मोतिलाल नेहरू ते राहुल गांधी पाच पिढ्यांची, सव्वाशे वर्षांची वाटचाल बारकाईने आणि वस्तुनिष्ठपणे सांगणारा 'शोध ... नेहरू गांधी पर्वाचा!' हा ग्रंथ आहे. पाच पिढ्यांची वाटचाल सांगणारा हा ग्रंथ आकाराने मोठा म्हणजे 758 पानांचा आहे, यात काहीच आश्चर्य नाही. त्याच्या विषयाचा आवाकाच तेवढा आहे. वकील, कार्यकर्ता, पत्रकार, लेखक अशी वाटचाल करणाऱ्या सुरेश भटेवरा यांनी दीर्घकाळच्या परिश्रमांना संशोधनाची जोड देऊन हा ग्रंथ सिद्ध केला आहे. सारे जगच कोरोनाच्या सावटात असताना, त्या काळात घराबाहेर पडणेही अवघड झालेले असताना, पत्रकारितेचा दीर्घ अनुभव, स्वतःजवळचे संदर्भ ग्रंथ, लेख, कात्रणे आणि महाजालाचा पुरेपूर वापर करून त्यांनी हा घरबंदिस्तीचा वेळ कारणी लावला. या कामामध्ये त्यांनी घेतलेल्या यापैकी काहींच्या पूर्वी घेतलेल्या मुलाखतींचाही त्यांना नक्कीच उपयोग झाला असणार. एक दर्जेदार संदर्भग्रंथच कठोर परिश्रमांनंतर त्यांनी साकार केला आहे.
वास्तवाची जाणीव करून देणारा हा बहुमोल ग्रंथ प्रकाशित झाला, त्याला वर्ष झाले. दरम्यान त्याच्या तीन आवृत्त्याही निघाल्या आहेत. पण देशासाठी सतत लढणाऱ्या, प्रसंगी प्राणांचे मोल द्यावे लागलेल्या पाच पिढ्यांच्या कार्याची समग्र नोंद करणाऱ्या या ग्रंथाची तितकीशी दखल कुणी घेतलेली दिसत नाही याचे वाईट वाटते. त्याला काही कारणे असतील. कदाचित नेहरूद्वेषाचा हेतुपूर्वक प्रचार केला जात असण्याच्या या काळात, काही अनामिक धास्ती संबंधितांना वाटत असावी. पण खरे तर अशा पार्श्वभूमीवर तर या पाच पिढ्यांचे मोल चांगलेच अधोरेखित होते. कारण दीर्घकाळ त्यांना प्रतिकूल परिस्थितीबरोबरच सामना करावा लागला होता. त्यांच्या महत्त्वाच्या कामांवर स्वतःचाच हक्क सांगणारा कुणी आपल्या देशातच निपजेल, असे कुणाला वाटलेही नसेल. पण तसे होत आहे. म्हणूनच सर्वांना खरे काय ते योग्य प्रकारे, पुराव्यानिशी सांगण्याचे महत्त्वपूर्ण काम लेखकाने केले आहे.
पाच पिढ्यांच्या कार्याचा इतिहास सांगणाऱ्या या ग्रंथाचे साहजिकच, 'मोतिलाल नेहरू', 'जवाहरलाल नेहरू', 'इंदिरा गांधी', 'राजीव आणि सोनिया गांधी'; 'राहुल... प्रियांका... वरुण गांधी', असे पाच भाग आहेत. पहिल्या भागात, ‘असे घडले मोतीलाल’, ‘सक्रिय राजकारणात मोतीलाल’, ‘अमृतसर अधिवेशनाचे अध्यक्ष’, ‘स्वराज पार्टीची स्थापना’, ‘नेहरू रिपोर्ट आणि महानिर्वाण’ ही प्रकरणे आहेत. मूळच्या कौल घराण्याचे नेहरू हे नाव कसे झाले हे सांगून नंतर त्यांच्या पूर्वजांचा संक्षिप्त इतिहास सांगितला आहे. मोतिलाल यांचा जन्म त्यांचे वडील गंगाधर यांच्या निधनानंतर तीन महिन्यांनी झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांचा भाऊ नंदलाल याने केला. खरे तर नंदलालहून मोठा बन्सीधर. ते ब्रिटिश सरकारच्या दिवाणी न्यायालयात रुजू झाले. त्यांच्या परिश्रमामुळे ते कारकून ते सहन्यायाधीश पदापर्यंत पोहोचले. पण त्यांची यामुळे वारंवार बदली होत असे. त्यामुळे मोतीलालची जबाबदारी नंदलाल यांनी स्वीकारली. राजस्थानच्या खेतडी रियासतीत त्यांनी नोकरी पत्करून दिवाणपदापर्यंत प्रगती केली.
दहा वर्षांनंतर नंदलाल यांच्या मनात कौटुंबिक वारसा जपण्याची जिद्द निर्माण झाल्याने, निर्धाराने कायद्याचा अभ्यास करून ते वकील बनले. त्या काळातील भारतीय वंशाचे ते पहिले वकील होते. मोतिलाल तेव्हा नऊ वर्षांचे होते. नंतर मोतिलाल यशस्वी वकील कसे बनले ते आणि त्यांच्या वकिलीतील नैपुण्याबाबतची डॉ. राजेंद्र प्रसाद यांची आठवणही लेखक सांगतो. स्वतंत्र भारतासाठी राज्यघटनेचा प्रस्तावित मसुदा मोतिलाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला. त्यात प्रत्येकाला लोकशाहीतले मौलिक अधिकार आणि हक्क मिळालेच पाहिजेत इ. खास तरतुदी होत्या. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेतील बऱ्याच कळीच्या मुद्द्यांना या मसुद्याने स्पर्श केला होता. त्यांचा कर्मकांडावरील अविश्वास, मुलगा आणि सुनेवरील प्रेम याबाबतही लेखक सांगतो. नंतरच्या प्रकरणात पहिल्या महायुद्धाच्या काळात निर्माण झालेले राष्ट्रीय चैतन्य, गांधीजींचा प्रभाव, होमरूल आंदोलन, जालियनवाला बाग हत्याकांड हे विषय आहेत. अमृतसर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांचे जे प्रचंड स्वागत झाले तेव्हा त्यांनी मनोमन, भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करावे लागले तरी बेहत्तर, त्यासाठी आपली तयारी असली पाहिजे अशी प्रतिज्ञा केली. अध्यक्षीय भाषणात रौलट कायद्याची हजेरी घेताना ते म्हणाले, “खटला न भरता कोणत्याही नागरिकाला अटक करून कितीही काळ तुरुंगात डांबायचे असा हा काळा कायदा ब्रिटिशांनी आणला आहे. तो राष्ट्रीय गौरवावरील कलंक आहे”. या दीर्घ भाषणाबरोबरच चौरीचौरा हत्याकांडाबाबतची त्यांची आणि जवाहरलाल यांची प्रतिक्रिया किती तीव्र होती तेही लेखक सांगतो.
1922 च्या अखेरीस काँग्रेस पक्षात असहकार आंदोलनात थोडेफार परिवर्तन करावे की नाही आणि नॅशनल असेंब्ली व प्रांतीय विधानसभांवर बहिष्कार घालावा का नाही, या मुद्द्यांवर वाद निर्माण झाला. राजगोपालाचारी, वल्लभभाई असे नेते ‘जैसे थे’च्या बाजूने होते. शक्तिपरीक्षेत ते जिंकल्याने मोतिलाल आणि चित्तरंजनदास यांनी काँग्रेस अंतर्गत ‘स्वराज पार्टी’ची स्थापना केली. विरोधी पक्षनेते म्हणून मोतिलाल यांचे कामही सांगितले आहे. प्रस्तावित राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी मोतिलाल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने ऑगस्ट 1929 मध्ये अहवाल सादर केला. तो ‘नेहरू रिपोर्ट’ म्हणून ओळखला जातो. त्याबाबतचे ‘नेहरू रिपोर्ट’ हे प्रकरण आहे. महानिर्वाण या प्रकरणात मोतिलाल यांचे राष्ट्र उभारणीसाठीचे काम लेखकाने वर्णिले आहे.
‘जवाहरलाल नेहरू’ हा विभाग दहा प्रकरणांचा आहे. ‘जवाहर आणि कमला’ या प्रकरणात त्यांच्या लहानपणापासून विवाहापर्यंतच्या आणि नंतरच्या काळातील दोघांचे जीवन आहे. जवाहरलाल यांच्यावर टिळक आणि गांधीचा प्रभाव शिकत असतानाच पडला होता. टिळकांनी ‘केसरी’मधून ब्रिटिश राजसत्तेवर केलेली कडकडून टीका आणि गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत केलेल्या अभिनव चळवळीच्या बातम्याही इंग्लंडमध्ये पोहोचत होत्या. इंग्लंडमध्ये शिकताना या गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर पडला. वडिलांना लिहिलेल्या पत्रात ते स्वातंत्र्य चळवळीची आस्थेने चौकशी करून, वडिलांनीही तिच्यात भाग घ्यावा म्हणून आग्रह करत. कायद्याचे शिक्षण घ्यायची इच्छा नसतानाही केवळ वडिलांच्या इच्छेनुसार ‘इनर टेंपल’मध्ये प्रवेश घेऊन ते बॅरिस्टर बनले. लवकर लग्न करण्याची त्यांची इच्छा नव्हती पण कमलाचा फोटो पाहिल्यावर ते लग्नास तयार झाले.
विवाहानंतर वर्षभरानंतर इंदिराचा जन्म झाला. जवाहरना स्वातंत्र्य आंदोलनात मुक्तपणे भाग घ्यायचा होता. पण मोतिलाल पदोपदी अडवत. त्यावेळी कमला जवाहरच्या बाजूने उभी राहायची. या लढ्यात केवळ पतीची सावली म्हणून राहायचे नसल्याने, ती स्वतः देखील सत्याग्रहात भाग घ्यायला लागली. गांधीजींच्या प्रभावामुळे तिचे जीवन बदलले. बहुतांश ते तुरुंगात गेल्यावर सत्याग्रहाची जबाबदारी महिलांनी घेतली. अलाहाबाद काँग्रेसचे नेतृत्व कमला नेहरूंनी केले. सविनय कायदेभंग चळवळीत त्यांना दोनदा अटक झाली. तेव्हा एका पत्रकाराला त्या म्हणाल्या, “पतीच्या पावलावर पाऊल टाकून मी तुरुंगात जात आहे, याबद्दल कमालीचा आनंद आहे. भारताचा ध्वज सदैव उंच फडकत राहावा, ही माझी आकांक्षा आहे”. त्यांच्या या बोलण्याने तुरुंगातील नेहरूंना सर्वाधिक आनंद झाला.
1931 मध्ये मोतिलाल यांचे देहावसान झाले. मार्चमध्ये दिल्ली करार झाला तेव्हा जवाहर-कमला दोघेही बरेच थकले होते. यानंतर कमला नेहरूंची तब्येत खालावत गेली. पाचच वर्षांनी त्यांचे निधन झाले. 20 वर्षांचा संसार संपला. जवाहरलालच नाही, तर इंदिरा गांधींवरही कमलांचा प्रभाव होता. पण नियती, इतिहास आणि साहित्य यांनी त्यांना न्याय दिला नाही. नेहरूंच्या काल्पनिक प्रेमकथा त्यांच्या हितशत्रूंनी अचाट कल्पनाशक्तीने रंगवल्या. त्यांच्या मृत्यूनंतर 57 वर्षांनीही वास्तवाच्या हेतुपुरस्सर विपर्यासाने त्यांचे प्रतिमाभंजन करण्याचे उद्योग थांबलेले नाहीत. एडविना माऊंटबॅटन आणि नेहरूंचे प्रेम शारीरिक संबंधांशी निगडित असावे, अशी अफवा दीर्घकाळ चर्चेत होती. “एडविना यांची मुलगी पामेला हिक्स हिने, 2012 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आत्मकथेत (‘डॉटर ऑफ एंपायर, लाइफ अॅज अ माऊंटबॅटन’), कुटुंबाच्या वतीने या गॉसिपचा पर्दाफाश केला. त्यानंतर तरी ही चर्चा थांबायला हवी होती, पण नेहरूद्वेषाने पछाडलेल्यांना बदमाशीची ही मोहीम अजूनही थांबवावीशी वाटत नाही”, असे लेखक म्हणतो.
नेहरूंना आयुष्यात नऊ वेळा तुरुंगवास झाला. त्यांना 3259 दिवस, म्हणजे जवळपास नऊ वर्षे तुरुंगात राहावे लागले. फुटकळ आरोपांमुळे त्यांना अडकवून ठेवणे सोपे होते. कारण नेहरू बाहेर राहणे राज्यकर्त्यांना परवडणारे नव्हते. या तुरुंगवासातल्या ठळक घटना आणि आठवणी नेहरूंनी लिहिल्या आहेत. त्यातील त्यांची शब्दप्रतिभा मौल्यवान आहे. म्हणून त्यातील निवडक घटनांचा संक्षिप्त भावानुवाद लेखकाने ‘नऊ वर्षांचा तुरुंगवास’ या प्रकरणात दिला आहे. त्या काळात त्यांचे 21 तुरुंगांत वास्तव्य होते. या तुरुंगवासाचे तपशील प्रकरणाअखेर दिले आहेत.
‘भारताची फाळणी आणि नेहरू’ या प्रकरणात, ‘ही फाळणी ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील भारताची झाली नाही, तर फक्त ब्रिटिश प्रांतांची झाली’ असे सांगताना 11 ब्रिटिश प्रांत, त्यात 6 हिंदू तर 5 मुस्लीमबहुल. याशिवाय 562 संस्थाने होती, हे स्पष्ट केले आहे. स्वातंत्र्यानंतर ही संस्थाने काही काळ स्वायत्त झाली असती. पण स्वतंत्र भारतात सरदार पटेलांनी साम, दाम, दंड, भेद नीती वापरून विलिनीकरण घडवून 1949 साली एकात्म भारताची घटना स्वीकारण्यास हैदराबादसह सर्व संस्थानांना भाग पाडले. पंतप्रधान असताना वाजपेयींना एकाने “अखंड भारताचे स्वप्न पुरे होणार का?”, असा प्रश्न केल्यावर ते उत्तरले, “भूमी आयेगी तो लाग आयेंगे, उनका क्या करोगे?” त्यावर तो निरुत्तर झाला. ‘पंडित नेहरू, सरदार पटेल आणि सुभाषचंद्र बोस’ या प्रकरणात लेखक सांगतो, “भारतापुढे मोठ्या समस्या असताना प्रत्येकजण स्वभाव, अंतःप्रेरणा, कायम जपलेली निष्ठा या गोष्टींना प्राधान्य देत कामकाज करणार होता. मतभेदाचे प्रसंगही उद्भवले, पण त्यांचे स्वरूप इतके गंभीर नव्हते की परस्परांविषयीची आत्मीयताच नष्ट व्हावी”. सरदार म्हणत, “मी जवाहरपेक्षा वयाने मोठा आहे. त्याला सल्ला देणे हे माझे कर्तव्यच आहे. माझे बहुतांश सल्ले त्याने स्वीकारले”. सुभाषबाबूंच्या एका कार्यक्रमात नेहरू म्हणाले होते, “आमच्यात मतभेद जरूर होते, मात्र सुभाषबाबूंचे मन स्वच्छ होते. त्यांच्या देशभक्तीबाबत कुणाच्याच मनात शंका नव्हती. त्यांचा लढा सर्वांना स्फुरण देणाराच ठरला.”
नंतरची प्रकरणे ‘पंतप्रधान नेहरू’, ‘परराष्ट्र धोरण आणि काश्मीर’, ‘नेहरूंचे आधुनिक भारताच्या उभारणीतील योगदान’ ही आहेत. यात नेहरुंच्या धोरणामुळेच जगातल्या अलिप्त राष्ट्रांची मदत भारताला झाली. तसेच रशिया आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रगटांकडून कधी एकेरी तर कधी दुहेरी मदतही भारताला मिळाली. पाकिस्तानच्या आक्रमणानंतर काश्मीरच्या राजे हरिसिंग यांनी मदत मागितली, तेव्हा विलीनीकरणासाठी त्यांनी ‘आधी विलीनीकरण मगच मदत’ असे सांगितल्यानेच ते शक्य झाले. त्यांच्या निधनानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तीन युद्धे झाली; पण जानेवारी 1949 च्या पहिल्या युद्धानंतर हा विषय जिथे थांबला, तिथेच तो आजही आहे. नियंत्रणरेषाही तशीच आहे, हे लेखक दाखवून देतो. या माहितीबरोबरच नेहरूंनी उभारलेल्या संस्था, महत्त्वाचे प्रकल्प यांची यादीच दिली आहे. या वास्तवामुळे ‘आमच्यापूर्वी कुणी काहीच केले नाही’ असा दावा करणाऱ्यांचे पितळ उघडे पडते. या संस्थांनी देशाला खूपच लाभ झाला, तर सध्याच्या पंतप्रधानांच्या मोठमोठे पुतळे, मंदिरे, उद्याने, सेंट्रल व्हिस्टा इ. मुळे नक्की कोणाचा फायदा झाला याचा विचार करणे वाचकाला भाग पडेल.
नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध छटा दाखवताना लेखक म्हणतो, ‘इतक्या मोठ्या (40 कोटी) लोकसंख्येचे जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांच्या गरजा भागवण्यासाठी अनेक आघाड्यांवर दिवसरात्र परिश्रमांची गरज आहे. तुमचे त्यासाठी मनापासून सहकार्य हवे आहे, असे कळकळीचे आवाहन ते प्रत्येक सभेत करायचे.’ व्यंगचित्रकार शंकर म्हणत की, नेहरूंच्या स्वभावात एक निरागस लहान मूल दडले आहे. उपजत धाडसी वृत्ती हा त्यांचा विशेष गुण. मरण अथवा निंदेला ते कधी घाबरले नाहीत. त्यांचा स्वभाव तापट होता. “लोकांकडून शिस्तीच्या खूप अपेक्षा मी बाळगतो. त्या पुऱ्या झाल्या नाहीत की माझी सहनशक्ती संपते. असे का घडते ते मला कळत नाही.” माओ आणि चौ एन लाय या नेत्यांना समजून जाणून घेण्यात नेहरूंची चूक झाली, असा समज आहे. पण 1952 सालीच नेहरूंनी गुप्तहेर खात्याला Treat China as India’s potential enemy number one - ट्रीट चायना अॅज इंडियाज पोटेन्शिअल एनिमी नंबर वन, असे टिपण पाठवले होते. चीनच्या धोक्याची त्यांना पुरेपूर कल्पना होती. ‘द गिल्टी मेन ऑफ 1962’ या पुस्तकात मंकेकर म्हणतात, “चीनबाबत नेहरू आणि भारत सरकार कधीच बेसावध नव्हते.” भारताच्या सरसेनापतींनी त्यावेळी नेहरूंना संगितले होते की, चीनने भारतावर आक्रमण केले. तर लष्करी तयारीच्या दृष्टीने आपण त्याला तोंड देऊ शकणार नाही. 1950 पासून 1962 पर्यंत चीनचे संभाव्य आक्रमण टाळण्याचा नेहरू प्रयत्न करत होते. याच काळात त्यांनी चीनशी मैत्रीचा पंचशील करार केला होता. युद्ध चीनने थांबवले, कारण भारताला पाश्चात्त्य देशांची मदत झाल्यास दूर अंतरावर रसद पोहोचवणे कठीण जाईल, हा विचार त्यामागे होता. त्यामुळे 2500 चौ. मैलाचा प्रदेश स्वतःकडे ठेवून 6000 चौ. मैल भूभाग त्यांनी सोडून दिला. चीनच्या विश्वासघाताचा त्यांना मोठा धक्का बसला. त्यातून ते सावरू शकले नाहीत.
‘प्रसन्न नेत्याचा अखेरचा प्रवास’ नेहरूंच्या खचून जाण्याने ‘त्यांच्यानंतर कोण?’ ही चर्चा सुरू झाली होती. त्याकाळातच ‘कामराज योजना’ आणण्यात आली. ती गाजली पण त्यामागील हेतू कोणालाच उमगला नाही. पण त्यानंतर नेहरू खचले. काळाने अचानक झडप घातली तर काय करायचे ते त्यांनी पूर्वीच लिहून ठेवले होते. त्यानुसार त्यांच्या राखेचा चिमुकला अंश अलहाबादला गंगेत विसर्जन करून उरलेली राख शेतकरी कष्ट करतात त्या शेतांमध्ये विखरून टाका, ही त्यांची इच्छा पुरी केली गेली. त्यामुळे त्यांचे वास्तव्य साऱ्या भारतात शेतकऱ्यांच्या शेतात, गंगेच्या प्रवाहात आणि हिमालयाच्या गिरिशिखरांत झाले. लेखक म्हणतो, “पूर्वी नेहरू भारतमय होते. त्यांच्या निधनानंतर सारा भारत नेहरूमय झाला. जगभर लोकांच्या हृदयात आजही या शांतिदूताचे स्थान अढळ आहे.”
इंदिरा गांधीवरील तिसरा भाग हा सर्वात मोठा भाग आहे. इंदिराजींचे जीवन हे बालपणापासूनच अनेक अडीअडचणींनी भरलेले होते. आणि नेहरूंच्या निधनानंतर त्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. स्वपक्षीयांनीच त्यांच्याविरोधात खूप प्रयत्न केले, तरी इंदिराजींनी त्यांतून धीटपणे, अनेकदा धोका पत्करून मार्ग काढला. त्यांचे बालपण, तारुण्य, फारसे सुखी नसलेले वैवाहिक जीवन याबाबत तर लेखक सांगतोच, पण स्वपक्षीय आणि विरोधकांचे कुटील बेत फोल ठरवण्याचे त्यांचे कौशल्यही वर्णन करतो. पंतप्रधानपद स्वीकारण्यापासून नंतर काँग्रेसमधील फूट, रुपयाचे अवमूल्यन, बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे व अन्य सुविधा बंद करण्याचा निर्णय यात त्यांना किती विरोध झाला ते लेखक खुलासेवार देतो. बांगलादेशाच्या निर्मितीमधील त्यांचे धाडस आणि त्यामुळे लोकांच्याच काय पण विरोधकांच्याही स्तुतीस त्या पात्र ठरल्या होत्या. त्याआधी त्यांनी रशियाबरोबर करार केला होता आणि अमेरिकेला पाकिस्तानला मदत करण्याआधी विचार करावा लागेल याची तरतूद करून ठेवली होती. हा त्यांचा मास्टरस्ट्रोकच होता. ‘नाम’ चळवळ बळकट करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. या साऱ्याची माहिती देणाऱ्या प्रकरणांची नावे बोलकी आहेत. म्हणजे ‘जोन ऑफ आर्क’, ‘फिरोज आणि इंदिरा’, ‘प्रेमविवाहाचा दुःखान्त’, ‘राष्ट्रीय राजकारणाच्या परिघात’, ‘वादळावर स्वार... आक्रमक झेप’, ‘देदीप्यमान दुर्गा’. ती वाचताच त्यांत काय वाचायला मिळणार याचा अंदाज येतो.
त्यांचा 16 मे 1975 रोजी ‘सिक्कीमचे भारतात विलिनीकरण’ करण्याचा निर्णय देशासाठी खूपच महत्त्वाचा होता. 330 वर्षांची नामग्याल राजघराण्याची सत्ता त्यादिवशी संपुष्टात आली. थोंडुफ नामग्याल यांनी अमेरिकन मिस होप कूक या तरुणीशी 1963 मध्ये विवाह केला होता. दोनच वर्षांनी या दांपत्याने स्वतःला सिक्कीमचे महाराज आणि महाराणी घोषित केले. महाराणीने भारताच्या विस्तारवादाला आळा घालण्याच्या हेतूने एक स्टडी फोरम स्थापन केला. 1950 च्या करारानुसार सिक्कीम वेगळे राजसत्ताक असले, तरी पूर्णतः स्वतंत्र व सार्वभौम नव्हते. सिक्कीमच्या जनआंदोलनाची मागणी भारतात विलीन व्हावे अशी होती. 14 एप्रिल 1975 ला सार्वत्रिक जनमताच्या चाचणीत 98 टक्के जनतेने विलीनीकरणाच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे अमेरिकेचे बेत कसे उधळले गेले, ते सारे मुळातूनच वाचायला हवे.
आणीबाणी जाहीर करण्याची कारणे लेखक नोंदवतो आणि ती अपरिहार्य कशी होती ते सांगतो. भ्रष्टाचार तर आधीपासूनच सुरू होता मग 1974 नंतरच्या काळातच जयप्रकाश नारायण यांना ‘समग्र क्रांतीची’ गरज का वाटली? ‘हमला चाहे जैसा होगा, हात हमारा नही उठेगा’ अशी त्यांची भूमिका होती तर नवनिर्माण आंदोलनातील हिंसाचाराविरुद्ध त्यांनी कोणते पाऊल उचलले? असे प्रश्नही लेखक उपस्थित करतो. पण त्याबरोबरच, आणीबाणी जाहीर झाल्यानंतरच्या अनेक घटना अशा होत्या की स्वतः इंदिरा गांधींनीही त्यांचे समर्थन केले नाही, उलट देशाची वेळोवेळी जाहीर माफीच मागितली आहे, याचे विस्तृत विवेचनही नंतरच्या, ‘संजय गांधी... आणीबाणी आणि पराभव’ या प्रकरणात लेखकाने केले आहे. इंदिराजींनी आपण होऊन जाहीर केलेल्या निवडणुकांत त्यांचा दारूण पराभव झाला. 1977 च्या त्या निवडणुकांनंतर देशात एक पर्व संपले. लोकांना आपल्या सुप्त सामर्थ्याची जाणीव झाली. इंदिराजींना सत्तेच्या बंधनामुळे जनतेबरोबरचे सूर सापडेनासे झाले होते. पराभवानंतर सत्तेच्या पिंजऱ्यातून मुक्त झालो, या भावनेनेच त्यांनी पराभव स्वीकारला. आणीबाणी जाहीर होण्याआधीपासूनच संजयचा मनमानी धुडगूस सुरू झाला होता, त्याला हेकटपणाची जोड होती. आणीबाणीनंतर त्यात मोठी भरच पडली. लोकांचे नेहरू आणि इंदिराजी यांच्यावरील प्रेम तो लहानपणापासूनच पाहत होता. त्यामुळे देश आणि इथली जनता यांच्यावर आपलीच मालकी आहे अशी त्याची समजूत होती. त्यामुळे योजना कितीही चांगल्या असल्या, तरी त्यांची अंमलबजावणीही काळजीपूर्वक करावी लागते, तरच त्या यशस्वी होतात. ही गोष्टच संजयच्या ध्यानात आली नसावी किंवा या बाबीला तो महत्त्व देत नसावा. अनेक गोष्टी इंदिराजींच्या कानावरही जात नव्हत्या, त्यामुळे त्यांना देशात, विशेषतः उत्तर भारतात काय चालले आहे याची कल्पनाच नव्हती. त्यांचा सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. परिणामी त्या जनतेपासून दूर गेल्या होत्या. आणीबाणीची आवश्यकता नाही असे वाटताच त्यांनी जनतेला उद्देशून भाषण केले व नंतर सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. याचे जयप्रकाश नारायण यांनाही कौतुक वाटले. ‘इंदिरेने धैर्य दाखवले आहे. खरोखरच खूप मोठे पाऊल उचलले आहे.’ आणीबाणीच्या काळात वादग्रस्त 42 वी घटनादुरुस्ती झाली. त्यामुळे जनमत बिघडण्यास मदतच झाली. असे असतानाही सल्लागारांचा सल्ला धुडकावून त्यांनी निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यात त्यांचा आणि संजयचा पराभव झाला. दक्षिण भारतात आणीबाणीची फारशी झळ बसली नव्हती, तेथे काँग्रेसला भरघोस यश मिळाले. त्या चार राज्यातील 129 जागांपैकी 122 काँग्रेसने जिंकल्या. ‘संजय... आणीबाणी आणि पराभव’ या प्रकरणात अशा अनेक घटनांबाबत सविस्तर विवेचन आहे.
निवडणुकीतील पराभवानंतर इंदिराजींच्याविरुद्ध किती कारवाया केल्या गेल्या आणि न डगमगता त्या या निर्माण केलेल्या अडचणींतूनही कसा मार्ग काढत होत्या, विरोधकांचे डावपेच त्यांच्यावरच कसे उलटवत होत्या या साऱ्याबाबत ‘सूडयात्रा... संघर्ष... बेलचीचा दौरा’ हे प्रकरण आहे. कृष्णमूर्तींनी काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला तेव्हा त्या म्हणाल्या ‘28 फौजदारी खटल्यांमध्ये मला आरोपी करण्यात आले आहे, आता माझ्यापुढे दोनच पर्याय आहेत. एक तर परिस्थितीशी झुंज देणे अथवा स्वतःचा विनाश पत्करणे.’ त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचे कानावर येताच त्यांनी संसदेत दाखल होण्याचा निर्धार केला. चिकमगलूर येथून त्या मोठ्या मताधिक्याने निवडूनही आल्या. त्याआधीच्या बेलचीच्या दौऱ्याची हकीगत आहे. जनता पक्षाचा वा कॉंग्रेसचा एकही नेता बेलची हत्याकांडाच्या स्थळी गेला नव्हता, ही बाब जनतेच्या ध्यानात आली. इंदिराच आपली तारणहार आहे, असा विश्वास जनतेला वाटायला लागला होता. ही सारी हकीगत मुळातूनच वाचण्याजोगी आहे.
राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे नंतर त्यांनी घेतलेली भरारी - त्यांच्या पुनरागमनाची कथा - नंतरच्या ‘सत्तेत शानदार पुनरागमन... संजयचे निधन’ या प्रकरणात आहे. प्रचाराला सुरुवात होण्याआधीच जयप्रकाश नारायण यांचे निधन झाले होते, त्यांच्या अंत्यसंस्काराला त्या उपस्थित राहिल्या. इंदिरा गांधींनी किती मेहनत घेतली ते पाहण्यासारखे आहे. 40 दिवसांत 40 हजार कि.मी. प्रवास करून त्यांनी दररोज सरासरी दहा सभा, याप्रमाणे 542 पैकी 250 मतदारसंघांत 350 जाहीर सभांत भाषणे केली. दर चारपैकी एका मतदाराने त्यांना पाहिले वा ऐकले. नंतर 15 डिसेंबर 1979 ते 4 जानेवारी 1980 दरम्यान त्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येईल, असे ‘इंडिया टुडे’ या नियतकालिकाने म्हटले होते. त्यांच्या या श्रमांना फळ आले आणि काँग्रेस पक्ष निर्विवाद बहुमताने निवडून आला. त्यांनी 350 जागांचा अंदाज केला होता पण प्रत्यक्षात त्यापेक्षा तीन जागा जास्तच मिळाल्या. त्यानंतर थोड्याच काळात संजयच्या अपघाती निधनाचा धक्का त्यांना सहन करावा लागला. मेनकाच्या वागण्याने मानसिक त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना विसंबून राहता येईल. अनेक कामे खंबीरपणे आणि झपाट्याने पार पाडेल आणि बाहेरच्या जगाच्या खिडक्या आपल्यासाठी खुल्या करून देईल, अशा व्यक्तीची गरज भासू लागली. ती जागा सोनियांचा सुरुवातीला विरोध असतानाही राजीवने भरून काढली.
त्यांचा पर्यावरणाच्या दृष्टीने घेतलेले ‘सायलेंट व्हॅली’ धरणाचे काम थांबवण्याचा निर्णय खूपच महत्त्वाचा होता.. 1980-84 या काळात त्यांनी 18 वेळा परदेश दौरा करून 40 देशांना भेटी दिल्या. आंध्र आणि कर्नाटक या दोन राज्याच्या निवडणुकांची जबाबदारी त्यांनी राजीव, अरुण नेहरू यांच्यावर सोपवली. पण निवडणूक लढवण्यासाठी जी मुत्सद्देगिरी आणि जाण लागते ती या दोघांत त्यावेळी नव्हती. परिणामी दोन्ही राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला. आसाममध्येही याचीच पुनरावृत्ती झाली. त्याला कारण होते नेल्ली येथील भयानक हत्याकांड. 1983 च्या मार्चमध्ये त्यांनी ‘नाम’चे (अलिप्त राष्ट्र संघटनेचे) अध्यक्षपद कॅस्ट्रो याच्याकडून स्वीकारले. आणि नंतरची नोव्हेंबरमधील ‘चौघम’ची बैठक ही त्यांच्या आयुष्यातील अखेरची आंतरराष्ट्रीय बैठक ठरली.
या विभागातील अखेरच्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार... इंदिरा गांधी यांची हत्या’ या प्रकरणात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही कारवाई करण्याची वेळ का आली हे सविस्तर सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे अन्य पर्यायच नव्हता हे कळते. कारण शीख दहशतवाद्यांना पैशाचा तोटा नव्हता. शस्त्रांची कमतरता नव्हती. त्याबरोबर भारतीय पोलिस आणि सेनादलात असलेल्या माहिती पुरवणाऱ्या हस्तकांचाही तुटवडा नव्हता. खलिस्तानवाद्यांपुढे एकच मार्ग होता. टोकाच्या धार्मिक मागण्या पुढे करून शिखांची डोकी भडकवायची. त्यामुळे अकाली दलाच्या सहाय्यानेच पंजाबमध्ये जहाल, अतिजहाल, अतिरेकी प्रवृत्ती वाढल्या होत्या. ज्या भिंद्रनवालेला कॉंग्रेसने जवळ केले तोच आता डोकेदुखी ठरत होता. काँग्रेसने त्याच्याबरोबरचे संबंध तोडले. त्यानंतरच हे ऑपरेशन कसे पार पडले त्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख कर्मचाऱ्यांना हटवावे अशी मागणी करण्यात आली. ती त्यांनी नामंजूर केली. खरे तर त्यासाठी पंतप्रधानांना कळवण्याचीही आवश्यकता नव्हती हेही लेखक सांगतो. पण या निर्णयानंतर शीख रक्षकांबरोबर एक बिगर शीख अधिकारी ठेवावा, असा निर्णय होऊनही तो अमलात आलाच नाही.
आपले दिवस संपत आल्याचा भास ऑक्टोबर 1984 मध्ये त्यांना होऊ लागला होता. एक मुलाखतीत सांगितले की, जोपर्यंत माझ्या ओठांवर स्मित आहे, मी हसू शकते, तोपर्यंत मी राजकारणात राहीन. 29 ऑक्टोबरला ओरिसाच्या सभेत त्या म्हणाल्या की, मी जिवंत राहीन की नाही, याची मला पर्वा नाही. पण मला याचा अभिमान आहे की, मी संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेत घालवले. अखेरच्या श्वाापर्यंत मी देशाची सेवा करत राहीन. माझ्या रक्ताचा थेंब अन्थेंब माझ्या मृत्यूनंतरही भारताला संजीवनी आणि सामर्थ्य देत राहील. 30 ऑक्टोबरला त्या रात्री दिल्लीत परतल्या. त्याआधी काही काळ शाळेत जाणाऱ्या राहुलच्या कानात त्या पुटपुटल्या होत्या की, माझे आयुष्य जगून झाले आहे... समजा, हिंसक पद्धतीने माझा मृत्यू ओढवलाच, तर हिंसा माझ्या मृत्यूत नव्हे, तर माझे प्राण घेणाऱ्याच्या विचारांमध्ये असेल. कोणाचाही द्वेष इतका गडद नक्कीच नाही की, देशबांधवांविषयी मला वाटणाऱ्या प्रेमावर त्याची छाया अतिक्रमण करू शकेल. त्यानंतर त्यांची हत्या आणि नंतरच्या घडामोडी सांगून हे प्रकरण संपते.
नंतरच्या ‘अंतिम यात्रा अन् सोनेरी ज्वाळा’ या प्रकरणात इंदिराजींच्या निधनानंतरची दिल्लीतील शीखविरोधी हिंसाचाराचे व नंतरच्या घटनांचे वर्णन आहे. अतिशय क्रूर आणि भयानक प्रकार या दंगलीत झाले. अडीच हजार लोक त्यात मारले गेले. पण लगेचच मदतकार्य केंद्र सरकारने आपल्या हाती घेऊन सारी मदत तात्पुरत्या शिबिरांकडे रवाना केली. शांतिवनात जिथे त्यांचा अंत्यविधी करण्यात आला तेथे 15 फूट उंचीचा एक मोठा खडक उभारला गेला व त्या स्थळाला ‘शक्तीस्थल’ असे नाव देण्यात आले.
चौथा विभाग ‘राजीव आणि सोनिया’ हा आहे. या या दोघांचे लहानपण, गाठभेट, लग्न इ.ची हकीगत आहे. केंब्रिजला शिकत असताना राजीवने पैसे कमावण्यासाठी ब्रेड बनवणे, आईसक्रीम विकणे, रस्ते खणणे अशी अनेक कामे केल्याचे त्यात समजते. लंडनच्या इंपिरिअल कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या अभ्यासक्रमासाठी त्याने प्रवेश घेतला, पण तो त्याला पुरा करता आला नाही. या काळातल्या काही रंजक घटनाही लेखक सांगतो. राजीवच्या राजकारणातील प्रवेशाला सोनियाचा प्रथम नकार होता पण संजयच्या मृत्यूनंतर आपल्या आईला मदत करणे हे राजीवचे कर्तव्य आहे. हे जाणवून या स्थित्यंतरालाही तिने परवानगी दिली.
नंतरच्या ‘राजकारणात प्रवेश ते पंतप्रधानपद’ या प्रकरणात राजकारणात प्रवेश केल्यानंतर राजीवने अमेठीतून निवडणूक लढवली आणि तो खासदार बनला. आशियाई क्रीडा स्पर्धांचे रेंगाळलेले काम करून स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आणि ती त्याने यशस्वीपणे पार पाडली. पण नंतरच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक विधानसभांची जबाबदारी त्याला पेलली नाही, योग्य अनुभव नसल्याने आणि जनमताचा अंदाज घेता न आल्याने दोन्ही राज्यांत काँग्रेसला नामुष्की पत्करावी लागली. एक कारण त्याने आंध्रमध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्याला दिलेली अपमानास्पद वागणूक. राजकारणात प्रवेश करणाऱ्या एन. टी. रामाराव यांनी या घटनेचा आंध्रमधील लोकांची अस्मिता जागवण्यासाठी पुरेपूर फायदा घेतला व प्रचंड यश मिळवले. कर्नाटकातही थोड्या फरकाने काँग्रेसला हार पत्करावी लागली. ज्या राज्यांनी इंदिरा गांधींना पुनरागमनासाठी हात दिला होता तेथेच काँग्रेसचा हा पराभव लाजीरवाणाच होता. काँग्रेसच्या महासचिवपदी त्याची नेमणूक करण्याची मागणी मान्य झाली. आता त्याला व्हिन्सेंट जॉर्ज हा विश्वासू सहाय्यक मिळाला होता. पण योग्य अनुभव घेण्यासाठी पुरेसा अवधीच मिळाला नाही. कारण ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ पाठोपाठ इंदिराजींची हत्या झाल्याने काहीसे अपघातानेच पंतप्रधानपद राजीव गांधींकडे आले. पाठोपाठ सर्वात्रिक निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी त्यांनी दाखवली आणि 24 ते 27 डिसेंबर 1984 दरम्यान झालेल्या या निवडणुकात काँग्रेसने विक्रमी 414 जागा जिंकल्या. सहानुभूतीची लाट तर होतीच पण त्यांच्या व्यक्तिगत मेहनतीचाही त्यात मोठा वाटा होता. 25 दिवसांत त्यांनी विविध मार्गाने 50 हजार कि.मी.चा प्रवास केला. या यशामुळे त्यांच्याबाबतची ‘नवशिक्या राजकारणी’, ‘पायलट कम नेता’ अशी कुजबुजीतील विचित्र विशेषणे आपोआपच निकालात निघाली. नंतरचे ‘ऑपरेशन रेस्क्यू मालदीव’ मात्र यशस्वी झाले.
नंतरच्या ‘पंतप्रधान राजीव गांधींची कारकीर्द’, ‘बोफोर्स... शहाबानो... शिलान्यास आणि श्रीलंका’ या प्रकरणांत भोपाळ गॅस दुर्घटना, शहाबानो खटला, अयोध्येतील शिलान्यास, श्रीलंकेच्या नागरी युद्धात हस्तक्षेप याबाबत माहिती आहे. बोफोर्स प्रकरणात राजीवचा कोणताही संबंध नाही हे दिल्ली हायकोर्टाने नंतर स्पष्ट केले. पण त्याचा फायदा भाजपने उठवला. त्याप्रमाणे शहाबानो, शिलान्यास यांचाही फायदा भाजपला मिळाला. केवळ चुकीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवून राजीवने हे निर्णय घेतले होते. ‘राजीव गांधींची हत्या’ आणि नंतरचे ‘हत्या की राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कारस्थान?’ ही प्रकरणे खिळवून ठेवणारी, तसेच विचार करायला लावणारी आहेत. राजीवच्या हत्येनंतर काही काळ राजकारणापासून दूर राहणेच पसंत करणाऱ्या सोनियांना राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेणे कसे भाग पडले आणि नंतर त्यांची नरसिंह राव, सीताराम केसरी, यांच्या कालखंडातील भूमिका, शरद पवार यांच्याबाबत त्यांना आदर कसा होता व त्यामुळेच त्यांनी आणि त्या अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय सल्लागार समितीने पवार यांच्या मंत्रालयाच्या कामात कधीच हस्तक्षेप केला नाही, पंतप्रधानपदाचा त्याग करून त्यांनी पवार यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता हे लेखक सांगतो. या भागातील ‘मैदानात उतरल्या सोनिया’ आणि ‘पंतप्रधानपदाचा त्याग’ ही प्रकरणे त्यांच्या गुणविशेषांची माहिती देतात.
अखेरचा भाग ‘राहुल... प्रियांका... वरुण गांधी’ हा आहे. त्यात राहुलबाबत बरीच माहिती देऊन त्याच्यावरील अनुचित टीकेलाही उत्तर दिले आहे. एक महत्त्वाची बाब लेखक सांगतो, "राहुलने सांगितलेल्या गोष्टींची यथेच्छ टिंगल करायची आणि नंतर हळूच त्यांची अंमलबजावणी करायची हे तंत्र सध्याच्या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाची प्रचीती देते." आपण कुणाचाच सल्ला मानणार नाही असा संदेश भक्तजनांत पोहोचवायचा हे लोकांना कळणार नाही, असा विश्वासही बाळगायचा हे जरा अतिच होते. भक्तजनांना कळणार नाही, पण ज्यांना बरेच काही सोसावे लागले आहे, अशांचा या ‘अच्छे दिन’ गाजावाजावर विश्वास कसा बसणार? महत्त्वाच्या बाबी टाळून भलत्याच गोष्टींना प्राधान्य देऊन जनतेचे भले कसे होणार हे कुणीच सांगत नाही. पण राहुल त्याविरुद्ध आवाज उठवतो. त्यांच्या गुणांबरोबरच त्यांच्यातील त्रुटींची नोंदही लेखक घेतो. त्यांच्यापुढील प्रचंड आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी त्या दूर करायला हव्यात हेही सुचवतो. ‘संघर्षरत प्रियांका आणि वेगळ्या वाटेवरचे वरूण’ या दोन प्रकरणांत त्या दोघांच्या वाटचालीबाबत सांगितले आहे. प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवे, तरच त्याला खऱ्या इतिहासाची नव्याने जाण होईल व तो खोट्या प्रचारापासून दूर राहील.
शोध... नेहरू गांधी पर्वाचा!
लेखक : सुरेश भटेवरा
पाने : 758; किंमत : 850 रुपये.
प्रकाशक : अरविंद घनःश्याम पाटकर
मनोविकास प्रकाशन, पुणे 411030
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Tags: नेहरू-गांधी काँग्रेस सोनिया गांधी भारत जोडो यात्रा राहुल गांधी गांधी घराणे लोकशाही आणीबाणी इंदिरा गांधी #bharatjodoyatra gandhi familiy history gandhi neharu family tree Load More Tags
Add Comment