आस्तिक गांधी आणि नास्तिक गोपराजू यांचा उद्बोधक संवाद

‘नास्तिकासोबत गांधी’ या पुस्तकाचा परिचय

1951 मध्ये इंग्रजीत प्रकाशित झालेले हे पुस्तक मराठीत आणण्याचा विचार 2023 मध्ये प्रत्यक्षात यावा‌ ही गोष्ट एका दृष्टीने महत्त्वाची आहे. गांधी अन्य सर्व मार्गांनी विस्मृतीत जावेत अशी रचना समाजाच्या एका विशिष्ट वर्गाकडून सतत होत असताना, गांधींची विशिष्ट भूमिका समोर आणण्यासाठी त्यांचा नास्तिकासोबत झालेला संवाद किती उत्तम होता, प्रेमळ होता. हे समोर आणण्यासाठी या पुस्तकाची प्रस्तुतता मला अधिक वाटते.

महात्मा गांधी स्वतःला सनातन हिंदू समजत, ते स्वतः आस्तिक होते. त्यामुळे त्यांनी एका नास्तिकासोबत काय चर्चा केली असावी असा प्रश्न साहजिकच वाचकांच्या मनात येऊ शकतो. आपली मते आग्रहीपणे मांडण्याच्या बाबतीत गांधी प्रसिद्ध होते; पण दुसऱ्यांची मते समजून घेण्यातही ते कसे वाकबगार होते, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचल्यावर येतो. गांधींचे एक अनुयायी गोपराजू रामचंद्र राव उर्फ ‘गोरा’ यांनी 1930 ला गांधीजींना पत्र पाठवून विनंती केली की, ‘मला तुमच्याशी नास्तिकवादावर चर्चा करायची आहे.’ गांधीजींनी पत्राला उत्तर दिले पण प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी मात्र 1944 मध्ये त्यांना साबरमती आश्रमात बोलावले. 1944 ते 1948 यादरम्यान गोरा यांनी गांधीजींसह चार वेळा नास्तिकवादाबाबत प्रत्यक्ष चर्चा केली. त्यांच्यात झालेल्या चर्चेचा सारांश म्हणजे हे पुस्तक. 

हे पुस्तक प्रथमतः ‘An Atheist with Gandhi’ या नावाने 1951 मध्ये इंग्रजीत आले. या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन अहमदाबाद येथील ‘नवजीवन पब्लिशिंग हाऊस’ यांनी केले होते. या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद विजय तांबे यांनी केला आहे. तांबे यांनी त्यांच्या आठ पानांच्या प्रास्ताविकात, त्यांना या पुस्तकाचा अनुवाद का करावासा वाटला ते सांगितले आहे. तसेच किशोर बेडकीहाळ यांनी 21 पानांमध्ये ‘पुस्तकाविषयी’ या शीर्षकाने लिहिले आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाला किशोरीलाल मश्रुवाला यांनी लिहिलेली 16 पानांची प्रस्तावना अनुवादकाने तशीच्या तशी अनुवादित केलेली आहे. याशिवाय वसंत पळशीकर यांचे ‘अस्तिक्यभाव’ हे 13 पानांचे परिशिष्ट पुस्तकात दिले आहे. यानंतर गोरा आणि गांधी यांच्या चर्चेचे विवेचन स्मरण टिपण पुढील 42 पानांत आहे. हा पुस्तकाचा मुख्य मजकूर मात्र चर्चात्मक आहे. वर उल्लेख केलेल्या आनुषंगिक लेखनामुळे पुस्तकाचे वाचनीय मूल्य निश्चितच वाढलेले आहे. 

गोपराजू रामचंद्र राव उर्फ गोरा हे गांधीवादी कार्यकर्ते होते‌. ते दक्षिणेत गांधीजींचा अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार पसरवत होते, प्रत्यक्ष काम करत होते. एका अर्थाने ते गांधीजींचे अनुयायी होते. त्यांनी त्यांच्या मुलीचा विवाह अस्पृश्याशी केला होता, तोही तो विवाह गांधीजींच्या आश्रमात झाला. असे ते कृतिशील अनुयायी असे असले तरी गोरा यांना गांधीजींचे आस्तिकत्व मात्र मान्य नव्हते. म्हणून त्यांनी गांधीजींशी पत्रव्यवहार करून, “मला तुमचा अस्तिकवाद समजून घ्यायचा आहे आणि माझा नास्तिकवाद समजावून सांगायचा आहे..” अशा तऱ्हेची विचारणा केली. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गांधीजींचे अनुयायी हे त्यांच्याशी काही बाबतीत टोकाचे वैचारिक मतभेद असणारेही होते. हे मतभेद उभयतांना मान्य होते पण त्यामुळे कामात अडचणी येत नव्हत्या.

या पुस्तकात आलेली गांधीजींची मते त्यांचा आस्तिकवाद समजून घेण्यासाठी, पुरेशी उपयुक्त नाहीत असे माझे वैयक्तिक मत आहे. गोरा यांनी मांडलेल्या नास्तिकवादाविषयीच्या मतांचा प्रतिवाद करण्यासाठी गांधीजींनी आपली मते मांडली आहेत. सुरुवातीच्या काळात गांधीजी ‘सत्य म्हणजेच ईश्वर’ असे मानत होते. नंतरच्या काळात त्यांनी ‘ईश्वर हेच सत्य’ अशी भूमिका घेतली.

पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाचे नाव ‘स्पष्टीकरण’ असून त्यात गोरा म्हणतात की, ‘मी नास्तिक आहे आणि चार वर्षे त्यांचा (गांधीजींचा) मला निकटचा सहवास लाभला. या काळात मी नास्तिकवादावर अनेक वेळा त्यांच्याशी बोललो. आमच्या संवादात ते नास्तिकवादावर जितके बोलले, तेवढ्या मर्यादेत मला त्यांची या विषयावरील मते माहीत आहेत. फेब्रुवारी 1948 मध्ये सेवाग्राम आश्रमात मी 10 दिवस यावे आणि रोज अर्धा तास चर्चा करून आमच्या मत-मतांतराबद्दलच्या विचारांना स्पष्ट आकार द्यावा असे ठरले होते. प्रत्यक्षात आम्ही भेटलो असतो, तर मी आता मांडले त्याहीपेक्षा जास्त मजकूर कदाचित आमच्या दोघांच्या सहीने प्रसिद्ध झाला अस‌ता, पण ते झाले नाही. इतके दिवस मला समजलेले गांधीजींचे नास्तिकवादावरील विचार त्यांच्या हत्येनंतर प्रसिद्ध करण्यात मला संकोच वाटत होता. कारण त्याचा पुरावा म्हणजे, माझा माझ्याबद्दलचा दृढविश्वास आणि मित्रांशी वेळोवेळी त्यांच्याविषयी बोलल्याने बळकट राहिलेली माझी स्मृती हे सोडून काही नाही. गांधीजींशी केलेली ही चर्चा मौल्यवान असल्याने ती कायमची नष्ट होऊ नये म्हणून आता हे पुस्तक प्रकाशित करण्याचे धाडस मी करत आहे.’ इतक्या प्रांजळपणे त्यांनी हे प्रकरण लिहिले आहे आणि गांधीजींची नास्तिकतेबद्दलची भूमिका स्पष्ट करून वाचकांसमोर ठेवली आहे. 


हेही वाचा : गांधींवर गरळ ओकण्याची प्रथा कधी संपणार? - मॅक्सवेल लोपीस


गोरा हे अस्पृश्यता निर्मूलनाचे आपलेच काम करत आहेत, याची गांधीजींना कल्पना होती. चर्चेदरम्यान त्यांनी गोरा यांना वारंवार सांगितले की, ‘तुम्ही जे काम करताहात त्याची प्रेरणा काय याच्याशी मला देणे घेणे नाही, तर तुम्ही जे काम करताहात ते समाजपयोगी आहे हीच मला अभिप्रेत असलेले प्रेरणा आहे. त्यामुळे तुम्ही नास्तिक असूनही जे काम करत आहात, तेच काम मी आस्तिक असून करत आहे. त्यामुळे दोघांच्या कामात नास्तिक असणे किंवा आस्तिक असणे हा मुद्दा होऊ शकत नाही’ हे त्यांचे प्रतिपादन मुळातूनच वाचायला हवे.

गांधी समजून घेणे ही अनेकांना जटील वाटणारी गोष्ट आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजून घेता घेताच आणखी नवे पैलू समोर येत राहतात. गांधी आस्तिक होते आणि ते नास्तिकांशी कसे वागत होते हा त्यांचा नवा पैलू यानिमित्ताने माझ्यापुढे आला. स्वतःशी विसंगत भूमिका असणाऱ्या माणसाशीसुद्धा गांधींजी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने वागत-बोलत होते. त्यांना त्या माणसाच्या वैचारिक भूमिकेपेक्षा तो करत असलेले काम किती समाजोपयोगी आहे, हे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटत होते. 

1951 मध्ये इंग्रजीत प्रकाशित झालेले हे पुस्तक मराठीत आणण्याचा विचार 2023 मध्ये प्रत्यक्षात यावा‌ ही गोष्ट एका दृष्टीने महत्त्वाची आहे. गांधी अन्य सर्व मार्गांनी विस्मृतीत जावेत अशी रचना समाजाच्या एका विशिष्ट वर्गाकडून सतत होत असताना, गांधींची विशिष्ट भूमिका समोर आणण्यासाठी त्यांचा नास्तिकासोबत झालेला संवाद किती उत्तम होता, प्रेमळ होता. हे समोर आणण्यासाठी या पुस्तकाची प्रस्तुतता मला अधिक वाटते. या पुस्तकात नमूद केलेला एक प्रसंग गांधीजींची एक वेगळीच ओळख करून देतो. गांधीजींनी आपले सचिव प्यारेलाल यांच्यामार्फत गोरा यांना सायंकाळी चार वाजता अर्धा तास भेटण्यासाठी बोलावले. गांधीजी वेळेच्या बाबतीत काटेकोर आहेत हे माहीत असल्याने लेखक त्यांच्या खोलीत बरोबर चार वाजता शिरले. गांधीजींचे आधी मुलाखत घेणाऱ्याबरोबरचे बोलणे संपतच आले होते. त्यांनी गोरा यांच्याकडे पाहून हसत म्हटले, “तू अर्धा मिनिट लवकर आलास.” त्यावर, “क्षमा करा, माझ्या घड्याळात चार वाजले आहेत.” असे उत्तर देऊन गोरा परत जायला वळले. तेव्हा गांधीजी म्हणाले, “परत जाऊ नको. घड्याळांमध्ये मतभिन्नता असेल पण आपल्यात नको.” इतक्या साध्या गोष्टीतून त्यांनी आस्तिक/नास्तिक असणे हा मतभेदाचा मुद्दा असू शकत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला. 

सुरुवातीलाच, किशोर बेडकिहाळ यांनी आस्तिक-नास्तिक वादाची चर्चा वेगळ्या पातळीवर जाऊन करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वसंत पळशीकर यांचे परिशिष्टदेखील अस्तिक्यभाव भाव समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहे. गांधी आणि गोरा यांना एकमेकांच्या कामाबद्दल तळमळ होती. त्यामुळे त्या दोघांत आस्तिक आणि नास्तिक हा भाव न राहता ‘आस्तिक्यभाव’ निर्माण झाला हा मुद्दा वसंत पळशीकर यांनी अधोरेखित केला आहे. या दोन्ही लेखांमुळे इंग्रजी आवृत्तीपेक्षा कदाचित हे मराठी पुस्तक वाचकांना अधिक ज्ञानसमृद्ध करणारे ठरेल असा विश्वास वाटतो. गांधीजी आणि गोरा चर्चा करत आहेत असे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी कल्पनेने योजले आहे. ते उचित आहे. मनोविकास प्रकाशनने हे पुस्तक 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रकाशित केले आहे. त्यामुळे एका अर्थाने या पुस्तकाला औचित्य आहे. गंभीर विषय असूनही तो सुरेखपणे प्रवाही करण्यात त्यांचा अनुवादक विजय तांबे यांचा हातखंडा जाणवतो. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे एक अत्यंत वाचनीय ऐवज बनले आहे. 

- देविदास वडगांवकर, धाराशिव


हेही वाचा : 

 

Tags: महात्मा गांधी नास्तिकासोबत गांधी अनुवाद आस्तिक नास्तिक मराठी साहित्य गांधीवाद An Atheist with Gandhi Load More Tags

Add Comment