लोणार. तसे आडवळणाचे गाव. विदर्भ आणि मराठवाडा या भौगोलिकदृष्ट्या वेगळ्या असणाऱ्या दोन प्रदेशांतील दोन परिसर, नाती, भाषा आणि संस्कृती यांना जोडणारे सीमेवरचे गाव पण लोणार म्हणजे जगद्विख्यात, जगप्रसिद्ध उल्कापातामुळे निर्मित जगातल्या तीनपैकी दोन नंबरचे आणि बेसॉल्टीक खडकातले जगातले एकमेव सरोवराचे गाव.
मी याच लोणार सरोवराच्या काठी लहानाचा मोठा झालो. सरोवराच्या अंगाखांद्यावर खेळलो, वाढलो परंतु त्या काळात सरोवराविषयी फार काही कुतूहल किंवा वेगळेपणा जाणवायचे नाही किंवा जाणवलेही नाही. जसे आपण कुटुंबासोबत राहतो अगदी तसेच हे सारे झाले पण इयत्ता आठवीत असताना शाळेत तारांगण दाखवणारा कृत्रिम फुगा कुण्या संस्थेने आणला आणि तिथून थोडेसे अंतराळ, त्यातल्या घटना आणि त्यातली तारामंडळे, सप्तर्षी, दूधगंगा, अश्नी, धूमकेतू वैगरे काही बाबी जुजबी स्वरूपात समजायला लागल्या. याच दरम्यान काही काळाने शाळेत विदेशातून एक टीम आली. त्यात लोणार सरोवर आणि एकूण त्यासंबंधीची माहिती गोळा करण्यासाठी हे काही शास्त्रज्ञ विदेशातून आले होते. त्यांनी स्थानिक शाळेतील काही विद्यार्थ्यांची निवड केली आणि योगायोगाने मीही त्या तेरा विद्यार्थ्यांमध्ये निवडला गेलो.
ही खऱ्या अर्थाने सरोवराची आणि माझी पहिली शास्त्रीय ओळख असेच म्हणावे लागेल. तेरा दिवस आम्ही विद्यार्थी या चमूसोबत सरोवरात फिरत होतो. त्यांत विविध खनिजे, पाण्याचे गुणधर्म, आतली मंदिरे, पशुपक्षी आदी बऱ्याच गोष्टींवर हे लोक बोलायचे. अर्थात त्या काळात इंग्लीश फारसे चांगले नसल्यामुळे फार काही कळायचे नाही तरी काहीतरी कानावर पडायचे आणि त्यातून हे सगळे वेगळेच विश्व आहे हे मात्र प्रकर्षाने जाणवले. तेथील दगड, माती, झाडे यांची सुरू असलेली बारीक तपासणी, विविध झाडांची आणि पक्ष्यांची फोटोग्राफी, त्यासाठी त्यांच्याकडे असलेले विविध कॅमेरे आणि साधने पाहिली आणि लोणार सरोवर हे काही साधेसुधे नसून ते एक वेगळे, वैज्ञानिकदृष्ट्या खास असे ठिकाण आहे हे कळले.
चंद्रावरील आणि लोणार सरोवरातील खडक आणि माती, दोन्ही एकाच प्रकारचे आहे. इथे कोणतीही वनस्पती वाढू शकते इतकी ती माती सुपीक आहे. या सरोवराचे पाणी खारे आहे. त्यात क्षाराचे प्रमाण आणि त्याचा खारटपणा हा समुद्रापेक्षाही जास्त आहे. उल्का पडल्यामुळे हे सरोवर तयार झाले. हजारो वर्षांपासून हे पाणी साचलेले असल्यामुळे इथे एक प्रकारे दलदल निर्माण झाली आहे... त्यामुळे पाण्याखाली खूप प्रमाणात गाळ आहे म्हणून या पाण्याची खोली मोजता येत नाही. इथे विविध प्रकारचे पशुपक्षी, झाडे-वनस्पती आहेत. अशा काही गोष्टी त्या काळात या चमूकडून शिकायला मिळाल्या. याव्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी होत्या परंतु वयाने लहान असल्यामुळे आम्ही त्या फार गंभीरपणे घेतल्या नाहीत. सरोवरात अभ्यासाच्या नावाखाली हुंदडायला जायचे, तिथली फळे खायची, कुठूनही खाली उतरून वर यायचे हा नित्यक्रम चालूच राहिला. त्या वेळी सरोवरातील मंदिरात वटवाघळांच्या सोबत किंवा दहशतीत आतली मंदिरे बघितली आणि त्याच सरोवराची ही वेगळी बाजू समोर आली. जोडीला पौराणिक कथाही होत्याच.
सरोवर म्हणजे फक्त देवीच्या दर्शनाचे ठिकाण समजलेले लोणार सरोवर शास्त्रीयदृष्ट्या आधी समजून घेऊ. जवळजवळ पन्नास हजार वर्षांपेक्षाही आधी या विवराची निर्मिती ‘उल्कापातामुळे’ झाली. उल्कापात म्हणजे थोडक्यात अंतराळात मुक्तपणे फिरणारे तुकडे आणि त्यांनी कक्षा ओलांडली की पृथ्वीच्या किंवा इतर ग्रहांच्या गरुत्वाकर्षणामुळे ते त्या ग्रहाच्या पृष्ठभागावर आदळून होणारी क्रिया. तर अशीच एक उल्का जिला पृथ्वीच्या कक्षेत आल्यावर अश्नी म्हणतात ती आत्ताच्या लोणार गावाशेजारी येऊन आदळली. ही अश्नी दहा लाख टन वजनापेक्षाही जास्त वजनाची होती. ती वीस किलोमीटर/सेकंद या प्रचंड वेगाने आदळली आणि अग्नीचे, धुळीचे आणि राखेचे ढग तयार झाले. परिणामस्वरूप तिचा जो खड्डा झाला त्याचा व्यास 1.8 किलोमीटर आणि खोली 150 मीटर आहे. त्यालाच आपण लोणार सरोवर म्हणून ओळखतो. अवकाशातून आलेली उल्का सरोवराच्या आत 600 मीटर खोल गाडली गेली.
जगात उल्कापातामुळे झालेले असे छोटेमोठे बरेच खड्डे आहेत. परंतु बेसॉल्ट खडकामधील उल्कापातामुळे निर्मित हे जगातले एकमेव सरोवर आहे. जगातील नैसर्गिक खाऱ्या पाण्याच्या सरोवरात आकारमानाने तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर किंवा विवर आहे. लोणार सरोवर हे शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत वेगळे आणि दुर्मीळ आहे. याविषयी संशोधन झाले असले तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. यात सापडणारे खडक, वनस्पती, क्षार, शेवाळ, जिवाणू, विषाणू असे खूप काही असल्यामुळे संशोधन करण्यास विपुल व्याप्ती आहे. सन 1823मध्ये इंग्रज अधिकारी जे. ई. अलेक्झांडर याने हे सरोवर जगापुढे आणले. त्यानंतर विविध विभागांतील शास्त्रज्ञांनी यावर संशोधनही केले आहे. याव्यतिरिक्त ऋग्वेदात याचा संदर्भ सर्वात जुना आहे. तसेच स्कंदपुराण, पद्मपुराण आणि आईना-ए-अकबरी यांमध्येही याचा उल्लेख आहे.
लोणार सरोवर उल्कापातामुळे किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झाले असे दोन मतप्रवाह आहेत परंतु हे उल्कापातामुळे झाले असेच आज तरी मानण्यात येते. लोणार सरोवर हे भूगर्भीय, पुरातत्त्व, पर्यावरण आणि आंतराळिकदृष्ट्या संशोधनाचे मुख्य ठिकाण मानण्यात येते. येथील माती आणि खडक चंद्रावरच्या माती-खडकाशी जुळतात म्हणून इथे एक बोर्डही होता. आता काही कामादारम्यान तो काढून टाकला असावा किंवा पडून गेला असावा. त्यावर लिहिलेले होते, ‘चंद्रावरच्या खडकाशी साम्य जयाचे जुळे, हेच ते लोणारचे खाऱ्या पाण्याचे तळे’.
खारे पाणी, नैसर्गिक संपदा, आयुर्वेदीय वनस्पती, विविध खडक, प्राणी, पक्षी आणि मंदिरे असे खूप काही लोणारला बघायला मिळते. लोणार सरोवराच्या निर्मितीपासूनच खगोलीय ते भूगर्भीय गोष्टींची उलथापालथ आणि त्यांची वैशिष्ट्ये बऱ्याच शास्त्रज्ञानी अभ्यासली आहेत आणि मतेही मांडली आहेत. असा सगळा आघात झाल्यानंतर किती प्रचंड प्रमाणात उलथापालथ झाली असेल हे वेगळे सांगायला नको. इथे अनेक प्रकारचे दुर्मीळ किंवा इथेच मिळणारे खडक, खनिज, काचमनी, पाण्यावर तरंगणारे दगड सापडतात. चुंबकीय दगड, लोहयुक्त माती, मौल्यवान स्फटिके आणि विविध प्रकारचे गुणधर्म असलेले खूप खडक, दगड, माती अशा बऱ्याच गोष्टी या सरोवराला अनोखे करतात. इथल्या पाण्यातील क्षारांचे प्रमाण, आम्लारी गुणधर्म म्हणजेच सरोवराच्या पाण्याची पीएच लेव्हल इतकी जास्त असूनही त्याच्या बाजूला घेतलेल्या छोट्याशा खड्ड्यात मात्र गोड पाणी मिळते. या पाण्यात कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही परंतु यात विविध प्रकारचे जिवाणू, विषाणू, हरितनील शेवाळ आहेत. पॉलिथिन विरघळणारे हे जगातले एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
इथला परिसर हिरवाईने नटलेला आणि वृक्षवनराईने श्रीमंत आहे. आयुर्वेदातील बऱ्याच दुर्मीळ वनस्पती येथे सापडतात. सरोवराच्या चोहोबाजूंना वन्यजीव अभयारण्य आहे. विपुल प्रमाणात झाडे, झुडपे आणि निसर्गाचे देखणे रूप आहे. यातून फिरण्याचा आनंद इथे आल्याशिवाय अनुभवता येत नाही. पावसाळा ते हिवाळा संपूर्ण सरोवराभोवतीचा भाग हिरव्यागार वनराईने नटलेला असतो. चोहोबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार डोंगरात खाली सरोवराचे हजारो वर्षे वय असलेले पाणी आणि आतली जैवविविधता तर आहेच...
शिवाय यांच्याबरोबरच या वन्यजीव अभयारण्यात मोर, ससे, घोरपड, विषारी-बिनविषारी साप, अजगर, तरस, कोल्हा, लांडगा, हरीण, नीलगाय, मुंगूस, खार, माकड आदी प्राणी आहेत. आता इथे बिबट्याचाही वावर आहे. फार आधी इथे पट्टेदार वाघही होते परंतु मानवी हस्तक्षेपामुळे आणि बराच काळ शेती केल्यामुळे प्राण्यांचा वावर कमी झाला पण आता आतली शेती बंद केल्यामुळे पुन्हा नव्याने हे प्राणिजीवन इथे निपजते आहे. त्यातही या करोनाच्या काळात सरोवर संपूर्णपणे बंद असल्यामुळे त्याचा या वन्यजीवसृष्टीला फायदाच झाला आहे. लोणार सरोवर सगळ्याच बाजूंनी शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. तसेच ते ऐतिहासिक आणि पुरातत्त्व दृष्टीनेही महत्त्वाचे आहे.
लोणार सरोवराच्या परिसरात आणि गावात शिल्पकलेच्या आणि इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची आणि प्रेक्षणीय अशी बरीच मंदिरे, बारव आहेत. ही मंदिरे, स्मारके 1500 वर्षांच्या कालावधीत विविध राज्यांच्या कार्यकाळांत बांधली गेली आहेत. लोणार सरोवर परिसरात 32 मंदिरे, 17 स्मारके, 13 कुंड आणि 5 शिलालेख आहेत यांपैकी 27 मंदिरे, तीन स्मारके, सात कुंड आणि तीन शिलालेख सरोवराच्याच परिसरात आहेत आणि इतर वर गावाच्या परिसरात आहेत. इथली मंदिरे आणि कुंड म्हणजे आणखी वेगळा अनुभव.
सरोवरात जाण्याचा बराच जुना मार्ग म्हणजे जुन्या रेस्ट हाऊसपासून आत उतरण्यासाठी केलेल्या दगडी पायऱ्या. आता मात्र त्याची खूप दुरवस्था झाली आहे. तसे आणखी पर्यायी मार्ग आहेत. या पायऱ्यांनी खाली उतरल्यावर लागते ते ‘रामगया’ हे यादवकालीन अतिशय सुंदर असे मंदिर आहे. याच्या बाजूलाच शंकर-गणेश मंदिर आहे. मातीखाली दाबले गेल्यामुळे याची पडझड झाली आहे. यात रामेश्वराची आयताकृती पिंड आहे आणि सुंदर गणपतीही आहे. बाजूला रामगया मंदिर आहे. याची रचना आणि वास्तुकलाही बघण्यासारखी आहे. गर्भगृहात पाहिल्यावर इथे तीन मूर्त्या दिसतात. तिन्ही बाजूंनी प्रकाशयोजना करून केलेली ती रचना कमाल आहे. शिल्प आणि शिलालेखही या मंदिरावर आहेत. समोर पाण्याच्या काठावरून जाताना विष्णू मंदिर आहे. यातली शिल्पेही अनोखी आहेत. इथे चार पायांवर उभे असलेले तीन पुरुष आणि कृष्णाची वेगवेगळी शिल्पे आहेत. त्याच वाटेवर समोर वाघ-महादेव मंदिर आहे. समोर मोर मंदिर आहे. या दोनही मंदिरांत आकर्षक शिल्पे आहेत. लज्जागौरी आणि कामशिल्पे या मंदिरात आहेत.
नंतर चालत आपण देवीच्या मंदिरापर्यंत येतो... जे इथले बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत असलेले आणि मुख्य आकर्षण किंवा कुलदैवत असलेले ठिकाण आहे. इथे देवीची मूर्ती आहे. समोर एक विहीर आहे. तिला सासू-सुनेची विहीर म्हणतात. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच विहिरीतले पाणी देवीच्या दाराकडून गोड लागते तर विरुद्ध बाजूने खारट लागते. बाजूला अंबरखाना मंदिर आहे. इथे चक्रधर स्वामींचे आसन आहे. लोणारचा उल्लेख लीळाचरित्रातही आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य काही काळ लोणारला होते आणि ते ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणांना आसन असे संबोधतात. अशी त्यांची 11 आसने इथे आहेत. याशिवाय शुक्राचार्यांची वेधशाळा हे मंदिर आहे. यातही बरीच दुर्मीळ शिल्पे आहेत. ही पुरातन काळातील वेधशाळा आहे. आज मात्र तिची दुरवस्था झाली आहे. इथल्या एका शिळेतून वेगवेगळे ध्वनी येतात. आणखी एक मंदिर यज्ञावल्केश्वर हे मंदिर आणि आयुर्वेदाचे तज्ज्ञ याज्ञवस्क्येश्वर यांची आयुर्वेद औषध निर्माण प्रयोगशाळा होती. तिथे आता फार काही नाही परंतु त्यांच्या प्रयोगातून आणि घेतलेल्या भट्टीतून उरलेल्या राखेची इथे एक टेकडी आहे जिला भस्म टेकडी म्हणतात.
...याशिवाय सीतान्हाणी ही सतत वाहणारी गोड पाण्याची धार आहे. त्यासमोरच कुमारेश्वर मंदिर आहे. हेही मंदिर प्रेक्षणीय आहे आणि पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. इथून वर चढत येताना पापहारेश्वर हे अतिप्राचीन मंदिर आणि धार लागते. इथे सुंदर मंदिर आणि नंदी मंडप आहे. यावर होयसाळ राजाचे राजचिन्ह आहे. तसेच येथून एक भुयारी मार्गही आहे जो दैत्यसूदन मंदिराच्या परिसरातील त्रिपुरुष मठात निघतो. यांच्या बाजूला हटकेश्वर मंदिर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे इथली पिंड ही पूर्व-पश्चिम आहे.
यानंतर आपण येतो ते भव्यदिव्य अशा लोणारच्या धारेवर. ही अखंडपणे वाहणारी धार आणि बाजूला असलेल्या भरपूर मंदिरांचा समूह खूपच आकर्षक आणि महत्त्वाचा आहे. या धारेखाली अंघोळ करण्यासाठी सुंदर असा घाट आहे. त्यातच दगडी कमानींचे वस्त्र बदलण्याचे ठिकाण आहे. बाजूला कुंड आहे. वर चोहोबाजूंनी मंदिरे आहेत. यावरही खूप सुंदर शिल्पे आहेत. धारेची रचना खूपच सुंदर आणि वेगळी आहे. हे त्या काळातील स्थापत्यशास्त्राचे वेगळे उदाहरण आहे. इथे स्नान केल्याने पापाचा क्षय होतो आणि पुण्यसंचय होतो असे मानले जाते. इथे बाराही महिने भाविकांची गर्दी असते. इथून आपल्याला सरोवराचे विहंगम दृश्य दिसते. याच ठिकाणाहून उल्का जमिनीत शिरली होती असे मानले जाते. इथून पुढे गेले की आपण गावात येतो. तिथून बाजूलाच चुंबकीय हनुमानाची भव्य झोपलेली मूर्ती आणि मंदिर आहे. त्याच्या बाजूनेसुद्धा वरून लोणार सरोवराचे विहंगम आणि सुंदर दृश्य बघता येते.
मुख्य जुन्या गावात आल्यानंतर लागतात ते बघितलेच पाहिजे असे भव्य दैत्यसूदन मंदिर आणि त्रिपुरुष मठ. हे मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्र आणि शिल्पे यांचा अनोखा संगम आहे. इथे फिरताना आपण पूर्णपणे हरवून जातो. कामशिल्पांपासून ऐतिहासिक, पौराणिक अशी सगळीच शिल्पे या मंदिरावर आहेत. मुळात मंदिराची रचना आणि भव्यताच आपल्या नजरेत पहिल्याच वेळेस भरते आणि मग पुढचा प्रवास खूपच आनंददायी ठरतो. इथेच त्रिपुरुष मठ आहे. त्यातही काही शिल्पे आहेत. याशिवाय गावात लिंबी बारव, अगस्ती तीर्थ, जैन मंदिर, दुर्गा टेकडी अशी ठिकाणे आहेत.
ही सगळी मंदिरे वाकाटक राजाच्या काळापासून यादवांच्या काळापर्यंतची आहेत. लोणार सरोवर हे संपूर्णपणे एक वेगळे ठिकाण आहे. जगाच्या पाठीवर कुठेच नसलेल्या असंख्य गोष्टी इथे आहेत. निसर्ग आहे, इतिहास आहे, भूगर्भापासून अंतराळापर्यंतचे नाते आहे, अरण्य आहे, पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत. लोणार सर्वच बाजूंनी समृद्ध आहे. इथे विदेशी पक्षीही स्थलांतर करून येतात. नुकताच म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच रामसर म्हणजे जागतिक पाणथळ क्षेत्र म्हणून लोणारला दर्जा देण्यात आला आहे. ते ‘अ’ दर्जाचे पर्यटनस्थळ आधीच आहे... मात्र लोणार सरोवराचा आणि अभयारण्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. जागतिक दर्जाचा हा ठेवा दुर्दैवाने काहीसा दुर्लक्षित राहिला आहे.
- डॉ. विशाल इंगोले,
रामनगर, लोणार (सरोवर)
vishalingole78@gmail.com
Tags: लोणार सरोवर बुलढाणा सरोवर डॉ. विशाल इंगोले पर्यावरण lonar lake lonar lake lonar temple vishal ingole Load More Tags
Add Comment