उसाचे पीक घेणाऱ्यांना आतापर्यंत एकरी जास्त ऊस उत्पादन अधिक आर्थिक फायदा, हे गणित माहीत झालेले आहे. महत्त्वाचे म्हणजे या पिकाला किमान ठराविक भावाचीही हमी मिळत असल्याने आता ऊस शेती बेभरवशाची राहिलेली नाही. आता तर पेट्रोल, डीझेल टंचाईमुळे इथेनॉलचा जास्तीत जास्त वापर करण्याकडे लक्ष पुरवले जात असल्याने, इथेनॉल निर्मितीला महत्त्व आले आहे. परिणामी ऊस पिकाचे मोलही वाढले आहे. शेतकरी ऊस मळ्यातून जास्तीत जास्त एकरी उत्पादन करण्याचा ध्यास घेताहेत. हे एकप्रकारचे देशकार्यच म्हणता येईल.
‘माझा ऊसाचा मळा’ हे ऊस उत्पादकांसाठी मार्गदर्शक असे हे पुस्तक कोल्हापुरच्या तेजस प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. ऊस शेतीतील किमयागार म्हटले जाते, अशा डॉ. बाळकृष्ण जमदग्नि, प्रा. अरुण मराठे, डॉ. बी. पी. पाटील आणि कृषिरत्न डॉ. संजीव माने या तज्ज्ञांनी ते लिहिले आहे. आपापल्या विषयातील अधिकारी असे हे लेखक आहेत. डॉ. जमदग्नि हे वनस्पती-क्रियाशास्त्रज्ञ, प्रा. मराठे हे मृदा शास्त्रज्ञ, डॉ. पाटील हे कृषि-विद्यावेत्ता, डॉ. संजीव माने डॉ. (मानद डॉक्टरेट) कृषिरत्न व प्रयोगशील शेतकरी आहेत. या सर्वांकडे दीर्घकाळचा अनुभव आहे आणि ‘आधी केले मग सांगितले’ या वचनानुसार प्रथम आपल्या प्रयोगांची सत्यता पडताळून नंतरच त्यांनी आपला अनुभव आणि ज्ञान त्यांच्या ‘ऊस संजीवनी व्हॉटसअॅप गटा’साठी उपयोगात आणले आहे. डॉ. माने यांच्या ऊस संजीवनी गटाच्या सदस्यांनी ऊस संजीवनी व्हॉटसअॅपद्वारे एकरी शंभर टन वा त्याहीपेक्षा जास्त उत्पादन घेण्यात यश मिळवले. त्यामुळेच या गटाच्या सदस्यांप्रमाणे इतरांनीही आपले उत्पन्न वाढवावे म्हणून पुस्तक लिहिले आहे.
उसाचे पीक घेणाऱ्यांना आतापर्यंत एकरी जास्त ऊस उत्पादन अधिक आर्थिक फायदा, हे गणित माहीत झालेले आहे. महत्त्वाचे म्हणजे या पिकाला किमान ठराविक भावाचीही हमी मिळत असल्याने आता ऊस शेती बेभरवशाची राहिलेली नाही. आता तर पेट्रोल, डीझेल टंचाईमुळे इथेनॉलचा जास्तीत जास्त वापर करण्याकडे लक्ष पुरवले जात असल्याने, इथेनॉल निर्मितीला महत्त्व आले आहे. परिणामी ऊस पिकाचे मोलही वाढले आहे. शेतकरी ऊस मळ्यातून जास्तीत जास्त एकरी उत्पादन करण्याचा ध्यास घेताहेत. हे एकप्रकारचे देशकार्यच म्हणता येईल.
या पुस्तकात अगदी साध्या सोप्या पद्धतीने लेखकांनी ऊस उत्पादन वाढीची गुरुकिल्लीच वाचकांकडे सोपवली आहे. ऊस शेतीचा सर्वंकष कोश असे पुस्तकाचे स्वरूप आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पुस्तकातील प्रकरणांची नावे बोलकी आहेत. उसाच्या विक्रमी उत्पादनाची गुरुकिल्ली, सुपरकेन नर्सरी, ऊस व आंतरपीके, खोडवा उसाची पंचसूत्री, ठिबक सिंचन-फर्टिगेशन, उसावरील पाण्याच्या ताणाचे निवारण, महापूर, पाणबुड ऊस पिकाचे व्यवस्थापन, पोषणद्रव्यांतील आंतरक्रिया खत व्यवस्थापन, हवामान बदल आणि उसशेती, दर्जेदार गूळ उत्पादन, सेंद्रीय ऊसशेती, ऊस संजीवनीची किमया ही प्रकरणे. परिशिष्टांत ऊस संजीवनीच्या यशस्वी उपक्रमांची माहिती आहे. लेखक परिचय संदर्भ सूचीही आहे.
ऊस निगराणीसाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, याची चटकन कल्पना यावी यासाठी जमदग्नि सरांनी ऊस उत्पादनाची कुंडलीच तयार केली आहे. ती पुढीलप्रमाणे. 1) तनुस्थानः पूर्व मशागत, पीक फेरपालट. 2) कुटुंबस्थानः सेंद्रीय व हिरवळीच्या खतांचा वापर, 3) सहजस्थान: जैविक खतांच्या आळवण्या, 4) मातृस्थान: उत्तम वाण, बेणे प्रक्रिया, सुपरकेन नर्सरी, 5) संततीस्थान: रुंद सरी लागण पद्धत, 6) रिपूस्थानः तण व्यवस्थापन, 7) जायास्थानः अन्नद्रव्य व्यवस्थापन- फर्टिगेशन, 8) मृत्यूस्थानः रोग व किडींचे नियंत्रण, 9) धर्मस्थानः पाणी व्यवस्थापन, ठिबक सिंचन, 10) कर्मस्थान: आंतरमशागत, बाळभरणी, मोठी भरणी, 11) पराक्रमस्थानः ऊस संजीवन फवारण्या आणि हे सारे व्यवस्थित पार पाडल्यानंतरचे 12) आनंदस्थानः एकरी 150 टनांचे उत्पादन.
महाराष्ट्रात उसाच्या लागवडीचे तीन हंगाम असतात. 1. सुरू हंगाम: 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी या काळात लावलेला ऊस. यात एक उन्हाळा, पावसाळा व पुढे हिवाळा या तीन ऋतूंत वाढ होऊन 12 ते 13 महिन्यांत ऊस तोडणीस तयार होतो. प्रत्येक उसाला 22 ते 25 कांड येतात.
2. पूर्व हंगामी ऊस: 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान लागण. लागणीच्या वेळी पहिला हिवाळा, पुढे उन्हाळा, पावसाळा व पुन्हा हिवाळा असे चार ऋतू वाढीसाठी मिळतात. सर्वसाधारणपणे उसाला 28 ते 30 कांड्या.
3. आडसाली ऊस: 15 जुलै ते 15 ऑगस्ट लागण. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, दुसरा पावसाळा व दुसरा हिवाळा असे पाच ऋतू मिळतात. पीक कालावधी 16 ते 18 महिने. उत्पादन इतर दोन पद्धतीपेक्षा जास्त मिळते. प्रत्येक उसाला 40-45 वा त्याहून जास्त कांड्या मिळतात.
लागवडीमध्ये सरीच्या रुंदीचे महत्त्व मोठे आहे. दाट लागणीमुळे कीड व रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. सरी अरुंद असल्या तर वाढलेल्या उसात फवारणी घेण्यासाठीसुद्धा फडात जाता येत नाही. त्यामुळे कीड व रोगांना बळी पडून उसांची संख्या कमी होते. भरणीनंतर येणारे तण, तसेच कीड रोगांचे व्यवस्थापन नीट करता येत नाही. म्हणून सरी साधारण पाच फुटाच्या असाव्यात. अरुंद सरीत लागण करू नये. कारण स्पर्धेमुळे जास्त ऊस 70 टक्के खते खाऊन मरून जातात आणि उरलेले केवळ ३० टक्के खतांवर जगतात.
उत्तम रोपांच्या निर्मितीसाठी ‘सुपरकेन नर्सरी टेक्नीक’ ही साधी, सोपी, कमी खर्चाची शरीर तत्त्वांवर आधारलेली पद्धत आहे. या पद्धतीने तयार केलेली रोपे निरोगी, कणखर, जोमदार असतात. स्थळ व हंगाम यानुसार तयार करून ती नियोजित ठिकाणी लावता येतात, वाहतूक करून नेता येतात. निवडलेल्या जातीच्या 9-10 महिने वयाच्या लागणीच्या फडातील एक डोळा कांड्या किमान 18 तास स्वच्छ पाण्यात बुडवून ठेवणे आवश्यक. या पाण्यात खायच्या चुन्याची निवळी सोडून द्रावणाची तीव्रता 0.3 ते 0.5 टक्के होईल एवढे पाहावे. म्हणजे 1500 लिटर पाण्यात 5 ते 7 किलो चुन्याची निवळी (चुना नाही) सोडावी. बेण्यावरील जंतू किंवा खवले किडीसारखा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी बुरशी व कीटकनाशकांचाही पाण्यात वापर करावा.
सेंद्रीय, जिवाणू खते, जैविक संरक्षण, किडी, त्यांच्या नियंत्रणासाठी करायची उपाययोजना, याबाबत माहिती देण्यात आली आहे आणि त्याच बरोबर पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व, त्यातही ठिबक सिंचन पद्धत कशी जास्तीत जास्त फायद्याची आहे. शिवाय त्या पद्धतीने पाण्याची तसेच खते, कीटकनाशके यांचीही मोठ्या प्रमाणात बचत होते हे सविस्तर सांगितले आहे. संजीवकांची उपयुक्तता सांगताना लेखक म्हणतात, ‘एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची. ती म्हणजे संजीवके म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये, कीटक-रोगनाशके नाहीत. ती म्हणजे नत्र, स्फुरद, पालाशसारखे अन्नद्रव्यही नाही. जिवाणू वा सेंद्रीय खते नाहीत. उसामध्ये वापरण्याजोगी संजीवके पुढीलप्रमाणे आहेत. ऑक्झिन्स (आय.बी.ए., आय ए. ए.); जिबरेलिन्स (जी ४, जीए ७, जी ३ व प्रोजिब.); सायटोकायकिन (उदा. सिक्स बी.ए., सी.पी.यू.यू.); ट्रायकॉटेनॉल (विपुल, वृद्धी) : पोलॅरिस, ग्लायफोसेट (परिपक्वतेसाठी); सागरी वनस्पतींचा अर्क (सी वीड एक्स्ट्रॅक्ट); आणि ब्रॉसिनाइडस.’
ऊस संजीवनी फवारणी वेळापत्रकात प्रत्येक फवारणीत वेगळे संजीवक घटक योग्य प्रमाणात वापरले जातात. पहिली फवारणी पोषक द्रव्ये, संजीवके, पीक संरक्षक. दुसऱ्या व तिसऱ्या फवारणीत याखेरीज सागरी वनस्पती अर्क. चौथ्या फवारणीत पहिल्याप्रमाणे आणि पाचव्या फवारणीत तिसरीप्रमाणे मुख्य घटक असतात. अर्थात पोषणद्रव्ये, संजीवके, सागरी वनस्पतींचे आणि पीक संरक्षकांचे वेगवेगळे प्रकार या फवारण्या करताना वापरले जातात.
खोडवा उसाच्या उत्पादनवाढीबाबतही पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आले आहे. ऊस उत्पादनासंबंधातील आणखी महत्त्वाचा एक घटक म्हणजे, खोडवा ऊस लागणी ऊस तुटून गेल्यावर त्याच्या खोडाचा - मुळाचा नाही- जमिनीत जो भाग राहतो, त्यावरील सुप्त अंकुरापासून नवे धुमारे फुटतात. पुढे त्यांचे उसात रुपांतर होते. त्यालाच खोडवा ऊस म्हणतात. महाराष्ट्रातील एकूण ऊस क्षेत्रापैकी साधारण निम्मे म्हणजे 10 लाख हेक्टर क्षेत्र नेहमी खोडवा पिकाखाली असल्याने त्याचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. खोडव्याला पूर्व मशागत, बेणे, बेणे प्रक्रिया अशा आर्थिक खर्चाची गरज नसते. खोडावरील डोळे बियाणांची जागा भरून काढतात. खोडव्याला मुळे लवकर फुटतात. खत सिंचनाची काळजी घेतली तर फुटवे झपाट्याने वाढतात. खर्चात 25-30 टक्के बचत होते. तुटलेल्या उसाचा पाला पसरून कुजवता येतो त्याचे आच्छादन होते. त्यामुळे ओल टिकून राहते. तण नियंत्रण, सेंद्रीय कर्बवाढ, जैवसमृद्धता हेही फायदे होतात. खोडवा पीक एक-दीड महिना लवकर पक्व तयार होते. त्याची गुणवत्तादेखील चांगली असते. रिकव्हरी लागणी पिकापेक्षा जास्त असते. खोडवा पीक लवकर तुटले, तर रान लवकर मोकळे होते. त्यामुळे पुढचे नियोजन निश्चित करणे सोयीचे होते.
हेही वाचा : शेतीविषयीचा विचार - आप्प्पासाहेब सा. रे. पाटील
जानेवारी-फेब्रुवारीत ऊस तुटला तर उत्तम खोडवा मिळतो. मार्चनंतर तुटला तर अपेक्षित उत्पन्न येत नाही. त्याचप्रमाणे अगोदर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुटला, तरीही चांगले उत्पादन मिळत नाही. लागण ऊस विरळ असेल, तुटाळ्या भरून काढल्या नसतील, तर खोडवेही विरळ होतात. अनेकदा नत्र, स्फुरद, पालाश, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणत वापरली जात नाहीत. एकसारखी तोड नसेल, बुडखे तासलेले नसतील तरीही खोडवा उत्पादन घटून नुकसान होते. बुडखे छाटताना ते उंच ठेवू नयेत ते जमिनीपासून 4-5 सेंमीचे असावेत. खोडव्यासाठी पाचट राखणे महत्त्वाचे. त्याचप्रमाणे रासायनिक खतांचा विचारपूर्वक वापर आवश्यक असतो. पीक संरक्षणासाठी तीन आळवण्या व फवारण्या कराव्यात. संजीवकांच्या पाच फवारण्या कराव्यात. असे सर्व निगुतीने केले तर उत्पादन चांगले होते. ऊस संजीवनी गटातील अनेकांनी खोडव्याचे उत्पादन एकरी शंभर टनांच्या जवळपास घेतले आहे. त्यामुळेच आता या गटाने खोडव्याचे एकरी 150 टन उत्पादन हे लक्ष्य ठेवले आहे.
उसाला तीन प्रकारे पाणी देता येते. प्रवाही सिंचन (पाटातून पाणी देणे, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन.) प्रवाही सिंचन पद्धतीसाठी शेताची बांधणी नागमोडी पद्धतीने करून पाणी देण्याकडे लोकांचा कल असतो. पण यात पिकाच्या गरजेपेक्षा पाणी जास्त दिले जाते ते हानीकारक ठरू शकते, (क्षारपड होण्याचा मोठा धोका संभवतो.) यापेक्षा लांब सरीतून पाणी देणे चांगले. हलक्या जमिनीत 30 ते 50 मीटर लांब तर भारी जमिनीत 0.3 टक्क्यांपेक्षा कमी उतार असल्यास 100 ते 150 मीटर लांब सरी असावी. पाणी देताना सुरुवातीला दोन तृतीयांश सरी भिजवावी. नंतर थोडा वेळ थांबून उरलेली एक तृतीयांश सरी भिजवावी. याला सर्ज (थाव) पद्धत म्हणतात. या पद्धतीने पाणी व्यवस्थित मुरते व शोषण चांगले होते. जमिनीत वाफसा राहील एवढेच पाणी द्यावे कारण त्यामुळेच त्याचा पुरेपूर वापर होऊन पिकाला लाभ मिळतो, म्हणून फडात वाफसा असणे महत्त्वाचे असते.
उसासाठी ठिबक सिंचन हे वरदान आहे. पाणी हे पिकाला द्यायचे असते, जमिनीला नाही, हे तत्त्व ध्यानात ठेवावे. ठिबकामुळे उपलब्ध पाण्यामध्ये दुपटीपेक्षा जास्त क्षेत्र भिजवता येते. मुळांच्या क्षेत्रात ओलावा राहतो. इतर भाग कोरडा राहतो. तण वाढत नाही. उंच सखल, हलक्या, पडीक जमिनी लागवडीखाली आणता येतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उसाच्या वाढीच्या शेवटच्या अवस्थेपर्यंत ठिबकातून खते, कीटकनाशके, संजीवके देता येतात. यालाच ‘फर्टिगेशन’ म्हणतात. यामुळे कांडांची संख्या वाढते, लांबी, जाडी, वजनही वाढते. वाढ एकसारखी होते. हुकमी विक्रमी पिकासाठी ठिबक सिंचन संच बसवावा. त्यावर शासनाची सबसिडीसुद्धा मिळते. पाण्याची कमतरता असेल तर दोन सऱ्यांत लागण करून एक सरी रिकामी ठेवावी. याला जोड ओळ पद्धत म्हणतात.
विक्रमी एकरी 168 टन घेणाऱ्या अशोक खोत यांनी तंत्रज्ञ अजिंक्य माने यांच्या साथीने हे कसे साध्य केले; याबरोबर गुजरातमध्येही या गटाच्या कामाने कशी वाखाणणी मिळवली आहे; डोंगराळ, निकस, मुरमाड जमिनीवर पायरी पद्धतीने प्लॉट करून मिळवलेल्या यशोगाथाही वाचनीय आहेत. महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त, शेखर गायकवाड पुस्तकाबाबतच्या आपल्या अभिप्रायात म्हणतात, ‘केलेला अभ्यास प्रयोगातून काढण्यात आलेले निरीक्षण, साध्या सोप्या भाषेतील पुस्तकाची मांडणी, संपूर्ण चार रंगी छपाई, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल दिलेली नेमकी माहिती यामुळे या पुस्तकाला सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी, तसेच अभ्यासू वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. या नेमक्या अभिप्रायात त्यांनी पुस्काची महती सांगितली आहे. पुस्तक वाचल्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी तसेच वाचकही त्यांच्याशी सहमत होतील.
माझा उसाचा मळा
लेखक - डॉ. बाळकृष्ण जमदग्नि, प्रा. अरुण मराठे, डॉ. बी. पी. पाटील, कृषिरत्न डॉ. संजीव माने.
प्रकाशक - रावसाहेब पुजारी, तेजस प्रकाशन, कोल्हापूर.
पाने - (मासिकाचा आकार) 184, किंमत - 400 रुपये.
पुस्तकासाठी संपर्क : रावसाहेब पुजारी (मोबाईल : 09881747325)
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Tags: शेती शेतीविषयक साहित्य ऊस शेती कोल्हापूर शेतकरी ग्रामीण महाराष्ट्र नवे पुस्तक Load More Tags
Add Comment