मराठी शाळा ही आपली दुसरी आई. तिला वाचवण्याची शेवटची संधी आपल्या हातात आहे. मागच्या चुका विसरून पुढे जाण्याची गरज आहे. मग तुमची मुलं कुठे शिकली, त्यांना इंग्रजी शाळेत का शिकवलं हे प्रश्न ही आता मागे ठेवायला हवेत. अगदी आज इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनाही त्यांच्या पालकांनाही सोबत घ्यायला हवे. दोषी कोण हे न शोधत बसता आता उपाय शोधण्याची अंतिम संधी आपल्या हातात आहे.
एक चांगला माणूस घडायला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. पण सर्वात महत्वाची असते ती म्हणजे शाळा. बालवयात आपल्यावर उत्तम संस्कार झाले की आयुष्यभर टिकतात यावर कोणाचेही दूमत नसेल. आजकाल शाळा म्हणजे पैसे कमवण्याचा धंदा झालेला आहे. आणि त्या पैशांच्या बाजारू राजकारणात उत्तम माणसं घडवणार्या आपल्या मराठी शाळा बंद होत आहेत. या गोष्टींवर भाष्य करणारा आणि प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यांत अंजन घालणारा असा हा "क्रांतिज्योती विद्यालय,मराठी माध्यम" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून सिनेमागृहात उत्तम गर्दी खेचत आहे. सिनेमाला येणारी ही गर्दी मराठी शाळेचा विचार मनामनांत रुजवू शकेल का? हे तर येणारा काळच ठरवेल. पण या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या विषयावर परखडपणे भाष्य केले आहे याचा आनंद वाटतो. दिग्दर्शक हेमंत ढोमे त्यांच्या सिनेमातल्या वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ओळखले जातात, प्रत्येक वेळी अपेक्षा वाढवत जातात! यावेळीही त्यांनी आणि त्यांच्या टीमने कमाल काम केलं आहे.
चित्रपटात एक संवाद आहे. "आजकाल शाळा म्हणजे छापखाना झाला आहे, जिथे पैसे छापले जातात. कारखाना आणि छापखाना यातला फरक म्हणजे कारखान्यात गोष्टी घडवल्या जातात..!"
चित्रपट कसा आहे किंवा काय गोष्ट आहे हे बाजूला राहून हा चित्रपट त्या प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाला भिडतो ज्याचं आपल्या माय मराठीवर प्रेम आहे. आपल्यातलेच काही लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालतात आणि आपल्या माय मराठी जगवणार्या, मनात रूजवणार्या शाळा बंद होत चालल्या आहेत ही खंत हा चित्रपट मांडतो आणि त्यावर उत्तम तोडगादेखील देतो. 'क्रांतिज्योती विद्यालय, मराठी माध्यम' हा प्रचारकी सिनेमा अजिबात नाही. मराठी शाळा वाचवायला हव्यात हा मुद्दा तो फार कळकळीने मांडतो पण कंटाळवाण्या पद्धतीने नाही तर धमाल मनोरंजक पद्धतीने. म्हणून हा सिनेमा अधिक भावतो.
संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांचं साहित्य बहिणाबाई, शांताबाई शेळके, बालकवी, ग्रेस, कुसुमाग्रज, आण्णाभाऊ साठे यांच्या ओळींची गोडी इंग्रजी माध्यमांतून मुलांना कळणार कशी?ज्यांना आपली मातृभाषाच धड येत नाही ते दुसरी भाषा कशी बोलणार? समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून शाळा सुरू केल्या त्या महात्मा फुलेंनी, स्त्री शिक्षणाचा पाया रोवला त्या सावित्रीबाई फुले, मुलांना घराघरांतून शाळेत आणून बसवलं ते टिळक, आगरकर, यांनी. ते यासाठी की आपला समाज हा उत्तम घडला जावा...पैसे कमावणे हा उद्देश न ठेवता मुलं ही देशाचं भविष्य आहेत आणि ते उत्तमच असलं पाहिजे यासाठी.
कोकणातील रायगड जिल्ह्यातील एक मराठी शाळा बंद होण्यापासून याच शाळेतील माजी विद्यार्थी कसे रोखतात ही गोष्ट हा चित्रपट मांडतो..! चित्रपट पाहताना अनेकदा नकळत आपले डोळे पाणावतात, आपणही आपल्या शाळेत, बालपणात हरवून जातो. आणि हा चित्रपट कधी आपल्याला आपलेसे करून घेतो कळतच नाही. सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला असून, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत या सर्वच बाबतीत चित्रपट बाजी मारतो. हेमंत ढोमे यांचं लेखन आणि दिग्दर्शन कमालीचं छान जमून आलं आहे आणि इतका अवघड विषय त्यांनी छान हाताळला आहे.
शाळेच्या आठवणी, केलेल्या गमतीजमती, शाळेबाहेरची बोरंवाली आजी, पॅटिसवाला, जोड्या जमवण्याचा बालिशपणा, अनेक आठवणी धमाल आणतात तर काही वेळा हळवं करत पापण्यांच्या कडा ओल्या करतात. यात विलन आहे विलनगिरी आहे ती ही फक्त तोंडी लावण्यापूरती. त्याचा कुठेही ओव्हरलोड होत नाही. अगदी शिक्षणमंत्री मग तो राजकारणी म्हणून निगेटिव्ह दाखवणं हा पण कॉमन फंडा इथे टाळलाय.
मोठ्या प्रमाणात मराठी शाळेत शिकलेली मागची पिढी ही शेवटची पिढी. शिक्षणात बाजारूपणा आला आणी पॉश इंग्रजी शाळांचं पेव फुटलं. आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत घालणं हा स्टेट्स सिम्बॉल झाला. आंतरराष्ट्रीय आणी राष्ट्रीय शिक्षण संस्थानी आपलं जाळ पसरवलं. यात राज्य शिक्षण संस्था मागे राहिल्या. शिक्षण मंडळे आणि राज्य सरकारेही या बाबतीत उदासीन राहिली. मराठी माणूसही आपल्या भाषेशी प्रामाणिक राहिला नाही. चित्रपटातील एक संवाद .."पृथ्वीवर आपली ही एकच जमात असेल ज्यांना आपल्या आईची लाज वाटते! म्हणून आपलीच लोकं मराठी शाळांमध्ये आपल्या मूलांना न पाठवता इंग्रजी माध्यम निवडतात..!" खूप काही सांगण जातो. हे लोण आता गावातही पसरलं आहे. अगदी जिल्हा परिषद शाळा पण अपुऱ्या पट संख्ये अभावी बंद कराव्या लागतं आहेत. हे असंच चालू राहिलं तर काही दिवसात मराठी माध्यमाची शाळा नावालाही शिल्लक राहणार नाही. याचा परिणाम मराठी भाषाच लुप्त होईपर्यंत दिसेल. हाच धोका हा सिनेमा मांडतो, पण कोणालाही थेट दोष देत बसत नाही. सिनेमा वास्तव मांडतो पण कारण न शोधत बसता यावरचा उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. अधून मधून हास्यविनोद करत, शाळेच्या आठवणी जागवत, साध्या सीन्समधून महत्वाचा संदेश देत देत सिनेमा पुढे सरकतो. कथा शेवटपर्यंत पकडून ठेवते, अनेकदा भावनिक करते. काही प्रसंग रिलेट होऊन डोळ्यांत पाणी येतं!
मराठी शाळा ही आपली दुसरी आई. तिला वाचवण्याची शेवटची संधी आपल्या हातात आहे. मागच्या चुका विसरून पुढे जाण्याची गरज आहे. मग तुमची मुलं कुठे शिकली, त्यांना इंग्रजी शाळेत का शिकवलं हे प्रश्न ही आता मागे ठेवायला हवेत. अगदी आज इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनाही त्यांच्या पालकांनाही सोबत घ्यायला हवे. दोषी कोण हे न शोधत बसता आता उपाय शोधण्याची अंतिम संधी आपल्या हातात आहे. मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांना राज्य सरकारच्या नोकरीत प्रथम संधी, मराठी शाळेत शिकण्यासाठी पालकांच्या खात्यात थेट अनुदान असे प्रयोग नक्कीच राबवता येतील. यासाठी सरकारने पावलं उचलायला हवीत.
सिनेमाच्या स्टारकास्टसाठी वेगळे गुण द्यायला हवेत! सर्व पात्रांच्या भूमिका अतिशय गोड आहेत. सचिन खेडेकर यांनी आदर्श शिक्षक कसा असावा हे उत्तम रीत्या उभं केलं आहे. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवलेले सचिन खेडेकर हे अभिनयातले 'सर' का आहेत हे त्यांनी पुन्हा सिध्द केलं! कादंबरी कदमला बऱ्याच वर्षांनी बघून छान वाटलं! तिची आणि पुष्कराजची जोडी स्क्रीनवर छान जमली आहे. 'मोस्टली सेन' युट्यूब चॅनेल फेम प्राजक्ता कोळीला आपण सोशल मीडिया, हिंदी वेब सिरीज, सिनेमामध्ये पाहिलं आहे. इथे तिला एक चांगली संधी मिळाली आणि तिने ती फुकट घालवली नाही. तिला इथून पुढे आणखी चांगली कामं मिळू शकतात. अमेय वाघने त्याच्या आगरी भाषेतल्या कॉमेडीने आणि बॉडी लँग्वेजने बहार आणली आहे. अनेक चुरचुरीत संवाद त्याच्या तोंडी आहेत. पूर्ण सिनेमाभर अमेय त्याच्या सीन्समध्ये आता काय डायलॉग मारणार याची उत्सुकता लागून राहते! सिद्धार्थ चांदेकर एका अभिनेत्याच्या भूमिकेत सूट होतो. हरीश दुधाडे आजवर वेगवेगळ्या भूमिका करत आला आहे. इथेही तो फिट होतो. क्षिती जोगच्या व्यक्तिरेखेला वेगळी किनार आहे. खऱ्या आयुष्यातही मराठी शाळांसाठी चळवळ उभी करणाऱ्या चिन्मयी सुमीत यांचा हा जिव्हाळ्याचा विषय. सिनेमातलं त्यांचं कामही उत्तम झालं आहे. अनंत जोग व्हिलन म्हणून नेहमीच सूट होतात. अनेकदा विनोदी भूमिकेत असणाऱ्या निर्मिती सावंत ताई छोट्या पण काहीशा गंभीर भूमिकेत आहेत. सायली संजीव गोड दिसतात पण थोडाच वेळ स्क्रीनवर येतात त्याबद्दल त्यांचा गोड निषेध! सिनेमा संपायच्या आधी सर्वांच्या लाडक्या असणाऱ्या एका अभिनेत्याचा छोटा पण महत्वाचा कॅमिओ!
हेही वाचा - अंगणवाडीऐवजी पालकांची पसंती प्ले-ग्रुपलाच (अलका गाडगीळ)
सिनेमाचं संवाद लेखन, सर्व पात्रांचं लेखन यावर चांगलं काम केलं गेलंय, प्रत्येकाची बॅक स्टोरी छान कव्हर केलीय. संगीत आणि गाणी छान आहेत. रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं "स्वर्गात आकाश गंगा" अगदी भूतकाळात घेऊन गेलं. सिनेमॅटोग्राफी आजकाल अनेक सिनेमांची चांगली असतेच. यातही अलिबाग, नागाव, चौल या भागामधलं शूटिंग असल्याने सर्व स्क्रीन्स सुंदर दिसतात. समुद्रकिनारे, किल्ला, धबधबा, मंदिर, पावसाळी कुंद वातावरण हे सगळं छान टिपलं आहे.
उपदेशाचा जास्त डोस न पाजता एखाद्या शहाण्या मुलाला समजावून सांगावं तशी ही कथा मुद्दा समजावून सांगते. काही मुद्दे कदाचित काहींना पटणार नाहीत तरी एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून नक्की बघावा असा सिनेमा..! एखाद्या नेहमीच्या विषयाला वेगळी 'ट्रीटमेंट' दिल्याबद्दल आपण नेहमी मल्याळम सिनेमांचं कौतुक करतो. तसं आता आपल्या मातीतल्या मराठी सिनेमाचंही करूया!
एकूणच, आपली माती आपली भाषा आपली मराठी शाळा वाचवायची असेल तर हा चित्रपट एकदा पहायलाच हवा!
- आशिष निनगुरकर
ashishningurkar@gmail.com
(लेखक चित्रपट अभ्यासक व समीक्षक आहेत.)
Tags: मराठी शाळा वाचवा मातृभाषा मातृभाषेतून शिक्षण शिक्षणव्यवस्था माजी विद्यार्थी आदर्श शिक्षक क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम मराठी माध्यम इंग्रजी माध्यम शाळा शिक्षण साधना डिजिटल Load More Tags
Add Comment