राजमोहन गांधी यांच्या सन्मानार्थ

गांधींचे अभ्यासक आणि वारसदार, पत्रकार, संपादक, 'हिंमत' कार

उंच, ताठ देहयष्टी असणारे राजमोहन गांधी केस पूर्ण मागे फिरवत असत. त्यांचा चश्मा जाड काचेचा होता. ते काळजीपूर्वक आणि संथपणे बोलत. रामू गांधी यांच्यासारखं उत्स्फूर्त सफाईदार वक्तृत्व आणि खोडकर विनोदबुद्धी राजमोहन यांच्याकडे नव्हती. परंतु, राजमोहन गांधींचं व्यक्तिमत्व प्रचंड क्षमता राखून असल्याचं त्यांना पहिल्यांदा भेटल्यावरच लक्षात येत असे.

महात्मा गांधींना चार मुलगे होते. त्यातील सर्वांत थोरल्या दोघांना, हरिलाल व मणिलाल यांना त्यांनी दमदाटी करून वागवलं, रामदास या तिसऱ्या मुलाला तुच्छतेने वागवलं. पण त्यांचा सर्वांत धाकटा मुलगा देवदास जन्माला येईपर्यंत गांधी अधिक लाड करणारे आणि काळजी घेणारे पालक झाले होते. लहानगा ‘देवो’ त्याची आई कस्तुरबा यांचाही विशेष लाडका होता. सौम्य स्वभावाचा, मदतीला तत्पर असणारा देवदास आश्रमातील जीवनात सहजपणे मिसळून गेला. मोठं झाल्यावर तो त्याच्या वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी मनोभावे करू लागला- मग ते सूत कातण्याचं काम असो वा दक्षिण भारतीय लोकांना हिंदी शिकवण्याचं काम असो.

एका बाबतीत मात्र देवदासने आपल्या वडिलांच्या विरोधात भूमिका घेतली. गांधींचे जवळचे सहकारी सी. राजागोपालचारी (‘राजाजी’ म्हणून परिचित) यांची मुलगी लक्ष्मी आणि देवदास यांचं परस्परांवर प्रेम होतं. परंतु, देवदास व लक्ष्मी यांच्या लग्नाला गांधी व राजाजी या दोघांनीही विरोध केला. देवदास व लक्ष्मी यांनी एकमेकांशी पाच वर्षं न बोलता किंवा एकमेकांना पत्रही न लिहिता राहून दाखवावं, हीच त्यांच्या प्रेमाची कसोटी असेल, अशी भूमिका त्यांच्या पालकांनी घेतली. देवदास व लक्ष्मी तितका कालावधी धैर्याने थांबले आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं. देवदासला ‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये नोकरी मिळाली तेव्हा लक्ष्मीसोबत तो दिल्लीला आला. याच शहरात त्यांनी चार मुलांना जन्म दिला : 1934 साली तारा, 1935 साली राजमोहन, 1937 साली रामचंद्र आणि 1945 साली गोपाळकृष्ण अशा क्रमाने त्यांची मुलं जन्माला आली.

गांधींच्या मुलाचं राजाजींच्या मुलीशी कसं लग्न झालं, याची कहाणी खूप लहानपणीच माझ्या मनात कोरली गेली होती. देवदास-लक्ष्मी यांच्या प्रेमसंबंधांविषयी भारतातील मध्यववर्गीय वर्तुळांमध्ये बरंच बोललं जात असेल. माझ्या आईवडिलांनाही याच कहाणीतून प्रेरणा घेतली. तेही प्रेमात पडले, तेव्हा दोन्ही कुटुंबांच्या संमतीसाठी त्यांना पाच वर्षं वाट पाहावी लागली आणि मग त्यांनी लग्न केलं.

देवदास व लक्ष्मी गांधी यांच्या चारही मुलांशी परिचय व मैत्री होणं आणि त्यांचा प्रभाव पडणं, ही माझ्यासाठी बहुमानाची गोष्ट राहिली आहे. माझ्या दोन मामांसह दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेजात शिकलेले तत्त्वज्ञ रामचंद्र (रामू) गांधी यांना मी पहिल्यांदा ऐकलं आणि भेटलो. तर, सनदी अधिकारी व लेखक गोपाळकृष्ण गांधी यांच्याशी माझा सर्वांत चांगला परिचय राहिला आहे. आमची मैत्री 1980 च्या दशकाअखेरीला झाली. त्या वेळी आम्ही दोघेही दिल्लीत काम करत होतो. गोपाळ गांधींच्याच घरी मी त्यांची बहीण तारा यांना पहिल्यांदा भेटलो. तारा गांधी या खादीच्या विषयातील तज्ज्ञ होत्या, आणि हिंदी, बंगाली, इटालियन, इंग्रजी यांसह इतरही भाषा त्या अत्यंत ओघवत्या रीतीने बोलू शकत. गोपाळ यांनीच त्यांचा दुसरा भाऊ राजमोहन यांच्याशी माझी ओळख करून दिली. याच राजमोहन गांधी यांचा नव्वदावा वाढदिवस 7 ऑगस्ट 2025 रोजी झाला. त्या निमित्ताने मी त्यांच्या सन्मानार्थ हा लेख लिहितो आहे.

मी राजमोहन गांधी यांना 1990 साली पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांचा नुकताच संसदीय निवडणुकीत पराभव झाला होता. आदल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अमेठी या मतदारसंघातून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधातील विरोधकांचे संयुक्त उमेदवार म्हणून राजमोहन यांची निवड झाली. ‘असली’ गांधी विरुद्ध ‘नकली’ गांधी अशी ही लढाई असल्याचं चित्र उभं करण्यात आलं. एकीकडे महात्मा गांधींचे अस्सल वंशज होते, तर दुसरीकडे अपघाताने ‘गांधी’ या आडनावासह जन्मलेले उमेदवार होते (राजीव यांचे पारशी वडील मुळात त्यांच्या आडनावाचं इंग्रजी स्पेलिंग ‘Ghandy’ असं करत असत), असा प्रचार विरोधकांनी केला. राजमोहन यांच्याकडे नैतिक बळ होतं पण आर्थिक बळ नव्हतं. स्वाभाविकपणे नेहरू कुटुंबियांचा निवडणुकीय बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात त्यांचा राजमोहन यांचा सपशेल पराभव झाला. परंतु, राजीव गांधींच्या पक्षाला एकंदर बहुमत गमवावं लागलं आणि त्या निवडणुकीनंतर व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले. चांगली लढत दिल्याचा मोबदला म्हणून राजमोहन यांना पंतप्रधान सिंगांनी राज्यसभेचं सदस्यत्व दिलं.

उंच, ताठ देहयष्टी असणारे राजमोहन गांधी केस पूर्ण मागे फिरवत असत. त्यांचा चश्मा जाड काचेचा होता. ते काळजीपूर्वक आणि संथपणे बोलत. रामू गांधी यांच्यासारखं उत्स्फूर्त सफाईदार वक्तृत्व आणि खोडकर विनोदबुद्धी राजमोहन यांच्याकडे नव्हती. परंतु, राजमोहन गांधींचं व्यक्तिमत्व प्रचंड क्षमता राखून असल्याचं त्यांना पहिल्यांदा भेटल्यावरच लक्षात येत असे. या पहिल्या भेटीनंतर थोड्याच काळाने मी त्यांनी लिहिलेली राजाजींची आणि वल्लभभाईंची चरित्रं वाचली आणि माझ्यावर त्या पुस्तकांचा प्रभाव पडला. (या दोन्ही राजकीय नेत्यांवरील ही चरित्रं प्रकाशित होऊन काही दशकं लोटली असली तरी अजूनही हेच त्यांच्यावरील प्रमाणित चरित्रग्रंथ आहेत). राजमोहन यांनी एकेकाळी ‘हिम्मत’ हे उदारमतवादी मूल्यांची पाठराखण करणारं साप्ताहिक सुरू केलं आणि ते त्याचे संपादक होते, हेही मला माझ्या काही ज्येष्ठ मित्रांमुळे माहीत होतं. आणीबाणीच्या वेळी या साप्हातिकाने निर्भीड भूमिका घेतली, पण कालांतराने आर्थिक पाठबळाअभावी ते बंद पडलं. ‘हिम्मत’मध्ये राजमोहन यांनी देशातील काही सर्वोत्कृष्ट पत्रकार घडवले. हे पत्रकार पुढे मुख्यप्रवाही वृत्तपत्रांमध्ये लेखक व संपादक म्हणून ख्यातकीर्त झाले.

राजमोहन यांच्याशी त्यांचे बंधू गोपाळ यांच्या माध्यमातून माझी ओळख झाली, पण नंतर मी राजमोहन यांना स्वतंत्रपणेही भेटू लागलो. या प्रत्येक भेटीमध्ये मला देशाच्या इतिहासाविषयी काही मर्मदृष्टी मिळत असे, तसंच या देशाच्या लोकशाही व अनेकत्ववादी भविष्याविषयी आम्हाला वाटणारी चिंताही त्या बोलण्यात व्यक्त होत असे. नंतरच्या काळात दिल्ली, बंगळुरू, पांचगणी व ईस्ट लॅन्सिंग, मिशिगन, अशा ठिकाणी त्यांच्याशी माझा सविस्तर संवाद होत राहिला. त्यांची पुस्तकं आणि निबंध मी वाचत राहिलो, त्यातून माझ्या विचारांना चालनाही मिळत राहिली. या सर्व काळात राजमोहन आणि माझ्यात केवळ एकदाच असहमती झाली. छापील माध्यमातून ही असहमती व्यक्तही झाली, पण आता तो मुद्दा इतका क्षुल्लक वाटतो की त्याची आठवण नोंदवणं अनावश्यक ठरेल.

महात्मा गांधींपेक्षा जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी आदरभाव बाळगणाऱ्या कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो. भारतीय पर्यावरणवादाबद्दल संशोधन करणारा तरुण अभ्यासक म्हणून नेहरूंविषयी माझी भूमिका जास्त टीकात्मक होती, कारण नेहरूंच्या सरकारने संसाधनकेंद्री, ऊर्जाकेंद्री आर्थिक प्रगतीचं प्रारूप आक्रमकपणे राबवलं आणि या धोरणाचे पर्यावरणीय शाश्वततेवर किती नकारात्मक परिणाम होतात याची फिकीर केली नाही. त्या वेळी माझे पर्यावरणवादी मित्र नेहरूंचं पूर्ण नकारात्मक चित्र उभं करत होते, पण त्या टोकाला जाण्यापासून मला राजमोहन गांधी यांनी वाचवलं. ‘द गुड बोटमन’ या पुस्तकात राजमोहन यांनी असं प्रतिपादन केलं की, आर्थिक धोरणाबाबत नेहरू व गांधी यांच्यात मतभेद असले तरी, नेहरू हेच गांधींचे वैध राजकीय वारसदार होते. गांधींच्या सर्व अनुयायांपैकी नेहरूंना महात्माजींच्या समावेशक दृष्टीचं सर्वाधिक आकलन होतं आणि ती दृष्टी व्यवहारात उतरवण्याचाही त्यांचा प्रयत्न होता.

गांधींप्रमाणे नेहरूसुद्धा हिंदू असले तरी मुस्लिमांचाही त्यांच्यावर विश्वास होता, स्त्रियांच्या समान हक्कांसाठी ते लढत होते, आणि उत्तर भारतीय असूनही दक्षिण भारतातसुद्धा त्यांच्याविषयी आदरभाव होता. नैतिक व राजकीय गुणांचा हा वैशिष्ट्यपूर्ण आणि अत्यंत दुर्मिळ संयोग नेहरूंच्या व्यक्तिमत्वात झाला होता. असा संयोग गांधींच्या घनिष्ठ वर्तुळातील सी. राजागोपालाचारी, मौलाना आझाद, राजेंद्र प्रसाद, जे. बी. कृपलानी, वल्लभभाई पटेल, यांपैकी इतर कोणत्याच नेत्याच्या ठायी झालेला नव्हता. हे सर्व राजमोहन यांनी मलाच नव्हे तर इतर अनेक वाचकांना पटेल अशा तऱ्हेने मांडलं. शिवाय, नेहरू व पटेल यांनी व्यक्तिगत व तात्त्विक मतभेद बाजूला ठेवून गांधींच्या हत्येनंतर भारताला व भारतीयांना एकत्र ठेवण्यासाठी कसं काम केलं, हेसुद्धा राजमोहन यांनी स्पष्ट करून सांगितलं.

राजमोहन व रामचंद्र गांधी हे दोघेही गांधींचे अभ्यासक होते आणि वारसदारही होते. रामू यांना प्रत्यक्ष एकट्यात बोलताना ऐकणं आणि मोठ्या श्रोतृवर्गाचा भाग म्हणून ऐकणं हा लक्षवेधी अनुभव असायचा. एखाद्या चांगल्या भारतीय पंडिताप्रमाणे ते मौखिक परंपरेचे पाईक होते. दुसऱ्या बाजूला, राजमोहन यांच्या लेखनात अजिबातच विनोदी सूर आढळत नाही. त्यांच्या लेखनात अनुभवजन्य तपशील, अभिलेखागारांमधून शोधलेली तथ्यं आणि सूक्ष्मदर्शी मूल्यमापन यांचं प्रमाण मात्र भरपूर असतं. व्यक्तिगत पातळीवर आणि एकत्रितरीत्या या भावांनी मला गांधींविषयी व भारताविषयी बरंच काही शिकवलं.

राजमोहन यांच्याकडून आपल्या देशाविषयी इतकं शिकल्यानंतर या लेखाच्या अखेरीला मी बहुधा राजमोहन यांच्या निदर्शनास आलेला नसावा असा एक जुना दाखला नोंदवतो. मला हा दाखला वेरिअर एल्विन यांच्या कागदपत्रांमध्ये सापडला. मूळचे इंग्रज असणाले एल्विन कालांतराने भारतीय झाले आणि भारतातील आदिवासी लोकांवरचे अग्रगण्य अभ्यासक म्हणून नावाजले गेले. ते गांधी व नेहरू दोघांनाही चांगलं ओळखत होते. राजमोहन यांच्या आईवडिलांना लग्नासाठी त्यांच्या आईवडिलांचं मन वळवण्याकरता प्रचंड मोठा कालावधी खर्चावा लागला, हे मी आधी सांगितलंच. तर, देवदास आणि लक्ष्मी यांना अखेरीस जून 1933 मध्ये पुण्यात लग्न करण्याची परवानगी देण्यात आली. लवकरच गांधी व काँग्रेस देशव्यापी सत्याग्रहाचं आंदोलन सुरू करणार असल्याची चर्चा होती. 1920-22 मधील असहकार आंदोलन आणि 1930-32 मधील सविनय कायदेभंगाची चळवळ, याला धरून हे तिसरं आंदोलन होण्याच्या मार्गावर होतं. पुण्यात महात्मा गांधींच्या काही अनुयायांना भेटल्यावर वेरिअर एल्विन यांना हे अनुयायी दुर्मुखललेले असल्याचं जाणवलं. पुन्हा एकदा तुरुंगात जाण्याची त्या मंडळींची इच्छा नव्हती. या संदर्भात एका मित्राला पाठवलेल्या पत्रात एल्विन यांनी लिहिलं, ‘तिथे केवळ देवदास आणि त्याची सुंदर वधू लक्ष्मी हे दोघंच खऱ्या अर्थाने आनंदी होते. ते आनंदी व उत्साही होते, आणि तुरुंगात न जाण्याचा त्यांचा निर्धार झाला होता.’

अखेरीस तो सत्याग्रह झाला नाही. देवदास गांधी यांना त्यांच्या वडिलांनी तुरुंगात जायचा आदेश दिला नाही. मग देवदास व लक्ष्मी दिल्लीला जाऊन स्थायिक झाले. तिथे त्यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासातील बहुधा सर्वांत वैविध्यपूर्ण बुद्धिमत्तेचं वरदान लाभलेल्या चार मुलांना वाढवलं. 

- रामचंद्र गुहा
(लेखक विख्यात इतिहासकार आणि राजकीय  - सामाजिक विश्लेषक आहेत.)
भाषांतर- प्रभाकर पानवलकर

Tags: महात्मा गांधी नेहरू रामचंद्र गुहा देवदास गांधी सी राजगोपालाचारी लक्ष्मी रामचंद्र गांधी हिंमत संपादक पत्रकार Load More Tags

Comments:

Manoj Sahare

गुहा यांची बात काही औरच आहे. नेहमीच वाचनीय. भाषांतर अर्थातच उत्तम.

Add Comment