तो तरुणही हताश झाला होता. कारण लोक आता त्यालाच नावं ठेवायला लागले होते. स्वप्नं राहिली दूरच पण बदनामी कपाळी आली, याचं त्याला जास्तच दुःख झालं. सुरुवातीलाच जुन्या जाणत्यांनी सांगितल्याप्रमाणं वागलो असतो, तर एव्हाना आपण बऱ्यापैकी सुस्थितीत असतो, असंही त्याला वाटलं. आता पाहुण्यालाच याचा जाब विचारायचं त्यानं ठरवलं होतं...
एक गाव होतं. तेथील लोक साधे, सुस्वभावी आणि इतरांना मदत करणारे. सारे जण एकमेकाला सांभाळून असत, आजारपणात एकमेकांना मदत करत. अडल्यापडल्याला आधार देत असत. म्हणजे तसं सारं काही फार चांगलं नसलं, तरी कुणाला काही कमी पडत नव्हतं, कमी पडू दिलं जात नव्हतं. पण माणसाचा स्वभावच असा की जे आहे, त्यात समाधानानं राहायचं त्यांना जमत नाही, कदाचित आवडतही नसावं. त्यामुळं मला हे हवं, ते मिळालं तर किती बरं होईल असा विचार त्यांच्या मनात येतो. सगळ्यांच्या नाही, पण बऱ्याच जणांच्या. ज्यांच्या मनात असं काही येत नसे ते सांगत, “अरे आहे त्याच्यात समाधान माना. नसत्या आशेनं भलत्या गोष्टीच्या मागं धावू नका, भूलथापांना बळी पडू नका.” पण त्यांचं सांगणं फारसं कुणी मनावर घेत नसे.
त्या गावात एक मुलगा होता. नुकताच तारुण्यात पदार्पण केलेला. त्यामुळं त्याला काही ना काही हवंहवंसं वाटायचं. पण ते मिळत नसल्यानं तो खट्टू व्हायचा. कुणी काही विचारलं, तर सांगायचाही. पण त्याला पाहिजे ते देणं काही कुणाला शक्य होणारं नव्हतं. पण त्याला वाटत होतं, एक ना एक दिवस कुणी तरी येईल. माझ्या इच्छा पुऱ्या करील. मग आपण काय करायचं, या कल्पनांत तो रंगून जायचा. ते कल्पनांचं विश्वच त्याला थोडा दिलासा देई. तरीही असं कधी होईल का, याची चिंता त्याला वाटायची. तरीही तो वाट बघत होता. जो कुणी येणार असेल, तो लवकर यावा अशी प्रार्थनाही करायचा.
आणि एक दिवस खरंच एक पाहुणा त्याच्याकडं आला. त्याचा चेहरा पाहून म्हणाला, “अरे कसल्या काळजीत आहेस? असा हिरमुसला होऊन का बसलायस? सांग तरी मला.” मुलानं त्याच्याकडं पाहिलं आणि तो म्हणाला, “सांगून काय फायदा? बऱ्याच जणांनी विचारलं. मीही सांगितलं. पण मग ते म्हणाले, “अरे, असं भलतं सलतं काही मागू नको. जे शक्य नाही त्याच्या मागं कशाला लागायचं.” पण मी काही अशक्यप्राय गोष्टी मागत नव्हतो. मला चांगला पैसा, राहायला लहानसं का असेना, स्वतःचं आणि दोन वेळा पुरेसं अन्न. एवढंच. एक मात्र खरं की ते सांगत, त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. असं एकदम काही मिळत नसतं. धीर धर, काम कर. असंही म्हणतात. पण किती काळ ते सांगत नाहीत.”
त्यावर तो आलेला पाहुणा हसला. म्हणाला, “या तर अगदी सोप्या गोष्टी आहेत. मी तुला त्या साऱ्या तर देईनच. पण त्याहीपेक्षा खूप काही देईन. पण त्याच्या बदल्यात तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवायला हवा आणि इतरांनाही सांगायला हवंस की, मी किती चांगला आहे, मी सगळ्यांना काय काय देणार आहे. सगळ्यांना सुखी समाधानी बघायचंय मला. पण त्यासाठी त्यांनीही माझ्यावर विश्वास ठेवायला हवा. मी सांगेन तसं वागायला हवं. मग बघ तुम्हा सगळ्यांचं जीवनच बदलून जाईल!” जगाचा फारसा अनुभव नसलेल्या त्या तरुणाला वाटलं, हे तर अगदीच सोपं आहे. मग तो पाहुण्यानं सांगितलेलं काम, मनापासून करू लागला. त्या पाहुण्याचं काम झालं होतं. त्याचा लौकीक वाढतच गेला. लोक त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागले. तोही त्यांना आकर्षक स्वप्नं दाखवू लागला. त्यांना काय काय मिळणार याची मोठी यादी देऊ लागला. लोक त्यात रंगून गेले. त्यानं सांगितल्याप्रमाणं त्यांनी त्याला खूप अधिकार दिले. कारण तसं केलंत तरच तुमची स्वप्नं मी पुरी करीन, असं तो म्हणाला होता. अशाप्रकारे तो त्यांचा एकमेव आणि सर्वश्रेष्ठ नेता बनला.
मग त्याच्या वागण्या-बोलण्यात फरक पडला. तो छानछोकीत, ऐशआरामात राहायला लागला. थोडीशी संधी मिळताच स्वतःची प्रौढी मिरवू लागला. त्याबरोबर कुणालाच जुमेनासा झाला. मला कुणी काही सांगायचं नाही. सल्ला तर नाहीच नाही. कारण मला सर्वच कळतं. मी सर्वज्ञानी आहे, असं त्याचं म्हणणं होतं. वागणंही तसंच. मी सर्वांचंच भलं करण्यासाठी सारं करतोय, असं गर्वानं सांगत होता. प्रत्यक्षात मात्र केवळ स्वतःचं आणि त्याच्या पित्त्यांचं हित पाहणं एवढंच करत होता. त्यामुळं सामान्य लोकांचे हाल होत होते, पण तिकडे त्याचे लोक सारे मालामाल होत होते. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होते. त्याला जागतिक नेता म्हणू लागले होते.
हळूहळू त्याच्या या अट्टहासाचा सर्वसामान्य लोकांना जास्तजास्तच त्रास होऊ लागला. ते बिचारे, गरीब, अगतिक लोक केवळ तो खरंच त्याची आश्वासनं पुरी करील या आशेनं त्यांची स्वप्नं पुरी व्हायची वाट बघत होते. वर्षांमागून वर्षं जात होती. काहीच होत नव्हतं. ते होते तसेच होते. पण आशेचे दोर तुटता तुटत नव्हते, आणि वास्तवाची झळ मात्र असह्य होत चालली होती. तसं पाहिलं तर, स्वप्नं पुरी झाल्याची केवळ कल्पनाही ती झळ सुसह्य करत होती. पण मग मात्र त्यांना वास्तवाचे चटके बसायला लागले. आणि ते धाडस करून विचारू लागले, “आमच्या स्वप्नांचं काय”, त्यावर तो म्हणाला, “थोडा धीर धरा. असं अचानक कधी काही होतं का?”
हेही वाचा : मतदानाला जाल तेव्हा या मुद्द्यांचा विचार करा... आ. श्री. केतकर
लोक म्हणाले, “ठीक आहे. धरतो धीर.” कारण अजूनही त्यांचा विश्वास थोडा बाकी होता. आणि अंधूक आशाही होती. त्यामुळं त्या यातना सहन करत ते कसेबसे दिवस काढत राहिले. अन्य पर्यायच नव्हता त्यांच्याकडं. त्या तरुणाची अवस्था तर केविलवाणी म्हणावी अशीच झालेली. कारण लोक आता त्यालाच बोल लावू लागले होते. पण पाहुण्याच्या सांगण्यावरून तो फक्त थोडा काळ धीर धरा, असं सांगत होता.
आणखी काही वर्षं गेली. लोक अस्वस्थ झाले. त्यांची चलबिचल आणखीच वाढली. ते आपसांत कुजबुजू लागले. त्या पाहुण्यालाही ते जाणवलं. मग तो फुशारकीनं त्यांना म्हणाला, “एवढा काळ तुम्ही केवळ ट्रेलर पाहिलंत, मुख्य सिनेमा यापुढंच आहे.”
ट्रेलरच एवढं भयानक, तर चित्रपट काय असेल, असं लोकांना वाटलं!
निलाजरेपणानं तो पाहुणा पुढं म्हणाला, “मला पुन्हा एक संधी द्या. आणखी काही वर्षांनी तुम्हाला नक्कीच अमृतकाल दिसेल.” तो नेहमीच असा भविष्यातला 25-50 वर्षांनंतरचा वायदा करायचा. हे आता अनेकांना माहीत झालं होतं.
त्या अनुभवानं शहाणे झालेले काही जाणकार म्हणाले, “दिसेलही कदाचित, पण तोवर आम्ही जिवंत तर असायला पाहिजे ना!'”
आता तो तरुणही हताश झाला होता. कारण लोक आता त्यालाच नावं ठेवायला लागले होते. स्वप्नं राहिली दूरच पण बदनामी कपाळी आली, याचं त्याला जास्तच दुःख झालं. सुरुवातीलाच जुन्या जाणत्यांनी सांगितल्याप्रमाणं वागलो असतो, तर एव्हाना आपण बऱ्यापैकी सुस्थितीत असतो, असंही त्याला वाटलं. आता पाहुण्यालाच याचा जाब विचारायचं त्यानं ठरवलं होतं.
अन् तशी संधी मिळताच त्यानं पाहुण्याला विचारलं, “आम्हाला अशी भरमसाठ आश्वासनं का दिलीत?” पाहुणा हसून म्हणाला, “बेटा, तो तर एक जुमला होता!”
आणि कसं सर्वांना बनवलं या खुशीत तो हसू लागला.
***
जाता जाता, रामायणातील एक गोष्ट आठवली… बालक रामानं चंद्र हवा म्हणून हट्ट धरला. कुणालाही त्याची समजूत काढता येत नव्हती. इतर खेळणी त्याला नको होती. सर्वजण आता याचा हट्ट कसा पुरा करायचा या चिंतेत होते. तेवढ्यात सुमंत प्रधान आले. त्यांनी विचारलं, “काय झालंय रामाला, का रडतोय तो?” मग त्यांना रामाचा हट्ट सांगण्यात आला. त्यांनी थोडा विचार करून एक आरसा आणायला सांगितला. नंतर रामाच्या हातात तो दिला आणि त्यातलं चंद्राचं प्रतिबिंब दाखवलं. बालक रामाला आरशात चंद्र दिसला आणि चंद्र हातात आल्याच्या समाधानात तो खुदकन हसला. बाकी सर्वजणही त्यांची काळजी मिटल्यानं हसले.
तो बहुधा आद्य जुमला असावा!
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Tags: vidhan sabha elections voting a s ketkar story politics राजकारण कथा निवडणूक आश्वासने राजकारण Load More Tags
Add Comment