दीर्घकाळची प्रतीक्षा अखेर संपली!

अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत करून भारताने टी-ट्वेंटी या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले..

अफगाणिस्तान आणि अमेरिका यांची कामगिरी पाहता ते खरोखरच कौतुकास पात्र आहेत. नाही म्हटले तरी अफगाणिस्तान बराच अनुभवी आहे. त्याच्यात कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे, हे त्याने न्यूझीलंडला प्राथमिक फेरीतच हरवून दाखवून दिले होते. तरीही त्यांनी खरी कमाल केली ती अव्वल साखळीत ऑस्ट्रेलियावर मात करून. ऑस्ट्रेलियाला हा मोठाच धक्का होता. मात्र अफगाणिस्तानची ही यशस्वी वाटचाल अखेर उपान्त्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने रोखली, मात्र त्या सामन्यातही त्यांची कामगिरी दाद घेऊन गेली होती.

भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांपैकी टी-ट्वेंटी या अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या, जवळपास महिनाभर चाललेल्या आणि आजवरचे सर्वाधिक म्हणजे 20 संघ सहभागी झालेल्या स्पर्धेचे अजिंक्यपद अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत करून मिळवले. या आधी 2007 मध्ये ही स्पर्धा सुरू झाली, तेव्हा त्या पहिल्याच स्पर्धेत भारत अखेरच्या षटकात पाकिस्तानवर विजय मिळवून अजिंक्य ठरला होता. यावेळच्या विजयाची क्रिकेटप्रेमी कदाचित खेळाडूंपेक्षाही अधिक आतुरतेने वाट पाहत होते. आणि त्यामुळे या विजयाची गोडी वाढली आहे.

अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात आधीचे साखळी व बाद फेरीचे आठही सामने जिंकणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन तुल्यबळ संघांमधील लढत रंगणार अशी सर्वांचीच अपेक्षा होती आणि ती फोल ठरली नाही. प्रत्येकी 20 षटके मिळणाऱ्या या सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत उत्कंठा कायम होती. भारताने 177 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी पाहता ही मजल गाठणे त्यांना अवघड नव्हते. पण अखेर भारत सात धावांनी विजयी झाला तो हार्दिक पंड्याच्या, सामन्यातील शेवटच्या षटकातील प्रभावाने. कोणतेही दडपण न घेता त्याने हे षटक टाकले व संघाचा विजय नोंदवला. महत्त्वाची आणि त्याच्या अभिमानाची गोष्ट अशी की क्लासेन आणि मिलर या - केव्हाही सामना फिरवू शकणाऱ्या - धोकेबाज फलंदाजांचा अडथळा त्याने दूर केला. बुमराने त्याच्या पहिल्याच षटकात हेंड्रिक्सला बाद केले आणि नंतर आधीचा सामना जिंकून देणाऱ्या मार्को यान्सेनच्या यष्टी भेदल्या. त्याआधी भारताच्या फलंदाजीच्या सुरुवातीलाच कोहलीने यान्सेनवर जोरदार हल्ला चढवला आणि यान्सेन अखेरपर्यंत त्यातून सावरला नाही. तेच विजयाच्या दृष्टीने पहिले पाऊल होते. त्याच्या चार षटकांत भारताने 50 धावा केल्या.

खरे सांगायचे तर हा भारताचा सर्वार्थाने सांघिक विजय होता. कारण प्रत्येक खेळाडूचा हातभार त्याला लागला होता. रोहित शर्माचे नेतृत्व, एक बाजू सांभाळत धावा वाढवण्याचे (साखळी सामन्यांत अपेक्षेप्रमाणे खेळ न करणाऱ्या परंतु योग्यवेळी, अर्थात अंतिम सामन्यात सूर सापडलेल्या) विराट कोहलीचे कौशल्य, फलंदाजीत कमी पडलेल्या ऋषभ पंतची यष्टीरक्षणातील सफाई, मोठी अपेक्षा असलेल्या सूर्यकुमारने फलंदाजीतील अपयश झटकत अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर घेतलेला - भारताला विजयाचे दार उघडून देणारा - डेव्हिड मिलरचा अफलातून झेल, कोहली एक बाजू लावून धरत असताना अक्षर पटेलची, आणि त्याचाच कित्ता गिरवणाऱ्या शुभम दुबेची प्रतिपक्षाला हादरवणारी जोरदार फटकेबाजी, अर्शदीप सिंग, हार्दिक पटेल आणि जसप्रीत बुमरा यांची जास्त धावा न देता बळी मिळवणारी भेदक गोलंदाजी आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना मिळालेली क्षेत्ररक्षकांची साथ या साऱ्याने भारताला हा विजय मिळू शकला.

या विजयात दशकभराचे संघाचे मार्गदर्शक राहुल द्रविड यांचाही मोठा वाटा आहे. संघातील खेळाडूंच्या गुणावगुणांची त्यांना चांगली माहिती आहे आणि त्याप्रमाणे प्रतिस्पर्धी संघ पाहून ते कर्णधार आणि ज्येष्ठ खेळाडूंबरोबर सल्लामसलत करून डावपेच ठरवत होते. खेळाडूंवर पुरेपूर विश्वास ठेवत होते. अव्वल साखळीपासून त्यांनी संघात बदल केला नाही. त्यामुळेच खेळाडूंचा आत्मविश्वास बळावला होता. निवड समितीनेदेखील स्पर्धेतील सामने कोठे होणार आहेत आणि संभाव्य प्रतिस्पर्धी कोण असू शकतात या गोष्टींचा विचार करून संघाची निवड केली याचे श्रेय अजित आगरकर आणि त्याच्या सहकाऱ्यांना द्यावे लागेल. एक गोष्ट आठवते. ती म्हणजे, 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकली. तेव्हा निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे होते. त्यांनीही संघात अनेक अष्टपैलू खेळाडूंची निवड केली होती.

यंदा प्राथमिक साखळीत 20 संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली होती. त्या साखळीतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर मात करून भारताने विजयानेच स्पर्धेत सुरुवात केली होती. नंतर आयर्लंड, अमेरिका यांना पराभूत केले. पावसामुळे कॅनडाविरुद्धचा सामना मात्र होऊ शकला नाही. या गटातून भारत आणि अमेरिका अव्वल आठ संघांत पोहोचले. तेथेही प्रत्येकी चार संघांच्या अव्वल साखळीत सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियावर मात करून ‘आपण पूर्ण तयारीनिशी विजेतेपद मिळवण्यासाठीच आलो आहोत’ असा इशारा भारतीय संघाने सर्वच संघांना दिला होता. त्यानंतर अफगाणिस्तान आणि बांगलादेशवर मात करून उपान्त्य फेरीत प्रवेश केला होता. आणि गतविजेत्या इंग्लंडला हरवून अंतिम फेरी गाठली होती. दक्षिण आफ्रिकेनेही प्राथमिक साखळीत बांगलादेश, श्रीलंका, नेदरलँडस आणि नेपाळ यांच्यावर विजय नोंदवून नंतर अव्वल साखळीत इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि अमेरिकेला हरवून उपान्त्य फेरी गाठली होती. तेथे अफगाणिस्तानला पराभूत करून त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. जागतिक स्पर्धेत ते पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचले होते.

अफगाणिस्तान आणि अमेरिका यांची कामगिरी पाहता, ते खरोखरच कौतुकास पात्र आहेत. नाही म्हटले तरी अफगाणिस्तान बराच अनुभवी आहे. त्याच्यात कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे हे त्याने न्यूझीलंडला प्राथमिक फेरीतच हरवून दाखवून दिले होते. फारुकी आणि गुरबाज हे त्यांचे खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करणारे होते. कर्णधार राशिद खानच्या फिरकीची त्यांना साथ होती. तरीही त्यांनी खरी कमाल केली ती अव्वल साखळीत ऑस्ट्रेलियावर मात करून. ऑस्ट्रेलियाला हा मोठाच धक्का होता. मात्र अफगाणिस्तानची ही यशस्वी वाटचाल अखेर उपान्त्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने रोखली, मात्र त्या सामन्यातही त्यांची कामगिरी दाद घेऊन गेली होती.


हेही वाचा : निर्वासितांच्या छावणीत जन्मलेले अफगाण क्रिकेट - संकल्प गुर्जर


या स्पर्धेत यजमान म्हणून अमेरिकेला प्रथमच संधी मिळाली होती. अमेरिकेने अनेक खेळांत नाव कमावले आहे आणि ऑलिंपिकच्या पदक तालिकेत दर वेळी ते प्रत्ययाला येते. तेच विजयाच्या दृष्टीने पहिले पाऊल होते. तिथले खेळाडू 'तंत्र' आणि 'फिटनेस'वरही बारकाईने लक्ष देतात. याचेच प्रत्यंतर यावेळी आले. त्यांचा खेळ पाहताना, ते प्रथमच या स्पर्धेत खेळत आहेत यावर विश्वास बसू नये एवढा दर्जेदार त्यांचा खेळ होता. तेथे लोकप्रिय असलेल्या 'बेसबॉल' या खेळाशी क्रिकेटचे बरेच साम्य आहे, या गोष्टीचा त्यांना उपयोग झाला. गोलंदाजी आणि फलंदाजी यांबरोबरच त्यांनी क्षेत्ररक्षणावरही मेहनत घेतल्याचे जाणवत होते. तेथे स्थायिक झालेल्या, भारत आणि पाकिस्तानातील काही खेळाडूंचा समावेश त्या संघात होता. त्यातही सौरभ नेत्रावळकरने प्रभावी डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारताविरुद्धच्या खेळात त्याने सुरुवातीलाच रोहित आणि कोहलीला बाद करून कमाल केली होती. त्यांच्या जोन्सने एका सामन्यात दहा षटकार मारण्याचा आश्चर्यकारक पराक्रम केला होता. नंतर मात्र त्याला तशी चमक दाखवता आली नाही. अव्वल साखळीत पोहोचण्याचा मान मिळवल्यानंतर मात्र हा संघ फिका पडला. कदाचित एवढ्या सातत्याने खेळण्याची त्यांना सवय नसेल. पण आता पुढील स्पर्धेत थेट प्रवेश मिळाल्याने ते अधिक तयारीनिशी उतरतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. 

दुसरा यजमान संघ वेस्ट इंडीजचा. तोही तसा बलवानच. चेस, पूरन, पॉवेल आणि रसेल यांच्यासारखे धडाकेबाज, एकहाती सामना फिरवू शकणारे फलंदाज ही त्यांची जमेची बाजू. प्राथमिक साखळीत अफगाणिस्तान, न्यूझीलंड, युगांडा आणि पपुआ न्यूगिनी यांच्याबरोबरचे सामने जिंकून त्यांनी अव्वल फेरी गाठली होती. मात्र अव्वल साखळीत त्यांना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने हरवल्याने त्यांचे आव्हान बाद फेरीपूर्वीच संपुष्टात आले. श्रीलंकेवर मात्र प्राथमिक फेरीतच गारद होण्याची वेळ आली. चार सामन्यांत त्यांना केवळ एकच विजय नोंदवता आला. तोही नेदरलँड्सविरुद्ध. नेपाळविरुद्धचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. पण तो जिंकला असता तरी काही फरक पडला नसता कारण दक्षिण आफ्रिका आणि यांच्याविरुद्धचे सामने त्यांनी गमावले होते. तसे पाहिले तर नेदरलँडस आणि आयर्लंडचे संघही खूप सुधारले आहेत आणि बड्या संघांना हादरा देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. युगांडाने केवळ एक विजय पपुआ न्यूगिनीविरुद्ध मिळवला. स्कॉटलंडनेही दोन विजय नोंदवले. तर नामिबियानेही ओमानला पराभूत करून एकमेव विजयाची नोंद केली.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेने टी-ट्वेंटी सामने म्हणजे केवळ फलंदाजांची मक्तेदारी आणि त्यांची टोलेबाजी पाहून होणारे प्रेक्षकांचे मनोरंजन अशीच सर्वसाधारण समजूत झाली आहे. पण प्रथमच या स्पर्धेत जलदगती आणि फिरकी गोलंदाजांना फलंदाजांएवढीच संधी मिळाली. तिचा फायदा पुरेपूर उठवून त्यांनी आपली छाप पाडली. अशी समसमान संधी असलेले सामने अधिकच रंगतदार होतात आणि फलंदाजांच्या फटकेबाजीएवढीच मजा गोलंदाजांनी चांगल्या फलंदाजाचा त्रिफळा उडवलेला पाहण्यातही असते, हे प्रेक्षकांना उमगले. त्यामुळे सामने एकतर्फी न होता अधिक चुरशीचे होतात हेही कळले. अमेरिकेतील सामन्यांसाठी, तयार करून आणलेल्या खेळपट्ट्या वापरण्यात आल्या होत्या. फलंदाजांना त्यांवर खेळणे अवघड जात होते कारण चेंडू पडल्यानंतर कोठे जाईल याचा अंदाजच त्यांना येत नव्हता. गोलंदाजांनी या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवला आणि सामन्यांत चांगलीच चुरस निर्माण झाली. वेस्ट इंडीजमध्ये खेळपट्ट्या तशा खेळाडूंच्या सवयीच्या. त्यामुळे फलंदाजांचे काम काहीसे सोपे झाले होते. तरीही त्या खेळपट्ट्या गोलंदाजांनाही बऱ्यापैकी मदत करत होत्या. त्यामुळेच सामन्यांतील चुरस वाढली होती.

या साऱ्या गोष्टींमुळे आणि त्यातही भारताच्या विजयामुळे ही स्पर्धा दीर्घ काळ स्मरणात राहील. पुढील आयपीएल स्पर्धेत यातील काही खेळाडू दिसण्याची दाट शक्यता आहे. कारण रोहित, कोहलीसारखे काही खेळाडू यापुढे टी-ट्वेंटी सामन्यांत खेळणार नाहीत. अर्थात त्यांच्या जागी नवे खेळाडू येणार हेही स्पष्ट आहे. भारतातील अनेक नवोदित खेळाडू संधीची वाट पाहत आहेत. आणि संधी मिळताच तिचा फायदा कसा घ्यायचा हे यशस्वी जयस्वाल, शुभम दुबे, रिकू सिंग अशा खेळाडूंनी त्यांना दाखवून दिले आहे. भारताची दुसरी फळी पहिल्या फळीएवढीच दर्जेदार आहे आणि त्यामुळे एकदिवसीय तसेच कसोटी सामनेही भारत आत्मविश्वासाने खेळेल, असे समजण्यास हरकत नाही.

(वाचकांनी आकडेवारी रविवारच्या वर्तमानपत्रांत वाचली असेल म्हणून ती या लेखात दिलेली नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


हेही वाचा :
वरील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: a s ketkar cricket sports t20 world cup india america virat kohali Load More Tags

Add Comment