साधना प्रकाशनाचे नवे पुस्तक - 'राजकारण-जिज्ञासा'

पुस्तकप्रकाशनानिमित्त परिसंवाद - "देशविदेशातील राजकारण कोणत्या दिशेने जात आहे?"

2019 च्या ऑगस्टमध्ये साधना ट्रस्टने ‘कर्तव्य साधना’ हे डिजिटल पोर्टल सुरू केले. ताज्या घडामोडींवरचे लेखन, साधनाची ओळख असलेले गंभीर, विश्लेषणात्मक आणि वाचनीय वैचारिक लेखन, आणि ऑडिओ व व्हिडिओ स्वरूपातला आशय डिजिटल माध्यमातून पोहोचवणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता. त्याच उद्देशाने एका व्यापक वाचकवर्गाला ज्यात स्वारस्य वाटेल असे गंभीर वैचारिक सदर लिहावे, अशी विनंती संपादकांनी सुहास पळशीकर यांना केली.

त्यांनी 'राजकारण-जिज्ञासा' या नावाने ही 25 लेखांची मालिका लिहिली. आपल्या सार्वजनिक जीवनात सर्रास आणि अचूक वापरल्या जाणाऱ्या, पण ज्यांचा नेमका अर्थ सामान्य लोकांना माहीत नाही, अशा राजकीय संज्ञा आणि संकल्पनांचे स्पष्टीकरण या लेखमालेत केलेले आहे. संविधानाची गरज, लोकशाही, स्वातंत्र्य, समानता, बहुमत, नागरिकत्व, बहुसंख्याकवाद अशा 25 मूलभूत संकल्पनांचे अर्थ, त्यांचा आजच्या व्यवहाराशी असलेला संबंध आणि आव्हाने या लेखांत मांडलेली आहेत. भारतीय राज्यघटना आणि संसदीय लोकशाही यांच्या संदर्भचौकटीत ही मांडणी केलेली आहे. 

या लेखनाचा मुख्य हेतू लोकांना तयार उत्तरं देण्यापेक्षा, सार्वजनिक जीवन आणि राजकारणाबद्दल योग्य प्रश्न पडावेत, कुतूहल निर्माण व्हावे हा आहे. आज लोकशाही, सत्ता आणि सार्वजनिक हित यांबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाच्या काळात, राजकारण समजून घेण्यासाठी अशी समजूतदार आणि चिकित्सक मांडणी आवश्यक आहे हीच या लेखनामागची मूलभूत भूमिका आहे. नवोदित वाचक, राज्यशास्त्राचे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि सामान्य नागरिक अशा सर्वांसाठी ही लेखमाला उपयुक्त ठरली.

कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या काळात लोकांचे डिजिटल मध्यमातले वचन वाढले होते, तेव्हा ही मालिका सुरू झाली. सव्वा वर्ष चालू राहिली. तेव्हापासून आजतागायत गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत साधनाच्या डिजिटल व्यासपीठावर प्रसिद्ध झालेल्या लेखनापैकी सातत्याने सर्वाधिक वाचले जाणारे लेखन म्हणजे ही लेखमाला आहे. हे तिच्या आशयाची सकसतेचे आणि असे लेखन ही काळाची गरज असल्याचे द्योतक आहे. 

आता ही लेखमाला साधना प्रकाशनाकडून 'राजकारण-जिज्ञासा' याचा नावाने पुस्तक रूपात प्रसिद्ध झाली आहे. पुस्तकात मूळ लेखमालेतल्या 25 लेखांसह तीन नवे लेख समाविष्ट केले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन 24 जानेवारी 2026 रोजी, एस.एम.जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनचे सभागृह, पुणे येथे झाले. त्या वेळी, "देशविदेशातील राजकारण कोणत्या दिशेने जात आहे?" या विषयावर परिसंवाद झाला. त्या परिसंवादात आरती मोरे (सहसंपादक , बोल भिडू), अभिजीत कांबळे (संपादक, बीबीसी मराठी), संकल्प गुर्जर (आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक) आणि प्रतापसिंह साळुंके (विधी महाविद्यालयातील प्राध्यापक) या चौघांची भाषणे झाली. परिसंवादाच्या प्रारंभी सुहास पळशीकर यांनी मनोगत व्यक्त केले, विवेक घोटाळे यांनी या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगितली, तर विनोद शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. त्या संपूर्ण कार्यक्रमाचा हा सव्वादोन तासांचा व्हिडिओ आहे.


हे पुस्तक साधना साप्ताहिकाच्या वेबसाइटवर सवलतीच्या खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

राजकारण-जिज्ञासा

Tags: स्पष्टीकरण नवे पुस्तक साधना प्रकाशन साधना डिजिटल लेखमाला पुस्तक प्रकाशन राजकारण-जिज्ञासा सुहास पळशीकर बोल भिडू बीबीसी मराठी गोखले इंस्टिट्यूट कायदा संविधान लोकशाही प्रतापसिंह साळुंके अभिजीत कांबळे आरती मोरे संकल्प गुर्जर Load More Tags

Add Comment

संबंधित लेख