एका फोरहॅन्ड फटक्यावर अल्काराझने विजयी गुण नोंदवला. त्याचे लहानपणापासूनचे स्वप्न साकार झाले होते. सर्वात आधी नदालनेच त्याचे अभिनंदन केले आणि सावरलेल्या झ्वेरेवनेही उपविजेतेपदाचे बक्षिस घेतल्यानंतर केलेल्या भाषणात “तू ‘हॉल ऑफ फेम’ दर्जाचा खेळाडू आहेस”, या शब्दांत त्याचा गौरव केला. 2022 मध्ये अमेरिकन, गत साली विम्बल्डन आणि आता खुली फ्रेंच स्पर्धा अशी अल्काराझची चढती कमान आहे. स्पेनच्या नदालच्या झ्वेरेवकडून झालेल्या पराभवाचा बदलाच जणू अल्काराझने घेतला असे अनेकांना वाटले. या स्पर्धेत नदालचा वारसदार कोण याचे उत्तरच अल्काराझने टेनिस जगताला दिले आहे.
ग्रँड स्लॅम स्पर्धा मालिकेत स्पेनच्या अल्काराझने खुल्या फ्रेंच टेनिस स्पर्धेत प्रथमच विजेतेपद मिळवले. हे त्याचे ग्रँड स्लॅम स्पर्धा मालिकेतील तिसरे जेतेपद आहे. खुल्या फ्रेंच टेनिस स्पर्धेत लागोपाठ तिसऱ्यांदा महिलांचे विजेतेपद मिळवणाऱ्या पोलंडच्या इगा स्विआटेकने या स्पर्धेत एकूण चार वेळा तर ग्रँड स्लॅम स्पर्धा मालिकेत एकूण पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे, यावरूनच या दोघांची महानतेकडे वाटचाल सुरू झाली आहे असे दिसते.
सध्या या ग्रँड स्लॅम स्पर्धा मालिकेत एवढी विजेतीपदे मिळवणारे खेळाडू दुर्मीळच आहेत. याला कारण, जवळपास दोन दशके या खेळावर रॉजर फेडरर, राफाएल नदाल आणि नोवाक योकोविच यांचेच वर्चस्व होते. बाकी कुणाला संधी अशी मिळतच नव्हती. कारण विजेतेपद या तिघांपैकीच कुणाकडे तरी जायचे, हे जणू काही ठरल्यासारखेच झाले होते. पण आता या त्रिमूर्तीचा कालखंड बहुतेक संपला आहे. ‘बहुतेक’ म्हणायचे कारण, नदाल आणि योकोविच यांनी अद्याप फेडररप्रमाणे निवृत्ती जाहीर केलेली नाही. मात्र ते खेळत राहिले तरी आधीचा जोम त्यांच्यात आता कितपत असेल याबाबत शंका आहे. त्यातच आता या दोघांना दुखापती वारंवार सतावू लागल्या आहेत. या स्पर्धेत नदाल पहिल्या फेरीतच अलेक्झांडर झ्वेरेवकडून पराभूत झाला. स्पर्धेच्या आधीपासूनच त्याच्या फिटनेसबाबत शंका होती, तरीही केवळ भावनिक प्रेमामुळे रोलाँ गॅरोवर खेळण्याचा मोह, तेथे 14 वेळा विजेता ठरलेल्या नदालला आवरला नसावा. त्यामुळेच तो खेळला. पराभवाबाबत त्याला फारसे दुःख नव्हते. येथील हजेरी त्याच्या दृष्टीने महत्त्वाची होती. कधी नाही तो प्रथम सीडेड योकोविचही यंदा दुखापतींनी ग्रस्त होता आणि तरीही त्याची चमक कायम असल्याचेच दिसत होते. पण ते फसवे होते. त्यामुळे सेरुंडोलो विरुद्ध उपउपान्त्यपूर्व फेरीचा सामना 6-1, 5-7, 3-6, 7-5, 6-3 असा जिंकला तरी त्यानंतर पायाच्या दुखापतीमुळे त्याने उपान्त्यपूर्व फेरीत सातवे सीडिंग मिळालेल्या कॅस्पर रुडला पुढे चाल दिली.
नदालला आदर्श आणि त्याबरोबरच हीरो मानणाऱ्या कार्लोस अल्काराझने या विजयामुळे अनेक विक्रम केले आहेत. या स्पर्धेत अजिंक्य ठरलेला सर्वात लहान वयाचा खेळाडू हा मान त्याने नदालला मागे टाकून मिळवला. नदालने येथे पहिले विजेतेपद मिळवले त्यावेळी तो 22 वर्षे आणि सात महिन्यांचा होता, तर अल्काराझ गेल्याच महिन्यात 21 वर्षांचा झाला आहे. नदालचा सर्वात लहान वयाचा - क्ले, ग्रास आणि हार्ड अशा तीनही प्रकारच्या कोर्टवरचा - जेता ठरण्याचा मानही आता अल्काराझकडे आला आहे. अशा प्रकारची कामगिरी करणारे खेळाडू अगदी मोजके आहेत. जिमी कॉनर्स, मॅट्स विलँडर, आंद्रे आगासी, रॉजर फेडरर, राफाएल नदाल आणि नोवाक योकोविच. जाणवण्यासारखी बाब म्हणजे बियाँ बोर्ग, जॉन मॅकेन्रो, पीट सॅम्प्रस यांसारख्या महान खेळाडूंनाही ही किमया साधली नव्हती. त्यामुळेच अल्काराझच्या या विजयाचे महत्त्व. दुसरे म्हणजे स्पेनच्याच आंद्रेस गिमोनो, सर्गी ब्रुगुएरा, अल्बर्ट कोस्टा, कार्लोस मोया आणि अल्काराझचा स्वतःचा कोच जॉन कार्लोस फरेरो आणि नदाल या विजेत्यांच्या यादीत त्याचा आता समावेश झाला आहे.
कार्लोस अल्काराझ आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यातील तब्बल 4 तास 19 मिनिटे चाललेल्या अंतिम लढतीत खेळाचा दर्जा मात्र थोडा कमीच होता. त्या मानाने उपान्त्य फेरीत सिन्नरला पाच सेटमध्ये हरवताना अल्काराझ जास्त प्रभावी वाटत होता आणि झ्वेरेवही रुडविरुद्ध चार सेटमध्ये विजयी झाला होता, तेव्हाही चांगला खेळ पाहण्यास मिळाला होता. अंतिम सामन्यात मात्र हे दोन्ही खेळाडू वारंवार चुका करत होते. कदाचित त्यांच्यावर अपेक्षांचे दडपण आले असू शकेल. त्यांचे काही फटकेही अचूक नव्हते आणि कधीकधी ते बाहेरही जात होते. सुरुवातीला पहिल्या सेटमध्ये दोघांचीही पहिली सर्व्हिस वारंवार चुकत होती. झ्वेरेवने नंतर त्यात बऱ्यापैकी सुधारणा केली, पण अल्काराझला मात्र या त्रुटीवर अखेरपर्यंत मात करता आली नाही. अधूनमधून मोक्याच्या प्रसंगी मात्र तो बिनतोड सर्व्हिस करत होता हीच दिलासादायक बाब होती, त्याच्यासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीलाच झ्वेरेवची सर्व्हिस भेदून अल्काराझने आघाडी मिळवली आणि ती कायम राखून सेट 6-3 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र सुरुवातीलाच त्याला सर्व्हिस राखण्यात यश आले नाही. त्याची सर्व्हिस भेदल्यानंतर झ्वेरेवने त्याला संधीच मिळू दिली नाही आणि सेट 6-2 असा जिंकला.
तिसऱ्या सेटमध्ये मात्र झ्वेरेवने कमाल केली. अल्काराझ 5-3 अशा आघाडीवर असतानाही त्याने चिकाटीने खेळ केला, अल्काराझच्या दुबळ्या सर्व्हिसचा फायदा उठवून नववा गेम जिंकून अल्काराझची आघाडी 5-4 वर आणली आणि पुन्हा स्वतःची सर्व्हिस राखून गेममध्ये 5-5 अशी बरोबरी तर साधलीच, पण नंतर पुन्हा अल्काराझची सर्व्हिस भेदून त्याने आघाडी देखील घेतली आणि स्वतःची सर्व्हिस राखून तिसरा सेट 7-5 असा जिंकला. दोन एक सेटसच्या आघाडीनंतर त्याला आणखी एकच सेट जिंकण्याची गरज होती, तर अल्काराझला मात्र दोन सेट जिंकावे लागणार होते. त्यामुळे चौथ्या सेटला महत्त्व आले होते. पण आता अल्काराझने त्याचा खेळ उंचावला. पहिली सर्व्हिस अजूनही दगा देत होती तरी त्याने नंतर अचूक फटक्यांची पेरणी करून या कमतरतेवर मात केली आणि पाठोपाठ झ्वेरेवची सर्व्हिस भेदली. त्याला सूर सापडला होता. आधी काहीसा नर्व्हस भासणारा अल्काराझ आता नेहमीच्या जोमात खेळत होता. बेसलाइनवरूनच तो खेळाची सूत्रे हलवीत होता आणि त्यात त्याला चांगलेच यश येत होते. त्याबरोबरच प्रतिस्पर्ध्याचे फटकेही तो सहजी परतवू शकत होता. परिणामी झ्वेरेव निराश झालेला दिसत होता आणि भरीला वारंवार रागावत होता. पंचांबरोबर वाद घालत होता. कदाचित त्यामुळेच त्याची एकाग्रता भंग पावून त्याच्या खेळावर परिणाम झाला असावा. कारण आधीच्या दोन सेटमध्ये दिसलेली त्याची अचूकता आता दिसत नव्हती आणि त्यामुळे तो आणखीच चिडत होता. अल्काराझने त्याला केवळ एक गेम जिंकू दिला होता आणि सेट 6-1 असा जिंकून सामना दोन-दोन सेट असा बरोबरीत आणला होता.
आता निर्णायक पाचवा सेट. या वेळीही अल्काराझने सुरुवातीलाच झ्वेरेवची सर्व्हिस भेदली आणि मग मात्र झ्वेरेव पुरता खचून गेलेला दिसला. आता तो जणू काही उपचार म्हणूनच खेळत होता. अल्काराझचे वर्चस्व त्याने मान्य केले असेच दिसत होते. त्यामुळेच या सेटमध्ये चिवट झुंज पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा पुरी होऊ शकली नाही. शेवटचे हे दोन सेट, पूर्णपणे खेळावर अल्काराझची पकड असलेलेच होते. आणि एका फोरहॅन्ड फटक्यावर त्याने विजयी गुण नोंदवला. त्याचे लहानपणापासूनचे स्वप्न साकार झाले होते. सर्वात आधी नदालनेच त्याचे अभिनंदन केले आणि सावरलेल्या झ्वेरेवनेही उपविजेतेपदाचे बक्षिस घेतल्यानंतर केलेल्या भाषणात अल्काराझला “तू ‘हॉल ऑफ फेम’ दर्जाचा खेळाडू आहेस”, या शब्दांत त्याचा गौरव केला. 2022 मध्ये अमेरिकन, गत साली विम्बल्डन आणि आता खुली फ्रेंच स्पर्धा अशी अल्काराझची चढती कमान आहे. स्पेनच्या नदालच्या झ्वेरेवकडून झालेल्या पराभवाचा बदलाच जणू अल्काराझने घेतला असे अनेकांना वाटले. या स्पर्धेत नदालचा वारसदार कोण याचे उत्तरच अल्काराझने टेनिस जगताला दिले आहे.
महिलांच्या एकेरीत पोलंडच्या इगा स्विआटेकने क्ले कोर्टवरील वर्चस्व ही स्पर्धा तीन वेळा जिंकून सिद्ध केले होते. आणि यावेळीही अंतिम सामन्यात केवळ एक तास आठ मिनिटांत इटलीच्या जस्मिन पौलिनीवर 6-2, 6-2 अशी सहजी मात करून त्यावर शिक्कामोर्तब केले. नदालची जबरदस्त चाहती असलेल्या इगाने आपला ‘क्वीन ऑफ क्ले’ हा किताब सार्थ ठरवला आहे. याबरोबरच येथे लागोपाठ तीन वेळा अजिंक्यपद मिळवून नदालप्रमाणेच आपणही वर्चस्व गाजवणार असल्याचा इशारा दिला आहे. तिची प्रतिस्पर्धी जस्मिन पौलिनी ही तशी नवखीच. ग्रँड स्लॅम स्पर्धा मालिकेतील अंतिम सामन्यात ती प्रथमच खेळत होती. याआधी या मालिकेतील कोणत्याही स्पर्धेत तिला दोन फेऱ्यांपुढे मजल मारता आली नव्हती. तरीही पहिल्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये तिने इगाची सर्व्हिस भेदली, तेव्हा सामना चुरशीचा होणार असे वाटत होते. कारण त्यावेळी जस्मिनचा खेळ सर्वांगीण वाटत होता. पण हा अंदाज फसवाच ठरला. खेळाची ती पातळी तिला कायम राखता आली नाही. आणि या धक्क्यानंतर मात्र इगाची सामन्यावर पूर्ण पकड होती आणि ती अखेरपर्यंत तिने ढिली होऊ दिली नाही. या कोर्टवर कसे खेळायचे हे तिला चांगलेच माहीत आहे आणि त्यामुळे तिला हे यश आले. मात्र पौलोनीचे कौतुक करायला हवे आणि या अनुभवाचा आगामी स्पर्धांत ती उपयोग करील असे म्हणता येईल. दुहेरीतही तिच्याच देशाच्या, इटलीच्या, सारा एरानीच्या साथीने तिने अंतिम फेरी गाठली होती. पण तिथेही तिला यशाने हुलकावणीच दिली. अमेरिकेची कोको गॉफ आणि चेकोस्लोवाकियाची कॅटरीन सिमिनाओवा या जोडीकडून तिला आणि सारा एरीनाला 7-6, 6-3 अशी सरळ सेटमध्ये हार पत्करावी लागली.
ग्रँड स्लॅम स्पर्धा मालिकेत दुहेरीत 11 विजेतीपदे मिळवणाऱ्या भारताच्या बोपण्णाला यावेळी मात्र उपान्त्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. तसे पाहता ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेनच्या साथीने त्याने चांगले यश मिळवले आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेतही ही जोडी विजयी झाली होती. यावेळी मात्र इटलीच्या सिमॉन बोल्लेली आणि आंद्रिया वावास्सोरी या जोडीकडून बोपण्णा एब्डेनला हार पत्करावी लागली. पहिला सेट 5-7 असा गमावल्यानंतर बोपण्णा एब्डेन जोडीने चमक दाखवून दुसरा सेट 6-2 असा जिंकला होता. सामना जिंकण्यासाठी ते प्रयत्न करणार असे वाटत असताना इटालियन जोडीने पुन्हा जम बसवला आणि खेळावर नियंत्रण राखले. त्यांच्यापुढे बोपण्णा एब्डेनला काहीच करता आले नाही आणि त्यांनी तो निर्णायक सेट 6-2 असा गमावला होता. मिश्र स्पर्धेचे जेतेपद मिळवताना लॉरा सिग्मंड आणि एदुआर्द रॉजर-व्हॅसेलीन या जोडीने डिझारे क्रॉझिक आणि नील स्कुप्स्की या जोडीवर 6-4, 7-5 अशी मात केली.
टेनिसमधील तीन बड्यांचा कालखंड आता समाप्त होत आहे आणि त्यामुळे रुन, रुड, रुब्लेव, मेदवेदेव, निशिकोरी, कोर्डा, हुरकाझ, टॉमी पॉल, त्सित्सिपास, खाचानोव्ह, बेन शेल्टन, मिनॉर अशा अनेक खेळाडूंना आता चांगली संधी आहे. महिलांमध्ये सेरेना विल्यम्सच्या निवृत्तीनंतरच्या काळात आता इगा स्विआटेक, सबालेंका, ओअन्स जुबेर, रिबाकीना, कास्ताकीना अशा खेळाडूंत ज्याप्रमाणे स्पर्धा आहे तशी पुरुष खेळाडूंतही दिसेल अशी अपेक्षा बाळगता येईल. असे झाले तर टेनिसची शान कायम राहील. तरीही एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी की, कार्लोस अल्काराझमध्ये पूर्वकालीन महान खेळाडूंमध्ये होती तशी गुणवत्ता, जिगर, चिकाटी आणि चमक आहे, हे मान्य करावे लागेल. लहान वयातच आधीच्या महान खेळाडूंनी आपली छाप उमटवली होती आणि अल्काराझनेही आताच काही प्रमाणात ती दाखवून दिली आहे. त्यामुळे असे म्हणता येईल की, भविष्यकाळ त्याचाच असू शकेल!
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Tags: Carlos Alcaraz Iga Swiatek Roger Federer Rafael Nadal Rafa Djokovic ग्रँड स्लॅम आंद्रे आगासी रॉजर फेडरर राफाएल नदाल नोवाक योकोविच Load More Tags
Add Comment