कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीचा मानवी पातळीवर अदमास घेणाऱ्या विज्ञानकथा

निरंजन घाटे यांचा नवा विज्ञानकथासंग्रह – स्पर्शाची जादू

सतत सुधारत असलेल्या तंत्रज्ञानामुळे सध्या लोकांकडे सहज वापरता येतील अशी अनेक उपकरणे आली आहेत. लोकांचे याबाबतचे कुतूहल वाढत आहे. नवे तंत्रज्ञान आणखी काय काय करेल, याचा विचार आता लोक करू लागले आहेत. तसे पाहता लोकांच्या विचाराला खाद्य पुरवण्याचे काम विज्ञानकथा पूर्वीपासूनच करत आहेत. या कथांतून अनेकदा लोकांना अगदी सहज समजेल अशा प्रकारे विज्ञानातील प्रगतीची माहिती मिळते आणि त्याबरोबरच पुढील काळात काय होऊ शकेल याबाबतचे अंदाजही वाचायला मिळतात. त्यामुळे वाचकांना माहिती तर मिळतेच, शिवाय त्यांचे मनोरंजनही होते. त्यांना विज्ञानकथांची गोडीलागते  परिणामी विज्ञानकथांचा वाचक वेगाने वाढत आहे. मराठीत पहिली विज्ञानकथा आली, त्याला शतक उलटून गेले, हे खरे, पण तिची खऱ्या अर्थाने वाढ मात्र विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाली, हे आता सर्वमान्य आहे. आणि या कथाप्रकाराला वाचकांचा प्रतिसाद वाढत गेला तशी लेखकांची संख्याही वाढली.

विज्ञानकथांना वाचक मिळवून देणाऱ्या या लेखकांतील एक नाव म्हणजे निरंजन घाटे. तसे त्यांनी विविध साहित्यप्रकार समर्थपणे हाताळले असले, तरी त्यांची ओळख मात्र प्रामुख्याने विज्ञानकथा लेखक आणि विज्ञानाच्या विविध शाखांची, त्यातील नव्या संशोधनांची सोप्या भाषेमध्ये ओळख करून देणारे विज्ञानलेखक अशीच आहे. त्यांच्या साधारण दोनशेपेक्षा अधिक पुस्तकांपैकी साठ टक्क्यांहून जास्त पुस्तके विज्ञानाशी या ना त्या प्रकारे संबंधित आहेत आणि त्यांची त्यातील माहिती अनेकांना, त्यातही विद्यार्थी वर्गाला उपयुक्त ठरली आहे आणि त्यांनी प्रत्यक्ष भेटून किंवा पत्रांद्वारे त्यांना तसे कळवलेही आहे. याचे कारण ही माहिती वरवरची नसते तर ती अनेक पुस्तके तसेच शास्त्रीय विषयांवरील नियतकालिकांचे वाचन करून मिळवलेली आणि सोपी करून वाचकांना सांगितलेली असते. त्यामुळे ती अगदी विश्वासार्हही असते, हेच याचे कारण आहे.

निरंजन घाटे यांचा 'स्पर्शाची जादू' हा लहानमोठ्या बावीस विज्ञानकथांचा नवा संग्रह आहे. त्यातील बऱ्याच कथा या यंत्रमानव हे महत्त्वाचे पात्र असलेल्या आहेत. त्या यंत्रमानवाला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड आहे आणि ते अगदी परिपूर्ण नसले तरी चांगली बुद्धिमत्ता असलेले आहेत. अर्थातच सर्वमान्य असे आयझेंक असिमोव्हचे यंत्रमानवांनी पाळायचे तीन नियम आणि विचार करताना मानवी मेंदूत घडणाऱ्या सूक्ष्म पातळीवरच्या हालचाली यातील काही कथांत पुन्हा आल्या आहेत. त्या कथेसाठी महत्त्वाच्या असल्याने अनाठायी वाटत नाहीत. असिमोव्हचे ते नियम असे आहेत:
१. कुठलाही यंत्रमानव कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही जिवंत व्यक्तीला अपाय होईल असे कृत्य करणार नाही. किंवा त्याच्या अकार्यक्षमतेमुळे मानवी व्यक्तीस अपाय होऊ देणार नाही.

२. वरील नियमाच्या आधीन राहून तो यंत्रमानव मानवाने त्याला दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करील आणि

३. वरील दोन नियमांचे उल्लंघन न करता, तो स्वतःचे संरक्षण करेल.

हे नियम माहीत झाल्यावर कथा वाचताना प्रश्न पडत नाहीत. कृत्रिम मानवनिर्मितीसंबंधीची 'एक बीटी विवाह' ही पहिली कथा एका महिला शास्त्रज्ञाच्या जीवतंत्रज्ञानातील खळबळजनक शास्त्रीय शोधाच्या मध्यवर्ती कल्पनेवर असून त्यामुळे अगदी वेगळ्याच प्रकारची तसेच मनोरंजकही आहे. त्यातील एकल पालक महिला शास्त्रज्ञ आणि तिच्या सुंदर मुलीशी लग्न करू इच्छिणारा जिद्दी युवक या महत्त्वाच्या व्यक्तिरेखा डोळ्यापुढे उभ्या राहतील, अशा वर्णन केल्या आहेत. त्याचबरोबर कथेचा शेवटही... 'ते वादळ गाजलं, पण त्यातून निर्माण झालेले वाद संपल्यावर त्यांनी लग्न केलं आणि ते आमरण सुखाने नांदले, असं आपण गृहीत धरू या!' असा वेगळ्या प्रकारे केला आहे. 

'संपलेली तृष्णा? भागलेली तहान?' या कथेत माणसाच्या स्वभावावर नियंत्रण मिळवण्याच्या तंत्राचा शोध लावणारा शास्त्रज्ञ त्याच्या मालकाला शोधाची संपूर्ण प्रक्रिया सांगायला नकार देतो. याच शोधामुळे त्याच्या प्रमुखाचा स्वभाव बदलून जातो आणि जो शीघ्रघकोपी आणि तुसडा असतो, तो शांत आणि प्रेमळ स्वभावाचा कसा बनतो, याची ही कथा. यात मालकाचे वर्तन कसे बदलते याचे चांगले परिणामकारक चित्रण लेखक करतो. अखेरीस 'या शोधाबद्दल तुला काय हवे?' असे मालक विचारतो. तेव्हां तो शास्त्रज्ञ 'या शोधाबाबत मला काही नको. कारण मी ते तुमच्यासाठी केलं नव्हतं, तर एक आव्हान म्हणून मी हा प्रकल्प हाती घेतला होता असे सांगतो'.

शेवटची 'पुरुष' ही कथा मानवी, विशेषतः बहुतेक पुरुषांचा स्वाभाविक स्वभावधर्म संशय घेणे हा असतो, या वास्तवावर आधारलेली आहे. नको त्या संशयामुळे यातील निवेदकाच्या मित्राची होणारी घालमेल आणि त्याच्यापुढे निर्माण होणारे प्रश्न, याबाबत आहे. या कथेत यंत्रमानव हेही एक महत्त्वाचे पात्र आहे. (ते कोणते हे कळण्यासाठी कथा वाचायला हवी) आणि त्यासंबंधातच मित्राला संशय आहे. निवेदक त्याला सल्ला देऊन यातून मार्ग दाखवतो. तो त्या संशय घेणाऱ्या मित्राला एवढेच सांगतो की, 'आता माझं ऐक आणि हा तुझा पुरुषी संशय डोक्यातून काढ, आणि सुखाने संसार कर! “संशयात्मा विनश्यति”, हे तुला ठाऊक आहे ना?' एवढे बोलून तो घरी परततो. नंतर लेखक टिप्पणी करतोः 'याला आता बरीच वर्षे झाली. अजून त्यांचा संसार चालू आहे. त्याच्या चेहऱ्यावर तजेला आहे. मुलं मोठी झाली आहेत. त्या अर्थी त्यानं गाढवपणा करून आपला संशय बायकोला बोलून दाखवला नसावा, असं मला वाटतंय'.

रहस्यकथेच्या अंगाने जाणारी 'फुकटचा ताप' ही कथा विस्मयकारक आहे. असे काही घडू शकते का, आणि खरोखरच घडले तर? असे प्रश्न मनात येतात आणि अस्वस्थ व्हायला होते. वेगळ्या आईबापांची एकाच वयाची दोन लहान मुले रूपाली आणि रूपेश यांच्यात वेगळेच गुण आहेत. त्यांना वेगवेगळ्या खोल्यांत ठेवून त्यांना वेगवेगळी खेळणी दिली जातात. मात्र रूपेशला कोणती खेळणी दिली ते रूपाली अचूक ओळखत होती आणि रूपेशही रूपालीला दिलेली खेळणी बरोबर ओळखत होता. हेच खाऊबाबत, त्याचप्रमाणे चित्रांच्या आणि अक्षरांच्या उच्चारांबाबतही घडते हे विविध चाचण्यांत दिसून येते. त्यामुळे ही दोन मुले विचारसंक्रमणाच्या सहाय्याने परस्परांशी संपर्क साधतात, हे जवळपास सिद्ध होते. परंतु त्यांच्याबाबतीत नेमके काय घडले, ते समजण्यासाठी दोघांच्याही आयांना मोहनिद्रेत नेऊन नेमके काय घडले हे पाहिले जाते. केवळ योगायोगाने त्यांच्यावर एक प्रयोग केला गेलेला असतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या बाळांवर होतो. अर्थात त्यांच्या नकळत झालेल्या या प्रयोगात अपायकारक काही नसते, हे महत्त्वाचे. एका इन्जेक्शनमध्ये एक सूक्ष्म प्रक्षेपक असणार होता. आणि ते इन्जेक्शन त्यांना दिल्यानंतर काय घडते ही उत्सुकता निर्माण होते. तिच्या पूर्ततेसाठी कथा वाचायला हवी.

रोजच्या सवयीच्या झालेल्या अनेक उपकरणांमुळे माणूस दिवसेंदिवस अधिकाधिक परावलंबी बनत चालला आहे. इतका की, त्यामुळे अनेक गोष्टी करण्याचेच तो विसरून गेला आहे. कारण त्या परस्पर एका आज्ञेने वा कळ दाबून होऊ शकतात. पण समजा अचानक या सुविधा नाहीशा झाल्या तर काय, हा नुसता विचारही अस्वस्थ करणारा असतो. याच सूत्रावर 'यंत्रमानवांची आत्महत्या' ही कथा बेतली आहे. बापूसाहेब हे या कथेचे नायक. बुद्धिमान आणि कामात वाघ असणारे संशोधक. त्यामुळे ते यंत्रमानव बनवणाऱ्या कारखान्यात नोकरीत या गुणांच्या जोरावरच झपाट्यानं वरच्या जागा मिळवतात. तरीही यंत्रमानवांमुळे मानवजातीचे मोठे नुकसान होणार आहे, असे म्हणत असतात. त्यावरून त्यांचे विरोधक 'मग तू यंत्रमानवनिर्मितीच्या कारखान्यात का काम करतोस?' असे विचारतात. मग राजीनामा देऊन ते स्वतःचाच यंत्रमानवनिर्मितीचा कारखाना सुरू करतात आणि मानवाची सर्व कामे करणारे यंत्रमानव निर्माण करणारा कारखाना सुरू होतो. त्यांनी बनवलेले यंत्रमानव यंत्रमानवांच्या सर्व स्पर्धांत सर्वश्रेष्ठ ठरतात. बापूसाहेबांच्या पश्चात त्यांचे वंशजही त्यांचा हा उद्योग नीटपणे चालवतात. पण बापूसाहेबांच्या दूरदृष्टीचा मात्र त्यांच्यात अभाव असतो. ते वंशज फक्त पैसा आणि मोठेपणाच्या मागे लागलेले असतात. बापूसाहेबांच्या शंभराव्या स्मृतिदिनाच्या समारंभात स्वतःच विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं बापूसाहेब प्रतिमेच्या रूपाने भाषण करतात आणि त्यांचे बोलणे थांबताच जगातील सर्व यंत्रमानवांच्या यंत्रणा बंद पडतात आणि त्यावेळी बापूसाहेबांचा आवाज येतो, 'चला उठा आता. यापुढ तुमची सर्व कामं तुम्हालाच करावी लागणार आहेत. यंत्रमानवी सेवा आता रद्द झाली आहे.' कथेतील ही कल्पना हादरवून टाकणारी आहे. हे कसे घडते ते कथा वाचल्यावरच उमगेल.


हेही वाचा - अतिशय महत्त्वाच्या (पण दुर्लक्षित) विषयावरील बहुमोल पुस्तक... (प्रख्यात हिंदी लेखक आणि पत्रकार सोपान जोशी लिखित 'जल थल मल' या पुस्तकाचा परिचय)


एका संगणक अभियंता असणाऱ्या, एकट्या राहणाऱ्या महिलेच्या बालयंत्रमानवाचे - यंत्रबालकाचे, अपहरण केले जाते. तिने तो तिचाच मुलगा आहे, अशी सर्वांची समजूत करून दिलेली असते. एका बहुराष्ट्रीय कंपनीने त्यांच्या फायद्यासाठी हे अपहरण घडवून आणलेले असते. पण त्याबाबतच्या खटल्यात त्या यंत्रबालकाच्याच साक्षीने या अपहरणाचा उलगडा कसा होतो हे सांगणारी 'यंत्रमानवाचे अपहरण' ही कथा सहज नर्मविनोदी शैलीने खिळवून ठेवते.

’माझं लग्न आणि नॅनो’ ही कथा एका विलक्षण कल्पनेवर आधारलेली आहे. लग्नासाठी सांगून येणाऱ्या मुलांना सतत नाकारणाऱ्या एका तरुणीला अचानक एकजण आवडतो, पण तो तिच्याकडं पाहातच नाही. हे तिचं दुःख ती तिच्या भावाला सांगते. त्यामुळे तिच्या अतिशय बुद्धिवान भावाला, चला निदान कोणीतरी हिला आवडला, याचंच समाधान वाटतं. योगायोगानं तिला पसंत असलेला तो मुलगा तिच्या भावाचा मित्रच असतो. अर्थातच आता त्या दोघांचं जमवून देण्याची जबाबदारी बहीण भावावरच टाकते. कारण हा काहीही करून यश मिळवणार याचा तिला विश्वास असतो. तोदेखील हा विश्वास सार्थ ठरवतो. त्यासाठी 'मेटॅमटेरिअल' या नव्या संशोधनानं अस्तित्वात आलेल्या पदार्थाचा वापर करून एक खास वस्त्र तयार करतो. या पदार्थाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रकाशकिरण यांना ओलांडून पलीकडं जाताना वाकतात आणि पुढं जातात. या गोष्टीचा फायदा घेऊन या पदार्थाच्या नॅनो कणांचा कृत्रिम धाग्यांत समावेश केला तर माणसाला अदृश्य करणारं वस्त्र तयार करता येतं आणि यातील एक प्रकार म्हणजे ठराविक कोनातून पाहिल्यास अदृश्य करणारं वस्त्र. याचा वापर त्याच्या बहिणीची इच्छा पुरी करण्यासाठी कसा होतो, हे वाचकाला कळते आणि तो अचंबित होतो.

'एक सुफल संपूर्ण कहाणी' ही कथा जंगलभागातील लोकांना एक बाई झाडपाल्याच्या औषधावर त्यांचा हक्क आहे, हे पटवून देऊन त्यांच्या विकासाला कसा हातभार लावतात, हे सांगणारी आहे. शिवाय लेखकाने शेवटी केलेली नोंद महत्त्वाची आहे. त्यानं लिहिलंय ही कथा लिहिली तेव्हा पुढं असं काही घडेल याची कल्पना नव्हती. २००२ नंतर अमेरिकेत आणि २०१३ साली भारतात केरळमध्ये हे घडलं. ही कथा आवर्जून वाचावी अशी आहे. 

शब्दमर्यादेमुळे संग्रहातील सर्वच कथांबद्दल लिहिता येणार नाही. पण त्यांची नावे सांगतोः ‘पण’, ‘आमचे देव परग्रहावरचे...’, ‘कथा एका बदनामीची’, ‘एक कहाणी भविष्यातली’, ‘मृगजळाचे पाणी’, ‘सुपरमॅन’, ‘हौशी संशोधक’, ‘घर्मिष्ठा’, ‘ई-पाठलाग’, ‘मूळ स्वभाव’, ‘चोर’ आणि ’मृत्युदूत’. यातून कथांचे वैविध्य ध्यानात येईल.

कथासंग्रहाचे नाव असलेली 'स्पर्शाची जादू' ही दीर्घकथा म्हणता येईल. लेखकच निवेदक असलेल्या या कथेत प्रसंगांची गुंफण करण्यात आली आहे आणि त्यामुळे ती वाचकाला खिळवून ठेवते. एका नियोजित दूरचित्रवाणी मालिकेचा नायक अपघातात सापडल्याने कोमात जातो आणि सारेजण काळजीत पडतात. कारण मालिकेच्या प्रक्षेपणाची तारीख तर जवळ येत असते. अशा अडचणीच्या प्रसंगावर मात करण्यासाठीम यंत्रमानवाचा कल्पकतेने उपयोग करून घेतला जातो. अडचण दूर होते, कारण हीरोचीच प्रतिकृती असलेला यंत्रमानव अडचण दूर करतो. काही काळाने नायक बरा होतो व काम करू लागतो. त्याच्याबरोबर काम करताना नायिका रमत नाही. तिला तो वेगळाच वाटू लागतो. कारण नायिका त्या यंत्रमानवाच्याच प्रेमात पडलेली असते. या गंतागुंतीतून असिमोव्हच्या नियमांच्या आधारे मार्ग कसा काढला जातो, हे कळल्यावर वाचक चकित होईल. शेवटी लेखक म्हणतो, 'ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड, असे म्हणताना माझा आवाज मात्र खिन्न होता. माझ्या मानसपुत्राच्या स्पर्शाची जादू आता कुणालाच जाणवणार नव्हती, हे मी विसरू शकत नव्हतो ना!'

स्पर्शाची जादू
लेखक : निरंजन घाटे
प्रकाशक : चेतक बुक्स, पुणे, 
पाने: २९२ 
किंमत : ६५७ रु.

- आ. श्री. केतकर 
aashriketkar@gmail.com 

Tags: sparshachi jadu sceince fiction vidnyan katha ketkar Load More Tags

Add Comment