विखुरलेले 'माणिक-मोती'...

गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मृतिग्रंथ

या पुस्तकात माणिकताईंचे सगळे चरित्र सांगणारी एकच एक व्यक्ती नसली तरी, अनुभवांच्या आणि आठवणींच्या विखुरलेल्या माणिक-मोत्यांची ही पुस्तकरूपी माळ सुंदर गुंफलेली आहे. माणिकताईंच्या लोभस, लाघवी व्यक्तिमत्त्वाची उकल होण्यासाठी हे माणिकमोती आपल्याला उपयुक्त ठरतात. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त या समग्र परिवाराच्या कलाकर्तृत्वाचा वेध घेणार्‍या स्मृतिचित्रांचे हे वेधक पुस्तक आहे.

काही व्यक्तिमत्त्वांना एक वेगळीच झळाळी प्राप्त झालेली असते. त्यांच्या सार्वजनिक, खाजगी आणि कलात्मक जीवनाबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. त्यात त्या माणिक वर्मांसारख्या लोकप्रिय कलाकार असतील, तर ही उत्सुकता अधिकच असते. 1960 पासून सुमारे चार दशके मराठी गानरसिकांच्या मनावर आपल्या मधाळ सोज्वळ सरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या गायिका - माणिक वर्मा. माणिकताईंनी संगीताच्या क्षेत्रात हिंदुस्थानी शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीत, भावगीते, नाट्यगीते आणि भक्तीगीते अशी चौफेर मुशाफिरी केलेली आहे. त्यांच्या प्रवासाची कहाणी सांगणारे 'माणिक मोती : माणिक वर्मा आणि परिवार' हे पुस्तक अलीकडेच, 12 मे 2025 रोजी प्रकाशित झाले.  

माणिकताईंचे भाऊ-भावजय श्रीकांत आणि शुभदा दादरकर, कन्या भारती आचरेकर, वंदना  गुप्ते, अरुणा जयप्रकाश आणि राणी वर्मा, त्यांच्या शिष्या अर्चना कान्हेरे, आशा खाडिलकर आणि शैला दातार यांनी सांगितलेल्या त्यांच्याबद्दलच्या कहाण्या, आठवणी अशी या पुस्तकाची मांडणी आहे. त्याचबरोबर मानवंदना म्हणून काही मान्यवर आणि सुहृदांची टिपणं आहेत. आपल्या आयुष्यात माणिकताई कशा आल्या आणि आपल्याला त्या कशा भावल्या, याचे अत्यंत हृद्य चित्रण प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने चितारलेले आहे. त्यातून माणिक ताई यांचा जीवनपट विखुरलेल्या परंतु तरीही एकमेकांशी जोडलेल्या स्वरूपात समोर येतो.

मूळच्या माणिक दादरकर, त्यांचे गुरू पं. जगन्नाथबुवा पुरोहित, पं. भोलानाथ भट्ट आणि हिराबाई बडोदेकर, पती अमर वर्मा यांच्याशी प्रेमविवाह, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, भाऊ-भावजयांनी माणिकताईंच्या मुलींच्या संगोपनात केलेली मदत, मुंबई-पुणे शहरांतलं वास्तव्य, आयुष्यात आलेले चढ-उतार, त्यांना धीराने सामोरे जाणं, कलाक्षेत्रात सातत्याने राखलेली चढती कमान, चार गुणी मुली, त्यांचं संगोपन, त्यापैकी तीन मुलींचा कलाक्षेत्रातला वावर, मोठं जीवावरचं दुखणं आणि त्यामुळे अनेक दिवस कोमात गेलेल्या माणिकताईंचं पुन्हा सावरणं... आपल्या लाडक्या गायिकेबद्दलच्या अशा अनेक लहानमोठ्या कुतूहलांची उत्तरे या पुस्तकात आहेत. एकत्र कुटुंबाच्या अनमोल सहकार्यामुळे माणिकताईंना सुरुवातीला गायनाचा छंद आणि पुढे व्यवसायिक गाणे कशाप्रकारे जोपासता आले हे वाचून आजच्या काळात एकत्र कुटुंब व्यवस्था विरत चाललेली असताना तिचे फायदेही यातून जाणवतात. दादरकर आणि वर्मा कुटुंबांचे सौहार्दपूर्ण चित्र या पुस्तकातून समोर येते.

माणिकताईंनी अनेक मैफिली गाजवल्या. त्यांना गीतरामायणामध्ये गायन करायची संधी मिळाली. अनेक भावगीते, भक्तीगीते यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. एक मधाळ, सोज्ज्वळ सुरांची गायिका म्हणून त्यांचे रूप कसे साकारत गेले, याचे मनोज्ञ चित्रण या पुस्तकात आलेले आहे. त्यांना अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले. पद्मश्री मिळाली, त्यांच्या एकसष्टीनिमित्त त्यांचा सत्कार झाला. त्या सत्कार समारंभांची आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींची छायाचित्रे या पुस्तकात आलेली आहेत. ही छायाचित्रे या पुस्तकाचे वैभव वाढवणारी आहेत. माणिकताईंच्या जीवनप्रवासाचा कालखंड लक्षात घेतला तर छायाचित्रांचा एवढा संग्रह उपलब्ध असणे सुद्धा एक अनोखी बाब आहे. 

साहित्य, संगीत आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांसोबत आणि राजकीय वर्तुळातील काही महत्त्वाच्या लोकांसोबत त्यांचा कौटुंबिक घरोबा होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माणिकताईंच्या सत्कार समारंभाला उपस्थित होते. माणिकमोती पुस्तकातल्या ‘मानवंदना’ या सदरात पु. ल. देशपांडे, किशोरीताई आमोणकर,आरती अंकलीकर-टिकेकर, विकास कशाळकर, सुहास व्यास आदी संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी आपापल्या भावना थोडक्यात व्यक्त केल्या आहेत. 


हेही वाचा - 

रसिया तुम बन्सी बजावत रहियो! (हरिप्रसाद चौरसिया यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त लेख - सुहास पाटील)


बाळासाहेब ठाकरे माणिकताईंच्या ज्या सत्कार समारंभाला हजर राहिले असतील, त्या कार्यक्रमात नक्कीच त्यांनी माणिकताईंबद्दल भाषण केले असेल. त्या भाषणाची एखादी झलक तरी या पुस्तकात असायला हवी होती, असे मात्र वाटते. बाळासाहेब ठाकरे एक व्यंगचित्रकार म्हणून आणि एक संपादक म्हणून मोठे होते. त्यांनाही कुटुंबातून कलेचा वारसा मिळालेला होता. त्यांची माणिकताईंबद्दलची मते पुस्तकात असती तर पुस्तक अधिक समृद्ध झाले असते. 

माणिकताईंचे सगळे चरित्र सांगणारी एकच एक व्यक्ती नसली तरी, अनुभवांच्या आणि आठवणींच्या विखुरलेल्या माणिक-मोत्यांची ही पुस्तकरूपी माळ सुंदर गुंफलेली आहे. माणिकताईंच्या लोभस, लाघवी व्यक्तिमत्त्वाची उकल होण्यासाठी हे माणिकमोती आपल्याला उपयुक्त ठरतात. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त या समग्र परिवाराच्या कलाकर्तृत्वाचा वेध घेणार्‍या स्मृतिचित्रांचे हे वेधक पुस्तक आहे. शोभा बोंद्रे यांनी उत्तमरीत्या संकलन केले आहे आणि संपादक म्हणून डॉ. सदानंद बोरसे यांनी संस्कार केलेले आहेत. 

माणिक वर्मा यांचे स्नेहाळ व्यक्तिमत्व प्रतीत व्हावे असा त्यांचा एक सुंदर फोटो मुखपृष्ठावर घेण्यात आला आहे. त्यांचा नक्षीदार तानपुरा आणि त्याच्या भोवती इतस्ततः विखुरलेले मोतीही दिसतात. हे मुखपृष्ठ सुंदर आणि समर्पक झाले आहे. पुस्तकाच्या मांडणीत जागोजागी क्यू आर कोड देऊन माणिक ताई यांची गाणी ऐकण्याची संधी दिलेली आहे. हे या पुस्तकाचे वेगळेपण म्हणायला हवे. मी तर हे पुस्तक अधाश्यासारखे वाचून काढलेच आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सारस्वताच्या दृष्टीने अशा प्रकारची पुस्तके त्यातील छायाचित्रांसह येणे अगत्याचे आहे असेही मला वाटते. त्यामुळे हे पुस्तक मराठी वाचकांनी अवश्य वाचावे असा माझा आग्रह राहील.

माणिक मोती : माणिक वर्मा आणि परिवार
संकलक : शोभा बोंद्रे
संपादक : सदानंद बोरसे
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, मुंबई
पृष्ठसंख्या :  208

किंमत : 400 रुपये

- देविदास वडगांवकर, तांबरी, धाराशिव
adwadgaonkar@gmail.com
(लेखक व्यवसायाने वकील आहेत.)

Tags: माणिकमोती माणिकमोती : माणिक वर्मा आणि परिवार शोभा बोंद्रे वंदना गुप्ते बाळासाहेब ठाकरे भारती आचरेकर राणी वर्मा अरुणा जयप्रकाश Load More Tags

Comments:

विष्णू दाते

छान! पुस्तकाचे मुखपृष्ठचं ईतक लोभस आहे तर पुस्तकातला मजकुर किती मोहक असेल..अगदि माणिकताईंच्या अनोख्या स्वरां इतकाच ! जरूर वाचून आनंद घेऊ!!

Add Comment

संबंधित लेख