फुले आणि रानडे यांचा ‘राष्ट्रवादा’संबंधीचा दृष्टिकोन

मधु दंडवते जन्मशताब्दीवर्षाच्या निमित्ताने त्यांच्या तीन पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

21 जानेवारी 1924 ते 12 नोव्हेंबर 2005 असे 82 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या मधु दंडवते यांच्या राजकीय-सामाजिक जीवनाची कारकीर्द तब्बल सहा दशकांची होती. समाजवादी पक्षातील आघाडीचे नेते अशी त्यांची ओळख अखेरचे पाव शतक तरी होती.त्यांची तीन पुस्तके साधना प्रकाशनाकडून 1999 ते 2006 या काळात प्रकाशित झाली होती. 1. जीवनाशी संवाद (आत्मकथन), 2. वेध अंतर्वेध (लेखसंग्रह), 3. परिवर्तनाचे दोन पाईक (दोन भाषणे). या तीनही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी वर्षात साधना प्रकाशनाकडून आणल्या आहेत. त्यानिमित्ताने, 'परिवर्तनाचे दोन पाईक'या पुस्तकातील निवडक भाग येथे प्रसिद्ध करत आहोत.

हार्वर्ड युनिव्हर्सिटीत ज्यांनी न्या. रानड्यांच्या संबंधात धर्मकारण, राजकारण, समाजकारण या विषयांवर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविली, त्या रिचर्ड ट्यूकर यांनी ‘Roots of Nationalism in India’ ह्या नावाचा एक प्रबंध लिहिला आहे. त्या प्रबंधामध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी जितके विवेचन केले आहे, त्यापेक्षाही खोलवर जाऊन रानड्यांविषयीचे विश्लेषण केले आहे.

न्या. रानड्यांची धर्मविषयक व्याख्याने प्रसिद्ध आहेत. त्याप्रमाणेच न.र. फाटकांनी त्यांचे एक उत्कृष्ट चरित्र लिहिलेले आहे. गं. बा. सरदारांनी त्यांच्या सुधारणावादाविषयी तात्त्विक मीमांसा करणारी जी व्याख्याने दिली, तीही प्रसिद्ध झाली आहेत. आपल्याला रमाबाईंच्या 'आठवणी'देखील उपलब्ध आहेत. या प्रकारचे त्यांच्यासंबंधीचे अनेक ग्रंथ मराठीत तसेच इंग्रजीतही उपलब्ध आहेत. या सर्वांचा आधार ट्यूकर यांच्या विवेचनाला आहे. तशीच परिस्थिती जोतिबा फुल्यांच्या बाबतीतही आहे. ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा असूड’, ‘अस्पृश्यांची कैफियत’, ‘इशारा’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’ अशा प्रकारच्या सर्व ग्रंथांमधून सर्व क्षेत्रांमधील त्यांचे जे विचार आहेत, ते अतिशय स्पष्टपणे आपल्यापुढे येतात. या ग्रंथांच्या आधारेच जी संकल्पना मी आपल्यापुढे मांडू इच्छितो, ती म्हणजे राष्ट्रवादाची.

राष्ट्रवादाच्या संदर्भात न्या. रानडे आणि जोतिबा फुले या दोघांचाही एका गोष्टीबद्दल आग्रह होता. त्यांना म्हणावयाचे होते की, सामाजिक न्याय, समता, व्यक्तिस्वातंत्र्य आणि प्रगती या सगळ्यांच्या अभावी राष्ट्रवाद हा संकीर्ण आणि आक्रमक बनण्याची शक्यता आहे. जागतिक इतिहासामध्येदेखील अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसतील. जर्मनीसारख्या राष्ट्रामध्ये वंशवादाचा धागा पकडून जेव्हा हिटलरचा नाझीवाद निर्माण झाला, तेव्हा तो एका अर्थाने आक्रमक राष्ट्रवादच होता. तेथील राष्ट्रवादाला सामाजिक न्यायाची, व्यक्तिस्वातंत्र्याची, समानतेची, सहिष्णुतेची आणि उदारमतवादाची बैठक नसल्यामुळेच त्या ठिकाणचा राष्ट्रवाद हा आक्रमक बनला, संकीर्ण ठरला, संकुचित झाला. न्या. रानडे आणि जोतिबा फुले ह्या दोघांचा असा आग्रह होता की, राष्ट्रवादाने जर या देशामध्ये मूळ धरावयाचे असेल, तर राष्ट्रवादाला संकुचित, संकीर्ण व आक्रमक स्वरूप येता कामा नये. या दोघांचीही धारणा होती की, ह्या देशावर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव पडला, तरच ते स्वरूप टळू शकेल. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक न्याय, प्रगती या उदारमतवादी मूल्यांवर जो भर आहे, ती मूल्ये आम्ही स्वीकारू तर राष्ट्रवाद हा अधिक प्रेरक बनेल; ही कल्पना फुले- रानडे ह्यांनी दोघांनीही मांडली, ही एक महत्त्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे.

या दोघांच्या राष्ट्रवादामागील प्रेरणा थोड्या वेगवेगळ्या आहेत. राष्ट्रवाद संकुचित, संकीर्ण होता कामा नये यासाठी न्या. रानडे ह्यांनी एक मार्ग दाखविला, तर म. फुल्यांनी दुसरा मार्ग दाखविला. न्या. रानड्यांचा असा भर होता की, पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये किंवा युरोपीय संस्कृतीमध्ये जे उदारमतवादी तत्त्वज्ञान निर्माण झाले आहे, त्या उदारमतवादाचा वारसा आपण भारतात जतन करून ठेवला पाहिजे. विशेषतः भारतासारख्या मागासलेल्या देशात रूढिवाद, परंपरावाद, अंधश्रद्धा, दैववाद आहे, त्या ठिकाणी उदारमतवाद हा अत्यंत महत्त्वाचा उतारा ठरणार आहे. न्या. रानडे यांनी एके ठिकाणी लिहिलेले आहे की, ब्रिटिशांची राजवट हा एक प्रकारचा ‘ईश्वरी संकेत’ (Divine Dispensation) आहे. याबद्दल जहाल राजकारणातल्या पुढाऱ्यांनी त्यांच्यावर कठोर टीका केलेली होती. पेशवाईच्या उत्तरकाळात ज्या अनेक अमानुष घटना घडल्या, त्या पाहून जोतिबा फुले म्हणाले होते की, हा देश स्वतंत्र होऊन याच लोकांच्या हातात राज्य पडण्याऐवजी काही काळ इंग्रजी राजवटीच्या अंमलाखालीच राज्य चालावे. ते म्हणाले की, हीच भिक्षुकशाही इथे चालणार असेल, शूद्र आणि अतिशूद्रांच्या बाबतीत पेशवाईच्या काळात झालेले कायदे असेच चालू राहणार असतील, अनाचार, भ्रष्टाचार चालू राहणार असेल; तर राजकीय आणि सामाजिक बाबतीत पाश्चिमात्य संस्कृतीच्या साहाय्याने आणि इंग्रजी राजवटीच्या मदतीने आपल्याकडील परिस्थिती पालटून टाकू या. हे परिवर्तन होण्यापूर्वी जर सत्तांतर झाले, तर ते आपल्याला अधिक तापदायक ठरेल; असा परखड इशारा जोतिबांनी दिला.

न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांनी भारताच्या ऐक्याबद्दलही स्पष्ट विचार मांडलेले होते. आज एका वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून देशाच्या ऐक्याचा विचार केला तर कदाचित आपल्या राष्ट्रीय अहंकाराला धक्का लागतो आहे की काय, अशी शंका येण्याची शक्यता आहे. परंतु जेव्हा इतिहासाचे अध्ययन आपण करू, तेव्हा ते वस्तुनिष्ठ पद्धतीनेच करावयास हवे. ज्याला आपण राष्ट्रवाद किंवा राष्ट्रीय एकात्मता म्हणतो; त्या संबंधीचा न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांचा दृष्टिकोन जेव्हा आपण पडताळून पाहतो, तेव्हा त्या संबंधीचे ऐतिहासिक सत्य आपण ओळखले पाहिजे. ज्याला आपण राष्ट्रीय एकात्मता म्हणतो ती आज वर्षानुवर्षे कोणत्या क्षेत्रात अस्तित्वात होती हे पाहू लागलो तर ध्यानात येते की, भारतीय एकात्मता ही आधुनिक युगातील, खरोखरी आधुनिक अशीच प्रक्रिया आहे. पूर्वापार या देशातील जी अखंडता अथवा एकात्मता होती, ती आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्तरावरील होती.

देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, अध्यात्माचा पुरस्कार करण्यासाठी जी संतमंडळी संचार करीत होती, ज्यांनी निरनिराळ्या धर्मग्रंथांचे संस्कार लोकांच्या मनावर घडवले; ज्यांनी रामायण-महाभारताचे सार लोकांना सांगितले; ज्यांनी अध्यात्माचा संदेश दिला, त्यांनी केवळ अध्यात्माच्या आणि संस्कृतीच्या पातळीवर एकात्मतेस दिली. पण राज्यप्रशासनाच्या पातळीवर काय चित्र दिसत होते, याचा मागोवा घेतल्यास कदाचित आपल्या राष्ट्रीय अभिमानाला धक्का बसेल. हे सत्य आहे की, या देशामध्ये निरनिराळ्या प्रदेशांवर ज्यांचे अधिराज्य होते, त्या ठिकाणचे संस्थानिक, जहागीरदार यांच्यामध्ये राष्ट्रीय ऐक्याची भावना अजिबात नव्हती. एखादा संस्थानिक आपले संस्थान टिकविण्यासाठी, शेजारच्या संस्थानिकाचा पराभव करण्यासाठी परकीय शक्तीचीही मदत घेत होता. त्यामुळे देशाची अखंडता, राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यापेक्षा प्रत्येकाला माझे संस्थान कसे टिकेल याची चिंता होती. हे ऐक्य शेवटी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्येच होते हे ऐतिहासिक सत्य आहे, पण हळूहळू त्यामध्ये कसा बदल होत गेला?

म. फुले आणि न्या. रानडे

इंग्रजांची राजवट आल्यानंतर इंग्रजांनी आपल्या राज्यकारभाराच्या सुलभतेसाठी व सोयीसाठी या देशातील दळणवळणाची साधने वाढविली, रेल्वेचे जाळे पसरले, खुष्कीचे मार्ग आखले आणि अशा प्रकारे हिंदुस्थानातल्या हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतचे अनेक प्रदेश एकत्र सांधण्याचे काम या दळणवळणाने केले. यातून प्रथम प्रादेशिक राष्ट्रवाद निर्माण झाला. त्या प्रादेशिक राष्ट्रवादातूनच ऐतिहासिकदृष्ट्या निखळ राष्ट्रवाद वाढीस लागला. राज्य करणारे इंग्रज आणि दडपले गेलेले भारतीय ह्यांचा संघर्ष झाला. ह्या संघर्षातून राष्ट्रवादाची आणि देशभक्तीची भावना अधिक प्रज्वलित झाली.

देशातल्या राष्ट्रवादाची ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण लक्षात घ्यावयाला हवी. या दृष्टिकोनातूनच न्या. रानडे यांचे विचार तपासावे लागतात. न्या. रानड्यांनी इंग्रजी राजवटीस 'ईश्वरी संकेत' संबोधिले म्हणून जरी काही लोकांना राग आला, तरी मला आपल्याला सांगावेसे वाटते की, या देशातल्या ज्या जुन्या रूढी, परंपरा होत्या, त्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या संघर्षातून आणि आघातातून नष्ट झाल्या आहेत. इंग्रजी राजवट हा ‘ईश्वरी संकेत’ असे मानणाऱ्या न्या. रानड्यांना असे वाटत होते की, या देशातले मागासलेपण, अज्ञान, अंधश्रद्धा नष्ट होण्यासाठी पाश्चिमात्य जगतातील ज्ञानविज्ञानाचा परिणाम होणे आवश्यक आहे. यासाठी इंग्रजांचे राज्य आमच्या देशावर कायम राहावे, असे त्यांचे म्हणणे नव्हतेच. आमच्याकडील परिस्थितीमध्ये पालट होण्यासाठी या राजवटीचा आम्हांला उपयोग झाला हे खरेच आहे. या संदर्भात जोतिबांनी काय म्हटले?


हेही वाचा : बेगम रुकय्या: फुले दाम्पत्याचा बंगाली वारसा - समीर शेख


अनेक टीकाकारांनी आपल्या ग्रंथांतून जोतिबांच्या कार्याची उपेक्षाच केली आहे. आचार्य जावडेकरांबद्दल मला अत्यंत आदर आहे, पण त्यांचे सुरुवातीचे ग्रंथ जर आपण पाहिले किंवा नंतरचेही ग्रंथ पाहिले, तर ह्या ग्रंथांमध्ये सामाजिक अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंबंधीचे समर्पक मूल्यमापन आपल्याला आढळणार नाही. स्वातंत्र्य आल्यानंतरच महात्मा जोतिबा फुले, डॉ. आंबेडकर आणि न्या. रानडे यांच्या कार्याचा, विचारसरणीचा गाजावाजा झाला ही वस्तुस्थिती आहे.

जोतिबा फुले यांनी वरपांगी कडवट भूमिका का घेतली हे तपासून पाहण्यासाठी आपल्याला त्या काळामध्ये जायला हवे. पेशवाईच्या उत्तरकाळामध्ये जे कायदे झाले, ते पाहिले तर स्पष्टपणे लक्षात येईल की, पांढरपेशा समाज आणि शूद्र-अतिशूद्र यांच्यामध्ये फारकत करणारे ते कायदे होते. कशा प्रकारचा अन्याय आणि अत्याचार सुरू होता यासंबंधीचे उत्तर- पेशवाईच्या काळातले सर्व चित्र पाहिले, तर आश्चर्यच वाटते. म्हणून जोतिबा फुले यांनी तळागाळातल्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवले. त्यांनी प्रश्न विचारला की, शेवटी राष्ट्रीय स्वातंत्र्य म्हणजे काय ? राष्ट्रीय स्वातंत्र्य हे उद्दिष्ट आहे की साध्य आहे? त्यांनी आपले उत्तर सांगितले की, ‘मानवाचा विकास’ हे माझे साध्य आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य हे त्याचे साधन आहे. परकीयांच्या गुलामगिरीतून आमचे जीवन उमलत नसेल, फुलत नसेल, तर तो अडसर दूर झाला पाहिजे, या अर्थाने मी स्वातंत्र्यवादी आहे. व्यक्तिविकास हे माझे साध्य आहे; पण मला असे दिसते आहे की, आज ज्याच्या हातांमध्ये सत्ता आहे ते लोक अनाचार, अत्याचार करीत आहेत, विषमता पसरवीत आहेत. शूद्र-अतिशूद्रांना ते ज्या पद्धतीने वागवीत आहेत, त्यामध्ये आम्हांला त्यांच्या बाजूने उभे राहता येणार नाही. मला सर्वप्रथम सामाजिक समता आणि स्वातंत्र्य पाहिजे. त्यासाठी पहिल्या प्रथम ह्या समतेवर घाला घालणाऱ्यांना हाकलून मग इतरांसाठी रस्ता तयार करायला हवा, या प्रकारची कडवट भूमिका जोतिबा फुल्यांनी घेतली, तेव्हा त्यामध्ये स्वातंत्र्याबद्दल अनादर नव्हता; तर व्यक्तिस्वातंत्र्याबद्दलचा ध्यास होता.

-    मधु दंडवते


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Tags: सामाजिक व्याख्याने जोतिबा फुले न्यायमूर्ती रानडे निवडणूक साधना प्रकाशन राजकारण मधु दंडवते नवी आवृत्ती लोकसभा नवे पुस्तक Load More Tags

Comments:

Prakash Kapade

छान लेख,समीक्षण

Add Comment