आता ओम बिर्ला काय करतील?

विरोधकांना सतत उपदेशामृत पाजणारे सभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी अनुराग ठाकूर यांना मात्र त्यांच्या विधानांबाबत खडसावल्याचे ऐकिवात नाही..

अखिलेश यांची मांडणी पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक अशी आहे आणि राहुल यांची मांडणीही त्याच प्रकारची पण थोडी वेगळी, ओबीसी, दलित, आदिवासी जमाती, अल्पसंख्याक आणि गरीब उच्चवर्णीय अशी आहे. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला आहे आणि लोकसभा निकालांनंतर आता त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. अनुराग ठाकूर यांच्या लोकसभेतील बेजबाबदार वक्तव्याने विरोधी पक्षांनाच फायदा होईल.

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हादरा दिल्यानंतर विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे. आधीच्या लोकसभेतील भाजप-रालोआ अर्थात ‘एनडीए’च्या पाशवी बहुमतापुढे ते दबून गेल्यासारखे दिसत. त्याही परिस्थितीत त्यांनी अवघड प्रश्न विचारले, तर सभापती ओम बिर्ला त्यांना निलंबित करण्याच्या सोप्या मार्गाचा अवलंब करत. विक्रमी 96 सदस्यांना निलंबित करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनीच घेतला होता. काहीही करून सरकारला - खरे तर पंतप्रधानांना - अडचणीत आणणारे प्रश्न त्यांना बहुधा सहनच होत नसत. (अजूनही होत नसणार...)

संसदेच्या या अधिवेशनात राहुल यांनी महाभारतातील अभिमन्यूला मारण्यासाठी रचलेल्या चक्रव्यूहाचा दाखला देऊन सांप्रति विरोधकांसाठी चक्रव्यूह किंवा पद्मव्यूह रचण्यात आला आहे असे म्हटले. अभिमन्यूला घेरणाऱ्या सहा महारथींप्रमाणे सध्याही सहा महारथी सज्ज आहेत असे म्हटले. हे महारथी म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा, अडानी, अंबानी इत्यादींची नावेही त्यांनी सांगितली. यामुळे भाजप गट चांगलाच अस्वस्थ झाला होता. कारण राहुल यांनी यात, आता आपणही डावपेचात तयार झालो आहोत, हे सिद्ध करतानाच आपला महाभारताचाही चांगला अभ्यास असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे सत्तारूढांची अस्वस्थता आणखीच वाढली होती. सडेतोड, समर्पक उत्तर नसल्याने त्यांची कोंडीत सापडल्यासारखी अवस्था झाली होती. गप्प बसून तर चालणार नव्हते कारण तसे केले तर पराभव मान्य केल्याचे शल्य बोचत राहिले असते. त्यामुळे ते आक्रमण करण्याची संधी मिळण्याची वाट पाहत होते.

काँग्रेसने याआधी सामाजिक न्यायाचे महत्त्व जाणलेले नाही हे लक्षात आल्याने आरक्षणाबाबत बोलताना राहुल यांनी, सामाजिक जातवार गणना केल्यानेच सर्वांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल असे म्हटले... आणि हवी ती संधी मिळाली असे भाजपच्या शिलेदारांना वाटले. मग त्यांचा बिनीचा शिलेदार, अनुराग ठाकूर यांनी हल्लाबोल केला.  ते म्हणाले की, राहुल लोकांना त्यांच्या जातीबद्दल विचारतो. जातीभेद आणि लिंगभेदामुळे असमता आणि भेदभावांवर बोट ठेवले जाते. पण अनुराग हे विसरले की धोरण आखण्याआधी जातवार गणना करून माहिती गोळा करण्याची बरोबरी जातींवर होणारा अन्याय आणि भेदभाव यांच्याशी होऊ शकत नाही. माध्यमांतीलही एका गटाच्या ध्यानात हे आले नाही.

अनुराग ठाकूर राहुल यांचे नाव न घेता म्हणाले होते : जिसकी जात का पता नही, वो गणना की बात करता है। अशा प्रकारची एखाद्याच्या आई- वडलांबाबतची शेरेबाजी ही असभ्य आणि शिवीगाळ केल्याप्रमाणे मानण्यात येते. अनुराग ठाकूर यांचा रोख राहुलची आजी इंदिरा गांधी आणि वडील फिरोझ गांधी यांच्याकडे होता हे उघड होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीअंतासाठी आंतरजातीय विवाह हाच एकमेव प्रभावी मार्ग सुचवला होता. त्यामुळे हळूहळू परिस्थिती बदलेल, मागास समजल्या जाणाऱ्या जातींबाबत अनुकंपा निर्माण होऊन समाजात जातीला काही महत्त्व उरणार नाही असे म्हटले होते. त्यांनी लिहिले होते की, कोणत्याही समाजाला त्याच्यात वेगवेगळे स्तर निर्माण करून ते निश्चित करण्याचा आणि त्यांनुसार कोणाला अधिक मान द्यायचा आणि कोणाला नाही, हे ठरवण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारे भेदभाव करून ठराविक लोकांवर अन्याय करण्याचा त्यांना तिटकारा होता. त्यामुळेच त्यांनी अखेर हिंदू धर्माचा त्याग करून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की, अनेक दशके संघ परिवार नेहरू-गांधी कुटुंबियांबाबत ते मूळचे मुस्लीम होते अशा प्रकारची अनेक खोटी विधाने करून लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करत होता आणि आहे. खरे तर नेहरू हे अज्ञेयवादी (agnostic) होते. त्याचप्रमाणे संघपरिवारातील सावरकर, लालकृष्ण अडवाणींसारखे काही मान्यवर नेतेही, त्यांनी स्वतःच जाहीरपणे सांगितल्यानुसार अज्ञेयवादीच होते. पण राहुल गांधी हे हिंदू शिवभक्त आहेत. त्यांनी कैलास मानसरोवर आणि केदारनाथ मंदिराला दिलेल्या भेटीला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. माहितगार सांगतात की, त्यांना हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञानाबाबत चर्चा करायला आवडते.

काँग्रेस हा हिंदूंविरोधी मुस्लीम पक्ष आहे या भाजपच्या खोट्या प्रचाराला राहुल यांच्या शिवभक्तीने चोख उत्तर दिले आहे. आपणच हिंदू धर्माचे एकमेव रक्षणकर्ते आहोत या दाव्याला चोख उत्तर देण्याचा हा योग्य पर्याय होता. त्यामुळेच भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. पण राहुल यांचे जातीबाबतचे विचार राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. कारण या मार्गाने ते एक प्रकारे, काँग्रेसने पूर्वी केलेली चूक दुरुस्त करत आहेत. जातीनुसार शिरगणती हाच समाज बदलण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कारण जातीअंताच्या पायावरच त्याची उभारणी होणार आहे. जातगणनेबाबत राजीव गांधी वा इतरांनी काय म्हटले होते, ते सांगितल्याने राहुल यांना बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. कारण जातीअंत केल्यानेच सेक्युलर लोकशाहीचे भवितव्य उज्ज्वल होणार आहे, हे राहुल यांनी ओळखले आहे. सामाजिक न्यायाबाबत ते बारकाईने बोलतात आणि त्यामुळे विरोधी पक्षांतील विविध धार्मिक शक्ती एक होतील आणि त्यामुळे त्यांची एकजूट अधिकच भक्कम होईल आणि समाजात बदल घडवण्याचे ते मुख्य साधन असेल. या एकजुटीचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत आला. अगदी मोठा गाजावाजा करून पूर्ण होण्याआधीच राममंदिराचे उद्घाटन करूनही अयोध्येतच समाजवादी पक्षाचा एक दलित निवडून आला. केवळ हिंदू म्हणून त्यांच्याबरोबर राहिल्याने समान दर्जा मिळत नाही हे आता सामान्य माणसाला उमगले आहे. पण आपली घटना ती जादू घडवून आणू शकते, हेही त्याने ओळखले आहे. 

तेजस्वी यादव आणि अखिलेश यादव

राहुल गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांच्यासारखे नेते ओळखतात की, या धोरणामुळेच भाजपची हिंदुत्वाच्या नावाने लोकांना भुलवण्याची बाजू कमकुवत करता येईल. म्हणूनच केवळ सहवेदना आणि सोशिकपणा यांचा गोंधळ यांतच समाजाला अडकवून ठेवून चालणार नाही. समाजात खरीखुरी एकता आणायची तर त्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क दिले पाहिजेत. हिंदू एकता ही मुळात कमकुवत आहे कारण भाजप आणि संघ यांच्या धोरणाने समाजाच्या मोठ्या वर्गाला अधिकार मिळालेले नाहीत आणि जातीभेदाबाबतही काही उत्तर मिळत नाही. सुस्थितीतील लोकांना अनुराग ठाकूर यांच्या ‘जाती का पता नही’ या टोमण्याचा अर्थ कळतो, मात्र त्याचा खरा अर्थ आणि त्यामागचा हेतू समजत नाही. मात्र अशा भेदभावाची आणि अन्याय्य वागणूक आपल्याला देण्यात आली तर तिला तोंड देण्यासाठी आपण तयार असल्याचे राहुल यांनी सांगितले. त्यामुळेच सामाजिक न्यायाबाबत त्यांना किती कळकळ आहे हे सर्वांना कळले. निवडणुकीत भाजपने हिंदू-मुस्लीम या विभागणीला 80-20 असे रूप दिले पण राहुल-अखिलेश जोडीने वंचित समाज आणि मान असणारा आणि धनाढ्य अभिजन समाज ही विभागणीदेखील 80-20 अशीच आहे असा दावा प्रचारात करून भाजपचा डाव उलटवला होता.

अखिलेश यांची मांडणी पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक अशी आहे आणि राहुल यांची मांडणीही त्याच प्रकारची पण थोडी वेगळी, ओबीसी, दलित, आदिवासी जमाती, अल्पसंख्याक आणि गरीब उच्चवर्णीय अशी आहे. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला आहे आणि लोकसभा निकालांनंतर आता त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. अनुराग ठाकूर यांच्या लोकसभेतील बेजबाबदार वक्तव्याने विरोधी पक्षांनाच फायदा होईल.

साक्षात विश्वगुरुंनी मात्र राजकीय धूर्तपणाने यासंबंधात थेट विधान करण्याचे टाळले आहे. पण यापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवण्याऐवजी, पूर्वी प्रज्ञा ठाकुर सिंगच्या बडबडीबाबत त्यांनी जे (मूकसंमतीने प्रोत्साहन देण्याचे) धोरण अवलंबले होते, त्याचीच पुनरावृत्ती केली आहे. कारण असे की, अनुराग ठाकूरचे हे भाषण सर्वांनी ऐकावे अशी शिफारस करून एक प्रकारे त्यांनी अनुरागच्या बोलण्याला दुजोराच दिला आहे. बाजू उलटली की राजकीय कुशाग्र बुद्धीही काम करत नाही असे म्हटले जाते, त्याचाच प्रत्यय त्यांच्या या वागण्याने आला. त्यांनी हा सल्ला दिल्यानंतर ताबडतोब अभिनेत्री, महान (!) विदुषी आणि (नव) इतिहास तज्ज्ञ (कारण भारताला स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले असा नवा इतिहास तिने लोकांना सांगितला) तसेच भाजपची खासदार कंगना रणौत हिने आज्ञाधारकपणे विश्वगुरुंचे सांगणे ऐकले. इतकेच नव्हे तर अनुरागच्या पुढे एक पाऊल टाकत म्हटले की त्याची आजी पारशी, नानी मुस्लीम असताना त्याची जात कशी सांगता येईल? आता विश्वगुरू आपली पाठ कधी थोपटतात यांची ती वाट पाहत असणार.

विरोधकांना सतत काही ना काही उपदेशामृत पाजणारे, त्याबाबत सतत जागृत असणारे सभाध्यक्ष ओम बिर्ला यांना या साऱ्या घडामोडी नक्कीच माहीत असणार. परंतु बिर्ला यांनी अनुराग ठाकूर यांना त्यांच्या विधानाबाबत लोकसभेत काही खडसावल्याचे वा उपदेशपर सांगितल्याचे ऐकिवात नाही, मग त्यांच्यावर काही कारवाई करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला असणार आणि बहुतेक त्यांचाही त्याला छुपा पाठिंबाच असणार असे मानण्यासही जागा आहे. एवढ्या तेवढ्यावरून विरोधी सदस्यांना निलंबित करणारे अध्यक्ष ओम बिर्ला याबाबत काहीच बोलले नाहीत, कदाचित वरचा आदेशही तसा असण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे विश्वगुरुंच्या उपदेशावरून स्पष्ट झाले आहे.

पण या कथानकाला आता वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, आणि ती ओम बिर्ला यांच्यासाठी अग्निपरीक्षाच ठरू शकेल. कारण विरोधी पक्षांनी आपण पंतप्रधानांविरुद्ध हक्कभंगाचा ठराव आणणार आहोत असे जाहीर केले आहे. कदाचित अध्यक्ष ओम बिर्ला तो ठराव स्वीकारणारच नाहीत, मग त्यावर चर्चा होणे दूरच. किंवा ते तो विषयच पटलावर येऊ देणार नाहीत कारण काही झाले तरी ते विश्वगुरुंचे नम्र सेवक आणि भक्तच आहेत की. मग ते गुरुविरुद्ध काही कसे होऊ देतील? अनुराग ठाकूरला वरवर काहीतरी शिक्षा वा तंबी देऊन हे प्रकरण मिटवायचा प्रयत्नही होण्याची शक्यता आहे. कंगनाही खासदार असल्याने तिच्याबाबत कोणते धोरण असेल हे पाहणेही रंजक ठरणार आहे. नक्की काय होणार याचे उत्तर काळाच्या पोटीच दडलेले आहे. आपल्या मनात मात्र विचार येत राहील की, आता ओम बिर्ला काय करतील?

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक, ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


हेही पाहा : 

 

Tags: rahul gandhi om birla parliament narendra modi anuraag thakur Load More Tags

Comments:

Anil Farakate

खूप छान भाष्य केले आहे. लोकसभा अध्यक्ष नि राज्यसभा सभापती ही मोदी-शहांची प्यादी म्हणून काम करत आहेत. अशाने लोकशाही बळकट म होता कमकुवतच होत राहणार. .

Add Comment