व्यावसायिक टेनिसमधील दोन दशकांच्या देदीप्यमान कारकीर्दीनंतर क्ले कोर्टचा सम्राट म्हणून ओळखला जाणारा स्पेनचा राफाएल अर्थात राफा नदाल निवृत्त झाला. गेली दोन वर्षे त्याला निवृत्तीचे वेध लागले होते. अखेर परवाच्या २० नोव्हेंबरला टेनिसप्रेमींवर हा वियोगाचा प्रसंग आला. खुद्द नदाललाही त्याला तोंड देणे अवघड झाले आणि अश्रूंचा बांध फुटला. इतके दिवस या प्रसंगासाठी मनाची तयारी करूनही अखेर जेव्हा ती वेळ आली तेव्हा प्रेक्षकांच्या “राफा राफा” या घोषाने तो भारावून गेला. प्रेक्षकांचा निरोप घेताना, “बाकी काही नाही, मला फक्त मलोर्का या लहानशा गावातील एक चांगला माणूस म्हणून ओळखा”, असे त्याने सद्गदित स्वरात सांगितले. त्याच्या निवृत्तीबरोबर एक युगांत झाला आहे. गेली दोन दशके टेनिस म्हणजे फेडरर, नदाल आणि योकोविच हे तीन शिलेदार असे जे समीकरण झाले होते, त्यातील पहिला फेडरर २०२२ मध्येच निवृत्त झाला. आता हा दुसरा शिलेदारही त्याच्या साथीला गेला. एकटा नोवाक योकोविच बाकी आहे. पण त्याची कारकीर्दही उतरणीला लागली आहे. ग्रैंड स्लॉम मालिकेत २४ वे जेतेपद मिळवल्यानंतर दीर्घकाळ त्याला त्या मालिकेत यश मिळालेले नाही.
या डेव्हिस चषक लढतीनंतर मी निवृत्त होणार, असे नदालने जाहीर केले होते. स्पेनच्या कर्णधाराने अनपेक्षितपणे त्याची एकेरीसाठी निवड केली. मात्र त्याचा हा निर्णय यशस्वी ठरला नाही. मायदेशीच्या या लढतीतील पहिल्याच सामन्यात नेदरलँडच्या व्हॅन द झांडशुल्पने त्याला ६-४, ६-४ असे हरवले. या सामन्यात नदालने क्वचितच त्याच्या कौशल्याची चुणुक दाखवली. पण त्याहून अधिक काही करणे त्याला शक्य झाले नाही. त्यातच भर म्हणून एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात अल्काराझने टॅलन ग्रीक्सपूरचा ७-६ (७-०), ६-३, असा पराभव करून लढत १-१ बरोबरीत आणल्यानंतरही स्पेनने दुहेरीचा सामना गमावला. त्यांच्या अल्काराझ मार्सल ग्रॅनोलर्स या जोडीला नेदरलँडच्याच्या व्हॅन द झांडशुल्प आणि वेस्ली कूल्हॉफ या जोडीने ७-६ (७-४), ७-६ (७-३) असे पराभूत केले आणि स्पर्धेची उपान्त्यफेरी गाठण्याचे त्यांचे इरादे फोल ठरले. राफाच्या हेवा वाटण्याजोग्या कारकीर्दीचा शेवट काही चांगला झाला नाही. स्वतःचा आणि संघाचा पराभव नदालला बघावी लागली. डेव्हिस चषक स्पर्धेतील पहिली लढतही नदालने गमावली होती आणि आता शेवटच्या लढतीतही तो हरला. दरम्यानच्या काळात याच स्पर्धेत त्याने २९ विजय नोंदवले होते. त्यामुळे मायदेशातील ही हार बोचरीच ठरली. खुल्या फ्रेंच स्पर्धेतही नदालला पहिल्या आणि शेवटचा सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. योगायोग असा की रॉजर फेडररलाही त्याच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना गमवावा लागला होता.
नदालच्या खेळातील कौशल्याबाबत बरेच काही लिहिले गेले आहे. त्यामुळे त्याची पुनरावत्ती न करता त्याच्या कारकीर्दीतील महत्त्वाचे काय त्याची नोंद मात्र करायलाच हवी. ग्रँड स्लॅम मालिकेतील ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत दोन, फ्रेंच खुल्या स्पर्धेत १४, विम्बल्डन येथे दोन तर अमेरिकन खुल्या स्पर्धेत चार अशी २२ जेतेपदे जिंकून त्याने विक्रम नोंदवला होता. तो मागे टाकताना नोवाक योकोविचने मागे टाकून २४ विजेतीपदे जिंकली आहेत. पण तेथेच तो अडकून पडल्यासारखे दिसत आहे. मात्र राफा नदालचा फ्रेंच खुल्या स्पर्धेत १४ वेळा अजिंक्य ठरण्याचा विक्रम मात्र बहुधा अबाधितच राहील. याशिवाय व्यावसायिक स्पर्धांत त्याने ९२ वेळा जेतेपद मिळवले आहे त्यात क्ले कोर्ट स्पर्धांतील विक्रमी ६३ जेतेपदांचा मावेश आहे. याशिवाय त्याने ऑलिंपकमध्ये २००८ (बीजिंग) मध्ये एकेरीत तर २०१६ (रिओ) येथे दुहेरीत अशी दोन सुवर्णपदके कमावली आहेत. स्पेनने २००४, २००८, २००९, २००११ आणि २०१९ अशा पाच वेळा डेव्हिस चषक जिंकला. त्यात नदालचा सिंहाचा वाटा होता, याबाबत कुणाचेच दुमत नाही. व्यावसायिकांच्या क्रमवारीत तो २०९ आठवडे पहिल्या क्रमांकावर होता.
कौतुकाची बाब म्हणजे या दोन दशकांच्या कारकीर्दीत साधारण १२५० रॅकेट त्याने वापरल्या असतील. पण एकदाही त्याने इतरांप्रमाणे रॅकेट तोडलेली नाही. (बऱ्याचदा खेळाडू एखादा पॉइंट गमावला वा सामना हरला की तो राग रॅकेटवर काढतात) यातच त्याचा संयमी स्वभाव दिसून येतो. या कारणानेच तो प्रेक्षकांचा आवडता खेळाडू आहे.
वयाच्या चौथ्या वर्षी नदालने प्रथम टेनिस रॅकेट हातात धरली. त्याचा काका टोनी हा त्याचा मार्गदर्शक होता, तो जवळपास त्याच्या कारकीर्दीच्या अखेरपर्यंत. मात्र त्याने या जबाबदारीतून अंग काढून घेतले आणि त्यानंतर नदालला पूर्वीसारखे यश मिळाले नाही. तशी त्याला फुटबॉलचीही आवड होती. त्याचा काका मीकेल एंजल नदाल हा प्रख्यात फुटबॉल खेळाडू होता पण अखेर राफाने टेनिसलाच पसंती दिली. कदाचित फुटबॉल एका खेळाडूला मुकला असेल, पण टेनिसचे मात्र त्यामुळे भले झाले, असे म्हणता येईल.
३ जून १९८६ रोजी जन्मलेल्या नदालने केवळ १५ व्या वर्षी, २००१ साली व्यावसायिक खेळाडू बनण्याचा निर्णय त्याने घेतला होता. तो सर्वात लहान वयाचा व्यावसायिक खेळाडू होता. नंतरच्याच वर्षी त्याने व्यावसायिकांच्या स्पर्धेत पहिला विजय नोंदवला, असा पराक्रम करणारा तो सर्वात लहान वयाचा खेळाडू होता. आणि नंतर २००२ मध्ये त्याने व्यावसायिकांच्या स्पर्धेतील पहिले विजेतेपद मिळवले. तो विम्बल्डन स्पर्धेत २००४ मध्ये उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचला होता. त्याच वर्षी डेव्हिस चषक जिंकणाऱ्या स्पेनच्या संघात त्याचा समावेश होता. नंतरच्याच वर्षी त्याने खुली फ्रेंच स्पर्धा जिंकली आणि तेव्हा अंतिम सामन्यात तेव्हां क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या रॉजर फेडररचा त्याने पराभव करून क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर व्यावसायिकांच्या स्पर्धांत त्याने स्वतःचे स्थान निर्माण केले. खुल्या फ्रेंच स्पर्धेत रोलाँ गॅरो कोर्टवर त्याने एकाच स्पर्धेत चौदा विजेतीपदे मिळवण्याचा विक्रम केला त्यामुळेच त्या क्क्ले कोर्टचा सम्राट हे बिरुद मिळाले. या स्पर्धेत त्याने एकूण ११२ विजय मिळवले आणि केवळ चारदा त्याला हार पत्करावी लागली. त्यातील काही वेळा दुखापतीनंतरही सामना न सोडता शेवटपर्यंत खेळण्याच्या त्याच्या स्वभावामुळे.
संपूर्ण कारकीर्दीत त्याला प्रमुख्याने नोवाक योकोविच आणि रॉजर फेडरर यांचा सामना करावा लागला. या तिघांनी २००५ ते २०२१ या कालखंडात ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धांवरही वर्चस्व गाजवले. या काळात त्यांच्यापैकी एक जण क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असायचा. (केवळ एकदाच, २०१६ मध्ये अँडी मरेने हा मान मिळवला होता.) फेडररबरोबर त्याचे एकूण ४० सामने झाले त्यातील २४ त्याने जिंकले, तर १६ फेडररने त्यांतही अंतिम फेरीत नदालने १४ तर फेडररने १० वेळा विजय मिळवला. योकोविचबरोबर मात्र त्याने ३१ विजय मिळवले तर योकोविचने २९. अंतिम सामन्यांत मात्र योकोविचची १५- १३ अशी आघाडी आहे. व्यावसायिकांच्या स्पर्धेत नदाल आणि फेडरर या दोघांवर सर्वाधिक विजयही योकोविचने मिळवले आहेत. अलिकडील काही वर्षांत १-८५ मी. उंचीच्या नदालला दुखापतींनी हैराण केले होते. मात्र नदाल अस्ताला जात असतानाच स्पेनच्या कार्लोस अल्काराझ याचा टेनिस क्षितिजावर उदय झाला, ही नदालसाठी समाधानाची गोष्ट होती. आपली जागा घेण्यास अल्काराझ समर्थ आहे, असे नदालला वाटते आणि चारदा ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे मिळवून अल्काराझनेही हा विश्वास अनाठायी नाही, हा दिलासा दिला आहे.
रॉजर फेडररने एका पत्रातूनच आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने लिहिले: “तू आता टेनिसला राम राम करत असताना, मी भावुक होण्यापूर्वीच तुझ्याबरोबर काही गोष्टी करणार आहे. एक उघड उघड दिसणारी गोष्ट म्हणजे मी तुला हरवले त्याहीपेक्षा जास्त वेळा तू मला पराभूत केले आहेस. मला कोणीही आव्हान देऊ शकला नसेल एवढे तू दिले आहेस. क्ले कोर्टवर खेळताना तर मला वाटायचे की मी तुझ्या अंगणातच आलो आहे आणि तूही मला केवळ सामन्यात उभे राहता येण्यासाठी जास्तीत जास्त कष्ट घ्यायला लावायचास. माझ्या खेळाबद्दल पुन्हा विचार करायला तू मला भाग पाडलेस, इतके की मी रॅकेटही वेगळ्या प्रकारची बनवून घेतली. रॅकेटच्या वरच्या भागाचा आकार बदलून घेतला, त्याने थोडा फायदा होईल या कल्पनेने. मी काही फारसा अंधश्रद्धाळू नाही, पण तू बहुतेक ती मानत असावास. त्यामुळेच मला तुझ्या एकंदर खेळण्याच्या प्रकाराचेच आश्चर्य वाटते. तुझ्या पाण्याच्या बाटल्या तू ज्याप्रमाणे सैनिकांच्या रांगेप्रमाणे शिस्तीत ठेवायचास, त्यात कधी बदल झाला नाही. केस सारखे करण्याची तीच गोष्ट, अंडरवेअर सावरून ठीकठाक करणे... या साऱ्याच गोष्टी अचंबित करणाऱ्या होता. आणि अगदी उठून दिसणाऱ्या. एकमेव ! कारण त्या तुलाच शोभून दिसत.”
गेल्या शतकातला सर्वोत्तम खेळाडू ऑस्ट्रेलियाचा रॉड लेव्हर म्हणाला, “नदालची संपूर्ण कारकीर्द पाहायला मिळाली हे माझे भाग्यच आहे.” त्याने पुढे म्हटले आहे की, “तुझ्यामुळेच अगणित अविस्मरणीय क्षण बघता आले. तुझ्या अतुलनीय कौशल्यामुळे भावी पिढ्यांना स्फुरण येईल”. स्पेनच्याच कार्लोस अल्काराझने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, “केवळ तुझ्यामुळेच मी व्यावसायिक खेळाडू आहे. तू प्रथमपासून माझा आदर्श होतास आणि नंतर तुझ्याबरोबर खेळण्याचे भाग्यही मला लाभले. तू तर स्वप्नातील जोडीदार आहेस”. सामन्यानंतर नदाल रडताना दिसल्यावर सध्याची दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू इगा स्विआटेक हिने रडणारा इमोजीच पाठवून आपल्या भावनांना वाट करून दिली. जगभरच्या टेनिसप्रेमींचीही तीच भावना होती. अमेरिकेच्या कोको गॉफने वेगळ्याच प्रकारे आपल्या भावना कळवल्या. नदालबरोबर सहभावना व्यक्त करून तिने म्हटले की आज मी स्पेनचीच आहे. सेरेना विल्यम्सने म्हटले की, “अनेकांना केवळ ज्याची स्वप्ने पाहावी लागतात, ते सारे तू प्रत्यक्षात मिळवले आहेस. तुझ्याच कालखंडात खेळून २४ ग्रँड स्लॅम जेतेपदे मला मिळवता आली, हे मी माझे भाग्यच समजते”. पुढे ती म्हणते, “तुझ्यामुळेच सतत प्रगती करत राहण्याचा धडा मला मिळाला. तुझी संपूर्ण कारकीर्दच अवाक् करणारी आहे. तुझ्यामुळेच मला अधिक जिद्दीने खेळण्यचा, चिकाटीने लढण्याचा आणि सहजी हार न पत्करण्याचा धडा मिळाला. कोणत्याही सबबी न देता खेळायचे हे मी तुझ्याकडूनच शिकले. तुझा हा वारसा कायम टिकणारा आहे”. मारिया शारापोवाचा संदेशही आगळा आहे. तिने नदालला, “तू एक अद्वितीय खेळाडू आहेस, कारण तू जणू काही स्पर्धावृत्तीची व्याख्याच होतास, तुझ्यासारखा तूच. अन्य कोणी नाही. तुझ्या जिद्द, तुझी झुंजार वृत्ती आणि दर्जा, जो तू अगदी प्रतिकूल परिस्थितीतही दाखवत होतास त्याबद्दल मला आदर आहे”. नोवाक योकोविचने म्हटले, “राफा, तुझी चिकाटी, जिद्द, लढाऊ वृत्ती आणि ताकद ही येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्शच आहे. हा धडा त्यांनी गिरवायलाच हवा. मी तुझा प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जातो, ही बाब तशी हरखून जायला लावणारीच आहे. टेनिस जगताला तुझी उणीव जाणवत राहील”.
सरतेशेवटी चाहत्यांचा निरोप घेताना नदाल म्हणाला, “हा क्षण येऊ नये अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण शेवटी हे सत्य स्वीकारावेच लागते. खेळाडू म्हणून मी थकलेलो नाही, पण आता शरीर मात्र खेळण्यासाठी साथ देत नाही. त्यामुळेच मला निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला आहे. माझ्या छंदातूनच कारकीर्द घडवण्यात मी यशस्वी ठरलो. मला वाटलेही नव्हते एवढा काळ मला खेळता आले याबाबत मला स्वतःबाबतच धन्य वाटते. तुम्ही सारेजण नेहमीच माझ्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे होतात म्हणूनच एवढी वर्षे मी टिकून राहिलो असे मला वाटते”. त्याला निरोप देण्यासाठी खास समारंभ आयोजित करण्यात आला होता. तो संपल्यानंतर नदालने सहकाऱ्यांना मिठी मारली आणि चाहत्यांचेही आभार मानून अश्रूभऱ्या डोळ्यांनी कोर्टाचा निरोप घेतला. एका यशस्वी कारकिर्दीची अखेर झाल्याची हळहळ चाहत्यांना वाटणे अपरिहार्यच होते.
टेनिसच्या या महान खेळाडूला, क्ले कोर्टच्या सम्राटाला सलाम!
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
Tags: rafael nadal retirement rafa राफेल नदाल निवृत्ती टेनिस Load More Tags
Add Comment