25 जागतिक अजिंक्यपदांचा मानकरी

अव्वल स्नूकरपटू पंकज अडवाणीने 8 ऑक्टोबरला मलेशिया येथे कारकिर्दीतील 25 वा जागतिक करंडक जिंकला.

आपले शूटर, तिरंदाज, बॉक्सर, वेटलिफ्टरही जागतिक स्पर्धात चमकत आहेत. अ‍ॅथलेटिक्समध्येही आता नीरज चोप्रामुळे भालाफेकीचं ऑलिंपिक सुवर्णपदक आपल्याकडं आलं आहे. असं असूनही आपण सारं महत्त्व अजूनही क्रिकेटलाच देतो. त्यालाही हरकत नाही, पण त्यामुळे इतर खेळांवर अन्याय तरी करू नका, असं सांगावंसं वाटतं. आपल्या क्रिकेट चाहत्यांना तर सामन्यांत यश-अपयश असतंच हेच समजत नसल्यासारखं ते कायम विजयाचीच अपेक्षा करतात आणि पराभवानं निराशा पदरी आली की प्रचंड रागावून थयथयाट करतात! आगळा वेगळा जागतिक विक्रमवीर बनलेल्या पंकज अडवाणीचं यश खरोखरच अतुलनीय म्हणावं असंच आहे. म्हणून तर त्याची दखल घ्यायला हवी.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच सारं वातावरण क्रिकेटमय बनलंय. आधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याबरोबरच्या टी-20 सामन्यांच्या मालिका आणि नंतर थेट विश्वचषक टी-20 स्पर्धा. पुढील अर्धा महिना तरी हा माहोल कायम असणार. (नंतरही विविध दौरे आहेत). आपल्याकडं वर्तमानपत्रांत क्रीडा पानावरील बहुतेक सर्व जागा क्रिकेटच्याच बातम्यांनी व्यापलेली असते. बाकी बातम्यांना जेमतेम चार-सहा ओळींचा परिच्छेद एवढीच जागा मिळालेली दिसते. त्यामुळे क्वालालंपूर येथे जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेच्या अंतिम बेस्ट ऑफ सेव्हन सामन्यात भारताच्या सौरभ कोठारीचा 4-0 फ्रेम्स (गेम वा सेट प्रमाणे या खेळात एका डावाला फ्रेम म्हणतात आणि त्यात ज्याचे जादा गुण असतील तो फ्रेमचा विजेता ठरतो.) पराभव करून या स्पर्धेत लागोपाठ पाचव्यांदा अजिंक्यपद मिळवून एका आगळ्या वेगळ्या विश्वविक्रमाचा मानकरी झालेल्या पंकज अडवाणीच्या यशाबाबत मात्र जेमतेम चार-सहा ओळींचीच बातमी वाचायला मिळाली. त्यानं जागतिक बिलियर्ड्स आणि स्नूकर स्पर्धांत मिळून 2003 ते 2022 या काळात एकूण 25 विजेतीपदं मिळवली आहेत आणि यंदाच्या वर्षी तर भारतीय, आशियाई आणि जागतिक बिलियर्ड्स या तिन्ही अजिंक्यपदांचा मान संपादन केला आहे. “लागोपाठ पाचव्यांदा जगज्जेतेपद राखणं हे स्वप्नच वाटतंय” असं या विजयानंतर तो म्हणाला होता. ते काहीही असलं, तरी त्याच्या या भरघोस यशाची, निदान थोडीफार का होईना, दखल तरी घेतली गेली, यातच समाधान मानायची वेळ आली आहे.

एक गोष्ट खरी आहे की, बिलियर्ड्स हा काही लोकांना नावाखेरीज त्याचे बारकावे ठाऊक असलेला खेळ नाही. (गॉल्फ, स्क्वॉश यांच्याप्रमाणं तो सामान्यांपासून दूर असलेला खेळच समजला जातो.) अर्थात ‘वक्त’सारख्या काही सिनेमांमधील या खेळाच्या दृश्यांमुळं त्याची थोडीफार ओळख लोकांना झाली आहे. शिवाय दरम्यानच्या काळात याच्याशी साम्य असलेल्या नव्हे, याचाच एक प्रकार समजण्यात येणाऱ्या पण आकाराने लहान टेबलावर खेळल्या जाणाऱ्या ‘पूल गेम’ची तर आपल्याकडे लाटच आली होती. बराच काळ हा खेळ सलून्स किंवा बारमध्येच खेळला जातो अशी समजूत होती. त्यामुळं तो कमी दर्जाचा समजला जाई आणि त्याच्याकडे फारसं कोणी लक्ष देत नसे. त्यामुळे त्याच्या राष्ट्रीय, जागतिक स्पर्धा होतात हे कुणाच्या कानावरही पडत नसे.

बिलियर्ड्स खेळ हा मोठ्या कडा अससलेल्या मोठ्या कॅरमबोर्डसारख्या टेबलावर खेळाला जाणारा खेळ आहे. हे टेबल पूर्वीपासूनच महोगनी लाकडाचे असते. आकार आयताकृती असतो. त्याची लांबी 12 फूट आणि रुंदी 6 फूट 1.5 इंच असते. त्याच्या कडाही कॅरमबोर्डप्रमाणे जाड असतात. त्यामुळे चेंडू तेथे लोटून योग्य प्रकारे तो पॉकेटमध्ये धाडणे शक्य होते. टेबलावर फेल्टसारखे कापडाचे आच्छादन ताणून सर्वत्र सारखे राहील या प्रकारे बसवलेले असते. कॅरमप्रमाणेच चार कोपऱ्यांत पॉकेटस् असतात, शिवाय दोन लांब बाजूंच्या मध्यावरही एक-एक पॉकेट, अशी एकूण सहा पॉकेटस् असतात. त्यात क्यु (cue) च्या सहाय्याने चेंडू हलकेच धक्का देऊन ढकलायचे असतात. चेंडू योग्य प्रकारे पॉकेट केल्यावर खेळाडूला गुण मिळतात. खेळाची सुरुवात ठराविक बाजूने, ठरलेल्या ठिकाणापासूनच करावी लागते. नंतर मात्र खेळाडू कोणत्याही बाजूने चेंडू क्युच्या सहाय्याने लोटू शकतात. दोन्ही खेळाडूंना आलटून पालटून क्युने चेंडू ढकलण्याची संधी देण्यात येते. हे चेंडू 5.7 ते 6 सेंटीमीटर व्यासाचे असतात. पूर्वी ते हस्तिदंतापासून तयार केले जात आणि लागले तर जखम होईल एवढे जड असत. आता मात्र ते प्लॅस्टिकपासूनच बनवलेले असतात. क्यु 40 ते 60 इंच (100 ते 150 सें.मी.) लांबीचा काठीसारखा पण एका बाजूला निमुळता होत गेलेला असतो. या निमुळत्या बाजूचे टोक हे प्लॅस्टिक फायबर किंवा हस्तिदंताचा वापर करून भक्कम करण्यात आलेले असते आणि त्यावर चामड्याचे आच्छादन असते. त्या टोकाला खडूचा लहान ठोकळा सर्वत्र सारखा घासून समप्रमाणात लावला जातो. त्यामुळे चेंडूला स्पिन फिरकी मिळावी हा हेतू. याला ग्रेट ब्रिटनमध्ये ‘साइड’ तर अमेरिकेत ‘इंग्लिश’ असं म्हणतात. त्यामुळे चेंडूला आवश्यक दिशेने लोटणे शक्य होते. एका चेंडूने दुसऱ्याला लोटून तो पंर्किट करण्यात येतो. चेंडू रंगीत असतात आणि कोणता चेंडू पॉकेट केला तर किती गुण, त्याचप्रमाणे कोणत्या चेंडूने कोणता चेंडू ढकलून पॉकेट केला यावर गुण ठरवले जातात. ती मोजणी मोजक्या शब्दांत देणे अवघड आहे. म्हणून बिलियर्ड्स या खेळाची साधारण ओळख करून देऊन येथे थांबतो.

पण खरं तर बिलियर्ड्स तसंच स्नूकर या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी दीर्घकाळ चांगली चमक दाखवली आहे. विल्सन जोन्स हे भारताचे पहिले जागतिक बिलियर्ड्स विजेते. 1958 मध्ये त्यांनी हा पराक्रम केला. त्यानंतर पुन्हा 1964 मध्ये त्यांनी हा बहुमान पटकावला. मायकेल फरेरानं 1977, 81, 83 मध्ये असं यश मिळवलं. त्यानं हौशी आणि व्यावसायिक अशा दोन्ही स्पर्धांत अजिंक्यपद मिळवलं होतं. नंतर गीत सेठी 1985, 87 आणि 2001, मनोज कोठारी 1990, अशोक शांडिल्य 2002 आणि रूपेश शहा यांनीही हा बहुमान मिळवला होता. पण पंकज अडवाणीने या सर्वांना मागे टाकून, या सर्वांहून मोठं यश मिळवलं आहे. तेही बिलियर्ड्स या तीन (पंधरा अधिक एक अशा सोळा चेंडूंनीही या खेळाच वेगळा प्रकार खेळला जातो) आणि स्नूकर या 21 चेंडूंच्या खेळांत अर्थात याआधी भारताच्या खेळाडूंनीदेखील बिलियर्ड्स आणि स्नूकरमध्ये चमक दाखवली होती हे खरं. त्याकाळात विल्सन जोन्स, मायकेल फरेरा, गीत सेठी यांना चांगली प्रसिद्धी लाभली, तशी नंतरही अशोक शांडिल्य, मनोज कोठारी, रूपेश शहा यांनाही मिळाली. पंकज अडवाणीचं देखील त्यानं केवळ 17 व्या वर्षी जागतिक विजेतेपदाला गवसणी घातली, तेव्हा बऱ्यापैकी कौतुक झालं. पण नंतर पंकज म्हटलं की विजय असं समीकरणच बनायला लागलं आणि (बहुधा त्यामुळंच) त्याच्या वाट्याला येणारी जागा कमी कमी व्हायला लागली. 

हॉकीमध्येही काहीसं असंच चित्र होतं. 1928 पासून आपण सलग सहा ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकं मिळवली. तो जणू काही आपला हक्कच होता असं समजून त्याला फारसं महत्त्व दिलं गेलं नव्हतं. पण 1960 मध्ये रोम ऑलिंपिकमध्ये पाकिस्ताननं आपली मक्तेदारी मोडून काढली. तेव्हा त्या पराभवाचा खूपच गाजावाजा झाला आणि नंतर 1964 मध्ये टोकियोला आपण पुन्हा सुवर्णपदक मिळवलं, तेव्हा खूप कौतुक झालं. पण पुन्हा पराभवाची मालिका सुरू झाली होती. त्यामुळे 1975 मध्ये जेव्हां अजितपाल सिंगच्या संघानं जागतिक विजेतेपद मिळवलं तेव्हा त्या संघाचं वारेमाप कौतुक झालं, तरी त्यामुळं हॉकीत कामगिरीत सुधारणा न होता घसरणच सुरू राहिली. प्रमुख संघ नसलेल्या मॉस्को ऑलिंपिकचं सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचं कौतुक त्यामुळंच मोठ्या प्रमाणात झालं. तरी भारताला आजवर पुन्हा ते हॉकीचे सोनेरी दिवस दिसलेले नाहीत. सुदैवानं विश्वनाथन आनंद, प्रकाश पडुकोण, साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किडांबी श्रीकांत, लक्ष्य सेन इ. ना चांगली प्रसिद्धी मिळत आहे. सानिया मिर्झा, लिअँडर पेस, महेश भूपती यांनी टेनिस दुहेरीत अनेक मोठी विजेतीपदं मिळवली. त्यांनाही त्यामानानं बरी प्रसिद्धी मिळाली. (एरवीही दुहेरीच्या सामन्यांना का कोणजाणे थोडं कमीच लेखलं जातं, म्हणूनही असेल). पण ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धांत अनेक विजेतीपदे ही काही सामान्य कामगिरी नाही. आपले शूटर, तिरंदाज, बॉक्सर, वेटलिफ्टरही जागतिक स्पर्धात चमकत आहेत. अ‍ॅथलेटिक्समध्येही आता नीरज चोप्रामुळे भालाफेकीचं ऑलिंपिक सुवर्णपदक आपल्याकडं आलं आहे. असं असूनही आपण सारं महत्त्व अजूनही क्रिकेटलाच देतो. त्यालाही हरकत नाही, पण त्यामुळे इतर खेळांवर अन्याय तरी करू नका, असं सांगावंसं वाटतं. आपल्या क्रिकेट चाहत्यांना तर सामन्यांत यश-अपयश असतंच हेच समजत नसल्यासारखं ते कायम विजयाचीच अपेक्षा करतात आणि पराभवानं निराशा पदरी आली की प्रचंड रागावून थयथयाट करतात!

आगळा वेगळा जागतिक विक्रमवीर बनलेल्या पंकज अडवाणीचं यश खरोखरच अतुलनीय म्हणावं असंच आहे. म्हणून तर त्याची दखल घ्यायला हवी.

पंकज अडवाणीचा जन्म 24 जुलै 1985 रोजी पुण्यात झाला. तेथून काही काळातच त्याचं कुटुंब कुवेतला गेलं. काही काळ कुवेतला राहिल्यानंतर मात्र नंतर त्याच्या कुटुंबानं तेथून थेट बंगळुरुला बिन्हाड हलवलं व तो तिथलाच झाला. पंकजचं शालेय शिक्षण ‘फ्रँक अँथनी स्कूल’मध्ये झालं. नंतर ‘श्री भगवान महावीर जैन कॉलेज’मधून त्यानं कॉमर्सची पदवीही घेतली. पंकज दहा वर्षांचा असताना त्याची स्नूकरची आवड आणि त्याचं कौशल्य त्याच्या मोठ्या भावाच्या, म्हणजे डॉ. श्री अडवाणी, (स्पोर्ट अँड परफॉरमन्स सायकॉलॉजिस्ट), यांच्या ध्यानात ध्यानात आलं. आणि त्यांनी पंकजची गाठ एकेकाळी भारतीय स्नूकर विजेते असणाऱ्या अरविंद सवूर यांच्याशी घालून दिली. सवूर यांनी पंकजची गुणवत्ता हेरली आणि त्याला योग्य मार्गदर्शन देण्यास सुरुवात केली. अकराव्या वर्षीच पंकजनं एका स्थानिक स्पर्धेत पहिलं विजेतेपद मिळवलं आणि त्याची ती वाटचाल जागतिक पातळीवर आजतागायत सुरू आहे.

1999 मध्ये त्यानं इंग्लंडमधील जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेत भाग घेऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धात पदार्पण केलं. पंकजनं 2000 मध्ये पहिल्यांदाच भारतीय ज्युनि. बिलियर्ड्स स्पर्धा जिंकली आणि नंतर 2001 आणि 2003 मध्येही तो पराक्रम केला. 2003 मध्ये त्यानं पहिलं जागतिक विजेतेपद स्नूकरमध्ये मिळवलं. 17 व्या वर्षीच तो स्नूकरमधील सर्वात लहान वयाचा जागतिक विजेता ठरला. दोनच वर्षांनी त्यानं माल्टात झालेल्या जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेमध्ये पॉइंटस फॉरमॅट आणि टाइम्ड लॉंग फॉरमॅट या दोन्ही प्रकारात विजयी होऊन ‘अँड डबल’ केली म्हणजे दुहेरी विजेतेपद मिळवलं. नंतर 2008 (भारत-बंगळुरू), 2014 (इंग्लंड) आणि 2018 (म्यानमार) मध्येही त्यानं असंच दुहेरी यश मिळवलं होतं. हौशी बिलियर्ड्स आणि स्नूकर मध्ये एकाच वेळी जागतिक विजेतेपद मिळवणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. आता त्याच्याकडे बिलियर्ड्सची 17 (पॉइंट फॉरमॅट 8 लॉंग फॉरमेंट 8 आणि एक जागतिक सांघिक) विजेतीपदं आहेत आणि स्नूकरची आठ. आशियाई क्रीडा स्पर्धांतही त्यानं 2006 दोहा आणि 2010 गुआंगझाऊमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

भारतातील अनेक बहुमान पंकज अडवाणीनं मिळवले आहेत. 2004 मध्ये ‘अर्जुन पारितोषिक, 2006 मध्ये ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न’ पारितोषिक त्याला देण्यात आलं. आणि 2009 मध्ये ‘पद्मश्री’ आणि 2018 मध्ये ‘पद्मभूषण’ असे मानाचे किताब देऊन त्याला गौरवण्यात आलं आहे. ‘द प्रिन्स ऑफ इंडिया’, ‘द गोल्डन बॉय’ तसेच ‘द प्रिन्स ऑफ पुणे’ अशा नावांनीही पंकज अडवाणीला ओळखलं जातं. त्याची पत्नी सानिया शदादपुरी ही बॉलीवूडमध्ये मेक-अप आर्टिस्ट आहे. गेल्या वर्षी 8 जानेवारी 2021 रोजी त्यांचा विवाह झाला. जागतिक विजेतेपदांची पंचविशी गाठणाऱ्या या खेळाडूला सलाम!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: Billiards Championship 2022 World Billiards Champion sports billiards snooker marathi article on sports Load More Tags

Add Comment