महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल अनपेक्षित होते. खुद्द महायुतीलादेखील एवढ्या भरघोस यशाची अपेक्षा नसणार. तसे पाहिले तर, महाविकास आघाडीलाही एवढे दारूण अपयश पदरी येईल याची कल्पना करता आली नसेल. पण घडले तसे. मतदारांनाही हा निकाल अनपेक्षितच असणार. याबरोबरच विश्लेषक तसेच एक्झिट पोलवाल्यांनाही चक्रावून टाकणारा हा निकाल आहे. तसे पाहिले तर प्रयत्नांची कसूर कुणीच केली नव्हती. पण त्यातही फरक होता. महायुतीतील पक्षांनी जणू काही ही अस्तित्वाची लढाई आहे, या जाणिवेने जीव ओतून प्रचार केला. भाजपला लोकसभा निवडणुकीत राज्यात आलेले अपयश सलत होते आणि ते पुसून टाकण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता.
संघाच्या मदतीची गरज नाही, या भ्रमात त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. पण हे म्हणजे प्रमुख अस्त्राविनाही जिंकण्याचा प्रयत्न करण्याजोगे होते, हा धडा त्यांना विसरता येणे शक्य नाही. संघाचा आधार हा आपल्यासाठी जीवनाधार आहे, हे त्यांना आता कळून चुकले आहे. या कारणामुळेच विधानसभा निवडणुकीआधीच त्यांनी संघाची मनधरणी केली आणि संघानेही उनाड मुलाला माफ करावे, त्याप्रमाणे त्यांच्या चुका आणि गर्व विसरून आपल्या पिलावळीतील संस्थांसह त्यांना मदत केली. तीही पूर्ण ताकद पणाला लावून. लोकसभानिवडणूक निकालानंतर त्यांना आता आपल्यालाच भाजप-रालोआला मदत करावी लागणार याची कल्पना आली असणार. शिवाय शताब्दीची तयारी करताना आपल्याच लाडक्या अपत्याचे अपयश त्यांना पुन्हा पाहायचे नसणार. त्यामुळे त्यांच्या छुप्या पद्धतीने त्यांनी तेव्हापासूनच प्रचार सुरू केला होता.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर तर समाजात फूट पाडण्याचा आपला कार्यक्रम त्यांनी आणखी जोरात राबवला. त्यांनी हिंदूंच्या घरोघरी जाऊन, “तुम्हाला लव्ह जिहादचा धोका आहे”, हे सतत सांगितले आणि जोडीला “आता व्होट जिहादमुळेही तुमच्यावर संकट ओढवणार आहे”, ही भीती त्यांना घातली. “ते तुमची मालमत्ताही हडप करतील” अशी पुस्तीही जोडली. एवढा काळ त्यांना याप्रकारे फूट पाडण्यात अपयश आले होते, कारण महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रणालीवर पोसलेला होता. त्याप्रमाणे त्याचे आचरण होते. हा हिंदू, हा मुसलमान असा विचारच महाराष्ट्रात नव्हता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेमकी हीच खंत होती. उत्तरेकडील राज्यांप्रमाणे येथेही समाजाचे विभाजन करण्याचा चंगच त्यांना बांधला. समाजाची एकी त्यांना नष्ट करायची आहे. या कारणाने त्यांच्या आवडत्या गोबेल्स नीतीनुसार खोटे बोला पण दडपून बोला. सतत त्याचाच मारा करत रहा. हळूहळू लोकांना ते पटेल या श्रद्धेने त्यांनी सतत हिंदूंना मुसलमानांपासून धोका आहे, हा घोष सुरू ठेवला. दीर्घकालच्या या विखारी आणि विषारी प्रचाराला यश मिळू लागले आहे हे दिसताच त्यांनी आणखी जोर केला. नेहमी मुसलमानांकडे बोट दाखवताना हिंदूंच्या गुन्ह्यांकडे त्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले. इतकेच नाही तर त्या गुन्हेगारांचा गौरवही केला. याप्रमाणे समजामनाची मशागत केल्यानंतर आता त्यात विद्वेषाचे बी पेरायची वेळ हीच आहे, हे त्यांनी ओळखले आणि त्यांच्या या प्रयत्नांना भाजपची साथ मिळाली. महायुतीतील भाजपच्या सहकाऱ्यांनी केवळ नापसंती व्यक्त केली, पण विरोध करायला मात्र ते धजावले नाहीत. आश्रितांना ते स्वातंत्र्य नसते याची जाणीव त्यांना होती. कुणी केवळ पैशाच्या मोहाने त्यांच्याकडे गेले होते आणि कुणी आपल्यावर पडलेले डाग भाजपच्या लाँड्रीत धुवून निघतील या विश्वासाने महायुतीत सामील झाले होते. दोन मोठ्या प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये फूट पाडणारा भाजपचा शिलेदार आता त्यांचा हीरो बनला होता. त्याच्या इशाऱ्यावर हे दोन फुटीर नाचत होते.
त्यातच सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या पात्रतेबाबतचा निकाल लांबवतच ठेवला. त्याबाबत खरे कोण आणि फूट पाडणारे कोण हे जनतेला कळूच दिले नाही. निवडणूक आयोगानेही हा निकाल आलेला नसताना त्यांच्या पक्षाची मूळ चिन्हे त्या फुटीरांनाच बहाल करून एकप्रकारे त्यांना अभय देऊन त्यांची ताकद वाढवली. अशा प्रकारची कवच कुंडले लेवून महायुतीचे शिलेदार रणांगणात उतरले होते. तिकडे महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीतील मोठ्या यशाच्या धुंदीतच होती. हरयाणातील धक्क्यानेही काँग्रेसचे शैथिल्य गेले नव्हते. भारत जोडो यात्रेच्या वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जे चैतन्य दिसले होते ते यावेळी प्रचारात अभावानेच दिसले. तशीही या पक्षाची कुवत पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही. पूर्वीप्रमाणे जीव तोडून पक्षासाठी झटणारे कार्यकर्तेदेखील क्वचितच आढळतात. आणि नेते तर सुस्तावलेले आणि आपापल्या संस्थानांतच रममाण झालेले दिसतात. पक्षाला बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात हे बहुतेक त्यांना माहीतच नसावे. आणि तसे प्रयत्न केले नाहीत, तर आपले स्थानही गमवावे लागते, हा अनुभव त्यांना आता आला असेल. कदाचित त्यांना जाग येईलही, पण आता उशीर झाला आहे. अर्थात त्यांनी त्याची पर्वा न करता ही भावी काळाची पेरणी आहे या भावनेने मन लावून प्रयत्न केले तरच त्यांना आणि पक्षाला फायदा होईल. या पक्षाबद्दल आजही लोकांना विश्वास आहे. तो टिकवण्याची जबाबदारी या नेत्यांवरच आहे. त्याबरोबरच दूर गेलेल्या निष्ठावंतांना पुन्हा जोडून घेण्याचे काम त्यांना करावे लागेल. असे झाले तर पक्षाची ताकद वाढेल आणि पूर्वीच्या चांगल्या कालखंडाप्रमाणे पुन्हा ते पक्षाची शान वाढवू शकतील.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना बऱ्याच प्रमाणात आजही लोकांच्या हृदयात स्थान टिकवून आहे. पण हा पाठिंबा हीच आपली ताकद आहे, याची जाण ठेवून त्यांनी आपल्या पाठीराख्यांना विश्वासात घेऊन परिस्थिती समजावून दिली पाहिजे. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी केवळ गद्दारांनी फूट पाडली हाच घोष सुरू ठेवला, त्यापेक्षा अपले खरेपण, न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा पक्षपात आणि त्यायोगे फुटीरांनाच कसे सहाय्य झाले आहे, आणि चोरच संन्यासी म्हणून कसे शहाजोगपणे मिरवत आहेत, हे सांगायला हवे होते. एकनाथ शिंदेंनी त्यांना भाजपच्या कृपेने मिळालेल्या मुख्यमंत्रीपदाचा पुरेपूर फायदा घेतला. अनेक योजना जाहीर केल्या. त्या प्रत्यक्षात कधी येतील याचा विचार मतदारांनी केला नाही. विकास म्हणजे रस्ते, त्यामुळे वाढत जाणारा टोल आणि त्यामुळे त्या कंत्राटदारांचा वाढत जाणारा फायदा! कारण ते केवळ टोल घेतात, बाकी ज्या रस्त्यांसाठी टोल घेतो ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर नाही, अशीच त्यांची समजूत असते; आणि त्यांना कंत्राट देणारेही मिंधेपणाने त्याबाबत काही बोलत नाहीत. कुणा जागरूक नागरिकाने त्याबाबत आवाज उठवला तर तो या ना त्या प्रकारे बंद करण्यात येतो, त्यासाठी टोकाचे मार्ग अवलंबण्याचीही कंत्राटदार आणि त्याचे पाठीराखे यांची तयारी असते.
भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी धर्मसत्ताच कशी आवश्यक आहे याबाबत प्रचार केला. प्रत्येक जिल्ह्यात, गावोगावी शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करणार (निदान ते काही महिन्यांत कोसळणार नाहीत याचे आश्वासन तरी द्यायचे) आणि मंदिरेही उभारणार. ती कोणत्या देवाची हे मात्र सांगितले नाही. मंदिरांमुळे सामान्य लोकांचा काय फायदा होणार? उलट त्यांचे खिसे हलके होणार आणि पुजाऱ्यांची धन होणार. त्याचा फायदा भाजपलाच मिळणार, हे लोक कधी ओळखणार, हा प्रश्नच आहे. कारण केवळ हिंदुत्वच तुम्हाला तारू शकेल हे त्यांनी अनेकांना पटवून दिले आहे. यामुळेतर आता त्यांचे कार्यकर्ते चेव येऊन मुसलमानांना चिडवण्याच्या अनेक युक्त्या वापरीत आहेत. काहीही करून त्यांनी विरोध करावा म्हणजे त्यांचा काटा काढता येईल हा विचार त्यामागे आहे. सुदैवाने अद्याप तरी मुसलमान या सापळ्यात सापडलेले नाहीत, त्यांनी जाणीवपूर्वक ते टाळले आहे. आणि यामुळेच कट्टर हिंदुत्ववादी अस्वस्थ झाले आहेत. ते निमित्त शोधत आहेत, आणि नाही मिळाले तर ते या ना त्या प्रकारे तयार करण्यात येईल. ती त्यांची रीतच आहे, हे आता सर्वांना माहीत झाले आहे, पण दुर्दैवाने विरोध करण्यासाठी कुणी पुढे येत नाही, कारण या लोकांना केंद्रसरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. अगदी पंतप्रधानही याला खतपाणी घालतात हे त्यांच्या “एक है तो सेफ है” या घोषणेवरून दिसून येते. म्हणजेच त्यांना देशातील एकजुटीने राहणाऱ्या समाजात फूट पाडायची आहे, हे लपून राहिलेले नाही, पण दुर्दैवाने महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातील लोकही आता याला बळी पडत आहेत. हे देशद्रोहाचेच कृत्य आहे, हे त्यांना उमगत नाही. जो विरोध करील त्याला कोणताही पुरावा नसताना देशद्रोही, शहरी नक्षलवादी म्हणणे सोपे आहे. ते सिद्ध करावे लागेल, पण त्यासाठी खूप काळ लागेल, हे ठाऊक असल्याने असे आरोप वारंवार केले जात आहेत. लोकांना भीती दाखवून आम्हीच तुमचे तारणहार हे पटवून देण्यात त्यांना यश आल्याचे या निवडणून निकालांवरून दिसून येते. देशासाठी ही धोक्याची घंटाच आहे.
याबरोबरच लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा नावाच्या पैशाची खैरात करणाऱ्या योजना जाहीर करून त्यांची अंमलबजावणीही सुरू करण्यात आल्याने काही नागरिकांना ती कृपाच वाटली. कारण त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नाला हा थोडाफार आधारच होता. पण महागाईमुळे हा पैसा कसा जातो, याची कल्पना त्यांना नव्हती आणि ती आली तरी पैशाला नाही म्हणणे त्यांना शक्य होत नसावे. कदाचित आलेल्या पैशाला, मग तो काळा असो वा कोणत्याही गैरमार्गाने आलेला असो, त्याला नाही म्हणायचे नाही, अशी त्यांना शिकवण असणार. अजित पवारांनी या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, तर शिंदे यांनी योजनेचे नावच मुख्यमंत्रांची लाडकी बहीण असे असल्याचे सांगून स्वतःकडे श्रेय घेतले. पण हा वाद फारसा न रंगता समजूतदारपणे दोघांनीही केवळ यांजनेचा महिलांना फायदा कसा आहे, त्यात वाढ कशी होणार आहे, निवडणुकीनंतर दोन महिन्यांचे पैसे कसे दिले जातील अशी साखरपेरणी केली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आमचाच पक्ष कसा मूळचा आहे, हे पटवून देण्यचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाने पक्षाचे घड्याळ हे चिन्ह त्यांनाच दिल्याने आणि न्यायालयाने त्यांच्या पात्रतेबाबतचा निकाल देण्याचे सतत लांबणीवर टाकून, या गटाचे काम सोपे केले. उलट शरद पवारांनी पक्ष मीच सथापन केला आणि आमचीच बाजू कशी बरोबर आहे, हे प्रत्येक सभेत लोकांना सांगितले. सभांना गर्दी चांगली असल्याने त्यांचा विश्वास दुणावला असणार. पण अनेकदा सभांना गर्दी झाली म्हणजे तिचे रूपांतर मतांत होते असे नाही. अगदी आचार्य अत्र्यांपासून अगदी मनसे पर्यंत याचा प्रत्यय अनेकांना आला आहे, हे ते कदाचित विसरले असावेत. काळ बदलला आहे. आता लोकांच्या निष्ठाही क्षणात, अर्थपूर्ण देवाणघेवाणीने बदलतात याचा विसर त्यांना पडला असावा. ते आपले आपली बाजू सत्याची कशी आहे, आपण स्वतः मंत्री असताना लोकहिताचे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे किती निर्णय घेतले, कर्जमाफी कशी केली या गोष्टींची उजळणी करत राहिले. पण त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही आणि नवमतदारांना तर याची जाणच नव्हती. त्यांची संख्या मोठी होती आणि लोकसभा निवडणुकीनंतर ती आणखी बरीच वाढली. नवमतदार त्यामुळे मतदानासाठी पात्र ठरले होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात हिंदुत्व विचाराच्या भूलथापांच्या प्रभावाने महायुतीलाच साथ दिली.
प्रत्यक्षात मतदान कसे झाले हे पाहता, भाजपला २६.७७ टक्के मते मिळाली पण त्यांना १३२ जागा मिळाल्या. शिंदे गटाला १२.३८ टक्के मतदारांनी कौल दिला आणि ५७ जागा मिळाल्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ९.०१ टक्के मते मिळाली, तरी त्यांना तब्बल चाळीस जागा मिळाल्या. उलट शिंदे गटापेक्षा थोडी जास्त, म्हणजे १२.४२ टक्के मते काँग्रेसला मिळाली पण जागा मात्र केवळ १६ मिळू शकल्या. उद्धव ठाकरे शिवसेनेला अजित पवार गटाहून जास्त म्हणजे ९.९६ टक्के मते मिळूनही जागा मात्र त्यांच्या निम्म्याने म्हणजे केवळ २० संपादन करता आल्या. शरद पवार गटाला तर ११.२८ टक्के प्राप्त झाली, पण अजित पवार गटाच्या टक्केवारीहून दोन टक्के जादा मते मिळूनही केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले. इतर पक्षांनाही १८-१८ टक्के मते मिळाली आणि जागा केवळ १२ पदरात पडल्या. अर्थात अशा आकडेवारीचा फारसा उपयोग नसतो. कारण आपल्याकडे मतांच्या टक्केवारीवर जागा मिळत नाहीत, तर मतदान कसे झाले त्यावर हे ठरते. त्यामुळे असे चित्र दिसते. दर वळी यावर काहीतरी उपाय योजला गेला पाहिजे असे बोलले जाते. चर्चा होते पण प्रत्यक्ष काहीच केले जात नाही.
गेल्या निवडणुकीत भाजपला १०५, एकत्र शिवसेनेला ५७, एकत्र राष्ट्रवादीला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपला २७ जागांचा फायदा झाला, तर काँग्रेसला २८ जागा गमवाव्या लागल्या. शिवसेनेचे दोनही गट मिळून ७७ जागा मिळाल्या म्हणजे त्यांचा २१ जागांचा फायदा झाला, तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना मिळून ५१ जागा मिळाल्या, म्हणजे त्याचा तीन जागांचा तोटा झाला. अर्थात या दोन गटांना कशा प्रकारे जागा मिळाल्या आहेत ते आपण पाहिलेच आहे. अपक्षांचेही काँग्रेसप्रमाणे नुकसान होऊन त्यांची संख्या २८ वरून बारावर आली आहे. मतदारांचाच हा कौल आहे. अर्थात निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वेळकाढूपणामुळे दोन्ही फुटीर गटांचा फायदाच झाला. कारण त्यांना मूळ पक्षाचे चिन्ह मिळाले. त्याचा फायदा नक्कीच झाला कारण आपल्याकडील अनेक मतदार केवळ चिन्ह बघून मत देणारे आहेत. त्यामुळे निष्ठा मूळ राष्ट्रवादी वा शिवसेनेशी असली तरी नकळत आणि सवयीने, त्यांचे मत घड्याळ आणि धनुष्यबाणालाच पडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ पक्षपातीपणा आणि दिरंगाईने या मूळ पक्षांचे यामुळे नक्कीच नुकसान झाले असावे. काँग्रेसच्या बाबतीत पुढाऱ्यांचा अहंभाव आणि निष्क्रियता, योग्य मुद्दे घेऊन प्रचार करण्याचा अभाव आणि केवळ राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यावरच विसंबून राहायचा ढिलेपणा त्यांच्या अंगाशी आला. त्यातच निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अभावही त्यांना जाणवला असणार. सांगण्यासारखे महागाई, बेरोजगारी, इतर राज्यांत जाणारे उद्योग, केवळ ठराविक उद्योजकांना दिली जाणारी कंत्राटे हे विषय ते योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवू शकले नाहीत.
लाडक्या भाऊबहिणींनी मिळालेल्या पैशाला जागून मतदान केले असण्याची शक्यता मोठी आहे. विकासाच्या नावावर मते मिळाली, हे महायुतीचे म्हणणे पटण्यासारखे नाही, कारण तो अद्यापही कुठे दिसत नाही, मग त्याचे फायदे मिळणे दूरच. मात्र लोकांना भरमसाठ आश्वासने देऊन ऐदी आणि लाचार बनवण्याच्या योजना उभय प्रतिस्पर्ध्यांनी अहमहमिकेने जाहीरनाम्यातून सांगितल्या. त्यांमुळे राज्याची अर्थव्यवस्था काय होईल, याचा विचार मात्र दोघांनीही केलेला दिसला नाही. राज्यावर आधीच साडेसात लाख कोटींचा कर्जाचा भार आहे, तो वाढण्याचीच शक्यता आहे आणि तसे झाले तर सारी अर्थव्यवस्थाच कोलमडू शकते हा धोका अद्याप कुणीच ध्यानात घेतलेला दिसत नाही. केवळ तसे काही होणार नाही, तशी वेळच आम्ही येऊ देणार नाही, असे ते आज सांगत आहेत. प्रत्यक्ष काय होते ते जनता पाहीलच. पण त्यावर काही करणे त्यांच्या हातात नाही. आणि विरोधात बोलले तर देशद्रोही वा शहरी नक्षलवादी ठरण्याचा धोका आहे, तो कोण पत्करील, हा प्रश्नच आहे.
या निवडणुकीचा हाच धडा आहे. मतदारांच्या हाती केवळ जे जे होईल ते पाहात राहावे, एवढेच असणार आहे. कारण त्यांनीच या लोकांकडे सत्ता दिली आहे. त्यामुळे त्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्याचा मार खाणाऱ्यांची आहे. केवळ स्वतःला दोष देत राहाणे एवढेच ते करू शकतात.
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Tags: maharshtra vidhan sabha महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 निवडणूक निकाल फडणवीस भाजप कॉंग्रेस Load More Tags
Add Comment