सर्वात लहान वयाचा आव्हानवीर : भारताचा गुकेश दोम्माराजू

विश्वनाथन आनंदनंतर प्रथमच जागतिक बुद्धिबळ कँडिडेट स्पर्धा जिंकून गुकेशने जगज्जेता, चीनचा डिंग लिरेन याचा आव्हानवीर बनण्याचा मान मिळवला आहे.

यंदाच्या जागतिक बुद्धिबळ आव्हानवीर ठरवण्याच्या या कँडिडेट स्पर्धेसाठी भारताचे तीन खेळाडू पात्र ठरले होते. प्रज्ञानंद रमेशबाबू आणि विदित संतोष गुजराथी. गुण गुकेशचे एलो गुण प्रज्ञानंदपेक्षा कमी होते, आणि विदितला दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे फिडे क्रमवारीत 16 व्या स्थानावर असलेल्या गुकेशबद्दल मोठ्या अपेक्षा कुणी बाळगल्या नव्हत्या. अगदी माजी विजेता मॅग्नस कार्लसननेही. त्याचे मत असे होते की, हिराकु नाकामुरा, इयान नेपोमनिआच्टची आणि फॅबिआने कारुना यांच्यापैकी एकजण ही स्पर्धा जिंकेल. पण तसे काही घडले नाही.

सध्या देशभर चालू असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या गोंधळात, आश्वासने, आणि भूल-थापांच्या वर्षावात, खोट्या प्रचारात, अर्वाच्च भाषणबाजीत, (खरेतर ती शिवीगाळ म्हणणेच अधिक योग्य ठरेल), हमरीतुमरीत, दलबदलूंच्या लीला, हास्यास्पद घोषणा आणि ठराविकांच्या आचार संहितेच्या विरुद्ध वर्तनाकडे दुर्लक्ष करण्याची, त्यांच्या भाषणांवर तक्रारी झाल्या तरी त्यांवर कारवाई न करता आम्ही याबाबत काहीच बोलणार नाही असे सांगणाऱ्या निवडणूक आयोगाच्या कानठळ्या बसवणाऱ्या मौनाच्या वातावरणात एक सुखद वार्ता आली. अगदी कडक उन्हाच्या झळांत सुखद शीतल झुळुक यावी तशी!

ती वार्ता म्हणजे, विश्वनाथन आनंदनंतर प्रथमच जागतिक बुद्धिबळ कँडिडेट स्पर्धा जिंकून गुकेश डोम्माराजू या भारतीय युवा खेळाडूने सध्याचा जगज्जेता ,चीनचा डिंग लिरेन याचा आव्हानवीर बनण्याचा मान मिळवला आहे.

या इतिहास घडवणाऱ्या विजयामुळे केवळ 17 वर्षे 10 महिने 24 दिवस वयाचा गुकेश (जन्म 29 मे 2006, चेन्नई येथे) या कँडिडेटस स्पर्धेतील सर्वात लहान वयाचा विजेता आणि त्याबरोबरच सर्वात लहान वयाचा आव्हानवीरही ठरला आहे. याआधीचा सर्वात लहान वयाचा आव्हानवीर गॅरी कास्पारॉव्ह 1983-84 मध्ये आव्हानवीर बनला, तेव्हा त्याचे वय 20 वर्षे 11 महिने 27 दिवस होते. आता जागतिक अजिंक्यपदासाठी गुकेशचा सामना सध्याचा विजेता चीनचा डिंग लिरेन याच्या बरोबर नोव्हेंबर महिन्यात होईल. या यशाबरोबरच गुकेशला बक्षिस रकमेचे 1 लाख 11 हजार पौंड (गुणिले 88.66 एवढे रुपये) मिळाले.

यंदाच्या जागतिक बुद्धिबळ आव्हानवीर ठरवण्याच्या या कँडिडेट स्पर्धेसाठी भारताचे तीन खेळाडू पात्र ठरले होते. प्रज्ञानंद रमेशबाबू आणि विदित संतोष गुजराथी. गुण गुकेशचे एलो गुण प्रज्ञानंदपेक्षा कमी होते, आणि विदितला दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे फिडे क्रमवारीत 16 व्या स्थानावर असलेल्या गुकेशबद्दल मोठ्या अपेक्षा कुणी बाळगल्या नव्हत्या. अगदी माजी विजेता मॅग्नस कार्लसननेही. त्याचे मत असे होते की, हिराकु नाकामुरा, इयान नेपोमनिआच्टची आणि फॅबिआने कारुना यांच्यापैकी एकजण ही स्पर्धा जिंकेल. पण तसे काही घडले नाही.

मात्र गुकेशच्या यशानंतर कार्लसन म्हणाला की, मला आणि इतरांना वाटत होते त्यापेक्षा गुकेश खूपच अधिक पक्का आणि अविचल असला तरी कधीकधी तो डळमळणारा वाटतो, हेही खरेच आहे. तो जलद वा अतिजलद स्पर्धांसाठी फारसा चांगला नाही. (गुकेशलाही पारंपरिक खेळातच अधिक रस आहे.) पण त्यामुळे त्याच्याबाबत अंदाज करणे धोक्याचे आहे. असे असले, तरी आपला खेळ किती भक्कम आहे हे त्याने या स्पर्धेत दाखवून दिले आहे. कार्लसन पुढे म्हणाला, गुकेशने जे काही केले, त्यावर मी फिदा आहे.

या वर्षीच नोव्हेबरमध्ये होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत गुकेश जिंकला, तर तो सर्वात लहान वयाचा जागतिक विजेता ठरू शकतो. याआधी गॅरी कॅस्पारॉव आणि मॅग्नस कार्लसन विजेते बनले होते तेव्हा त्यांचे वय 22 होते. म्हणजे आणखी एक विक्रम नोंदवण्याची संधी गुकेशला आहे.

तसे पाहिले तर गुकेशला असे यश नवीन नाही. कारण वयाच्या केवळ 12 व्या वर्षी तो इंटरनॅशनल मास्टर आणि 13व्या वर्षीच तो ग्रँडमास्टर बनला होता. 15 व्या वर्षी त्याने कँडिडेट मास्टर हा किताब मिळवला होता. आणि 2700 गुण पार करणाऱ्या युवा खेळाडूंत तो तिसरा होता, तर 2750 गुण नोंदवणारा सर्वात लहान वयाचा खेळाडू हा बहुमान त्याने मिळवला होता. या स्पर्धेतील त्याची कामगिरी सरस होती. त्याने 14 फेऱ्यांच्या या स्पर्धेत पाच विजय नोंदले, आठ डाव बरोबरीत सोडवले आणि केवळ एकच सामना त्याने गमावला. इराणियन फ्रेंच ग्रँडमास्टर फिरौझा अलिरेझाने त्याला सातव्या फेरीत पराभूत केले होते. गुकेश म्हणाला,  "त्या पराभवाने मी निराश झालो होतो. पण नंतरचा दिवस सुट्टीचा होता. नंतरच्या दिवशी मी जागा झालो तेव्हा मला खूपच ताजेतवाने वाटले. बहुधा त्या पराभवामुळेच माझी ईर्षा जागी झाली, आणि आता जिंकण्यासाठीच खेळायचे अशी भावना निर्माण झाली." 13 व्या फेरीत मात्र गुकेशने फिरौझा अलिरेझाला बरोबरीत रोखले. अंतिम क्रमवारीत अलिरेझाचा सातवा क्रमांक होता.

अंतिम 14 व्या फेरीत गुकेश अमेरिकेच्या ग्रँडमास्टर हिकारु नाकामुराबरोबर काळ्या मोहऱ्यांनिशी खेळला. त्यामुळे त्याला सावधपणे खेळावे लागले, तो त्याप्रमाणे जिद्दीने खेळला. तेराव्या फेरीअखेर त्याचे 8.5 गुण होते तर अन्य तीन खेळाडूंचे - हिराकु नाकामुरा, इयान नेपोमनिआच्टची आणि फॅबिआने कारुआना यांचे प्रत्येकी आठ गुण होते. त्यामुळे अंतिम फेरी अत्यंत महत्त्वाची होती. पण नाकामुरा बरोबरचा डाव सुरू होण्यापूर्वी इयान नेपोमनिआच्टची आणि फॅबिआने कारुना यांचा डाव 109 चालींनंतर बरोबरीत सुटला होत. त्यामुळे गुकेशने नाकामुराशी केवळ बरोबरी साधली तरी पुरे होते. मात्र ते काम सोपे नव्हते, कारण नाकामुरा पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळत होता. एक गोष्ट खरी की नाकामुरा आणि गुकेश दोघेही जिंकण्यासाठीच निकराने लढले. पण अखेर त्या नाट्यपूर्ण लढतीत 71 चालींनंतर त्यांनी डाव बरोबरीत सोडवण्याचे त्यांना मान्य करावे लागले. त्यामुळे गुकेशचे नऊ गुण झाले आणि तो विजेता बनला. नाकामुराला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

गेल्या वर्षी जागतिक बद्धिबळ विश्वचषक स्पर्धनंतर गुकेशचा फॉर्म कायम असला तरी, फिडे ग्रँड स्विस खुल्या स्पर्धेत त्याला अजिबात यश मिळाले नव्हते. त्यावेळी त्याच्यावर कँडिडेट स्पर्धेत स्थान मिळवण्याचे दडपण होते, त्यामुळे तो दबून गेला होता, हे त्या अपयशाचे कारण होते. अर्थात खेळात अशा गोष्टी होतच असतात. पण महत्त्वाचे म्हणजे तो त्या दडपणातून लवकर बाहेर आला आणि त्याने डिसेंबर महिन्यात चेन्नई येथे झालेल्या ग्रँडमास्टर स्पर्धा जिंकून कँडिडेट स्पर्धेतील स्थान मिळवले होते.

गुकेशच्या यशाला त्याचे वडील डॉ. रजनीकांत आणि आई डॉ. पद्माकुमारी यांचाही हातभार लागला आहे, कारण आपल्या कामातून वेळ काढून त्यांनी त्याच्याकडे लक्ष पुरवले. डॉ. रजनीकांत यांनी सांगितले की, 2013 मध्ये त्याचा बुद्धिबळातील प्रवास सुरू झाला. तेव्हा तो आठवड्यातील तीन दिवस, केवळ एक तास बुद्धिबळ शिकण्यासाठी देत होता. नंतर त्याच्या शिक्षकांना तो चांगला खेळतो आहे, असे वाटल्याने तो आठवड्याअखेर होणाऱ्या स्पर्धांत सहभागी होऊ लागला. सुरुवातीला आमच्या वेळापत्रकात आम्हाला फारसा बदल करावा लागला नाही, पण 2014 मध्ये गुकेश इलो रेटिंग स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागल्यानंतर हे चित्र बदलले. मला आणि त्याच्या आईला आमच्या कामाच्या वेळांमध्ये बदल करावा लागला. आधी मी ज्या हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ काम करत होतो (डॉ. रजनीकांत हे नाक-कान-घसा सर्जन आहेत) पण मग मी केवळ व्हिजिटिंग सर्जन म्हणून तेथे जाऊ लागलो.

गुकेशची आई डॉ. पद्माकुमारी या ‘मायक्रोबायॉलॉजी’च्या असिस्टंट प्रोफेसर आहेत. त्यांना वेगळीच काळजी होती. कारण सुरुवातीपासून गुकेश नेहमीच वर्गात पहिला येणारा विद्यार्थी होता. आणि आता सततच्या स्पर्धांमुळे त्याची शाळा वारंवार बुडत होती. पण त्याच वेळी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. गुकेश बुद्धिबळातच चमकत असेल, तर तो शाळेत गेला नाही तरी चालेल, पण बुद्धिबळात त्याला अपेक्षित यश मिळाले नाही, तर त्याने पुन्हा शाळेत जायचे, असे आम्ही ठरवले. त्याच्या शाळेनेदेखील त्याला केवळ परिक्षेसाठी येण्याची परवानगी दिली. बाकी काळात तो बुद्धिबळावर लक्ष केंद्रित करील असा निर्णय घेतला. तसा हा एकप्रकारचा जुगारच म्हणायचा. पण गुकेश दोन्हीकडे प्रभावी ठरतो का हे आम्हाला पाहायचे होते. त्यासाठी चाचणी म्हणून एक वर्ष द्यायचे असे ठरले. गुकेशचे स्वप्न पूर्ण करण्याकरता डॉ. पद्माकुमारी यांनी प्रवास व अन्य खर्चाचा मेळ घालण्यासाठी जादा वेळ काम केले. कोणाही सहकाऱ्याला रजा हवी असेल तर त्याचे काम त्या करत होत्या. कारण प्रवास अधिकाधिक महाग होत होता. गुकेशला काहीवेळा स्पर्धांत रोख पारितोषिके मिळत. तसेच शाळेकडूनही थोडी मदत मिळत होती. तरीही बऱ्याच प्रमाणात पैशाची गरज भासतच होती.


हेही वाचा : भारताच्या युवा शक्तीचे यश! - आ. श्री. केतकर


गुकेशच्या वडलांनी 2019 च्या जिब्राल्टर येथे झालेल्या एका स्पर्धेनंतर पाच वेळा जगज्जेता बनलेल्या विश्वनाथन आनंदची भेट घेतली. त्याने गुकेशला थोडी विश्रांती घेण्यास सांगितले होते. त्याने गुकेश कुटुंबियांना त्याच्याकडे बोलावले. तो गुकेशबरोबरी जिब्राल्टरला खेळलेल्या डावांची चर्चा करत होता. गुकेश कोणत्या वेगळ्या चाली करू शकला असता हेही सुचवत होता. मग त्याने गुकेशला थोडा काळ विश्रांती घ्यायला सांगितले. पालकांच्या पाठिंब्यामुळे गुकेशने शालेय परीक्षाही चांगल्या प्रकारे पार केल्या आहेत.

कँडिडेट स्पर्धेची अंतिम क्रमवारी :

(क्रम, खेळाडूचे नाव, रेटिंग आणि स्पर्धेतील गुणसंख्या)

1. गुकेश डोम्माराजू 2743, 9.
2. हिराकु नाकामुरा 2789, 8.5
3. इयान नेपोमनिआच्टची 2758, 8.5.
4. फॅबिआनो कारुआना 2803, 8.5.
5. प्रज्ञानंद रमेशबाबू 2747, 7.
6. विदित संतोष गुजराथी 2727, 6.
7. अलिरेझा फिरौझा 2760, 5.
8. निजत अबासोव्ह 2632, 3.5.

महिलांच्या कँडिडेट स्पर्धेत कोनेरु हंपीने दुसरा क्रमांक मिळवला. विजेतेपद टॅन झोंग्युयीने मिळवले. भारताच्याच वैशाली रमेशबाबूचा चौथा क्रमांक होता.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: gukesh dommaraju sadhana digital sports chess vishwanathan anand garry kasparov chess championship बुद्धिबळ क्रीडा गुकेश दोम्माराजू बुद्धिबळ कँडिडेट स्पर्धा साधना डिजिटल Load More Tags

Add Comment