अयोध्येच्या दुभंगलेल्या वर्तमानाचे चित्रण

सुतपा मुखर्जी लिखित 'अयोध्या: पास्ट ॲन्ड प्रेझेन्ट' या पुस्तकाचा परिचय

लेखिकेने आपल्या विषयाची ओळख करून देताना लिहिलेल्या सुरुवातीच्या प्रकरणाचे नावच ‘अयोध्या - डिव्हायडेड इट स्टिल स्टॅंडस्’(आजही दुभंगलेली अयोध्या) असे आहे. त्यानंतरची ‘द पोलस्टार ऑफ फेथ अँड बिलीफ: स्लिंटर्ड पीस’, ‘राम रिसरेक्टेड रामाज् प्रोटेजीज (Proteges)’, ‘लीगल ट्रॅव्हेल्स अँड ट्रायल्स, भाग 1 : 1858 - 1950’, ‘लीगल ट्रॅव्हेल्स अँड ट्रायल्स, भाग 2 : 1950-2011’, ‘मशीन ऑन अ मिशन आणि डिमॉलिशन डे’ अशी प्रकरणे आहेत. उपसंहार ‘अयोध्या : राम की नगरी’ या नावाचा आहे. यावरून पुस्तकामध्ये काय वाचायला मिळणार याचा अंदाज आपल्याला येतो.

“हे पुढारी रामराज्याची गोष्ट करत आहेत. परंतु त्यांचे रामराज्य हे रामायण या महाकाव्यातील रामराज्यापेक्षा खूपच वेगळे आहे. असं बघा की, अनेक पुरातन पवित्र स्थळं म्हणजे जम्मूतील वैष्णोदेवी, आंध्र प्रदेशातील तिरुपती, महाराष्ट्रतील शिर्डी साईबाबा, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, अशी अनेक ठिकाणे न्यासाद्वारे - ट्रस्टद्वारे चालविली जातात. परंतु रामजन्मभूमी मंदिराबाबत मात्र विश्व हिंदू परिषद (विहिप) आणि ट्रस्ट एकच आहेत. तुम्हाला यामागील हेतू ध्यानात येतोय ना? आता आम्हाला पूर्णपणे बाजूला टाकले जाईल, कारण आता साऱ्याचा ताबा भगवे घेत आहेत.” - अयोध्येतील व्यापार मंडळ अध्यक्ष नंदकुमार.

“एकदा हे मंदिर पूर्ण झाले की आमच्यावर बहिष्कार घातला जाईल, अशी भीती आम्हाला वाटते. हे लोक पूर्वापार असलेला दोन जमातींतील भ्रातृभाव आणि प्रेम संपुष्टात आणतील. गप्प राहण्याखेरीज आम्हाला अन्य पर्यायच नसेल.”- महंमद याकुब.

“एक प्रकारची काळजी आणि असुरक्षिततेची भावना येथील जनतेत असणं स्वाभाविक आहे. येथे धार्मिक पर्यटकांनाच सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे, याबाबत शंकाच नाही. कारण या स्थानाला सर्वाधिक महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्धी दिली जात आहे. त्यामुळे येथील रहदारीत मोठी वाढ होईल यात शंका नाही. त्यामुळे सरकारला रस्ते रुंद करण्याला पर्यायच नाही. यासाठी जुन्या इमारती पाडाव्या लागतील, इ. व्यापाऱ्यांना खरं तर काळजीचं कारण नाही. कारण मोठी आणि लहान दुकाने एकत्र नांदू शकतात. कारण येथे येणारे यात्रेकरू आणि पर्यटक हे सर्व स्तरांतील असतात. त्यांना काय परवडते यात फरक असतो. मात्र मला वाटते की, अयोध्येचे स्वरूप आणि नैतिकता यांना धक्का पोहोचता कामा नये. पुराना अयोध्या का स्वरूप कायम रहना चाहिये.” - इतिहासकार बांके बिहारी मणि त्रिपाठी.

अयोध्येतील काही रहिवाशांची ही मते आहेत. ती प्रातिनिधिक मानायला हरकत नाही...

बाबरी मशीद आणि रामजन्मभूमी या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 2019 मध्ये आला. त्यात ‘हिंदूंची श्रद्धा’ हा मुख्य घटक मानून विवादित भूभागावर पूर्वी मंदिर होते, असा निर्णय न्यायालयाने दिला. तेव्हापासून अयोध्या हा सर्वांच्या कुतूहलाचा विषय झाला आहे. अयोध्येवर अनेक पुस्तके येत आहेत. पण सुतपा मुखर्जी या पत्रकार लेखिकेचे ‘अयोध्या: पास्ट ॲन्ड प्रेझेन्ट’ हे पुस्तक मात्र त्याच्या वेगळेपणाने उठून दिसणारे आहे. त्यात बाबरी मशीद- रामजन्मभूमीवाद, त्याबाबतचा कित्येक दशके चाललेला न्यायालयीन इतिहास, याबाबत माहिती आहेच; पण त्याचबरोबर दीर्घकाळ चाललेल्या या वादामुळे एकेकाळी सलोखा आणि बंधुभावाने वागणारे अयोध्येतील रहिवासी हळूहळू त्यांच्याही नकळत कसे बदलत गेले; दुरावत गेले आणि आता ते कसे अगदी दुभंगल्यासारखे झाले आहेत, याबाबत खुलासेवार माहिती आहे.

लेखिका लहानपणापासूनच अयोध्येशी जोडली गेलेली आहे. त्या काळात ती वारंवार अयोध्येला जात असे. अर्थातच तिच्या त्या शहराबाबतच्या आठवणी लहानपणापासूनच्या आहेत. मात्र गेल्या 30 वर्षांत झालेल्या बदलांमुळे ती अस्वस्थ झाली. त्यामुळेच अयोध्येत होत गेलेल्या आणि झालेल्या बदलांबाबत लिहिण्याचे तिने ठरवले, असे ती म्हणते. अनेक संदर्भ, मुलाखती आणि पत्रकारितेतील अनुभवाचा तिने पुरेपूर उपयोग केला आहे. ओघवत्या भाषेत लिहिले असल्यामुळे पुस्तक माहितीपर असूनही कंटाळवाणे होत नाही.

आपल्या विषयाची ओळख करून देताना लिहिलेल्या सुरुवातीच्या प्रकरणाचे नावच ‘अयोध्या - डिव्हायडेड इट स्टिल स्टॅंडस्’(आजही दुभंगलेली अयोध्या) असे आहे. त्यानंतरची ‘द पोलस्टार ऑफ फेथ अँड बिलीफ: स्लिंटर्ड पीस’, ‘राम रिसरेक्टेड रामाज् प्रोटेजीज (Proteges)’, ‘लीगल ट्रॅव्हेल्स अँड ट्रायल्स, भाग 1 : 1858 - 1950’, ‘लीगल ट्रॅव्हेल्स अँड ट्रायल्स, भाग 2 : 1950-2011’, ‘मशीन ऑन अ मिशन आणि डिमॉलिशन डे’ अशी प्रकरणे आहेत. उपसंहार ‘अयोध्या : राम की नगरी’ या नावाचा आहे. यावरून पुस्तकामध्ये काय वाचायला मिळणार याचा अंदाज आपल्याला येतो.

लेखिका सुरवातीलाच अयोध्येच्या इतिहासाचा धावता आढावा घेते. अयोध्येचे नाव ‘साकेत’ असेही आहे. चिनी आणि तिबेटन इतिहासकारांनी राजा कनिष्क आणि साकेतचा राजा यांच्यातील लढाईचे वर्णन केले आहे. जैनांच्या मते अयोध्या हे त्यांच्या पहिल्या तीर्थंकराचे जन्मस्थान आहे. पार्श्वनाथ आणि महावीर यांनी या नगरीला भेट दिली होती, असा जैनांचा विश्वास आहे. आजही तेथे अत्यंत चांगल्या स्थितीत राखलेली आठ जैन मंदिरे आहेत. 2500 वर्षांपासून येथे जैन आणि बौद्धांचे वास्तव्य आहे. इ.स.पू. 500 ते इ.स. 500 या हजार वर्षांच्या काळात येथे अनेक धर्मीय होते. अनेक समाज एकोप्याने सुखात राहत होते. नंतरच्या हजार वर्षांत मात्र नगरीचे हे रूप बदलले. तरीही किमान आठव्या शतकापर्यंत तरी जैन आणि बौद्धांचे येथे संख्याबळ असल्याने त्यांना या नगरीत महत्त्व होते. त्यानंतरच्या काळात मात्र येथे हिंदूंची संख्या वाढत गेली. काही इतिहासकारांच्या मते, आद्य शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान लोकप्रिय होत गेले, हे याचे कारण असावे. काहीजण याचे श्रेय अन्य भारतीय तत्त्वज्ञांना देतात. काहीही असले तरी एक गोष्ट खरी की, संपूर्ण भारतातच या काळात हिंदूधर्मात नवचैतन्य आले. याच काळात हजारो रामानंदी साधूंचे अयोध्या हे घरच बनले. आणि प्रभू रामाचे जन्मस्थान ही ओळख मिळाल्यानंतर तर अयोध्येचे स्वरूप पुरते बदलून गेले.

मुस्लिमांचा असा विश्वास आहे की, हजरत नूह यांचे दफन येथेच झाले आहे. ख्रिश्चनांना नोहाचे जेवढे महत्त्व वाटते, तितकेच मुस्लिमांना नूहचे. नूहचे दफन येथेच झाले. म्हणूनच अनेक मुस्लीम अयोध्येला खुर्द मक्का (छोटी मक्का) समजत असत. अनेक सूफी संतांच्या कबरी येथे आहेत आणि अनेक मोडकळीस आलेल्या मशिदीही आहेत. त्यांपैकी अनेक इ.स.100 ते 1500 या काळातील आहेत. गुरु नानकदेव आणि गुरु गोविंद सिंग हे येथे येऊन गेले होते, म्हणून शिखांसाठीही अयोध्येचे महत्त्व आहे. शिवाय मुस्लिमांबरोबरच्या लढ्यात अनेकदा हिंदूंनी शिखांची मदत मागितली आणि शिखांनीही ती तत्परतेने दिली, कारण तेव्हा त्यांचाही मुस्लीम राज्यकर्त्यांबरोबर झगडा सुरू होता.

अयोध्येत पूर्वापार हिंदूमध्येही एका गटाचे हिंदूंमधील अन्य गटांशी झगडे होत. मुस्लिमांमध्ये शिया सुन्नी झगडे होत. त्याचप्रमाणे हिंदू आणि मुसलमानांमध्येही झगडे होत. इंग्रज आल्यावर अशा झगड्यांत ते मध्यस्थाची भूमिका बजावू लागले. (पण एकीकडे ते त्यांच्या ‘तोडा, फोडा आणि झोडा’ या धोरणानुसार ही दरी कशी रुंदावत जाईल, याचीही खबरदारी घेत.) लखनौ किंवा दिल्लीसारखी येथे आर्थिक एकात्मकतेची पातळी नव्हती. काही व्यवसायांमध्ये मुस्लिमांचे प्राबल्य होते आणि इतर सर्वांमध्ये हिंदूंचे प्राबल्य होते. असे असले, तरीही ते दोघे एकमेकांच्या आध्यात्मिक बाबींमध्ये सहभागी होत. अगदी आजही येथे अनेक मुस्लीम असे आहेत की, ज्यांची भरभराट येथील असंख्य मंदिरांवर अवलंबून आहे. ते प्रामुख्याने फुले आणि हिंदूंच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि दैनंदिन व्यवहारात उपयोगात आणल्या जाणाऱ्या अनेक वस्तू विकतात. परंपरेनुसार देवाचे कपडे बनवणारे अनेक मुसलमान होते आणि अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत ते हे काम अगदी मनापासून करत होते. आता मात्र त्यांच्याकडून ते जाणीवपूर्वक काढून घेतले जात आहे. अनेकांकडून काढून घेतले गेले आहे.

दीर्घकाळ चाललेल्या इतिहासाबाबतच्या वादामुळे या नगरीतील लोकांवर कसा परिणाम झाला आहे, दोन जमातींतील नाते कसे बिघडून गेले आहे, त्यामुळे त्यांच्यात चीड कशी निर्माण झाली आहे आणि त्याचबरोबर ती आता विश्व हिंदू परिषदेबाबतही आहे, हे कळते. विश्व हिंदू परिषद (विहिप) अयोध्येत अवतरली, तेव्हांपासून सारे शहर कायमचे बदलून गेले, असे तेथील लोकांचे म्हणणे आहे. कारण आता तेथील रहिवाशांना विहिंपचे स्वामित्व सतत जाणवते. विहिंपने सर्वत्रच प्रवेश केला असून, तेच या नगरीतील अधिकारी आणि त्याबरोबरच निर्णय घेणारेही बनले आहेत, असे लेखिका म्हणते..

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुस्लीम पूर्णपणे उदासीन बनले आहेत. बहुसंख्याक समाजात यामुळे अत्यानंदाची भावना निर्माण झाली असली, तरी दुसरीकडे आपले पूर्वीचे, जुने जग पूर्णपणे बदलले असून गेल्या तीन दशकांतील येथे पद्धतशीरपणे आणि हेतुपूर्वक जम बसवणारी विहिंपच त्याला कारणीभूत आहे, अशीही त्यांची भावना आहे. त्याला कारणही तसेच आहे. कारण येथील पुरातन मंदिरे, मठ, आखाडे यांच्या प्रमुखांना पूर्वी जे आदराचे, मानाचे स्थान होते, ते आता पार नाहीसे झाले आहे. आणि विहिंपकडून हे अगदी जाणीवपूर्वक केले गेले आहे, याबाबत त्यांना खात्री वाटते. येथील सारे अधिकार आपल्याकडेच हवेत, ही इच्छा विहिंपने लपवून ठेवलेली नाही आणि त्याचबरोबर विद्यमान सरकारचाही त्यांना (विहिंपला) पूर्ण पाठिंबा आहे, हे आपल्याला कळते. या साऱ्यामागील हेतू न सांगता कुणालाही कळण्यासारखा आहे. जाता जाता, फार महत्त्व नसलेले एकेकाळचे अयोध्या स्टेशन आता कसे ओळखता न येण्याइतके बदलले आहे हे सांगताना लेखिकेची भावुकता जाणवते.

अयोध्येतील रहिवाशांच्या, हिंदू-मुस्लीम दोघांच्याही मुलाखती घेताना, त्यांना बोलते करून त्यांच्या बोलण्यातील महत्त्वाच्या टिप्पणीही तिने नोंदवल्या आहेत. त्यांतील अनेकांना ती यापूर्वीही अनेकदा भेटलेली होती, त्यामुळे ते सर्वजण तिच्याबरोबर अगदी मोकळेपणे बोलल्याचे जाणवते. सारे काही स्पष्ट सांगण्याकडेच त्यांचा कल आहे आणि त्यांच्या या सांगण्यावरून या घटनेबाबत मतभिन्नता असल्यामुळे, अयोध्यानगरीत बहुसंख्य असलेल्या लोकांमध्येही (हिंदूंमध्येही) कसे दोन तट कसे पडले आहेत, हे कळते. अर्थातच 1992 मध्ये जे काही झाले ते सर्वांनाच हादरवून सोडणारे होते. जे घडले ते योग्य होते असे मानणाऱ्यांना, आणि झाले ते काही बरोबर झाले नाही, असे मानणाऱ्यांनाही. प्रत्यक्ष राम मंदिर मोहिमेत सामील असणाऱ्यांच्या मुलाखतींचा समावेशही या पुस्तकात आहे. न्यायालयीन लढाईबाबतच्या दोन प्रकरणांमध्ये त्याबाबतचा संपूर्ण इतिहास वाचायला मिळतो आणि बहुतेक वेळा लहान मोठ्या न्यायालयांचा कल मंदिराच्या बाजूनेच असल्याचे जाणवते.

‘स्प्रिंटर्ड पीस’ (शांततेच्या ठिकऱ्या) या प्रकरणाच्या सुरुवातीलाच, ‘मी मला स्वतःला इस्लाम, ख्रिश्चॅनिटी, झोराष्ट्रियानिझम आणि इतर सर्व धर्मांचा अनुयायी समजतो, कारण मी खराखुरा हिंदू आहे. सारे धर्म एकसारखे आहेत आणि ते एकाच श्रद्धेवर स्थापन करण्यात आले आहेत’ हे महात्मा गांधींचे उद्गार दिले आहेत. त्यानंतर या नगरीत कशा प्रकारे बदल घडले, ते लेखिका सांगते. त्यात आपल्याला कळते की, हे बदल प्रामुख्याने 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून होत गेले आहेत. अनेक मुस्लीम देवपूजेसाठी आवश्यक पूजेचे साहित्य विकत, देवांसाठी पोषाख, दागिने तयार करत. लाकडी खडावा बनवत. पण विहिंपचे वर्चस्व आणि दहशत वाढत गेली, तेव्हापासून या कारागिरांना आपले काम करणे अवघड झाले. अनेकांनी स्थलांतर केले. पण ज्यांना ते शक्य नव्हते, ते कसेबसे दिवस काढत आहेत. मारहाण करणाऱ्याबाबत तक्रार नोंदवण्यात अनेक अडचणी निर्माण केल्या जातात. यामुळेच त्यांना सरकारचा पाठिंबा असल्याचेही स्पष्ट होते. इंग्रजांची नीती स्वातंत्र्यानंतर सात दशकांनीही सुरू ठेवण्यात आली आहे. येथील मुसलमान हे प्रामुख्याने अन्सारी आणि कुरेशी आहेत. थोडे अन्य आहेत. अनेकांचे पूर्वज हिंदू होते. कित्येक शतकांपूर्वीच ते मुस्लीम बनले आहेत. बरेच अन्सारी स्वतःला प्रेषित महंमदाचा सहकारी अयुब अन्सारी याचे वंशज समजतात, तर काही अरबस्तानातील अन्सर टोळ्यातूनच आपले पूर्वज आल्याचे सांगतात. कुरेशी हे जनावरांची कत्तल करण्याचे काम करतात. ते कसाई, चिकवा, बकरकसाब आणि बदरकसाब अशा नावांनी ओळखले जातात.


हेही वाचा : आम्ही लटिके ना बोलू... - आ. श्री. केतकर


‘राम रिसरेक्टेड’(रामाचे पुनरुत्थान) हे प्रकरण ‘रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम’ या भजनाच्या ओळींनी सुरू होते. अयोध्येमध्ये जवळपास पाच हजार लहान मोठी देवळे होती असे ब्रिटिश गॅझेटमध्ये नोंदले होते. पण दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्यामुळे, त्यापैकी निम्मी नाहीशी झाली आहेत. तेथील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महापालिकेने 182 मंदिरे दुरवस्थेत असून ती केव्हाही पडू शकतात, असे म्हटले आहे. याबरोबर मुस्लीम, जैन, बौद्ध, शीख अशा अनेक धर्मांची प्रार्थनास्थळे आहेत. त्यामुळे त्यांचेही भाविक अयोध्येत येतात. जैनांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या 24 तीर्थंकरांपैकी 21 ईक्ष्वाकु वंशातील आहेत, जो हिंदूंच्या रामाचाही वंश आहे. बौद्धांच्या रामायणामध्ये महत्त्वाकांक्षी कैकेयीपासून बचावासाठी दशरथाने राम, सीता आणि लक्ष्मण यांना वनवासात पाठवले होते. त्यांच्या ग्रंथात सीताहरणाचा उल्लेख नाही. शिखांच्या ‘ग्रंथसाहिब’मध्येही रामाला स्थान आहे. पण लाक्षणिक. रावण हा अहंकाराचे, सीता ही प्रज्ञेचे, राम हा अंतस्थ भावनांचे आणि लक्ष्मण हा विचार करणाऱ्याचे प्रतीक आहे.

रामायणाचे 300 वेगवेगळे प्रकार आहेत. त्या प्रत्येकाचे रूप आणि भाष्य वेगळे आहे. भारतातील भिल्ल, मुंडा, संथाल, तौरस, कायक, राभा, बोडो कचरी, खासी, मिझो आणि मेईती इ. अनेक जनजाती आहेत आणि त्यांच्या रामायणांमध्ये त्यात्या जमातीची वैशिष्ट्ये आढळतात. उदा. आसाममधील डोंगरी भागातील महिला कुशल विणकर आहेत. तेथील रामायणातील सीता ही कसबी विणकर आहे. भारताप्रमाणे म्यानमार, इंडोनेशिया, कंबोडिया, लाओस, फिलिपिन्स आणि चीनमध्येही रामायणाला स्थान आहे. आणि कोरियासाठी तर अयोध्या ही पवित्र आणि महत्त्वाची नगरी आहे. कारण आख्यायिका बनलेली त्यांची राजमाता - जिच्यामुळे तेथे राजवंश सुरू झाला - ती भारतीय राजकन्या होती आणि तिने दक्षिण कोरियाच्या राजाशी विवाह केला होता. काही ग्रंथांमध्ये तर अयोध्येच्या राजाला स्वप्नात त्याची मुलगी सुरीरत्ना - हिला, द कोरियाचा राजा किम सुरो याला विवाहात देण्याची आज्ञा खुद्द परमेश्वराने केली होती. काही चिनी आख्यायिकांमध्येही अशीच वर्णने आहेत. आजही शरयूच्या तीरावर विविध धर्मांची अनेक प्रार्थनास्थळे आहेत.

एक महत्त्वाची बाब लेखिका सांगते. ती म्हणते, तुलसीदासामुळेच अयोध्येला रामजन्मभूमी म्हणून मानाचे स्थान मिळाले. तोवर ते केवळ एक तीर्थस्थान एवढेच लोकांना माहीत होते. पण तुलसीदासाच्या ‘रामचरितमानस’ या अत्यंत लोकप्रिय काव्यात अयोध्येत रामाचा जन्म झाल्याचा उल्लेख आहे. श्रद्धावंतांनी तो मानला आहे. तेव्हांपासून अयोध्येला लोकांच्या मनामध्ये आगळेच स्थान मिळाले आहे. वाल्मिकीने संस्कृतमध्ये रचलेल्या रामायणानंतर साधारण दोन ते तीन हजार वर्षांनी, म्हणजे इ. स. 1574 मध्ये तुलसीदासाने हे महाकाव्य रचले, आणि ते चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी, म्हणजे रामजन्माच्या दिवशी असा त्यातच उल्लेख आहे. तुलसीदास हा संस्कृत पंडित होता, पण त्याने हे काव्य लोकभाषेमध्ये, म्हणजे अवधी भाषेत लिहिले. त्यामुळे ते जनसामान्यांपर्यंत पोहोचले. अवधी ही भाषा आजही उत्तर आणि मध्य भारतात बोलली जाते. सात कांडांत हे महाकाव्य आहे आणि ते भगवान शंकराने देवी पार्वतीला सांगितलेली कथा या स्वरूपात आहे. यातील बालकांडात रामजन्माची कथा आहे.

रामभक्त स्वामी रामानंद हे इ. स. 1430 च्या सुमारास तामिळनाडूतून बनारसला गेले. ते प्रख्यात संत रामानुजांचे आध्यात्मिक वारस असल्याचा समज होता. त्यांना प्रत्यक्ष राम आणि सीतेकडून मंत्र मिळाला होता. त्यांचे सर्वच शिष्य ब्राह्मण नव्हते. त्यांत क्षत्रिय, इतर जाती आणि अस्पृश्यांचाही समावेश होता. रामानंदांच्यामुळेच रामानंदी पंथ अस्तित्वात आला. व त्याने अयोध्येचा जवळपास ताबाच घेतला. स्वातंत्र्यानंतर दोनच वर्षांनी बाबरी मशिदीत रामलल्लाची मूर्ती बसवण्याचा बेत पार पडला होता. काँग्रेसची सत्ता असताना हिंदू राजकीय पक्ष तसे शांत होते. पण हे चित्र 1980 च्या दशकात बदलले. नंतर काय घडले ते सर्वज्ञात आहे. त्याचे सविस्तर वर्णन ‘डिमॉलिशन डे’ या अखेरच्या प्रकरणात आहे.

‘रामाज् प्रोटेजीज्’ (Proteges) या प्रकरणात मंदिर मोहिमेशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती आहेत. वेगवेगळे आखाडे आणि साधू, महंत यांबाबत चांगली माहिती यामुळे मिळते. यापैकी काहीजण वरवरचे, उथळ आध्यात्मिक तर काही मोजके खरोखरच समर्पित आणि आपल्या लोकांसाठी म्हणजे हिंदूंसाठी काम करणारे असले, तरी त्यांनी त्यासाठी मुस्लिमांना वेठीला धरलेले नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांच्या दृष्टीने मंदिर ही शक्यता होती. आणि तशा परिस्थितीतदेखील हिंदू-मुस्लीम सलोख्याने नांदू शकले असते, असे त्यांचे मत आहे. बाबरी मशिदीचा विध्वंस होईपर्यंत अयोध्येत दोन्ही जमाती मित्रत्वाने राहत होत्या, असे लेखिका म्हणते. याचे एक उदाहरण पाहण्यासारखे आहे. या वादातील सुरुवातीचे दोन प्रमुख दावेदार रामचंद्र परमहंस आणि हमीद अन्सारी हे न्यायालयात जाताना-येताना कायमच बरोबर प्रवास करत. ते अखेरपर्यंत मित्रच कसे राहिले, हे वाचताना आता तसे चित्र पुन्हा दिसण्याची शक्यता नाही असे वाटते. लेखिका म्हणते, “त्यांची ही मैत्री हे मशिदीच्या विध्वंसाइतकेच सत्य आहे!”

फारशी माहीत नसलेली एक घटना ‘लीगल ट्रॅव्हेल्स अँड ट्रायल्स, भाग 1 : 1858 - 1950’ या प्रकरणात वाचायला मिळते. ती म्हणजे, 1949 च्या डिसेंबर महिन्यात वादग्रस्त वास्तूमध्ये अचानक रामलल्ला कसा प्रकटला याची हकिकत एखाद्या रहस्यकथेमध्ये शोभावी अशी आहे आणि नंतरच्या साऱ्या महत्त्वाच्या घटनांना ती कारणीभूत आहे. महंत अभिराम दास हे अतिशय चांगले नियोजक होते. त्यांना ‘उद्धारक बाबा’ असेही म्हणत. त्यांनी राम मंदिराचा ध्यासच घेतला होता. 20 डिसेंबर 1949 रोजी त्यांच्या चेल्यांकरवी त्यांनी गोंडा, बस्ती आणि सुलतानपूर या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये ‘चलो अयोध्या’ असा संदेश पसरवला. अन्य काहीही त्यांना सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे केवळ ‘हनुमानगढीसे बुलावा आया है!’ एवढ्या संदेशाने लोकांची उत्सुकता वाढली. तिकडे अयोध्येत योग्य आखणी करण्यात येत होती. बहुधा वादग्रस्त वास्तूच्या पहाऱ्यावरील हिंदू पहारेकऱ्याशी संपर्क साधला गेला असावा. रात्रीचा पहारेकरी बरकत अली हा होता. त्याला याबाबत काही ठाऊक होते का, ते सांगता येत नाही. 22 डिसेंबरच्या रात्री उशिरा सर्वत्र धुके पसरले होते. त्यावेळी मूर्ती घेऊन वृंदावन सुरक्षेसाठी लावलेल्या कठड्याजवळ काहीही न बोलता मूर्ती घेऊन अभिराम दास यांच्याकडे आला. त्या दोघांनी अनेक अडथळे पार करून मूर्ती चबुतऱ्यावर कशा ठेवल्या. आणि त्यानंतर काय घडले ते पुस्तकातूनच वाचायला हवे.

‘उपसंहार’ या प्रकरणात लेखिका या नगरीतील सध्याचे वास्तव लिहिते. त्यात तिची हळहळ जाणवते. ती लिहिते, ‘एकेकाळी खूपच महत्त्व असलेली छोटी छावणी आता उदास दिसते. महंत नृत्य गोपाल दास यांच्या गढीची रया गेली आहे... निर्मोही आखाड्यातली गडबडही थंडावली आहे. आणि पूर्वीची शेकडो मंदिरे, मशिदी तर आता कुठे दिसतच नाहीत. केवळ भव्य श्रीरामजन्मभूमी मंदिर आणि विहिंप-बजरंग दल यांचे वर्चस्व दाखवणारे कठोर बजरंगबलीचे रौद्ररूप दाखवणारे मोठमोठे फलक सर्व व्यापून राहिले आहेत. अनेक वर्षे अयोध्येत धंदा करत असलेल्या अनेक दुकानदारांना यानंतर आपल्या उपजीविकेचे पुढे काय, याची चिंता आहे, तर कित्येकांना थोड्याच काळात आपले राहते घर जाणार याची भीती आहे. कारण यापुढे या नगरीत येणाऱ्या भाविक यात्रेकरू आणि त्याहीपेक्षा महत्त्वाच्या परदेशी आणि देशी पर्यटकांच्या सोयीसाठी येथील रस्ते रुंद केले जाणार, परदेशी पर्यटकांच्या आणि देशातील संपन्नांसाठी मोठमोठी पंचतारांकित हॉटेल्स, मॉल, आणि करमणुकीची अनेक साधने येणार. त्याबरोबरच सुविधा आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली या पुराण्या, मनुनिर्मित समजण्यात येणाऱ्या अयोध्या नगरीमध्ये करण्यात येत असलेल्या अशा साऱ्या बदलांमुळे अयोध्येचे मूळ अस्तित्वच पुसून जाणार, असे दिसते. कारण पूर्वापार पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाणारी अयोध्या आता भाविक यात्रेकरूचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाण्याऐवजी, केवळ देशी-विदेशी हौशी पर्यटकांचे पर्यटन स्थळ, फार फार तर सर्वात मोठे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणूनच ओळखले जाईल, असे दिसते.

त्यातच लेखिकेला वाटणारी आणखी एक मोठी भीतीही आहे. अनेकांना वाटते की, एवढ्या साऱ्या प्रकारानंतर श्रीरामजन्मस्थान मंदिराची पूर्तता झाल्यानंतर तरी हे सारे थांबेल. पण लेखिका केवळ त्यांनाच नाही, तर साऱ्या देशवासीयांनाच धोक्याचा इशारा देते की, हे सारे आता येथेच थांबणार नाही. कारण आता हे घडवून आणणाऱ्यांची घोषणा आहे, ‘अयोध्या सिर्फ झाँकी है, काशी, मथुरा बाकी है!’

हे सारे वाचून झाल्यानंतर, शेवटी एवढेच जाणवते की, शरयू तीरीची अयोध्या आता पहिली उरली नाही, हेच खरे!

अयोध्या: पास्ट ॲन्ड प्रेझेन्ट
लेखक : सुतपा मुखर्जी
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स इंडिया
पाने : 300, किंमत : 499 रुपये.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक, ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: ayodhya sutapa mukharji ayodhya past and present abvp a s ketkar hindu muslim अयोध्या पुस्तक परिचय हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स इंडिया सुतपा मुखर्जी राममंदिर Load More Tags

Add Comment