या पुस्तकामध्ये त्यांनी आपली प्रशासकीय सेवा आणि पितृसत्ताक कुटुंबव्यवस्था यांच्यावर प्रखर टीका केली आहे. आपल्याकडे केवळ परंपराच पुढं चालवल्या जात आहेत, त्यामुळे आपल्या देशात महिलांना दुय्यमच लेखण्यात येते, असे त्या सांगतात. त्यामुळेच त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आपल्या प्रशासकीय सेवेतल्या (आयएएस ऑफिसरची) मानाच्या नोकरीचा त्याग केला, खरेच सांगायचे तर त्यांना तो करावा लागला. हे पाहता, त्यांचे म्हणणे कुटुंबांनी आणि प्रशासकीय सेवेतील सर्वांनीच विचारात घेण्यासारखे नक्कीच आहे.
नागपूरची एक मुलगी पुष्पा. आई मराठीच. त्यामुळे ती मराठी संस्कृतीत वाढली. तिचे आजोबा (आईचे वडील) भारतातील एक महान संस्कृतपंडित आणि इंडॉलॉजिस्ट होते. ते म्हणजे 1975 मध्ये 'पद्मभूषण' सन्मानाने गौरवले गेलेले, प्रोफेसर व्ही. व्ही. मिराशी. तिचे वडील संस्कृतचे पारितोषक मिळवणारे विद्यार्थी आणि सनदी अधिकारी होते. लहानपणी तिच्या आईने तिला वाचनाची गोडी लावली. सुरुवातीला घरामध्येच तिचे शिक्षण झाले. आईने तिला संवेदनशीलतेचे वळण लावले, तिच्यात वाङ्मय आणि निसर्गाबाबत ओढ निर्माण केली, आणि त्याबरोबरच देशभक्ती आणि त्यागाची वृत्तीदेखील शिकवली.
त्यांच्या एकत्र कुटुंबात पुष्पाच्या आत्या आणि त्यांच्या मुली होत्या. अधूनमधून त्यांचा मुलगाही येत असे. घरीच शिक्षण झाल्याने पुष्पाला काटकसरीने राहण्याची सवय जडली, आणि तेच तिच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. नंतर ती मराठी माध्यमाच्या शाळेत गेली, तिथे इंग्रजी विषय शिकवला जात नव्हता, आणि घरामध्येही इंग्लिशचा वापर होत नसे, त्यामुळे तिला इंग्रजी भाषेचा गंधही नव्हता.
लवकरच हे चित्र पालटले कारण पुष्पा दहा वर्षांची असताना सनदी अधिकारी असलेल्या तिच्या वडिलांची बदली इंग्लंडला झाली. हा तिच्या आयुष्यातला मोठा बदल होता. कारण तेथे शिक्षण अर्थातच इंग्रजीत होते. तरीही जिद्दीने आणि चिकाटीने पुष्पा थोड्याच काळात इंग्रजी शिकली आणि दोन वर्षांतच त्या भाषेत तिने प्राविण्यही मिळवले, आश्चर्य म्हणजे नंतर ती तेथील शाळेत पहिली आली. तेथील सार्वजनिक शाळेत तिने व तिच्याभावंडांनी मोफत शिक्षण घेतले. तेथील इतर सुविधांचा तिने पुरेपूर लाभ घेतला. पुष्पामधील नेतृत्वगुणांमुळे तिला गर्ल-गाइडमध्ये नेतृत्वाची संधी मिळाली. त्या शाळेची (म्हणजे अधिकारपदावरील शिक्षकांची) इच्छा पालकांशिवायच (कारण, पुन्हा वडिलांची भारतात बदली झाल्यामुळे, त्यांना भारतात परतणे भागच होते) पुष्पाने शिक्षण तेथेच पूर्ण करावे, अशी होती. पण ते घडायचे नव्हते. मात्र तेथील शाळेतल्या तिच्या अनुभवाने इंग्लंडमधील शिक्षणपद्धतीचे महत्त्व तिला कळले.
इंग्लंडमध्ये शहर वा गावाच्या भल्यासाठी काम करण्याची वृत्ती लोकांमध्ये आहे आणि महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना अधिक वाव मिळतो, याचा तिच्या मनावर ठसा उमटला. भारतीय संस्कृतीत वाढलेल्या पुष्पाला त्यामुळे या दोन संस्कृतीतील फरक कळला. त्या लिहितात "रक्त आणि रंग यांचा विचार केला तर मी भारतीयच होते. पण आवडनिवड, नैतिकता आणि बुद्धी यांबाबत मात्र मी इंग्लिश आहे." संस्कृत स्तोत्रे आणि अंगाईगीते ऐकत वाढल्यामुळे मायदेशाशी त्यांचे नाते कायम राहिले आणि नंतरच्या आयुष्यात सामाजिक न्याय हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट बनले.
इंग्लंडमधून भारतात परतल्यानंतर पुष्पाचे शिक्षण पुढे सुरू झाले. तिने वडिलांच्या इच्छेचा आदर करून मिरांडा हाऊसमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास केला. पण तिची खरी आवड इंग्लिश साहित्याच्या अभ्यासाची होती. आपल्या इच्छेनुरूप वागले असते, तर मी चांगली लेखिका झाले असते असे त्या म्हणतात. असे असले तरी, त्या एम. ए. ला दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्या आल्या. वस्तुतः त्या स्वभावतः नर्व्हस (बुजऱ्या) आणि रंगमंचाबाहेर संकोची होत्या आणि प्रत्यक्ष सादरीकरणात, भाषण करण्यात आणि वादविवादातही फारशा प्रभावी नव्हत्या तरी, शाळा, कॉलेज आणि आयएएस अॅकेडमीमध्ये त्यांनी नाटकांत कामेही केली.
त्यांच्या वडिलांना स्वतः आयसीएस अधिकारी व्हावे असे वाटत होते, ते ती परीक्षा उत्तीर्णही झाले होते. पण त्यांची भारतीय वेषातली साधी राहणी होती आणि पाश्चात्य चालीरीती पाळून त्यांना वागता येत नसे त्यामुळे मुलाखतीत त्यांना यश आले नव्हते. आपले ते स्वप्न आपल्या लेकीने पूर्ण करावे अशी त्यांची इच्छा होती. कायम वडिलांच्या इच्छेचा मान राखून वागण्याच्या सवयीमुळे, स्वतःची आकांक्षा नसतानाही, त्यांनी नागरी सेवा परीक्षा दिल्या. अभ्यासासाठी पुरेसा वेळ नव्हता तरीही त्या परीक्षेत त्या सातव्या आल्या होत्या. तरीही त्यांना आयएफएस म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये घेण्यात आले नाही, हे त्यांनी सांगितले आहे.
नंतरच्या काळात मोठी पदे आणि मंत्रीपदही मिळवणाऱ्या त्यांच्या आयएएस अॅकेडमीमधील सहाध्यायांची व्यक्तिचित्रेही त्यांनी या पुस्तकात रंगवली आहेत. आयएएस अॅकेडमीमध्येच त्यांची मैत्री संजीवी सुंदर यांच्याशी झाली होती. त्या दिसायला सुंदर असल्याने आयएएस अॅकेडमीमधील इतर पुरुषांनीही त्यांना वश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संजीवी यांना चिंता वाटत होती. पण यथावकाश प्रणयाराधनानंतर त्यांचा संजीवीशीच विवाह झाला, हे त्या अगदी मोकळेपणाने सांगतात.
आपल्या पतीबरोबर राहता यावे म्हणून त्यांनी गुजरात केडरची निवड केली. तेथे नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांना किती त्रास झाला आणि किती अडचणींना तोंड द्यावे लागले याचे वर्णन त्यांनी केले आहे. गुजरातमध्ये असताना त्यांची अनेकांशी मैत्री झाली, त्यात डॉ. व्हर्गीज कुरियन आणि त्यांची पत्नी मॉली यांचा समावेश होता, हे त्या आवर्जून सांगतात. त्या नागरी सेवेत 1963 मध्ये रुजू झाल्या, लग्न 1964 मध्ये झाले. त्यांनी पहिल्या मुलीला 1965 मध्ये जन्म दिला.
मुलीला सांभाळण्यासाठी कुणीच नसल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला, पतीचीही त्यांनी नोकरी सोडावी हीच इच्छा होती. दैवी सेवेचा आणि आपल्या पितृप्रधान संस्कृतीचा हा शापच आहे. याचा प्रत्यय पुस्तकात अनेक ठिकाणी येतो. स्वतः एक स्त्री, तीही पारंपरिक एकत्र कुटुंबात वाढलेली, असे असल्याने त्यांना जुळवून घेण्याची सवय होती. त्यामुळे नडियादला अनेक पाहुण्यांची सरबराई त्यांनी केली. तरीही त्या केवळ 'ट्रॉफी वाईफ' बनून राहिल्या नाहीत, तर एक लक्षणीय स्वयंशिक्षित इतिहासकार आणि निबंधकार कशा झाल्या याचे वर्णनही त्या करतात.
गुजरातमधील दहा वर्षांच्या वास्तव्यात पुष्पा स्वयंप्रेरित इतिहास संशोधक बनल्या. सुरत ही डचांची छावणी होती आणि ब्रिटिशांसाठी व्यापाराचे हितसंबंध असलेले महत्त्वाचे शहर होते. तेथेच 1969 च्या जातीय दंगलींचा अनुभव त्यांनी घेतला, त्याबाबतही त्या लिहितात. संजीवी यांच्या दंगलग्रस्तांना मदत करण्याच्या लक्षणीय प्रयत्नाबद्दल त्यांना कौतुकयुक्त आदर वाटतो. कारण संजीवी यांनी, धर्माचा विचार न करता, दंगलग्रस्तांना मदत केली. अशा नैतिक जबाबदारीची जाणीव आता समाजात कमी होते आहे, असेही त्या म्हणतात. याच काळात त्यांनी लेखनाला सुरुवात केली. त्यांच्या 1973 मध्ये दिल्लीला झालेल्या बदलीमुळे नव्या अध्यायाला सुरुवात झाली. त्यांच्यातील लेखनाची आणि संशोधनाची कुवत संबंधितांना कळली, पण त्यांना योग्य मोबदला मात्र मिळाला नाही. नंतर ‘फेडरेशन ऑफ इंडियन कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ मध्ये काही काळ काम करताना त्यांना समाजसेवेचे महत्त्व जाणवले. त्यांच्या मैत्रिणीने त्यांना फोर्ड फाऊंडेशनची ओळख करून दिली. त्या 1976 मध्ये तेथे रुजू झाल्या.
फोर्ड फाऊंडेशनने त्यांना कला, देशातील विविध भाषांतील साहित्य, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय अशा अनेक क्षेत्रांची ओळख करून दिली. त्यांनी जपान, इंडोनेशिया, फिलिपाइन्स आणि थायलंड या देशांना भेट दिल्याने त्यांना परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालण्याचा एकाचवेळी प्रयत्न करणाऱ्या तेथील महिलांची अवस्था कळली. जपानचे नाट्यक्षेत्र, अर्थव्यवस्था आणि सामाजिक जाणीव यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे. महिलांबाबतचा तेथील पुरुषांच्या दुटप्पीपणा मात्र त्यांना आवडला नाही. फोर्ड फाऊंडेशनमध्येच त्यांची डॉ. कमला चौधरींशी गाठ पडली आणि त्या जवळची मैत्रीण, मार्गदर्शक आणि सहयोगी बनल्या.
पुष्पा यांनी मग 'नॅशनल फाऊंडेशन फॉर इंडिया'चा बौद्धिक पाया घातला. या प्रकारची संस्था असायला हवी, ही कल्पना त्यांना 1985 मध्ये दिल्लीतील कार्यशाळेत सुचली होती. सरकार आणि मोठ्या कंपन्यांवर अवलंबून नसलेल्या फाऊंडेशनसाठी डॉ. कमला चौधरींनी फोर्ड फाऊंडेशनची मदत मिळवली. नॅशनल फाऊंडेशन फॉर इंडियाची स्थापना 1992 मध्ये मुंबईत मोठ्या थाटात झाली. गांधीजींच्या विधायक कार्याचा आणि राज्यकेंद्रित नसलेल्या विकासाच्या कार्यक्रमाला त्यांनी पुनरुज्जीवित केले. डॉ. कमला चौधरींसह सी. सुब्रमण्यन आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचाही यात सहभाग होता. खरे तर, केवळ या कल्पनेसाठीच पुष्पा सुंदर यांना देशात मान्यता मिळायला हवी.
vसामाजिक न्यायासाठी काम करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली, हा नियतीचाच संकेत होता. त्यासाठी त्यांनी काम ही सुरु केले होते. पण 1991 मध्ये सुंदर यांची बदली लंडनला झाली. आणि त्यामुळे पुष्पा यांच्या सामाजिक न्यायासाठी त्या करत असलेल्या कामात खंड पडला. लंडनला गेल्यानंतर तेथील वास्तव्यात त्यांनी अभिलेखीय संशोधन केले. 1995 च्या सुरुवातीला त्यांना बाल्टिमोर मधील सेंटर फॉर सिव्हिल सोसायटीत काम करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. भारतात परतल्यावर सामाजिक न्यायासाठी 1999 मध्ये त्यांनी 'संप्रधान' (Sampradaan Indian Centre for Philanthropy - SICP) ही संस्था स्थापन केली. सरकार, विदेशी संस्था आणि उद्योजकांकडून देणग्या, त्याही सामाजिक न्याय, महिलांचे सबलीकरण आणि पर्यावरणाची जपणूक करणाऱ्यांना मदत करण्यासाठी, या हेतूने 'संप्रधान' ही संस्था स्थापन करण्यात आली होती. त्यांनी अशा देणग्या देण्याची सवय धनवंत उद्योजक यांना लागावी यासाठी बरेच प्रयत्न केले. नियोजन मंडळाच्या अभ्यासाचा वर्ग त्यांनी घेतला आणि नंतर स्वतंत्र धर्मादाय आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केली. पण समर्पण वृत्तीच नसलेल्या सहकार्यांनी त्यांची निराशा केला. परिणामी संस्था बंद करावी लागली. त्या काळाच्या पुढेच होत्या हे मात्र खरे.
या पुस्तकामध्ये त्यांनी आपली प्रशासकीय सेवा आणि पितृसत्ताक कुटुंबव्यवस्था यांच्यावर प्रखर टीका केली आहे. आपल्याकडे केवळ परंपराच पुढं चालवल्या जात आहेत, त्यामुळे आपल्या देशात महिलांना दुय्यमच लेखण्यात येते, असे त्या सांगतात. त्यामुळेच त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आपल्या प्रशासकीय सेवेतल्या (आयएएस ऑफिसरची) मानाच्या नोकरीचा त्याग केला, खरेच सांगायचे तर त्यांना तो करावा लागला. हे पाहता, त्यांचे म्हणणे कुटुंबांनी आणि प्रशासकीय सेवेतील सर्वांनीच विचारात घेण्यासारखे नक्कीच आहे.
'संप्रधान' चालवण्याच्या श्रमामुळे त्यांची प्रकृती बिघडली, तरी त्यांनी भारतातील परोपकारी वृत्तीत बदल घडवण्यासाठी काम केले. गांधीजींच्या कल्पनांनुसार काम करायचे ठरवले. धैर्य, अभ्यासू वृत्ती आणि, संस्थांची उभारणी यांचा अभ्यास केला तर पुढे कसे जायचे हे उमगेल, हे तत्त्व घेऊन त्यांनी काम केले. सनदी नोकरी बाहेरून पाहणाऱ्यांना कितीही 'स्वर्गात जन्मलेली' (स्वर्गतुल्य) वाटली, तरी लेखिकेच्या अनुभवांचे हे पुस्तक वाचताना वाटते की, ती सर्वांसाठी, खरे म्हणजे महिलांसाठी, तशी नसते. पण या साऱ्यांवर मात करून तिने जे काम केले आहे ते उल्लेखनीयच आहे. हे वाचताना आपण या परंपरांच्या बाहेर कधी येणार असा विचार वाचणाऱ्याच्या मनात नक्कीच येईल.
बियाँड द हेवन-बॉर्न सर्व्हिसः माय जर्नी फ्रॉम द आय.ए. एस. टू फिलँथ्रोपी
लेखक : पुष्पा सुंदर ;
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स इंडिया प्रा. लि. ;
पानेः 280;
किमत : 599 रुपये.
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Tags: बियाँड द हेवन-बॉर्न सर्व्हिस बियाँड द हेवन-बॉर्न सर्व्हिसः माय जर्नी फ्रॉम द आय.ए. एस. टू फिलँथ्रोपी इंग्रजी पुस्तक नवे पुस्तक नवे इंग्लिश पुस्तक IAS ICS वा. वि. मिराशी Sampradaan साधना डिजिटल Philanthropy Beyond The Heaven-Born Service Beyond The Heaven-Born Service : My Journey from the IAS to Philanthropy Sampradaan Indian Centre for Philanthropy SICP New Book New English Book Good Read Book Review Load More Tags
Add Comment