आपल्या घटनेने गरीब, श्रीमंत, हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन, पारशी, आदिवासी, दलित सर्वजण समान आहोत आणि आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळेल, आपले स्वातंत्र्य अबाधित राहण्याची काळजी घेतली जाईल याची हमी दिली आहे. हेही विसरू नका की, असे केल्याने बंगालात 2021मध्ये आणि कर्नाटक, तेलंगणात गेल्या वर्षी लोकांनी आपण बदल करू शकतो हे दाखवून दिले होते.
काश्मीरमधील लोकांच्या यातना, मणिपूरमधील आता वर्षभर चाललेल्या यादवीमुळे तेथील लोकांना होत असलेल्या वेदना, महिला कुस्ती खेळाडूंचे दुःख आणि करोना काळात जगातील सर्वात कडक लॉकडाउनमुळे स्थलांतरित कामगारांचे, त्यांच्या कुटुंबियांचे झालेले हाल विसरू नका. शववाहिनी बनलेली गंगा, लोकांची औषधे आणि रुग्णालयात खाट मिळावी यासाठी चाललेली धडपड, ऑक्सिजन सिलिंडर मिळावेत यासाठी रुग्णालयांना करावी लागलेली; परंतु निष्फळ ठरलेली धावाधाव, ऑक्सिजन सिलिंडर म्हणून पुरवण्यात आलेली निरुपयोगी नळकांडी, रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सोसावा लागलेला अतोनात मनस्ताप, अंत्यविधीसाठी लावाव्या लागलेल्या रांगा आणि तरीही ती सोय न झाल्याने नदीतीरावरच पेटलेल्या असंख्य चिता...
आठवा; शंभरीपार गेलेले पेट्रोलचे दर, रुपयाच्या मूल्यात झालेली विक्रमी घट... शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य 80 कोटी लोकांना फुकट वाटले गेले, पण शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला दिला न गेल्याने त्यांची झालेली बिकट अवस्था, त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या इतर अनेक आश्वासनांप्रमाणे हवेत विरून गेलेल्या आश्वासनामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यांमधून वाहणारी अश्रुधार, दुसरीकडे याच साथीच्या काळात अंबानी आणि अदानीच्या संपत्तीत कित्येक पटींनी झालेली वाढ...
पुलवामातील बळींचा निवडणुकीसाठी करून घेतलेला वापर; परंतु त्याबाबत खुलासेवार माहिती देण्याबाबत मात्र मौन, त्यांना विमानाऐवजी बसने प्रवास करण्याची सक्ती का करण्यात आली याबाबत मौन, तेथे आरडीएस (शक्तिशाली स्फोटक) आले कोठून, याबाबत गुप्तहेर खात्याचे अपयश याबाबतही मौनच… आणि त्यामुळे गेलेले आणि हुतात्मा बनलेले 40 जीव, ज्यांचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर केला गेला; त्यांना विसरू नका.
भारताचा लोकशाही निर्देशांक सातत्याने घसरत चालला आहे, पण आम्ही मात्र आम्ही लोकशाहीची माता म्हणून गाजावाजा करतो आहोत. अनेक विद्यार्थी नेते, पत्रकार आणि कार्यकर्त्यांना वर्षानुवर्षे चौकशीविना तुरुंगात डांबले आहे, त्यातील आजाऱ्यांना काहीही सहाय्य दिले जात नाही, जी. एन. साईबाबांना मृत्युशय्येवरील आईला भेटण्याची मुभाही दिली जात नाही पण नंतर मात्र ते निर्दोष सुटतात. मात्र काहीजणांना तेथेच देहत्याग करावा लागला आहे, हेही विसरू नका.
बलात्कार करणाऱ्यांना मुक्त करून त्यांना हार घालून गौरविले गेले; वर त्यांच्यावर चांगले संस्कार झाले आहेत, असे सांगण्यात आले तेव्हा त्या बिल्किस बानोची काय अवस्था झाली असेल, याचा विचार करा. महिला कुस्ती खेळाडूंनी ज्याच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला तो ब्रिजभूषण शरण सिंग आणि शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारणारा खुनी अजय मिश्रा टेणी अद्यापही मोकळे आहेत, एवढे ते प्रभावी कसे आणि कुणामुळे आहेत याचाही विचार करा.
‘चौकीदारा’चे आपण भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार असल्याचे आश्वासन, सरकारी कामांसाठी घेण्यात येणारा – हररोज येणारा – पैशातील भ्रष्टाचाराचा अनुभव, सध्या मोठ्या भ्रष्टाचारी नेत्यांनाच पावन करून घेणारे सत्ताधाऱ्यांचे धुलाई यंत्र आणि तरीही ‘न खाऊंगा न खाने दूंगा’च्या केल्या गेलेल्या वल्गना आठवा... भ्रष्टाचारी म्हणून ज्यांच्यावर वारंवार टीका केली त्या नारायण राणे, अजित पवार, गाली जनार्दन रेड्डी, छगन भुजबळ, प्रफुल पटेल अशा अनेकांना, ते भाजपमध्ये दाखल होताच, या धुलाई यंत्राच्या मदतीने स्वच्छ करून, क्लीन चिटबरोबर चांगली पदेही देण्यात आली आहेत याची आठवण ठेवा.
‘ऑपरेशन लोटस’चा वापर करून राज्य सरकारे पाडण्यात आली, त्यामुळे अनेक राज्य सरकारांनी धसका घेतला आहे. त्यामुळे सरकारे पाडण्याच्या खेळीलाच आता ‘ऑपरेशन लोटस’ हे नाव मिळाले आहे. त्याचा बेलगाम वापर केला जात आहे, हे विसरू नका.
कोरेगाव भीमा - एल्गार परिषदेसंदर्भातील आरोपींपैकी विदुषी आणि कार्यकर्त्या शोमा सेन यांना सहा वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला या दीर्घ काळात खटल्याबाबत काहीही हालचाल न झाल्याने, तसेच शोमा सेन या अनेक आजारांनी ग्रस्त असल्याने, हा निर्णय देण्यात आला. आजवर या रेंगाळत ठेवण्यात आलेल्या प्रकरणातील सहा नेत्यांनाही जामीन मिळाला आहे. त्यांच्यावरील आरोप सिद्ध होण्यासारखे नाहीत, हे माहीत असल्याने खटले रेंगाळत ठेवण्याचे धोरण अमलात आणले जात आहे.
आणि दुसरीकडे, निवडणूक रोख्यांबाबत सविस्तर माहिती देण्याची शक्य तितकी टाळाटाळ स्टेट बँकेने केली. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ती द्यावीच लागली पण तरीही शक्य तितका वेळकाढूपणा करण्यात आलाच. ते कोणाला पाठीशी घालत होते, हे सर्वांनाच उमगले आहे. हे रोखे विकत घेणारे आणि ते पैसे कोणाला मिळाले हे उघड झाले आहे. तोट्यातील कंपन्या शेकडो कोटींचे रोखे कसे घेतात, त्यानंतर त्यांना हजारो कोटींची कंत्राटे कशी मिळतात हे उघड झाले आणि इतरांना भ्रष्टाचारी म्हणणारे स्वतःच किती भ्रष्टाचारी आहेत हे लोकांसमोर आले, हेही ध्यानात ठेवा.
निवडणुकीआधीच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची बँक खाती गोठवायची आणि जो काही थोडाफार पैसा उरला आहे, तोही खर्च करायला मनाई करायची ही सध्याची रीत विसरू नका. दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात ठेवले जाते, त्यांच्या सरकारमधील मंत्री फोडले जातात हेही आठवा. महाराष्ट्रातील दोन पक्षांतही फूट पाडली गेली, आणि त्यातील गणंग पावन करून घेतले गेले.
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर हवा, पण व्हीव्हीपीएटीचा वापर करण्यास मात्र विरोध हा विरोधाभास आणि चंदीगढचे महापौरपद मिळवण्यासाठी केलेला उघडउघड गैरप्रकार कसा विसरता येईल? तुमचे मत सुरक्षित नसेल तर त्याला महत्त्व तरी किती राहणार!
पण हेही विसरू नका की, आपल्या घटनेने गरीब, श्रीमंत, हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन, पारशी, आदिवासी, दलित सर्वजण समान आहोत आणि आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळेल, आपले स्वातंत्र्य अबाधित राहण्याची काळजी घेतली जाईल याची हमी दिली आहे. त्यामुळे मतदान करण्याआधी या साऱ्या गोष्टींचा विचार करा. हेही विसरू नका की, असे केल्याने बंगालात 2021मध्ये आणि कर्नाटक, तेलंगणात गेल्या वर्षी लोकांनी आपण बदल करू शकतो हे दाखवून दिले होते.
तर या साऱ्या गोष्टी ध्यानात ठेवून मतदान करा, म्हणजे 4 जूनला तुम्हाला अपेक्षित बदल घडलेला दिसेल!
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
हेही वाचा :
Tags: sadhana digital loksabha 2024 elections politics bilkis bano a s ketkar राजकारण लोकसभा निवडणूक साधना डिजिटल मतदान Load More Tags
Add Comment