35 वर्षांतील क्रिकेटचा ‘आंखो देखा हाल’ सांगणारे पुस्तक

अमृत माथुर यांच्या ‘पिचसाइड : माय लाइफ इन इंडियन क्रिकेट’ या पुस्तकाचा परिचय

द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, मुंबई येथे पुस्तकाचे प्रकाशन करताना अमृत माथुर, सुनील गावस्कर, पियुष पांडे आणि हर्षा भोगले (ऑगस्ट 2023)

माथुर हे खेळाडू, मंडळाचे ज्येष्ठ अधिकारी आणि संघाचे माजी व्यवस्थापक होते. पिलकॉम (PILCOM ) म्हणजे पाकिस्तान, भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजन समितीने आयोजित केलेल्या 1996 च्या विश्वचषक स्पर्धेच्या दहा सदस्यांच्या आयोजन समितीतही त्यांचा समावेश होता. त्यांनी पुस्तकात, 1990 च्या दशकातील भारतीय संघ ते 'इंडियन प्रीमियर लीग'च्या (आयपीएल) काळापर्यंतच्या बदलत्या भारतीय क्रिकेटचे वर्णन केले आहे. मुख्य म्हणजे ते काही सांगोवांगीचे नाही, तर त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचे आहे.

पुस्तकाच्या प्रारंभीच लेखक सांगतो की, 35 वर्षांच्या काळात या ना त्या रूपात मी क्रिकेटशी जोडलेला होतो. अनेक अनुभव आले. मित्रांबरोबर गप्पा मारताना त्यांनी सांगितले की, हे तू लिहून काढ. पण सर्वच लिहिता येणं शक्य नव्हतं. मग कोणते प्रसंग, घटना निवडाव्या असा प्रश्न पडला. नाणेफेक जिंकल्यावर खेळपट्टी कशी असेल, प्रथम फलंदाजी घ्यावी की क्षेत्ररक्षण, अनेक गुणी खेळाडूंमधून अंतिम 11 कसे निवडावे ह्या क्रिकेट कर्णधाराला पडणाऱ्या जटील प्रश्नांप्रमाणेच हा प्रश्न होता असे ते म्हणतात.

अमृत माथुर यांच्या 'पिचसाइड : माय लाइफ इन इंडियन क्रिकेट' या पुस्तकात त्यांनी बरेच काही सांगितले आहे. भारतीय क्रिकेट नियामक क्रिकेट मंडळात ते महत्त्वाच्या पदांवर होते. त्या आणि नंतरच्या काळातील भारतीय संघाची वाटचाल आणि त्याच काळात मंडळात काय घडले, ते त्यांनी मोकळेपणाने कथन केले आहे. या पुस्तकाबद्दल ते म्हणतात की, हे पुस्तक म्हणजे मी पाहिलेली भारतीय क्रिकेटची कथा आहे, ही भारतीय क्रिकेटच्या कारभाराची कथा आहे, ही इंडियन प्रिमियर लीगची कथा आहे, आणि ही भारताच्या क्रिकेटपटुंचीही कथा आहे.

आजघडीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची सध्याची ओळख 'क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत मंडळ' अशी आहे. पण 1983 मध्ये एक दिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कपिलदेवच्या भारतीय संघाने जिंकली, त्यावेळी भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूला जाहीर केलेले एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे पैसे नव्हते. सरतेशेवटी लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करून मंडळाने 40 लाख रुपये जमा केले आणि आश्वासनपूर्ती केली. नंतरच्या काळात मात्र मंडळाची ही स्थिती आमूलाग्र बदलण्यास कारणीभूत झाला दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वेचा दौरा. दीर्घकाळचे वर्णद्वेषाचे धोरण दूर केल्यानंतर बहिष्कार उठल्यामुळे 1992 च्या अखेरीला दक्षिण आफ्रिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. तो आता पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळू शकणार होता. आणि तेथे प्रथमच दौऱ्यावर जाण्याची संधी भारताला मिळाली होती. भारतीय संघाचे नेतृत्व अझरुद्दीनकडे होते तर संघाचे प्रशिक्षक अजित वाडेकर होते. व्यवस्थापक अमृत माथुर होते. त्यांना अनेक गोष्टींकडे लक्ष पुरवावे लागत होते. या दौऱ्याच्या निमित्ताने मंडळाला माध्यम हक्क (दूरचित्रवाणी- टीव्ही, प्रक्षेपणाचे हक्क) हे उत्पन्नाचे मोठे साधन आहे, हे उमगले. तोवर मंडळच दूरदर्शनला प्रक्षेपणासाठी पैसे देत असे. आता पैसे मिळवण्याची संधी आली होती. मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष माधवराव शिंदे यांनी माथुरना याबाबत आफ्रिकन मंडळाच्या अली बाकरकडे चौकशी करण्यास सांगितले. बाकर यांनी भारतीय मंडळाकडे त्यांना प्रक्षेपण हक्कासाठी किती पैसे हवेत, असे विचारून सुखदाश्चर्याचा धक्का दिला होता.

सुरुवातीला प्रत्येक कसोटीसाठी 10 हजार डॉलर्स मागावे असे ठरले होते. पण चिटणीस डालमिया यांनी माथुरना 20 हजार डॉलर्स मिळायला हवे, असे सांगायला सांगितले. नंतर बाकर यांनी तो प्रश्न करताच, त्याला उत्तर न देता, माथुर यांनी बाकर यांनाच तुम्ही किती देणार, असे विचारले, तेव्हा त्यांनी प्रत्येक सामन्यासाठी 30 हजार डॉलर्स सांगितले. अचंबित होऊन माथुर गप्प राहिले. तेव्हा बाकर यांनी ती रक्कम वाढवून दर कसोटीसाठी 40 हजार डॉलर्सचा प्रस्ताव दिला. तो मान्य झाला. माथुर म्हणतात, "मंडळाला प्रथम अपेक्षा केलेल्या 30 हजार डॉलरच्या चौपट रक्कम मिळाली. तेव्हापासून मंडळाची सुबत्ता सतत वाढतच आहे. 30 वर्षांनंतर आता भारताच्या प्रत्येक सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला किमान 100 कोटी रुपये मिळतात.

दक्षिण आफ्रिकेच्या त्या ऐतिहासिक दौऱ्यातील महत्त्वाच्या घटना लेखकाने सांगितल्या आहेत. त्यातील काही वाचकांसाठी देत आहे. 1983 च्या विश्वचषक स्पर्धेतील झिंबाब्वे बरोबरच्या सामन्यात भारताला अत्यंत बिकट स्थितीतून कपिलने झंझावाती शतक करून सावरले होते. त्या खेळीची आठवण करून देणाऱ्या कपिलच्या एका खेळीची हकीगत माथुर सांगतात. पोर्ट एलिझाबेथ येथील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताची अवस्था पाच बाद 27 अशी, आणि नंतर सहा बाद 31 अशी (म्हणजे आणखीच बिकट) होती. सातव्या क्रमांकावर आलेल्या कपिलने नंतर आश्चर्यकारक प्रतिहल्ला चढवला. डोनाल्ड, ब्रेट शूल्टझ आणि ब्रायन मॅकमिलन यांच्या गोलंदाजीला त्याने जणू कस्पटासमान लेखले. त्याच्या या धडाडीच्या खेळीत त्याने संघाच्या 215 धावंपैकी 129 धावा केल्या. संघातील दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या केवळ 17 होती! अ‍ॅलन डोनाल्डने या सामन्यात 12 बळी मिळवून त्याच्या संघाला विजयी केले. पण तरीही कपिलच्या या खेळीपेक्षा गाजली, ती त्याची आणि वेसल्सची चकमक. गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधीच गोलंदाजाच्या बाजूस असलेला वेसल्स वारंवार पुढे जात होता. कपिलने त्याला दोनदा इशारा दिला. पण तरीही पुन्हा वेसल्स पुढे धावला, तेव्हा कपिलने त्याला धावचीत केले.

अशा प्रकारचे धावचीतचे प्रकार नियमानुसार असले, तरी आजही त्यांच्याबाबत वादंग होतोच. पण ही गोष्ट तेवढ्यावरच थांबली नाही. नंतरच्या डावात धाव घेत असताना वेसल्सनने कपिलच्या घोट्यावर जोरात बॅट मारली. वेसल्सने जाणूनबुजून बॅट मारली असे कपिलचे म्हणणे. पण तो केवळ अपघात होता असे वेसल्स सांगत राहिला. वाद आणखीच वाढला. पण वेसल्सवर कारवाई झाली नाही, कारण नेमका तो प्रसंग असलेला भाग टीव्ही कॅमेऱ्यांतून अजाणतेपणे काढून टाकला गेला आहे, असे साउथ आफ्रिका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले. मॅच रेफ्री असलेल्या क्लाइव्ह लॉइड यांनी, (बहुधा हा सामना ऐतिहासिक महत्त्वाचा असल्याने, त्याला डाग लागू नये म्हणून) त्या प्रसंगाचे चित्रण उपलब्ध नसल्याचे सांगून बोटचेपी भूमिका घेतली आणि आपण काहीच करू शकत नाही असे सांगितले. वेसल्सच्या या धडधडीत खोटे बोलण्याने सारेच थक्क झाले होते. 

याच दौऱ्यात पहिल्या कसोटीत सचिन तेंडुलकर हा दूरचित्रवाणीचा पहिला बळी ठरला होता. जाँटी होडसच्या फेकीने चेंडू थेट यष्टींवर आदळला होता. पण पंचांचा निर्णय होत नव्हता म्हणून या नव्या तंत्राचे सहाय्य घेण्यात आले होते आणि त्यात सचिन बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते. (आज या तंत्राचा वारंवार वापर केला जातो, खेळाडूंकडून आणि प्रसंगी पंचांकडूनही.) या कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर कपिलला बळी मिळाला होता. जिमी कूकचा झेल सचिनने स्लिपमध्ये घेतला होता. आणि प्रवीण आमरेने आपल्या पहिल्याच कसोटीत शतक केले होते.

माथुर हे खेळाडू, मंडळाचे ज्येष्ठ अधिकारी आणि संघाचे माजी व्यवस्थापक होते. पिलकॉम (PILCOM) म्हणजे पाकिस्तान, भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजन समितीने आयोजित केलेल्या 1996 च्या विश्वचषक स्पर्धेच्या दहा सदस्यांच्या आयोजन समितीतही त्यांचा समावेश होता. त्यावेळी आयोजकांना प्रक्षेपण हक्कांसाठी 36 लाख डॉलरची हमी मिळाली होती. (त्यातील 30 लाख रोख होते.) ही रक्कम 1992 चे संयुक्त आयोजक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांना मिळालेल्या रकमेच्या दुप्पट होती, हे माथुर आवर्जून सांगतात. त्यांनी पुस्तकात, 1990 च्या दशकातील भारतीय संघ ते 'इंडियन प्रीमियर लीग'च्या (आयपीएल) काळापर्यंतच्या बदलत्या भारतीय क्रिकेटचे वर्णन केले आहे. मुख्य म्हणजे ते काही सांगोवांगीचे नाही, तर त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचे आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या 2002 च्या नॅटवेस्ट ट्रॉफी स्पर्धेबाबतही ते लिहितात. संघातील कडक शिस्त, त्यावेळी प्रशिक्षक जॉन राइट आणि सेहवाग याच्यातील झगडा आणि उशिरा आल्याने कर्णधार गांगुली आणि जॉन राइट यांच्यातील बिघडलेले संबंध हेही ते सांगतात. 2004 च्या पाकिस्तान दौऱ्यात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रवीड यांच्यात सचिनच्या 194 धावा असतानाच भारताचा संघ विजयी होण्याची शक्यता वाटली म्हणून, डाव घोषित केल्याने तणाव निर्माण झाला होता, तेव्हाचे संघातील वातावरणही त्यांनी रंगवले आहे. (आता तोच राहुल द्रवीड विश्वचषक स्पर्धेतील एका साखळी सामन्यात भारताचा विजय जवळ आलेला असताना, विराट कोहलीला शतक पूर्ण करता यावे म्हणून एकेरी धाव घेऊ नको, असे खुणावत असल्याचे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. याला काय म्हणावे, असा प्रश्न त्यांना नक्कीच पडला असणार.)  

दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर असलेले गोऱ्यांचे वर्चस्व सहन करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता स्वतःच आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वाचा जणू काही ताबाच कसा घेतला आहे, हे त्यांनी कथन केले आहे. त्याचबरोबर भारतीय संघ आता अगदी एकसंध कसा बनला आहे, हे सांगताना महंमद अझरुद्दिन, सौरभ गांगुली यांच्या काळातील भारतीय संघात स्टार खेळाडूंचा प्रभाव कसा होता आणि त्यानंतर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाच्या काळात भारतीय संघाच्या मनोवृत्तीत मोठाच बदल होऊन तो अव्वल कसा बनला आहे, हे त्यांनी रंजकपणे सांगितले आहे.

2003 मध्ये दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या विश्वचषक सामन्यादरम्यान नेल्सन मंडेलांच्या उजव्या बाजूस माथुर आणि डाव्या बाजूस दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू अली बाकर

सुरुवातीच्या प्रकरणांत माथुर यांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील सामने, तसेच दिल्ली विद्यापीठ संघाने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धा जिंकून रोहिंग्टन बारिया करंडक मिळवला, त्याचीही हकीगत आहे. तेव्हा त्या संघात कीर्ती आझाद, सुनील वाल्सन, अरुणलाल यांच्याबरोबर माथुर यांचाही समावेश होता, असे ते सांगतात. त्याबरोबरच त्यांच्या कॉलेजच्या म्हणजे, सेंट स्टीफन्स कॉलेजच्या क्रिकेट संघाचे प्रकाशचित्रही आहे. 'कर्तव्य साधना'च्या वाचकांना त्या संघात रामचंद्र गुहा हे देखील होते हे पाहून आश्चर्य वाटेल. त्याच प्रकाशचित्रात राजिंदर (जॉनी) अमरनाथ आणि अरुणलाल हेही दिसतात. त्यावेळी रामचंद्र गुहा यांना ऑफ स्पिनर म्हणून संघात घेतले होते. पण गोलंदाजीपेक्षा ते लक्षात राहिले ते त्यांनी एका हाताने शॉर्ट मिड विकेटला देशपाल सिंगच्या फटक्यावर घेतलेल्या अफलातून झेलमुळे, असे माथुर म्हणतात.


हेही वाचा : रणजी चषक आणि वृद्ध चाहत्यांच्या प्रेरक आठवणी - रामचंद्र गुहा


अरुणलालने त्यांना सलीम दुराणीची आठवण सांगितली होती ती त्यांनी दिली आहे. एका रणजी सामन्यात दुराणी राजस्थानकडून खेळत होता. सामना दिल्लीविरुद्ध होता. राकेश शुक्लाच्या गोलंदाजीवर दुराणी सुरुवातीला चाचपडत होता. तेव्हा तो कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर होता. स्लिपमधील खेळाडू त्याला काही अश्लाघ्य शब्द बोलला. दुराणीचे अर्धशतक जवळ आले असताना तो बाद झाला. जाता जाता तो त्या खेळाडूला म्हणाला, "थोडा क्रिकेट खेलना हमें भी आता है." एका रणजी अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध खेळताना विजय मांजरेकरने मोठे शतक केले होते. तर रमाकांत देसाईच्या एका उसळत्या चेंडू-बंपरवर दुराणीने जबरदस्त षटकार लगावला होता, अशी आठवणही ते सांगतात.

माथुर रेल्वेमध्ये अधिकारी असतानाच त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्याचे गुण तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री माधवराव शिंदे यांनी हेरले होते आणि त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्यानंतर माथुर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सर्वसाधारण व्यवस्थापक, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे चिटणीस, क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार, ऑलिंपिकमध्ये विजयमंचावर जाण्याच्या उद्दिष्टाच्या योजनेचे टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीमची आखणी करणारे सल्लागार, त्याचप्रमाणे रेल्वे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंड असोसिएशन्समध्ये विविध व्यवस्थापकीय पदांवर काम करण्याची संधी मिळाली. आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाचे प्रमुख अधिकारी म्हणूनदेखील त्यांनी काही काळ काम पाहिले.

माधवराव शिंदे, फत्तेसिंगराव गायकवाड, जगमोहन डालिमया, एम.ए. चिदंबरम, राजसिंग, रुंगठा, श्रीनिवासन या मंडळाचे अध्यक्षपद भूषवलेल्या व्यक्तींबरोबरच माथुर यांनी नबाब ऑफ पतौडी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, इम्रान खान इत्यादी खेळाडूंसाठी एक संपूर्ण प्रकरण लिहिले आहे. 1990 मध्ये, झी वाहिनी वा मंडळाच्याही आधी, ललित मोदी यांनी प्रथम आयपीएलची कल्पना मांडली होती, पण तेव्हा ती कुणालाच मान्य झाली नव्हती. अखेर ती मान्य होण्यासाठी 2007 साल उजाडावे लागले, असे ते सांगतात. याशिवाय 1996, 2003 मधील विश्वचषक स्पर्धा, पाकिस्तानातील विजय, आयपीएलचा पहिला मोसम अशी रंगतदार प्रकरणेही आहेत. ती वाचकांनी मुळातूनच वाचावीत. माथुर त्यांच्या लेखनात हिंदी शब्दांचा भरपूर वापर करतात, त्यामुळे ते वाचताना गप्पा मारत असल्याचाच अनुभव देते. शिवाय त्यात कृत्रिमपणा अजिबात जाणवत नाही. त्यामुळेच हा प्रसन्न आणि सुखदायक वाचनानुभव आहे!

पिचसाइड : माय लाइफ इन इंडियन क्रिकेट
लेखक : अमृत माथुर
प्रकाशक : वेस्टलैंड पब्लिकेशन्स लिमिटेड.
पाने : 346. किंमत : 499 रुपये.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक, ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: cricket books on cricket amrut mathur Pitchside: My Life in Indian Cricket autobiography ramchandra guha westland publications IPL World Cup Load More Tags

Add Comment