आपल्याला वारंवार पडणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांचा वेध

माणसाच्या वागण्याची संगती शोधणारे पुस्तक - '(दु)र्वर्तनाचा वेध'

काही वेळा असे होते की एखाद्या गंभीर समस्येने माणसाच्या डोक्याचा भुगाच पडलेला असतो. अनेक शक्यता पडताळून पाहूनही उपयोग होत नाही. शेवटी तो मोकळ्या हवेत पाय मोकळे करायला जातो. नुकताच पाऊस पडून गेल्याने हवेत प्रसन्न गारवा असतो. आकाशात तरंगांचे खेळ चाललेले पाहताना तो काळजी विसरून जातो. त्याचे मन पिसासारखे हलके होते... आणि अचानक त्याच्या मनात काहीतरी लख्खकन चमकून जाते. त्याला सतावणाऱ्या समस्येचे ते उत्तर असते. परिणामकारक आणि अनोखे. मग त्याच्या मनात येते, 'अरे, या शक्यतेचा विचारच आपण केला नव्हता. किती सोपा मार्ग आहे हा. आधी कसा लक्षात नाही आला?' हाच तो 'युरेका' क्षण.

माणसांच्या चांगल्या किंवा वाईट वागणुकीबाबतच्या विविध प्रश्नांचे मेंदूविज्ञान या विषयावरील सुबोध जावडेकर यांच्या लेखांचा '(दु)र्वर्तनाचा वेध' या नावाचा  संग्रह आहे. यात वेगवेगळ्या नियतकालिकांत गेल्या साधारण दीड दशकांत मौज, दीपावली, अक्षर, साधना, साप्ताहिक सकाळ इ. विविध नियतकालिकांत प्रकाशित झालेले लेख आहेत. सुबोध जावडेकर आपल्याला विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि विज्ञानविषयक लिहिणारे म्हणून परिचित आहेत. विषय शक्य तितका सहजसोपा करून सांगण्याच्या त्यांच्या खास लेखनशैलीमुळे त्यांचे लेखन आवर्जून वाचले जाते. अनेक विज्ञानविषयक गोष्टींची अचूक माहिती त्यामुळे मिळते. सध्या शास्त्रज्ञ कोणते नवीन संशोधन करत आहेत, याविषयीही माहिती कळते.

रोजच्या जीवनात स्वतःच्या आणि इतरांच्या वेगळ्या वाटणाऱ्या वागण्याबाबत आपल्याला अनेकदा पडणाऱ्या, चटकन उलगडा होऊ न शकणाऱ्या, विविध प्रश्नांचा मेंदूविज्ञानाच्या अंगाने घेतलेला वेध हे यातील प्रकरणांचे स्वरूप आहे. या प्रश्नांची यादी वाचताना आपल्यालाही असेच प्रश्न पडतात याची जाणीव होते. पुस्तकातील प्रकरणे अशी आहेतः ‘माणसं खोटं का बोलतात?’ ‘माणसं लबाडी का करतात?’ ‘माणसं हट्टीपणा का करतात?’ ‘माणसं भेदभाव का मानतात?’ ‘माणसं परोपकार का करतात?’ ‘माणसं व्यभिचार का करतात? माणसं क्रूरपणे का वागतात?’ ‘?’ ‘माणसं सर्जनशील का असतात?’ ‘माणसं दहशतवादी का बनतात?’ ‘माणसं पॉर्न का बघतात?’ ‘माणसं धार्मिक का असतात?’ ‘माणसं संगीत का ऐकतात?’ ‘माणसं सौंदर्यावर का भाळतात?’ ‘अल्पवस्त्रांकित स्त्रिया बघायला माणसांना का आवडतं?’ ‘स्त्री पुरुषाच्या वागण्यात इतका फरक का असतो?’ ‘आपल्या काही आठवणी साफ चुकीच्या का असतात?’ हे प्रश्न वाचतानाच कळते की खरे तर यातील काही बाबी दुर्वर्तन म्हणावे अशा नक्कीच नाहीत. (मात्र त्यांबाबत विचार नक्कीच करायला हवा, हेही खरेच.) त्यामुळेच बहुधा पुस्तकाच्या नावामध्ये 'दु' हा कंसात टाकला आहे.

माणसाच्या चांगल्या किंवा वाईट अशा कोणत्याही प्रकारच्या वागण्याला त्याचा मेंदूच कारणीभूत असतो. कारण माणसाला त्याबाबतचे आदेश मेंदूच देतो, हे आता सर्वमान्य झाले आहे. त्या अनुषंगाने गेल्या तीन दशकांत मानवी मेंदूवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे उपलब्ध होणाऱ्या नवीन उपकरणांच्या मदतीने शास्त्रज्ञ मेंदूचा वेध घेत आहेत. त्यामुळे मेंदूची कितीतरी रहस्ये उलगडत आहेत. ज्या भावना, जे विचार आपल्या अंतर्मनात आपण खोलवर दडवून ठेवलेले असतात आणि त्यामुळे ते दुसऱ्याला कधीच कळणार नाहीत असे आपल्याला वाटत असते, ते आता या नवीन उपकरणांच्या सहाय्याने शास्त्रज्ञांना सहज वाचता येऊ शकतात. त्यातून मिळणारी माहिती अनेकदा सगळ्यांनाच अचंबित करणारी असते. कधी ती हादरवून टाकणारी तर कधी लाज, शरम वाटावी अशीही असू शकते. तरीही तिचा मनमोकळ्या मनाने स्वीकार करण्यातच शहाणपणा असतो, असे शास्त्रज्ञ सांगतात, कारण तसे केल्यामुळे आपण स्वतःलाच अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो; असे सांगून लेखक पुढे म्हणतो प्रश्न एवढाच आहे की अशा प्रकारे स्वतःला जाणून घ्यायची, आणि गरज असल्यास बदलायची इच्छा आपल्याला खरोखरच असते का?

शास्त्रज्ञ आता वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी विविध उपकरणांचा उपयोग करतात. असे प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मेंदूच्या विविध भागात कोणत्या प्रकारच्या हालचाली होतात आणि त्यांतही बदल कशा प्रकारे दिसतात याचा अभ्यास करून निष्कर्ष काढतात. त्यांचे बरेच संशोधन प्रामुख्याने स्मृती आणि जाणीव या विषयांभोवतीच केंद्रित झाले आहे. माणसाचा मेंदू ही किती अजब गोष्ट आहे, हे त्यामुळे लक्षात येत चालले आहे. आपल्या शरीरातील या विलक्षण गूढ अवयवाबद्दल आता कुठे थोडेफार कळायला लागले आहे. खरे म्हणजे जे कळले आहे, ते फारच थोडे आहे. हेही मान्य करायला हवे की, या संशोधनाला अद्याप पूर्णत्व आलेले नाही, तरीही ते योग्य दिशेने चालले आहे, याबाबत दुमत नाही. मेंदूची आजवर अज्ञात असलेली रहस्ये जसजशी उलगडू लागली आहेत, तसतसे आपण आपल्यालाच जास्त चांगल्या प्रकारे ओळखायला लागलो आहोत. ही ओळख वाढत जाईल तसतशी या अनेक प्रश्नांची उत्तरेही आपल्याला मिळू लागतील. एखादी व्यक्ती विशिष्ट प्रकारे का वागते, हे ध्यानात येईल. त्यामुळे आपली या प्रश्नांकडे आणि त्या व्यक्तीकडे पाहण्याची दृष्टीही बदलेल. याबाबतचे कोणत्या विषयाचे संशोधन कोणते शास्त्रज्ञ करत आहेत ते या लेखांमध्ये लेखकाने अगदी सहज समजेल अशा सोप्या भाषेत सांगितले आहे. त्यामुळे ते वाचताना लेखक आपल्याबरोबर गप्पा मारत आहे असे वाटते. त्यातील बऱ्याच गोष्टी वाचकांना नव्या आहेत, हे लक्षात घेऊन त्या समजावून देण्यासाठी या सोप्या भाषेचा वापर केला आहे. त्याबरोबरच तक्ते, काही अपवाद सोडता आकृत्यांचा वापर कटाक्षाने टाळला आहे. काही छायाचित्रांचा केलेला वापर लेखाच्या संदर्भात उपयुक्त ठरणारा आहे. कित्येक ठिकाणी जावडेकरांनी त्यांच्या नर्मविनोदी शैलीचाही वापर केला आहे. त्यामुळे विषयाचे आकलन दडपण न येता होते हे महत्त्वाचे.

‘माणसं क्रूरपणे का वागतात?’ या प्रकरणातील माहिती चटकन समजणारी आहे. पण क्रूरपणाची जी उदाहरणे दिली आहेत, ती अंगावर शहारा आणतात. माणसे असे कसे वागू शकतात? असा प्रश्न पडतो. पण त्याचे उत्तरही लेखक देतो. मेंदूत ज्याप्रमाणे क्रूरतेचे केंद्र नसते, तसा क्रूरपणाचा किंवा दुष्टपणाचा वेगळा असा जीन असत नाही. पण काही जीन्स माणसाचा स्वभाव घडवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतात. MAOA नावाचा जीन त्याला आक्रमकपणा, तापटपणा बहाल करतो. एरवी तो शिघ्रकोपी वा आक्रमक नसतो, पण वादावादी किंवा भांडण झालं तर अशा लोकांचे माथे भडकते. डीएनए मध्ये VPR1A आणि CNR1 हे जीन्स असले, तर भावनांचा उद्रेक चटकन होतो. कधी डोळ्यांत पाणी भरते तर कधी क्षुल्लक कारणाने रक्त उसळते. या आणि यासारख्या अनेक जीन्सच्या असण्या-नसण्यामुळे, त्यांच्या एकत्रित प्रभावामुळे ती व्यक्ती निर्दय, क्रूर आणि आक्रमक बनते. या वागण्याला 'डोपामाइन' नावाचे मेंदूत उत्पन्न होणारे रसायनही सहाय्य करते. आक्रमक वागण्याने माणसाला आनंद होतो; त्यालाही डोपामाइनच कारण असते. नाझींच्या छळछावण्यांत ज्यू लोकांवर जे अत्याचार करण्यात आले होते, त्यांबाबत नंतर न्यूरेनबर्गमधील खटल्यांत बऱ्याच नाझी अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही फक्त आज्ञा पाळत होतो. आम्हाला त्यासाठी जबाबदार धरता येणार नाही. पण शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगात असे आढळले की माणसाला आज्ञापालनाचा कैफच चढतो. अधिकारवाणीने कुणी काही सांगितले की ते निमूट ऐकायचे, ही जन्मजात वृत्ती असते. त्यातून परिणामांची जबाबदारी आपल्यावर नाही, असे समजले की मग माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो.
याच प्रकरणात शेवटी पाकिस्तानी कवयित्री फहमीदा रियाज यांच्या 'तुम बिल्कुल हम जैसे निकले भाई' या कवितेतील ओळी दिल्या आहेत. त्या म्हणतात, "आम्ही एक मूर्ख होतो. धर्माचं भूत आमच्या मानगुटीवर स्वार होतं. आम्ही स्वतःची दुर्दशा करून घेतली. आता तुम्हीही आमच्याच वाटेनं निघाला आहात. शिक्षण गेलं खड्यात, असं म्हणून कट्टरपंथाचे पोवाडे गायला लागले आहात. शेजाऱ्याकडे बघून तुम्ही काहीच शिकायला तयार नाही. आम्ही तर नरकात पोहोचलेलोच आहोत. या मार्गानं निघालात तर थोड्या वेळात तुम्हीही तिथं येणार आहात. बधाई हो. अभिनंदन ! कालपर्यंत याचं वाईट वाटायचं. आता हसू येऊ लागलंय. पंधरा वर्षांपूर्वीची ही कविता पाकिस्तानची आजची स्थिती पाहता रियाज किती द्रष्ट्या होत्या हे स्पष्टच दिसतं. पण आपणही काही धडा घेतलेला नाही, हेही लक्षात येतं." असे लिहून जावडेकरांनी आपल्या देशाच्या अवस्थेकडेही लक्ष वेधले आहे.

‘माणसं सर्जनशील का असतात?’ या प्रकरणाची दखल घ्यायलाच हवी. काही वेळा असे होते की एखाद्या गंभीर समस्येने माणसाच्या डोक्याचा भुगाच पडलेला असतो. अनेक शक्यता पडताळून पाहूनही उपयोग होत नाही. शेवटी तो मोकळ्या हवेत पाय मोकळे करायला जातो. नुकताच पाऊस पडून गेल्याने हवेत प्रसन्न गारवा असतो. आकाशात तरंगांचे खेळ चाललेले पाहताना तो काळजी विसरून जातो. त्याचे मन पिसासारखे हलके होते... आणि अचानक त्याच्या मनात काहीतरी लख्खकन चमकून जाते. त्याला सतावणाऱ्या समस्येचे ते उत्तर असते. परिणामकारक आणि अनोखे. मग त्याच्या मनात येते, 'अरे, या शक्यतेचा विचारच आपण केला नव्हता. किती सोपा मार्ग आहे हा. आधी कसा लक्षात नाही आला ?' हाच तो 'युरेका' क्षण. आर्किमिडीस 'युरेका युरेका' असं ओरडत स्नानगृहातून 'तसाच' बाहेर आला होता तो क्षणही असाच होता. राजमुकुट न वितळवता त्यातील भेसळ कशी शोधायची, याचे उत्तर त्याला मिळाले होते. फक्त एखादी अफलातून अन् मौलिक कल्पना ध्यानीमनी नसताना अचानक सुचणं म्हणजे 'युरेका' क्षण. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येणे ही माणसाला लाभलेली देणगी. पण अनेकदा मेंदूचे हे कौशल्यच सर्जनशील उत्तर शोधायच्या आड येते. बहुतेक सर्व प्रतिभावंतांचे लक्ष सहज विचलित होऊ शकते. 'अचपळ मन माझे नावरे आवरीता' हे वचन त्यांच्या बाबतीत अक्षरशः खरे असते. म्हणून ते नवनव्या गोष्टींच्या शोधात असतात. मात्र सावध असणे हे सर्जनशीलतेला मारक असते, हे ध्यानात ठेवले पाहिजे. जयदीप भट्टाचार्य आणि भावीन सेठ या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांचे 'युरेका' क्षणाच्या संशोधनाबाबतचे काम महत्त्वाचे आहे, असेही लेखक सांगतो. आणि शेवटी तो म्हणतोः 'सर्जनशीलता कधीच चाकोरीत जन्म घेत नाही'.

‘माणसं हट्टीपणा का करतात?’ या प्रकरणात म्हटले आहे की बहुतेक माणसे आपल्या मताला घट्ट चिकटून असतात. त्याच्या समर्थनार्थ कडाक्याचा वाद घालतात. हमरीतुमरीवर येततात. कुणी विरोधात बोलले तर त्याचे ऐकूनसुद्धा घेत नाहीत. ते सत्य असलं तरी मान्य करत नाहीत. आपल्या मताच्या विरोधातला पुरावा समोर आला तरी ते त्याकडे डोळेझाक करतात. कित्येकदा थोड्या वेळापूर्वी त्यांनीच दिलेले उत्तर दुसऱ्याचे म्हणून समोर आले की त्यातल्या चुका लक्षात यायला लागतात, असं सांगून लेखक म्हणतो की, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, असं म्हणतात ते काही खोटं नाही. एकदा ठरवलं की ठरवलं अशी हट्टी माणसांची वृत्ती असते. त्यामुळेच आजच्या युगातही पृथ्वी सपाट आहे असे मानणाऱ्यांची संस्था आहे. तीही अमेरिकेत. त्यांना पृथ्वी गोल असल्याचे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे खोटेच वाटतात, ही बाब हेच दाखवून देते. या बरोबरच आपला राजकीय कल आपल्या मेंदूत कोरलेला असतो का?’ ‘आपला नेता चुकतोय हे दिसत असूनही लोक त्याच्या मागे का जातात?’ ‘या प्रश्नांचाही वेध घेतला आहे. शेवटी लेखक म्हणतोः हट्टीपणा करणं हा मनुष्य स्वभावच आहे, हे स्वीकारायला शिका. आणि नंतर कंसात पुस्ती जोडतो: हे तुम्ही स्वीकारणार नाही याची मला जाणीव आहे. उलट आपलं मत दुसऱ्याला पटवून देण्याकरता वादविवाद करणंच कसं योग्य आहे, हे तुमचं मत आणखीनच घट्ट झालं असणार !

‘माणसं भेदभाव का मानतात?’ या प्रकरणात ही उपजत वृत्ती आहे की संस्काराचा भाग आहे, ही भावना टाळत येईल का या विषयावर गेली वीस पंचवीस वर्षे चाललेल्या संशोधनाचा आढावा घेतला आहे. आणि विज्ञान हे तटस्थ, अलिप्त, उदासीन असते असे म्हणतात, ते एका परीने खरेच आहे. पण जरा खोलवर डोकावून पाहिले तर त्यामागचा मानवी चेहरा दिसायला लागतो. कारण विज्ञानाची उपासना करणारी ही माणसंच असतात. हाडामासाची माणसे. मानव जातीचे कल्याण चिंतणारी माणसे. साधुसंतांनी जे सांगून ठवले आहे, तेच ती वेगळ्या प्रकारे सांगत असतात. त्यांच्यालेखीही भेदभाव अमंगळच असतात. येथे सर्व लेखांबाबत सांगण्याऐवजी एवढेच सांगतो की, ते मुळातून वाचण्याचा आनंद वाचकांनी घ्यावा, सहजपपणे अनेक गोष्टींची ओळख होईल, आणि त्यांबद्दल अधिक वाचण्याची प्रेरणाही मिळेल. रविमुकुल यांनी तयार केलेले सूचक मुखपृष्ठ पुस्तकात काय असेल याबाबतची उत्सुकता वाढवणारे आहे.

'मनोगत' मध्ये जावडेकरांनी शेवटी म्हटले आहे 'माणसांच्या अनुचित वर्तनाला अप्रत्यक्षपणे मेंदू जबाबदार असतो, हे खरं असलं तरी याचा अर्थ ते वर्तन समर्थनीय किवा अटळ असतं असं मुळीच नाही. उलट त्यामागचा कार्यकारण भाव समजून घेतला तर ते टाळता येणं शक्य होईल. निदान आपण इतरांना (आणि स्वतःलाही) जास्त चांगलं समजून घेऊ शकू. जरा शहाणे होऊ. समंजस बनू. थोडे अधिक सहिष्णू होऊ. इतकं झालं तरी पुस्तक लिहिण्याचा उद्देश सफल होईल'.

(दु)र्वर्तनाचा वेध
लेखक: सुबोध जावडेकर
प्रकाशक: अशोक केशव कोठावळे, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पाने: २५२
किंमत: ३०० रुपये.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com

Tags: pustak parichay Subodh javadekar ketkar Load More Tags

Add Comment