आगळे वेगळे पॅरिस ऑलिंपिक

पॅरिस येथे नुकत्याच पार पडलेल्या 'ऑलिंपिक 2024'वर दृष्टिक्षेप..

प्रसिद्धीपासून दूर असलेल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लहान गावातून, साध्या परिस्थितीतून आलेल्या स्वप्नील कुसाळे याच्याकडून याच कारणांमुळे कोणीच फारशा अपेक्षा केल्या नव्हत्या. पण नवव्या वर्षापासूनच शूटिंगचा ध्यास घेऊन घरापासून दूर - प्रथम नाशिक आणि नंतर पुण्यात बालेवाडी संकुलात दाखल झालेला, आई सरपंच झाली तरीही तिला भेटायला न गेलेला स्वप्नील फक्त ऑलिंपिक पदकाचाच ध्यास घेऊन होता. मार्गदर्शक दीपा देशपांडेही त्याच्या या वृत्तीवर खुश होत्या. तो एकाग्रतेने वाटचाल करत होता. या दीड तपाच्या साऱ्या परिश्रमांचे फळ त्याला ब्राँझपदकाच्या रूपाने मिळाले आहे.

यंदाच्या पॅरिसमध्ये झालेल्या 2024 च्या ऑलिंपिकची सांगता झाली आहे. शंभर वर्षांनंतर पॅरिसला ऑलिंपिक आयोजनाचा मान पुन्हा एकदा मिळाला होता. हे ऑलिंपिक ‘ग्रीन ऑलिंपिक’ म्हणजे पर्यावरण पोषक ऑलिंपिक असेल असे अगोदरच जाहीर करण्यात आले होते. त्याप्रमाणे या ऑलिंपिकमध्ये प्रदूषणाचे प्रमाण लंडन आणि रिओ ऑलिंपिकप्रमाणे 50 टक्के ठेवण्यात आयोजन समितीने यश मिळवले, ही गोष्टही दाद द्यावी अशीच म्हणावी लागेल. स्वच्छ करण्यात आलेल्या सीन नदीच्या काठावरील लाखो प्रेक्षकांच्या साक्षीने, त्या नदीतूनच मोठ्या होड्यांतून खेळाडूंनी संचलन केल्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन ऑलिंपिक ज्योत पेटवून स्टेडियमध्ये करण्यात आले. स्वच्छ झालेल्या नदीत काही स्पर्धाही घेतल्या गेल्या.

यावेळी ऑलिंपिकमध्ये एकूण 206 संघ सहभागी झाले होते. त्यांत वैयक्तिकरीत्या तटस्थपणे सहभागी झालेल्या खेळाडूंचा संघ (AIN - Individual Neutral Athletes) आणि निर्वासित खेळाडूंचा संघ (EOR - Equipe Olympique des Refuges) हे देखील सहभागी झाले होते. एकूण 10,500 खेळाडूंचा यात सहभाग होता. महत्त्वाची बाब म्हणजे पुरुष आणि महिला खेळाडूंची संख्या समान म्हणजे 5250 अशी होती. एकूण 32 खेळांचा - विविध सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांचा समावेश होता. त्यांच्या विजेत्यांसाठी एकूण 329 सुवर्णपदके तसेच रौप्य आणि ब्राँझ पदके होती. यावेळी ऑलिंपिकमध्ये ब्रेकिंग, स्पोर्टस क्लाइंबिंग, स्केटबोर्डिंग आणि सर्किंग या चार नव्या खेळांचा समावेश करण्यात आला होता.

या ऑलिंपिकमध्ये स्पर्धा शर्यतींत एकूण 13 जागतिक आणि 47 ऑलिंपिक विक्रमांची नोंद झाली. ते तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, कॅनुइंग, ट्रॅक सायकलिंग, शूटिंग, स्पोर्टस क्लाइंबिंग आणि जलतरण यांत नोंदवले गेले. लक्षणीय बाब म्हणजे तिकिटविक्रीही विक्रमी – 9 लाख 50 हजारांपेक्षा जास्त झाली. यजमान देश वगळता जगभरातून 1 लाख 45 हजार प्रेक्षक आले होते. रस्त्यावरील सायकल शर्यत दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिली. बीच व्हॉलीबॉललाही साडेचार लाख प्रेक्षक मिळाले. स्टेडियमधील स्पर्धांत रग्बीला 5 लाख 30 हजार, हॅन्डबॉलला पाच लाख अशी विक्रमी उपस्थिती होती. पुरुष-महिला समानतेला यावेळी महत्त्व देण्यात आले होते; त्यामुळे स्पर्धाधिकारी, स्वयंसेवकांत महिला आणि पुरुषांची संख्या सारखी होती. इतकेच काय 195 देशांच्या पथकांतही ही समानता होती हे विशेष. ऑलिंपिक ज्योत आणणाऱ्या खेळाडूंतही ही समानता दिसली. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलांच्या स्पर्धांसाठी विक्रमी गर्दी होती. पुरुषांसाठी 157 तर महिलांसाठी 152 स्पर्धा होत्या आणि 20 स्पर्धा मिश्र होत्या. याबरोबरच स्थानिक 904 तर आंतरराष्ट्रीय 4830 असे पत्रकार, 2113 वृत्तसंस्था आणि 1573 छायाचित्रकार, अशी विक्रमी उपस्थिती माध्यमांचीही होती. शिवाय महाजाल, अ‍ॅप्स इ. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचाही विक्रमी सहभाग होता. खेळ कोणताही असो, स्टेडियम प्रेक्षकांनी भरलेले असायचे. भारतात केवळ मोजक्या खेळांनाच प्रेक्षक गर्दी करतात. मग वेगवेगळ्या खेळांमधील स्पर्धकांना प्रोत्साहन देणे आणि सहाय्य करणे दूरच राहते. अशा परिस्थितीत क्रीडा-संस्कृतीची भाषा कितीही केली तरी ती करणे फोलच ठरणार, हे वेगळे सांगण्याची गरजच नाही.

भारताचा चमू 117 खेळाडूंचा होता. त्यात 110 स्पर्धक आणि आठ राखीव खेळाडूंचा समावेश होता. त्यांनी एक रौप्य आणि पाच ब्राँझ अशी एकूण सहा पदके मिळवली. मनू भाकरने महिलांच्या 10 मी. पिस्तूल शूटिंगमध्ये ब्राँझपदक आणि मिश्र 10 मी. पिस्तूल शूटिंगमध्ये सरबज्योत सिंगच्या साथीने ब्राँझपदक मिळवले. यामुळे एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके मिळवणारी ती भारताची पहिलीच खेळाडू ठरली. गेल्या ऑलिंपिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक मिळवणाऱ्या नीरज चोप्राला यावेळी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. खरे तर गेल्यावेळेपेक्षा त्याने यावेळी सरस कामगिरी केली होती. पण पाकिस्तानच्या अर्शद नदीमने विक्रमी फेक करून त्याला मागे टाकले. तरीही नीरज चोप्रा आता लागोपाठ दोन ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत पदक मिळवणारा सुदेश कुमार (कुस्ती) आणि पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन) यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. स्वप्निल कुसाळे (50 मी. रायफल थ्री पोझिशन शूटिंग), अमन सेहरावत कुस्ती (57 कि. गट) आणि भारतीय हॉकी संघ हे अन्य ब्राँझपदक विजेते होते. 

अमन सेहरावत

अमन सेहरावत हा भारताचा सर्वात लहान वयाचा पदकविजेता आहे. त्याने पदक जिंकले तेव्हा त्याचे वय 21 वर्षे आणि 24 दिवस इतके होते. याआधी हा मान पी. व्ही. सिंधूचा होता तिने रिओ ऑलिंपिकमध्ये पहिले पदक (रौप्य) जिंकले तेव्हा तिचे वय 21 वर्षे, एक महिना व 14 दिवस होते. अमनने टोकियोला कुस्तीत 57 कि. गटात ब्राँझपदक मिळवणाऱ्या रवी दहियाला निवड चाचणीत हरवून ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळवला होता आणि रवी दहियाप्रमाणेच ब्राँझपदक मिळवून त्याने निवड सार्थ ठरवली. अमनचेही वजन ब्राँझपदकाच्या लढतीआधी सकाळी साडेचार किलोने वाढले होते. परंतु चाचणीपूर्वीच ते वजन कमी करण्यात त्याला यश मिळाले होते. रात्रभर वेगवेगळे व्यायाम करून आणि योग्य पदार्थांचे सेवन करून त्याने हे करून दाखवले होते. त्यामुळेच त्याला ब्राँझपदक मिळवता आले.

विनेश फोगटला मात्र 53 कि. गटाच्या निवड चाचणीत अंतिमने आधीच पात्रता मिळवल्याचे सांगून, पात्रता मिळवणाऱ्यांनाही चाचणीत सहभागी व्हावेच लागेल हा आपलाच नियम फेडरेशनने मोडला आणि त्यामुळेच विनेशला चाचणीत 50 कि. गटात सहभागी होणे भाग पडले. त्यात ती पात्रही ठरली होती. मात्र या प्रकारे गट बदलावा लागला म्हणूनच तिला आता केवळ 100 ग्रॅमने वजन जास्त भरल्यामुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगाला सामोरे जावे लागत आहे.

प्रसिद्धीपासून दूर असलेल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लहान गावातून, साध्या परिस्थितीतून आलेल्या स्वप्नील कुसाळे याच्याकडून याच कारणांमुळे कोणीच फारशा अपेक्षा केल्या नव्हत्या. पण नवव्या वर्षापासूनच शूटिंगचा ध्यास घेऊन घरापासून दूर - प्रथम नाशिक आणि नंतर पुण्यात बालेवाडी संकुलात दाखल झालेला, आई सरपंच झाली तरीही तिला भेटायला न गेलेला स्वप्नील फक्त ऑलिंपिक पदकाचाच ध्यास घेऊन होता. मार्गदर्शक दीपा देशपांडेही त्याच्या या वृत्तीवर खुश होत्या. तो एकाग्रतेने वाटचाल करत होता. या दीड तपाच्या साऱ्या परिश्रमांचे फळ त्याला ब्राँझपदकाच्या रूपाने मिळाले आहे. 

स्वप्नील कुसाळे

मात्र या यशस्वी खेळाडूंबरोबरच काहींचे पदक अगदी थोडक्यात हुकले. त्यांना चौथ्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले. यात मनू भाकर- 25 मी. पिस्तूल शूटिंग; अर्जुन बबूता - 10 मी. एअर रायफल; अंकिता भकत व धीरज बोम्मादेवरा - तिरंदाजी मिश्र; महेश्वरी चौहान व अनंतजीत सिंग - स्कीट नेमबाजी मिश्र; लक्ष्य सेन - बॅडमिंटन एकेरी; मीराबाई चानू - वेटलिफ्टिंग; हे ते खेळाडू. यामुळेच भारताचे खेळाडू यंदा टोकियोपेक्षाही चांगली कामगिरी करतील आणि भारताची पदक संख्या दोन आकडी असेल ही अपेक्षा अवाजवी नव्हती असे म्हणता येईल.

अपेक्षेबरहुकूम कामगिरी करणाऱ्या विनेश फोगटने कुस्तीमध्ये 50 किलो गटात सलामीलाच जागतिक स्पर्धा विजेत्या जपानच्या खेळाडूला पराभूत केले होते आणि नंतर गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर, नियमांप्रमाणे प्रत्यक्ष अंतिम फेरीपूर्वी दुसऱ्या दिवशी सकाळी वजन करण्यात आले तेव्हा तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याने बाद ठरवले गेले. (कुस्तीत अंतिम फेरी गाठणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली होती.) बाद ठरवण्याच्या निर्णयाविरुद्ध रौप्य पदक मिळावे म्हणून तिने तसेच भारतीय ऑलिंपिक समितीने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे दाद मागितली आहे. मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय 13 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. (निर्णय विनेशच्या बाजूने लागला तर भारताची पदकसंख्या गेल्या ऑलिंपिकएवढी म्हणजे सात होईल.)

उपान्त्य फेरीतील विजयानंतर विनेशचे वजन वाढले होते आणि रात्रभर ते कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करूनही सकाळी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त भरले होते. 57 किलो गटात अमन सेहरावतलाही सुमारे साडेचार किलो वजन एका रात्रीत कमी करायचे होते आणि ते करण्यात त्याला यश मिळाले. त्यामुळेच तो ब्राँझपदक मिळवू शकला. विनेशबाबत जे काही घडले ते तसे संशयास्पदच होते असे अनेकांना वाटते. कारण भारतीय कुस्ती फेडरेशनचे तत्कालीन अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून विनेशने न्याय मिळावा आणि ब्रजभूषण यांची हकालपट्टी व्हावी यासाठी साक्षी मलिक बजरंग पूनिया आणि अन्य काही खेळाडूंसह आंदोलन केले होते. पण त्यांची दाद न घेता त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली, नव्या संसदभवनापासून काही अंतरावरच त्यांच्यावर जवळजवळ हल्ला करून नंतर त्यांना रस्त्यावरून फरफटत नेले होते.


हेही वाचा : कुस्तीगीरांचा लक्षणीय विजय - आ. श्री. केतकर


पंतप्रधानांसकट सत्तारूढ पक्षाच्या कोणत्याही नेत्याने त्यांची दखल घेतली नव्हती. विरोधी पक्षनेते तसेच नीरज चोप्रा, कपिलदेव आणि काही प्रख्यात खेळाडूंनी मात्र आंदोलनाला प्रथमपासून पाठिंबा दिला होता. सरतेशेवटी ब्रजभूषणची हकालपट्टी केली गेली आणि नवी कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. पण तीमध्येही ब्रजभूषणच्या पित्त्यांचाच समावेश होता व याच कारणाने तिला मान्यता दिली गेली नव्हती. तरीही तत्या समितीतील ब्रजभूषणच्या जागी आलेला संजय सिंग आणि अन्य काही पदाधिकारी पॅरिसला गेले होते आणि ते काहीही करू शकतात या भावनेमुळेच असा संशय घेतला जात आहे. तो अगदीच अनाठायी म्हणता येणार नाही. आता सारे काही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती काय निर्णय देते यावर अवलंबून आहे. केवळ नियमावलीच्या आधारेच ते निर्णय घेतात, की एकूण परिस्थितीचा सारासार विचार करून निर्णय देतात ते पाहायचे. तो निर्णय काहीही असला तरी मान्य करावाच लागेल. याचा धक्का बसलेल्या विनेशची समजूत घालण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला हे चांगलेच आहे. पण जेव्हा ते संसदेत असताना काही अंतरावरच हमरस्त्यावर तिची फरफट केली जात होती, तेव्हा त्यांनी त्याची याच तत्परतेने दखल का घेतली नाही, असा अवघड प्रश्न आता केला जात आहे. अर्थात त्याचे उत्तर मिळेल अशी कोणाचीच अपेक्षा नाही. 

विनेश फोगट

ऑलिंपिक म्हटले की प्रथम आठवते, मॅरेथॉन शर्यत. यंदा या शर्यतीत इथिओपियाच्या तमिरात तोला (Tamirat Tola) याने ही दीर्घ पल्ल्याची शर्यत जिंकली. त्याने ही शर्यत 2 तास 6 मिनिटे आणि 26 सेकंदांत पुरी करून त्याचबरोबर ऑलिंपिक विक्रमही नोंदवला. तब्बल 24 वर्षांनी इथिओपियाच्या धावपटूने ही शर्यत जिंकली आहे. खरे तर मुळात तोलाचे नाव या शर्यतीसाठी देण्यात आले नव्हते. पण त्यांचा मूळ स्पर्धक सिस्से लेम्मान याने दुखापतीमुळे माघार घेतली आणि त्यामुळे तोलाला ही संधी मिळाली होती. विजयानंतर तोलाने आवर्जून लेम्मानचे आभार मानले. गेल्या वर्षी त्याने न्यू यॉर्क मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. ऑलिंपिक मॅरेथॉन दोनदा जिंकणाऱ्या केनयाच्या किपचोगेला मात्र यंदा ही शर्यत पूर्ण करता आली नाही आणि त्याने लगेचच ऑलिंपिकमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र इतर स्पर्धांत आपण सहभागी होत राहू असेही तो म्हणाला. महिलांमध्ये या शर्यतीत हॉलंड (नेदरलँडस) च्या एस. हस्सानने ही शर्यत जिंकताना 2 तास 22 मिनिटे 55 सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. या ऑलिंपिकमधील तिचे हे तिसरे सुवर्णपदक. मॅरेथॉनपूर्वी तिने 5000 मी. आणि 10,000 मी. या शर्यतींतही पहिला क्रमांक मिळवला होता. पुरुष व महिला मॅरेथॉनमध्ये विक्रमी कामगिरी नोंदली जाण्याचा वेगळाच विक्रम यंदा नोंदला गेला. अद्वितीय टेनिसपटू नोवाक योकोविचने कार्लोस अल्काराझचा पराभव करून सुवर्णपदक मिळवले. आजवर त्याला तेच हुलकावणी देत होते. ग्रँड स्लॅम मालिकेतील सर्व विजेतीपदे - एकूण 24 - जिंकणाऱ्या योकोविचने याप्रकारे त्याची आजवर अपुरी राहिलेली मनोकामना पुरी केली आहे. कोणालाही हेवा वाटावा असे हे त्याचे यश आहे. जिम्नॅटिक्समधील अमेरीकेच्या सिमॉन बाइल्सची कामगिरीही अविस्मरणीय म्हणावी लागेल.

या ऑलिंपिक नंतर काही प्रमुख खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली आहे. टेबल टेनिसमध्ये सहा सुवर्णपदके मिळवणारा आणि 14 वेळा जगज्जेता असलेलला चीनचा मो लाँग, तीन सुवर्णपदके मिळवणारा टेनिसपटू ब्रिटनचा अँडी मरे, मॅरेथॉन 2016 रिओ आणि 2020 टोकियो ऑलिंपिकमध्ये जिंकणारा आणि 13 प्रमुख मॅरेथॉनचा विजेता केनयाचा एलिउद किपचोगे, ब्राझीलचा फुटबॉलपटू मार्ता द सिल्व्हा, गॉल्फपटू न्यूझीलंडची लीटिया को, बॉक्सिंगमध्ये लागोपाठ दोन सुवर्णपदके जिंकणारी केली हॅरिग्टन, डेन्मार्कचा हँडबॉलपटू मिकेल हॅन्सेन, जलतरणात 14 सुवर्णपदके मिळवणारी ऑस्ट्रेलियाची एम्मा मॅकिऑन तसेच भारताचा सर्वोत्तम हॉकी गोलरक्षक श्रीजेश आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा हे ऑलिंपिकवर आपली छाप ठेवून जाणारे खेळाडू आहेत. ते यानंतर ऑलिंपिकमध्ये दिसणार नाहीत.

फ्रान्सचा जलतरणपटू लिऑन मार्चड चार सुवर्णपदके मिळवून देशवासियांच्या गळ्यातला ताईत बनला. तर चीनने डायव्हिंगमधील सर्व - आठ सुवर्णपदके जिंकून आगळाच विक्रम नोंदवला. या साऱ्याला साजेसाच समारोप सोहळाही होता. पुढचे ऑलिंपिक 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे. त्यासाठी सर्वांना येण्याचे आवाहन करून पॅरिस ऑलिंपिकची सांगता झाली.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


 

Tags: paris olympic olympics 2024 aman saharawat swapnil kusale vinish phogat a s ketkar sports sadhana digital green olympic Load More Tags

Add Comment