भूलोकीच्या कैलासाचे कातळात निर्माण... 

वेरूळच्या कैलास लेण्याची निर्मितीकथा रंगवणारी ऐतिहासिक कादंबरी

या मंदिराला कैलास हे नाव कसे दिले गेले हेही कथन केले आहे. मंदिराला नाव देण्याचे वेळी कोकशदेव 'दंतिदुर्ग मंदिर' असं नाव सुचवतात, पण कौमुदिनी म्हणते, "हे मंदिर काही माझ्या स्वामींचे नाही. महादेव शिवशंभूचे आहे. त्यामुळे ते याोग्य वाटत नाही. दंतिदुर्ग महाराजांचेही विचार असेच काहीसे होते. भगवान शंकर कैलासावर वास करतात. ह्या रम्य परिसरात आपण जणू प्रतिकैलासच साकारतोय असं मला वाटतं. कधी आकाशातून प्रवास करताना त्यांना इथं थांबावसं वाटलं, तर मला आश्चर्य वाटणार नाही. आपण याला कैलास मंदिर म्हणू या का?"

वेरूळचे अदभुत म्हणावे असे कैलास लेणे, खरे तर मंदिर, पाहणाऱ्याला थक्क करते. ‘आधि कळस मग पाया’, या पद्धतीने त्याचे एकच खडक वरून खाली खोदून काम करण्यात आले. त्यातील विलोभनीय शिल्पे तर अप्रतिमच. या प्रकारची रचना जगात अन्य कुठेच आढळण्याची शक्यता नाही. म्हणूनच मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. ब. देगलूरकर म्हणतात, “जागतिक सात आश्चर्यांत कैलासमंदिर गणलं जात नाही, हेच खरं आश्चर्य आहे.” परंतु या अद्भुत अत्युच्च निर्मितीचे स्थपती (आर्किटेक्ट) आणि त्यांना आर्थिक पाठबळ पुरवणारे राज्यकर्ते दोघेही लोकांना फारसे माहीत नाहीत. त्यामुळेच याबाबत अनेक दंतकथा निर्माण झाल्या आहेत. त्या कितीही रंजक असल्या, तरी अखेर काल्पनिकच आहेत. अशा परिस्थितीत या कैलास लेण्याच्या निर्मितीची वास्तवाच्या जवळ जाणारी कथा सांगणे हे अवघड काम होते. पण अभिजित केतकर यांनी त्यांच्या ‘कथा वेरूळच्या कैलास निर्मितीची’ या कादंबरीत ते समर्थपणे आणि रसाळपणे केले आहे. ही त्यांची दुसरी कादंबरी. (पहिली होती, ‘दुर्गनिर्माता हिरोजी’ या नावाची. हिरोजी इंदुलकर या सिंधुदुर्गाबरोबरच इतर गड आणि मुख्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी उभारणाऱ्या, या आजवर दुर्लक्षित राहिलेल्या स्थपतीची.) 

सुरुवातीला मनोगतामध्ये लेखक म्हणतो “इतिहास हा फक्त हे असे झाले, असे सांगण्यापुरता नसून त्यापासून काहीतरी बोध घेणं महत्त्वाचं आहे. रघुकुल सम्राट दंतिदुर्गासारख्या असामान्य राजाच्या चरित्रावरून आजच्या पिढीला बोध घेण्यासारखं बरंच काही आहे. दंतिदुर्गाची साम्राज्यनिर्मिती आणि कैलासमंदिराची वास्तूनिर्मिती या दोन्ही घटना एकमेकींपासून वेगळ्या करणं मला अशक्य वाटलं. त्यामुळेच या कथेतील घटना प्रथम साम्राज्यनिर्मिती आणि नंतर मंदिरनिर्मिती ह्यावर केंद्रित आहे. त्या दंतिदुर्गाला उद्युक्त करणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींवर आणि घटनांवर प्रकाश टाकतात. कथेतील बहुतेक पात्रे आणि घडणाऱ्या घटना आपल्याला अनेक विषयांवर बोध देतात. हा बोध घेण्याचा मीही प्रयत्न केला आणि कथा स्फुरत गेली. कथेचा उद्देश सापडला आणि मी ऐतिहासिक शोध घेण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम कैलास मंदिर वेरूळलाच का, इतर ठिकाणी का नाही, हा प्रश्न मला पडला. त्याचा शोध घेताना तत्कालीन इतिहास, राज्याराज्यातील संघर्ष, तत्कालीन मानवी जीवन, व्यापार, कला, भक्ती, धर्म आणि तत्त्वज्ञान ह्यांमधले आश्चर्यकारक दुवे मिळत गेले. दक्षिणेतल्या महाबलिपुरम, कांचीपुरम, ऐहोळे, पट्टडकल आदी मंदिरांचा कैलास लेण्याच्या निर्मितीशी असलेला घनिष्ठ संबंध समोर आला. उत्तरेतील कनौज, उज्जयनी आदी नगरं, पश्चिम किनाऱ्यावरील बंदरं, मध्य प्रदेशातील महिष्मतीच्या कलचुरी साम्राज्यातील कृष्णराजाने कोरलेल्या श्रीपुरी (घारापुरी) लेण्या, पुण्यपुराचं म्हणजे पुण्याचंच पाताळेश्वर मंदिर आदींचे एकमेकांत गुंफलेले संदर्भ मी जोडत गेलो आणि कैलासमंदिर निर्मितीची पार्श्वभूमी बनत गेली.” 

या मनोगतातील भागावरून या कादंबरीसाठी लेखकाने किती मेहनत घेतली आणि किती बारकाईने अभ्यास केला हे कळते. कादंबरीत त्याने या साऱ्याचा वापर तर केला आहेच पण त्यामुळे कथानकाला बाधा येऊ दिलेली नाही, हे महत्त्वाचे. यामुळे ते गुंतागुंतीचेही झालेले नाही, उलट ते प्रवाही बनले आहे, याचे श्रेय अर्थातच लेखकाला आहे. इसवी सन ७००-७२० पासून या कथेची सुरुवात होते. त्यावेळी विक्रमादित्य हे चालुक्यांचे महाराज होते. एलापूरचा राष्ट्रकूट राजा इंद्रवर्मन हा इ. ७३५ पर्यंत चालुक्यांचा मांडलिक होता. सोमनाथ दर्शनाला गेला असताना म्लेच्छांच्या गुर्जर देशावरील आक्रमणाचे वेळी इंद्रवर्मनच्या पराक्रमामुळे म्लेंच्छ हरले. त्याचा तितकाच पराक्रमी भाऊ कृष्णवर्मन याची त्याला साथ होती. त्यावेळी इंद्रवर्मनने गुर्जर देशाच्या, चालुक्याच्या मांडलिकत्वाला नकार देणाऱ्या कर्कराजाची म्लेच्छांच्या तावडीतून सुटका करून त्याचा जीव वाचवला आणि त्याची बहीण भावनगा हिच्याशी तिच्या संमतीने गांधर्व विवाह केला. पण आता कर्काला चालुक्यांचे मांडलिकत्व पत्करावे लागले, याची खंत त्याच्या मनात होती. त्यामुळेच आपल्या बहिणीला इंद्रवर्मनने पळवले अशी त्याची समजूत झाली होती. परिणामी भावनगेला त्याने माहेर बंद केले. 

चालुक्यांचे महाराज विक्रमादित्य यांचे निधन झाले. त्यांची जागा त्यांचा भाऊ कीर्तिवर्मनने घेतली. त्याच्या संशयी स्वभावानुसार तो पराक्रमी इंद्रवर्मनचा वारंवार अपमान करायचा. तिकडे इंद्रवर्मनला मुलगा झाला. जन्मतःच बळकट दात असल्याने त्याचे ‘दंतिदुर्ग’ असे नामकरण करण्यात आले. दंतिदुर्ग लहान असताना कीर्तिवर्मनने दगाबाजीने इंद्रवर्मनला मारले. इंद्रवर्मनच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ कृष्णवर्मन राज्याचा कारभार पाहू लागला, कारण दंतिदुर्ग लहान होता. 

तशी ही कथा साधारण शतकभरात घडणारी, तीन पिढ्यांची आहे. इंद्रवर्मन राजाला काहीतरी भव्यदिव्य करण्याची कल्पना सुचल्यापासून वेरूळ येथे कैलासमंदिर प्रत्यक्षात साकार होईपर्यंतचा हा काळ. अर्थातच कथेत अनेक पात्रे आहेत. पण मुख्य पात्रे इंद्रवर्मन, त्याची पत्नी भावनगा, त्यांचा मुलगा दंतिदुर्ग आणि त्याची पत्नी कौमुदिनी, दंतिदुर्गचा काका कृष्णवर्मन, त्याची पत्नी माणकावती, इंद्रवर्मनचे सल्लागार राजप्पा, कोकशदेव आणि त्यांचा शिष्य-मदतनीस सुधाकर अशी आहेत. कथा काहीतरी भव्यदिव्य करण्याची कल्पना इंद्रवर्मनला सुचली आणि ती पूर्ण करण्यासाठी दंतिदुर्गाला ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी किती प्रयास पडले याचीही आहे. मात्र दंतिदुर्ग, ज्याच्या प्रेरणेने ही अजरामर कलाकृती आकार घेत होती, तो ती पूर्णत्वाला जाण्यापूर्वीच मरण पावतो, आणि त्यानंतर त्याची पत्नी कौमुदिनी आणि इंद्रवर्मनचा भाऊ कृष्णवर्मन ती पूर्णत्वाला जावी यासाठी किती प्रकारे शिल्पकारांना उत्तेजन देतात, शिल्पे कुणाकुणाची आणि कोणत्या जागी असावीत याबाबत राजप्पा आणि कोकशदेव यांच्याबरोबर विचार विनिमय करून कसे ठरवतात, अखेर कौमुदिनीचा धाकटा मुलगा सूत्रे हाती घेतो आणि कैलासमंदिर पूर्णत्वाला येते. अशी सारी कहाणी कंटाळवाणी न होता वाचकांचे कुतूहल वाढत राहील, अशा प्रकारे लेखकाने सांगितली आहे. ती मुळातूनच वाचायला हवी. 

वेरूळच्या कैलास लेण्याच्या निर्मितीच्या या कथेत पुण्यपुराहून आलेला कोकशदेव याचे उपकथानकही आहे. लहानपणीच वातापी (बदामी) नगरीला जाऊन शिल्पकलेचे शिक्षण घेणारा कोकश पट्टदक्कल येथील आश्रमात हे शिक्षण घेतो. मोठ्या चातुर्याने हा आश्रम या जागी उभारण्यात आलेला, कारण वातापी, पट्टदक्कल आणि ऐहोळे ही गावे जवळपास असल्याने, या भागांतील मंदिरे आणि त्यातील स्थापत्य अभ्यास करता येणार होता. दहा-बारा वर्षांनी कोकश घरी परततो. कालांतराने कुंभार श्रेणीत जन्माला आलेल्या लहान सुधाकरला शिल्पकलेचे आकर्षण असते आणि ती साध्य करण्यासाठी त्याने बलदेव यांच्याकडून शिल्पकार बनण्यासाठी घेतलेले कठोर परिश्रम आणि अखेर त्याला शिल्पकार श्रेणीत मिळालेला प्रवेश, नंतर कोकशदेवांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारणे. हे सारे सांगताना, या दोन श्रेणींच्या कामातील बारकावे वर्णन करताना ते वाचकांना भावतील अशा प्रकारे सांगितले आहेत. त्याने साकारलेल्या पुण्यपुरातील (सध्याचे पुणे) पाताळेश्वर मंदिरातील नंदीच्या मूर्तीबाबतच्या कथेचेही आश्चर्य वाटावे. कलेच्या शिक्षणाबरोबरच विविध लेण्यांतील, मंदिरांतील शिल्पांचा अभ्यास करण्यासाठी त्याच्या गुरुबरोबर केलेला अनेक ठिकाणचा प्रवास आणि प्रत्यक्ष कैलास लेण्याची निर्मिती करण्याआधी महाबलिपुरम आणि कांचिपुरमला दिलेली भेट अचंबित करणारी आहे.

मुळात ‘आधि कळस मग पाया’ ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यात किती अडचणी निर्माण झाल्या, (मंदिरासाठी वेरूळचीच निवड केली गेली, कारण तेथील खडक हे शिल्पाकृती घडवण्यासाठी योग्य होते.) त्या दूर करण्यासाठी किती प्रयास पडले, त्यात किती काळ गेला, हे वाचताना थक्क न होणारा विरळाच म्हणावा लागेल. त्या काळातील विविध राजवटी, म्हणजे चालुक्य, पल्लव, कान्यकुब्ज, इत्यादी आणि त्यांचे एकमेकांबरोबरचे संबंध याचे वर्णनही आहे, आणि त्या काळातील वेगवेगळी वस्त्रप्रावरणे, अनेक प्रकारचे दागिने, तत्कालीन चालीरीती यांबाबतही वाचायला मिळते. सध्याच्या वेगवेगळ्या देशांची, (त्याबरोबरच आपल्या समुद्रापलीकडील देशांतील अनेक ठिकाणांची तत्कालीन नावेदेखील अनेकांना माहीत असण्याची शक्यता कमीच; परंतु आपल्याच लोकांचा त्यांच्याबरोबर व्यापार होता, ते समुद्रपर्यटनात निपूण होते आणि पश्चिमेला तसेच पूर्वेला दूरदूरपर्यंत संचार करीत होते (त्या काळात समुद्र ओलांडणे निषिद्ध नव्हते), हेही कळते 

अखेर कैलासमंदिर तयार होते. कौमुदिनी ऐलगंगा नदीच्या डोहात उडी मारून इंद्रवर्मनच्या भेटीस जाते. मंदिराच्या बाजूसच कलादालनाचे काम पूर्ण होते. कृष्णवर्मनचा धाकटा मुलगा ध्रुव बायकोसमवेत ते बघतो. आणि म्हणतो, “इथे दर्शनास येणाऱ्या प्रत्यशक भाविकाला राष्ट्रकूट कुलाची महती आणि कीर्ती कळो. त्या सर्वांच्या आठवणी आणि प्रार्थना आम्हाला मोक्ष प्राप्त करून देवो.” भावुक होऊन तो बोलत असतो. तेव्हा तो आई वडिलांची आठवण काढत होता. स्थपती म्हणतात, “फक्त देवाच्या पाया पडायला देवळात जायचं नसतं, हे सांगण्यासाठी ह्या कलादालनाचा अट्टाहास. ह्या शिल्पांचे अनेक लोक अनेक पद्धतींनी रसग्रहण करतील. कलेच्या बाबतीत तज्ज्ञ आणि अज्ञ सगळे सारखेच. शेवटी प्रत्येकाला येणारी अनुभूती वेगळी! शिव आणि पार्वतीमध्ये प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचं, प्रियजनांचं प्रतिबिंब दिसतं, म्हणूनच शिव पार्वती प्रत्येक मनात घर करून आहेत.” दगडावर खडूने रेखाटलेल्या शिव-पार्वतीच्या चित्राकडे हात करत स्थपती म्हणाले, “भाविकाला हे निव्वळ दगडात कोरलेले आकार नाहीत ह्याची जाणीव होवो. पार्वतीच्या ममतापूर्ण चेहऱ्यात त्यांना आपली आई दिसो. शिवाचा आश्वासनात्मक चेहरा त्यांना सतत प्रोत्साहन देवो. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला देवीदेवतांचे गुण कळोत, त्यांचा महिमा ते जाणून घेवोत.” ध्रुवानेही हात जोडले. दोन्ही हात जोडून, डोळे मिटत स्थपती पुढे म्हणाले, “पायऱ्या चढून नंदीला प्रणाम करताना जीव आणि शिव एक होण्याचे भाव दाटू लागतील. गर्भगृहातील ब्रह्मरूपाबद्दल सांगण्याचं ना मला ज्ञान आहे, ना अधिकार, ना अनुभव !” 

‘अजून बोलण्यासारखे काहीच उरले नव्हते.’ या वाक्याने कादंबरी संपते. या कादंबरीने वाचकाला अनेक बाबींची माहिती होईल. कारण लेखक प्रत्येक ठिकाणी त्या त्या विषयाबाबत माहिती देतो. तीही अशा खुबीने की, वाचकाला ती खिळवून टाकणारी, तरीही ती उगाचच लांबणार नाही याची काळजी लेखकाने घेतली आहे. यामुळे वाचकाला तो विषय समजणे सोपे होते. एका प्रसंगी दंतिदुर्ग शिल्पांबाबत कौमुदिनीला सांगतो, “ही शिल्पं आणि मूर्ती फार कामाला येतात. इथे येणाऱ्या पांथस्थाला किंवा भाविकाला ह्या शिलापटाद्वारे कथा सांगताना भाषेची अडचण उरत नाही. कारण चित्रांची भाषा सर्वांना समजते. त्यामुळे हे शिवप्रसंग, कथा आणि त्यामागील शिकवण ही संस्कृत न येणाऱ्याला सुद्धा समजतील.” 

मुख्य कथानक आणि उपकथानक यांचा मेळ जमल्याने कादंबरी एकसंध वाटते. अनेक पात्रे असली, तरी अडखळल्यासारखे होत नाही. उदाहरणार्थ सुधाकर डावरा. पण कामण्णांच्या सांगण्यावरून उजव्या हाताने काम करतो, पण नकळत डाव्या हातानेच बरेच काम करतो. त्यामुळे बलदेव अस्वस्थ होतात. सुधाकर वाममार्गी वा तांत्रिक आहे का असा त्यांना संशय येतो. पण कोकशदेव आणि योगेंद्रप्रभूच्या कानावर हे घातल्यावर योगेंद्रप्रभू डाव्या हाताबद्दलचा त्याचा गैरसमज दूर करतात. ते सांगतात, “डावा हात अपवित्र मानला जातो कारण तो स्वच्छतेच्या कामासाठी वापरला जातो. डावा हात अपवित्र असता, तर आपण दोन्हीही हात जोडून नमस्कार केला नसता. फक्त उजव्या हाताने केला असता. डावा हात अपवित्र असता तर धर्मकार्यात पत्नी डाव्या बाजूला बसली नसती. अर्धनारी नटेश्वराच्या डाव्या अंगाला प्रत्यक्ष्ह पार्वती दिसली नसती. डावा हात अपवित्र असता तर शंख, चक्र, गदा आणि कमळ धारण करणाऱ्या भगवान विष्णूने गदा आणि शंख डाव्या हातात धरले असते का? देवी सरस्वतीने डाव्या हातात वेद धारण केले असते का? तुम्ही अनेक मूर्ती घडवता, त्या सर्व देवी देवता दोन्ही हातात शस्त्र किंवा पवित्र वस्तू धारण करतात. डावा हात आणि उजवा हात ह्यांत कुठेही भेद दिसत नाही. मग तुमच्या मनात ही शंका कशाला ?” 


हेही वाचा - वारसास्थळे हीच शहराची शक्तिस्थळे हे पटवून देणारे पुस्तक (लतिका जाधव)


अनेकदा ही कादंबरी वाचताना कथासरित्सागर या साहित्यकृतीची आठवण होते. कारण त्यात अनेक ठिकाणी, प्रसंगानुसार वेगवेगळ्या पौराणिक, ऐतिहासिक कथा गुंफल्या आहेत. त्यामुळे सांगणाऱ्याला श्रोत्यांना विषय योग्य प्रकारे आकलन होईल याची खातरी असते. कधी कुणी गोष्ट सांगतात तर कधी एखाद्या व्यक्तीला त्या आठवतात. गृहनिर्मितीसाठी वास्तुशास्त्र महत्त्वाचे. आचार्य कोकशला वास्तू म्हणजे काय, याची माहिती सांगताना वास्तुपुरुषाची कथा सांगतात. “असं म्हणतात की शिवाने अंधकासुराला मारलं आणि पृथ्वीने सुटकेचा निःश्वास टाकला. त्या भीषण युद्धानंतर शिव थोडेसे दमले. त्यांच्या कपाळावरून घामाचा थेंब धरणीवर पडला. तो थेंबसुद्धा इतका तेजस्वी आणि वीर्यवान होता की, त्यातून एक भीषण आणि अक्राळविक्राळ असुर जन्माला आला. हाच मूळ वास्तुपुरुष. कालांतराने तो सर्वांना त्रास देऊ लागला. पृथ्वी आणि आकाश त्रस्त झाले. तेव्हां अनेक देवतांनी मिळून त्याला धडा शिकवला. त्याच्या शरीराच्या विविध भागांवर एक एक देवता उभी राहिली आणि त्यांनी त्याला जमिनीत गाडून टाकले. त्यावेळी तो ब्रह्मदेवाला शरण गेला. ब्रह्माने त्याला वरदान दिले की, जो कोणी जमिनीवर घर बांधताना तुझी पूजा करेल आणि तुला प्रसन्न करेल त्याची भरभराट होईल. त्याला सुखसमृद्धी मिळेल आणि तसं न केल्यास त्याला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल”. 

कान्यकुब्जचे नाव मुलाच्या तोंडून ऐकताच इंद्रवर्मनला गुप्त साम्राज्याचा आणि सम्राट हर्षवर्धनचा संपूर्ण इतिहास आठवतो. काही ठिकाणी चाणक्यनीतीचाही दाखला दिला जातो. कुंभारांचं महत्त्व सांगताना सुधाकरचे आजोबा कथा सांगतात. “कलाकार आणि निर्मिती करणाऱ्यांना ब्रह्मदेवाने उसाचा एकएक खंड दिला. सर्वांनी ब्रह्मदेवाला धन्यवाद दिले आणि तो मिटक्या मारत खल्ला. पण आपला आदिपुरुष घडे बनवण्यात इतका दंग होता की, देवाने दिलेला तो उसाचा खंड खाण्याचे सोडून त्याने तो एका घड्यात ठेवून दिला. तो घड्यात तसाच राहून गेला, हे कामाच्या नादात त्याच्या ध्यानातच राहिलं नाही. काही दिवसांनी ब्रह्मदेवाला उसाच्या तुकड्यांची आठवण झाली आणि त्यांनी सर्वांकडे उसाची विचारणा केली. सर्वांनी तो कधीच संपल्याचं सांगितलं. पण कुंभाराला आपण तो घटात ठेवल्याचं आठवलं. त्याने तो घट आणला, तर त्यात उसाच्या डोळ्यातून ऊस उगवला होता. त्याने तो ब्रह्मदेवाला अर्पण केला. त्याच्या कृतीमुळे ब्रह्मदेव खूष झाला आणि समस्त कुंभारांना प्रजापती अशी पदवी बहाल केली”. या खेरीज घृश्मा-सुदेहा या सवतींची, तसेच घृश्मेची विनंती मान्य करून शिवाने वास केल्याने घृश्मेवर हे नाव कसे पडले याची, रावणाला नंदी शाप देतो त्याची कथा अशा अनेक गुफलेल्या कथा कथानक पुढे नेतात. 

अनेक ठिकाणी श्लोक उधृत केले आहेत आणि त्यांचा अर्थही सांगितला आहे, हे संस्कृत न शिकलेल्या वाचकांच्या दृष्टीने सायीचे आहे. वास्तु गायत्री मंत्र मात्र तसाच दिला आहे. तो सहज समजण्याजोगा आहे. तो असा : 
वास्तुपुरुषाय विद्महे भूमिपुत्राय धीमहि तन्नो वास्तू प्रचोदयात । 

व्यासांची महती सर्वांना सांगताना, वेगवेगळ्या पुराणांबाबत दंतिदुर्गाला सांगताना राजप्पा बोलू लागतात. व्यासांच्या शिष्यगणांनी अनेक कथा संकलित केल्या. त्यांची वर्गवारी करून विषय किंवा देवतेनुसार त्या वेगवेगळ्या संहितांतून महंडल्या. स्कंदपुराण, लिंगपुराण, वायुपुराण आदि ग्रंथांतून ह्या कथा समाविष्ट केल्या. पुराण या ग्रंथपद्धतीची मांडणी व्यासांनीच केली असं म्हणतात. 

“तुम्ही आम्हाला शिवमाहात्म्य ऐकवाल का?” असे कौमुदिनीने विचारल्यावर राजप्पा ते कथन करतात. या मंदिराला कैलास आणि शंकराला म्हणजे देवतेला माणकेश्वर हे नाव कसे दिले गेले हेही कथन आहे. मंदिराला नाव देण्याचे वेळी कोकशदेव सुचवतात, “दंतिदुर्ग मंदिर असं नाव दिलं तर?” पण कौमुदिनी म्हणते, “हे मंदिर काही माझ्या स्वामींचे नाही. महादेव शिव शंभूचे आहे. त्यामुळे ते याोग्य वाटत नाही. दंतिदुर्ग महाराजांचेही विचार असेच काहीसे होते. कैलासावर प्रत्यक्ष भगवान शंकर राहतात. आपला कैलास सोडून कुठंही जायला ते सहसा तयार होत नाहीत. रावणाने अथक प्रयत्न केला, पण आपल्या अहंकारापायी तो अपयशी ठरला. ह्या रम्य परिसरात आपण जणू प्रतिकैलासच साकारतोय असं मला वाटतं. कधी आकाशातून प्रवास करताना त्यांना इथं थांबावसं वाटलं, तर मला आश्चर्य वाटणार नाही. आपण याला कैलास मंदिर म्हणू या का? कांचीपुरमच्या मंदिराचं नावही कैलासनाथ आहे. माणकावती ताईबद्दलही मला काही सांगायचं आहे. साम्राज्य उभारणीत जसा कृष्णाकाका सदैव पाठीशी आहे, तशीच या वास्तुनिर्मितीत माणकावती ताई. तिची सर्वच योजनेला सदैव साथ राहिली आहे आणि तिच्यावाचून मी उभीच राहू शकले नसते. तिच्या शिवभक्तीसंबंधी फारसं कुणाला माहीत नही. पहाटे शंकराची पूजा केल्याशिवाय ती अन्नप्राशनही करत नाही. मंदिराच्या वास्तूला कैलासमंदिर म्हणणं योग्य असलं, तरी शंकराला म्हणजे देवतेला माणकेश्वर हे नाव मला उचित वाटतं”. 

या चांगल्या साहित्यकृतीत गालबोटासारख्या काही उणिवाही आहेत. त्या बहुतेक मुद्रणदोष आणि क्वचित वाक्यरचनेच्या. बऱ्याचदा एकाच वाक्यात कधी मात्रा तर कधी अनुस्वार (उदाहरणार्थ ‘असं वाटते’), अशी वाक्यरचना आहे. वाचताना याचा अडथळा आल्यासारखे वाटते आणि खटकतेही. नाटक चित्रपटांत काही पात्रे कानडी मराठी बोलतात, तसे वाटावे अशशी काही वाक्ये आहेत. उदा.... राजप्पांचं तत्त्वज्ञान ऐकून जयदेवांच्या चेहऱ्यावर फारसा फरक पडलेला दिसला नाही. “रंगकर्मी मंडळी नटराजाची मूर्ती पूजतातच की”, राजप्पांच्या उत्तराने जयदेव काहीसे समाधानी झाले आणि बोलू लागलं. अर्थात यामुळे समजायचे ते समजते, तरी खाताना एकदम दाताखाली खडा लागल्यासारखे वाटते. काही ठिकाणी ते सारे आलं किंवा ते बोललं, हे सहज टाळता आले असते. बहुधा हा योग्य शब्द न वापरता बहुदा असेही काही ठिकाणी आहे. मात्र ‘परोक्ष’ शब्दाचा वापर योग्य प्रकारे केला आहे हे महत्त्वाचे. कारण अलीकडे अनेकजण, अगदी मुख्यमंत्रीही, परोक्ष आणि अपरोक्ष यांचा योग्य अर्थ न कळल्याने परोक्षच्या जागी अपरोक्ष या शब्दाचा वापर करतात. खरे तर परोक्ष म्हणजे एखाद्याच्या अनुपस्थितीत आणि अपरोक्ष म्हणजे अगदी समोरासमोर. यामुळेच बहुधा ऐवजी बहुदा म्हटले आहे, याचे नवल वाटते. सागरिकेचा मुलगा धूम्रकेतू हा कृष्णवर्मनच्या मुलाला काका म्हणतो. खरे तर तो त्याचा मामा. कारण सागरिका दंतिवर्माची मुलगी आणि कृष्णवर्मनचा मुलगा ध्रुव हे चुलत भाऊबहीण. इंग्रजीत काका मामा अंकल होतात. तरीही त्यांत मॅटर्नल अंकल आणि पॅटर्नल अंकल असा खुलासा करावा लागतो. अर्थात ही काही फार मोठी चूक म्हणता येणार नाही. तरीही... 

शेवटी मनोगतात लेखकाने महत्त्वाची गोष्टसांगितली आहे. “या अत्युच्च निर्मितीचे स्थपती (आर्किटेक्ट) आणि राज्यकर्ते दोघेही जनमानसाला फारसे माहीत नाही. साधारण राष्ट्रकूट राजांच्या कारकिर्दीत ह्या मंदिराची निर्मिती झाली एवढंच इतिहास सांगतो (म्हणजे सातशे अट्ठावन साली). कैलास मंदिराच्या कर्त्यांना आपली नांवं कोणाला कळू नयेत, असं वाटलं असावं. त्याबद्दल नंतरच्या राष्ट्रकूट राजांनी शिलालेख लिहून ठवला आहे. तो असाः ‘मंदिराचे स्थपती आणि त्यांचे मोजके ज्येष्ठ सहकारी जेव्हां हे निर्माणकार्य संपन्न झाले तेव्हा दूर जाऊन मंदिराकडे बघू लागले (येथेही बघू लागलं असं छापलं गेलंय,) तेव्हा ही विलक्षण निर्मिती आपल्या हातून घडली ह्यावर त्यांचा विश्वासच बसेना. आपले हात केवळ निमित्तमात्र होते, हे अदभुत कार्य प्रत्यक्ष शंभो शंकराने आपल्या हातून घडवलं ह्याची खात्री वाटल्याने, त्यांनी कोठेही आपली नावं कोरली नाहीत. हा त्यांचा मोठेपणा आहे. प्रत्यक्ष पुरावे नसल्यामुळे कैलासमंदिर निर्मितीसंबंधी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. त्या मनोरंजक असल्या तरी इंजिनीयर म्हणून मला त्या तार्किक वाटत नाहीत. त्यामुळे दंतकथेपलीकडे जाऊन भावी पिढ्यांना आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची ओळख होणं मला नितांत गरजेचे वाटतं. लेखकाचा हा हेतू नक्कीच यशस्वी झाला आहे. वाचकांनी मनोगतापासूनच कादंबरी वाचायला हवी, असे वाटते. 

कथा वेरूळच्या कैलास निर्मितीची
लेखक : अभिजित केतकर
प्रकाशक : रविंद्र कृष्ण घाटपांडे; स्नेहल प्रकाशन, पुणे ३०; 
पाने: ३२४: 
किंमत: ५०० रुपये.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत. )

Tags: वेरुळ लेणी राष्ट्रकूट राजे इतिहास महाराष्ट्राचा इतिहास चालुक्य Load More Tags

Add Comment

संबंधित लेख