Relevant विषयावरची Irrelevant कलाकृती

'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाने काय साधलं? काय राहून गेलं?

मराठी माध्यमाच्या शाळा टिकवणं ही जरी आपली नैतिक जबाबदारी असली तरी ही जबाबदारी आता कशी अपरिहार्यता होऊन बसली आहे असं हतबल Narrative उभं करणं हा आपला उद्देश नसून मातृभाषा आणि शिक्षण यांचा सहसंबंध लक्षात आणून देणे आणि त्याभोवती कलाकृती फिरत राहणे आवश्यक ठरते. आज पालक आपल्या मुलाचा हात घट्ट धरून त्याला इंग्रजी शाळेच्या फाटकात सोडतात. त्या फाटकावर चमकदार अक्षरं असतात, मोठी आश्वासनं असतात; "Future Ready, Global Citizen". हा ग्लोबल सिटीझन मातृभाषेतून शिक्षण घेऊन अधिक सक्षमपणे भविष्यासाठी तयार होऊ शकतो हे ठसवणे जास्त समर्पक वाटते.

एखाद्या ज्वलंत सामाजिक प्रश्नावरचा सिनेमा म्हणजे, त्या प्रश्नामागील सत्याचा, वास्तवाचा मागोवा घेण्याची संधीच असते. अशाच एका समकालीन सामाजिक प्रश्नावरचा सिनेमा म्हणजे; हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित "क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम". मराठी शाळा बंद होत जाणं हा मागील १० वर्षांत वेगाने उभा राहत गेलेला सामाजिक- सांस्कृतिक आणि बहुतांशी राजकीय असा प्रश्न. या प्रश्नाला तसे अनेक कंगोरे असले तरी सर्वच कंगोरे एकाच कलाकृतीतून मांडणे निव्वळ अशक्य. परंतु त्या दिशेने काही एक प्रयत्न सुरु झाले याबाबत दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि टीमचं कौतुक करणे तसे रास्तच ठरते.

निशाणी डावा अंगठा, १० वी फ, शिक्षणाच्या आईचा घो!! अशा काही मराठी चित्रपटांतून शिक्षण हा विषय जरी प्रामुख्याने यापूर्वी हाताळला गेला असला तरी 'मराठी शाळांची पडझड' ही थीम केंद्रस्थानी असणारा हा मराठीतील कदाचित पहिलाच चित्रपट असावा. मराठी शाळा टिकायलाच हव्यात ही दिग्दर्शकाची तळमळ यातून प्रकर्षाने दिसते आणि जाणवते. परंतु, दुसऱ्या बाजूला मराठी शाळांना वाचवणं म्हणजे नेमकं काय करणं? कशासाठी करणं? मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी शाळा टिकायला हव्यात की मराठी लोकांच्या हितासाठी मराठी शाळांचं अबाधित राहणं आवश्यक आहे? यांपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर हा चित्रपट देत नाही हेही तितकच खरं.

मराठी शाळा वाचल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत याबाबतचा संदेश सबंध चित्रपटात सातत्याने ध्वनित होत राहतो ही त्यातल्या त्यात चित्रपटाची जमेची बाजू असली तरी याबाबत शासन आणि समाज या दोन्ही स्तरांवर असणारी उदासीनता आणि निष्क्रियता कशी भेदता येईल याचं चित्र रेखाटण्यात या चित्रपटाची कथनशैली बरीच अशक्त वाटते. नेहमीप्रमाणे यातही निरंकुश सत्तेचं, लोभाचं प्रतिनिधित्व करणारी एक ‘व्हिलन फिगर’ उभी राहिलेलीच असते. मग या व्हिलन फिगरविरोधात उभा राहिलेला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा संघर्ष, आणि अखेरीस ठरलेला सुखांत अशी चित्रपटाची सरळसोट रूपरेषा. नाही म्हणायला अखेरीस शासनाचं काही क्षणापुरतं का होईना एक छोटंसं representation दिसतं पण ते अगदीच अनुल्लेखाने मारल्यासारखं.

आपली मातृभाषा ही निव्वळ एक संपर्काचे किंवा माहितीच्या अदलाबदलीचे माध्यम न राहता ती आपल्या उदरात इतिहास, संस्कृती, मूल्यव्यवस्था यांचं एकत्रित त्रिकूट नेहमीच घेऊन वावरत असते. आणि म्हणूनच गावातल्या मराठी माध्यमातल्या शाळेत शिकूनही मुलं भविष्यात चांगलं नाव कमावू शकतात, फाडफाड इंग्रजी बोलू शकतात हा सबंध चित्रपटात सातत्याने दरवळणारा युक्तिवाद एका टप्प्यानंतर ठोस युक्तिवाद न वाटता निव्वळ प्रतिवाद वाटत राहतो. मराठी माध्यमातूनच शिक्षण आवश्यक आहे, हे सतत सांगण्याची असोशी (की, हतबलता?) दिग्दर्शकाला का भासत असावी, हे कळेनासे होते. 

गेल्या पाचच वर्षांच्या कालावधीत कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सर्व जगाचा आकस्मिकपणे घेतलेला ताबा, पर्यावरणाचा ऱ्हास, जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, दिवसेंदिवस वाढत जाणारा जातीय-धार्मिक विद्वेष या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण घेऊन विद्यार्थी अधिक चांगले तयार होऊ शकतील का? आणि माणसं घडवण्यासाठी मराठी शाळा हा एक सशक्त पर्याय असू शकतो का? मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे नेमकी शहाणीव तयार होऊन उद्याच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांना भिडणारे भविष्यातले बुद्धिजीवी आणि निर्मितीक्षम असे विद्यार्थी आपल्याला मराठी माध्यमातून घडवता येतील का? याबाबतचे एक चर्चाविश्व या सिनेमातून दाखवता आले असते तर उद्याचे होणारे पालक आपल्या मुलांना मराठी माध्यमांमध्ये आनंदाने दाखल करायला निश्चितच तयार झाले असते यात शंका नाही. परंतु हा सिनेमा केवळ मराठी माध्यमातून शिकलेल्या आजच्या Millennial पिढीचा नॉस्टॅल्जिया कुरवाळण्यापलीकडे फारसं काही करत नाही असे खेदाने नोंदवावेसे वाटते.

एखाद्या सिनेमाचा प्रभाव आपल्यावर दीर्घकाळ कसा राहतो याबाबत मानसशास्त्रात Narrative Transportation नावाची एक संकल्पना सांगितली जाते. या संकल्पनेनुसार,असा प्रभाव तयार होण्यासाठी पटकथेचं कथात्म वैशिष्ट्य आणि खिळवून ठेवणारी कथनशैली आवश्यक मानल्या जाते. आज याच संकल्पनेचं पुढचं पाऊल म्हणून आपण propaganda films कडे पाहतो. 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा चित्रपट जरी propaganda film या प्रकारातला नसला तरी या विषयाचं गांभीर्य आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेची होत असणारी पडझड विचारात घेता, दिग्दर्शकाला याबाबत काही एक भाष्य करत व्यवस्थेसमोर, समाजासमोर रास्त प्रश्न उभे करण्याची म्हणजेच एकंदरीत Narrative Transportation करण्याची नक्कीच संधी होती.

शाळेतील एक विद्यार्थी म्हणून सुरु झालेला प्रवास ते आता शाळेचे एक लाडके मुख्याध्यापक आणि एका अर्थाने सर्वेसर्वा असणारे दिनकर शिर्के सर (सचिन खेडेकर) सकाळी शाळेच्या आवारात उभे राहिले आहेत. आजूबाजूला मुलांचा गोंधळ असला तरी, त्यांना एक विचित्र शांतात जाणवते आहे. फळ्यावर कालचा धडा अजून पुसलेला नसतो, शाळेची घंटा वाजायला तयार असते, पण वर्गात येणाऱ्या पावलांचा आवाज हळूहळू कमी होत चाललाय. शिर्के सरांच्या अशा काहीशा उदास मनोवस्थेतून चित्रपटाची सुरुवात होते, कारण लवकरच ९९ वर्षे पूर्ण केलेल्या त्यांच्या शाळेची इमारत धोकादायक असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे आता त्या जागी चकचकीत, पॉश अशी इंग्रजी माध्यमाची शाळा उभी राहणार आहे. मराठी माध्यमाच्या शाळाही आज अशाच शांत होत चालल्या आहेत.

शिर्के सर विचारपूर्वक एक यादी करायला घेतात. या यादीत असतात त्यांच्या माजी विद्यार्थ्यांची नावे. कुणी दुबईत यशस्वी हॉटेल मालक तर कोण सेलिब्रेटी तर कोण परदेशात स्थायिक कलाकार. या सर्वांना शिर्के सरांचं तातडीचं बोलावणं जातं आणि सगळे आपल्या लाडक्या शिर्के सरांच्या हाकेला 'ओ देत' धावत पळत आपली गावातली शाळा गाठतात. आता सिनेमा विषयाच्या दिशेने मार्गक्रमण करेल असे वाटत असतानाच दिग्दर्शक काही काळासाठी सिनेमाला पूर्णपणे Out of Context करून टाकतो.

अशातच सिनेमाच्या एका दृश्यात दिग्दर्शक सर्व पात्रांना शाळेच्या एका वर्गात आणतो. शाळेतले माजी विद्यार्थी आपली सर्व जबाबदारीची कामे मागे ठेवून केवळ त्यांच्या लाडक्या शिर्के सरांच्या एका हाकेवर जमतात. “आपली ९९ वर्षे जुनी मराठी शाळा पाडून त्या जागी इंग्रजी माध्यमाची शाळा उभी राहणार. आपल्याला हे थांबवायचं आहे आणि त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे” असं आवाहनदेखील करतात. तेव्हा मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा अशा मुद्यावरून सर्व पात्रांमध्ये चर्चा सुरु होऊन काहीच क्षणांत ही चर्चा हमरी-तुमरीवर येते. आणि इंग्रजी माध्यमाच्या बाजूने भूमिका मांडणारं एक पात्र चर्चा करताकरताच निघून जातं ते पुन्हा सिनेमाच्या अखेरपर्यंत नजरेस पडत नाही. म्हणजे हे दृश्य सुरु होताना इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम या दोन्ही perspectives मध्ये काही एक rational संवाद घडवून आणण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न दिसतो आहे असं वाटण्याचा अवकाश तोच ते दृश्य जवळपास अदृश्य होतं.

या चित्रपटातील सर्वच पात्रं सबंध सिनेमातच एक विचित्र Confusion घेऊन वावरताना दिसतात. जसं की दीप (सिद्धार्थ चांदेकर) हा एक सेलिब्रिटी आहे. तर अंजली (प्राजक्ता कोळी) जिन्हिव्हामध्ये स्थायिक आहे. हे दोघेही वर्गमित्र. सिनेमात या दोघांच्या नात्यांमधलं जवळीक-दुराव्याचं द्वंद्व दिग्दर्शक आपल्याला सातत्याने दाखवत राहतो. या out of context नात्यातून कोणतीच उत्तरं सापडत नाहीत किंवा उत्तरांपेक्षा काही शक्यता चाचपडून पाहाव्यात तर त्याही स्पष्टपणे दिसत नाहीत. खरंतर आजच्या समकाळात अतिशय संवेदनशील अशा 'मराठी भाषा आणि शाळा' या प्रश्नाबाबत अधिक समज आणि प्रश्न सोडविण्याबाबत नवीन सामग्री म्हणून हा सिनेमा रचनात्मक आणि लिखाणाच्या पातळीवर अधिक सशक्त करता आला असता.


हेही वाचा - समाजाच्या अभिरुचीचे सामूहिक करंटेपण आणि आपण (मकरंद ग. दीक्षित)


एखाद्या तरी पात्रात Clarity (विचारांची स्पष्टता) आणि Sincerity (हाती घेतलेल्या कामावर प्रामाणिक निष्ठा) दिसणं अपेक्षित असताना सगळीच पात्रं एक प्रकारचं Absurd Baggage का वागवत असतात याचं उत्तर शेवटपर्यंत मिळत नाही. त्यातल्या त्यात सिनेमातल्या बबन (अमेय वाघ) ह्या पात्राने ओपनिंगला बॅटिंग करायला येऊन, अगदी शेवटची विकेट पडेपर्यंत पिचवर टिकून राहत आपल्या अभिनयातून वेगळीच चमक दाखवली आहे. शाळेत आपल्या प्रत्येकाच्या वर्गात असा एक तरी बबन असतोच. त्यांचा आणि अभ्यासाचा जरी छत्तीसचा आकडा असला तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र आकडा टाकून विजेचा जुगाड कसा करायचा ते ह्यांना बरोबर ठाऊक असतं. अशा सर्वांचं प्रतिनिधित्व सिनेमात बबन अतिशय शिताफीने करतो.

मराठी माध्यमाच्या शाळा टिकवणं ही जरी आपली नैतिक जबाबदारी असली तरी ही जबाबदारी आता कशी अपरिहार्यता होऊन बसली आहे असं हतबल Narrative उभं करणं हा आपला उद्देश नसून मातृभाषा आणि शिक्षण यांचा सहसंबंध लक्षात आणून देणे आणि त्याभोवती कलाकृती फिरत राहणे आवश्यक ठरते. आज पालक आपल्या मुलाचा हात घट्ट धरून त्याला इंग्रजी शाळेच्या फाटकात सोडतात. त्या फाटकावर चमकदार अक्षरं असतात, मोठी आश्वासनं असतात; "Future Ready, Global Citizen". हा ग्लोबल सिटीझन मातृभाषेतून शिक्षण घेऊन अधिक सक्षमपणे भविष्यासाठी तयार होऊ शकतो हे ठसवणे जास्त समर्पक वाटते.

जसं की, एखाद्या उंच झाडाची मुळं जमिनीत फार खोलवर पसरलेली असतात. ती मातीशी बोलतात, ओलावा ओळखतात, अंधारातही जीवन शोधतात. मातीतील पाणी मुळं हळूहळू शोषून घेतात. मराठी माध्यमाची शाळा अशीच झाडांच्या मुळांसारखी असते. ती मुलांच्या मनाशी थेट बोलते. आई जशी बोलते तशी. मुलं इथे घाबरत नाहीत. शब्द अडखळले तरी विचार अडखळत नाहीत. प्रश्न विचारताना भाषा अडथळा ठरत नाही, ती आधार बनते. इंग्रजी शाळा म्हणजे शेंडा. उंच आणि अत्यंत गरजेचा असा. त्याशिवाय आज सावली मिळणं कठीण आहे, हे खरं. पण शेंडा असा एका रात्रीत उभा राहत नाही. त्याला पाणी लागतं. आणि ते पाणी मुळांतूनच येतं. आजच्या जगात इंग्रजीचं महत्त्व कोणी नाकारणार नाही. पण शेंडा जर मुळांपासूनच तुटलेला असेल, तर झाड कितीही झपाट्यानं वाढलं, तरी ते आतून कोरडं पडत जातं आणि कालांतराने कोमेजून जातं. असे एक ना अनेक प्रश्न असताना केवळ मराठी शाळा वाचवा या एकमेव प्रश्नाचा निव्वळ Intro म्हणून या चित्रपटाकडे पाहता येते आणि खेदाने असे नोंदवावेसे वाटते कि, "पिक्चर तो अभी बाकी है..."

- सिद्धार्थ नाईक
siddharthnaik1530@gmail.com
(लेखक साहित्य व सिनेमा माध्यमाचे अभ्यासक आहेत.)

Tags: मराठी चित्रपट मराठी शाळा मराठी शाळा वाचवा मराठी शाल कशासाठी भाषा संवर्धन शिक्षण मराठी शाळा सशक्त ग्लोबल सिटिझन साधना डिजिटल Load More Tags

Comments:

महेश

" इंग्रजी शाळा म्हणजे शेंडा"- असे परीक्षणकर्त्याने म्हटले आहे. त्यांना खरोखर असेच म्हणायचे आहे की "इंग्रजी भाषा म्हणजे शेंडा" असे म्हणायचे आहे. काहीही म्हणायचे असले तरी केवळ इंग्रजी भाषा सावली देते, असे म्हणण्यातील निर्घृण सांस्कृतिक विषमता त्यांच्या ध्यानात येत नाही, असे दिसते. इंग्रजी भाषा आजच्या जगात आवश्यकच आहे, पण मातृभाषेचे स्थान केवळ मुळांसारखे असते आणि वरील झाडात तिचे स्थान नसते, ही मांडणी भोंगळ आहे. चित्रपटाच्या खांद्यावरून स्वतःची अपुऱ्या आकलनाची बंदूक चावल्यासारखे वाटते.

Dr. Meghana Joshi

Writer has expressed the emotions with remarkable method, carefully following all the technique of film criticism. These were very much the feelings I myself experienced after watching the film. The article is articulated with great beauty and finesse.

Dr Bhagwat Shinde

सिद्धार्थ सरांनी या चित्रपटाच अचूकरित्या समीक्षण केल आहे. खूप आवडलं. दोन-चार दिवसांपूर्वी हा चित्रपट पाहून मलाही खूप निराश वाटलं होतं. मूळ विषय अगदी वरवरपणे मांडलाय. सिद्धार्थ सरांनी हे खूप नेमकेपणाने मांडलंय. त्यामुळे माझ्यासारख्या अनेकांची निराशा प्रातिनिधिक रूपात या लेखातून व्यक्त झालीय असे म्हणायला हरकत नाही.

Ravindra Parmale

खरं तर खूप काही मांडता आलं असतं सिनेमात. मी तर म्हणेल 'उत्कृष्ट आणि ज्वलंत विषयाची फसलेली मांडणी.' मराठी शाळा आणि त्यांच्या समस्या मांडता आल्या असत्या प्रत्येक संवादात.

Subhash Langote

Excellent & studious ARTICLE The truth. But vanishing. I am proud to be from a Marathi Medium School Student. Congratulations to the Author.

Add Comment