सिनर आणि अल्काराझ या दोन खेळाडूंमधील स्पर्धा तीव्र होत चालली आहे. इतकी की, त्यामुळे फेडरर, नदाल आणि योकोविच या तिघांतील सामन्यांप्रमाणे या अल्काराझ आणि सिनर यांच्यातील सामन्यांची रसिक आता वाट बघत असतात. कारण तेथे या खेळाडूंच्या प्रत्येकाच्या गुणवत्तेचा कस लागतो. त्यामुळे 24 ऑगस्टला सुरू होणाऱ्या अमेरिकन खुल्या स्पर्धेतही हेच दोघे अंतिम फेरीत झुंजतील असे बोलले जात आहे.
विम्बल्डनला यंदा दोन नवे मानकरी पुरुष आणि महिला विभागात मिळाले आहेत. पुरुष एकेरीचा विजेता यानिक सिनर आणि महिला विजेती ईगा स्विआटेक यांनी या या स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करून विजेतेपद मिळवले. सिनरने अंतिम सामन्यात गेल्या वर्षीचा विजेता कोर्लोस अल्काराझ याला चार सेटमध्ये 4-6, 6-4, 6-4, 6-4 इसे हरवले. तर स्विआटेकने एकही गेम न गमावता, अमांडा अनिसिमोवाला 6-0; 6-0 असे सपशेल पराभूत केले. ग्रँड स्लॅम मालिकेतील सिनरचे हे चौथे, तर स्विआटेकचे पाचवे विजेतेपद आहे. या मालिकेमध्ये अल्काराझने पाच विजेतीपदे संपादन केली आहेत.
उपान्त्य फेरीत महिलांमध्ये अनिसिमोवाने पहिल्या मानांकित अरीना सबलेंकाला 6-4; 4-6; 6-4 असे तर स्विाअटेकने बेन्सिकला 6-2; 6-0 असे हरवले होते, तर पुरुषांमध्ये अल्काराझने फ्रिट्झवर 6-7; 5-7; 6-3; 7-6 (8-6) असा तर सिनरने यांकोविचवर सरळ सेटमध्ये 6-3; 6-3, 6-4 असा विजय मिळवला होता. या पराभवाने योकोविचची ग्रँडस्लॅम मालिकेत 25 वे विजेतेपद मिळवण्याची, तसेच विम्बल्डनला आठवे विजेतेपद मिळवून फेडररशी बरोबरी करण्याची मनीषा पुरी झाली नाही, अल्काराझचीही लागोपाठ तिसरे विम्बल्डन जेतेपद मिळवण्याची इच्छाही पूर्ण झाली नाही. योकोविचची जिद्द कितीही असली, मनाची उमेद असली तरी आता वाढत्या वयामुळे त्याचे शरीर त्याला साथ देत नाही असे गेल्या दोन वर्षांत दिसले आहे. बऱ्यादचा तो थकल्यासारखा दिसतो. तरीही नाउमेद न होता दर स्पर्धेत नव्या उत्साहाने खेळत आहे. आपले प्रयत्न त्याने सोडलेले नाहीत आणि अल्काराझलादेखील आपल्या चुकांची दुरुस्ती करण्यात फारसे यश मिळालेले नाही, जसे सिनरने फ्रेंच स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर चुका दुरुस्त करण्यात बरेचसे मिळवले आहे.
महिलांच्या अंतिम फेरीपूर्वी अमांडा अनिसिमोवाने पहिल्या मानांकित सबलेंकाला उपान्त्य फेरीत हरवल्यामुळे तिच्याबाबतच्या अपेक्षा वाढल्या होत्या. तर स्विआटेकने बेन्सिकवर सहज मात केल्याने अंतिम सामना चुरशीचा होईल असे वाटत होते. पण प्रेक्षकांच्या पदरी निराशाच आली. संपूर्ण सामन्यात स्विआटेकने अनिसिमोवाला एकही गेम जिंकू दिला नाही, एवढे तिचे वर्चस्व होते. तसे पाहिले तर अमांडा चांगली खेळत होती. पण तिच्याकडून सर्व्हिसच्या दुहेरी चुका होत होत्या. तसे अनेक गेम तिने ड्यूस (म्हणजे चाळीस-चाळीस गुणांची बरोबरी) पर्यंत नेले होते. परंतु नंतर मात्र तिला गेम जिंकण्यात यश मिळाले नाही. अनेकदा त्या गेममध्ये तीन, चारदा ड्यूस झाले. तरी ऐन मोक्याच्या वेळी अमांडा फटके चुकत होती आणि गेम गमावत होती. उलट ईगा स्विआटेक मात्र प्रत्येक गुण अखेरचा असल्याप्रमाणे निकराने खेळत होती. तिच्याकडून सर्व्हिसच्या दुहेरी चुकादेखील अमांडाच्या मानाने कमी होत्या. तिने संपूर्ण सामन्यात एकही गेम गमावला नाही, आणि अमांडाला एकही गेम जिंकू दिला नाही. स्विआटेकने केलेला अंतिम फेरीत पोहोचल्यानंतरचा नामुष्की आणणारा पराभव अमांडाच्या जिव्हारी लागला, हे स्पष्ट दिसत होते.
क्रमवारीतील दुसरा असलेला बावीस वर्षाचा अल्काराझ आणि क्रमवारीत पहिला असलेला. तेवीस वर्षाचा सिनर या खेळाडूंची पुरुषांच्या एकेरीतील अंतिम लढत म्हणजे आता प्रेक्षकांना मेजवानीच असते. या दोन खेळाडूंचे ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धांत गेली दोन वर्षे चांगलेच वर्चस्व आहे आणि त्यांनी त्यांत प्रत्येकी चार विजेतीपदे मिळवली आहेत. इतर स्पर्धकांच्या ते खूपच पुढे गेले आहेत. यातही गंमत अशी की सिनरने खुली फ्रेंच स्पर्धा तर अल्काराझने खुली ऑस्ट्रेलियन स्पर्धा आजपर्यंत जिंकलेली नाही. यंदा रोलाँ गॅरो येथील खुल्या फ्रेंच स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील त्यांची झुंज अटीतटीची होती आणि ती पाच तास सदतीस मिनिटे चालली होती. तेथील विजेतेपद राखण्यात अल्काराझने निसटता विजय मिळवला. तेथे त्याचे परतीचे फटके वारंवार नेटमध्ये जात होते आणि सर्व्हिसच्या दुहेरी चुकाही त्याच्याकडून वारंवार होत होत्या. पण याबाबत त्याने दुरुस्ती करण्यावर फारशी मेहनत घेतल्यासारखे विम्बल्डन येथे दिसले नाही. त्याच चुका तो वारंवार करत होता आणि नंतर बऱ्याचदा त्यांची भरपाईही करत होता. परंतु चुकांचा फटका त्याला बसायचा तो बसलाच. अमेरिकन खुल्या स्पर्धेपर्यंत तो त्यात दुरुस्ती करून खेळ अधिक प्रभावी करणार का हे पाहायचे.
उलट सिनरने तीन आठवड्यांच्या कालावधीत आपल्या चुका सुधारण्यावर भर दिलेला दिसला. शिवाय येथील हिरवळीच्या कोर्टवर त्याच्या सर्व्हिसमध्ये अधिक वेग आणि भेदकला होती. बरोबरीने अल्काराझ सर्व्हिस कोठे करणार आणि परतीचा फटका कुठे मारणार याचा अंदाज घेत होता, आणि अल्काराझला फटक्यांचा अंदाजच येणार नाही, अशा जागी कधी वेगवान तर कधी अलगदपणे शिताफीने फटके पेरत होता. अल्काराझने उंची दिलेल्या लॉबचा अंदाज घेऊन जोरदार आणि प्रभावी फटक्यांनी त्यांना उत्तर देत होता. नेटजवळील ट्रॉप्सनाही अनेकदा त्याने त्याच प्रकारे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे अल्काराझ बऱ्याच वेळा जागीच खिळून राहात होता. त्याची सर्व्हिसही अधिक प्रभावी होत होती. तिच्यात वेगाबरोबर अचूकताही दिसली. त्याने सर्व्हिसची दुहेरी चूकही फारशी केली नाही त्यामुळेच त्याचा पहिल्या सेटमध्ये धक्का बसल्यानंतर मात्र सामन्यावर ताबा राहिला. पहिल्या सेटमध्ये तो पराभूत झाला, तरी त्याने आपले काय चुकले आणि अल्काराझची बलस्थाने कोणती हे हेरले आणि त्याला ती कशी वापरता येणार नाहीत, याकडे नंतरच्या सेटमध्ये लक्ष देऊन फटके मारले आणि अल्काराझला ते परतवणे अशक्य झाले. आणि अल्काराझला आपला हा फटका सिनरला परतवता येणार नाही असे वाटले तरी कित्येकदा त्याने ते परतवले. उलट अल्काराझने सिनरचे फटके परतवण्याचा प्रयत्न केले तरी बऱ्याचदा असे फटके ते नेटमध्येच जाऊन त्याच्या पदरी निराशाच येत होती. त्यामुळेच सिनरला यश मिळाले. आणि विम्बल्डनचा चषक मिळवण्याचे त्याचे स्वप्न साकार झाले.
या दोन खेळाडूंमधील स्पर्धा तीव्र होत चालली आहे. इतकी की, त्यामुळे फेडरर, नदाल आणि योकोविच या तिघांतील सामन्यांप्रमाणे या अल्काराझ आणि सिनर यांच्यातील सामन्यांची रसिक आता वाट बघत असतात. कारण तेथे या खेळाडूंच्या प्रत्येकाच्या गुणवत्तेचा कस लागतो. त्यामुळे 24 ऑगस्टला सुरू होणाऱ्या अमेरिकन खुल्या स्पर्धेतही हेच दोघे अंतिम फेरीत झुंजतील असे बोलले जात आहे. अल्काराझने क्ले, ग्रास आणि हार्ड या तीनही प्रकारच्या कोर्टस्वर आपली चमक दाखवून अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे. सिनरला मात्र अद्याप क्ले कोर्टचे कोडे सुटलेले दिसत नाही. यंदा तेथे तो यशाच्या जवळपास पोहोचला होता. पण त्याने तीनदा मॅच पॉइंट गमावले. अल्काराझने मात्र 3-5 असे मागे पडल्यानंतरही तिसरा सेट जिंकण्यात यश मिळवले होते पण ती चिकाटी त्याला विम्ब्लल्डनवर दाखवता आली नाही. कदाचित येथे विजेतेपदाची हॅट-ट्रिक करण्याचे आणि प्रेक्षकांच्याही त्याबाबतच्या अपेक्षांचे दडपण त्याच्यावर आले असेल. तसे सिनरवरही येथे हुलकावणी देणाऱ्या विजेतेपदाचे दडपण असणारच, पण त्याने दडपणावर मात केली.
यंदाच्या स्पर्धेत आणखी एक बाब जाणवली. ती म्हणजे बऱ्याच काळानंतर येथे अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपला प्रभाव पाडला. त्यामुळे त्यांच्याबाबत त्यांच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या असल्या नाहीत तरच नवल. अमेरिकेच्या फ्रिट्झने उपान्त्य फेरी गाठली, तर टिआफो आणि शेल्टननेही चांगली कामगिरी केली. तशी ऑस्ट्रेलियाच्या मिनॉरनेही. उपउपान्त्य फेरीत योकोविचला झुंजवले. इटलीच्या कोबोलीनेही उपान्त्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली पण तेथे त्याच्याच देशाच्या सिनरकडून त्याला पराभव पत्करावा लागला.
टेनिसच्या ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धात विम्बल्डन स्पर्धा सर्वात मानाची समजली जाते. इतर तीन स्पर्धांच्या आधी ती सुरू झाली, पण काळाबरोबर तिने आयोजन आणि नियमांत बदलही केले अहेत. त्यामुळेच यंदाच्या स्पर्धेत कोर्टवर लाइन्समन दिसले नाहीत, जे चेंडू सीमारेषेच्या आत पडला की बाहेर याचा निर्णय देत. आता ते काम तंत्रज्ञानावर सोपविले गेले आहे. रोलाँ गॅरो येथील स्पर्धेत म्हणजे खुल्या फ्रेंच स्पर्धेचे वेळी लाइन्समन कायम होते हे दूरचित्रवाणीवर सामना पाहणाऱ्यांनीही बघितले आहे. पण चेंडू सीमारेषेच्या आत पडला की बाहेर याबाबत अधिक अचूक आणि योग्य निर्णय देण्यात यावा यासाठी विम्बल्डनने हा बदल केला आहे. जेणेकरून खेळाडूंवर अन्याय होणार नाही. म्हणूनच ते काम तंत्रज्ञानाने करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे आयोजकांनी सांगितले. त्याबरोबरच लाइन्समनचे काम करणाऱ्यांना बऱ्याच जणांना इतरत्र कामांत सामावून घेण्यात आले होते, जेणेकरून त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. नव्या तंत्रज्ञानामुळे कोर्टवर यंदा वादावादीचे प्रसंग आल्याचे दिसले नाही, ही टेनिसच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे.
यंदाचे विंबल्डन सुरुवातीपासूनच चुरशीचे ठरले. कारण पहिल्या काही फेऱ्यांमध्येच बरेच मानांकित खेळाडू एकापाठोपाठ एक असे बाहेर पडले, त्यातही महिलांच्या विभागात एकेरीच्या उपान्त्य फेरीपर्यंत पहिल्या दहा मानांकित खेळाडूंपैकी सहा पराभूत झाल्या, केटी बोलस्टरने नवव्या मानांकित बडोसाला 6-2; 3-6; 6-4 असे, तर डायना यास्ट्रेमस्काने दुसऱ्या मानांकित कोको गॉफवर 7-6 (7-3); 6-1 असा विजय मिळवला. तिसऱ्या फेरीत स्लेगमंडने केजवर 6-3; 6-3 अशी मात केली. आणि पुरुष विभागात देखील पहिल्या फेरीत आठवा मानांकित रुन, नववा मानांकित मेदवेदेव तसेच सेरुंदोलो आणि त्सित्सिपास हे चांगले खेळाडूही स्पर्धेतून बाहेर पडले. निकोलस जॅरीने होल्गर रुनचा 4-6; 4-6; 7-5; 6-3; 6-4 असा परा भवभव केला, तर बेंझामिन बाँझीने डानिल मेदवेदेववर 7-6 (7-2); 3-6; 7-6 (8-6) 6-2 अशी मात केली त्सित्सिपासने रॉयरविरुद्धचा सामना रॉयर 6-3, 6-2 असा आघडीवर असताना सामना सोडला. दुसऱ्या फेरीमध्ये रिडरकर्फनेच याने तिसऱ्या मानांकित झ्वेरेवला पाच संटपर्यंत चालेल्या लढतीत 7-6 (7-3); 6-7 (8-10) 6-3; 6-7 (5-7); 6-4 असे हरवले होते.
अंतिम निकाल :
महिला एकेरी : ईगा स्विाआटेक विजयी विरुद्ध अमांडा अनिसिमोवा 6-0 ; 6-0.
महिला दुहेरी : व्ही. कुदरमेतो आणि ई मेर्टेन्स विजयी विरुद्ध एस. हसिए आणि ओस्टापेंको 3-6; 6-2; 6-4.
पुरुष एकेरी : यान्निक सिनर विजयी विरुद्ध कार्लोस अल्काराझ 4-6; 6-4, 6-4, 6-4.
पुरुष दुहेरी : पी. व्हिजिकाटा आणि डॅ. पेल विजयी विरुद्ध जे. कॅश आणि एल. ग्लासपूल 2-6; 6-7 (9-7).
मिश्र : एस. व्हर्बिक आणि कॅटरीना सिनिआकोव्हा विजयी विरुद्ध जो सॉल्सबरी आणि लुइझा रेफानी 7-6 (7-3); 7-6 (7-3).
मुली एकेरी : एम. पोखानोव्हा विजयी विरुद्ध टी. परेजा 6-3; 6-1.
मुली दुहेरी : के. पेनिकोव्हा आणि व्ही. वाल्डामानोवा विजयी विरुद्ध टी. प्रॉडिन आणि जे. परेजा.
मुले एकेरी : आय. इव्हानोव विजरी विरुद्ध आय. कार्की: 6-2; 6-3
मुले दुहेरी : पाल्डानिअस आणि ए. वाइनी विजयी विरुद्ध ओ. बाँडिंग आणि जे. लिच 7-5; 6-7 (10-5)
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार आहेत.)
Tags: wimbledon alcarz sinner sabalenka Iga Swiatek Amanda Anisimova centre court wimbledon final wimbledon winners wimbledon winners 2025 यानिक सिनर ईगा स्विआटेक कोर्लोस अल्काराझ अमांडा अनिसिमोवाला विम्बल्डन विम्बल्डन 2025 Load More Tags
Add Comment