एक शापित गंधर्व

हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार मदनमोहन यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त (15 जुलै)

स्वर्ग-नरक, गंधर्व-अप्सरा हा सर्व मानवी कल्पनांचा खेळ. पण कधीतरी वास्तविक जीवनात एखाद्या कल्पनेप्रमाणे वाटणारी माणसे निपजतात आणि इतिहासाच्या सुवर्ण पृष्ठावर आपले नाव उमटवून जातात. यांमधे असेही काहीजण असतात ज्यांची किर्ती सर्वदूर पसरून राहण्यासाठी थांबलेली असते अगदी त्या व्यक्तीच्या शेवटच्या श्वासापर्यंत. जीवनमृत्यूचा संग्राम भेदून मरणानंतर यशस्वी झालेला असाच एक शापित गंधर्व म्हणजे मदनमोहन.

मदनमोहन यांना जाऊन या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली. अवघ्या बावन्न वर्षांचे आयुष्य लाभलेला हा संगीतकार. जीवनाचे कितीतरी रंग पाहिलेला हा कर्तबगार. जन्म बगदादमधे, बालपण बगदाद, आताच्या पाकिस्तानमधील चकवाल, मुंबई अशा शहरांत. मग सैनिकी नोकरी आणि लखनौ, दिल्ली अशा ठिकाणी आॕल इंडिया रेडिओवरील नोकरी. त्यानंतर परत मुंबईतील धडपड, चित्रपटातील अभिनय, पार्श्वगायन आणि शेवटी सापडलेले स्वत्व - संगीतकार! 

मदन मोहनच्या लहानशा आयुष्याच्या या प्रवासातील अनेक स्थित्यंतरांवर अशी सहज नजर फिरवली तरीही थकायला होते. पण मदनमोहन साहेब नशीबाचे हे सर्व फेरे जगले होते. त्यामुळे मदनमोहनचे संगीत हे केवळ संगीत न राहता एक तत्त्वज्ञान बनून गेले. निघून गेलेल्या गतकालीन जीवनाची सुवर्णपाने अलगदपणे उलगडवून देणारे ते तत्त्वज्ञान! आणि त्यामुळेच त्यांची केवळ धून ऐकून जावेद अख्तर लिहून जातात
ज़िंदगी ले के आई है, बीते दिनों की किताब
घेर हैं अब हमें, यादें बे-हिसाब…..

स्वतः मदनजी जेव्हा संगीताबाबत आपले मत व्यक्त करतात तेव्हाच त्यांच्यातला हा तत्त्वचिंतक संगीतकार दिसू लागतो. ते म्हणतात की ‘मनाचे अथांग गूढ, स्वप्नांचे उमगलेले सार, माझ्या विचारांच्या काही अंशांवरील चिन्हे मला फिल्मी संगीतात खिळवून ठेवतात. या संगीताचा आविष्कार कोणीही थोपवू शकत नाही. दैवाने हे आधीच ठरवून टाकले आहे की मी संगीत रसिकांना सांगितीक उपहार द्यावा.’

मदनजींना कुठल्याही प्रकारचे औपचारिक संगीत शिक्षण मिळाले नाही. जे काही ते शिकले ते मनामधे असलेल्या प्रगाढ इच्छाशक्तीच्या जोरावर. बगदाद मधे असताना वडलांकडे बराच मोठा संगीत संग्रह होता. पाच वर्षाच्या मोहनला कुठलेही गाणे सांगितले की तो तत्काळ मोठ्या संग्रहातून त्या त्या गाण्याची रेकॉर्ड उचलून आणायचा. त्या अजाणत्या वयात किती वेळा त्याने त्या रेकॉर्ड्स ऐकल्या असतील याची कल्पना यावरून आपण करू शकतो! पुढे पंजाबला परत आल्यावर त्याला आजोबांचा सहवास मिळाला. आजोबा सतत गाणी ऐकायचे. त्यावर चर्चा करायचे. बाल मदनच्या संगीताचा पाया तिथेच रचला गेला असावा. 

ऐन उमेदीत ते सैनिक झाले. बंदुकी, तोफा लीलया हाताळल्या. पण त्यात मन रमले नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 मधे सैनिकी पेशाचा राजीनामा देऊन ते लखनऊला आॕल इंडिया रेडिओवर म्युझिक अॕरेंजर म्हणून रूजू झाले. तिथे विलायत खाँ, रोशनआरा बेगम, पंडित रामनारायण, अब्दुल वहीद खाँ, अली अकबर खाँ, फय्याज खाँ, तलत महमूद आणि बेगम अख्तर अशा संगीत क्षेत्रातील महान कलाकारांच्या गोतावळ्यात मदनच्या सांगीतिक जिज्ञासेला खतपाणी मिळालं. संगीताने मदनमोहनच्या जीवनाचा पुरा ताबा घेतला. ऐकलेले सगळे स्वर त्यांच्या मनात प्रतिध्वनी बनून गुंजू लागले. चांगलं गाणं ऐकायची कुठलीही संधी ते सोडत नसत.

पण पुढे दिल्लीला बदली झाली. तिथे कारकुनी काम जास्त होते. नोकरीचा राजीनामा देऊन मदनजी मुंबईला आले. मुंबईला त्यांच्या शेजारी राहायच्या जद्दन बाई. त्या अभिनेत्री नर्गिस यांच्या वालिदा. त्यांच्या घरी बऱ्याचदा मैफिल रंगे. मदनजी न चुकता तिथे उपस्थित राहत. संगीत हे काही औपचारिक शिकवले जाणारे शास्त्र नाही तर ती अंतर्मनातून प्रसवणारी कला आहे याबद्दल बोलताना ते असे म्हणतात, “संगीताचे मुलभूत नियम आणि तत्त्वे यांचे ज्ञान महत्त्वाचे असले तरीही पारंपारिक पद्धतीने संगीत शिकण्यासाठी ते गुरूच्या पायापाशी बसून शिकण्याची गरज नाही. मला वाटते जर संगीत शिकण्याची इच्छा असेल तर ते श्रवणाने शिकता येते.”

1948 चा ‘शहीद’ सिनेमा भारतरत्न लता मंगेशकरांच्या भविष्याची पायाभरणी करणारा होता. याच सिनेमात मदन मोहनने एक छोटीशी भूमिका देखील केलेली होती. यात दीदीसोबत ते मास्टर गुलाम हैदरच्या संगीत दिग्दर्शनात एक द्वंद्वगीत गायले होते- ‘पिंजरे मे बुलबुल बंद है माली छोड दे रे.’ ते गीत काही प्रदर्शित झाले नाही. मात्र त्यावेळीच त्यांनी ठरवले की मी जेव्हा संगीतकार होईन तेव्हा लताचा आवाज जास्तीत जास्त वापरेन. 

खरे तर मदन मोहनचा आवाज रियाजातून संस्कारी बनलेला असा नसला तरीही त्यात एक मार्दव होते. एक ठेहराव आणि किंचितशा कंपनांमुळे भावनाप्रवणता होती. त्यांचे ‘नैना बरसे’ हे गीत लता दीदी आजारी असल्यामुळे त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करून चित्रिकरणासाठी वापरले गेले. मागाहून दीदींनी ते गाणे गायले आणि ते चित्रपटात घेतले गेले. यूट्यूबमुळे हे गाणे आज सहज ऐकता येते.

सुरुवातीला एस. डी. बर्मन, श्याम सुंदर अशा संगीतकारांकडे सहाय्यक म्हणून काम करता करता मदनमोहनला 1950 मधे संगीत दिग्दर्शक म्हणून ‘आँखे’ चित्रपट मिळाला. त्यांत त्यांच्याकडे सर्वप्रथम गायले होते मुकेश. गाणे होते ‘प्रीत लगा के मैने ये फल पाया’. याशिवाय मीना कपूर, शमशाद बेगम, मो. रफी, राज खोसला यांचीही गाणी त्या सिनेमात होती. 1951 च्या ‘मदहोश’ मधे दीदी सर्वप्रथम त्यांच्याकडे गायल्या. असे म्हणतात की दीदीला इंडस्ट्रीतील काही लोकं ‘मदनमोहचे संगीत जास्त चांगले नाही’ असे सांगत होते. दीदीने त्यांची गाणी ऐकली आणि दीदी त्यावर इतक्या खूष झाल्या की त्यानंतर दीदींचा त्यांच्याकडे गाण्याचा सिलसिला सुरू झाला. 

 

अभ्यासकांच्या मते मदनमोहनची खरी शैली प्रकटली ती 1958 च्या ‘अदालत’ या सिनेमातून. गाणी अर्थात लतादीदी गायल्या होत्या. जाना था हमसे दूर, यू हसरतो के दाग, उनको यह शिकायत है… लतादीदी आणि त्यांचे मदनभय्या ही जोडी आता गज़ल या संगीत प्रकारात मुशाफिरी करू लागली होती. 

लता मंगेशकर हे मदनमोहनच्या संगीत किरकिर्दीतले असे एक पर्व होते ज्याला कधीच अस्त नव्हता. तशीच अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या संगीतात होती - रईस खाँ यांची सतार. काही गोष्टींमुळे दोन्ही कलाकारांत वितुष्ट निर्माण झाले. झाले असे की रहीस खाँ साहेबांना त्यांचा मेहनताना विचारण्याचा मदनसाहेबांना संकोच वाटला. त्यांनी दुसऱ्या व्यक्तीमार्फत ते विचारले. ही गोष्ट खाँ साहेबांच्या जिव्हारी लागली. त्यांनी मदनसाहेबांना विचारणे पाठवले की ‘अमुक अमुक ठिकाणी लग्नसमारंभात तुम्ही गायला याल का? आणि त्याचा मेहनताना किती घ्याल?’ दोघांचाही स्वाभिमान दुखावला गेला. नव्हे स्वाभिमानाचा बुरखा ओढून अभिमान आपली वाट मोकळी करत होता. परिणाम असा झाला की मदन मोहनच्या संगीतातून सतार हरवून गेली. त्यांची ‘मौसम’ चित्रपटातली गाणी आठवावीत. त्यात सतार आढळणार नाही. त्यांनी मग दिलरूबा, मेंडोलिन अशी वाद्ये प्राधान्याने वाजवली.

एकीकडे मदन मोहन आणि लता दीदींची गाणी खूप लोकप्रिय ठरत होती. नौशादसारखे संगीतकार ‘है इसी मे प्यार की आबरू’ हे मदनजींचे गाणे एका बाजूला आणि माझी कारकिर्द एका बाजूला असे म्हणत होते. पण दुसरीकडे त्यांना मिळालेले चित्रपट काही चालत नव्हते. अ श्रेणीतला कुठलाही चित्रपट नाही अथवा कुठलाही पुरस्कार नाही. 1970 च्या ‘बय्या ना धरो’ या ‘दस्तक’ मधील गाण्याला तितका राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.

 
1964 च्या ‘वह कौन थी’ चित्रपटाने सिल्वर ज्युबिली साजरी केली. पण हे सगळे यश अगदी अपवादात्मक! मौसम आणि लैला मजनू हे देखील त्यांच्या कारकिर्दीतले दोन गाजलेले सिनेमे. पण ते मुळात प्रदर्शितच झाले मदन मोहनच्या मृत्यूनंतर!

 

आरंभीच्या काळात वडिलांची साथ नव्हती. वडील राय बहादुर बॉम्बे टॉकीजचे भागीदार. पण मुलाने नोकरी करावी असा बाणा असलेल्या वडिलांच्या नावाचा फायदा तर सोडाच नुकसानच मदनच्या वाट्याला आलं. शेवटी शेवटी मुलाचं संगीत ऐकून वडिलांना त्याचं महत्त्व कळलं तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यानंतर काही महिन्यांत वडील गेले.

राजकपूर, सुरैया हे मदनमोहनचे जवळचे स्नेही. पण ओळखीचा फायदा घेऊ नये असा स्वाभिमानी स्वभाव. मदनजींनी जे कमावलं ते स्वकर्तृत्वावर. पण हळूहळू तो गंधर्व थकू लागला. जगाचे रंग त्याला नकोसे वाटू लागले. निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी त्याने हातात बाटली उचलली. त्या निराशेने जसा त्यांना विळखा घातला तसा त्यांच्या संगीतालाही. 

त्यांच्या शेवटच्या टप्प्यातील गाणी जणू या निराशेच्या संधिप्रकाशात लोळण घेत आहेत….
आयुष्याच्या अंतिम पडावावर जीवनाचे गोळाबेरीज करणारे ते गीत….
आज सोचा तो आसूं भर आए….
‘आज सोचा’ मधे लता दीदींचा आवाज, रईस खानची सतार आणि व्हायोलिनचा स्वर या तीन काळीज पिळवटून टाकणाऱ्या गोष्टी आहेत. सतारचा प्रत्येक स्वर इतका जिवंतपणे वाजवला गेलेला आहे की असे वाटते फनकाराने हृदयात उचंबळून आलेल्या भावनांचे निर्झर त्या निर्जीव सतारीला पाजले असावे. आणि मग पुढे दीदी गातात ‘दिल की नाजूक रगे टूटती है’ त्यावेळी दीदीच्या स्वरांसोबत व्हायोलिनची एक दारूण लकेर स्पष्ट ऐकू येते आणि खरोखर हृदयाचे तुटणे म्हणजे केवळ एक भाषासौंदर्यासाठी वापरलेली उक्ती नसून एक साहिलेली वेदना आहे याचा प्रत्यय रसिकांना येतो….
दिल की नाज़ुक रगें टूटती हैं 
याद इतना भी कोई न आए
आज सोचा तो आसूं भर आए
मुद्दतें हो गईं मुस्कुराए

 

आणि अजूनही असेच एक गीत. एकाकीपणाच्या संध्याछायेत जगण्याची असारता दर्शवणारे हे गीत, रुके रुके से कदम रुक के बारबार चले… ‘मौसम’ मधील हे गीत म्हणजे जीनवानील एकाकीपणा, तुटलेले सगळे बंध यांचा सांगितीक आविष्कार. राग ‘आहिरी तोडी’ या अत्यंत दुर्मिळ अशा रागात हे गाणे बसवलेले आहे. यात ‘रुक के बार बार चले’ या ओळीचा शेवट षड्ज म्हणजे ‘सा’ ऐवजी कोमल रिषभापर्यंत ‘रे’ आणून सोडलेला असल्याने तो जीवनाची अपूर्णताही यथायोग्यपणे उभी करतो. तत्त्वज्ञान, रागसंगीत यांचा उचित मिलाफ मदन मोहनच्या संगीतात दिसून येतो.

लतादीदीनंतर मदनमोहनच्या संगीताला जर कोणी योग्य न्याय दिला असेल तर ते म्हणजे रफी साहेब. आप्तांच्या विरहातली भळभळ त्यांनी ‘मेरा साया’ मधील ‘आपके पहलू में आकर रो दिए’ गात यथार्थ मांडली. ‘गज़ल’ मधील ‘रंग और नूर की बारात किसे पेश करू’ आजही प्रेम भंगाचा घाव दाखवत राहते. या गाण्यात रफी साहेबांनी आवाजावर दिलेले नियंत्रण आणि त्यातून उमटविलेले भाव निव्वळ अप्रतिम आहेत. ‘कर चले हम फिदा’ हे सैनिकांच्या जीवनावर आधारित गीत तर मदन मोहनसारखा पूर्वायुष्यात ते आयुष्य प्रत्यक्ष जगलेला संगीतकारच बनवू शकतो.

मदनमोहन खूप लवकर निघून गेले. पण त्यांची दूरदृष्टी इतकी लांब पोहोचलेली होती की एकविसाव्या शतकात कुठले संगीत चालू शकेल याची जाण या संगीत द्रष्ट्याला खूप आधीच होती. 2003 चे ते वर्ष. मदनजी गेल्याला अठ्ठावीस वर्षे झालेली आहेत. यश चोप्रा ‘वीरझारा’ चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. मदनजींचे चिरंजीव संजीव कोहली यशराज कंपनीत मॕनेजर. ते यशराजजींना मदनजींच्या काही न वापरलेल्या चाली ऐकवतात. ‘वीरझारा’साठी सगळ्या संगीतकारांबरोबरच्या चर्चा फोल ठरलेल्या असताना या चाली मात्र यशजींना योग्य वाटतात. आयुष्यभर मोठ्या बॕनरसाठी मदनजी वाट पाहत राहिले. मरणानंतर अठ्ठावीस वर्षांनी असा एक मोठा बॕनर मिळतो. त्यात तब्बल अकरा गाणी साकारतात. ती अकरा गाणी लोकप्रिय होतात. त्यांना आयफा पुरस्कार मिळतो. त्या वर्षाचा सगळ्यात जास्त खप ती गाणी करतात. सगळेच कसे चमत्कारिक घडले होते. पण सगळ्यात मोठा चमत्कार हा होता की अठ्ठावीस वर्षांपूर्वी या चाली बनल्या होत्या लतादीदींसाठी आणि अठ्ठावीस वर्षांनंतरदेखील गाण्याचे भाग्य लाभले होते दीदींनाच!

दीदी आणि मदनभय्यांचे नातेच तसे होते. संजीव कोहलींच्या लग्नावेळी दीदी आत्या म्हणून त्या समारंभात उपस्थित राहिल्या. त्यांच्या आमंत्रण पत्रिकेवर देखील आत्या म्हणून दीदीचे नाव होते. संजीवजींनी म्हटले आहे की ‘वडील गेल्यानंतर त्यांच्याकडचे काम संपले होते. पण दीदींनी आमच्या परिवाराला पूर्वीपेक्षाही अधिक जवळचे गेले.’

मदनमोहनने ‘वीरझारा’ धरून एकूण 93 सिनेमांसाठी संगीत दिले. काही नॉनफिल्मी गाणी वगळता 620 गाणी त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यामधील 213 गाणी लता दींच्या नावावर आहेत. थोडक्यात मदनजींची निम्मी गाणीदेखील न गाता दीदी त्यांच्या संगीताची ओळख बनतात हे दीदींचे स्वरसामर्थ्य म्हणावे का मदन मोहनच्या संगीताला मिळालेली उचित दिशा समजावी हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. असो.

आपण ‘वीरझारा’ बद्दल बोलत होतो. तर दीदी आणि मदनभय्यांचे हे घट्ट नाते ज्यामुळे पंचाहत्तर वर्षाच्या दीदी तेव्हाही त्यांची गाणी पूर्वीच्याच जोमाने गाऊ शकल्या. गाणी रेकॉर्ड झाली. संजीव कोहलींनी लंडनला त्यावर काम करणाऱ्या एडिटरला सहज विचारले, “या गायिकेचे वय काय वाटते?” तो एडिटर म्हणाला, “बावीस-तेवीस वर्षे!” 

मदनजींकडे काळाची छाया भेदणारी नजर होती, संगीताची प्रखर जाण होती, स्वरांची विलक्षण तळमळ होती. कलाकाराला आवश्यक असलेला प्रचंड संयत देखील त्यांच्याकडे होता. ‘वह कौन थी’ चित्रपटातील गीत ‘नैना बरसे’ ची धून त्यांनी अकरा वर्षे आधी बनवलेली होती. अकरा वर्षेपर्यंत योग्य शब्द, योग्य आवाज यांची प्रतिक्षा करू शकेल इतका मदनमोहनचा स्वभाव संयमी होता. इतके सर्व असूनही या संगीतकाराला जीवंतपणी ते यश मिळाले नाही जे मृत्यूनंतर मिळाले. जिवंतपणी ते नैराश्यात गेले. परंतु मरणानंतर ते यशस्वी झाले. कुठल्याही आधाराशिवाय जे संगीतकार होण्याचे ते स्वप्न पाहत होते तसे स्वप्न पाहणाऱ्या अनेक उदयोन्मुख संगीतकारांचे ते एक आदर्श बनले होते. आर. डी. बर्मन तर त्यांच्याविषयी बोलून गेलेले आहेत, “हिंदी फिल्मी संगीतातील मदनमोहन हे एक स्वतंत्र घराणे आहे. माझ्यासकट नवीन पिढीसाठी त्यांनी एक पाठ दिलेला आहे की त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित आपली सर्व गाणी लोकप्रिय करून दाखवली.” बर्मनच्या दुसऱ्या पिढीतील या महान संगीतकाराने मदनमोहन बाबत हे उद्गार काढावेत यात मदनमोहनच्या संगीताचा विजय आहेच. पण हे सगळे घडले खूप खूप नंतर. म्हणून मदन मोहन म्हणजे पृथ्वीवर वावरलेले एक खरेखुरे शापित गंधर्व! राजेंद्र कृष्ण या गंधर्वाची व्यथा यथार्थपणे मांडून गेलेले आहेत…..
किसी ने मेरा दिल ना देखा, ना दिल का पैग़ाम सुना
मुझको बस आवारा समझा जिसने मेरा नाम सुना
अब तक तो सब ने ठुकराया, कोई तो पास बिठाएगा
कभी ना कभी, कहीं ना कहीं कोई ना कोई तो आएगा
कोई ना कोई तो आएगा…..

- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com 
(लेखक भारतीय संगीताचे अभ्यासक आहेत.)


संदर्भ-
1- A tribute to Madan Mohan- V. M. Joshi
2- Madan Mohan - Ultimate Melodies- Vishwas Nerurkar

 

Tags: madanmohan lata mangeshkar sanjiv kohli adalat mausam veer zara मदन मोहन मदनमोहन लाटा मंगेशकर Maxwel Lopes मॅक्सवेल लोपीस लता मंगेशकर चित्रपट संगीत Load More Tags

Comments:

Anil Khandekar

संगीतकार मदन मोहन यांच्या वरील एक अप्रतिम लेख . गाण्यांची यादी न देता संगितकार म्हणून मदनमोहन यांचे वैशिष्ट्य, त्यांच्या संगिता तील अंत‌:प्रवाह, त्यातील भाव सौंदर्य ...यांचा समर्पक शब्दांत वेध घेतला आहे. लेख शब्द बंबाळ नाही.. तरीही गुंगवून टाकणारा आहे. धन्यवाद.

John Colaco

लेख फारच सुंदर झाला आहे... आवडला.

Add Comment

संबंधित लेख