आता सार्वकालिक सर्वश्रेष्ठ टेनिसपटू कोण?

नोवाक योकोविच आता राफा नदालच्या जोडीने 22 ग्रां प्री टेनिस मालिकांतील स्पर्धांत विजेता बनला आहे.

ग्रां प्री स्पर्धा मालिका व्यावसायिकांसाठी सुरू झाल्यानंतरचा या स्पर्धेचा 35 वर्षांचा योकोविच हा सर्वात जास्त वयाचा खेळाडू आहे. आणि त्याने त्याच्याहून 11 वर्षांनी लहान असणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करून हा विक्रम नोंदला. आणि 22 वे विजेतेपद मिळवून नदालच्या विक्रमाशीही बरोबरी केली. नदालने 69 सामन्यांत 22 ची मजर गाठली होती तर योकोविचने 68 सामन्यांतच त्याची बरोबरी केली आहे. फेडररला मात्र 20 विजेतेपदे 80 सामन्यांनंतर कमावता आली होती. कोर्टवर पूर्णपणे संयम राखलेला योकोविच नंतर आपली टीम बसली होती, तेथे गेला आणि मग मात्र त्याला एवढा वेळ आवरलेले आनंदाश्रू आवरणे अशक्य झाले.

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत 10 वे अजिंक्यपद मिळवताना चौथे सीडिंग मिळालेल्या योकोविचने तिसरे सीडिंग मिळालेल्या स्टिफानोस त्सित्सिपासचा सरळ सेटमध्ये 6-3, 7-6, 7- 6 असा पराभव करून मेलबर्नमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व नव्याने सिद्ध केले. आणि येथील नऊ अजिंक्यपदाचा स्वतःचाच विक्रम आणखी उंचावला. येथील वर्चस्व नव्याने म्हणायचे कारण म्हणजे गेल्या वर्षी नियमाप्रमाणे लसीकरण करून न घेतल्याने त्याची ऑस्ट्रेलियातून हकालपट्टी केली गेली. त्यामुळे त्याला स्पर्धेत सहभागी होणे शक्य नव्हते. पण यंदा मात्र तसा नियम नसल्याने विनाअडथळा तो स्पर्धेत सहभागी झाला आणि जवळपास विनाअडथळाच विजेताही बनला. संपूर्ण स्पर्धेमधील सात सामन्यांत त्याने केवळ एकच सेट गमावला होता. दुसऱ्या फेरीच्या त्या सामन्यात कौआकौडने दुसरा सेट टायब्रेकरवर 7-6 असा जिंकला होता. पण योकोविचने तो सामना तसा विनासायास 6-1, 6-7 6-2, 6-0 असा जिंकला होता. तर महिला एकेरीचे विजेतेपद अरीना सबालेंकाने मिळवले आहे. महिलांच्या अंतिम सामन्यात अरीना सबलेंकाने एलेना रायबाकिनावर 4-6, 6-3, 6-4 अशी मात करून आपले ग्रां प्री मालिकांतील पहिलेच अजिंक्यपद संपादन केले होते.

योकोविच या स्पर्धेत जेव्हा जेव्हा उपान्त्य फेरीत पोहोचला तेव्हा तेव्हा त्याने विजेतेपदच मिळवले आहे. मुख्य म्हणजे त्याचे प्रमुख प्रतिस्पर्धी फेडरर आणि नदाल त्याला येथे कधीच हरवू शकलेले नाहीत, ही बाबच त्याचे येथील वर्चस्व दाखवते. विम्बल्डनवर फेडररचे, खुल्या फ्रेंच स्पर्धेत नदालचे तसेच ऑस्ट्रेलियन स्पर्धेत योकोविचचेच प्रभुत्व दीर्घकाळ दिसत आले आहे. येथे तो विनासायास खेळतो अगदी घरच्याप्रमाणे! त्याच्यावर यंदा फारसे दडपण नव्हते. अमेरिकन खुल्या स्पर्धेचा विजेता अल्काराझ दुखापतीतून न सावरल्याने या स्पर्धेत उतरलाच नव्हता; तर कट्टर प्रतिस्पर्धी, प्रथम सीडेड नदाल दुसऱ्या फेरीतच पराभूत झाला होता. अ‍ॅन्डी मरेही हरला होता, तसा झ्वेरेवही प्रगती करू शकला नव्हता. नवोदित सिन्नरचे, रुनचे तसेच रुडचे आव्हानही संपले होते. आणि ज्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या तो सातवे सीडिंग असलेला मेदवेदेव तर तिसऱ्या फेरीतच अनपेक्षितरीत्या गारद झाला होता. त्यामुळे त्याला आव्हान देऊ शकेल असा एकच प्रतिस्पर्धी, तिसरे सीडिंग असलेला त्सित्सिपासच उरला होता आणि अपेक्षेनुसार त्यांची गाठ अंतिम फेरीत पडली. योकोविचने पहिल्या फेरीत बाएनाचा 6-3; 6-4; 6-0असा; दुसऱ्या फेरीत कौआकॉडचा 6-1, 6-7 6-2, 6-0 असा दिमित्रेवचा तिसऱ्या फेरीत 7-6, 6-3; 6-4 असा चौथ्या फेरीत डि मिनारचा 6-2, 6-1 6-2 असा, उपात्न्यपूर्व फेरीत रुब्लेवचा 6-1 6-2, 6-4 असा तर उपान्त्य फेरीत, या स्पर्धेत 2009नंतर प्रथमच उपान्त्यफेरी गाठणाऱ्या अमेरिकेच्या पॉलचा 7-5; 6-1, 6-2 असा पराभव केला होता. केवळ यावरूनच योकोविचचे वर्चस्व किती होते ते कळून येईल. आणि त्सित्सिपासने चांगला खेळ केला आणि जिद्दीने लढत दिली, तरी अंतिम सामन्यामध्येही त्याने आपली पकड जराही ढिली पडू दिली नाही.

योकोविचने पहिल्याच सेटमधील सहाव्या गेममध्ये त्सित्सिपासची सर्व्हिस भेदली आणि आघाडी घेतली ती कायम राखली. पण हेही मान्य करावे लागेल की, आकडेवारीवरून दिसते तितका काही त्सित्सिपास फिका पडला नव्हता. प्रत्येक गुणासाठी तो झुंजत होता. त्याचे बॅक हॅन्डचे फटके सुरेखच होते पण योकोविचही ते परतवताना आपली अचूकता दाखवून गुण मिळवत होता. फटक्यांची पेरणीही त्सित्सिपास करत होता आणि योकोविचला इकडून तिकडे पळवत होता. एकदा तर त्या प्रयत्नात योकोविच तोल जाऊन पडला. पण सुदैवाने त्याला काही इजा झाली नाही. तशी त्याला या स्पर्धेत मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने थोडी काळजीच होती. त्याने तसे बोलूनही दाखवले होते. पण त्यानंतरही त्याच्या हालचाली मंदावल्या नव्हत्या वा फटक्यांतील जोर आणि अचूकता कमी झाली नव्हती. अनेकदा सर्व्हिस परतीच्या फटक्यांवर आणि डाउन द लाइन म्हणजे कोर्टच्या बाजूच्या सीमारेषेलगत मारलेल्या फटक्यांनी त्याने त्सित्सिपासला निरुत्तर केले होते. त्सित्सिपासच्या खेळात आधीच्या दोन आठवड्यांमध्ये दिसलेली सहजता आणि प्रवाहीपणा अंतिम फेरीत दिसेनासा झाला होता. बहुधा अंतिम सामन्यात आणि तेही योकोविचबरोबर खेळत असल्याचे दडपणच त्याच्यावर असावे. कारण आधीच्या या दोघांत झालेल्या सामन्यांपैकी दहा योकोविचने तर केवळ त्सित्सिपासने जिंकले होते.

तरीही नाऊमेद न होता त्सित्सिपास चिवटपणे झुंजत होता. आपली सर्व्हिस वाचवत होता. पण योकोविचची सर्व्हिस भेदण्यात मात्र त्याला यश मिळत नव्हते. परिणामी दुसऱ्या सेटमध्ये 6-6 अशी बरोबरी झाली आणि टायब्रेकरचा अवलंब करावा लागला आणि तेथे मात्र योकोविचने वर्चस्व सिद्ध केले आणि टायब्रेकर 7-4 असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये त्सित्सिपासने सुरुवातीलाच योकोविचची सर्व्हिस भेदण्यात यश मिळवून आघाडी घेतली, पण त्याची ही आघाडी फार काळ टिकली नाही कारण लगेचच योकोविचने त्सित्सिपासची सर्व्हिस भेदून सामना पुन्हा बरोबरीत आणला. दोघेही आपले कौशल्य आणि सर्वस्व पणाला लावून खेळत होते आणि त्यामुळे बरोबरीची कोंडी फुटत नव्हती. हा सेटही टायब्रेकरवर जाणार अशी चिन्हे दिसत होती आणि तसेच झाले. टायब्रेकरमध्ये प्रथम त्सित्सिपास दडपण असल्यासारखा खेळत होता व योकोविच आपल्या खेळाची पातळी उंचावली होती आणि 5-0 अशी मोठी आघाडी मिळवली होती. पण त्सित्सिपासने नंतर तीन गुण मिळवून टायब्रेकर 5-3 वर आणला. योकोविचकडे तीन मॅच पॉइंट होते. पण त्सित्सिपासने पाठोपाठ दोन गुण जिंकले आणि पुन्हा 5-5 अशी बरोबरी झाली. पण 21 ग्रां प्री अजिंक्यपदांचा मानकरी असलेल्या योकोविचने त्याला तेथेच थोपवले आणि टाय ब्रेकर 7-5 असा जिंकला आणि अजिंक्यपद मिळवून नदालशी बरोबरी साधली. आपल्या कारकीर्दीतला हा सर्वात मोठा विजय आहे, असे योकोविचने सामन्यानंतर सांगितले. या विजयामुळे योकोविच व्यावसायिक टेनिसपटूंच्या क्रमवारीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ग्रां प्री स्पर्धा मालिका व्यावसायिकांसाठी सुरू झाल्यानंतरचा या स्पर्धेचा 35 वर्षांचा योकोविच हा सर्वात जास्त वयाचा खेळाडू आहे. आणि त्याने त्याच्याहून 11 वर्षांनी लहान असणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करून हा विक्रम नोंदला. आणि 22 वे विजेतेपद मिळवून नदालच्या विक्रमाशीही बरोबरी केली. नदालने 69 सामन्यांत 22 ची मजर गाठली होती तर योकोविचने 68 सामन्यांतच त्याची बरोबरी केली आहे. फेडररला मात्र 20 विजेतेपदे 80 सामन्यांनंतर कमावता आली होती. कोर्टवर पूर्णपणे संयम राखलेला योकोविच नंतर आपली टीम बसली होती, तेथे गेला आणि मग मात्र त्याला एवढा वेळ आवरलेले आनंदाश्रू आवरणे अशक्य झाले. काही काळ तो तोंड झाकून घेऊन रडतच होता. येथील विक्रमी दहा अजिंक्यपदांखालोखाल त्याने विम्बल्डनला सात अजिंक्यपदे मिळवली आहेत, अमेरिकन खुल्या स्पर्धेत तो तीन तर फ्रेंच खुल्या स्पर्धेमध्ये तो दोनदा विजेता ठरला आहे. त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अजिंक्यपदांपैकी 20 त्याने केवळ 2011 नंतरच्या दशकात मिळवली. गेल्या वर्षी विम्बल्डन विजेतेपद हे त्याचे 21 वे जेतेपद होते.

फेडररच्या निवृत्तीमुळे आता सार्वकालिक सर्वश्रेष्ठ (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) टेनिसपटू बनण्याच्या स्पर्धेत आता नदाल आणि योकोविच हे दोघेच उरले आहेत. ते साधारण बरोबरीचेच आहेत. नदाल 36 तर योकोविच 35 वर्षांचा आहे. आता त्यांच्यातला कोण जास्त काळ खेळू शकतो ते महत्त्वाचे. कारण नदाल गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे त्रस्त आहे. त्याला काही स्पर्धांना मुकावे लागले आहे. त्याचे वैशिष्ट्य असे की, सामना खेळताना दुखापत झाली, वा असलेली वाढली, तरी तो सामन्याचा निर्णय होईपर्यंत खेळतो. सामना मध्येच सोडणे त्याला आवडत नाही असे तो म्हणतो, पण त्यामुळे त्या दुखापतीचे गांभीर्य अधिकच वाढते. त्यामानाने योकोविपुढे असा प्रश्न क्वचितच उद्भवतो. त्यामुळेच त्याने गेल्या दशकात कोणत्याही खेळाडूहून जास्त विजेतीपदे संपादन केली आहेत. त्यामुळेच पुन्हा पहिल्या क्रमांकावर जाण्याच्या शर्यतीत कोण आघाडी घेणार हे सांगणे अवघड आहे. कारण यानंतर महत्त्वाची खुली फ्रेंच स्पर्धा आहे!

मानाच्या मोठ्या स्पर्धेत प्रथमच विजयी ठरणाऱ्या अरीना सबालेंकाने आपल्या जोरदार प्रभावी सर्व्हिसचा पुरेपूर उपयोग करून घेतला. तिने 17 वेळा बिनतोड (एस) सर्व्हिस केली. मात्र तिच्याइतक्याच ताकदीने फडके मारणाऱ्या रायबाकिनाला मात्र केवळ नऊ वेळाच बिनतोड (एस) सर्व्हिस करता आली. सबालकाचा खेळ नेहमीप्रमाणेच झाला म्हणजे तिने सुरुवात तशी चाचपडतच केली आणि बिनतोड सर्व्हिसचा फायदा झाला तरी तिने सात वेळा सर्व्हिसच्या दुहेरी चुका (डबल फॉल्ट) केल्या. त्यामुळे पहिला सेट तिने गमावला. पण काही काळानंतर तिचा जम बसला आणि सामन्याच्या दुसऱ्या सेटमध्ये तिने हळूहळू आपली पकड बसवण्यास सुरुवात केली. रायबाकिनाची लय बिघडवण्यात तिला यश आले. तिने दुसरा सेट जिंकला. आणि निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये रायबाकिनाने प्रयत्न करूनही तिला सामन्यावर पकड मिळवता आली नाही, कारण सबालकाचे निर्विवाद वर्चस्व होते. सामन्याची सूत्रे तिने स्वतःकडेच ठेवली होती. जबरदस्त ताकदीचे आणि तितकेच अचूक फटके ही तिच्या खेळाची खासियत होती. त्यांमुळेच तिचा आत्मविश्वास वाढत गेला. त्या जोरदार फटक्यांना रायबाकिनाकडे उत्तर नव्हते. सामन्यानंतर बोलताना सबालेंका म्हणाली की मीच माझी सायकॉलॉजिस्ट आहे, त्यासाठी मला अन्य कुणाची गरजच नाही. 

अरीना सबालेंका

पुरुषांच्या विजेत्याचे हे 22वे, तर महिला विजेतीचे हे पहिलेच विजेतेपद असा पुरुष आणि महिला स्पर्धेतला अगदी जाणवण्याजोगा फरक होता. त्याचबरोबर अद्यापही फेडरर निवृत्त झाला असला, तरी नदाल आणि योकोविच यांच्यापुढे खऱ्या अर्थाने आव्हान उभे करणारा खेळाडू अद्याप दिसत नाही. मध्येच कुणी विजेता बनतो, नाही असे नाही. पण त्यांच्यात या तीन शिलेदारांएवढे सातत्य आढळत नाही. एकेरीत भारताचे कोणीही खेळाडू मुख्य स्पर्धेसाठी पात्रता फेरीतून येऊ शकले नाहीत, तरी दुहेरीत मात्र सायना मिर्झा आणि रोहन बोपण्णा खेळले. त्यांनी अंतिम फेरीही गाठली, तरी त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. स्टेफानी आणि मातोस या जोडीने त्यांच्यावर 6-7 (2-7); 2-6 अशी मात केली.

महिला दुहेरीत सायनाला दानिलिनाच्या साथीने खेळताना दुसऱ्याच फेरीत व्हॅन युत्वांकिना आणि कालिनीना या जोडीकडून 4-6; 6-4; 2-6 अशी हार पत्करावी लागली. बोपण्णालाही पुरुष दुहेरीत एडबेनच्या साथीने खेळताना मिडलर आणि एडबेन या जोडीकडून 3-6; 5-7 असा पराभव पत्करावा लागला. अन्य दोन्ही भारतीय खेळाडूंच्या असलेल्या जोड्याही पहिल्या फेरीपुढे आगेकूच करू शकल्या नाहीत. युकी भांब्री व मायनेनीला माइल्स आणि पिअर्सने 6-7; 7-6; 3- 6 असे, तर रामनाथन व रेयेस वरेला यांना एस. सित्सिपास आणि पी. त्सित्सिपास या जोडीने 6-3, 5-7-3-6 असे पराभूत केले होते.

स्पर्धेतील अन्य विजेते :

पुरुष दुहेरी: जे. कुबलर-हिजिकाटा (विजयी विरुद्ध न्यिस झीलिन्स्की 6-4; 7-6 (7-4) महिला दुहेरी: क्रेयकिकोवा-सिनिआकोवा (विजयी विरुद्ध आयोमा-शिबाहारा 6-4, 6-3) कुमार एकेरी: अलेक्झोडर ब्लॉक्स विजयी विरुद्ध लीमर निएन 6-1 2-6, 7-6 (11-९) मुली एकेरी: अलीना किर्नीव्हा विजयी विरुद्ध मीर्रा आंद्रीवा 6-7 (2-7), 6-47-5.

29 जानेवारीचा रविवार हा क्रीडारसिकांसाठी सुपर संडेच होता. 19 वर्षांखालील मुलींच्या जागतिक करंडक क्रिकेटच्या विसेवीस (टी ट्वेटी) अंतिम सामन्यात शेफाली वर्मा या भारतीय संघाने इंग्लंडवर सात गडी राखून सहजी मात करून आपले वर्चस्व सिद्ध केले. तर पुरुषांच्या क्रिकेटच्या विसेवीस (टी ट्वेंटी) सामन्यांच्या मालिकेत भारताने न्यूझीलंडला सहा गडी राखून हरवले आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत जर्मनीने सुरुवातीला पिछाडीवर असूनही नंतर जिद्दीने सामना लढवला त्यामुळे सामना संपतेवेळी त्यांना तीन तीन अशी बरोबरी साधता आणि नंतर त्यांनी टायब्रेकरवर गतविजेत्या बेल्जियमला पराभूत केले. टायब्रेकरच्या त्याच्या पहिल्या फेरीतही तीन तीन अशी बरोबरी झाली. त्यामुळे सडन डेथचा अवलंब करावा लागला आणि अखेर जर्मनीने 5-4 असा विजय नोंदवला. या महत्त्वाच्या स्पर्धेत भारताचा संघ विजयी झाला तर त्यातील प्रत्येक खेळाडूला एक कोटी रुपये देण्यात येतील, असे आयोजक ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जाहीर केले होते. परंतु मायदेशी खेळत असूनही भारतीय संघाला फारसे यश मिळाले नाही. आणि उपान्त्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले. नंतर अंतिम क्रमवारी ठरवण्यासाठी झालेल्या सामन्यांत त्याला नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com 
(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)

Tags: अरीना सबालेंका नोवाक योकोविच 22 ग्रां प्री टेनिस Load More Tags

Add Comment