दिसो लागे मृत्यू... परि न घाबरले हे...

'मृत्यू पाहिलेली माणसं' या पुस्तकाचा परिचय

प्रतिकूल परिस्थितीशी झुंजण्याची शक्ती निसर्गाने सगळ्यांनाच दिलेली असते... पण याची जाणीव फार कुणाला नसते... कारण तशी वेळ आलेलीच नसते... पण जेव्हा केव्हा ती वेळ येते तेव्हा मात्र प्रथम धक्का बसल्यासारखे झाले तरी त्यातून तो सावरतो आणि सारे काही आता संपले असे वाटत असतानाच जगण्याची ऊर्मी त्याला नवी चेतना देते. काहीही करून परिस्थितीबरोबर झुंजायला त्याला मनोबल देते आणि जेव्हा केव्हा त्याचे मनोबल संपले असे वाटते तेव्हाच असे काहीतरी घडते की, तो हार न पत्करता पुन्हा झुंजण्यासाठी सिद्ध असतो. ही झुंज असते जगण्यासाठी... साक्षात मृत्यू समोर असतानाही हार न मानणाऱ्या या माणसांचे म्हणूनच कौतुक तर वाटतेच... शिवाय त्याचबरोबर वाचकालाही कुठेतरी ताकद देऊन जाते. अर्थातच अशा मृत्यू पाहून आलेल्या माणसांच्या कहाण्या रंजक होतात आणि त्याबरोबरच त्यांच्या जिद्दीला, चिकाटीला आणि प्रयत्नांनाही वाचक नकळत सलाम करतो.

‘मृत्यू पाहिलेली माणसं’ या पुस्तकामध्ये लेखिका गौरी कानेटकर यांनी अशाच मृत्यू पाहिलेल्या माणसांच्या नऊ कहाण्या सांगितल्या आहेत. पुस्तकाचे उपशीर्षक मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या असे आहे आणि हे या कहाण्यांचे अचूक वर्णन आहे. ‘संकटाच्या वावटळीत तग धरून राहणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्यांना...’ असे म्हणणारी पुस्तकाची अर्पणपत्रिकाही तितकीच साजेशी आहे. 

अद्यापही दहशत असलेल्या कोविड-19 अर्थात करोनाने लोकांच्या मनात भय निर्माण केले आहे. इतके की, अनेकांना मरणाची चाहूल लागल्यासारखे वाटते आहे. त्यांनी या कहाण्या वाटल्या तर त्यांना जाणवेल की, आपले मन हाच आपला मुख्य आधार आहे आणि त्याची विजिगीषु वृत्ती ही आपली ताकद आहे... त्यामुळेच मनाची उभारी कायम असली की माणसामध्ये नवे चैतन्य येते, जगण्याची उमेद वाढते आणि तीच त्याला तारून नेते.

घटना कितीही रंजक, उत्कंठावर्धक, थरारक आणि उत्सुकता जागृत ठेवणारी असली तरी ती सांगणाऱ्याच्या कौशल्याला फार महत्त्व आहे. कथनकाराचे कौशल्य या साऱ्या घटनेला वेगळेच परिमाण मिळवून देते. लेखिका ही संपादकही आहे आणि त्यामुळे नेमके काय कथन करायचे आणि ते किती प्रमाणात सांगायचे आणि कोठे थांबायचे हे तिला माहीत आहे. सोबतच ती एक उत्तम कथाकथनकार - स्टोरी टेलर आहे... त्यामुळे ती वाचकाला खिळवून ठेवते आणि मग वाचक या कथा एकामागून एक वाचतच जातो. 

या साहसवीरांच्या साहसांवर बेतलेल्या पुस्तकांमधून या साऱ्या कथा तिने घेतलेल्या आहेत आणि ही निवडही वैविध्यपूर्ण असल्याने कथा एकसाचीपणाच्या होत नाहीत. मृत्यूला जवळून पाहिलेले कथानायक वा नायिका कथेत अपरिहार्यपणे आहेत... पण घटना मात्र वेगवेगळ्या भागांतील, काळांतील आणि परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्यांच्या आहेत. कुणी दाट जंगलात हरवले आहे तर कुणी विमान बर्फात कोसळल्याने निर्जन भागात अडकले आहे, कुणी समुद्रसफरीत वाट चुकले आहे तर कुणी एकाकी निर्जन बेटावर काळ काढते आहे. तरीही या संकटांतून त्यांची सुटका होते. याला थोडीफार इतरांच्या प्रयत्नांची, नशिबाची साथ असली तरीही हार न मानता प्रयत्न न सोडण्याच्या निश्चयाची त्यांची महती कमी होत नाही. 

निसर्ग मानवाची कसोटी कशी पाहतो, त्याच वेळी ती पार करण्याची जिद्दही देतो असे यावरून वाटते. साधारण शंभर वर्षांपूर्वीच्या घटनेपासून अगदी अलीकडील म्हणजे 2012मधल्या घटना लेखिकेने निवडल्या आहेत. काळ कितीही बदलला, कितीही सोयीसुविधा झाल्या, नवनवी उपकरणे, सामग्री तयार होत असली तरीही माणसावर अचानक संकट येतेच आणि तो एकाकी पडतो. तेव्हाच त्याच्या धैर्याची, जिद्दीची आणि सहनशीलतेची कसोटी लागते हे आपल्याला या कहाण्या वाचताना जाणवते.

सुरुवातीला 1981मध्ये ॲमेझॉनच्या जंगलात चुकून तब्बल 21 दिवस सोबत्यापासून फारकत झाल्याने योसी घिन्सबर्गला एकाकी भटकंती करावी लागते आणि त्या काळात काय घडते आणि अखेर त्याचा मित्र केव्हिन याच्याशी त्याची गाठ कशी नाट्यमयरीत्या पडते याची ही कहाणी आहे. योसी धिन्सबर्गने स्वतःच लिहिलेल्या ‘जंगल - ट्रू स्टोरी ऑफ सर्व्हायव्हल इन ॲमेझॉन’ या पुस्तकात कथन केली आहे. हॉलीवूडमधील ‘जंगल’ हा सिनेमा याच पुस्तकावर आधारलेला होता. 

तब्बल नऊ देशांना व्यापून असणारे ॲमेझॉनचे घनदाट जंगल हे जगातील सर्वांत मोठे पर्जन्यवन आहे. त्यात मैलोन्‌मैल माणसाचा मागमूसही नसतो... असतात फक्त विषारी वेली, वनस्पती, प्राणी, कीटक, सततच्या पावसाने पडलेला पाचोळ्याचा खच आणि अर्धी पाण्यात गेलेली झाडे. मयसभेप्रमाणे जमीन भासणाऱ्या पण पाय पडताच खेचणाऱ्या दलदली असे सारेच आव्हानात्मक असल्याने हे जंगल माणसांना आकर्षून घेते... भूल पाडून खेचून घेतल्याप्रमाणे. 

इस्रायलच्या एकवीस वर्षांच्या योसीलाही अशी भूल पडते. जोडीला तिला समधर्मा दोन साथीदारही बोलिव्हियात भेटतात. अमेरिकेचा केव्हीन आणि स्वित्झर्लंडचा मार्क्स. दोघेही 29 वर्षांचे. कार्ल हा ऑस्ट्रिअन त्याच्या संशोधन मोहिमेत येण्याचा आग्रह या तिघांना करतो. तिथे सोने सापडते वगैरेबाबत शंका वाटली तरी साहसाची ओढ त्यांना कार्लला होकार द्यायला लावते. ‘जंगलामध्ये महिनाभर भटकंती करून अनुभवसमृद्ध होऊन परतायचं...’ असा त्यांचा विचार असतो... पण प्रत्यक्षात काय घडते, त्यांना संकटांमागून संकटांना सामना कसा द्यावा लागतो, योसी एकटा कसा पडतो आणि मरणाच्या दारातून कसा परत येतो त्याची ही संक्षिप्त कहाणी. ती मुळातूनच वाचायला हवी.

दुसरी कहाणी आहे इमॅक्युली इलिबागिझाची. ती 1994मध्ये रवांडात झालेल्या तुत्सी जमातीच्या आठ लाखांवर लोकांच्या नरसंहाराची साक्षीदार आहे. ती स्वतः तुत्सी आहे... त्यामुळेच तिला हे सारे पाहावे लागले. आपल्या माणसांपासून दुरावल्या गेलेल्यांना मृत्यूच्या छायेत जगण्याची वेळ येते तेव्हा त्यांचे काय होते ते तुत्सीच्या अनुभवातून उमगते. कुठेतरी इमॅक्युली आपलीशी वाटते. 

Immaculée Ilibagiza on Hope for the Future| National Catholic Registerतिने लिहिले आहे - एकदा का जगण्याची इच्छा संपली की तुम्हाला कुणी वाचवू शकत नाही. आम्हीही या टोकावर हातो... पण कशी कोण जाणे... माझ्या मनात मात्र जगण्याची इच्छा टिकून होती. ज्या अर्थी इतक्या हालअपेष्टा सहन करून मी वाचले आहे त्या अर्थी मला जगवण्यामागे देवाचे काहीतरी प्रयोजन असणार. मी जगायला हवे. अखेर ते प्रयोजन तिला सापडते... आपण जगलोय ते आपली कहाणी, रवांडाची कहाणी जगाला सांगण्यासाठी. त्यासाठी ‘लेफ्ट टू टेल - डिस्कव्हरिंग गॉड अमंग होलोकास्ट’ हे पुस्तक तिने लिहिले. पुस्तकात ती म्हणते - ही कहाणी वाचल्यावर एखाद्या तरी व्यक्तीला वांशिक-धार्मिक-जातीय अस्मितेतला फोलपणा कळून येईल का? 
आपल्यालादेखील हा प्रश्न पडतो.

अँडीजवरचा चमत्कार या कहाणीत हिमशिखरांमध्ये, जिथे मरण सोपे, यातनांपासून सुटका करणारे ठरू शकते अशा अमानवी वातावरणात विमानातील प्रवाशांपैकी 16 जण कसे तग धरून राहतात ते सांगितले आहे. 12 ऑक्टोबर 1972 रोजी विमान कोसळल्यावर तब्बल सत्तर दिवस ते मृत्यूशी सामना करत होते. त्या सर्वांची हकिकत ऐकून पॉल रीड या लेखकाने ‘अलाइव्ह’ हे पुस्तक लिहिले. त्यात तो पूर्णपणे समरस झाला होता... त्यामुळे ही कहाणी इतकी जिवंत झाली की त्या सोळा जणांनी पॉलला वाचलेला सतरावा ठरवले. 

या घटनेबाबत नँडो पॅरेडोने ‘मिरॅकल ऑन अँडीज’ आणि रॉबर्ट कनोसाने ‘आय हॅड टू सर्व्हाइव्ह’ अशी पुस्तके लिहिली. लेखिकेने मुख्यतः अलाइव्हचा आधार घेतला आहे. अगणित अडचणी, संकटांचा मुकाबला करून मदत मिळवण्यात यशस्वी झालेले आणि रॉबर्ट हेच कथानायक आहेत आणि मृत्यूला पुरून उरलेल्या तरुणांची ही कहाणी वाचल्यावर आश्चर्यचकित होणाऱ्या वाचकांनाही हा चमत्कारच वाटेल.

केवळ बारा वर्षांचा पोर, डॉन फेंडलर अमेरिकेतल्या कटाहदीन पर्वतावरील जंगलात हरवतो आणि आपल्या मदतीला कोणी येणार नाही याची जाणीव त्याला होते तेव्हा त्याच्यात जगण्याची जिद्द कशी निर्माण होते; तो अविश्वसनीय वाटावा असा नऊ दिवसांचा काळ कशी लढत देतो; थोडेसे झोपून, बराचसा गुंगीत, खडतर परिस्थितीत रोज 20 ते 25 किलोमीटर चालतो. हे कळण्यासाठी ही कहाणी वाचावी. 

कोणाचीही सोबत नसताना बारा वर्षांच्या मुलाने केलेले हे साहस माणसाच्या जीवनासक्तीचे प्रतीकच म्हणायला हवे असे लेखिका म्हणते. त्याच्याशी आपण सहमत होतो. 1939च्या या घटनेवर स्वतः डॉन फेंडलरने 1978मध्ये ‘लॉस्ट इन द माउंटन मेन’ हे पुस्तक लिहिले. नंतर जगभर आपला अनुभव मुलांना सांगत ते जगभर फिरले.

पन्नास वर्षांपूर्वी ज्युलिअन कोपेकला विमान कोसळल्यानंतर ॲमेझॉनच्या जंगलात दहा दिवस पायपीट करावी लागली. तिच्या मनात त्या काळात घडणाऱ्या उलथापालथीची कहाणी जंगलात येऊन पडलेल्या मुलीची गोष्ट. दहा हजार फुटांवरून कोसळूनही केवळ मामुली जखमांवर आपले कसे निभावले हे तिला उमगत नाही. त्या घटनेनंतर चाळीस वर्षांनी तिने ‘व्हेन आय फेल फ्रॉम द स्काय’ हे त्या वेळच्या जंगलातल्या अकरा दिवसांच्या अनुभवाचेच नाही तर त्या काळातील मनात घडलेल्या खळबळीचे आणि नंतरच्या आयुष्याची कहाणी सांगणारे पुस्तक लिहिले.

या पुस्तकात ती म्हणते - ‘मी असामान्य अजिबातच नव्हते. आजही नाही. आईवडिलांनी मला जंगलाच्या सान्निध्यात वाढवलं म्हणून मी तिथे तरू शकले... पण माझ्या जागी अन्य कुणी असतं तरी त्यांनीही तेवढंच धाडस केलं असतं असामान्य परिस्थिती त्या-त्या वेळी आपल्याला असामान्य बनवते हे त्यामागचं खरं कारण आहे.’ लेखिकेने याच पुस्तकाधारे ही कहाणी सांगितली आहे.

एक गिरीप्रेमी, ॲरन रॅल्टसन हा अमेरिकेतल्या कॅनिअनच्या एका घळीत अडकतो, जवळजवळ पाचसहा दिवस झुंज देऊन खडकाच्या फटीमध्ये अडकलेला आपला हात स्वतःच तोडून तो सुटका करून घेतो... त्याची कहाणी... 127 तासांची झुंज. श्वास रोखणारी. घळीतून सुटकेची हकिकत आणि त्या संकटातून बाहेर पडल्यानंतर सुरळीत जीवन सुरू करेपर्यंतचा त्याचा लढा त्याने ‘वन ट्‌वेंटी सेव्हन अवर्स - बिटवीन अ रॉक अँड अ हार्ड प्लेस’ या पुस्तकामध्ये लिहिला आहे. इच्छाशक्तीचे बळ समजून घ्यायचे तर हे पुस्तक वाचायला हवे. 

आता हे सारे संपून जाऊ दे... हा विचार घळीत अडकलेला असताना जितक्या वेळा येतो त्याहीपेक्षा जास्त वेळा हॉस्पिटलमध्ये असताना ॲरनच्या मनात येत असतो... पण आईवडिलांच्या आणि मित्रांच्या साथीने तेही दिवस पार पडतात. हात गमावल्यानंतरही त्याचे गिरीप्रेम कमी झालेले नाही. आता कृत्रिम हात बसवल्यावरही ॲरन भटका गिरीप्रेमीच राहिला आहे.

समुद्राच्या लाटांवर एक वर्ष काढणाऱ्या जोस सॅल्वडोर अल्वरेंगा या मच्छीमाराची कहाणी 2012च्या नोव्हेंबरमधली. दहाव्या वर्षापासून मासेमारीचेच काम करणाऱ्या जोसला जमिनीवरील व्यवहारापेक्षा प्रशांत महासागराचीच ओढ जास्त असते. तो मोठ्या वादळांना घाबरून जमिनीवर थांबणारा नसतो. एक नवखा पोरगेलासा तरुण तो पार्टनर म्हणून शोधतो. एक दिवसाचा तर प्रश्न आहे असे अनुभवी जोसला वाटत असते... पण नंतर त्याला कोणकोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते त्याची ही श्वास रोखून धरायला लावणारी कहाणी. 

त्याच्या एल साल्वाडोपासून दहा हजार किलोमीटर भरकटत तो ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्याला मार्शल आयलंड्‌समधील एका छोट्या बेटावर पोहोचतो. तो दिवस असतो 30 जानेवारी 2014चा. तग धरून राहण्यासाठी समोर येणाऱ्या संकटाशी आणि बदलांशी जुळवून घेण्याची माणसाची शक्ती किती कमालीची असते हे दाखवून देणाऱ्या अल्वरेंगाचे नाव इतिहासात कायमचे नोंदवले गेलेले असते असे लेखिका म्हणते.

हायवेवर अनोळखी व्यक्तीला आणि तिच्या साथीदारांना लिफ्ट देण्याची चूक रिकी मेगीने केली. नवी नोकरी सुरू होण्याआधी तो सुट्टीवर निघालेला असतो आणि त्या मूडमध्येच त्याने या अनोळखी लोकांची विनंती मानतो... पण त्यामुळेच त्याच्या जिवावरच बेतते. त्याच्या मोटारीत बसल्यानंतर काही काळातच ते दुष्ट रिकीला गुंगीचे औषध पाजून, ऑस्ट्रेलियाच्या विस्तीर्ण आणि निर्जन वाळवंटात मरण्यासाठीच फेकून देतात... पण रिकी सहजी हार मानणाऱ्यांतला नसतो. निर्जन वाळवंटात अस्तित्वाची लढाई ही त्याने हार न मानता जिंकली ती ही कहाणी. रिकीच्या सांगण्यावर कित्येकांचा विश्वासच बसत नव्हता... पण पत्रकार ग्रेग मॅक्लीनने रिकीच्या सविस्तर मुलाखती घेऊन ‘लेफ्ट फॉर डेड इन द आऊटबॅक’ हे पुस्तक लिहिले. अस्वस्थ करणारी ही कहाणी वाचता-वाचता शहारल्यासारखे होते.

अखेरची ॲडा ब्लॅकजॅकची कहाणी तर कळसाध्याय म्हणावी लागेल. मुलाला उपचार देण्यासाठी पैसे हवेत म्हणून, संशोधकांची मदतनीस म्हणून, जिथून कुणी जिवंत परतत नाही अशी समजूत असलेल्या, निर्जन बेटावर गेलेल्या तेवीसवर्षीय एस्किमो महिलेला अखेरीला एकटीलाच जीव तगवण्यासाठी, हिवाळ्यात शून्याखाली 29 अंश तपमान असलेल्या बर्फाळ प्रदेशात झुंज द्यावी लागते... जवळजवळ दोन वर्षे. ती ही कहाणी. 

या रँगल बेटावरील मोहिमेतील कागदपत्रांचा अभ्यास करून जेनिफर निवेन या लेखिकेने लिहिलेले ॲडा ‘ब्लॅकजॅक - ट्रू स्टोरी ऑफ सर्व्हायव्हल इन द आर्क्टिक’ हे पुस्तक 2003मध्ये प्रकाशित झाले. निर्जन रँगल बेटावरून परतल्यानंतर ॲडा अमेरिकेत स्थायिक झाली. ती 1983मध्ये वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी मरण पावली. अशा या अचाट साहसी माणसांच्या कहाण्या... मृत्यूला पाहून परतलेल्या या माणसांना प्रत्येक वाचकाने भेटायलाच हवे!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


मृत्यू पाहिलेली माणसं - मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या
लेखिका - गौरी कानेटकर
प्रकाशक - समकालीन  प्रकाशन, पुणे 30.
पाने - 146,   किंमत - रुपये 200/-

Tags: पुस्तक पुस्तक परिचय आ. श्री. केतकर गौरी कानेटकर समकालीन प्रकाशन मृत्यू पाहिलेली माणसं A S Ketkar Book Review Marathi Samkalin Prakshan Gauri Kanetkar Book Introduction Load More Tags

Add Comment