तसं पाहता वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला अन् अंगावर पांढरा अॅप्रन व गळ्यामध्ये स्टेथोस्कोप आला की 'डॉक्टर'चं मन घडू लागतं. प्रस्तुत पुस्तक म्हणजे शिक्षण, सभोवतालचं वाचन आणि रुग्णांशी आस्थेवाईक संवाद यांतून संवेदनशील डॉक्टर कसा आकार घेऊ लागतो, याचे प्रत्यक्ष अनुभव आहेत.
1980च्या दशकापर्यंत, सायकलला बॅग लटकावून खेडोपाडी जाणारा डॉक्टर हा चित्रपटसृष्टीतील नायक असे. त्या काळात डॉक्टर हा कुटुंबाचा अभिन्न हिस्सा होता आणि त्याच्याविषयी समाजमनातही अतीव आदराची भावना होती. कित्येक डॉक्टरांच्या कर्तृत्वातून कोणतंही विघ्न दूर करू शकणारे 'संकटमोचक' अशी ख्याती दूरवर पसरत होती. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगात सल्ला घेण्यासाठी, अनेक जण शिक्षक वा डॉक्टर यांच्याकडे धाव घेत असत.
1990 पूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता ही उत्तम दर्जाची होती. विद्वान प्राध्यापकांमुळे विद्यार्थिदशेतच अत्यल्पवादाचे (मिनिमलिझम) धडे शिकवले जात. प्रत्येक रुग्णाची माहिती मन लावून ऐकून ती नोंदवून ठेवणे. कमीतकमी तपासण्यांत निदान करणे व माफक औषधोपचारातून रुग्णास बरे करणे, ही सूत्रे विद्यार्थ्यांवर आपसूकच बिंबली जाऊन डॉक्टरांच्या पिढ्या घडत गेल्या. डॉ. शुभदा लोहिया ह्या अशाच वातावरणातून घडत गेल्या.
शिक्षण, अभियांत्रिकी, पत्रकारिता, वैद्यकीय कोणत्याही व्यवसायात धंदेवाईक व आस्थेवाईक असे दोन्ही प्रकारचे लोक आढळतात. त्या काळात रुग्णांना खर्चात ढकलणारे डॉक्टर पाहून ग्रामीण भागात म्हणच तयार झाली, 'माणसांनी पांढऱ्या व काळ्या कोटापासून दूर राहावं.' अशा डॉक्टरांना धन कमावता आलं असेल. परंतु त्यांना समाजात मान मिळू शकला नाही. तेव्हा अंतःकरणातून रुग्णांविषयी आस्था वाटणाऱ्या डॉक्टरांची विरळी जातही होती. अशा धीरोदात्त, शांत व सौम्य प्रकृतीच्या डॉक्टरांची भेट होताच असंख्य रुग्णांचा निम्मा आजार बरा होत असे. रुग्णांना मनातून सुरक्षितता वाटत असे. आपपर भावास थारा न देता उदात्त मूल्यांची बूज राखणाऱ्या अशा महानुभावांना समाजातील तत्त्वज्ञांची प्रतिष्ठा होती. डॉ. रामचंद्र भालचंद्र, डॉ. व्यंकटराव डावळे, डॉ. ईश्वर राठोड यांच्यासारख्या काही डॉक्टरांची बीड, उस्मानाबाद व लातूर परिसरात अशीच ख्याती होती. दंतकथा झालेल्या ह्या प्रभृतींचा आजही 'डॉक्टरांचे डॉक्टर' असा त्यांचा गौरवपूर्वक उल्लेख केला जातो.
तसं पाहता वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला अन् अंगावर पांढरा अॅप्रन व गळ्यामध्ये स्टेथोस्कोप आला की 'डॉक्टर'चं मन घडू लागतं. प्रस्तुत पुस्तक म्हणजे शिक्षण, सभोवतालचं वाचन आणि रुग्णांशी आस्थेवाईक संवाद यांतून संवेदनशील डॉक्टर कसा आकार घेऊ लागतो, याचे प्रत्यक्ष अनुभव आहेत.
विज्ञान हे सतत प्रगत होत असतं. कित्येक जुने आडाखे व सिध्दान्त गळून पडत असतात. म्हणूनच आयझॅक न्यूटन (1642-1727) यांनी, “नवी पिढी ही आधीच्या पिढीच्या खांद्यावर बसून जग पाहत असते," असं सांगून ठेवलं होतं. माणसांना विकार कसे होतात? त्याची जबाबदारी शरीरावर किती व मनावर केवढी? यांविषयी पूर्णपणे अचूक निदान होऊ शकतं का? तज्ज्ञ डॉक्टरांनी आशा सोडलेला रुग्णदेखील ठणठणीत बरा कसा होतो? शरीरारील पेशी एकाद्या औषधाला दर वेळी सारखाच प्रतिसाद का देत नाहीत? अशा कित्येक प्रश्नांची उकल करून घेण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अशा निरनिराळ्या औषधोपचार पद्धती वेगवेगळा विचार करतात. ह्या सर्वांना अवैज्ञानिक ठरवता येईल का? मग त्या उपचारांनी रुग्ण बरे होतात त्याला तोषक वा समाधानकारक परिणाम (प्लासेबो) म्हणता येईल? प्रत्येक डॉक्टरला ह्यासारख्या कूट प्रश्नांना सामोरं जावं लागतंच.
लातूर येथील डॉ. राठोड म्हणत, "आम्ही डॉक्टर करतो तरी काय? रुग्णाच्या सांगण्यातून निम्मं काम होतं. आम्ही शिकल्यानुसार काही अंदाज बांधतो आणि कित्येक वेळा रुग्ण नैसर्गिकरीत्या बरा होऊन जातो. श्रेय मात्र तो आपल्याला देतो." वास्तविक प्रत्येक रुग्ण आपल्याला काही शिकवत असतो. लोहियादेखील अशाच विचारप्रक्रियेतून जाताना दिसतात. वैद्यकीय पदवीनंतर इंटर्नशिपपासून ते त्यापुढे पदव्युत्तर शिक्षण घेऊन वैद्यकीय सेवा चालू केल्यानंतरही करतानाच अनेकविध समस्यांचा डोंगर उभा राहतो. मात्र डॉ. लोहिया यांची खुली दृष्टी व त्यांची जिज्ञासा यांतून त्यांना उत्तरे सापडत जातात. सुसंवाद का महत्त्वाचा आहे? वाणीतून व स्पर्शातून व्यक्त होणाऱ्या जिव्हाळ्यामुळे सिरोटोनीन संप्रेरक स्रवतं आणि रुग्णास बरं वाटू लागतं.
वैद्यकीय क्षेत्राला सध्याच्या झटपट 'गुगलीकरणा'च्या जोरदार झळांतून जावे लागत नाही. रुग्णच डॉक्टरांना "मग सीटी स्कॅन करू का एम.आर.आय. ?" असा सवाल करतात. काही रुग्णांना आजार व तपासण्या करून त्या मिरवायला आवडतात. उर्दूतील 'अर्धवट हकीम म्हणजे जीवास धोका' ही म्हण आता बदलून तो डॉक्टरांना कसा 'ताप' आहे? हे उलगडत जातं. अशा रुग्णांना कसं सामोरं जावं? याचं खुमासदार वर्णन लेखिका प्रस्तुत पुस्तकात करतात.
अंबाजोगाई येथील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्राला उच्च दर्जावर नेण्याचं कार्य करणाऱ्या डॉ. शैला व डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या कुटुंबात डॉ. शुभदा दाखल झाल्या. त्यात त्या फिजिशियन असल्यामुळे त्यांना सार्वजनिक जीवनाचे असंख्य पैलू दिसत गेले. विधवा वा घटस्फोटित असणाऱ्या एकल महिलांची स्थिती दयनीय असते. तशात त्यांना विकार जडला तर तो 'दुष्काळातील तेरावा'च नाही तर 'पंधरावा' महिना ठरतो. अशा रुग्णांना धीर देऊन त्या एकाच वेळी 'अनेक विकार' दूर करतात.
आता अनेक रुग्णालयांना भाडोत्री गुंड ठेवावे लागतात. देशभर कित्येक ठिकाणी फीस देण्यावरून रुग्ण दगावला अथवा अयोग्य संभाषणामुळे डॉक्टर व रुग्ण हे नातं अतिशय स्फोटक होऊन बसलं आहे. ग्राहक न्यायालयात डॉक्टरांवरील खटल्यांचं प्रमाण वाढत आहे. आता मात्र डॉक्टर व औषध कंपन्या हातात हात घालून रुग्णांना फसवत आहेत, लुटत आहेत, अशी भावना सार्वत्रिक दिसून येते. त्यावर संवाद हाच एकमेव व रामबाण उपाय आहे, असे सांगून लेखिका सार्वजनिक आरोग्याच्या व्यापक समस्येकडेही लक्ष वेधतात.
करोनापूर्व काळात 2019 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं 'हवामान बदल आणि अनारोग्य' अहवाल तयार केला होता. त्यात हगवण, हिवताप, साथीचे रोग तसेच उष्णतेची लाट, दूषित हवा व पाणी यांमुळे मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. तापमान वाढीमुळे यामध्ये कमालीची भर पडणार आहे. परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेची अब्जावधी डॉलर्सची हानी होणार आहे. सार्वजनिक आरोग्याची परवड परवडणारी नाही. हवामान बदल ही संधी मानून आरोग्यासाठीच्या निधीमध्ये वाढ आवश्यक आहे; असं बजावून ठेवलं होतं. एकंदरीत सध्या अनेक देशांत आरोग्य सुविधा देताना न्याय व समता ह्या संकल्पनांचा विचारच केला जात नाही. मानवाची भरभराट करण्यासाठी स्थानिक व जागतिक पातळीवर उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध असणं अतिशय कळीचं आहे. त्यासाठी जागतिक पातळीवर भक्कम सार्वजनिक यंत्रणा उभी करणं अनिवार्य आहे. सध्या काही देशांत केंद्रीय सार्वजनिक आरोग्य धोरण राबवले जाते. ते अधिक नियोजनबद्ध, विचारपूर्वक लक्ष्य ठरवून आखलेलं असतं. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पायाभूत सुविधा तयार होत असतात. याउलट विकेंद्रित सार्वजनिक आरोग्य धोरण हे थातूरमातूर, त्या क्षणी सुचेल तसे आखलेलं, ठिगळासारखं असतं. अमेरिकेत अशी यंत्रणा आहे. तर तैवान, सिंगापूर व युरोपातील अनेक देशांत केंद्रीय पद्धत अवलंबिली जाते. त्यामुळे या देशातील आरोग्य व्यवस्था ही सुदृढ आहे.
प्रो. सर मायकेल मॅरमॉट हे जागतिक ख्यातीचे रोग परिस्थितिशास्त्रज्ञ व सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ असून ते मागील 30 वर्षांपासून आरोग्यक्षेत्रातील विषमतेच्या परिणामांचा अभ्यास करीत आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी त्यांच्यावर आरोग्याच्या अवस्थेविषयीचे निदान करण्याची जबाबदारी सोपवली होती. प्रो. मॅरमॉट यांनी 'युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन'मधून सलग 10 वर्षे सखोल अभ्यास केला. त्यांनी 2020च्या फेब्रुवारी अखेरीस परखड अहवाल सादर केला होता. सरकारांनी सार्वजनिक आरोग्यावरील खर्चाकडे कठोरपणे पाहिल्याचे दुष्परिणाम जगाला भोगावे लागत आहेत. सर्वांनाच, काटकसर ही केवळ आरोग्याचा प्रश्न येताच आठवते. त्यामुळे ह्या दशकात आयुष्यमान वाढण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. गरीब पुरुषांचं सरासरी आयुष्यमान हे श्रीमंतांच्या मानाने 9.4 वर्षांनी कमी तर महिलांचं 7.4 वर्षांनी कमी आहे. गरिबांच्या वेतनांमध्ये वरचेवर घट होत असून त्यामुळे त्यांच्या आजारपणात वाढ होत आहे. गरीब व श्रीमंत यांना उपलब्ध होत असणाऱ्या आरोग्य सुविधांतील अंतर वाढत असून हे राष्ट्राच्या आरोग्यासाठी घातक आहे. गरीब देश व गरीब जनता अशा आपत्तीमध्ये होरपळून निघणार आहे. असं त्यात स्पष्टपणे सांगून ठेवलं होतं. (आपल्याकडे असा अभ्यास झालेला नसला तरी निष्कर्ष कसे असतील, याचा सूज्ञांना अंदाज येईलच.) सार्वजनिक आरोग्य सुविधा पुरविण्यात जगातील सर्वोत्तम राष्ट्रांच्या अनेक सर्वेक्षणात कॅनडा, डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, जर्मनी, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, स्वित्झर्लंड असा क्रम लागतो. अमेरिका पंधराव्या स्थानावर आहे. 190 देशांच्या यादीत भारताचं स्थान हे कायम 110 च्या पुढेच जात आहे.
'प्रकृती हीच संपत्ती आहे', हे प्राचीन काळापासून चालत आलेलं सुभाषित होतं. अठराव्या शतकात अमेरिकी अध्यक्ष बेंजामिन फ्रँकलिन यांनी 'तरुण व्यापाऱ्यांना सल्ला' ह्या निबंधात 'वेळ हाच पैसा आहे' असं सूत्र दिलं. यथावकाश संपूर्ण जगानं ते आत्मसात करीत 'संपत्ती हीच प्रकृती!' हा नवा मंत्र आपलासा केला. पैसा आणि वेळ यांत निवड करताना पैशाला आपलंसं केलं. मनाची मशागत करणाऱ्या कला, शास्त्र व विनोद यांना वेळ नसला तरी चालेल, अशी धारणा होत गेली. काळ ही गुंतवणुकीची बाब झाली. गुंतून राहणे (बिझी) व अधिकाधिक पैसा कमावण्याला प्रतिष्ठा लाभली. अशा जीवनशैलीतून आरोग्याच्या नवनवीन जटिल समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. मानसिक विकारांचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे. ह्या अवस्थेला प्रगत म्हणता येईल? एकनाथांनी सांगितलं होतं, “रोग गेलियाचे लक्षणे, रोगी नेणे, वैद्य जाणे” त्याप्रमाणे लोहिया यांनी 'रुग्णांच्या चष्म्यातून' सध्याची वैयक्तिक व सामाजिक आरोग्यावस्था दाखवत त्यातून सुव्यवस्थेकडे जाण्याचे सूचनही केलं आहे. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. डॉ. लोहिया यांचे वाचन अद्ययावत असल्यामुळे त्यांनी प्रत्येक प्रकरणाचा आरंभ हा नेमक्या व चपखल अवतरणाने केला आहे. त्यातून विशाल विचारपटाची पार्श्वभूमी तयार होते. हे पुस्तक, वाचकाला एकाच वेळी डॉक्टर व रुग्ण ह्या दोघांच्या चष्म्यातून पाहण्याची काळानुरूप दृष्टी देण्याचं कार्य करणार आहे.
'रुग्णांच्या चष्म्यातून'
- डॉ. शुभदा राठी-लोहिया
साधना प्रकाशन
पृष्ठे : 120, किंमत : 125 रुपये.
- अतुल देऊळगावकर, लातूर
atul.deulgaonkar@gmail.com
साधना प्रकाशनाची सर्व पुस्तके sadhanaprakashan.in वर उपलब्ध आहेत.
Tags: sadhana prakashan marathi books atul deulgaonkar latest books rugnanchya chashmyatun Load More Tags
Add Comment