खेला होबे!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 - पडघम वाजू लागले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक मार्च 2026 मध्ये होणार आहे. म्हणजे वर्षभरापेक्षा कमी काळ राहिला आहे. तिथे सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने पूर्ण बहुमताचे सरकार चालवले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठीच धडक मारली होती, मात्र सत्तापालट झालेला नव्हता. या वेळी मात्र भाजप सर्व प्रकारची ताकद लावून पश्चिम बंगाल मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे, तेथील निवडणुकीचे पडघम आत्ताच वाजू लागले आहेत. त्यावर ओझरता दृष्टीक्षेप टाकणारा हा लेख आहे.

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी म्हणजे 2026 साली विधानसभेची निवडणूक होत आहे. दीर्घकाळपासून या राज्यात भाजपला काहीच स्थान नव्हते. बंगाल ही त्यांची भळभळती जखम होती आणि अजूनही आहे. पण गेल्या काही लोकसभा निवडणुकांत त्यांच्या मतांचा टक्का हळूहळू वाढतो आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना बऱ्यापैकी यश आले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी ‘दीदी ओ दीदी’ अशी प्रक्षोभक हाक दिली होती. तृणमूल काँग्रेस यामुळे खचून जाईल अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु ममता बॅनर्जी यांनी त्यांना ‘खेला होबे’ (Game On! किंवा तर मग आमनेसामने होऊन जाऊ दे!) असे खणखणीत प्रत्युत्तर दिले होते. ममता दीदींचा आत्मविश्वास आणि बंगाली जनतेवरचा विश्वास लोकांनी खरा ठरवला आणि भाजपला जिव्हारी लागेल असा धक्का दिला. आणि तेव्हापासून भाजपवाले आणखीनच चेकाळले आहेत. 

अन्य राज्यांत समाजाचे ध्रुवीकरण / विभाजन करण्याचे भाजपचे बेत खूपसे यशस्वी झाले. प. बंगालमध्येही त्यास निश्चित यश मिळेल असे त्यांना ठामपणे वाटते आहे. त्यामुळे त्यांनी ‘हिंदू फर्स्ट’ हा मुख्य मुद्दा ठरवला आहे. पण ही नेहमीची ‘हिंदू विरुद्ध अल्पसंख्याक’ खेळी बंगालमध्येही यश देईल का, हा कळीचा प्रश्न आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या केल्लॉग महाविद्यालयात ममता बॅनर्जी यांचे भाषण झाले. त्या भाषणाचा संदर्भ सामाजिक सुधारणा, मुली, पौगंडावस्थेतील मुली आणि महिला यांची सुरक्षितता असा होता. भाषण सुरू असतानाच त्यांना बंगालमधील लाखो कोटींची गुंतवणूक, आर. जी. कारमधील बलात्कार आणि खून प्रकरण यांबाबत प्रश्न विचारण्यात आले, आणि "ममताजी, एनी वन फॉर हिंदूज?" अशी प्रश्नार्थक घोषणाबाजी झाली. “बंगालमध्ये हिंदूंचा कोणी तारणहार आहे का?” असा खडा सवाल केला गेला. त्याला उत्तर देताना ममतादीदी म्हणाल्या, “मी सर्वांसाठी आहे, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वांसाठी!” मात्र त्यामुळे त्यांचे विरोधक शांत झालेले नाहीत. अशा परिस्थितीत सेक्युलर बंगाली त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील का, हा खरा प्रश्न आहे. कारण 2026 मधील भाजपचा प्रचार हा ‘अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण आणि त्यावरचा हिंदूंचा संताप’ या प्रमुख मुद्याला धारूनच असेल हे पुरेसे स्पष्ट आहे. 

ममता बॅनर्जी यांनी त्या भाषणात कोलकात्याचे लंडनमध्ये रूपांतर करण्याची मनीषा बोलून दाखवली होती. पण वरील घोषणेनंतर बंगालमधील पुढील वर्षीच्या निवडणुका आता थेट ऑक्सफर्डपर्यंत पोहोचल्या आहेत अशी जाणीव बंगाली लोकांना झाली असेल आणि केल्लॉग कॉलेजलाच कोलकात्याच्या रस्त्यांवरील राजकारणाची (street politics) चुणूक पाहायला मिळाली असेल.

पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी, भाजपचे प्रांताध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनीही “जिहादींवर कोणतेच नियंत्रण नाही ते मुक्तपणे लूट करत आहेत, मारामाऱ्या आणि नासधूस करत आहेत. त्यांचे लक्ष्य हिंदूच आहेत. परंतु अन्सर अल इस्लामच्या अटकेनंतर तृणमूल काँग्रेसने बंगालला शेजारच्या देशातील जिहादींचा स्वर्ग बनवला आहे ममता मात्र मुस्लिमांचे तुष्टीकरण करत आहेत” असे आरोप करून “हिंदुस्तानात तसेच प. बंगालमध्ये जे हिंदूंच्या भल्याची काळजी घेतील, तेच येथे सत्तेवर राहतील. आणि ममता बॅनर्जी यांचा भवानीपूरमध्ये भाजपच्याच उमेदवाराकडून पुन्हा पराभव होईल”. अशी भाकिते वर्तवली आहेत. भाजप आता फक्त हिंदू-मुस्लिमांत फूट पाडण्यावर जास्तच भर देत आहे. धार्मिक ओळख आणि तुष्टीकरण हेच मुद्दे प्रमुख असणार आहेत. 

प. बंगालमध्ये हिंदू 70 टक्के आणि मुस्लिम 30 टक्के आहेत. त्यामुळे हिंदू मतांचे एकीकरण झाले तरच भाजपला फायदा होणार आहे, हे त्यांना ठाऊक आहे. या राज्यात 2019 पासून त्यांच्या मतांचे प्रमाण वाढत असून आता ते लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आता जवळपास 39 टक्क्यांवर गेले आहे. यात समाजाच्या सर्व थरांतील मतदारांचा, अगदी स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्यांचाही समावेश आहे, असे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अरुण शाह यांनी म्हटले आहे. पण मुख्य प्रश्न असा आहे की, बंगालमधील भद्रलोकाची काय भूमिका असेल, असेही दिलीप घोष यांना वाटत असल्याचे सांगितले आहे. 

राजकीय विश्लेषक सुचिस्मिता दास म्हणतात की, ‘सेक्युलर बंगाली निवडणूक विश्लेषकांना चकवू शकतात. कारण असे की, सर्वसाधारण बंगाल्यांना आपल्या देशातील इतर कोणाहीप्रमाणेच इस्लामोफोबिया आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचा पाडाव झाल्यानंतर अल्पसंख्याक हिंदूंवर झालेले अत्याचार आता जगभर सर्वांना ठाऊक झाले आहेत. त्यामुळे प. बंगालमधील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. पूर्वी भाजपचे फुटीचे राजकारण फार थोड्यांना भावत होते. बंगाल्यांचा अभिमान आणि बुद्धिवाद्यांतील जागतिक दृष्टिकोन, यांवर भाजप आजवर मात करू शकला नव्हता. पण आता येत्या निवडणूक प्रचारात या दोन्हीवरच हल्ला चढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.’

प्रश्न असा आहे की केवळ हिंदुत्वावर अवलंबून राहून भाजपला फायदा होईल का? कारण बंगालचा हिंदू माशांची थाळी सहज रिचवतो, आणि दुर्गा पूजा आणि ख्रिसमसही सरस्वतीपूजेएवढ्याच उत्साहात साजरा करतो. पण यामुळे तो इतर हिंदूंपेक्षा वेगळा होत नाही, असे अभिनेता अनिंद्य चक्रवर्तीला वाटते. भाजपने प. बंगालमध्ये बऱ्यापैकी जम बसवला असला तरी अद्याप ‘बंगाली माणूस हा खऱ्या अर्थाने बंगाली कशामुळे असतो?’ या कोड्याची उकल त्यांना करता आलेली नाही. त्याचे उत्तर कदाचित अ-बंगाली वा नॉन-बेंगाली या संकल्पनेत असू शकेल. हा शब्द बाहेरच्यांसाठी वा उपऱ्यांसाठी वापरला जातो. त्यामुळे त्याचा प्रभाव धर्माहून जास्त असू शकतो. आणि ते सारे उपरे बंगाल्यांकरता अवांच्छित असू शकतात. 

आगामी निवडणुकीसाठी भाजप आतापासूनच मशागत करत आहे. तृणमूल काँग्रेसच्या काही जणांना ईडीचे लक्ष्य करण्यात येत आहे, तर काहींवर गुन्ह्यांचे आरोप केले जात आहेत. या रामनवमीचे निमित्त करून भाजपने बंगालमध्ये 2000+  शोभायात्रांचे आयोजन केले होते. तृणमूल काँग्रेसने या वेळी त्याला सडेतोड उत्तर दिले. त्यांनी स्वतःच काही मिरवणुका काढल्या तर त्यांचे काही कार्यकर्ते भगवी वस्त्रे परिधान करून भाजपच्या शोभायात्रांतच सामील झाले.

त्यामुळे भाजपची पुरतीच पंचाईत झाली. कारण खरे म्हणजे त्यांना रामनवमी हा दंगलींचा हंगाम बनवायचा होता. परंतु बंगालमध्ये रामनवमीला दंगली झाल्या नाहीत. ईदचा दिवसही शांततेत पार पडला. त्यानंतरच्या दिवशी मात्र मुर्शिदाबादमध्ये दंगलींना निमित्त झाले वक्फ़ कायद्याविरोधातील निदर्शनांचे. या दंगलीत तीन जण मरण पावले, अनेक जखमी झाले व शेकडो बेघर शेजारच्या माल्डा जिल्ह्यात गेले. पुढे दोन दिवस शांतता होती, पण 11 एप्रिलला भांगडमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला. पाठोपाठ सुती, समशेरगंज, धुलियन आणि जांगीपूर येथे असंतोष! आता थोडी शांतता आहे. इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

वक्फ़बाबत 16 तारखेला सर्वोच्च न्यायालय़ात सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच तृणमूल  आणि भाजप यांनी एकमेकावर आरोप केले आहेत. भाजपने अपेक्षेप्रमाणे ममता यांना जबाबदार धरले, तर सत्ताधारी गोटात ‘भाजपने मुख्य प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी वक्फ़ कायदा आणला आहे. भाजप मुस्लिम विरोधी आहे’ असे बोलले जात आहे. भाजपच्या विनोद बन्सल यांनी 'इंडिया' आघाडीवर ठपका ठेवला आहे. यामुळे आता आगामी निवडणुकीत वक्फ़ हा मुद्दा दोन्हीकडून वापरला जाण्याची शक्यता आहे. 

जवाहर सरकार हे प्रसारभारतीचे माजी संचालक आहेत. त्यांनी म्हटले की, “याआधी बंगालमध्ये चैत्र नवरात्रात अशोक षष्ठी, बसंती पूजा, अन्नपूर्णा पूजा होत असत. परंतु भाजपने 2017 पासून येथे रामनवमीला शोभायात्रा सुरू केल्या आणि दरसाल त्यांची संख्या वाढतच गेली. ती यंदा 2000 वर पोहोचली आहे. भगवे झेंडे आणि शस्त्रांना न्यायालयाने बंदी घातली असली, तरी या शोभायात्रांत भगव्या झेंड्याबरोबरच अनेक शस्त्रास्त्रे सर्रास मिरवण्यात येत होती. न्यायालयाच्या आदेशाला भाजप किंमत देत नाही हे एव्हाना सर्वांनाच माहीत झाले आहे. पण प. बंगालवर राम असा लादता येणार नाही. उलट यामुळे मतदार भाजपासून दूर जाण्याचीच शक्यता आहे. कारण रामनवमी हा आता तणावाचाच उत्सव बनला आहे. (सुदैवाने तृणमूल काँग्रेसच्या डावपेचामुळे यंदा यावेळी दंगाधोपा झाला नाही.)”

2022 मध्ये बंगाल, झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, दिल्ली या राज्यांत दंगल झाली, तर 2023 मध्ये बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हिंसाचार झाला होता. गेल्या वर्षी बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराथ आणि बिहारमध्ये दंगली झाल्या होत्या. अर्थात तेव्हा नंतर लगेच लोकसभा निवडणुका होत्या हेही येथे ध्यानात घ्यायला हवे. 

आजच्या भारतात भडक माथ्याच्या लोकांमुळे दंगली होत नाहीत, तर थंड डोक्याने, बारकाईने, पैसा पुरवून, निर्दयपणे दंगलींचे नियोजन करण्यात येते. बहुविधता हे वैशिष्ट्य असणाऱ्या भारतात अशी कल्पनाही काही वर्षांपूर्वी करता आली नसती. पण आता हे वास्तव बनले आहे. 

यंदा बंगाल आणि देशात अनेक ठिकाणी मुस्लिमांनी रामनवमीच्या शोभायात्रेचे स्वागत केले, त्याची छायाचित्रेही प्रकाशित झाली आहेत. त्यामुळे देशाची सर्वसमावेशकता मोडून टाकून, दोन समाजांत फूट पाडण्याचा भाजपचा डावही तूर्ततरी फसला आहे, असे म्हणायला हरकत नाही. अर्थात भाजप एवढ्याने हार मानणारा नाही. कारण एकतर त्यांच्याकडे सत्ता आहे, मनुष्यबळ आहे आणि प्रचंड पैसाही आहे. शिवाय ईडी, ईटी, सीआयडी अशा महत्त्वाच्या सरकारी संस्थाही त्याच्या हाताखाली आहेत. आणि कदाचित न्यायालयेदेखील. त्यामुळे बंगालच्या निवडणुकांसाठी भाजप कोणतेही प्रयत्न कमी पडू देणार नाही आणि त्यांना तृणमूल देखील प्रतीकार करत राहील याची खातरी बाळगायला हवी.

कदाचित हीच ‘खेला होबे’ची सुरुवात असेल!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com 
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: bjp mamata banerjee पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 विधानसभा निवडणूक पश्चिम बंगाल विधानसभा ममता बॅनर्जी इस्लामोफोबिया खेला होबे अमित शाह मोदी बंगाली माणूस Load More Tags

Add Comment

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://econtract.ish.co.id/ https://tools.samb.co.id/ https://orcci.odessa.ua/ https://febi.iainlhokseumawe.ac.id/