माणसाच्या मनात विज्ञानविवेकाचा उजेड पडावा म्हणून...

संजीव कुलकर्णी लिखित 'शास्त्रकाट्याची कसोटी' या पुस्तकाचा परिचय

'पायलट स्टडी' या मनोगतात लेखक आपल्याला सांगतो, “विज्ञानाचा ध्यास हे सोपे काम नाही. ते लोकप्रिय काम तर नाहीच नाही. विज्ञान आपल्याला प्रश्न विचारायला शिकवते. समाजाला प्रश्न विचारणे आवडत नाही. विज्ञान आपल्याला विचार करायला शिकवते. समाजाला विचार करणे तरी आवडते की नाही कुणास ठाऊक! मग हे सगळे का करायचे, तर त्याचे उत्तर जॉर्ज मलरी यांनी देऊन ठेवले आहे. 'बिकॉज इट इज देअर!' विज्ञानाचा ध्यास असल्यामुळेच लेखकाने विज्ञानाचे महत्त्व लोकांच्या ध्यानात यावे, म्हणून हे लेखन केले आहे.

जाऊ दे कार्पण्य 'मी'चे
दे धरू सर्वांस पोटीं 
भावनेला येऊ दे गा
शास्त्रकाट्याची कसोटी

- बा. सी. मर्ढेकर

डॉ. संजीव कुलकर्णी यांच्या 'शास्त्रकाट्याची कसोटी' या कथासंग्रहाच्या सुरुवातीलाच या काव्यपंक्ती आहेत. त्यावरूनच लेखकाला आपल्या कथांतून काय सांगायचे आहे, ते स्पष्ट होते. मलपृष्ठावर 'ब्लर्ब'मध्ये म्हटले आहे की, "निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती म्हणजे विज्ञान आणि निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचीती आणि उपाययोजन ही विचारशृंखला म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार हा ऐच्छिक मामला नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 (अ) नुसार ठरवण्यात आलेल्या भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांत प्रत्येक भारतीयाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून चिकित्सक व सुधारक व्हावे, असे म्हटले आहे.

“मात्र प्रत्यक्षात अंधानुकरण आणि गतानुगतिकता माणसाने आजही सोडलेली दिसत नाही. प्रश्न विचारणे म्हणजे औधत्य, चिकित्सा म्हणजे बंड, कारणमीमांसा म्हणजे अवज्ञा, असे मानण्याची आजही अनेकांची मनोवृत्ती आहे. समाजाच्या या एका मोठ्या वर्गाचा विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त उपेक्षापूर्णच नव्हे, तर उपहासपूर्ण असलेला दिसतो. हे अस्वस्थ करणारे चित्र आहे” असे सांगून पुढे म्हटले आहे की, “ 'शास्त्रकाट्याची कसोटी' या विज्ञानकथा संग्रहातील कथा माणसाच्या मनात विवेकविज्ञानाचा उजेड पडावा या आशेतून लिहिल्या आहेत". लेखकाची भूमिका यामुळे स्पष्ट झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत विज्ञानावरील निष्ठा ढळू द्यायची नाही, ही त्याच्या वडिलांची शिकवण आहे. आणि तिला तो पुरेपूर जागला आहे, हे या कथा वाचताना जाणवत राहाते.

अनेकांच्या मनात विज्ञान म्हणजे काय, असा प्रश्न असतो, त्याचे अगदी सोपे उत्तर विनोबांनी दिले आहे. ते म्हणतात, 'विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान' यातील विशेष हा शब्द महत्त्वाचा. कारण त्यामुळेच विज्ञानाचे मोठेपण सहज कळते... समाजाच्या एका मोठ्या वर्गाचा विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त उपेक्षापूर्णच नाही तर उपहासपूर्ण असलेला दिसतो. हे लेखकाला अस्वस्थ करते. स्वार्थीपणा, बेदरकार वृत्ती आणि हाताला लागेल ते ओरबाडून घेण्याच्या वृत्तीने पर्यावरणाचे आणि पर्यायाने आपले अपरिमित नुकसान होते आहे. विनाशाच्या उंबरठ्यावर असलेल्या मानवजातीला तारण्याचे सामर्थ्य फक्त विज्ञानाकडेच आहे. हे हा संग्रह वाचताना पदोपदी जाणवत राहते.

दुसरे म्हणजे, या कथासंग्रहातील दहा कथांत वेगवेगळे विषय लेखकाने हाताळले आहेत, आणि प्रत्येक कथेमध्ये शास्त्राच्या वेगळ्या शाखेचा आधार घेत त्याने कथा साकारली आहे. अर्थातच या कथा एका साच्यातल्या वाटत नाहीत. त्यामुळे संग्रहामध्ये वैविध्य आले आहे. दर कथेने आपल्याला काहीतरी नवे शिकवले, असे वाचकाला वाटते. कारण या कथांमुळे त्याला अनेक शास्त्रे माहीत होतात. त्यांपैकी काहींची माहिती करून घ्यावी, असा विचार त्याला करावासा वाटला, त्यांबाबत अधिक जाणून घ्यावे असे वाटले, तर लेखकाचा हेतू साध्य झाला, असे म्हणता येईल. कारण कोणत्याही बाबीकडे वाचक वेगळ्या, चिकित्सक, शोधक दृष्टीने पाहू लागेल.

प्रस्तावनेत डॉ. अंजली चिपलकट्टी यांनी म्हटले आहे की, “करोनासारख्या महासंकटातून बाहेर पडता पडता पदरात आलेलं शहाणपण ही या कथांची पार्श्वभूमी आहे. विविध देशांच्या विविध विषयांच्या तज्ज्ञांनी आणि नेत्यांनी परस्पर सहकार्य करत आणि तंत्रज्ञानाचा तारतम्यानं सुयोग्य वापर केला तर अनेक जागतिक समस्या सोडवता येतील, असा दुर्दम्य आशावाद सर्व कथांमधून पाझरतो. काहीवेळा तो 'युटोपिया' वाटावा इतका जास्त आहे. पण अशा स्वप्न बघण्याची गरजही आहे. कारण 'डूम्स डे' (जगाचा सर्वनाश) जवळ येऊन ठेपला आहे, तर आता काहीही करून उपयोग नाही अशी उपहासात्मक, निराशावादी भूमिका घेणाऱ्यांपेक्षा धडपडणारी आणि बदल घडवून दूरचं स्वप्न बघणारी पिढी घडवणं हे कालसुसंगत आहे".

'पायलट स्टडी' या मनोगतात लेखक आपल्याला सांगतो, “विज्ञानाचा ध्यास हे सोपे काम नाही. ते लोकप्रिय काम तर नाहीच नाही. विज्ञान आपल्याला प्रश्न विचारायला शिकवते. समाजाला प्रश्न विचारणे आवडत नाही. विज्ञान आपल्याला विचार करायला शिकवते. समाजाला विचार करणे तरी आवडते की नाही कुणास ठाऊक! मग हे सगळे का करायचे, तर त्याचे उत्तर जॉर्ज मलरी यांनी देऊन ठेवले आहे. 'बिकॉज इट इज देअर. !' विज्ञानाचा ध्यास असल्यामुळेच लेखकाने विज्ञानाचे महत्त्व लोकांच्या ध्यानात यावे, म्हणून हे लेखन केले आहे. विज्ञानकथेतल्या विज्ञानाइतकीच तिच्यातली रंजकता त्याला महत्त्वाची वाटते. कारण विज्ञानासाठी निव्वळ वैज्ञानिक लेखन केले, तर त्याने विज्ञानाची प्रगती आणि प्रसार होईल. पण तसे लेखन लोकांपर्यंत जाणार नाही." म्हणून डॉक्टर म्हणतात की, “आजच्या समाजाला विज्ञानाची एखादी गोळी लागू पडायचीच असेल, तर औषध कणभर आणि साखर मूठभर अशी ती असलीच असावी लागेल. रंजकतेचे गणित सांभाळायचे म्हटले की कथेत तपशील, व्यक्तिरेखा, प्रसंग, संवाद हे सगळे घालणे आले. पण तसे केले की मग कथा गोळीबंद राहत नाही. या सगळ्या तारेवरच्या कसरतीतून जे हाती आले, ते या पुस्तकाच्या रूपाने वाचकांच्या हाती देताना मला आनंद होत आहे.” मुद्दाम सांगायला हवे की तारेवरच्या या कसोटीला या कथा पुरेपूर उतरल्या आहेत...

जंगली हत्तींचे गावांत-शेतांत आक्रमण, माणसांवर हल्ले, त्यात कितीजण दगावले, रेल्वेच्या धडकेने हत्ती दगावले अशा बातम्या अलीकडे वारंवार वाचनात येत असतात. यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आक्रमणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पाय आपटून जमिनीतून जे संदेश हत्ती ध्वनिलहरींद्वारे एकमेकांना पाठवतात, ते संदेश आपल्याला वाचता येतील का, तसे संदेश आपल्याला तयार करता येतील का, यादृष्टीने केलेले प्रयत्न; त्यात आलेले यश आणि त्याच्या वापराने ठराविक भागात येण्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा यशस्वी प्रयत्न सांगणारी सुरुवातीची 'वाजे पाऊल आपुले' ही कथा आहे. प्राणीशास्त्राचा अभ्यास आणि ध्वनिलहरींबाबतचे संशोधन यांची सांगड घालून केलेल्या प्रयोगांत संशोधकांना यश मिळते. पण लेखक येथे कथा न संपवता गोगटेंचे विचार करायला लावणारे उद्गार सांगतो.

"हत्तीची जागा देऊळ नाही, तर जंगलच आहे. या हत्तींना इथून हाकलून दे, तिथून हाकलून दे, असं करत राहिलं, तर त्यांचा अधिवास आक्रसत जाईल. त्यांना जंगलाच्या एका तुकड्यात बंदिस्त करून सुरक्षित ठेवता येईल. पण हे अनैसर्गिक आहे. त्याने निसर्गाबाबतची बेफिकिरी कमी करता येणार नाही. हत्ती जातभाईंना सावध करतात. पण आपण माणसाला सावध करू शकत नाही, याचं शल्य जास्त जाणवायला लागलं आहे. म्हणून मी समाधानी नाही.” असे डेप्युटी कॉन्झव्हेंटर ऑफ फॉरेस्ट गोगटे, सेस्मॉलॉजी तज्ज्ञ डॉक्टर पाठारेंना सांगतात.” आणि इथे ही कथा संपते. 

माशाची उलटी सापडल्यामुळे कुणाकुणाला अटक, शिक्षा झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचतो. या उलटीची किंमत काही लाखांत असल्याचेही बातमीत म्हटलेले असते. पण या स्पर्म व्हेलच्या उलटीला एवढे महत्त्व का, हे फारच थोड्या लोकांना ठाऊक असते. त्या उलटीला प्रचंड मोल असते, ते का असते, आणि त्याच्या हव्यासाने होणारी या माशांची हत्या कशी थांबवता येईल, हा 'प्रथमावतार' या कथेचा विषय आहे. एका गाडीची तपासणी करताना पोलिसांना अतिशय दुर्गंधी आल्याने, त्या गाडीच्या चालकाकडे चौकशी होत असतानाच तो पळून जायचा प्रयत्न करतो, पण गाडी खड्डयात अडकल्याने तो फोल ठरतो. तपास करताना गाडीच्या डिकीत मळकट कापडाच्या बोचक्यात असलेले दोन गोळे पडतात. त्यातूनच भयानक दुर्गंधी येत असते. ते गोळे उलटीचे असतात. येथून कथा आकार घेऊ लागते. नंतर त्याबाबत माहिती मिळत जाते. म्हणजे उलटी हा काय प्रकार असतो, त्याचा उपयोग अनेक महागड्या सुगंधी पदार्थांच्या निर्मितीत, तसेच कामोत्तेजके तयार करण्यासाठी केला जातो. आणि त्यामुळेच उलटीला जास्त मोल असते हे आपल्याला कळते. तिला 'अँबरग्रीस' असे नाव आहे. व्हेलच्या शरीरातून ते उलटीवाटे बाहेर पडते की विष्ठेवाटे हे अद्याप उलगडलेले नाही. पण बाहेर पडल्यावर त्याचे गोळे समुद्रात तरंगत असतात. स्पर्म व्हेलच्या खाद्यातील न पचलेल्या भागाचे हे गोळे असतात. काही माणसांच्या पोटात तयार होणाऱ्या पित्ताच्या खड्यांप्रमाणे हे अँबरग्रीस तयार होते.

डॉ. संजीव कुलकर्णी 

तस्कर असे स्पर्म व्हेल मासे बरोबर शोधून त्यांची शिकार करतात. त्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर (जवळपास 80 टक्के) घटते. शास्त्रज्ञांना याबाबत चिंता वाटू लागल्याने यावर उपाय शोधायचा ते प्रयत्न करतात. अखेर त्यात यश मिळवतात. आणि स्पर्म व्हेल्सची संख्या वाढते आणि (शिकारीत न दगावल्याने) स्पर्म व्हेलना नैसिर्गक मरण येऊ लागते. अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितलेल्या या कथेत आपल्याला अनेक शास्त्रीय गोष्टींची माहिती मिळते. स्पर्म व्हेल्समध्ये ही उलटी अर्थात अँबरग्रीस मुळात तयारच होऊ नये यासाठी ते शास्त्रज्ञ प्रयत्न करतात. त्यांना यश कसे येते, त्यांनी शोधलेला उपाय काय असतो, ते समजण्यासाठी कथा वाचायला हवी.

हवामानात होणारे बदल आणि पर्यावरणाचा होत असलेला हास, यामुळे सारे जगच संकटात आले आहे. कुठे प्रचंड दुष्काळ तर कुठे महाभयंकर पूर यामुळे आजवरची निसर्गाची घडीच बिघडली आहे. त्यामुळे अन्नधान्याची टंचाई टाळण्यासाठी त्याचा अपव्यय टाळणे, तशी शिस्त सर्वांनाच लावणे खास करून गरीब समजल्या जाणाऱ्या देशांमध्ये तर याची विशेषच गरज आहे. कारण एकूण वाया जाणाऱ्या अन्नधान्याचे प्रमाण एवढे मोठे आहे की, त्यांत काही देशांची या बाबतीतील गरज भागवता येईल. पाण्याबाबतही अशी दक्षता घ्यावी लागणार आहे. असे केले तर काहीशी सुरक्षितता लाभेल. पण मूळ प्रश्न सुटणार नाही, हे ध्यानात घेऊन उपाययोजना सुरू होते आणि त्याचे फायदे दिसू लागतात.

ही कृत्रिमरीत्या एल निनो जागृत करायची योजना जागतिक पातळीवर राबवली जाते. त्यासाठी पाण्याचे तापमान वाढावे म्हणून अणुभट्ट्यांतील कचरा मोठ्या नळकांड्यांत भरून त्या संयुक्त आरमारी कारवाईद्वारे युद्धनौकांच्या मदतीने सुरक्षितपणे पॅसिफिकच्या तळाशी सोडल्या जातात. मात्र यात तेथील जैवसाखळीला धोका पोहोचू नये अशी खबरदारीही घेण्यात येते. त्याचा फायदा कसा होतो आणि नंतर ती धोकादायक नळकांडी पुन्हा बाहेर काढून जमिनीत खोलवर पुरली जातात. या साऱ्या योजनांमध्ये होणारे फायदे सर्वांनाच कळतात. माणसाचा निसर्गाबद्दलचा, नैसर्गिक संसाधनांबद्दलचा आदर पुन्हा प्रस्थापित करायची ही फक्त सुरुवात आहे असे शेवटी सांगणारी 'बाळ येशू' ही कथा आहे. एल निनो याचा स्पॅनिश भाषेतील अर्थ लहान मुलगा. पॅसिफिक महासागरात ख्रिसमसच्या आधी जागृत होणारा हा उष्ण पाण्याचा प्रवाह, म्हणून त्याला बाळ येशू असंही म्हणतात. अन्नपाण्याची नासाडी टाळण्याचा संदेशही ही कथा देते.


हेही वाचा : वैज्ञानिक सत्य - विनोद शिरसाठ


मानवाला अन्नाची गरज असतेच पण त्याबरोबर ते सकस असायला हवे. तरच त्याचा उपयोग होतो. मुख्य वाटा प्रथिनांचा, पण नेमकी त्याचीच कमतरता असल्याने कुपोषितांची संख्या वाढते आहे. 'बायोलॉजिकल फूडस' ही प्रथिनांची सिंगल सेल प्रोटीन्स, मोठ्या प्रमाणात निर्मिती करणारी कंपनी. यासाठी जैवतंत्रज्ञान वापरून विकसित केलेले खास बॅक्टेरिया जिवाणू, विशिष्ट प्रकारचं शेवाळ वापरण्यात येते. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते जिवाणूंसाठी खाद्य बनवतात. मुख्य म्हणजे कचरा आणि सांडपाण्याचा पुनर्वापर करून प्रदूषण नियंत्रणही केले जाते. पण जिवाणू आणि शैवालांची वाढ हळू होते, शिवाय या प्रथिनांमुळे कालांतराने लोकांना आजार होत होते. ते टाळण्यासाठी उपाय असलेल्या, पूर्ण वाढलेल्या जिवाणूंमधून न्यूक्लिइक अ‍ॅसिड वेगळे करण्यासाठी मोठा खर्च होत होता. ही त्यांची महत्त्वाची अडचण. त्यामुळे त्यांच्या भरभराटीला मर्यादा आल्याने ते पर्याय म्हणून कीटकांचा वापर करण्याचा बेत करतात. 'इन्सेक्टा नरिशमेंट्स' याच्याच मदतीने प्रथिने तयार करतात. जिवंत कीटकांची अगणित संख्या म्हणजे दहावर अठरा शून्ये, दहा क्विंटिऑन आणि जगात एकूण 1900 प्रकारचे कीटक खाल्ले जातात, अगदी आपल्या देशातही. यात अडचण एकच. कीटकनाशकांचा वापर. कारण मग कीटकांमध्ये त्याचे अंश येऊन ते खाणे घातक बनते. त्यावरही मात करून प्रथिनांची निर्मिती केल्याने कंपनीची प्रचंड भरभराट होते. परंतु कंपनीचे प्रमुख तांत्रिक अधिकारी, कीटकशास्त्रज्ञ रिधिमान घोषाल मात्र राजीनामा देतात. का? ते 'तुम्हा कोण म्हणे दुर्बळ बिचारे' ही गोष्ट वाचल्यावरच कळेल.

कथांची साधारण कल्पना यावी म्हणून या कथांबाबत लिहिले. बाकी कथाही अशाच खिळवून ठेवणाऱ्या आणि काही गोष्टींचे महत्त्व पटवून देणाऱ्या आहेत. त्यांच्याबाबत थोडे. 'दिखाई दिए यूँ' ही एका उत्पादनाचा खप वाढवण्यासाठी यश न आल्याने, एका तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार उपाय योजल्याने कसे प्रचंड यश मिळते ते सांगणारी कथा आहे. व्यक्तीच्या अचेतन मनात एक बीज सोडल्यावर ते योग्य वेळी अंकुरते आणि ठराविक गोष्टी करायला, या संदर्भात खरेदी करायला प्रवृत्त करते. या मानसशास्त्रावर आधारित तंत्राचा वापर यात आहे. शास्त्र, विज्ञान हे ठराविक मर्यादेपर्यंतच काय होईल याचा अंदाज सांगतील, पण माणसाचा मेंदू आणि मन कसा विचार करू शकेल हे विज्ञानालाही तंतोतंत सांगता येत नाही, हे सांगणारी 'पेल्टझमन हरतो तेव्हां' ही कथा आहे. डोकेदुखी, गॅसेस, जुलाब, मलावरोध, रक्तदाब वाढणे, चर्मरोग, इ. सगळ्याचे कारण मानसिक आजार हेच असते. पण त्यावर योग्य उपचार केल्यास ते बरे होतात, हे 'मन काळोखाची गुंफा' या कथेमुळे कळते. ब्रह्मांडाचा विस्तार आणि मानवी मूर्खपणा या अमर्याद म्हणाव्या अशा दोनच गोष्टी आहेत. मानवी प्रतिभा आणि विकृतीही याच गटातल्या. पण विकृत हेतूंचा पाडाव करायलाही विज्ञानाचा उपयोग होतोच. तो कसा, ते 'शठे शाक्यं समाचरेत' या कथेत सांगितले आहे. 'भक्ष्य' ही कथा गिधाडांच्या पुनर्वसनाचे, त्याबरोबरच मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची निश्चित व्यवस्था का हवी आणि माणसांनी काही सवयी बदलायला पाहिजेत हेही सांगते. आजच्या खाद्यतेलाच्या तुटवड्याचा संदर्भ असलेली आणि त्याबाबत काय करता येईल हे सांगणारी अखेरची 'करून तर बघू!' ही कथा प्रयोगशीलतेचे महत्त्व सांगणारी आणि अडचणींवर मात करणाऱ्यांना प्रेरणादायक ठरेल अशी आहे.

विविध घटना, त्यांचे सामाजिक, राजकीय संदर्भ, लोकांच्या सवयी, त्यांचे स्वभावातील बारकावे, इ. सहजपणे सांगताना हलक्या फुलक्या विनोदाचा वापर आणि जोडीला लोकप्रिय गाण्यांचा तुरळक वापर केल्याने कथा शुष्क न होता वेगवान होतात. हे लेखकाचे यश आहे. प्रस्तावनेत डॉ. चिपलकट्टी यांनी म्हटल्याप्रमाणे 'विविध देशांचे विविध विषयांतील तज्ज्ञ आणि नेत्यांनी परस्पर सहकार्य करत, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केला तर अनेक जागतिक समस्या सोडवता येतील, असा दुर्दम्य आशावाद सर्व कथांमधून पाझरतो; तो युटोपिया वाटावा इतका जास्त आहे. पण अशी स्वप्ने बघण्याचीही गरज आहे. आता काहीही करून उपयोग नाही अशी निराशावादी भूमिका घेणाऱ्यांपेक्षा, धडपडणारी आणि बदल घडवून दूरचे स्वप्न बघणारी पिढी घडवणे हे जास्त कालसुसंगत आहे'.

यामुळेच या कथांना केवळ विज्ञानकथा असे म्हणण्यापेक्षा 'विज्ञानाचा प्रसार करणाऱ्या कथा' असे म्हणणे अधिक योग्य ठरेल असे वाटते.

शास्त्रकाट्याची कसोटी 
लेखक : संजीव कुलकर्णी
लोकवाङ्मय गृह, मुंबई.
पाने: 184; किंमत : 300 रुपये.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक, ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: विज्ञान कथा साहित्य पुस्तक परिचय नवे पुस्तक विज्ञान प्रसार वैज्ञानिक दृष्टीकोन Load More Tags

Add Comment