अठरा वर्षांचा (बुद्धि)बळवंत 'राजा'! 

गुकेशच्या विजयाने भारतातल्या बुद्धिबळ युगाचे दुसरे पर्व सुरू

बुद्धिबळातील आजवरची सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून निर्विवादपणे गणली जाणारी ग्रँडमास्टर सुझान पोल्गर म्हणाली की, गुकेशचे मनोबल वाखाणण्याजोगेच आहे. त्याला जबरदस्त आत्मविश्वास आहे आणि लढण्याची त्याची जिद्द पाहता तो खरोखरच अजिंक्यवीर बनण्यास लायक आहे. आणि तो केवळ अठरा वर्षांचा आहे. पुढील अनेक वर्षे तो बुद्धिबळाचा अँबेसेडर असेल! गुकेशने अजिंक्यपद मिळवणे हा बुद्धिबळासाठी सुवर्णक्षण आहे असे ती म्हणाली. जागतिक अजिंक्यपदाच्या या लढतीपूर्वीच सुझान म्हणाली होती की, या लढतीत गुकेश किंचित सरस ठरणार आहे.


दोम्माराजू गुकेश हा भारतीय खेळाडू जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासातला आजवरचा सर्वात लहान वयाचा विजेता ठरला आहे. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील १४ व्या आणि अखेरच्या डावात गुकेशने डिंग लिरेनला पराभव मान्य करायला भाग पाडले आणि अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. विश्वनाथन आनंदनंतर भारताचा हा दुसरा जागतिक बुद्धिबळ विजेता. कारकिर्दीत पाच वेळा जगज्जेता ठरलेल्या आनंदने आपले पहिले विजेतेपद ३० व्या वर्षी मिळवले होते, तर गुकेशने तो बहुमान केवळ १८ व्या वर्षीच मिळवला आहे.

गुकेशच्या दृष्टीने या लढतीतील १४ वा डाव अत्यंत महत्त्वाचा होता. कारण १३ व्या डावाअखेर त्याची आणि लिरेनची प्रत्येकी साडेसहा गुण अशी बरोबरी होती. आणि चौदावा डावही बरोबरीत सुटला असता तर मग टाय ब्रेकर झटपट पद्धतीने खेळवला जाऊन विजेता ठरवण्यात आला असता. आणि नेमकी हीच गोष्ट गुकेशला नको होती. कारण झटपट स्पर्धेत लिरेन हा खूपच सरस समजला जातो. उलट ती गुकेशची कमकुवत बाजू आहे. त्यामुळेच गुकेशने या अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या चौदाव्या डावात सर्वस्व पणाला लावले. विजेतेपद राखण्याच्या तणावाखाली असलेल्या लिरेनने एका क्षणी अनपेक्षितपणे चूक केली, आणि नेमकी ती संधी साधून गुकेशने त्याला शह दिला आणि मात केली. चेक मेट!

प्रथमपासूनच गुकेश विजय मिळवण्यासाठीच खेळत होता हे खरे, पण प्रत्यक्ष विजय मिळाल्यानंतर मात्र त्याला आनंदाश्रू आवरणे अशक्य झाले. दहा वर्षांपासून त्याने जे स्वप्न उराशी बाळगले होते ते साकार झाल्याचा हा आनंद होता. आता रात्री मला झोप येणे शक्य नाही. मी हा विजयानंद माझ्या टीम आणि मित्रांबरोबर साजरा करणार आहे, असे गुकेशने सांगितले.
गुपित म्हणून त्याने एक गोष्ट सांगितली. त्याने सांगितले की नवव्या डावानंतरच्या विश्रांतीच्या दिवशी माझे सहकारी आणि ट्रेनर ‘गायू’ (पोलंडचे ग्रँडमास्टर ग्रेझेगोर्झ गायेवस्की) आणि मी, आम्ही समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलो होतो. तेव्हा ते मला म्हणाले, “जर तू जिंकलास तर मी बंजी जंपिंगचा प्रयत्न करीन”. का ते मला ठाऊक नाही, पण मी त्यांना म्हणालो की, मीही तुमच्याबरोबर येईन. आणि आता कदाचित पॅडी (मेंटल कोच पेंडी अ‍ॅप्टॉन) देखील त्यात सामील होतील!

काही वर्षांपूर्वी माजी जागतिक विजेता विश्वनाथन आनंद गुकेशच्या बाबतीत म्हणाला होता, “हा मुलगा राजा बनेल.” (This boy will be king!) आणि आता प्रत्यक्षात त्याचे हे भाकित खरे ठरलेले पाहून तो भारावून गेला होता आणि त्याचा आनंद खरोखरच गगनात मावत नव्हता. आनंदच्याच 'वेस्ट ब्रिज आनंद चेस अ‍ॅकेडमी' च्या सुरुवातीच्या बॅचमधला गुकेश दोम्माराजू जागतिक अजिंक्यवीर ठरला होता. या अ‍ॅकेडमीतील मुलांना सर्वोत्तम खेळाडूंचे मार्गदर्शन मिळते, त्याबरोबरच त्यांच्याशी संवादही साधता येतो.

बुद्धिबळातील आजवरची सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून निर्विवादपणे गणली जाणारी ग्रँडमास्टर सुझान पोल्गर म्हणाली की गुकेशचे मनोबल वाखाणण्याजोगेच आहे. त्याला जबरदस्त आत्मविश्वास आहे आणि लढण्याची त्याची जिद्द पाहता तो खरोखरच अजिंक्यवीर बनण्यास लायक आहे. आणि तो केवळ अठरा वर्षांचा आहे. पुढील अनेक वर्षे तो बुद्धिबळाचा अँबेसेडर असेल! गुकेशने अजिंक्यपद मिळवणे हा बुद्धिबळासाठी सुवर्णक्षण आहे असे ती म्हणाली. जागतिक अजिंक्यपदाच्या या लढतीपूर्वीच सुझान म्हणाली होती की, या लढतीत गुकेश किंचित सरस ठरणार आहे.

खेळाचा नियम असा आहे की जिंका ते डौलाने आणि पराभूत व्हा तेही आब राखून प्रतिष्ठेने! त्यानुसारच गुकेश डौलात जिंकला (won with grace) आणि डिंग लिरेन आब राखून हरला (lost with digity) गुकेशने संपूर्ण लढतीत लढाऊ वृत्तीने आणि धाडसाने खेळ केला. त्याचे मनोबल जबरदस्त आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की, त्याच्यात अजिंक्यवीराचे आणि व्यावसायिक खेळाडूचे सारे गुण आहेत आणि नुकताच, मे महिन्यात तो १८ वर्षांचा झाला आहे. तो परिपक्व, नम्र आहे आणि त्याच्या वागण्यातही एक खास अदब आहे. त्याच्या खेळाने अद्यापही शिखर गाठलेले नाही, आणि यापुढे त्याचा खेळ सुधारतच जाईल.

या लढतीबाबत बोलताना पोल्गर म्हणाली की, “या लढतीचा दर्जा अपेक्षेपेक्षा कमी होता, असे म्हटले जात असले तरी मला तसे वाटत नाही. एका बाजूला अजिंक्यवीर डिंग लिरेन होता. मागच्या वर्षी विजेतेपद मिळवल्यानंतर त्याचे मनस्वास्थ्य बिघडले होते आणि भावनाही स्थिरस्थावर नव्हत्या. दुसरीकडे १८ वर्षांचा आव्हानवीर दोम्माराजू गुकेश होता, ज्याला अशा मोठ्या लढतीचा फारसा अनुभव नव्हता. असे असूनही दोघांनी आपापल्या उणिवांवर काम करत या स्पर्धेत अप्रतिम खेळ केला, ही लढत चांगली रंगवली. ही लढत सुरू होण्याआधीच मी सांगितले होते की गुकेशची बाजू थोडीशी सरस आहे आणि त्यामुळे तो विजयी होईल. तसेच झाले आणि त्याने ७.५ वि. ६.५ गुणांनी डिंगवर विजय मिळवला. दोघाही खेळाडूंनी या लढतीत काही वेळा आपापली बलस्थानं दाखवली, आणि कधी त्यांच्या कमकुवत बाजुही दिसल्या. दोघेही कसलेले लढवय्ये आहेत. लढतीच्या अखेरच्या पारंपरिक १४ व्या डावात दोघांवरही चांगले दडपण होते. डिंग पांढऱ्या मोहन्यांनिशी खेळत असल्याने त्याला थोडा फायदा होता, असे तज्ज्ञांचे मत होते. गुकेशने काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना वेळेबाबत जागरुकता दाखवली. बत्तीस वर्षाच्या अनुभवी डिंगला मात्र त्यात यश आले नाही, हाच मोठा फरक होता. त्यामुळेच जागतिक क्रमवारीत ४६ क्रमांकावर असणाऱ्या गुकेशने दुसऱ्या स्थानावरील डिंग लिरेनला पराभूत केले.”

विजयानंतर गुकेश म्हणाला, “डिंग हा खऱ्या अर्थाने जगज्जेता आहे. त्याच्याबद्दल मला वाईट वाटते. पण खेळात कोणीतरी विजेता ठरणार तर कोणालातरी पराभव पत्करावा लागणार. मात्र डिंगने दिलेली झुंज कौतुकास्पदच होती. मला त्याचे आभार मानायचे आहेत. विजेतेपदाच्या माझ्या स्वप्नाहून आई-वडिलांचे (कान-नाक-घसा-तज्ज्ञ डॉ. रजनीकांत आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. पद्मिनी) स्वप्न मोठे होते. त्यांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन याविना मी एवढी मोठी मजल मारू शकलो नसतो.”

डिंग लिरेन म्हणाला, “या अखेरच्या डावाची सुरवात तर मी चांगली केली होती. पण माझ्या हातून चूक झालीय याची जाणीव मला उशिरा झाली. तरीही मी या वर्षातील सर्वोत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेत केली असे मला वाटते. कदाचित मी आणखीही चांगला खेळ करू शकलो असतो. पण गुकेशने विजय मिळवला हा योग्य निकाल आहे, असे मला वाटते. म्हणूनच कोणत्याही गोष्टीची हळहळ मला वाटत नाही.”

या लढतीतील पहिला सामना गुकेशने गमावला होता. पण त्या पराभवातून सावरून, दुसरा डाव बरोबरीत सोडवून, त्याने तिसरा डाव जिंकला होता. त्यानंतरचे सात डाव बरोबरीत सुटल्यावर अकरावा डाव गुकेशने जिंकला होता, पण लगेचच बाराव्या डावात विजय मिळवून डिंगने बरोबरी साधली होती. गेल्या लढतीतही डिंगने बारावा डाव जिंकून नंतर अजिंक्यपद मिळवले होते. पण तो यावेळी तशी करामत करू शकला नाही. तेरावा डावही बरोबरीत सुटला होता. त्यानंतरच्या पारंपरिक पद्धतीच्या चौदाव्या डावात अजिंक्यपद राखण्याचे दडपण डिंगवर होते आणि ते त्याला लपवता आले नव्हते.


हेही वाचा - सर्वात लहान वयाचा आव्हानवीर : भारताचा गुकेश दोम्माराजू ( लेखक: आ. श्री. केतकर)


बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले म्हणाले की हा गुकेशच्या दृढनिश्चयाचा विजय आहे. बुद्धिबळातील चीनच्या वर्चस्वाला गुकेशच्या भारतीय संघाने बुडापेस्टमधील ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक मिळवून हादरवले होते. त्यावेळी गुकेशबरोबर खेळणे डिंगने टाळले होते. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत पहिले चौदा डाव पारंपरिक पद्धतीने खेळले जातात. डिंगला चौदाव्या डावात बरोबरी साधायची होती. कारण त्याचे लक्ष जलदगतीने होणाऱ्या टाय-ब्रेकरकडे होते, जे त्याचे बलस्थान आहे. पण गुकेशने ती वेळ येऊ दिली नाही. या संपूर्ण वर्षभर गुकेश सातत्याने चांगला खेळ करत आहे. एप्रिल महिन्यात त्याने कॅंडिडेट्स स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले होते. तेव्हाही तो सर्वात लहान वयाचा आव्हानवीर ठरला होता. ती स्पर्धा जगज्जेतेपदाच्या लढतीपेक्षाही खडतर होती, असे गोखले यांना वाटते.

पाच वेळा जगज्जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या विश्वनाथन आनंदने अखेरचे विजेतेपद २०१२ मध्ये मिळवले होते. त्यानंतर एका तपाने एक भारतीय पुन्हा जगज्जेता ठरला आहे. आनंदला २०१३ साली पराभूत करून विजेता ठरलेल्या कार्लसनने नंतर दीर्घकाळ वर्चस्व गाजवले होते. पण पाचवे जेतेपद मिळवल्यानंतर मात्र त्याने या स्पर्धेत पुन्हा न खेळण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी डिंग लिरेनने बाजी मारली होती तर यावेळी गुकेशने! अकरा तारखेला वाढदिवस साजरा करणाऱ्या आनंदला त्याने वाढदिवसाची ही बहुमोल भेट दिली.

विश्वनाथन आनंदमुळे भारतात बुद्धिबळाचे रोप रुजून त्याचा वृक्ष झाल्याचे आपण बघत आहोतच. आता दोम्माराजू गुकेशच्या जगज्जेतेपदानंतर हा वृक्ष आणखीच बहरेल, फुलेल, फळेल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)

Tags: गुकेश बुद्धिबळ विजेता विश्वनाथन आनंद chess championship Load More Tags

Comments:

Umesh Kunde

अतिशय सुंदर लेख.

Add Comment