टेनिसचे उगवते तारे 'यानिक सिनर' आणि 'मॅडिसन केज'

ऑस्ट्रेलियन ओपन 2025 टेनिस स्पर्धेचा आढावा

चुरशीच्या लढतीच्या अपेक्षेने आलेले प्रेक्षक सामन्यात रंगत यावी म्हणून झ्वेरेवला उत्तेजन देत होते, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सिनर काहीवळा नेटजवळ जात होता आणि तेथूनच झ्वेरेवला नाचवत होता. नेटजवळ जाऊन खळण्याचा प्रयत्न झ्वेरेवनेही केला. पण त्याला तेथून सिनरला चकवणारे फटके मारता आले नाहीत. उलड सिनर त्याच्या फटक्यांची पेरणी अचूक करत होता. कधी सीमारेषेजवळून जाणारे परतीचे फटके तर कधी झ्वेरेवचा अंदाज चुकवणारे, शिताफीने त्याच्या विरुद्ध बाजूला मारलेले फटके परतवण्याचे झ्वेरेवचे प्रयत्न फोल ठरत होते कारण तो चेंडूपर्यंत पोहोचूच शकत नव्हता. कधी सिनर अलगद नेटजवळ ड्रॉप टाकत होता आणि वेगाने तेथपर्यंत जाण्यात अपयश आल्याने झ्वेरेव गुण गमावत होता.

जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इटलीच्या यान्निक सिनरने क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवला सरळ सेटमध्ये हरवून लागोपाठ दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. तर महिलांमध्ये अमेरिकेची मॅडिसन केज पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धेत विजेती बनली. तेवीस वर्षे वयाच्या सिनरच्या या यशामुळे तो १९९२-९३ मध्ये असा पराक्रम करणाऱ्या जिम कुरियरनंतरचा सर्वात लहान वयाचा खेळाडू बनला आहे. आणि त्यानंतर या शतकात या स्पर्धेत असा विक्रम करणाऱ्या आंद्रे अगासी, रॉजर फेडरर, आणि नोवाक योकोविच यांच्या जोडीने त्याने स्थान मिळवले आहे. ग्रँड स्लॅम मालिकेतील सिनरचे हे तिसरे विजेतेपद. नव्या पिढीतील खेळाडूंत फक्त कार्लोस अल्काराझ हा चार विजेतेपदे मिळवणारा खेळाडू त्याच्या पुढे आहे. या विजयाबरोबरच सिनरने ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धांत हार्ड कोर्टवरील तीन अंतिम सामने जिंकले आहेत. कारण २०२३ ला येथील विजेतेपद आणि २०२४मध्ये खुल्या अमेरिकन स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर पाठोपाठ यंदाच्या हंगामातील या पहिल्या स्पर्धेतही तो अजिंक्य ठरला आहे.

रॉड लेव्हर प्रेक्षागारात प्रथम सीडेड सिनरची अंतिम लढत द्वितीय सीडेड झ्वेरेवबरोबर झाली. मात्र पहिले आणि दुसरे सीडींग असलेल्या या खेळाडूंमध्ये अटीतटीची झुंज होईल, ही प्रेक्षकांची अपेक्षा मात्र पूर्ण झाली नाही. सामना तसा एकतर्फीच झाला असे म्हणता येईल, कारण संपूर्ण सामन्यात सिनरने त्याची सर्व्हिस भेदण्याची एकही संधी झ्वेरेवला दिली नाही. (या शतकातील अंतिम सामन्यांतील ही तिसरी वेळ.) उलट पहिल्या सेटच्या आठव्या गेममध्ये त्याने झ्वेरेवची सर्व्हिस भेदून ५-३ अशी आघाडी घेतली आणि नंतर स्वतःची सर्व्हिस राखून तो सेटही जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये झ्वेरेवने जिद्दीने खेळ केला आणि स्वतःची सर्व्हिस भेटू दिली नाही, मात्र सिनरची सर्व्हिस भेदण्यातही त्याला यश मिळाले नाही आणि सेट टाय-ब्रेकरवर गेला. तेथेही सिनरच सरस ठरला आणि त्याने टाय-ब्रेकर ७-४ असा जिंकून दुसरा सेटही खिशात घातला. 

तिसऱ्या सेटमध्येही झ्वेरेवला प्रभाव पाडता आला नाही. तिसऱ्या सेटच्या सहाव्या गेममध्ये सिनरने झ्वेरेवची सर्व्हिस भेदली आणि ४-२ अशी आघाडी घेतली. आणि नंतर स्वतःची सर्व्हिस राखून ती ५-२ अशी वाढवली. नंतरच्या गेममध्ये झ्वेरेवने सर्व्हिस भेदू न देता सिनरची आघाडी ५-३ अशी कमी केली, तरी त्याने सामना गमावल्यातच जमा होता. कारण नंतरच्या गेममध्ये सिनरची सर्व्हिस होती. आणि प्रभावी बिनतोड सर्व्हिसच्या मदतीने सिनरने या गेममध्ये ४०-३० अशी आघाडी घेतली आणि नंतर झ्वेरेवला निरुत्तर करणाऱ्या एका अलगद क्रॉस कोर्ट फटक्याने सामना जिंकला. सिनर विजयी विरुद्ध झ्वेरेव ६-३; ७६ (७-४); ६-३. ग्राँ-प्री स्पर्धा मालिकेत विजेतेपद मिळवण्याचे झ्वेरेवचे स्वप्न या स्पर्धांत तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने अपुरेच राहिले. बऱ्याच काळ पहिल्या दहा खेळाडूत असलेला झ्वेरेव तरीही प्रयत्नशील राहणार हे नक्कीच. कारण काही वर्षांपूर्वी फेडरर, नदाल आणि योकोविच असे अव्वल खेळाडू शर्यतीत असतानाही त्याने एटीपी वर्षअखेरच्या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले आहे. त्याच्या दर्जाबाबत शंका नाही, तरीही ग्रँड स्लॅम मालिकेत मात्र तो अद्याप विजता बनलेला नाही. 

तसे पाहिले तर झ्वेरेव काहीशा नशिबानेच अंतिम फेरीत पोहोचला होता. उपान्त्य फेरीत पायाच्या दुखापतीमुळे योकोविचने पहिला सेट टाय-ब्रेकरवर गमावल्यानंतर सामना सोडला होता. (त्यावेळी प्रेक्षकांनी त्याला हिणवून त्याची नालस्ती केली होती. त्यावर उलट सुलट प्रतिक्रियाही आल्या. काहींनी त्याच्याशी सहमती दाखवली, तर काहींनी गोट (GOAT)- म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स, असा लौकिक मिळवणाऱ्या खेळाडूला अशा प्रकारची वागणूक देणे योग्य नाही, असे म्हटले.) अशा प्रकारे पुढे चाल मिळाल्याने झ्वेरेव अंतिम फेरीत दाखल झाला होता. खरे तर त्याने अधिक जोमाने प्रयत्न करून खेळ अधिक उंचीवर न्यायला पाहिजे होता. पण अंतिम सामन्यात त्याने केवळ दुसऱ्या सेटमध्येच काहीशी चमक दाखवली आणि तो सेट टाय-ब्रेकरपर्यंत नेला. पण तेथेही त्याला अपयशच आले. त्याच्याकडून अनेक चुका होत होत्या कधी त्याचे फटके नेटमध्ये तर कधी कोर्टबाहेर जात होते. त्याचे खरे अस्त्र त्याची प्रभावी सर्व्हिस आहे. पण त्याला ते फारसे उपयोगात आणता आले नाही, कारण कित्येक वेळा त्याची पहिली सर्व्हिस नेटमध्येच जात होती, तर कधी कोर्टबाहेर पडत होती. त्यामुळे दुसरी सर्व्हिस त्याला काळजीपूर्वक करावी लागल्याने वेग कमी होत होता, आणि त्यामुळे ती परतवताना सिनरला काहीच अडचण येत नव्हती. मात्र त्याच्या बिनतोड सर्व्हिस १२ म्हणजे सिनरच्या दुप्पट होत्या. तरीही तो सामन्यात मागे पडला कारण सिनरची सर्व्हिस परतवताना त्याच्याकडून वारंवार चुका होत होत्या. त्यामुळे त्याला स्वतःच्या बिनतोड सर्व्हिसचा फायदा घेता आला नाही. उलट सिनर मात्र त्याची सर्व्हिस सहज परतवत होता आणि त्याच्या क्रॉस कोर्ट फटक्यांनी झ्वेरेवला निरुत्तर करत होता. 

चुरशीच्या लढतीच्या अपेक्षेने आलेले प्रेक्षक सामन्यात रंगत यावी म्हणून झ्वेरेवला उत्तेजन देत होते, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सिनर काहीवळा नेटजवळ जात होता आणि तेथूनच झ्वेरेवला नाचवत होता. नेटजवळ जाऊन खळण्याचा प्रयत्न झ्वेरेवनेही केला. पण त्याला तेथून सिनरला चकवणारे फटके मारता आले नाहीत. उलड सिनर त्याच्या फटक्यांची पेरणी अचूक करत होता. कधी सीमारेषेजवळून जाणारे परतीचे फटके तर कधी झ्वेरेवचा अंदाज चुकवणारे, शिताफीने त्याच्या विरुद्ध बाजूला मारलेले फटके परतवण्याचे झ्वेरेवचे प्रयत्न फोल ठरत होते कारण तो चेंडूपर्यंत पोहोचूच शकत नव्हता. कधी सिनर अलगद नेटजवळ ड्रॉप टाकत होता आणि वेगाने तेथपर्यंत जाण्यात अपयश आल्याने झ्वेरेव गुण गमावत होता. झ्वेरेवने अंतिम फेरी गाठताना पौअल्ले, मार्टिनेझ, फिअर्नली, हम्बर्ट, पॉल आणि योकोविचला हरवले होते, तर सिनरने जार्टी, शुल्केट, गिरॉन, रुन, मिनॉर आणि शेल्टनला हरवले. अंतिम फेरीत पोहोचेपर्यंत दोघांना केवळ दोनदाच प्रत्येकी चार सेट खेळावे लागले होते.

यानंतर अनुकमे खुली फ्रेंच आणि विम्बल्डन स्पर्धा आहे. एक क्ले कोर्टवर तर दुसरी ग्रास कोर्टवर. गेल्या दोन वर्षांत त्याने या स्पर्धात उपान्त्य फेरी गाठली होती. २०२२ च्या अमेरिकन स्पर्धेत त्याने अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्याला तब्बल पाच तास १५ मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात कार्लोस अल्काराझकडून हार पत्करावी लागली होती. अल्काराझचे ते पहिलेच विजेतेपद होते. 

'मी २३ वर्षाचा आहे. त्यामुळे माझ्या खेळात सुधारणेला चांगला वाव आहे', असे सांगून सिनर पुढे म्हणाला, 'मला त्या कोर्टवरही चांगले यश मिळवायचे आहे. कारण माझे ध्येय सर्वांगीण, अर्थात अष्टपैलू खेळाडू बनण्याचे आहे. त्या कोर्टशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे, असे मला वाटते कारण खुली फ्रेंच स्पर्धा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. मी व्यावसायिक बनल्यानंतर एकदाही ज्युनियर गटात खेळलो नाही. अडचणींचा सामना करणे मला आवडते. कोर्टबाहेर बऱ्याच घटना घडतात आणि कोर्टवर उतरल्यानंतरही काही वेळा त्या अस्वस्थ करतात. परंतु माझी टीम आणि जवळचे लोक मला त्यातून बाहेर पडण्यास मदत करतात. कितीही गोंगाट असला तरी मी जणू काही कान बंद करून घेतल्याने त्याचा माझ्यावर परिणाम होत नाही, याचा मला अभिमान आहे'. गेल्या मार्च महिन्यात सिनरला उत्तेजकांच्या चाचणीला तोंड द्यावे लागले होते. तो दोन्ही चाचण्यांत अपयशी ठरला होता. मात्र त्याच्यावर तरीही बंदी घालण्यात आली नव्हती, हे महत्त्वाचे. 

महिलांच्या अंतिम फेरीत प्रथम सीडेड अरीना सबालेंका आणि एकोणिसावे सीडिंग असलेल्या मॅडिसन केज यांच्यात लढत होती. या लढतीत गतसालची विजेती सबालेंका सहज विजय मिळवेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु केजने उपान्त्य फेरीतच दुसरे सीडिंग असलेल्या इगा स्विआटेकचा तीन सेटमध्ये ५-७; ६-१, ७-६ (१०-७) असा पराभव केला होता. नंतरच्या अंतिम फेरीत केजने सबालेंकाला अत्यंत चुरशीच्या लढतीत ६-३; २-६ आणि ७-५ असे हरवले. या विजयाने केजचे स्वप्न साकार झाले. या दोघींमधली ही लढत चुरशीची होणार असा अंदाज होता. प्रत्यक्षातही त्याप्रमाणेच झाले. हा दोन तुल्यबल खेळाडूंतला सामना होता आणि त्यात डावे उजवे करता येणे शक्य नव्हते. गुण मिळवताना पहिल्या सर्व्हिसच्या टक्केवारीत सबालेंकाने ७० तर केज ६७ टक्के मिळवून थोडी पिछाडीवर होती; तर दुसऱ्या सर्विसच्या टक्केवारीतही सबालेंका ७५ टक्के तर केज केवळ ४८ टक्के असे चित्र होते. गुण मिळवण्यात केजने लागोपाठ आठ गुण मिळवले होते तर सबालेंकाला फेवळ सलग चार गुणच कमावता आले होते. मात्र सबालेंकाने दुसऱ्या सेटमध्ये ६-१ असा विजय मिळवताना सलग पाच गेम जिंकले होते. केजने असे यश आठ वेळा मिळवले होते. सबालेंकाने पाच वेळा सर्व्हिस करताना दुहेरी चूक (डबल फॉल्ट) केली तर केजने एकदाही सर्व्हस करताना दुहेरी चूक केली नाही. दोघींनीही प्रत्येकी ५८ सर्व्हस गुण मिळवले तर प्रत्येकी ११ सर्व्हस गेम्स जिंकले. यावरून सामना किती चुरशीचा झाला याची कल्पना येईल. या विजयामुळे अमेरिकेच्या केजने व्यावसायिक खेळाडू बनल्यानंतर जवळजवळ १६ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर आणि ग्रँड स्लॅम मालीकेतील स्पर्धात ४६ व्यांदा खेळताना हा विजय मिळवला. विजयी होण्यासाठी धीर धरा असे खेळाडूंना सांगितले जाते. पण धीर धरण्याची ही परिसीमाच म्हणायला हवी. या बाबतीत ती फक्त फ्लाविया पेनेट्टा आणि मारियन बर्टोली यांच्या मागे आहे. हा विजय मिळवल्याने ती व्यावसायिक खेळाडूंच्या असोसिएशनच्या (एटीपीच्या) क्रमवारीत पुन्हा पहिल्या दहामध्ये आली आहे.

सामन्यानंतर बोलताना सबालेंकाने 'केवळ ताकदीच्या खेळाच्या जोरावर केजला मागे टाकण्यात माझी चूक झाली', असे सांगीतले आणि नंतर ती म्हणाली की 'मी डावपेच अधिक चांगल्या प्रकारे आखायला हवे होते. तसे न झाल्याने ग्रँड स्लॅम स्पर्धा मालिकेत तिसरे जेतेपद मिळवण्याचा माझा बेत फसला, अर्थात ती ज्या प्रकारे खेळत होती, बेसलाइन लगत फटके पेरत होती आणि तिच्या खेळात जे सातत्य होते ते पाहता तिच्यावर मात करणे अवघडच होते कारण अनेकदा तिचे फटके परतवणे शक्यच नव्हते. ती या प्रकारे खेळत राहिली तर पहिल्या पाच खेळाडूंत ती स्थान मिळवू शकेल'.

हा सामना सबालेंकाने जिंकला असता तर लागोपाठ तीनदा येथे विजेतेपद मिळवणारी मार्टिना हिंगिसनंतरची ती पहिलीच खेळाडू ठरली असती. हिंगिसने येथे १९९७, ९८ आणि ९९ मध्ये अशी कामगिरी केली होती. 'मात्र तसे यश मला मिळवता आले नाही,' असे बेलारूसची, २६ वर्षाची सबालेंका म्हणाली. केजचा पती बियाँ फ्रेटँगेलो हाच तिचा प्रशिक्षक आहे. तिने या माजी टेनिसपटूशी दोन महिन्यांपूर्वी विवाह केला होता. अंतिम फेरी गाठताना सबालेंकाने स्टीफन्स, बौझाला, टास्न, अँड्रीवा, पौलिउचेंकोवा आणि बडोसा यांचा पराभव केला होता, तर केजने ली, रूज, कॉलिन्स्, रिबांकिना आणि स्विआटेक याांना नमवले होते. 

इतर विजेते : 

  • पुरुष दुहेरी : पॅटन हेलिओव्हारा विजयी विरुद्ध बालेल्ली व्हाव्हासोरी ५-७ (१६-१८); ७-६ (७-५); ६-३. 
  • महिला दुहेरी : टाउनसेंड सिनिआकोवा विजयी विरुद्ध हसिए (Hasieh) ओस्टापेंको ६-२; ६-७ (१-७); ६-३. 
  • मिश्र दुहेरी : गडेचकि (Gadechki) पीर्स (Peers) विजयी विरुद्ध बिरेल-स्मिथ ३-६, ६-४, १०-६. 

 

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत)

Tags: ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस सिनर केज टेनिस Load More Tags

Add Comment

संबंधित लेख