ढिपांडिटिपांग धाडधिंगपांग्!

साळवडे येथील यमाई देवी मुलींचे लेझीम पथक 

बाळकृष्ण तांबट एका लेझिम पथकाचे नायक. पुणे जिल्ह्यातील यात्रांमध्ये बक्षिसं पटकावाणारा केवळ मुलींचा हा एकमेव संघ. दोन वर्षात ४०-४५ गावांतील यात्रांत साळवडेच्या मुलींनी रौनक आणलीय. मुली गावोगावची बक्षिसं पटकावताएत. तांबट या घडामोडीचं वंगण ठरलेत. त्यामुळं भेटायचं ठरवलं. तर हे निघाले महाराज! भूतपिशाच उतरवणारे!

“मी तारपेट माणूसे!" बाळकृष्ण तांबट तळहातावरची तंबाखू रगडत म्हणतात, "चुकीत घावलेल्याला सोडत नाय. जिथल्या तिथं वाटंला लावतो.” ‘तारपेट म्हणजे?’ विचारल्यावर त्यांनी तंबाखूची फक्की थाप मारून उडवली. मग पॉज घेवून म्हणाले, “तामसी! तापट्येय मी. अन्याय सऽन होत नाय मला.” 

आयपीसीचं कलम ५०९ किती लोकांना माहीत आहे? महिलांकडे एकटक पाहणं, त्यांना अनकम्फर्टेबल वाटेल असं न्याहाळणं हा कायद्यानं गुन्हा. या अपराधाला तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही सजा आहेत. तांबटांनाही हा कायदा माहीत असण्याची शक्यता कमी, पण अशा गुन्ह्यांशी सामना होतो, तेव्हा तांबटांची तामस वृत्ती कामी येते. ते आपल्या पद्धतीने टवाळांना वाटेला लावतात, बाकी जबाबदारी आई यमाईवर सोपवतात. 

तसा हा मनुष्य शांतीप्रिय. माणूस साठीत आल्यावर तसाही सौम्य होतो. पण तांबटांना ढोल वाजवताना पहा. कमरेला ढोलाचं टिपाड बांधून ते रात्र रात्र जोशात टिपरू हाणतात. या मनुष्यात भिनलेला ढोलाचा ताल, त्याची कला समजून घेताना आपल्यासमोर कलम ५०९चं महत्त्वही उलगडत जातं.       

तांबट साधुबुवा आहेत. दत्तभक्त. आमच्या भेटीवेळची घटना : गावातील प्राथमिक शाळेची सुट्टी झालेली. छोटे छोटे विद्यार्थी किलबिलत शाळेबाहेर येत होते. यांना पाहताच, आबू आबू म्हणत मुलं धावत आली. पोरांना पाहून वाटतं, आत्ता वर्गात बसून यातल्या कुणी थुकून पाटी पुसली असेल. एवढी नासमझ. पण सर्वांनी रांग लावून दर्शन घेतल्यागत केलं. नि तांबटांनी एकेकाला आशीर्वाद दिल्यागत केलं.  

आबू हे टोपणनाव. गावातली पोरंसोरंही तांबटांना आबू म्हणतात. पण अनेकांसाठी ते ‘म्हाराज’ही आहेत. देवदेवस्की करणारा या अर्थानं महाराज. याशिवाय तांबटांच्या टोपीत आणखी एक तुरा आहे. ढोललेझीम संघाचा. पट्टीचा ढोल्या म्हणूनही त्यांची एक ओळख आहे.

एनएच-४८ रोडनं पुण्यापासून साधारण तीस कि.मी. गेलं की केळवडे फाटा येतो. हायवेला सोडून एक चिंचोळी सडक घरंगळत गावाकडे निसटते. या वाटेवर केळवडे गाव ओलांडलं की शिवगंगा नदी आडवी येते. पुल ओलांडून दुतर्फा शेतं पाहत पुढं आलं की रस्त्याकडेलाच दत्त मंदीर. हे देऊळ तांबटांनी बांधलंय.

गावात चारदोन देवळं असतात तसंच हे. फरक इतकाच, पंचक्रोशीत भुतबाधा झालेल्यांना या देवळात आणलं जातं. महाराज अंगारा लावतात. गुण आला तर ठिक, अन्यथा तांबट ते 'झाड' घेवून गाणगापूरला जातात.

तांबटांच्या पुढाकारानं साळवडे गावात मुलींचा लेझीम संघ स्थापन झालाय. जिल्ह्यातलं हे एकमेव केवळ मुलींचं लेझीम पथक. या संघाने दोन वर्षात ४०-४५ गावांतील यात्रांत रौनक आणलीय. मुली गावोगाव जावून नाचताहेत. बक्षिसं मिळवताहेत. लोक मुलींच्या नाचाला दाद देताहेत. तांबट या घडामोडीचं वंगण ठरलेत. त्यामुळं भेटायचं ठरवलं. तर हे निघाले महाराज! भूतपिशाच्च उतरवणारे.

भूतपिशाचाची लागण खरीखोटीॽ की तो मनोविकारॽ हा विषय बाजूला ठेवून मला तांबटांशी बोलायचं होतं. या भेटीमागचा उद्देश्य लेझीम संघाची घडामोड समजावून घेणं असला, तरी त्यामागचा माणूस कसा टाळणार?

तांबट गाभाऱ्यात होते. दोन स्त्रिया व एक तरुण होता त्यांच्यासोबत. तांबट त्या भक्तांशी बातचित करत होते. पांढऱ्या संगमरवरातील दत्तमुर्ती तटस्थपणे त्यांचं बोलणं ऐकत उभी. अवघडून मी देवळातल्या चौकातच घुटमळलो. थोड्या वेळानं गाभाऱ्यात डोकावलो, तर तिथलं दृश्य बदललेलं. 

तांबटांसमोरचा तरुण गदगदत होता. त्याच्या अंगात आलेलं. शरीरात सर्प वळवळल्यागत हालचाली तो करत होता. एका माणसाच्या तोंडून दोघांनी बोलावं असे घोगरे उच्चार त्याच्या तोंडून निघत. हे मिनिटभर चाललं. 

मग तांबटांनी त्याच्या कपाळावर हात ठेवला. त्यासरशी करंट लागल्यागत त्यानं मानेला झटका दिला. नि तो सामान्य झाला. हे या देवळातलं नेहमीचं चित्रं असावं.

मी देवळाबाहेर आलो. आपल्याला तांबट आधार ठरलेत, त्या लेझीम कलेशी मतलब. हल्ली गावोगाव केवळ पुरुषांचेच लेझीम संघ आढळतात. लेझीम हा एक पारंपारिक नाचप्रकार. शेतीसंसाराचं जू वागवून थकलेल्या पुरुषांच्या माना लेझमीनं मोकळ्या होत असतील. स्त्री असो वा पुरुष, नाचून माणूस मुक्त होतो. साळवडेतील मुली-महिलांचं नाचाबद्दल काय मत असेल?

गावातील एखाद्या महिलेशी बोलावं वाटलं. देवळाजवळच्या बसस्टॉपवर एक बाई दिसल्या. या रोहिणी रांजणे. वय साधारण तीस. साळवडे यांचं सासर. बस येईपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारणं सोयीस्कर होतं. या गप्पातला निवडक भाग - 

माहेर कुठलंॽ : शिवरे. शिक्षणॽ : धाव्वी. पुढं नाही शिकलाॽ: वडील लवकर वारले ना, परिस्थिती नाजूक. म्हणून धाव्वीनंतर लगीच लग्न झालं.

२००५ मधील एका सर्वेक्षणानुसार  खेड्यातील २० ते २४ वयोगटातील ४७% मुली अठरावं गाठण्याआधीच लग्न करत्या झाल्या. अर्थातच त्यांच्या मर्जीचा प्रश्न येतो कुठे? परिस्थिती ठरवते तसं घडतं. रोहिणीताईंचही असंच काही घडलं असावं. ही नोंद घेऊन मी मुलींचा नाच, बालपणातील आनंदाकडे वळलो.

शाळेत गॅदरिंग-सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे काॽ : पंधराआगस्टसव्वीसजानेवारीला व्हायचे की! देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम. मी यकदा समूहगीतात भाग घेतलेला. पण आतासारके नाचवगैरे नव्हते आमच्या शाळेत. शाळेत मुलींचा भोंडला होत असेल नाॽ: खेड्यातल्या शाळेत ओ कुठं भोंडलाबिंडलाॽ

महिला-मुलींचं सांस्कृतिक जग वेगळंच. मी त्या मुद्द्याकडे वळलो.   

पंचमी, वटपौर्णिमेला फेर धरून नाचला का कधीॽ : आमचं घर गावाबाहेर. गावात मिक्सच होता आलं नाय. आन् आता पैल्यावाणी बाया पंचमीला जमतबी नाहीत. भैनीभैनींनी कधी ठरवलं तर आम्ही गणपती विसर्जनाची मिरवणूक तेवढी बघायला जायचो. पोरं नाचायची, आम्ही पोरी बघायचो.

रोहिणीताई ग्रामीण महिलांच्या प्रतिनिधी वाटल्या. मुलींचं नाचणं इन्स्टा रील्सवरचं वेगळं, गावात सर्वांदेखत परंपरेबरहुकूम असतं, ते निराळं. खेड्यांत नागपंचमी-वटपौर्णिमेला महिला फुगड्या खेळत, झोके झुलत. ती गंमत आता नाहीशी होतीए. रोहिणीताईंना परंपरेतील हे नाचही अनुभवता आले नाहीत. आता ही स्त्री दोन मुलींची आई आहे, आजघडीला हिचं नाचाबद्दल काय मत असेलॽ

रोहिणीताई म्हणाल्या, “आम्हालाबी नाचावं वाटतंय की, पण बंधनं हायेत. गावात गणपती उत्सवात संगीत खुर्चीचा कार्यक्रम होतो ना तवाच लेडिज-बिडिज मिक्स झाल्या तर झाल्या!” 

बसस्टॉपवर गाडी आली. नि रोहिणीताई गेल्या. पदर सावरत गाडीत बसणाऱ्या रोहिणीताईंना पाहून वाटलं : आपला समाज वर्षानुवर्षे गृहिणी बनवतोय. या गुऱ्हाळाच्या चरकात बाईमाणसांतील अंगभूत ऊर्मींचं काय होतं? 'नाचावं वाटतं, पण बंधनं हायेत!' हे बायांच्या हाडीमासी कसं बसतं?

मी या विचारात होतो तोवरच तांबट देवळाबाहेर आले. म्हणाले, “चला, तिकडं यमाईच्या देवळात बसून बोलू, तिथं शांतता असते.” गावाच्या पश्चिमेला, दलित वस्तीला वळसा घालून एक वाट टेकडीवर चढते. तिथे असते साळवडेची ग्रामदेवी यमाई. यमाई देवीचा गूगल सर्च द्या – माहिती मिळते – यमाई ही शिवपार्वतीचं एकत्र रूप. 'ए माऽये' या आर्जवाचा अपभ्रंश यमाई! अर्थात देवीच्या नावातच भावार्थ सामावलेला – आई, कृपा कर!

साळवडेच्या लेझीम पथकाचं नावही - यमाई देवी लेझीम पथक. मनात आलं, यमाईचं एक जेंडर नाही! आपण मात्र नाचात देखील जेंडर मानतो : लेझीम पोरांची, फुगड्या पोरींच्या. देवळाजवळ येताच मनात प्रार्थना आली - ए माई, प्लीज कृपा कर – नाचाला जेंडरच्या कल्पनांतून मुक्त कर!   


यमाईबद्दल तांबटांकडून जाणून घ्यावं वाटलं. त्यांनी तपशीलवार सांगितलं, “तीनचारशे सालामागं यमाई आली असंल साळवड्याला. तसं हीचं मुळ ठाणं औंधला. यकदा यका भक्ताला देवी परसन्न झाली. भक्त औंधावरून तिला बर्बरच घिवून निघाला. पण देवी म्हणली, मी यतीया, तु म्होरं चाल. वळू नगंस, मान फिरवून बघशील तर म्या तिथंच थांबल. साळवड्याला भक्त वळला. तवापासून देवी हितंच ऱ्हायली.”

“उत्सव कधी असतो देवीचाॽ” मी विचारलं. तांबटांनी सांगितलं, “दरसाली चैत पुणवंला यात्रा भरती. गावोगावचं लेझीम खेळ येत्यात छबिन्यासमोर हाजरीला. पालखी आधी बुवासायेबाच्या समाधीजवळ जाती, मग खैसबुवासमोर, नंतर मारूतीच्या देवळात, त्यानंतर हरिजन वस्तीतल्या लक्षुमीआयजवळ आन् मंग भैरवनाथाच्या देवळापरेंत. गावाला परदक्षिणा घालून परत येतीय.” 

यमाईचा परिचय झाला, कडकलक्षुमी तामसी, तिचं देऊळ गावातल्या दलित वस्तीत असतं, हेही माहीत, तसेच भैरवनाथ, मारुतीही माहितीतले. कुतूहलापोटी मी बुवासायेब व खैसबुवाबद्दल जाणून घेतलं. तांबटांनी सांगितलं, “एक बैरागी होता. बुवासायेब, त्यांची समाधी यमाईच्या पायथ्यालाच हाये.” मी विचारलं, “आणि खैसबुवाॽ” तांबट दाढीमिशात हसून म्हणाले, “त्यो भुतांचा राजा! खैसबुवा जांभळीच्या झाडाखाली ऱ्हातो. वैशाखात त्या जांभळीला हीऽ टपोरी जांभळं येत्यात. लय वानरं येत्यात जांभळं खायला. ल्हानपणी आम्ही दोस्तमंडळीबी जायचो की!" तांबटांनी अचानक जीभ तोंडाबाहेर काढली नि म्हणाले, "माझे वडील रागवायचे, म्हणायचे उन्हातान्हाचं तिथं जावू नै, खैसबुवा धरंल. पण जांभळी जीभ दोस्तांना दाखवायला मजा यायची. म्हणून आम्ही हटकून जायचो...” तर तांबटांचं जग असं आहे, त्यात गावकुसातल्या देवांसहित भुतांनाही योग्य स्थान आहे. गावोगावचे लेझीम संघ छबिण्यासह नाचत या प्रत्येकाचा आदर सन्मान करतात. 

मी विषयाकडे येत तांबटांना विचारलं, ‘तुम्हाला लेझीमची आवड कशी लागलीॽ’ “मी तिसरीत होतो तवा...” तांबट नॉस्टॅल्जिक होत म्हणाले, “जगताप नावाचे एक गुरूजी होते, ते सांगली जिल्ह्यातले. त्यांनी शाळेत हलगीवला खेळ चालु केला. पण मला घेतलं नव्हतं खेळात.” सांगली-सातारा हे लेझीम या खेळप्रकाराचं केंद्र मानलं जातं. तांबटांचे शिक्षक त्या भागातले. हल्ली बहुतेक संघ ढोल-ताशा-झांज-टोलाच्या दणदणाटी तालात नाचतात. पूर्वी लेझीमला केवळ टाऽनटाऽन अशा मधुर हलगीचीच सोबत असे.

तांबट पुढं म्हणाले, “गुरूजींनी सांगली जिल्ह्यात चालायचा तो पावूंड बसवलेला” पथकात नाचणारे विशिष्ट लयीत पावलांचा ठेका धरतात. या ठेक्याला पावूंड म्हणतात. पथक कधी रिंगण, स्वास्तिक असे आकार धारण करतं, तर कधी दोन, कधी चार रांगात नाचतं, ढोलाच्या ठेक्यासोबत किती पावूंडांनंतर पथकानं मूव्ह घ्यावी ते ठरतं. नाचणारांना पावूंड जमलं तरच खेळ जमतो.

तांबट म्हणतात, “मला नाचायची हौस वाटाय लागली. मी यकलाच दार लावून रिकामा डबा वाजवत पावंडं खेळायचो. आईनी मला बघितलं, ती गुरूजीकडं गेली. म्हणली, आमचा पोरगा घरातच नाचतोय, त्यालाबी घ्या खेळात. मंग गुरूजींनी मला घेतलं.” 

'लेझीम' हा तांबटांचा आस्था विषय. त्यामुळं ते अघळपघळ बोलू लागले,“जुन्या काळात रूपयाला मोठी किंमत होती. पंचाला पावूंड आव़डला, तर नाचणाऱ्याच्या तोंडात रूपयाची नोट द्यायचे." यात्रेत छबिण्यांसमोर नाचणाऱ्या पथकांची नोंद पंच घेतात. पंच वाजवणारांचा ठेका नि नाचणारांची लय पाहतात. पंचांनी दिलेल्या गुणांआधारेच पथकांना बक्षिसाचा क्रमांक मिळतो. तांबटांनी बालपणात अशा पंचांकडून दाद मिळवली. त्यामुळं त्यांना लेझीमची गोडी लागली.

तांबट जुन्या आठवणीत रमलेले, "मी बिनचूक खेळायचो. आम्ही बैलगाड्यातून यात्रेत नाचायला जायचो. आमच्या पथकात बारा मुलं बारा मुली व्हत्या. टेंभ्याचा खेळ व्हता आमचा. एकसंगटच सर्व्यांनी टेंभ्यावर राकेल फुकायचं न् एकसंगटच जाळ करायचा वरती. पण एकदा एक पोरगं चुकलं...”

'म्हणजे?' माझ्या प्रश्नावर तांबटांनी प्रतिप्रश्न केला, "तोंडात राकेल धरून नाचणं सोपंय व्हय? त्या पोरानी चुकीचा फवारा सोडला..." ‘मगॽ’ मी विचारलं, तांबट म्हणाले, “पोरगं पेटलं नाय, पण यात्रेचा मांडव भडाकला. गडबड झाली. तवापासून शाळेचं पथक बंद झालं." 'मग?' मी विचारलं, 'तुमची लेझीम बंद पडली?' तांबट हसून म्हणाले, "हा नाद सुटतोय व्हयॽ” ते पुढची गोष्ट सांगू लागले, “नंतर गुरुजींची बदली झाली. मंग आम्ही पोरापोरांनीच परत खेळ बसवला. आम्ही सायकलींवर जायला लागलो यात्रांमधी नाचायला.” या काळात तांबट व त्यांच्या पथकातील सोबती तरुण झालेले. त्यामुळं शालेय काळात यांच्यासोबत नाचणाऱ्या मुली आपसूकच पथकातून बाद झाल्या.

नंतर ही तरुण मुलंही कामंधंद्याला लागली. तांबट सांगतात, “ मी कंपनीत कामाला लागलो. नंतर एक टेंपो घेतला. तरकारी पुण्याला न्ह्यायचो. नंतर मुंबैला जायला लागलो. पण पैसा काय हातात टिकत नव्हता." तांबटांची गाडी आता लेझीम पथकाचं स्टेशन सोडून संसारात रमली. दोन मुली एक मुलगा झाला. पण हा गृहस्थ देवदेवस्कीकडे का वळला? 

आयुष्याला कलाटणी देणारी घटना तांबट सांगतात, "यकदा माझ्या लेकीला फोड आला. निवलेलं दुध तिज्या हातावर सांडलं. माझं डोकंच चालंना, पोरीला थंड दुधानं भाजलंच कसं?" खरंतर आपण टेंपो चालवतो, मेहनत करतो. पण मिळकत पुरी पडत नाही, या विचारानं तांबट मेटाकुटीला आलेले. त्यात मुलीच्या हातावरील फोडाच्या रहस्यानं त्यांच्या मनाचा ताबा घेतला. आपण देवापासून दुरावलोय म्हणून पोरीला फोड आला, असं त्यांना वाटलं. तांबटांनी गाणगापूर गाठलं. तिथंच आठवडाभर राहिले. घरी आल्यानंतरही संसारात मन रमेना. ते यमाईच्या टेकडीमागील जंगलात जावून बसू लागले. यथावकाश हा संसारी माणूस दत्तभक्त झाला.

तांबटांचा मुलगा वयात आलेला. त्यानं शेती सांभाळली. तांबटांनी भक्ती. ते पुन्हा पुन्हा गाणगापूरची वारी करू लागले. तिथे भूतपिशाचानं पछाडलेल्यांना मुक्ती मिळते. आपल्यालाही मुक्तीच हवीय, असं काहीसं त्यांच्या मनानं घेतलं असावं. हळूहळू हा माणूस महाराज झाला. 

महाराज मंडळी भुतंखेतं उतरवण्याबरोबरच, चेटूक, करणी करतात, गुप्तधन शोधतात अशी माझी समजूत. म्हणून विचारलं, 'तुम्हाला येते का ती विद्या?' तांबट म्हणाले, "मी तसल्या नादालाच लागलो नाय. वाईटवंगाळाची इद्याच नको आपल्याला, आपली भोळी भक्ती बरी."

आपल्या लेकीच्या हातावरील फोडानं हा माणूस हळवा झाला. त्या फोडानं याला दत्तभक्तीकडे नेलं, पण हा मुलींच्या लेझीम संघाचा नायक कसा झाला? तांबट सांगतात, "गावात आमचे जुने दोस्त हायेत ना, तर ते म्हणले परत खेळ बसवू. आम्ही तरुण पोरांला नाचायला जमवलं. पण पोरांना काय पावूंडं जमंना. गावातल्या पोरी बघत बसायच्या. त्यातल्या एकदोघी म्हणल्या आम्ही नाचू का?" छोट्या मुलींच्या नाचण्यावर कुणी हरकत घेतली नाही. सरावात मुलांच्या तुलनेत मुली लवकर पावूंडं शिकल्या. मग मुलीच नाचू लागल्या. या पंधरा-वीस मुलींची प्रगती तांबटांनी पाहिली. गावातील बुजुर्गांनाही वाटलं, आपण मुलींचं लेझीम पथक सुरू करू! नि मुलं बाद झाली, मुली नाचायला सज्ज झाल्या.

दरम्यान जवळच्या खळद गावची यात्रा आली. पथकातील एका मुलीचं हे आजोळ. तिनं प्रस्ताव ठेवला – माझ्या मामाच्या गावची यात्रा आहे, आपण तिथं लेझीम खेळूया का? मुलींनी हा प्रस्ताव तांबटांपुढे मांडला. तांबटांनी विचारलं, 'रातभर नाचणार का यात्रेत?' मुलींना नाचायचंच होतं, त्या 'हो!' म्हणाल्या. तांबट सांगतात, "मी देवीला कौल लावला. यमाईचा आशिर्वाद घिवूनच आम्ही खळदला गेलो."

तांबटांना वाटतं, 'देवीनं कृपा केली.' खळदच्या यात्रेत साठ पथकं आलेली. त्यातून साळवडेच्या संघाला प्रथम क्रमांकाची ढाल मिळाली. गुलालात माखलेल्या मुली गावात ढाल मिरवत, नाचत आल्या. मुलींचा ढालीसोबतचा फोटो एका दैनिकात प्रसिद्ध झाला.

चैत्र महिन्यापासून भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, सासवड या भागात यात्रा असतात. या यात्रांत लेझीम पथकांना रोख बक्षिसंही मिळतात. खळदच्या विजयानंतर साळवडेचं पथक यात्रांची वाटच पाहू लागलं. तांबट सांगतात, "दोन वर्षांत आम्ही पंचेचाळीस यात्रांत गेलो. पण मुलींचं पथक फक्त आमचंच. बाकी सगळे संघ पोरांचे. तरी आम्ही बक्षिसं मिळवली." 

या लेखाच्या निमित्तानं मलाही साळवडेच्या मुलींचा लेझीम डान्स पाहता आला. तांबटांच्या ढोलाचा ढिपांग टिपांग नाद सुरू होताच, एरवी बुजऱ्या वाटणाऱ्या खेड्यातील मुली अचानक बिजलीसारख्या नाचू लागल्या. नाचता नाचता त्या अचानक हुर्यो करत. अशावेळी भुईनळ्यागत त्यांच्यातून काहीतरी उसळतंय, झिंगून काहीतरी मुक्त होतंय हे पाहणं थोर.

मुलींचं नाचणं पाहण्यापाहण्यातही फरक आहेच, यात्रेत हवशे गवशेही येतात. काही नशेडीही असू शकतात. मिरवणूक रात्रभर चालते. अशावेळी मुलींची सुरक्षा हाही एक प्रश्न. त्याबद्दल तांबटांना विचारताच ते म्हणाले, "मी तारपेट माणुसे... असा एकांदा दिसला की डोळं वटारतो. माझं डोळं बघूनच असली बेणं पळत्यात..."

असं असलं तरी तांबट दर यात्रेच्या वेळी एक सोपस्कार करतात. ते म्हणतात, "मी आधी यमाईला कौल लावतो. तिचा आशिर्वाद घिवूनच जातो. नंतर यात्रा असंल तिथल्ल्या देवळात आधी जातो. देवाला हात जोडून सांगतो, गावानी माझ्या भरवशावर पोरी सोडल्यात, आता ह्या पोरींचं रक्षण करायचं काम देवा तुझं..."

रात्रभर पालखीसोबत मिरवणाऱ्या पथकांची मुख्य मंडपात एकामागोग हाजरी होते. पंच खेळांना गुण देतात. मग बक्षिसपात्र पथकाचं नाव जाहीर होतं. ही प्रक्रिया होता होता अनेकदा उजाडतं. अशावेळी नाचून दमलेल्या पोरींना तांबट टेंपोत पाठवतात. बक्षीस  जाहीर होईपर्यंत मुली टेंपोतच डुलक्या घेतात. यात्रेत आडोशाला थांबलेल्या या टेंपोभोवती तांबट पहारा देत बसतात. कुणी टवाळ निजलेल्या मुलींकडे डोकावताना दिसला की हाकलून लावतात.

नाचून शांत झोपलेल्या मुलींना तांबटांच्या मनातील उलघालीची कदाचित कल्पनाही नसावी. यात्रेत त्यांना कोण कसं पाहतंय, याचीही तमा नसावी. लेझीम नाचून मिळालेल्या आनंदाचे त्या वेगळेच किस्से सांगतात.       

तेरा वर्षीय धनश्री तांबट सांगते, "आम्ही यात्रांत गेलो, की सगळीकडं मुलंच मुलं दिसायची. आम्ही घाबरायचो, ह्या मुलांसमोर आपला कसा नंबर येणार? पण नंतर कॉन्फिडन्स वाढला. मंग आम्हाला पयला नायतर दुसरा नंबर मिळायलाच लागला." 

मुलींनी गावोगावच्या यात्रांत ढाली जिंकल्या. साळवडेशिवाय असं एकही गाव नसेल, जिथल्या देवळात मुलींनी जिंकलेल्या ढाली गावाची शान म्हणून टांगलेल्या दिसतील. 

मुलींना या कौतुकाशिवाय काय मिळालं? सृष्टी शेंडगे (वय १४) सांगते, "एका गावात एक बाई खेळ बघून लय खुश झाली. तिनी सगळ्या मुलींच्या हातात एक एक नोट ठेवली." एका महिलेकडून मिळालेल्या बक्षिशीची आठवण सृष्टीच्या मनानं कोरून ठेवलीए. 

तांबट सांगतात, "ढालीबरोबरच रोख बक्षिसपण मिळतं. ते पैशे मी बँकेत जमा केले. पह्यल्याच वर्षी दोन लाख जमले. ते मी परत्येकीला समान वाटले." 

पथकातील मुलींचा वयोगट आठ ते चौदा. या वयात मिळालेल्या अशा पैशांचं पोरींनी काय केलं? सृष्टी सांगते, "पप्पांनी माझ्या शाळेच्या ड्रेसवरती ते पैशे खर्च केले. परत पैशे मिळाले. मंग पप्पांनी अजून पैशे घालून मला सोन्याची चैन केली." तर भक्ती भडाळे सांगते, "वडलांना पैशाची गरज होती, मी त्यांनाच दिले" राधा भडाळेही तेच सांगते.

साळवडेतील बहुतेक कुटुंबं शेतकऱ्यांची. या मुलींनी आपल्या कुटुंबाची गरज ओळखून ती रक्कम आपापल्या वडलांकडे सोपवली. बहुतेक मुलींच्या वडलांनी आपल्या लेकींसाठी दागिन्यांत गुंतवणूक केल्याचं दिसतं.

पण समृद्धी व सिद्धी या दोन बहिणी सांगतात, "आम्ही पप्पांना पैशे धिले. पप्पांनीही त्यात भर टाकली. आम्ही तिघांच्या पैशातून आईला सोन्याची चैन भेट धिली." 

तर नियती भडाळे एक विशेष मत नोंदवते. ती म्हणते, "आजपर्यंत फक्त मुलंच पार्टी करायचे, आमच्या पैशातून आम्ही मुलींनी पार्टी केली. ढाब्यावर जावून जेवलो. मज्जा केली."  

मुलींची ही मतं ऐकताना तांबटांच्या चेहऱ्यावर अभिमानाचं स्मितहास्य होतं. वाटलं, एकेकाळी लेकीच्या हातावरील फोडानं हवालदिल झालेला हा मनुष्य. याच्या ढोलाच्या ठेक्यावर मुलींना नाचताना पाहून काय विचार करत असेल? कदाचित अंतर्मनात हा अजुनही लेकीच्या हातावरील फोडावर फुंकर घालत असेल?  

'तुम्हाला मुलींच्या जबाबदारीचं दडपण येत नाही?' मी विचारलं. तांबट म्हणाले, "यमाईचा भरवसा. ती करती सगळं नीट!"

तांबटांचा निरोप घेत मी उठलो. तांबटांनी देवी यमाईला हात जोडले. मीही जोडले. नि वाटेला लागलो. एकदा वळून साळवडेच्या यमाईकडे पाहिलं. नि वाटलं, बरं झालं वळून पाहिलं, नसता ही देवी या गावी राहिलीच नसती. पाहण्यापाहण्यातही फरक असतो, मी देवीच्या डोळ्यात पाहिलं, तिनं माझ्या. या नजरभेटीतून मी तिला विचारलं, ए माई, सतत उघड्या डोळ्यानं तू काय पाहतेस?  : आयपीसीचं कलम ५०९? 

- प्रशांत खुंटे
मोबाईल - 97644 32328
(लेखक पत्रकार आहेत.)

Tags: मुलींचे लेझीम पथक साळवडे यमाई लेझीम पथक Load More Tags

Comments:

Amol shinde

अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असा लेख आपण लिहिला आहे अगदी हुबेहूब.

Nikam Ganesh chandrakanth

खूप सुंदर असा लेख लिहिलेला आहे तुमचे खूप खूप आभार

Mangesh

खुप सुंदर लेख आहे खेळ पण ऐक नंबर आहे

Add Comment

संबंधित लेख