आता यापुढं गांधीहत्या, आरएसएसवर बंदी, बाबरी मशीदीचा विध्वंस आणि नंतरच्या रक्तपाताच्या घटना, गुजरातमधील दंगली, तेथील 2002चं सरकार पुरस्कृत हत्याकांड (आणि त्यातील आरोपींची अर्थात हिंदू असले तरच निर्दोष मुक्तता, सत्कार, मोठी पदे इ.) हे आमच्या इतिहासात असणार नाही. (आणीबाणी तसंच 1984 च्या दिल्ली दंगलीबाबत मात्र आवर्जून बोलत राहायचं.) आम्ही तेथून एकदम 2014 मध्येच येतो, कारण तेव्हाच खरं स्वातंत्र्य मिळालं! तेव्हाचा खरा इतिहास काय ते लोकांना सांगायची जबाबदारी आहे.
सध्या शालेय पाठ्यपुस्तकांतील इतिहासाबरोबरच अन्य विषयांच्या प्रकरणांमध्ये, काटछाट-बदल करण्याच्या, त्यातील ठराविक मजकूर गाळल्याबाबतच्या बातम्यांची एकच चर्चा सर्वत्र आहे. चर्चेचं रूपांतर वादांमध्ये होत आहे. भले भले जाणकार (आणि जाणकार म्हणवणारेही) त्यात भाग घेत आहेत. त्यातील मुद्द्यांचे गुद्द्यांत रूपांतर होणार अशी भीती काही जणांना वाटायला लागली आहे. सर्व विषयांमध्ये इतिहास हा खरंतर कुतूहलाचा आणि रस वाटणारा रंजक विषय. कारण, होऊन गेलेल्या घडामोडींची माहिती आपल्याला त्यातूनच मिळते. एक गोष्ट खरी की, इतिहासलेखन करणाऱ्याला त्याच्या धन्याला झुकतं माप देणं भाग असतं. तसं सगळीकडंच हे होत असतं. पण असं असलं तरीही त्या इतिहासातून सत्यही मोठ्या प्रमाणात शोधता येतं. अर्थात जाणीवपूर्वक एकतर्फी लेखन करणाऱ्यांचा विचारही यात करावा लागतो आणि त्याबरोबरच त्यांच्याकडं दुर्लक्षही करावं लागतं. कारण अभ्यासासाठी त्यांचा विचार करण्याची गरजच नसते. तरीही तेच खरं मानणारेही काहीजण असतातच. ते त्या लिखाणावर विश्वासही ठेवतात किंवा तसं सांगणं त्यांना फायद्याचं असतं, जसं ते लिहिणाऱ्यांनाही असतं. नमनाला अगदी घडाभर नसलं, तरी एवढं तेल पुरे. कारण लेखाचा विषय चाणाक्ष वाचकांच्या एव्हाना ध्यानात आलाच असेल. तर आता मुख्य विषय..
त्याचं काय झालं... तर काही शास्त्रज्ञ, संशोधक, ज्ञानोपासक, इतिहासप्रेमी आणि इतिहासाचे, तसंच अन्य विषयांचे अभ्यासक जमले होते. ते या सुधारित (?) अभ्यासक्रमाचं, त्यातही जास्त करून इतिहासलेखनाचं स्वरूप कसं आहे आणि कसं असावं याबाबत चर्चा करत होते. खऱ्याखुऱ्या इतिहासप्रेमींचं म्हणणं असं की, एखाद्या घटनेबद्दल लिहिणारे अनेक असतात आणि त्यांत खूपच फरक असतो. पण आपण नीरक्षीरविवेक करून त्यातून सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करायला हवा. तिथं विश्वगुरुचे काही भक्तगणही होते. त्यांनी लगेच याला विरोध केला. असं करण्याची आवश्यकताच काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांचं म्हणणं असं की, ‘जे आपल्या (म्हणजे, अर्थातच आमच्या विचारसरणीच्या) सोयीचं असेल, तेवढं घ्यायचं. तेच सत्य समजायचं आणि सांगायचं. बाकीचं भरताड म्हणून काढून टाकायचं. आम्ही तेच केलं आहे, करतो आहोत आणि करत राहणार आहोत. आपला स्वाभिमान म्हणून काही आहे की नाही? उगाच दुसऱ्या राज्यकर्त्यांच्या, त्यांच्या चांगुलपणाच्या, पराक्रमाच्या यशाच्या गोष्टी हव्यात कशाला? त्या सरळ काढूनच टाकायच्या! म्हणजे पुढच्या पिढीला ते काही समजणार नाही. आम्ही सांगू तेच त्यांना खरं मानावं लागेल.’
इतर काहींनी त्यांना दुजोरा देत म्हटलं की, ‘कुठला कोण तो डार्विन आणि काय त्याचा उत्क्रांतीवाद, म्हणे माकडापासून माणूस झाला.’ आमच्या एका अतिज्ञानी मंत्र्यानं तर विचारलंच की, ‘माकडापासून माणूस झालेला कुणी पाहिलाय का? म्हणून आम्ही त्याला पाठ्यपुस्तकातून कोलून दिलंय.’ त्यावर अभ्यासक म्हणाले, “उत्क्रांती ही काही लगोलग होणारी प्रक्रिया नाही, त्यासाठी शेकडो, हजारो वर्षे जावी लागतात.” अर्थात महनीय मंत्रिमहोदयांना हे ठाऊक असण्याची शक्यताच नाही. ‘तुम्ही असेच परधार्जिणे’ असं त्यांनी म्हटलं.
त्यावर एक वैज्ञानिक म्हणाला, “तुमचं बरोबरच आहे. तुमच्या विश्वगुरूनं तर सांगितलंच ना! तेही शास्त्रज्ञांच्या सभेत की, फार पूर्वी भारतात अनेक गोष्टी होत होत्या. म्हणजे प्लास्टिक सर्जरीही.. कारण गणपती तुम्ही पाहताच, त्या माणसाच्या धडावर हत्तीचं डोकं बसवण्याचं कौशल्य का नाकारायचं? कृत्रिम गर्भधारणेची तर असंख्य उदाहरणं आहेत. आमच्याकडं दूरचित्रवाणी होती, दूरसंदेश यंत्रणा होती, अण्वस्त्रदेखील होती, असं सांगणारे त्याचे होयबाही होतेच की. वर सर्वांनी ते मान्य करायलाच हवं असा यांचा अट्टाहास. तसं होत नाही, म्हणून आपल्याला हवं तेच सांगण्यासाठी हे नव्या पाठ्यपुस्तकांचं तंत्र त्यांनी आता अवलंबलंय. कोणताही विषय त्यातून सुटणार नाही. विज्ञान तंत्रज्ञानच काय, अगदी इलेक्ट्रॉनिक्सदेखील ते बदलू शकतात कारण त्यांच्याकडे अधिकार आहे. (ज्ञानाचा नाही, तर सत्तेला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचा!) आता यापुढे डार्विनच काय, मेंडेल, पाश्चर, आइन्स्टाइन इ. सर्वाचंच आता काही खरं नाही. भावी पिढीच्या कानावरही ही नावं पडू नयेत अशी व्यवस्था करण्यात येत आहे.
त्यावर एक अभ्यासक म्हणाला, “पण बाकी जगात तर ते सर्वांपर्यंत गेलेलंच आहे, तिथून ते कसं हटवता येईल? आपले अनेक विद्यार्थी तिकडंच शिकतात. पण त्यांना हे काही माहीतच नसेल, तर मग ते तिथं काय शिकणार? एकतर त्यांना तिथं शिकताना खरं विज्ञान, खरा इतिहास असं सर्व काही कळेल. त्यामुळे आपल्यावरच खोटेपणाचा आरोप येईल!” विरोध करणारा म्हणाला, “आता तुम्हीही त्या देशद्रोह्यांत सामील झालात का? आमच्या साहेबांचं सांगणं तुम्हाला कळणार नाही, असं वाटतच होतं.”
आता यापुढं गांधीहत्या, आरएसएसवर बंदी, बाबरी मशीदीचा विध्वंस आणि नंतरच्या रक्तपाताच्या घटना, गुजरातमधील दंगली, तेथील 2002चं सरकार पुरस्कृत हत्याकांड (आणि त्यातील आरोपींची अर्थात हिंदू असले तरच निर्दोष मुक्तता, सत्कार, मोठी पदे इ.) हे आमच्या इतिहासात असणार नाही. (आणीबाणी तसंच 1984 च्या दिल्ली दंगलीबाबत मात्र आवर्जून बोलत राहायचं.) आम्ही तेथून एकदम 2014 मध्येच येतो, कारण तेव्हाच खरं स्वातंत्र्य मिळालं! तेव्हाचा खरा इतिहास काय ते लोकांना सांगायची जबाबदारी आहे.
दरम्यान देशात आयटीची स्थापना भरभराट झाली, आर्थिक सुधारणा झाल्या तेव्हा आम्ही त्याला कडकडून विरोध केला होता. पण नंतर मात्र जणू काही ती आमची कामगिरी आहे अशा आर्विभावात आम्ही या नव्या क्रांतीचा भरभरूनच नाही, तर पुरेपूर फायदा उठवला. खोट्या बातम्या, व्हॉटसअॅप विद्यापीठाचे पगारी प्रचारक यांनी मोलाची कामगिरी बजावल्यानं ते परकीय जोखड आम्ही दूर केलं ते 2014 मध्ये आणि त्यानंतरच्या काळात!
खरं तर भारताचा इतिहास या नव्या स्वातंत्र्यापासूनच लिहिला जाईल. पण त्या इतिहासातही नोटबंदी, अविचाराने केलेल्या टाळेबंदीनं देशोधडीला लागलेल्यांचे मृत्यू, कोविडमुळे मेलेल्यांची खरी संख्या, कोविडवरचे टाळ्या-थाळ्या वाजवणे, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणे इ. उपाय, ऑक्सिजनचा तुटवडा, गुजरातमधून काश्मीरला पाठवलेले न चालणारे व्हेंटिलेटर्स, गंगेत वाहिलेली प्रेतं, अदानी आणि विश्वगुरू यांचे लागेबांधे, चीननं केलेलं आक्रमण, बळकावलेली हजारो कि.मी.ची जमीन, यापैकी काही काही पाठ्यपुस्तकांत येणार नाही! मात्र पं. नेहरूंच्या काळात चीननं किती जमीन लाटली याची आम्ही वारंवार घोकंपट्टी करून घेऊ. पण देशातील महत्त्वाचे उद्योग, शिक्षण संशोधन संस्था, पायाभूत सुविधा, नंतरची हरित आणि धवल क्रांती हे कसं टाळता येईल? कुणीतरी विचारलं. पण पुन्हा तो विरोधक हसतच म्हणाला, काय तुमचं ज्ञान हो! अहो, ते सारं तर 2014 नंतरच्या विश्वगुरूच्या कारकिर्दीत सुरू झालंय. अनेक योजनांची नावं बदलून त्या विश्वगुरू योजना म्हणूनच ओळखल्या जाताहेत. मनरेगाला मनसोक्त नावं ठेवली ती विश्वगुरूनंच. पण आता तीच योजना किती चांगली, आणि अर्थातच आम्ही ती कशी आणली हे आम्ही सांगतोय. घरोघर शौचालय, गॅस जोडण्या कुणी दिल्या, आम्हीच ना? त्यावर एकजण म्हणाला, तेही खरंच आहे म्हणा! पण त्या शौचालयांचा वापर कुठं होतोय, ती अडगळीच्या खोलीसारखी वा कोठारासारखी वापरली जात आहेत. गॅसच्या सिलिंडरवरच शेगड्या पेटवल्या जाताहेत. तुमच्या या योजना म्हणजे राजा उदार झाला आणि गरिबाला हत्ती दिला अशा आहेत. गॅस कुणाला परवडतोय आणि शौचालयांसाठी पाणी कुठंय? प्यायला पाणी मिळायची मारामार तिथं शौचालयं कशी वापरणार?
त्याच्या या बोलण्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काही सज्ज झाले. ते नेहमीप्रमाणे (आणि त्यांच्या विश्वगुरूप्रमाणे) मूळ मुद्दा टाळून ते म्हणाले की, आता राम मंदिर होतंय, अनेक महामार्ग होतायत, वंदेभारत रेल्वे वाढताहेत, लवकरच बुलेट ट्रेनही धावेल. ते ठीक. पण ते सारं सामान्य माणसाला कसं परवडणार? तुमच्या या विकासयोजनांमुळे अपघात वाढताहेत, झाडं तोडली जात आहेत.. लाखो झाडं लावणार म्हणून सांगितलंय खरं, पण तसं काही होताना दिसत नाहीय. सामान्य लोक मात्र अक्षरशः देशोधडीला लागणार आहेत. खरं तर पुरते नागवले जाणार आहेत. कारण या विकासापेक्षा जास्त गतीनं महागाई वाढत आहे.. उद्योगधंद्यांमध्ये नोकरकपात सुरू आहे. नवे उद्योग सुरू होत नाहीयेत. त्यामुळंच अनेकजण नोकऱ्या गेल्या म्हणून, तर असंख्यजण रोजगार नाही, मग आम्ही जगायचं कसं या चिंतेत आहेत, त्यांना राममंदिर आणि बुलेट ट्रेनचं, सेंट्रल प्लाझा आणि नव्य संसद भवनाचं काय पडलंय? त्यांना चिंता आहे ती, आला दिवस कसा काढायचा याची.
हेही वाचा : मुक्त विचाराचं भय - रामचंद्र गुहा
भक्तांपैकी एकजण काही बोलायला सुरुवात करणार तोच एकजण धावत, धापा टाकत तिथं आला. त्याच्या हातात काही कागद होते. तो काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता, पण धाप लागल्यानं त्याला धड बोलताही येत नव्हतं. इतरांनी त्याला शांत केलं. पाणी प्यायला दिलं आणि त्याला म्हणाले, “जरा बरं वाटलं की मग बोल काय ते.” काही वेळानं तो बोलू लागला. “अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मला एका पुस्तकाची काही पानं सापडली आहेत. कदाचित ते पुस्तकाचे फॉर्म बांधणीसाठी घेऊन जात असताना त्यातून ही पानं निसटून पडली असावीत. कुतूहल वाटल्यानं मी येता येता त्यातलं जे काही वाचलंय ते अक्षरशः अद्भूत वाटलं. म्हणून घाईनं आलो. आपल्याला हा खजिनाच मिळाला आहे. त्यासाठी कदाचित आपल्याला मोठं बक्षिसही मिळेल.”
बाकी जण म्हणाले, “ते ठीक आहे, पण काय मिळालंय ते तरी सांग ना! म्हणजे त्याचं महत्त्व आम्हालाही कळेल. कुठचं पुस्तक म्हणतोयस तू? आम्हाला तर त्याबाबत काहीच माहिती नाही. त्यावर तो म्हणाला, “अहो, हे काम अगदी गुपचूप चाललेलं असणार. कारण ते फॉर्म नेणाराही सारखा इकडं तिकडं पाहत होता आणि आपल्यावर कुणाची नजर नाही, याची खात्री करून घेत होता. पुस्तक इतिहासाबाबतच आहे, असं वाटतंय... तुम्ही सारेच बघाना. त्यावर एकजण म्हणाला, “सारेजण कसं बघणार एकदम? त्यापेक्षा कुणीतरी वाचलं तर बरं. म्हणजे सगळ्यांनाच ऐकता येईल.” चांगला आवाज असणाऱ्या आणि व्यवस्थित वाचू शकणाऱ्या एकाकडं ती कामगिरी सोपवण्यात आली.
त्यानं ते कागद हातात घेऊन त्यांवर नजर टाकली. म्हणाला, “अरेच्चा! ही तर पाठ्यपुस्तकातली पानं दिसतायत. बघा नं, तळाला त्याचं नाव ‘नवा इतिहास’ असं आहे. आणि पुढं सर्व इयत्तांसाठी असंही कंसात म्हटलंय. म्हणजे प्रार्थनेइतकंच महत्त्व असणार त्याचं. वाचणाऱ्यानं पानावर नजर टाकली. आणि तो म्हणाला, “अरेच्चा, हा तर ताजाच इतिहास दिसतोय. म्हणजे यात सध्याच्या चर्चेतील विषयच दिसताहेत. गुजरात, उत्तर प्रदेशातील बलात्कार, हत्याकांड, गोरक्षकांनी पाडलेले खून, निरपराध्यांवर केलेले अत्याचार अशा प्रकरणातील आरोपींना कोर्टानं कसं निर्दोष सोडलं हे यात सांगितलंय. अगदी माजी राज्यपाल सत्य प्रकाश मलिक यांच्या मुलाखतीबाबतही काही आहे.”
ऐका यामध्ये काय लिहिलंय ते, असं म्हणून त्यानं वाचायला सुरुवात केली. ‘गुजरातेत काही जणांवर हत्याकांड, बलात्काराचे आरोप करण्यात आले होते आणि त्यांना दोषीही ठरवण्यात आलं होतं. पण पुन्हा ते प्रकरण न्यायालयात आलं आणि आधी बिल्किस बानोवरील बलात्कार आणि नंतरच्या हत्याकांडातील अन्य सर्व निरापराध्यांना निर्दोष मुक्त केलं गेलं ते आमच्या आदेशानंच. अर्थात त्यांनी अत्याचार मुस्लिमांवर केले होते, हत्याकांड मुस्लिमांचं केलं होतं, जाळपोळ त्यांच्याच घरादारांची, उद्योगधंद्यांची, दुकानांची केली होती. त्यांना चरितार्थाची साधनंच शिल्लक राहू दिली नव्हती. आम्हाला वाटतं की, त्यांनी जे काही केलं ते योग्यच केलं. ते निर्दोषच होते. म्हणून तर त्यांचे सत्कार केले गेले. अगदी मंत्र्यांच्या उपस्थितीत. मंत्री महोदयांनी त्यांचं कौतुकही केलं. ते किती संस्कारी आहेत असं शिफारसपत्र दिलं. (तेव्हा कुणी कुत्सितपणं म्हणालं की, असे संस्कार नको रे बाप्पा!). गोरक्षकांप्रमाणे याही बाबतीत कोणावर काही गुन्हा नोंदवला जाणार नाही, याची हमीही देण्यात आली होती. तेव्हा ‘नुसता विकासकारी नाही तर कल्याणकारी नेताही मिळालाय आम्हाला!’ असं असंख्य भक्तगण आदेशाप्रमाणे एका सुरात म्हणाले होते. पण तेथील बहुतेकांनी त्याच्या बोलण्याकडं दुर्लक्ष तरी केलं किंवा ते हसण्यावारी नेलं.
चर्चा पुढं सुरू झाली. आता विद्यार्थ्यांना औद्योगिक क्रांतीबाबतही काही कळणार नाही. कारण ती युरोपात झाल्यानं तिला आमच्या अभ्यासक्रमामध्ये स्थान नाही, असं इथं स्पष्ट नोंदलंय. पुन्हा तो विरोध करणारा भक्त म्हणाला, “अहो, ते तर केव्हाच करायला हवं होतं. अगदी फार फार पूर्वीपासून आम्ही विमानविद्या शिकलो होतो. सध्याच्या घातक अस्त्रांपेक्षा सरस अशी अस्त्र वापरल्याचे उल्लेख तर रामायण महाभारतातही आहेत. म्हणून तर राम... चुकलो, श्रीराम आमचा आदर्श आहे.” त्यावर एकजण म्हणाला, “म्हणजे तुम्हाला महिलांवरील अत्याचार, पत्नीला अन्याय्य वागणूक, शूद्रांवर अन्याय आणि अत्याचार मान्य आहेत..” तर ते न ऐकल्यासारखं करून तो भक्त पुढे सांगतो की, याआधी डावे कम्युनिस्ट, मार्क्सिस्ट, राष्ट्रद्रोही, तुकडे तुकडे गँग यांनी लिहिलेला इतिहास आम्हाला नकोय आणि आम्ही काही कुणावर सक्ती केलेली नाही. एनसीईआरटीचे प्रमुख हेच सांगतात ना. ते म्हणतात की, आमच्या कमिटीवर कुणाचाही दबाव नव्हता. कदाचित कोविड-19 मुळे मुलांना जे काही सोसावं लागलं, मुलांना जो दबाव सोसावा लागत आहे, त्याचा भार कमी करण्यासाठी अभ्यासक्रमातून काही भाग वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
एकजण म्हणाला की, इतिहासतज्ञ मृदुला मुखर्जी तर सिद्धार्थ भाटिया यांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या आहेत की, लहानपणापासूनच मुलांवर आपल्या विचारांचेच संस्कार घडायला हवेत म्हणून इतर काहीही त्यांच्यासमोर येऊ द्यायचं नाही म्हणजे ते आपोआपच आपल्या विचारसरणीचे होतील असा यामागचा विचार आहे.
(ही मुलाखत ‘द वायर’साठी घेण्यात आली. ती पुढील संकेतस्थळावर वाचता / ऐकता येईल. (संकेतस्थळाची लिंक) प्रस्तुत लेखातील काही माहिती त्या मुलाखतीच्या आधारेच घेतली आहे. वाचकांनी आवर्जून ती संपूर्ण वाचावी / ऐकावी. कारण या लेखात त्यातील सर्वच भाग देणे जागेअभावी शक्य नाही.) मात्र या कमिटीतील सदस्यांची नावे ते सांगणार नाहीत. (कारण तसं केलं तर त्या व्यक्तींना त्याबाबत विचारलं जाईल आणि दुसरं म्हणजे त्यांची पात्रता ही मूळ संघाच्या विचारसरणीशी जोडलेलं असणं ही असल्याचं लोकांना समजेल.)
मुखर्जीबाई सांगतात की, गांधीहत्येनंतरची बंदी उठल्यावर संघाने प्राथमिक शाळा सुरू करण्याचा सपाटा लावला. व 15000 ते 20000 शाळा स्थापन केल्या. बहुतेक वेळा त्यांचं नाव ‘सरस्वती शिशु मंदिर’ आहे. यावरूनही हेच दिसतं. प्राथमिक शाळा स्थापन करण्याचं कारण म्हणजे, त्या वयात मुलं जास्तीत जास्त संवेदनक्षम असतात. ते तेव्हा शिकलेल्या गोष्टी चटकन विसरत नाहीत. शाखांमध्येही लहान मुलांवरच लक्ष केंद्रित केलं जातं. त्यात खेळाबरोबर आपल्या विचाराचं हे जहर मुलांना देण्याचा प्रयत्न स्पष्ट असतो. पालकांना मात्र मुलं खेळायला जातात तर जाऊ दे, असं वाटतं. हिंदू राष्ट्र ही संकल्पना सतत त्यांच्या मनात रुजवली जाते. तीवरच सारा भर असतो. जे काही चांगलं असेल ते हिंदूंचं. मोगलांनी फक्त अत्याचार आणि अन्यायच केला हे मुलांच्या मनावर बिंबवण्यात येतं. मात्र हे करताना जाणीवपूर्वक या काळातील हिंदूंचं क्रौर्य: अस्पृश्यता, दलित आणि आदिवासी अशांना दिलेली हीनपणाची वागणूक हे वगळण्यात येतं. आणि हे कमी म्हणून की काय, आता मौलाना आझाद यांचंही नाव वगळण्यात येत आहे. कारण, हा अभ्यास केला तर मग सारंच मुसळ केरात जाईल अशी भीती त्यांना वाटते. आणि व्हॉटसअॅपवर तर असे धडे असतात की, नेहरू हे मुसलमान होते असंच मुलं समजायला लागतील. त्या आणखी एक महत्त्वाचा इशारा देतात. हे सारं आता उजेडात येत आहे. आणि त्याला प्रसिद्धीही मिळत आहे. मात्र सध्या त्यांनी गाळलेले धडे, उतारे एवढ्यापुरतंच हे मर्यादित आहे. खरं तर आधीची पाठ्यपुस्तकं आणि ही नवीन सुधारून बनवलेली पाठ्यपुस्तकं शेजारी ठेवून प्रत्येक ओळ तपासायला हवी. कारण ते बदल चटकन लक्षात येणार नाहीत, हे त्यांनी ओळखलं आहे. हे काम तसं वेळ घेणारं आहे, पण ते करायलाच हवं.
वाचकांचे आभार मानून येथेच थांबतो. कारण लेख खूपच लांबला आहे. तरीही आम्ही लटिके ना बोलू... म्हणत कृती मात्र आम्ही लटिकेच बोलू... अशी कशा प्रकारे करायची याचं ही पाठ्यपुस्तकं म्हणजे एक ज्वलंत उदाहरण आहे.
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Tags: पाठ्यपुस्तके एनसीइआरटी शिक्षण मुघल अभ्यासक्रम Load More Tags
Add Comment