कार्लोस अल्काराझच पुन्हा विम्बल्डन विजेता

अल्काराझने केवळ दोन तास 27 मिनिटांत सामना संपवला. अल्काराझ आणि योकोविच यांचा गतसालच्या अंतिम लढतीचा सामना चार तासांपेक्षा जास्त वेळ चालला होता..

योकोविच आणि अल्काराझ

या विजयामुळे अल्काराझने रॉजर फेडरर प्रमाणे ग्राँ प्री मालिकेत पहिल्या चार सामन्यांत विजेतपद कायम राखण्यात यश मिळवले (फेडररनने ओळीने पहिली सात अजिंक्यपदे जिंकली होती.) याबरोबरच खुली फ्रेंच स्पर्धा आणि विम्बल्डन स्पर्धा पाठोपाठ जिंकणाऱ्या रॉड लेव्हर, बियाँ बोर्ग, राफा नदाल, फेडरर आणि योकोविचशी बरोबरी केली. या विजयाने वयाच्या 21 व्या वर्षी वा त्याआधी अशी चार विजेतीपदे मिळवणाऱ्या बेरिस बेकर, बियाँ बोर्ग आणि मॅट्स विलँडर यांच्या पंक्तीत तो बसला आहे.

कार्लोस अल्काराझ आणि बार्बोरा क्रैचिकोवा हे यंदाचे पुरुष आणि महिला एकेरीचे विम्बल्डन विजेते आहेत. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात क्रैचिकोवाला जस्मिन पाओलिनीविरुद्ध विजेतेपदासाठी थोडे झुंजावे लागले. त्यामानाने काहीशा एकतर्फी झालेल्या पुरुषांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात अल्काराझने योकोविचवर विजय मिळवला. त्यामुळे योकोविचचे विम्बल्डनचे आठवे विजेतेपद मिळवून फेडररशी बरोबरी करण्याचे, तसेच ग्राँ प्री मालिकेत पंचविसावे विजेतेपद मिळवून मार्गारेट कोर्टची बरोबरी करण्याचे स्वप्न साकार होऊ शकले नाही.

या अतिशय चुरशीच्या आणि रंगतदार स्पर्धेचा अंतिम सामनाही अगदी अटीतटीचा होईल अशी अपेक्षा बाळगून, दीर्घकाळ थांबावे लागेल अशी मनाची तयारी ठेवून आलेल्या प्रेक्षकांचा अंदाज मात्र चुकला. ग्राँ प्री मालिकेतील, पंचविसाव्या अजिंक्यपदासाठी नोवाक योकोविच, तर गतसालचे विजेतेपद राखण्यासाठी कार्लोस अल्काराझ आमने सामने असल्याने प्रेक्षकांची अपेक्षा चुकीची नक्कीच नव्हती. पण ती पूर्ण झाली नाही. योकोविच कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात, तर अल्काराझची कारकीर्द तशी नुकतीच सुरू झालेली. मात्र असे असूनही दोघांच्या गुणवत्तेत फारसा फरक नाही, हे माहीत असल्यानेच प्रेक्षक उत्सुकतेने आले होते. खुल्या फ्रेंच स्पर्धेत योकोविचने पायाच्या दुखापतीमुळे उपान्त्यपूर्व फेरीत सातवे सीडिंग मिळालेल्या कॅस्पर रुडला पुढे चाल दिली होती. त्यानंतर पायावर शस्त्रक्रियाही झाली व बरा होऊन तो पुन्हा खेळण्यास सिद्ध झाला होता. पण यावेळी अल्काराझच्या प्रभुत्वाने त्याला नामोहरम केले. अल्काराझने केवळ दोन तास 27 मिनिटांत सामना संपवला. याच दोघांच्या गतसालच्या अंतिम लढतीचा सामना चार तासांपेक्षा जास्त वेळ चालला होता, याची आठवण प्रेक्षकांना झाली.

तीन सेटच्या या लढतीत अल्काराझने काही अप्रतिम फटके लगावून गुण मिळवले. पहिल्या सेटमधील पहिलाच गेम 14 मिनिटे चालला. त्यात अनेकदा ड्यूस (प्रत्येकी 40 गुण) झाले. मात्र शेवटी अल्काराझने योकोविचची सर्व्हिस भेदण्यात यश मिळवून आघाडी घेतली आणि त्यानंतर तोच धडाका कायम ठेवून दुसऱ्यांदा योकोविचची सर्व्हिस भेदून ती वाढवली आणि सेट 41 मिनिटांत जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही याचीच पुनरावृत्ती झाली. पुन्हा पहिल्याच गेममध्ये त्याने योकोविचची सर्व्हिस भेदून आघाडी घेतली. आणि ती वाढवतच नेली. त्याने नेटजवळ अगदी अलगद असे अप्रतिम फटके मारून योकोविचला ते परतवण्याची संधीच दिली नाही. तिसऱ्या सेटमध्ये योकोविच काहीसा सावरला व त्याने सामन्यावर पकड बसवण्याचा प्रयत्न चालवला. पण अखेरपर्यंत अल्काराझने त्याला दाद न देता आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी निकराने प्रयत्न केले. त्यामुळे त्या सेटमध्ये टाय ब्रेकरचा अवलंब करावा लागला. त्यातही काही काळ त्यातही दोघांचे पारडे सारखेच होते. 5-4 आणि 40-0 अशी आघाडी घेतली होती. पण त्यावेळी एका प्रेक्षकाच्या ओरडण्याने त्याची एकाग्रता भंग पावली. त्यानंतर त्याच्याकडून चुका होत गेल्या. परिणामी सामन्यात प्रथमच त्याला सर्व्हिस गमवावी लागली. पण याचा परिणाम होऊ न देता त्याने टाय ब्रेकरमध्ये दबाव कायम ठेवला आणि तो 7-4 असा जिंकला आणि अजिंक्यपद स्वतःकडेच ठेवण्यात त्याने यश मिळवले.


हेही वाचा : सर्वात लहान वयाचा आव्हानवीर : भारताचा गुकेश दोम्माराजू - आ. श्री. केतकर


या विजयामुळे त्याने रॉजर फेडरर प्रमाणे ग्राँ प्री मालिकेत पहिल्या चार सामन्यांत विजेतपद कायम राखण्यात यश मिळवले (फेडररनने ओळीने पहिली सात अजिंक्यपदे जिंकली होती.) याबरोबरच खुली फ्रेंच स्पर्धा आणि विम्बल्डन स्पर्धा पाठोपाठ जिंकणाऱ्या रॉड लेव्हर, बियाँ बोर्ग, राफा नदाल, फेडरर आणि योकोविचशी बरोबरी केली. त्यानंतर अल्काराझ म्हणाला की, हा मोठाच मान असला तरी ते सगळे मोठे चॅम्पियन आहेत. मी स्वतःला चॅम्पियन समजत नाही. तरीही मी याच मार्गावर माझी चाल कायम राखण्याचा प्रयत्न करीन. या विजयाने वयाच्या 21 व्या वर्षी वा त्याआधी अशी चार विजेतीपदे मिळवणाऱ्या बेरिस बेकर, बियाँ बोर्ग आणि मॅट्स विलँडर यांच्या पंक्तीत तो बसला आहे.

अल्काराझचे चापल्य आणि त्याला अफलातून म्हणावेत अशा फटक्यांची जोड हे त्याच्या खेळाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तो नक्की काय करणार याचा अंदाजच प्रतिस्पर्ध्यांना येत नाही. कारण, अगदी अशक्यप्राय वाटणारे परतीचे फटके तो सहज लगावतो. त्याच्या या करामतीने प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे प्रेक्षकही अवाक् होतात. या स्पर्धेत त्याला पहिल्या सर्व्हिसने मात्र फारशी साथ दिली नाही. सर्व्हिस करताना तो अनेक वेळा चुकत होता आणि त्याला पुन्हा सर्व्हिस करावी लागत होती. त्यामुळे काही वेळा त्याच्याकडून सर्व्हिसची दुहेरी चूक होत होती. अगदी अंतिम सामन्यातही काही वेळा असे घडले. मात्र याचा त्याने एकाग्रतेवर परिणाम होऊ दिला नाही, हे महत्त्वाचे.

विम्बल्डन टेनिस स्पर्धा ही ग्राँ प्री मालिकेतील, पण सर्वात महत्त्वाची मानली जाणारी तिसरी स्पर्धा. हिरवळीच्या कोर्टवर खेळविण्यात येणारी ही या मालिकेतील एकमेव स्पर्धा. येथे विजेतेपद मिळवायचे हे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. मात्र मुख्य स्पर्धेत केवळ 128 खेळाडूंना प्रवेश दिला जातो. त्यापैकी काहींना पात्रता स्पर्धेतून प्रवेश मिळतो. त्यांना मानांकन दिले जाते आणि कार्यक्रम ठरवला जातो. अर्थात, मानांकन आधीच्या कामगिरीनुसार दिले जाते. प्रत्यक्ष स्पर्धेत मात्र अनेकदा त्यांची कामगिरी त्यानुसार नसते. मानांकन मिळालेले खेळाडू अपेक्षित पल्ला गाठण्याआधीच गारद होतात. अशा निकालांना ‘अपसेट’ म्हणजे अनपेक्षित निकाल म्हटले जाते. यंदाच्या स्पर्धेत या प्रकारचे अनेक अनपेक्षित निकाल लागले आणि महत्त्वाची बाब अशी की, पुरुष आणि महिला गटात पहिले नामांकन मिळालेले अनुक्रमे सिन्नर आणि इगा स्विआटेक अनुक्रमे उपान्त्यपूर्व आणि तिसऱ्या फेरीतच हरले. पुरुष गटात दुसरा मानांकित योकोविच आणि तिसरे मानांकन असलेला अल्काराझ अंतिम फेरीत दाखल झाले. तर महिलांच्या अंतिम फेरीत मानांकन नसलेली आणि सातवे नामांकन असलेली जस्मिन पाओलिनी दाखल झाल्या होत्या. 

बार्बोरा क्रचिकोवा

स्पर्धेतील अनपेक्षित निकाल : महिला गटात पहिल्या फेरीत बैझासने सहाव्या मानांकित व्हाँन्ड्रसोवाला तर दुसऱ्या फेरीत पाचवे मानांकन मिळालेल्या पेगुलाला वँगने हरवले. तिसऱ्या फेरीत दहाव्या मानांकीत ओन्स जेबुरला स्विटोलीनाकडून तर पहिल्या मानांकित इगा स्विआटेकला पुतिंतसेवाकडून हार पत्करावी लागली. पुढच्याच फेरीत दुसरे मानांकन मिळालेल्या कोको गॉफचा ई. नवारोने पराभव केला. उपान्त्यपूर्व फेरीत क्रेचिकोवाने तेराव्या मानांकित ओस्टापेंकोवर विजय मिळवला होता. पुरुष गटात त्सित्सिपासला रुसुवुओरीने दुसऱ्या फेरीत हरवले तर त्याच फेरीत सातव्या मानांकित हुरझाकने ए. फाइल्सला चौथ्या सेटमध्ये 6-6 अशी बरोबरी असताना पुढे चाल दिली, अर्थात सामना सोडला. उपउपान्त्यपूर्व फेरीत चौथे मानांकन असलेल्या इवेरेवला तेराव्या मानांकित फ्रिटझने पराभूत केले. पण त्याला उपान्त्यपूर्व फेरीत त्याला मुसेट्टीकडून पराभव पत्करावा लागला. तर मेदवेदेवने अग्रमानांकित सिन्नरला धक्का दिला होता. पण उपान्त्य फेरीत त्याला अल्काराझने हरवले. अखेर योकोविच आणि अल्काराझ यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अल्काराझने मार्क लायल 7-6 (7-3), 7-5, 6-2; अलेक्झांडर बुबिक 7-6 (7-5), 6-2, 6-2; फ्रासिस टिआफो 5-7, 6-2, 4-6, 7-6 (7-2), 6-2; युगो हंबर्ट 6-3, 6-4, 1-6, 7-5, टॉमी पॉल 5-7, 6-4, 6-2, 6-2 आणि डानिल मेदवेदेवला (6-7 (1-7), 6-3, 6-4, 6-4 असे हरवले होते. तर योकोविचने व्हिट कोप्रीवला 6-1, 6-2,6-2, जेकब फर्नलीला 6-3, 6-4, 5-7, 7- 5, अॅलेक्सी पॉपिरिनला 4-6,6-3, 6-4, 7-6, होल्गर रुनला 6-3, 6-4, 6-2 असे हरवले. नंतर मुलरकडून त्याला पुढे चाल मिळाली होती आणि उपान्त्य फेरीत त्याने ममुसेट्टीला 6-4, 7-6 (7-2), 6-4 असे पराभूत केले होते.

चुरशीच्या महिलांच्या अंतिम सामन्यात पाओलिनीला 2-6, 6-4, 7-6 (10-8) असे पराभूत करून बार्बोरा क्रेचिकोवा यंदाची विजेती ठरली. तीन वर्षांपूर्वी तिने खुल्या फ्रेंच स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले होते. पण या स्पर्धेत तिला तिची आदर्श आणि मार्गदर्शकही असलेल्या (2019 मध्ये कर्करोगाच्या बळी ठरलेल्या) याना नोवोटनाप्रमाणे विजेतेपद मिळवण्याचे तिचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद वेगळाच होता. नोवोटनानेच तिला तुझ्यात विजेती बनण्याची क्षमता आहे हे वारंवार सांगितले होते. सध्या माझ्याकडे काही सांगायला शब्दच नाहीत कारण हे सारेच अविश्वसनीय आहे, असे ती प्रेक्षकांना अभिवादन करताना म्हणाली. हे कसे घडले कुणास ठाऊक, असे तिने सांगितले. चेक प्रजासत्ताकाला या विजयाचे मोल काय असा प्रश्न केला असता ती म्हणाली, “मला वाटतंय की, मी अंतिम फेरीत पोहाचले आणि विम्बल्डनला विजेती बनले हे कोणालाच खरे वाटत नाहीय. माझाही अजून यावर विश्वास बसत नाहीय.” तिच्या या कामगिरीचे मोल खूपच आहे कारण यंदाचे वर्ष तिच्यासाठी फारसे चांगले नव्हते. आजारपण आणि दुखापतींनी ग्रासले असल्याने आधीच्या पाच महिन्यांत तिने केवळ तीन सामने जिंकले होते. मात्र येथे तिने ओळीने सात सामन्यांत विजय मिळवला.

बार्बोरा क्रेचिकोवाची सुरुवात पहिल्या फेरीतील अटीतटीच्या लढतीने झाली होती. त्या लढतीत तिने व्हेरोनिका कुदरमितोवाला 7-6 (7-4),6-7 (1-7) 7-5 असे पराभूत केले. या विजयाने तिचा आत्मविश्वास वाढला. नंतर व्हॉलिनेत्झला दोन सेटमध्ये टाय-ब्रेकरमध्ये 7-6 (8-6) आणि 7-6 (7-5) असे नमवले. तिसऱ्या फेरीत बौझासविरुद्ध तिची 6-0, 4-3 अशी आघाडी असताना बौझासने सामना सोडला. नंतर कालिन्सवर तिने 7-5, 6-3 असा विजय मिळवला आणि उपान्त्यपूर्व फेरीत ओस्टापेंकोला 6-4, 7-6 (7-4) हरवले. उपान्त्य सामन्यात रिबाकिनावर 3-6, 6-3, 6-4 अशी मात करून अंतिम फेरी गाठली. पाओलिनने प्रथम सॉरिबेसला 7-5, 6-3 तर मिन्नेनला 7-6 (7-5), 6-2 असे पराभूत केले. नंतर अॅन्ड्रेस्कूवर 7-6 (7-4), 6-1 असा विजय नोंदवला. नंतरच्या फेरीत केसविरुद्ध 6-3, 6-7 आणि 5-5 अशी परिस्थिती असताना केसने पुढे चाल दिली. उपान्त्य फेरीत नवारोला 6-2, 6-1 असे झटपट पराभूत केले आणि चुरशीच्या, दीर्घ काळ चाललेल्या उपान्त्य सामन्यात वेकिकवर 2-6, 6-4 आणि 7-6 (10-8) अशी सरशी मिळवून ती अंतिम फेरीत पोहोचली होती.

पाओलिनी बरोबरचा अंतिम सामनाही अपेक्षेप्रमाणे खूपच रंगला. पाओलिनीने पहिला सेट धडाक्याने 6-2 असा जिंकला आणि ती सामन्यावर वर्चस्व गाजवणार असे वाटत असताना दुसऱ्या सेटमध्ये क्रॅचिकोवाने चिकाटीने सामना लढवला आणि हळूहळू त्यावर पकड घेतली. तरीही पाओलिनीने तिसऱ्या सेटमध्ये प्रयत्न सुरूच ठेवले आणि सहा सहा बरोबरीनंतर टाय ब्रेकरचा अवलंब करावा लागला. तो क्रॅचिकोवाने दहा आठ असा जिंकला. मात्र विम्बल्डन विजेतेपद हे माझे स्वप्न नव्हते. ते खुल्या फ्रेंच स्पर्धेच्या जेतेपदाचे होते आणि 2021 मध्येच ते साकार झाले होते, असेही ती म्हणाली. एक लक्षणीय बाब अशी की, गेल्या आठ स्पर्धांत विम्बल्डन विजेतेपदाच्या मानकरी आठ महिला आहेत.

इतर विजेते असे आहेत :

पुरुष दुहेरी : हेन्री पॅटन आणि हॅरी हेलिओवारा विजयी विरुद्ध मॅक्स पर्सेल आणि जॉर्डन थॉम्पसन
6-7 (5-7), 7-6 (8-6), 7-6 (11-9).

महिला दुहेरी : टेलर टाउनसेंड आणि कॅटरीना सिरिआकोना विजयी विजयी विरुद्ध गॅब्रिएला डाब्रोवस्की आणि एरीन रौटलिफ
7-6 (7-5), 7-6 (7-1).

मिश्र दुहेरी : यान झीलिन्स्की आणि एस. हसीह विजयी विरुद्ध सँटियागो गोन्झालिस आणि गुइलिआना ओलमॉस
6-4, 6-2.

कुमार एकेरी : निकोलाय बीडकोव क्यीर विजयी विरुद्ध मीस रॉटजरिंग
6-3, 6-3.

मुली एकेरी : रेनाटा जॅमरिचोवा विजयी विरुद्ध जोन्स 6-3, 6-4.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


हेही वाचा : 

 

Tags: Carlos Alcaraz Novak Djokovic Wimbledon 2024 barbora krejkov Load More Tags

Add Comment