एक गोष्ट तुमच्या ध्यानात आलीच असेल. आम्हाला देवानंच पाठवलंय असा साक्षात्कार झाल्यापासून आम्ही आता तृतीयपुरुषी भाषेमध्ये बोलत होतो. ‘मोदी की गॅरंटी’, ‘ये मोदीका वादा है’, ‘मोदी विरोधकांना पुरून उरेल’, इ.इ. पण आता मात्र कटाक्षानं आम्ही ‘रालोआ सरकार’ असं म्हणतो. ‘मी’पणाचा आम्ही आता त्याग केला, जसा संसाराचा केला होता. त्यावरूनही तो लालूप्रसाद बोललाच म्हणा. ऐकायचं आणि सोडून द्यायचं.
मित्रों SSS
... पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना कसंतरीच होतंय. कदाचित हा आपला शेवटचाच संवाद असेल, असंही वाटतंय. कारण परिस्थिती खूपच बदललीय. आता तुमच्याशी बोलायला वेळ मिळणं अवघडच असेल. या आधी एकदा तुमच्याशी संवाद साधला होता, त्यानंतर निवडणूक प्रचाराची धामधूम. त्यात दीड-दोन महिने कसे गेले, ते कळलंच नाही. कारण सततचा प्रवास, शक्तीप्रदर्शनाच्या यात्रा, नंतर भाषणं आणि (लिहून दिल्याप्रमाणे घेण्यात आलेल्या) असंख्य मुलाखती यांशिवाय अन्य विचार डोक्यात नव्हता. जराही उसंत नव्हती.
मतदानाचे पहिले दोन टप्पे पार पडले आणि मतदान आमच्या अपेक्षेप्रमाणे झालं नाही हे कळलं. त्यामुळं खडबडून जाग आल्यासारखं झालं. कित्येकदा काय बोलावं हेही सुचत नव्हतं आणि काय बोलत आहोत याचंही भान राहत नव्हतं. त्यामुळंच ते मटण, मुस्लीम, मंगळसूत्र, म्हशी, अनेक मुलांना जन्माला घालणारे असं काहीतरी बोलून गेलो. पोटातलं ओठावर आलं असंही काहींना वाटलं. विरोधकांना त्यामुळं जास्तच जोर आला आणि ते एकापाठोपाठ एक वेगवेगळे प्रश्न विचारू लागले. आम्ही नेहमीप्रमाणं गप्पच राहिलो.
2019च्या निवडणुकीच्या वेळी सुरुवातीला विरोधकांचा जोर आहे हे कळल्यावर, अजिबात धास्तावून न जाता आम्ही ‘पुलवामा’ आणि ‘बालाकोट’ घडवलं. त्यानंच डाव बदलून गेला. हा बनाव तेव्हा त्यांच्या ध्यानातच आला नाही. लोकांचे देशप्रेम हे खरंखुरं असतं, (आमच्याप्रमाणं) स्वार्थासाठी नसतं, हे ठाऊक असल्यानंच ते नाटक रचण्यात आलं आणि त्याला अपेक्षेहून जास्त यश मिळालं होतं. यावेळी मात्र त्या पप्पूच्या ‘भारत जोडो यात्रा’ आणि ‘भारत जोडो न्याय यात्रा’ यांनी सारंच बिघडवून टाकलं.
आता त्याला तसं म्हटलं तर आमचंच हसं होईल, हे उमगल्यानं आम्ही ते नाव पुन्हा तोंडातून काढलेलंच नाही. त्याच्या या न्यायाच्या मागणीनं लोकांमध्ये नवा जोम, नवी जाण आली. त्यांच्यात प्रश्न विचारायचं धाडस निर्माण झालं. आम्हाला तर प्रश्न विचारलेलं आवडतच नाही. अगदी नाइलाज झाला तर आम्हीच प्रश्न लिहून देतो आणि तेच मुलाखत घेणाऱ्यानं विचारायचे, ही अट घालतो. पत्रकार बैठक घेतली तर अशी सोय नसते. महाराष्ट्रातील एकानं तर अचानक भर सभेतच कांद्यांबाबत प्रश्न केला. त्याचं उत्तर आमच्याकडं नव्हतं म्हणून आम्ही अर्थातच त्याकडं लक्षच दिलं नाही. तर आता थोड्या धीट झालेल्या पत्रकारांनी त्यालाच प्रसिद्धी दिली. म्हणूनच यापुढंही पत्रकार बैठकीचा विचारही करणार नाही.
तसं आता लोकांना माहीत झालंय की, आम्ही ठराविक भाषणंच करतो. पण केवळ त्यांचीच तयारी आम्ही केलेली असते, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. शिस्त म्हणजे शिस्त. शिवाय विरोधकांच्या भाषणातही आम्हाला निरुत्तर करणारे तेच मुद्दे असतात की! पण त्यांच्यावर कुणी टीका करत नाही. आमची ट्रोलभैरवांची आर्मीही आता निष्प्रभ होत चालली आहे.
आम्ही अनेक आश्वासनं दिली होती. ‘वचने किं दरिद्रता,' असं म्हणतातच ना! पण सुरुवातीला आमच्या जुमल्याला भुललेले लोक आता बदललेले दिसले. ते सरळ “तुमच्या आश्वासनांचं काय?” असं विचारायला लागले. ज्याची धास्ती वाटत होती तेच होत होतं. तरीही आम्ही त्याकडं दुर्लक्ष करून, आम्ही किती पुतळे उभारले, किती शहरांची नावं बदलली, (नको तिथं) किती रस्ते बांधले हे सांगत होतो आणि ज्याची 500 वर्षं प्रतीक्षा होती, ते श्रीरामाचं मंदिर अयोध्येत त्याच्या जन्मस्थळी उभारलं, असं सांगत होतो. पण काही शंकेखोर “त्यामुळं कुणाचं भलं झालं? त्यासाठी किती मंदिरं, प्रार्थनास्थळं, लोकांची राहती घरं आणि दुकानं उद्ध्वस्त केली? किती लोकांची रोजी-रोटी हिरावली गेली? कितीजण विस्थपित झाले आणि किती अयोध्या सोडून गेले?” असे काहीतरी प्रश्न करत होते. रामलल्लापुढं या साऱ्याचं काय मोल? पण त्यांना हे कसं कळावं? आम्ही वचन दिलं होतं त्याची पूर्ती केली, असं म्हटलं तर ते म्हणाले, “कुठं काय झालंय?” आम्ही लगेचच 2047 पर्यंत त्यांची पूर्तता होईल असं ठामपणं सांगितलं. अर्थात ‘तोवर आम्हाला सत्तेत कायम ठेवा’ हेच आम्हाला सांगायचं होतं. या विकासकामांच्या आसपासच्या अनेक मतदारसंघांत आमचा पराभव झाला. इतकंच काय, पण रामलल्लाही पावला नाही. त्याच्या अयोध्येतच आमचा पराभव झाला. मग आम्ही ‘जय श्रीराम’ या ऐवजी ‘जय जगन्नाथ’ अशीच आरोळी दिली. आणि जगन्नाथ पावला. आम्ही वाचलो त्याचं हे एक कारण असावं. वाराणसीत आम्ही जिंकलो, पण मताधिक्य मात्र खूपच घटलं अनेकांनी आम्हाला त्याबाबतीत मागे टाकलं. पण आम्ही जिंकलो हे महत्त्वाचंच.
ज्यांच्यावर भरवसा होता ते उ.प्र. आणि महाराष्ट्र प्रामुख्यानं आमच्या घसरणीस कारण झाले. मध्य प्रदेशानं मात्र इमान राखलं. गुजरातनंही, तरी तिथं एक जागा यावेळी गेलीच! पण त्याच वेळी केरळमध्ये एक जागा मिळाली. हे मोठंच यश. आता तिथं फुटीची विषवल्ली आम्ही वाढवूच. तामीळनाडूत मतं थोडी वाढली इतकंच यश म्हणायचं. ओरिसामध्ये मात्र नवीनबाबूंच्या प्रकृततीबाबत संभ्रम निर्माण करण्याचा फायदा झाला आणि ‘पांडियन हा परप्रांतीय’ अशी फूट पाडण्याच्या प्रचाराचाही फायदा होऊन चांगलं यश मिळालं. त्यामुळंच आम्ही तरलो. कारण बंगालमध्येही खूपच जागा कमी झाल्या होत्या. संदेशखालीचं प्रकरण फोलच ठरलं कारण तो आमचाच डाव असल्याचं तिथल्याच महिलांनी सांगितलं.
अस्वस्थ, असंतुष्ट आत्म्याचा बाणही निष्फळ ठरला म्हणून मग आम्ही देव आणि दैवाचाच आधार घेतला. आम्ही सांगितलं की, ‘आई होती तोवर वाटत होतं की आपण जीवशास्त्रीय रीतीनं जन्माला आलो आहोत. पण ती गेल्यावर मात्र आम्हाला साक्षात्कार झाला की आमचा जन्म तसा नाही. एक विशिष्ट काम व्हावं म्हणून आम्ही भूतलावर आलो आहोत.’ थोडक्यात आम्ही दैवी अवतारच आहोत. असं सांगितल्यावर भक्तगण - आयटीवाले, आमचा गोदीमीडिया, सुस्थितीतील सुशिक्षित आणि असंख्य भोळ्या-भाबड्या माय-भगिनी सारेजण - धन्य धन्य झाले. या साऱ्याला सतत मुस्लीमद्वेषाची जोड आम्ही देतच होतो.
आम्ही एका सभेत ठासून सांगितलं की, ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लीम असं करीन त्यावेळी मी माझ्या पदाला लायक राहणार नाही. अनेकांना हा मोठा विनोद वाटला. बाकीच्यांना मानभावीपणा. निवडणूक आयोगानं धर्माचा वापर केल्यानं काही काळापूर्वी शिवसेनेच्या प्रमुखाला सहा वर्षं मतदानाला आणि निवडणूक लढवायला मनाई केली होती. आम्ही तेच वारंवार करत होतो. त्यामुळं आमच्यातील काही जणांनी सावधानतेचा इशारा दिला. पण आमच्यासारख्या दैवी पुरुषाला आयोगाची कसली भीती? त्यामुळं विविध सभांत आम्ही हिंदू-मुस्लीम असा उल्लेख सर्रास करत राहिलो. अगदी अडीचशेपेक्षा जास्त वेळा! काँग्रेसचाही तितक्यांदाच उल्लेख केला. स्वतःचा उल्लेख मात्र त्याच्या तिप्पट वेळा केला. नेहरूंना नावे ठेवली नाहीत अशी एकही सभा नसेल. लोक नेहमीच त्यांनी देशासाठी काय केलं, किती संस्था, उद्योगांची उभारणी केली हे आम्हाला ऐकवतात. वर त्या पायावरच तुमचा डोलारा उभा आहे, असं म्हणतात. पण त्यांनी एक तरी मंदिर उभारलं का, असा प्रश्नच त्यांना पडत नाही हे देशाचं दुर्दैव.
ते म्हणतात, ‘लोकांपुढील बेरोजगारी, महागाई यावर आम्ही बोलत नाही.’ पण आम्ही तर त्यांना दरमहा मोफत धान्य पुरवतो ना. शिवाय ही योजना आणखी पाच वर्षं चालवू असंही सांगितलं. पण आता ते गरीब पुरुष-महिलाच म्हणू लागल्या की, ‘आम्हाला मोफत धान्य नको, आम्हाला रोजगार द्या.’ धान्याशिवायही अनेक गरजा असतात. त्यांसाठी पैसा हातात असावा लागतो. शेतकऱ्यांची कर्जं लहान-सहान असतात. ती माफ केली काय अन् नाही केली काय, त्यानं काय फरक पडतो? आम्ही तर आमच्या धनाढ्य मित्रांची 15 लाख कोटींची कर्जं माफ केली. आता त्यात बँकांना खोट आली, सर्वसामान्य ठेवीदारांचंही नुकसान झालं. पण असं होतंच असतं. काही मिळवायचं तर काही गमवावं लागतंच. पण तज्ज्ञ सांगायला लागले की, ‘तेवढ्या रकमेत मनरेगाची 24 वर्षांची तरतूद झाली असती.’ आणि लोक म्हणायला लागले की ‘तुमचं म्हणणं असं असतं की, आम्ही जुलूम करणार आणि तुम्ही तो सहन केला पाहिजे’, ‘धर्माधारित राजकारणाचा तुम्ही धंदा बनवलाय’.
एक गोष्ट तुमच्या ध्यानात आलीच असेल. आम्हाला देवानंच पाठवलंय असा साक्षात्कार झाल्यापासून आम्ही आता तृतीयपुरुषी भाषेमध्ये बोलत होतो. ‘मोदी की गॅरंटी’, ‘ये मोदी का वादा है’, ‘मोदी विरोधकांना पुरून उरेल’, इ.इ. पण आता मात्र कटाक्षानं आम्ही ‘रालोआ सरकार’ असं म्हणतो. ‘मी’पणाचा आम्ही आता त्याग केला, जसा संसाराचा केला होता. त्यावरूनही तो लालूप्रसाद बोललाच म्हणा. ऐकायचं आणि सोडून द्यायचं.
आपल्या या आधीच्या संवादानंतर काय झालं ते तुम्हाला सांगितलं. बाकी लहान-सहान घटना तुम्ही वाचल्या- पाहिल्या असतीलच. अर्थात, निवडणूक निकालाबाबत. आम्ही तो केव्हाच जाहीरपणं सांगितला होता. ‘इस बार चार सौ पार’ हा आमचा नारा आणि खरं तर तसंच व्हावं म्हणून सारं सेटिंग योग्य प्रकारं केलं होतं. त्यामुळंच निवडणूक आयोगानं आम्हाला नाही तर पक्षाला इशारावजा सल्ला दिला. ज्यानं त्यांना त्या पदावर बसवलंय त्यालाच ते कसा हात लावतील, खरं ना. बाकी इडी, आयकर, सीआयडी सारे सारे आमचेच आहेत. न्यायालयही धाडसानं काही करील अशी भीतीही नव्हती. असं सारं काही पक्कं होतं. तरीही आम्ही अस्वस्थ होतो.
1977, 1980, 2024 च्या निवडणुकांत जे झालं, ते विसरता येत नव्हतं. त्यामुळं मनात भीतीही होती. भरीस भर म्हणून नेमकं शेवटच्या दोन-तीन टप्प्यांचं मतदान बाकी असतानाच आमच्या पक्षाच्या अध्यक्षानं आमच्या मातृसंस्थेलाच दुखावलं, 'आता भाजपला कुणाची गरज नाही,' असं तो म्हणाला. काय गरज होती असं सांगायची? खरं तर संघ नेहमीच सांगतो की, आम्ही राजकारणात नसतो. पण आता अध्यक्षांनीच संघाबरोबर पक्षाचंही पितळ उघडं पाडलं.
पण वाचलो. कशीबशी थोड्या बहुमताच्या फरकानं का होईना, सत्ता कायम राहिली. तरीही वाटत राहिलं, ‘मनुज योजी एक काही, दैव दुसरे घडविते’...
का कोण जाणे यापुढंही तसंच काहीतरी होणार की काय, हा विचार मनात येतो आणि थरकाप होतो.
'लागे जिवा हुरहूर' अशी आमची अवस्था झालीय...
तरीही याचा बदला कसा घ्यावा हा विचार करतो आहोत. स्वभावच आहे आमचा. बघून घेईन सगळ्यांना. तसे मार्ग अनेक आहेत. पण तूर्त तरी लोकमताचा आणि त्यापेक्षाही मित्रपक्षांचा धाक आहे. थोडा धीर धरायला हवा. आमचा मुस्लीमद्वेष मित्रपक्षांना मानवत नाही. उलट एकानं तर त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवायचा प्रस्ताव केलाय आणि दुसराही त्यांच्या प्रेमात असल्यासारखाच आहे. खरं तर त्यांच्याशी जमवून घेणं अवघड जाणार आहे, पण काय करणार, सत्ता तर टिकवायलाच हवी. ती गेली तर खटल्यांची माळच लागेल मागे आणि तेव्हा न्यायालयांची मदत मिळण्याचीही शक्यता नाही. कदाचित आता संसदेत नियमित जायला लागेल, हा विचारही अस्वस्थ करतोय. तिथं चर्चा होणार, प्रश्नांची बरसात होणार. त्यांची योग्य उत्तरं द्यावी लागणार.
अगदी 'नको नको ते येई पदरी' असंच वाटायला लागलंय. हे सारं आम्ही कसं निभावणार याची चिंता आहे. जुने अनुभवी आम्हीच दूर सारले. कदाचित त्यांचीच मदत घ्यावी लागेल. अहंभाव टाकायला लागेल. पण तेही आम्ही करू. सत्तेसाठी काहीही हे तर आमचं ब्रीद. सत्ता सोडवत नाही ना!
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
हेही वाचा : काय भुललासि... - आ. श्री. केतकर
Tags: loksabha elections narendra modi nda rahul gandhi a s ketkar india Load More Tags
Add Comment