प्रश्न असा उपस्थित होतो की भारताच्या गुप्तहेर खात्याला याबाबत काही कसे माहीत झाले नाही? की माहीत होऊनही दुर्लक्ष / निष्काळजीपणा घडला? की यातून कोणी सामील झाल्यामुळे काशाचाच काही उपयोग झाला नाही? की 'काश्मीर खोऱ्यामध्ये पहलगाम भागात दहशतवाद्यांनी रेकी केली असून मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, असा सुगावा एप्रिलच्या प्रारंभीच गुप्तचर यंत्रणेला लागला होता. पाकिस्तानच्या आयएसआय यंत्रणेमार्फत दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याची पूर्वकल्पनाही देण्यात आली होती.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 28 जणांनी प्राण गमावले आणि अनेक जखमी झाले. देशाच्या अनेक राज्यांतील पर्यटकांचा त्यात समावेश आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दरसाल वाढतच गेली होती, हे आकडेवारीवरूनच दिसून येते. सन 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर 2020 मध्ये पर्यटकांची संख्या 34.7 लक्ष होती. ती 2021 मध्ये थेट 1.1 कोटीवर गेली आणि 2022 मध्ये 1.9 कोटी, 2023 मध्ये 2.1 कोटी आणि 2024 मध्ये विक्रमी 2.3 कोटी पर्यटकांनी या भूलोकातील नंदनवनाला भेट दिली होती. त्यामुळे या राज्यातील सुबत्ता वाढत होती आणि नेमके हेच पाकिस्तानला नको होते. यंदाही त्यात मोठी वाढ होत होती. फेब्रुवारी ते ऑक्टोबर दरम्यान काश्मीरला जाणाऱ्यांची संख्या नोंदीनुसार या घटनेपूर्वी अडीच कोटीवर गेली होती. तरी आता मात्र या दहशतवादी हल्ल्यानंतर बऱ्याच जणांनी आपला नियोजित दौऱ्याचा कार्यक्रम रद्द केला आहे. बऱ्याच म्हणजे जवळपास 60 टक्क्यांनी. काश्मीरमधील पर्यटनावर पोट अवलंबून असणाऱ्या तेथील अनेक लोकांना हा मोठाच धक्का आहे, त्याचबरोबर आता चरितार्थासाठी काय करावे या चिंतेत ते असतील.
आपल्या देशातील आणि इतर देशांतीलही पर्यटकांच्या या वाढीमुळे जम्मू-काश्मीर राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळत होता. शिवाय त्यामुळे अनेकांच्या उपजीविकेची चांगली सोय झाली होती. ते पर्यटकांची प्रतीक्षा करत असत. यंदाच्या पर्यटन हंगामाच्या काळात तुरळक चकमकी वगळता बहुतांशी शांतताच होती. पण फाळणीनंतर सुरुवातीपासूनच या भूलोकीच्या नंदनवनावर पाकिस्तानचा डोळा आहे. तीन युद्धांत पराभव झाल्यानंतरही त्यांची ही इच्छा कमी झालेली नाही. शिवाय काश्मीरमधील मोठ्या प्रमाणातील शांतता आणि सुबत्तेत झालेली वाढ त्यांना नक्कीच जाचत असणार. त्यांचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणतात की, काश्मीर ही आमच्या (पाकिस्तानच्या) गळ्याची नस आहे. आणि आता त्यांच्या दहशतवाद्यांचा प्रयत्न ती नसच कापण्याचा आहे, याची तर्कसंगती कशी लावायची? संपूर्ण भारत देश या घटनेमुळे खवळला आहे. काही जण तर आता त्यांना धडा शिकवायला हवा, त्यांना घुसून मारा, इस्राएलने हमासची केली तशी गत आयएसआयची करा, अशा घोषण देत आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या भेटीवर असताना आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स, हे भारतभेटीवर असताना हा हल्ला करण्यात आला. याचे नेमके कारण काय असावे? मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहब्बूर राणा याला यशस्वीपणे भारतात आणल्याची बोच पाकिस्तानला सलत होती का? शिवाय सध्या पाकिस्तानमध्ये सारे काही आलबेल नाही. तो आर्थिकदृष्ट्या पुरता खालावलेला आहे. सध्याच्या तेथील सरकारची विश्वसनीयतादेखील कमीकमी होत चालली आहे, असे दिसते. ती वाढवण्यासाठीचा तर हा मार्ग नसेल? यामुळे देशवासीयांचे लक्ष दुसरीकडे वळवणचा तर हा प्रयत्न नसेल? असे प्रश्न आहेत. यथावकाश त्यांची उत्तरेही मिळतील.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, "निष्पाप पर्यटकांचे रक्त सांडणाऱ्या दहशतवाद्यांवर तसेच त्यांच्या सूत्रधारांवर लवकरच जबरदस्त प्रहार करण्यात येईल", असा इशारा दिला आहे. "ज्यांनी हत्याकांड घडवले त्यांच्यापर्यंत आणि त्याबरोबरच पडद्याआड राहून भारताच्या भूमीवर नापाक षडयंत्र रचणाऱ्यांपर्यंतही आम्ही पोहोचू", असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी बोलावलेल्या मंत्रिमंळाच्या बैठकीत दहशतवाद्यांविरुद्धची रणनीती ठरवण्याबाबत विचार केला गेला. संरक्षण मंत्र्यांनी सेनादलाच्या तिन्ही दलप्रमुखांची आणि राष्ट्रीय सल्लागारांची बैठक घेतली आणि सैन्यदलाच्या सज्जतेचा आढावा घेतला. प्रमुख राष्ट्रीय सल्लागार अजित डोवल, हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी तसेच नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी हे या बैठकीत उपस्थित होते. राजनाथ सिंग यांनी पहलगाम येथील हत्याकांडाला प्रत्युत्तर देण्याचा सरकारचा इरादा स्पष्ट केला. विरोधकांनीही सरकारच्या प्रयत्नांना आम्ही पूर्ण साथ देऊ अहे म्हटले आहे. संकटाचे वेळी एकजुटीने लढायचे ही आपली परंपराच आहे.
या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (टीआर एफ) ने पत्करली आहे. या हल्ल्यात चार पाकिस्तानी आणि दोन स्थानिक दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आपल्या सुरक्षा यंत्रणांनी शोध मोहिमेचा वेग वाढवला आहे. दहशतवाद्यांपैकी दोन स्थानिक दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. त्यांची नावे आदिल आणि आसिफ अशी आहेत. ते अनुक्रमे बिजबेहरा आणि त्राल, या अनंतनागमधील भागातील आहेत. इतर तीन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रेही प्रसारित करण्यात आली आहेत. या हल्ल्यात एके-47 सारखी आधनिक शस्त्रे, औषधे, तसेच सुकामेवा यासारखे दीर्घकाळ टिकणारे साहित्य दहशतवाद्यांकडे होते. मुंबईप्रमाणेच येथेही मोठा हल्ला करण्याचा आणि अधिकाधिक प्राणहानी करण्याचा त्यांचा इरादा होता.
भारताची सुधारत जाणारी स्थिती पाकिस्तानला नेहमीच बोचत असते. त्यामुळे वारंवार दहशतवाद्यांकरवी किंवा दहशतवाद्यांच्या रूपातील सैनिकांकरवी असे हल्ले घडवले जातात हे कित्येकदा उघड झाले आहे. असे हल्ले करूनही पाकिस्तान तो हे सारे केवळ दहशतवाद्यांमुळेच होत आहे, आमचा त्यांच्याशी काहीएक संबंध नाही, असा कांगावा करत असतो. पण आजवरच्या अनुभवावरून त्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही, हे खरेच आहे. या नितांतसुंदर, नयनरम्य ठिकाणच्या आजूबाजूच्या जंगलात लपून त्यांनी स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने पाळत ठेवून पर्यटकांवर गोळीबार केला होता. या हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला हा असून तो पाकव्याप्त काश्मीरमधून सूत्रे हलवतो, असे सांगण्यात आले आहे. त्याने एक महिन्यापूर्वीच इशारा दिला होता असेही बोलले जात आहे.
"भारताकडून होणाऱ्या अत्याचारांमुळे काश्मिरी अतिशय दैन्यावस्थेत आहेत, त्यामुळे त्यांच्या मुक्तीची आवश्यकता आहे!", असे जगभर ओरडून सांगणाऱ्या पाकिस्तानचाच हा डाव असेल, याबाबत कुणालाही शंका नाही. या हल्ल्याद्वारे पाकिस्तानने 'काश्मीरच्या बाबतीत भारतामध्ये सर्व काही ठीक नाही', हा इशारा अमेरिका आणि चीनबरोबरच जगातल्या इतर महत्त्वाच्या देशांनाही दिला आहे का?
या हल्ल्यामुळे भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट टाकून तातडीने परतले, त्यांनी लगेचच मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि सिंधू नदीचे पाणी रोखण्याचा तसेच अत्तारी सीमा बंद करण्याचा आदेश दिला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्याचे फर्मावले. पाकिस्तानी लोकांनी ताबडतोब परत जावे म्हणून त्यांना 48 तासांची मुदत दिली. आणि त्याबरोबरच भारतातील पाकिस्तानच्या उच्चालयातील सैन्य सल्लागारपदे रद्द करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे भारतातील उद्रेक थोडाफार शांत होईल. याबरोबरच त्यांनी कानपूरचा नियोजित दौरा रद्द करून गुरुवारी सर्वपक्षीय बैठकही आयोजित केली. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स मात्र त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आपल्या नियोजित भारत दौऱ्याचा कार्यक्रम पार पाडत होते.
देशातील काहीजणांनी हा हिंदूंवरील हल्ला होता असे सांगितले असले, तरी मृतांत काही स्थानिक मुस्लीमही होते, हे विसरून चालणार नाही. उदा. सय्यद आदिल हुसेन शाह या घोडेवाल्याने ओरडून दहशतवाद्यांना पर्यटक हे काश्मीरचे पाहुणे आहेत, त्यांना मारू नका; असे सांगितले आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. पण एका दहशतवाद्याची बंदूक हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात तो असतानाच, दहशतवाद्यांनी त्याच्या पाहुण्यांना मारू नका! या विनवणीला न जुमानता पर्यटकांबरोबर त्याच्यावर गोळ्या झाडून त्यालाही ठार केले.
दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून ठार केले असे त्यांच्याबरोबरच्या महिलांनी सांगितले. महिलांना मात्र कोणतीही इजा करण्यात आली नाही. यामागचे कारण त्यांनी नंतरचे सारे आयुष्य याच दुःखदायक आठवणींत घालवावे अशी दहशतवाद्यांची इच्छा होती. "धर्माच्या नावाखाली निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले, हे फार वाईट आहे", अशी भावना भारतातील आणि आणिअसे क्रिकेटपटू महमद सिराज म्हणाला. या हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीरमध्ये बंद पाळण्यात आला. तेथील सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. अनेक राज्यसरकारांनीही त्यांच्या राज्यातील मृतांच्या कुटुबेयांना मदत देण्याचे जाहीर केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी (पंतप्रधानांच्या सांगण्यावरून) ताबडतोब जम्मू-काश्मीरला भेट दिली. तेथे त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर सांगितले की दहशतवादापुढे देश झुकणार नाही, तर आम्ही दहशतवादाला ठेचून काढणार. पहलगाम येथे ज्या बैमरन या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांवर दहशतवादद्यांचा हल्ला झाला, त्या ठिकाणालाही गृहमंत्र्यांनी भेट दिली. आणि संरक्षण अधिकाऱ्यांकडून त्याबाबतची सविस्तर माहिती घेतली. गृहमंत्र्यांनी नंतर रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करून त्यांना, आणि त्यांच्या नातलगांनाही धीर दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने आणि सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी, बार कौन्सिलने तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, ब्रिटनचे पंतप्रधान कॅर स्ट्रॅमर यांनी आणि सर्व जवळजवळ सर्व राष्टरप्रमुखांनी 'दहशतवाद्यांविरुद्धच्या लढ्यात आम्ही तुमच्याबरोबर आहोत' असे सांगितले. या सर्वांनाच भारताबरोबर चांगले संबंध हवे आहेत, कारण भारत ही त्यांच्यासाठी एक भव्य बाजारपेठ आहे आणि अमेरिका-चीन यांच्यातील वाढत जाणाऱ्या व्यापार युद्धामुळे चीनचे दरवाजे अमेरिकेसाठी बंद झाले आहेत, आणि या परिस्थितीचा जास्तीत जास्त लाभ कसा उठवता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण भारतासाठी आता प्रतिहल्ल्याला पर्यायच नाही, असे अनेकांचे मत आहे
हे सारेच खरे आहे. पण याबरोबरच प्रश्न असा उपस्थित होतो की भारताच्या गुप्तहेर खात्याला याबाबत काही कसे माहीत झाले नाही? की माहीत होऊनही दुर्लक्ष / निष्काळजीपणा घडला? की यातून कोणी सामील झाल्यामुळे काशाचाच काही उपयोग झाला नाही? की 'काश्मीर खोऱ्यामध्ये पहलगाम भागात दहशतवाद्यांनी रेकी केली असून मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, असा सुगावा एप्रिलच्या प्रारंभीच गुप्तचर यंत्रणेला लागला होता. पाकिस्तानच्या आयएसआय यंत्रणेमार्फत दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याची पूर्वकल्पनाही देण्यात आली होती. याबरोबरच हमास आणि लष्कर ई तोयबा यांच्यात संगनमत होत असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता' असे वृत्तही एका दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. केंद्रीय गृहसचिवांनी मार्च महिन्याच्या दहा तारखेला काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला होती. सहा एप्रिलला गृहमंत्र्यांनी श्रीनगरमध्ये इंटिग्रेटेड कमांडच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन केले होते. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या जोरावरच या बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांकडून चूक झाली असे म्हणणे योग्य होणार नाही. परंतु तरीही सुरक्षायंत्रणा भेदण्याची संधी हल्लेखोरांनी साधलीच.
या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी सहभागी होते याबाबतचे पुरावेही मिळाले आहेत. पाकिस्तान हिंदू मुस्लिम यांच्यातील दरी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे हे आता सर्वांनाच उमगले आहे. पण त्याच वेळी भारतातही काही संघटना गेली काही वर्षे स्वतःला देशभक्त म्हणवून घेत दुही माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत, हेही सर्वज्ञात आहे. आपल्या या कृत्याने आपण पाकिस्तानलाच मदत करत आहोत, एवढेही भान त्यांना राहिलेले नाही. पाच वर्षांपूर्वी कलम 370 रद्द केल्यानंतर आता काश्मीरमध्ये सर्वकाही ठीक झाले आहे, असे सरकारतर्फे वारंवार सांगण्यात येत होते. पण या दहशतवादी हल्ल्यामुळे, तेथील परिस्थिती वेगळीच आहे, हे स्पष्ट झाले आहे. तेथे खरोखरच शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले गेले तर सारा देश त्या प्रयत्नांना साथ देईल. त्यासाठी सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना सुरक्षित वाटावे अशी खबरदारी घ्यायला हवी. याचे सूतोवाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले आहेच. आता लष्करी आणि निमलष्करी दलांच्या सहाय्याने ते कसे करता येईल हे पाहायला हवे.
झाले ते वाईटच होते, याबाबत दुमत नाही. पण तसे पुन्हा घडू नये यासाठी आपण नेहमीच सज्ज राहायला हवे, हे विसरून चालणार नाही!
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Tags: पहलगाम पहलगाम हल्ला जम्मू-काश्मीर दहशतवाद दहशतवादी हल्ला 22 एप्रिल 2025 दहशतवादी हल्ला काश्मीर काश्मीर खोरे पाकिस्तान घुसखोर J&K jammu and kashmir kashmir kashmir valley Pehalgam Pahalgam Pahalgam attack pehalgam attack 22 nd April 2025 pakistan TRF The Resistance Front Pakistan Army Pakistan Govt. Modi Amit Shah US Vance Load More Tags
Add Comment