मेस्सीची स्वप्नपूर्ती आणि एम्बापेचा स्वप्नभंग

रविवारी झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने गतविजेत्या फ्रान्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने मात केली.

telegraph.co.uk

गमतीचा म्हणावा असा योगायोग म्हणजे मेस्सी आणि फ्रान्सचा प्रमुख खेळाडू किलियन एम्बापे हे दोघे ‘पॅरिस ऑल सेंटस टीम’चे सदस्य आहेत. त्यामुळे कोणताही संघ विजयी झाला असता तरी ते यश पॅरिस ऑल सेंटस टीमचेच असणार, असं ते म्हणत होते. तसं पाहता या दोन संघांत उजवं डावं करणं अवघडच होतं आणि अंतिम सामन्यानं त्यावर शिक्कामोर्तबच केलं.

अखेर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचं स्वप्न साकार झालं. त्याच्या कारकिर्दीतील एकमेव उणीव भरून निघाली. कतारमधील विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ विजेता ठरला. अर्जेंटिनाला 1986 नंतर म्हणजे 36 वर्षांनंतर पुन्हा विश्वचषकावर नाव कोरता आलं. 36 वर्षांपूर्वी त्याचा हीरो होता, अर्थातच कर्णधार डिआगो मॅराडोना. लिओनेल मेस्सी तेव्हा जेमतेम एक वर्षाचा होता. पण तेव्हापासूनच बहुधा मॅराडोनाचं नाव त्याच्या कानावर पडत असणार. कारण अर्जेंटिना, उरुग्वे, ब्राझील या लॅटिन अमेरिकन देशांचा फुटबॉल हाच प्राण आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तिथं बहुतेक मुलं चालण्याबरोबरच फुटबॉल खेळायला शिकत असावीत. खरं तर त्यांना तो शिकवावा लागतच नसेल. कारण तो तर त्यांच्या रक्तात भिनलेलाच असतो, पेलेच्या ब्राझीलमधील मुलांप्रमाणेच. अर्थात अर्जेंटिनाने आता तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला आहे, आणि पेले तर सर्वांनाच आठवत राहणार, कारण 1958, 62 आणि 70 च्या स्पर्धांमध्ये विजेता ठरलेल्या, ब्राझील संघाचा तो आधारस्तंभच होता. ब्राझीलने नंतर 1992 आणि 2002 मध्ये हा चषक मिळवला होता. ब्राझीलप्रमाणे लागोपाठ दुसऱ्यांदा चषक जिंकण्याचं फ्रान्सच्या एम्बापेचं स्वप्न मात्र भंगलं..

तर लहानपणापासूनच मेस्सी मॅराडोनाचं नाव ऐकत आला आणि त्यामुळे त्याच्यापुढं काय करायचं हा काय करायचं हा प्रश्नच उरला नाही. त्यानं ठरवलं होतं नुसतं फुटबॉलपटू व्हायचं नाही तर मॅराडोनाप्रमाणंच विश्वचषक जिंकायचा. अर्जेंटिनानं 1978 आणि 86 मध्ये हा चषक जिंकला होता पण नंतर मात्र त्यांना यश आलं नव्हतं. मेस्सीनं तो चषक पुन्हा मिळवण्यासाठी शक्य ते सारं करायचं ठरवलं होतं. आणि त्याचे प्रयत्नही योग्य दिशेने होत होते. लहानपणी लिओनेल लहान चणीचा होता आणि त्यामुळं त्याला शाळेत, मैदानावर व इतरत्रही चिडवलं जायचं. त्याची वाढ नीट होत नव्हती. दहाव्या वर्षी त्याचं कारण कळलं. त्याच्यामध्ये ग्रोथ हार्मोन्सची कमतरता होती. ती इंजेक्शने देऊन भरून काढता येणार होती. पण त्याच्या वडिलांची कमाई जेमतेम म्हणावी अशीच होती. त्यामुळे महिन्याला एक हजार डॉलर ते या इंजेक्शनसाठी खर्च करू शकत नव्हते. त्यांनी मदतीसाठी अनेकांना विनवलं पण त्यांना यश मिळालं नाही. त्याचं फुटबॉलमधील कौशल्य तेव्हाही दिसत होतं.. पण तेथील क्लब त्याच्यासाठी हा खर्च उचलायला तयार नव्हते.

वडलांनी मग थेट बार्सेलोना गाठलं. तेथील बार्सेलोना क्लबनं या होतकरू खेळाडूसाठी हा खर्च करायची तयारी दाखवली आणि ते आश्वासन पाळलं. मेस्सीला कौशल्य वाढवायला तिथं पुरेपूर वाव होता कारण त्या अव्वल दर्जाच्या क्लबकडून अनेक नामांकित खेळाडू खेळत असत. तेराव्या वर्षापासूनच कुमारगटांतील सामन्यांत मेस्सीची चमक दिसू लागली. सतराव्या वर्षी त्यानं पुरुष गटातील सामना खेळला आणि पहिला गोल त्या सामन्यात नोंदवला. इतक्या लहान वयात असा पराक्रम करणारा तो क्लबचा पहिलाच खेळाडू होता. त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलंच नाही. यथावकाश तो अर्जेंटिनाकडून खेळू लागला आणि जगभरात त्याचं नाव आणखीच गाजू लागलं. 2002 मध्ये त्यानं विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केलं. त्यानंतरच्या 2006, 2010, 2014 आणि 2018 या सर्व स्पर्धांत तो खेळला पण त्याचा संघ दरवेळी विजेतेपदापासून दूरच राहिला.

अखेर यंदा सहाव्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळताना मात्र त्याचं स्वप्न साकार झालं. प्रमुख खेळाडू आणि कर्णधार अशी जबाबदारी त्याच्यावर होती आणि त्यानं ती समर्थपणे पेलली. त्याच्या संघानं अंतिम सामन्यात 3-3 बरोबरीनंतर टायब्रेकर- शूट आऊटमध्ये आधीच्या विजेत्या फ्रान्सचा पराभव केला. त्याचं श्रेय अर्थात मोठ्या प्रमाणात त्यांचा गोलरक्षक दिबु मार्टिनेझ याचं होतं. त्यानं आधीच प्रशिक्षक लिओनेल हॅकलोनी यांना सांगितलं होतं की मी शूट आऊटमध्ये दोन गोल अडवीन. त्याप्रमाणं त्यानं आपलं वचन पुरं केलं. प्रशिक्षकांच्या डावपेचांचाही या विजयात मोठा वाटा होता कारण त्यांना योग्य खेळाडूंची निवड तर केलीच पण जेव्हा गरज भासली तेव्हा खेळाडू बदलण्यातही अचूकता दाखवली होती. ते म्हणाले या यशात कोजिंग टीमचाही थोडा वाटा आहे, पण खरे मानकरी खेळाडूच आहेत!

लिओनेल मेस्सी आणि किलियन एम्बापे

गमतीचा म्हणावा असा योगायोग म्हणजे मेस्सी आणि फ्रान्सचा प्रमुख खेळाडू किलियन एम्बापे हे दोघे ‘पॅरिस ऑल सेंटस टीम’चे सदस्य आहेत. त्यामुळे कोणताही संघ विजयी झाला असता तरी ते यश पॅरिस ऑल सेंटस टीमचेच असणार, असं ते म्हणत होते. तसं पाहता या दोन संघांत उजवं डावं करणं अवघडच होतं आणि अंतिम सामन्यानं त्यावर शिक्कामोर्तबच केलं. कारण जादा वेळामध्येही बरोबरीची कोंडी फुटली नाही. त्यामुळंच पेनल्टी शूट आऊटवर सामन्याचा निकाल ठरवावा लागला. हा प्रकार तसा बेभरवशाचा आणि त्यामुळंच नशिबाचादेखील. कारण यात प्रतिस्पर्धी खेळाडू आणि गोलरक्षक यांना समसमान संधी असते. फील्ड गोलच्या वेळी मात्र चेंडूला किक मारणाऱ्याचं कौशल्य जास्त महत्त्वाचं असतं कारण गोलरक्षकाला त्यावेळी लक्ष एकाग्र करण्यासाठी संधीच नसते, पण शूट आऊटच्या वेळी मात्र त्याला ती मिळते आणि म्हणूनच योग्य अंदाजानं त्याला चेंडू अडवण्यात यश मिळू शकतं. नशीबाचा कौल यावेळी अर्जेंटिनाच्या बाजूनं होता. 

या विजयानंतर आपण लगेच खेळातून निवृत्त होणार नसल्याचं स्पष्ट करून मेस्सीनं त्याच्या चाहत्यांना मोठा दिलासाच दिला असला, तरीही पुढच्या 2026 च्या स्पर्धेत तो खेळेल की नाही, हे आताच सांगता येणार नाही, तरी ती शक्यता कमीच दिसते. कारण या स्पर्धेतही आधीच्या सामन्यांत तो फारसे प्रयास न करता रेंगाळतच चालायचा आणि जरुर तेव्हा मात्र कसब दाखवायचा. पण बहुधा त्यानं सर्वस्व अंतिम सामन्यासाठी राखून ठेवलं असावं कारण त्या सामन्यात तो अक्षरश: ‘यत्र, तत्र, सर्वत्र’ दिसत होता. त्याच्या सहकाऱ्यांना त्यामुळे स्फुरण चढत होतं. परिणामी या सामन्यात त्यांनी मध्यंतराआधीच 2 गोलची आघाडी घेतली होती. हे गोल मेस्सी आणि मारियानं अनुक्रमे 23 आणि 36 व्या मिनिटाला केले होते. पण फ्रान्सच्या एम्बापेने या आघाडीपुढं दबून न जाता आपला खेळ दाखवून सर्वांना थक्क केलं. 80 आणि 81 व्या मिनिटाला पाठोपाठ केवळ 97 सेकंदाच्या अंतरानं हे गोल करून सामना बरोबरीत आणताना सर्वांना आश्चर्यचकित होणं भाग पाडलं. नंतरच्या जादा वेळात मेस्सीनं 108 व्या मिनिटाला गोल केला आणि अर्जेंटिना संघाला आघाडी दिली. पण जादा वेळ संपण्यापूर्वी दोन मिनिटे एम्बापेनं तिसरा गोल तर केलाच पण अंतिम सामन्यात हॅटट्रिक करण्याचा बहुमानही मिळवला. त्यामुळे सामन्याचा निकाल शूट आऊटवरच झाला.

खरं तर या सामन्याच्या आधीपासूनच फुटबॉलप्रेमींमध्ये नेहमीच मॅराडोना श्रेष्ठ की मेस्सी हा वाद रंगत असे आणि मॅराडोनाचे चाहते अंतिम हुकमी एक्का म्हणून त्यानं विश्वचषक जिंकल्याचा दाखला देत असत. मेस्सीच्या चाहत्यांना त्यापुढं बोलता येत नसे कारण पाच वेळा या स्पर्धेत खेळूनही मेस्सीला चषक संघाला मिळवून देता आला नव्हता. पण आता मात्र ती उणीव त्यानं भरून निघाल्यानं त्याचे चाहते खुश झाले आहेत. वर आता ते म्हणू शकतात की हा सरळसरळ अगदी निर्भेळ विजय होता. असं म्हणण्याचं कारण म्हणजे मॅराडोनाच्या यशाला लागलेलं ‘हॅन्ड ऑफ गॉड’चं गालबोट. विजयी गोल करतेवेळी चेंडू त्याच्या हाताला लागून गेल्याचं पंचांना कळलंच नव्हतं आणि त्यामुळे तो कायमच चर्चेचा आणि वादंगाचा विषय ठरला. म्हणून अनेकदा तो हात देवाचाच होता असंही म्हटलं गेलं. पण खरं तर मेस्सी हा बऱ्याच काळपासून त्याच्या अगणित चाहत्यांसाठी देवच आहे. त्याबाबतचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. क्रिस्तिआनो रोनाल्डो या तितक्याच दर्जेदार खेळाडूचे चाहते एकदा म्हणाले की, रोनाल्डोला देवानंच पाठवलं आहे, हे कुणीतरी मेस्सीला सांगितलं. असं म्हणतात की, त्यावर मेस्सी म्हणाला, “मी तर कुणाला पाठवलेलं नाहीय!” यावरून त्याच्या चाहत्यांची निष्ठा आणि प्रेम कळावं.

केवळ आकडेवारीचाच विचार केला तर मेस्सी मॅराडोनापेक्षा केव्हाही श्रेष्ठच ठरतो. आणि आता तर त्याच्याकडे विश्वचषकही आहे. ती एकमेव उणीवही आता भरून निघाली आहे. तो मॅराडोनापेक्षा जवळपास दुप्पट सामने खेळला आहे हे खरं, पण एवढा काळ फिट राहण्याचं श्रेय त्याला द्यायलाच हवं. त्यानं मॅराडोनापेक्षा जास्त गोल केलेत आणि विश्वचषक स्पर्धेतही त्याचे गोल जास्त आहेत, मॅराडोनाचे आठ गोल आहेत, तर मेस्सीचे तेरा! आता तो विश्वचषक स्पर्धेत 27 सामने खेळला आहे आणि सर्वाधिक सामने खेळण्याचा मान त्याच्याकडे गेला आहे. लोथार मथायसचा 26 सामन्यांचा विक्रम त्यानं मागे टाकला आहे. या स्पर्धेत मेस्सीबरोबरच पोर्तुगालचा रोनाल्डो, ब्राझीलचा नेमार, पोलंडचा लेवांडोवस्की आणि फ्रान्सचा एम्बापे या पंचकडीकडंच सर्वांचं लक्ष होतं आणि त्यांनी अपेक्षेप्रमाणेच खेळ केला. रोनाल्डोला मात्र तो देशाकडून खेळताना पुरत्या जिद्दीनं खेळत नाही, या टीकेला उत्तर देता आलेलं नाही. यंदाही त्यानं अपेक्षाभंगच केला असं म्हणावं लागेल. बाकीच्यांनी मात्र आपल्या लौकिकाला न्याय दिला. पण त्यांच्या संघांना शूट आऊटमध्ये अपयश आलं पण मेस्सीच्या अर्जेंटिनाला तेथेही यशच मिळालं. 

डिआगो मॅराडोना

स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अर्जेंटिनाला सौदी अरेबियानं पराभवाचा धक्का दिला होता. पण त्यामुळंच मेस्सीचा संघ जागा झाला असं म्हणावं लागतं. अशा दुबळ्या संघाविरुद्धचं अपयश त्यांनी अखेर भरून काढून आपला लौकिक सिद्ध केला. (क्रिकेटच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही कमकुवत आयर्लंडकडून पराभूत झाल्यावर इंग्लंडने खेळ उंचावून अखेर चषक जिंकला होता, याची आठवण येते.)

आता नंतर काय? असा प्रश्न साहजिकच पुढे येतो. अर्जेंटिनाच्या मानानं फ्रान्सच्या संघात खूपच जास्त तरुण आणि दर्जेदार खेळाडू होते आणि या स्पर्धेच्या अनुभवाचा फायदा त्यांना होईल. पुढच्या वर्ल्डकपच्या वेळी एम्बापे 27 वर्षांचा असेल (20 डिसेंबरला तो 24 वर्षांचा झाला आहे). उलट मेस्सी खेळेल की नाही हे आजतरी ठामपणे सांगता येणार नाही. मात्र त्याच्या संघातले बरेच खेळाडू तेव्हा नसणार हे नक्की आहे. उलट एम्बापेशिवाय फ्रान्सचे मार्कस थुरम, एदुआर्दो कम्पाविंगा, किंग्जली कोमन, युसुफ फोन्ना, ऑरेलिअन त्सआमेनी हे आजचे नवोदित तेव्हा पूर्ण बहरात असतील. यंदा त्यांना जखमी बेझेमा करीमविना खेळावे लागले, पण त्यांचे इतर खेळाडूही तितक्याच दर्जाचे असल्यानं त्यांना त्याच्या अनुपस्थितीचा फटका बसला नाही. पुढच्या स्पर्धेसाठीही ते अशाच तयारीनं येतील असं समजायला हरकत नाही.

आजपर्यंतच्या 22 विश्वचषक स्पर्धांत ब्राझीलनं पाच, इटली आणि जर्मनीनं प्रत्येकी चार वेळा विजेतेपद मिळवलं आहे. ऊरुग्वे आणि फ्रान्स यांनी दोन वेळा तर इंग्लंड आणि स्पेननं एकदा हा चषक जिंकला आहे. अर्जेंटिनानं आता तीनदा या चषकावर आपलं नाव कोरलं आहे. जगभरचे सर्वाधिक देश हा खेळ खेळत असले तरी चषक जिंकणारे फक्त आठच देश आहेत. भारताला आजवर एकदाही मुख्य स्पर्धेत स्थान मिळवता आलेलं नाही, तरीही दूरचित्रवाणी आल्यापासून फुटबॉलची लोकप्रियता वाढतच आहे, कदाचित काही वर्षांनी भारताला मुख्य स्पर्धेमध्ये स्थान मिळवता येईलही. अन्यथा ते मिळवायचं तर त्याला आयोजकाचं म्हणजे यजमान देशाचं स्थान तरी मिळवावं लागेल. नजिकच्या भविष्यात तरी ते अवघडच वाटतं. पण तोवर या स्पर्धेच्या दर्जेदार खेळाचा आनंद लुटायला काय हरकत आहे?

एक मजेदार किस्सा असा - भारत मुख्य स्पर्धेत अपयशी का ठरतो याबाबत चर्चा सुरू असताना एकजण म्हणतो, “अरे त्यांचा खेळ, वेगवान धावणं पाहतानाच इथं दम लागतो, आपले सामने म्हणजे स्लो मोशनमध्ये सामना पाहिल्यागतच वाटतं. मग अशा संघांबरोबर खेळताना प्रत्यक्ष मैदानावर काय होईल? 

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: fifaworldcup worldcup qatar fifa cr football messi manchesterunited championsleague leomessi cristiano goldenboot parisangerman manunited worldcupqualifier soccer worldcupqualifiers doha wcq roadtoqatar uefa qualifiers ronaldo caf afc fifaworldcupqualifiers asianqualifiers africa liga asian फुटबॉल क्रीडा मॅराडोना लिओनेल मेस्सी फिफा वर्ल्डकप Load More Tags

Comments:

Sanjay Pujari

Super

Add Comment