अतुलनीय, एकमेव... नोवाक योकोविच!

महिला एकेरीत अमेरिकेच्या 19 वर्षांच्या सहाव्या सीडेड कोको गॉफने दुसऱ्या सीडेड अरिना सबलेंकाचा पराभव केला. 

योकोविच म्हणाला की, माझी बालपणाची स्वप्ने आता मी प्रत्यक्षात जगतो आहे. जगातला सर्वात मोठा टेनिसपटू व्हावे असे मला सात-आठ वर्षांचा असताना वाटत होते आणि आता खरोखरच ती इच्छा पूर्ण झाली आहे. मेदवेदेवने त्याच्याबद्दल बोलताना सांगितले की, आम्ही प्रथम मी 15 वर्षांचा असताना भेटलो होतो. पण तेव्हा तो जसा होता, तसाच आताही आहे. यशामुळे त्याच्यात काहीच बदल झालेला नाही. तो त्याच साधेपणाने वागतो..

जगातील आजचा सर्वोत्तम टेनिसपटू कोण याचे उत्तर आता मिळाले आहे. सर्बियाचा 36 वर्षांचा नोवाक योकोविच आता त्याला ‘महान, द ग्रेट योकोविच’ असे म्हणावे लागेल. या वयात अशी मजल गाठण्याची अविश्वसनीय वाटावी अशी कामगिरी केल्याबद्दल त्याचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच पडेल. त्याच्या जिद्दीला आणि चिकाटीला, आणि पराभवाने खचून न जाता, सतत प्रयत्न करत राहण्याच्या वृत्तीला सलाम!

यंदाची अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकून ‘ग्रँड स्लॅम मालिके’तील स्पर्धांतील 24 वे अजिंक्यपद मिळवण्याचा पराक्रम त्याने केला. त्याचप्रमाणे महिलांमध्ये 1960 च्या दशकात अशी कामगिरी करणाऱ्या मार्गारेट कोर्टच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. या बाबतीत रॉजर फेडरर आणि राफा नदालबरोबर त्याची स्पर्धा होती. या मालिकेत 20 जेतीपदे मिळवणारा फेडरर गतसाली निवृत्त झाला, आणि योकोविच आता 22 अजिंक्यपदे मिळवणाऱ्या नदालच्या दोनने आघाडीवर गेला आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकून त्याने नदालच्या विक्रमाशी बरोबरी केली होती आणि फ्रेंच स्पर्धा जिंकून त्याने नदालला मागे टाकले. नदालही 37 वर्षांचा आहे. आणि दुखापतींनी त्याला सतत त्रास होतो, त्यामुळे आता नोवाकची बरोबरी साधणे त्याला खूपच अवघड आहे असे वाटते. दोन वर्षांपूर्वी डानिल मेदवेदेवने अंतिम फेरीत योकोविचवर मात केली होती, हा विजय मिळवून योकोविचने त्याची परतफेड केली. पण त्यावेळी त्या पराभवाने त्याचे एका वर्षात ग्रँड स्लॅम करण्याचे स्वप्न साकार होऊ शकले नव्हते. कारण ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि विम्बल्डन येथे तो अजिंक्य ठरला होता. एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या विजयाबरोबरच तो आता जागतिक क्रमवारीत पुन्हा पहिल्या स्थानावर आला आहे.

महिला एकेरीत अमेरिकेच्या 19 वर्षांच्या सहाव्या सीडेड कोको गॉफने दुसऱ्या सीडेड अरिना सबलेंकाचा 2-6, 6-3, 6-2 असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर तिने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले होते. लहान वयात ही स्पर्धा जिंकणारी ट्रेसी ऑस्टिन आणि सेरेना विल्यम्स नंतरची ही तिसरी खेळाडू. तिच्या कामगिरीचे महत्त्व यासाठी की, ती विम्बल्डन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत झाली होती. मात्र नंतरच्या स्पर्धांत ती सतत जिंकत होती. त्यामुळेच तिचा आत्मविश्वास वाढला होता. अंतिम सामन्यात पहिला सेट हरल्यानंतर ती ज्या तडफेने खेळली ते पाहून सबलेंकानेही तिचे कौतुक केले. अरिनाचा कोणताही फटका परतवायचा या जिद्दीने ती कोर्टवर अक्षरशः या टोकापासून त्या टोकापर्यंत धावत होती. तीही चांगल्या वेगाने.. आणि या धोरणाने तिला यश मिळवून दिले. प्रेक्षकांना याचे कौतुकमिश्रित आश्चर्य वाटत होते.

विजयानंतर गॉफ म्हणाली, “विम्बल्डनमध्ये मी पहिल्या फेरीतच हरले होते. नंतर मी वॉशिंग्टनमध्ये डब्ल्यूटीए 500 स्पर्धा जिंकली तेव्हा टीकाकार म्हणाले की, आता मी यापुढे जाऊ शकणार नाही. नंतर सिनसिनाटीमध्ये मी डब्ल्यूटीए 1000 स्पर्धेचे जेतेपद मिळवले तेव्हा ते म्हणाले की, मी याहून अधिक मोठे काही जिंकू शकणार नाही पण तीन आठवड्यांनी मी हे मोठे यश मिळवले आहे. त्यांना वाटत होते की मी निराश होईन, माझे स्फुल्लिंग विझतील पण उलट त्यांच्यामुळेच माझी जिद्द वाढली. ती आग धगधगत राहिली, अधिकच वाढली. मी त्यांचे आभार मानते.” 

कोको गॉफ

योकोविच आणि मेदवेदेव यांच्यातला अंतिम सामना सरळ सेटमध्येच संपला. पण हे थोडे फसवेच आहे. कारण या सामन्याचा दुसरा सेट तब्बल 105 मिनिटे चालला होता. कोणीही हार मानायला तयार नव्हते. शेवटी टायब्रेकरचा अवलंब करावा लागला. त्यात मेदवेदेवने 31 ने आघाडी घेतली होती पण नाउमेद न होता योकोविचने ती मोडून काढली. त्यामुळे टायब्रेकर फार लांबला नाही. 7-5 अशा गुणांनी योकोविचने तो जिंकला आणि नंतर अखेरपर्यंत सामन्यावरील पकड ढिली होऊ दिली नाही. या सेटमध्ये मेदवेदेवने प्रथमच त्याची सर्व्हिस भेदून आघाडी मिळवलेली होती, ती भरून काढताना त्याने लगेचच मेदवेदेवची सर्व्हिस भेदली आणि नंतर 4-2 अशी आघाडी घेतली. आणि नंतर मात्र त्याची वाटचाल सहज होती. त्याच्या ‘किलर इन्स्टिंक्ट’चा यात मोठा वाटा होता. तीच त्याची जमेची बाजू आहे.

योकोविच म्हणाला की, माझी बालपणाची स्वप्ने आता मी प्रत्यक्षात जगतो आहे. जगातला सर्वात मोठा टेनिसपटू व्हावे असे मला सात-आठ वर्षांचा असताना वाटत होते आणि आता खरोखरच ती इच्छा पूर्ण झाली आहे. मेदवेदेवने त्याच्याबद्दल बोलताना सांगितले की, आम्ही प्रथम मी 15 वर्षांचा असताना भेटलो होतो. पण तेव्हा तो जसा होता, तसाच आताही आहे. यशामुळे त्याच्यात काहीच बदल झालेला नाही. तो त्याच साधेपणाने वागतो..

भारताच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रोहन बोपण्णा हा सर्वात जास्त वयाचा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एन्डेनच्या साथीने खेळताना त्याने या स्पर्धेत पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठताना डोडिंग क्रायचेक जोडीचा 7-5, 3-6, 6-3 असा पराभव केला होता. अंतिम सामन्यात बोपण्णा-एन्डेन जोडीने राजीव राम (अमेरिका) आणि जो सॅल्सिबरी (इंग्लंड) यांच्या विरुद्ध खेळताना, पहिला सेट पूर्ण वर्चस्व राखून 6-2 असा जिंकला होता. बोपण्णाची प्रभावी सर्व्हिस आणि दोघांचेही परतीचे फटके प्रभावी ठरले होते. परंतु दुसऱ्या सेटमध्ये त्यांची लय बिघडली. कारण काही काळ एन्डेन थकलेला दिसत होता. थोड्या वेळानंतर तो ठीकठाक झाला. पण तेव्हा बोपण्णाच्या सर्व्हिसमधील धार आणि जोर कमी झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा राम सॅल्सिबरीने उठवला. सुरुवातीला निष्प्रभ ठरलेली रामची सर्व्हिस अधिक वेगवान झाली आणि सॅल्सिबरीनेही खेळ उंचावला. आता ते गतसालचे विजेते त्या लौकिकाला साजेसे खेळू लागले आणि दुसरा सेट त्यांनी 6-3 असा जिंकला, निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये बोपण्णा एण्डेनने बऱ्यापैकी प्रतिकार केला, पण आता प्रतिस्पर्ध्याचा खेळ उंचावला होता. बोपण्णा एन्डेनने शिकस्त करूनही प्रतिस्पर्ध्यांनी दाद दिली नाही आणि तो सेट 6-4 असा जिंकून जेतेपद राखले. विजेतेपद मिळवणारा सर्वात जास्त वयाचा खेळाडू या मानाला तो मुकला. यानंतर निवृत्त होणार असल्याचे त्याने आधीच जाहीर केले होते. पण अखेरचा सामना जिंकण्याचे समाधान त्याला मिळाले नाही. सानिया मिर्झाच्या साथीने काही वर्षांपूर्वी मिळालेले मिश्र दुहेरीचे विजेतेपद हे या मालिकेतील त्याचे एकमेव ठरले.


हेही वाचा : टेनिसचे 'फेडरर युग' संपले! - आ. श्री. केतकर


महिला एकेरीमध्ये प्रथम क्रमांकाच्या इगा स्विआटेकप्रमाणे अनेक सीडेड खेळाडूंना पराभव पत्करावा लागला होता. विसावे सीडिंग असलेल्या येलेना ओस्टापेंकोने चौथ्या फेरीत स्विआटेकला 3-6, 6-3, 6-1 असे हरवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पाचवे सीडिंग मिळालेल्या ओन्स जेन्युरला क्विनवेन झेंगने 6-3, 6-4 असा धक्का दिला होता. पण नंतरच्या उपान्त्यपूर्व फेरीत कोको गॉफने ओस्टापेंकोला 60, 6-2 असे पराभूत केले तर सबलेंकाने झॅगवर 6-1, 6- 14, अशी मात केली होती. या फेरीतील अन्य सामन्यांत व्होडुसकोवाने मॅडिसन केजला 6-1, 6-4 असे हरवले. (मॅडिसन केजने चौथ्या फेरीत तिसरे सीडिंग मिळालेल्या पेगुलाचा 6-1, 6-3 असा पराभव केला होता). कॅरोलिना मुचोवाने सोना सिरतीला 60, 6-3 असे नमवले होते. उपान्त्य फेरीत गॉफने मुचोवाला 6-4, 7-5 असे हरवून अंतिम फेरी गाठली. तिची गाठ आता जेतेपदासाठी होणाऱ्या सामन्यात गतविजेत्या अरिना सबलेंकाबरोबर पडणार होती. एवढ्या लहान वयात प्रमुख स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी सेरेना विल्यम्सनंतरची गॉफ ही पहिलीच खेळाडू. सेरेनाने अशी मजल 1999 मध्ये गाठली होती.

पुरुष एकेरीत मात्र फारसे अनपेक्षित निकाल लागले नाहीत. म्हणजे उपान्त्य फेरीपर्यंत. अपवाद फक्त चौथे सीडिंग मिळालेल्या होल्गर रुनचा. रॉबर्टो कार्बलिस बैनाने त्याला पहिल्याच फेरीत 6-3, 4-6, 6-3, 6-2 असे गारद केले होते. योकोविच, मेदवेदेव, अल्काराझ, इवेरेव, रुब्लेव, शेल्टन, टिआफो फ्रिटझ यांनी सहज विजय मिळवले होते. उपान्त्यपूर्व फेरीत अल्काराझने झ्वेरेवचा, मेदवेदेवने रुब्लेवचा, शेल्टनने टिआफोचा तर योकोविचने फ्रिटझचा पराभव केला होता. म्हणजे बरेच निकाल अपेक्षेप्रमाणे होते. उपान्त्य फेरीत 2021चा जेता डानिल मेदवेदेव आणि 2022चा विजेता कार्लोस अल्काराझ अशी लढत होती.

अल्काराझ आणि शेल्टन हे दोघेही 20 वर्षांचे तरुण. त्यातही अल्काराझ गतसालचा विजेता. या दोघांकडून खूप अपेक्षा होत्या. पण त्यांनी तशी निराशाच केली. दोघेही पराभूत झाले. तेही फारशी कडवी झुंज न देता. मेदवेदेवने अल्काराझला 7-6, 6-1, 3-6, 6-3 असे पराभूत केले. विम्बल्डनला दाखवलेली चमक अल्काराझच्या खेळात क्वचितच आढळली. आणि मेदवेदेवची कोर्टच्या बेसलाईनमागे दूर उभे राहण्याच्या धाटणीचा पूर्वी त्याने फायदा उचलला होता आणि ड्रॉपचा वापर करून त्याने मेदवेदेवला आधी त्यांच्यात झालेल्या दोन सामन्यांत नमवले होते. मेदवेदेवने आपली चूक ध्यानात आल्यावर ती लगेचच सुधारली आणि त्यामुळे त्याला अपेक्षित फायदा झाला. त्याच्या मानाने कमी अनुभवी अल्काराझला बहुधा आता काय करावे असा प्रश्नही पडला असेल. तरीही अंगच्याच गुणवत्तेच्या जोरावर त्याने तिसरा सेट जिंकला तेव्हा सामना पाच सेटपर्यंत लांबणार का असा प्रश्न पडला होता. पण मेदवेदेव आता अधिक ठामपणे खेळत होता आणि अल्काराझकडून होणाऱ्या चुकांचा पुरेपूर फायदा उठवून त्याने सामना जिंकला. या सेटमध्ये तो सर्व्हिस करत असताना प्रेक्षकांनी खूपच आरडाओरडा केल्याने त्याला त्रास होत होता. पण निश्चयाने त्याने एकाग्रता भंग होऊ दिली नव्हती.

अन्य अंतिम विजेते:
महिला दुहेरी : एरिन रॉटलिफ - गॅब्रिएला डाब्रोवस्की विजयी वि. लॉरा सिग्मंड - व्हेरा झ्वोनारेवा 6-3, 6-4. मिश्र दुहेरी : ॲना डॅनिलिना - हॅरी हेलिओवारा विजयी वि. जेसिका पंगुला - ऑस्टिन क्रायचेक 6-3, 6-1.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक, ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: क्रीडा टेनिस खेळ अमेरिकन ओपन Sports Roger Federer Rafael Nadal tennis player GOAT Load More Tags

Add Comment