हा हंत हंत...

...मात्र ही विश्वचषक स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी संस्मरणीय झाली. अनेक विक्रम नोंदले गेले आणि त्यात भारताचे खेळाडू आघाडीवर होते.

सामाजिक माध्यमांतील कवित्वही नोंद घ्यावी असेच होते. एकाने म्हटले की, स्टेडियमचे नाव बदलले असून जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भारत पराभूत झाला आहे. तर दुसऱ्याने म्हटले शतक नोंदवून भारताच्या पराभवाला कारण ठरलेल्या हेडच्या घरावर ईडीची धाड! आणखी एक जण म्हणाला की, 'इंडिया' हरल्याने अनेकांना हर्ष झाला असून आगामी घटनांची ही नांदी ठरावी असे त्यांना वाटत आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर एकदम आठवण झाली ती एका संस्कृत श्लोकाची. 'हा हंत हंत नलिनीं गजमुज्जहार', ही त्याची शेवटची ओळ. कमळात अडकलेला भुंगा स्वप्न पाहत असतो... लवकरच रात्र संपून सूर्योदय होईल, त्याला पाहून कमळ हास्यमुखाने पुन्हा उमलेल आणि अर्थातच आपली सुटका होईल. पण हाय रे दैवा, त्या हत्तीने ते कमळच उखडून टाकले. असा तो श्लोक. आणि तो आठवण्याचे कारण म्हणजे काही कोटी लोक गेले सहा आठवडे भारतीय संघ यावेळी नक्कीच विश्वचषक जिंकणार, असे स्वप्न बघत होते, त्यांचे ते स्वप्न रविवारी 19 नोव्हेंबरला अहमदाबादमधील भव्य स्टेडियमध्ये लाखभर क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने ऑस्ट्रेलियन संघाने उद्ध्वस्त केले.

तसे पाहिले तर इतर अनेक स्पर्धांप्रमाणे ही देखील आणखी एक स्पर्धा. पण आयोजक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, स्पर्धेचे पुरस्कर्ते, जाहिरातदार, क्रीडासाहित्य निर्माते, दूरचित्रवाणी आणि अन्य प्रसारमाध्यमांसह इतरांनी स्वतःच्या फायद्यासाठी अगदी जाणीवपूर्वक अशी वातावरणनिर्मिती, स्पर्धेअगोदर कित्येक महिने अगोदरपासून सुरू केली होती. आणि विविध प्रकारची तर्कटे लढवून यावेळी भारतच ही स्पर्धा जिंकणार असा प्रचार केला जात होता, कित्येक कोटींच्या फायद्यासाठी. आपल्या भाबड्या चाहत्यांना ते खरे वाटत होते. क्रिकेट हा या देशातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. आणि आपले लोक खेळावर प्रेम करत नाहीत, तर व्यक्तिपूजेचीच सवय असल्याने आपल्या खेळाडूंवरच जास्त प्रेम करतात, हे सर्वज्ञात असल्याने त्याचा फायदा उठवण्यासाठीच तर ही खेळी खेळली गेली होती आणि त्यात फक्त भारतीय संघाचे चाहते सोडून सगळेच यशस्वी झाले. चाहत्यांच्या पदरी मात्र घोर निराशाच आली.

अनेक क्रिकेट चाहते हे केवळ चाहते असतात. खेळाचे जाणकार नाही. आपल्या आवडत्या संघाचा विजय ही कल्पनाच त्यांना भुरळ घालते. कोणताही सामना म्हटला की कुणीतरी जिंकणार आणि दुसरा हरणार हे तसे माहीत असले, तरी पटत नाही. त्यामुळे आणि वर सांगितलेल्या जाहिरातबाजीमुळे चाहत्यांच्या संघाबद्दलच्या अपेक्षा वारेमाप वाढलेल्या असतात. त्यामुळेच पराभवाचा धक्का सहन करणे जड जाते. त्यातच यावेळी भारताच्या संघाचा खेळ प्रथमपासूनच अफलातून होता. आणि साखळीचे नऊ सामने जिंकल्यावर उपान्त्य सामनाही त्याने जिंकला होता.

अर्थातच त्याच्याबाबतच्या अपेक्षाही त्या विजयांच्या मालिकेबरोबर वाढत गेल्या होत्या. 12 वर्षांनी पुन्हा विश्वविजेतेपद हा संघ मिळवणार, 2003 मधील अंतिम सामन्यातील ऑस्ट्रेलियाने केलेल्या पराभवाचे उट्टे काढणार, तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकणार असे केवळ बोलले जात नव्हते, तर तशी जणु काही खात्रीच या चाहत्यांना वाटायला लागली होती. आता आपणच विजेते ही भावना सर्वत्र होती. आपल्या खेळाडूंनी कितीही नाही म्हटले, तरी त्यांच्याही नकळत त्यांच्या मनावर हे अपेक्षांचे ओझे असणारच. आणि त्या अपेक्षांच्या जड झालेल्या ओझ्याचाच भार बहुधा त्यांना पेलला नसावा. 10 विजयांच्या मालिकेतील विजयी लय अंतिम फेरीत अचानक त्यांना सोडून गेली असेच चित्र दिसले. आधीच्या सामन्यांत त्यांच्यात दिसलेला आत्मविश्वास त्यांना सोडून गेला असावा असे त्यांचा अंतिम सामन्यातील खेळ पाहताना वाटत होते.

अंतिम सामन्यात खरे तर डावाची सुरुवात जोमाने झाली होती. शुभमन गिल लवकर बाद झाला तरी पहिल्या दहा षटकांत दोन बाद 80 धावा अशी स्थिती होती. पण त्याच दहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. हेडने मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर त्याचा अप्रतिम झेल घेतला होता. आणि तेथून एकूणच रंग बिघडत गेला. पुढच्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर श्रेयस अय्यर परतला. विराट कोहलीने के. एल. राहुलच्या साथीने 67 धावांची भर घातली पण त्यासाठी 18 षटके घेतल्याने धावगती खूपच मंदावली होती. नंतर अखेरपर्यंत ती सुधारली नाही आणि भारताचा डाव 240 धावांवर आटोपला. विराट कोहली आणि राहुल यांची अर्धशतके यांमुळे ही मजल तरी गाठता आली होती. स्पर्धेत हा संघ सर्वबाद होण्याची ही पहिलीच वेळ होती.

ऑस्ट्रेलियासाठी हे आव्हान तसे मोठे नव्हते, हे खरे. पण भारतीय गोलंदाजांची स्पर्धेतील कामगिरी पाहता प्रतिस्पर्ध्यांना ते अवघडच जाईल, असे वाटत होते. पण ऑस्ट्रेलियाने चांगला गृहपाठ केला होता, हे त्यांच्या खेळावरून दिसून आले. त्यांचे पहिले तीन गडी - वॉर्नर, मार्श आणि स्मिथ लवकर बाद झाले, तरी त्यांनी या जलद गोलंदाजांच्या माऱ्याला योग्य प्रकारे तोंड दिले. विजयासाठी आवश्यक धावगती ठेवली. त्यामुळेच सात षटकांत त्यांनी 47 धावा केल्या होत्या.आणि चौथ्या विकेटसाठी हेडच्या जोडीला लबुशेन आल्यावर हा वेग कायम तर राहिला होताच पण नंतर त्यांचा जम बसल्यावर तो हळूहळू वाढतच गेला.

अतिशय योजनाबद्ध प्रकारे खेळताना या जोडीने भारतीय गोलंदाजांना कोणतीच संधी दिली नाही. त्यांनी मोठ्या फटक्यांच्या म्हणजे चौकार, षटकारांच्या मागे न लागता संयमाने एक-एक धाव घेत धावफलक सतत हलता ठेवला आणि भारतावरचा दबाव वाढवला. मोठा लौकीक असलेल्या भारताच्या फिरकीला योग्य पद्धतीने तोंड दिले. त्यांच्या भागीदारीने शतक पुरे केल्यावर मात्र हेड त्याच्या नेहमीच्या आक्रमक धाटणीत खेळला. आणि शतक पार केल्यावर तर त्याने आणखीच आक्रमक खेळ केला. 15 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 120 चेंडूंवर 137 धावा करून विजयासाठी केवळ दोन धावा हव्या असताना तो बाद झाला. मॅक्सवेलने त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विजय नोंदवला. सहा गडी आणि सात षटके राखून ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतील सहावे तर या शतकातील सहा स्पर्धांत चौथे जेतेपद मिळवले. 

अहमदाबादच्या भव्य स्टेडियममधील साधारण लाखभर प्रेक्षक अवाक् झाले होते. विजयी संघाला दाद देण्याचे भानही त्यांना काही काळ नव्हते. सर्वत्र सन्नाटा पसरल्याप्रमाणे वाटत होते. तसे पाहता हे साहजिकच. कारण प्रेक्षक हौशी जास्त आणि खेळाचे जाणकार कमी. मनोरंजनासाठी आलेलेच जास्त. त्यांच्यासाठी हवाई दलाचे संचलन (त्याचा खर्च कोणी केला, या प्रश्नाचे उत्तर मिळालेच नाही.), लेझर शो, गाणीबजावणी आणि नेहमीचे शोभेचे दारूकाम हे होतेच. शिवाय देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, परदेशी पाहुणे, लोकप्रिय चित्रपट कलाकार यांचीही उपस्थिती होतीच. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असणार.

तर अशा प्रकारे मोठ्या अपेक्षाभंगाने स्पर्धेची सांगता झाली. आपल्या विजयाची खात्री असल्यानेच बड्या असामी आल्या होत्या पण त्यांनाही आपल्या संघाच्या पराभवाने निराश व्हावे लागले. संघ विजयी झाल्यावर त्याच्याबरोबर मिरवण्याची त्यांची मनीषा अपुरीच राहिली. आणि आपण उपस्थित असल्यानेच संघ विजयी झाला असे सांगून आपले महत्त्व वाढवण्याची संधीही हुकल्याची हळहळ त्यांना नक्कीच वाटली असणार. (आणि तीन राज्यांच्या निवडणूक प्रचारात त्याचा लाभ आता मिळणार नाही, हेही निराशेचे आणखी एक कारण असणार.) 

काहीही असले, तरी ही विश्वचषक स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी संस्मरणीय झाली याबाबत दुमत नाही. अनेक विक्रम नोंदले गेले आणि मुख्य म्हणजे त्यात भारताचे खेळाडू आघाडीवर होते. अंतिम सामन्यात प्रवेश करण्याआधी एकही सामना न गमावण्याचा विक्रम भारतीय संघाने केला. स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा, एकदिवसीय सामन्यांतील पन्नासावे शतक नोंदवून तेंडुलकरचा विक्रम मागे टाकणारा, स्पर्धेत पाच अर्धशतके नोंदणारा आणि स्पर्धेचा मानकरी ठरण्याचा, असे विक्रम विराट कोहलीने नोंदले; तर सर्वाधिक षटकारांचा विक्रम कर्णधार रोहित शर्माने केला. महमद शमीने स्पर्धेत सर्वाधिक 24 बळी मिळवण्याचा, तसेच एका डावात सात गडी बाद करण्याचा विक्रम नोंदवला. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हस हेडने उपान्त्य आणि अंतिम सामन्यात 'सामन्याचा मानकरी' हा मान मिळवला, (1983 च्या स्पर्धेत मोहिंदर अमरनाथनेही असा विक्रम केला होता.) तर ग्लेन मॅक्सवेलने विश्वचषक स्पर्धेत प्रथमच द्विशतकाची नोंद करण्याचा पराक्रम नोंदवला. दक्षिण आफ्रिकेच्या यष्टीरक्षक डिकॉकने 20 गडी बाद करण्यात सहभाग नोंदवला तर न्यूझीलंडच्या मिचेलने सर्वाधिक 11 मैदानी झेल घेतले.


हेही वाचा : ‘त्या’ बंदुकीच्या गोळ्यांपासून दागिने बनवतात - आ. श्री. केतकर


अनेक अनपेक्षित निकाल या विश्वचषक स्पर्धेत पाहण्यास मिळाले. पहिल्याच सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला न्यूझीलंडने जबरदस्त धक्का दिला. त्यानंतर सावरण्यास इंग्लंडला बराच काळ लागला. दरम्यान त्यांनी सहा सामने गमावले. पण अखेर सातवा क्रमांक मिळवून त्यांनी जेमतेम आपली अब्रू वाचवली. मात्र अफगाणिस्ताननेही त्यांच्या वरचे स्थान मिळवले ही खंत त्यांना दीर्घकाळ जाणवणार. अफगाणिस्तानचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अलीकडेच या स्पर्धेत स्थान मिळवणाऱ्या या संघाने चार सामने जिंकले. शिवाय ऑस्ट्रेलियालाही झुंजवले. केवळ मॅक्सवेलच्या अचाट 201 धावांच्या खेळीनेच अफगाणिस्तानला पराभव पत्करावा लागला होता. नेदरलंडने म्हणजे हॉलंडनेही दोन विजय नोंदवले, त्यात त्यांनी द. आफ्रिकेवर मिळवलेला विजय ऐतिहासिकच म्हणावा लागेल. भारताने पराभव केल्यानंतर पाकिस्तान भरकटत गेल्यासारखाच झाला, जणू काही त्यांची जिद्द, झुंजार वृत्ती त्यांना सोडूनच गेली होती. न्यूझीलंडच्या पदरी मात्र पुन्हा एकदा निराशाच आली. द. आफ्रिकेप्रमाणेच उपान्त्य फेरी गाठण्यात त्यांनीही यश मिळवले होते. पण त्या सामन्यात मात्र त्यांनी फारसा प्रतिकार न करताच शरणागती पत्करली. त्यांच्या सात फलंदाजांना बाद करणाऱ्या शमीची प्रभावी गोलंदाजीच याला कारणीभूत होती.

तर स्पर्धेतील या महत्त्वाच्या नोंदी. पण नंतर सामाजिक माध्यमांतील कवित्वही नोंद घ्यावी असेच होते. एकाने म्हटले की, स्टेडियमचे नाव बदलले असून जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भारत पराभूत झाला आहे. तर दुसऱ्याने म्हटले शतक नोंदवून भारताच्या पराभवाला कारण ठरलेल्या हेडच्या घरावर ईडीची धाड! आणखी एक जण म्हणाला की, 'इंडिया' हरल्याने अनेकांना हर्ष झाला असून आगामी घटनांची ही नांदी ठरावी असे त्यांना वाटत आहे.

एक विचार मनात आला. 1936 च्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये आर्यांचे वर्चस्व सिद्ध करू पाहणाऱ्या हिटलरला जेसी ओवेनने चार सुवर्णपदकांची कमाई करून नामोहरम केले होते. यावेळीही आयोजकांची आणि महान नेत्याची तशी इच्छा असणे सहज शक्य आहे. एरवी एवढा बडेजाव करण्याचे कारणच काय होते. निवडणुकीत याचा लाभ मिळेल अशी सुप्त इच्छाही त्यामागे असणारच. कारण कोठेही आपलीच छबी झळकावण्यात गर्क असणाऱ्यांना बाकी काय वाटणार?

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक, ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: cricket team India virat kohali Load More Tags

Add Comment