आता प्रतीक्षा 18 जूनची... 

भारताचा कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश 

चार सामन्यांच्या क्रिकेट कसोटी मालिकेत इंग्लंडला निर्णायकपणे 3-1 असे सपशेल पराभूत करून भारतीय संघाने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान तर मिळवलेच... शिवाय त्याचबरोबर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही प्रवेश केला आहे. न्यूझिलंडसोबत होणारा हा सामना 18 जूनला  नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ऐतिहासिक लॉर्ड्‌स मैदानावर होणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता हा सामना साउथम्प्टन इथे होणार आहे. 

अखेरची कसोटी केवळ अनिर्णित राखली असती तरी भारताचा अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित होता... पण भारताने प्रथमपासूनच जिंकण्यासाठीच खेळ केला. इंग्लंडच्या फलंदाजांचे मनोधैर्य दुसऱ्या कसोटीपासूनच खचले, फिरकीपुढे त्यांनी नांगी टाकली... त्यामुळे भारताच्या फिरकी गोलंदाजांना मिळालेले स्फुरण आणि काही प्रमाणात खेळपट्टीची मिळालेली साथ यांमुळे भारताचे काम सुलभ झाले. भारताच्या... त्यामानाने कमी अनुभव असलेल्या... ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल या तरुण खेळाडूंनी जी करामत केली ती दीर्घ काळ विसरता येणार नाही. त्यांच्या फलंदाजीमुळेच भारताला या कसोटीत 160 धावांची मोठी आघाडी आणि मोठा विजय मिळवणे शक्य झाले.

अर्थात आघाडीवीर रोहित शर्माची कामगिरीही विसरता येणार नाही... पण दुसऱ्या डावात मात्र तो कधी नव्हे इतका दबकून खेळला. कदाचित इतर फलंदाजांवरदेखील दडपण आले असेल. तसे पाहिले तर 121 धावांवर रोहित शर्मा आणि 146 धावा असताना रविचंद्रन अश्विन बाद झाला तेव्हा- भारत दोनशेची मजल तरी गाठणार का- असा प्रश्न पडला होता... पण ऋषभ पंतने अतिशय संयमाने आणि जबाबदारीने आपली खेळी रचली आणि त्याच्या जोडीला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरनेही त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी इंग्लंडची धावसंख्या (205) सावधपणे पार केली आणि नंतर मात्र धडाक्याने, इंग्लंडला चांगलाच हादरा देणारा खेळ केला. 113 धावांच्या भागीदारीनंतर पंत बाद झाला तेव्हा भारताच्या 259 धावा होत्या. आघाडी नाममात्र होती. 

इंग्लंड संघ पुन्हा सामन्यावर पकड घेऊ शकतो की काय असा प्रश्न निर्माण झाला होता... पण पंतच्या जागी आलेल्या अक्षर पटेलने चांगला जम बसलेल्या वॉशिंग्टन सुंदरला विश्वास वाटेल असा खेळ सुरू केला आणि मग वॉशिंग्टन सुंदरने ऋषभ पंतचाच कित्ता गिरवत डावाची सूत्रे स्वतःकडे घेतली. अगदी त्याच्याचप्रमाणे जोरदार फटकेबाजी केली. आठव्या विकेटसाठी या जोडीने तब्बल 106 धावांची भर घातली. अक्षर पटेलने 43 धावा करून आपले अष्टपैलुत्व दाखवले... (केवळ कमनशिबानेच) तो धावचीत झाला आणि वॉशिंग्टनच्या शतकाची आशा दुरावली असे वाटत असतानाच नंतरच्या षटकात इशांत शर्मा पहिल्या आणि सिराज चौथ्या चेंडूवर बाद झाल्याने वॉशिंग्टन सुंदरला निराशेने हे पाहत राहावे लागले. कसोटीतील अगदी हाताशी असलेले शतक त्याला गाठता आले नाही याची हळहळ सर्वांना वाटली तरीही आपण आपल्या संघासाठी पुरेसे काम केल्याचे समाधान त्याला नक्कीच मिळाले असेल.

जाणवण्याजोगी एक गोष्ट अशी की, ज्या ऋषभ वॉशिंग्टन आणि अक्षर या तीन फलंदाजांनी इंग्लंडचे मनसुबे उधळून लावले ते तिघेही डावखुरे फलंदाज आहेत. अगदी अनुभवी अँडरसनलाही त्यांच्यापुढे हात टेकावे लागले यातच त्यांचा दर्जा आणि कसब दिसून येते हे तर खरेच... पण प्रतिकूल परिस्थितीतही मनोधैर्य कायम राखून योग्य प्रकारे खेळण्याचा गुण अधिक महत्त्वाचा वाटतो. भारतीय संघाला नेमकी कशाची आवश्यकता आहे हे त्यांनी बरोबर ओळखले होते आणि त्यानुरूपच खेळ केला हे महत्त्वाचे. कसोटी शतकाचा घास ओठांपर्यंत येऊनही निसटला याचे वॉशिंग्टनला (आणि असंख्य क्रिकेटप्रेमींनाही) दुःख होणे स्वाभाविकच... पण तरीही त्याची कामगिरी भारतीय संघाच्या दृष्टीने शतकापेक्षाही कितीतरी मोलाची म्हणता येईल.

रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांना आता अगदी गारफिल्ड सोबर्स, कपिल देल निखंज, इयन बोथम, इम्रान खान वा रिचर्ड हेडली यांच्यासारखे परिपूर्ण नाही तरी अष्टपैलू खेळाडू म्हणायला कोणाचीच हरकत नसेल. अश्विनने तर पाच कसोटी शतके नोंदवून आपले नाणे वाजवून घेतले आहे आणि अक्षरही त्याच्याच पावलावर पाऊल टाकून वाटचाल करण्याची चिन्हे दिसत आहेत. एक अस्ताकडे झुकत आहे तर दुसरा उदयाला येत आहे... त्यामुळे भारतीय संघाची काळजी दूर झाल्याची चिन्हे आहेत.

फलंदाजीतही रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे इत्यादी तिशीत गेले असले तरी आता विशीत पदार्पण केलेले शुभमन गिल, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर (फिरकी गोलंदाज म्हणूनही भूमिका वठवू शकतात आणि मयार्दित षटकांच्या सामन्यांत तर ते मोलाचे ठरू शकते.) आणि अक्षर पटेल यांच्यामुळे भारत निश्चिंत असायला हरकत नाही. (शिवाय त्यांच्याच बरोबरीचे इशान किशन, तेवातिया, पडिक्कल वगैरे खेळाडू संधीची वाटच बघत आहेत.)

तसे पाहिले तर अहमदाबाद इथे झालेल्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीची वाटचाल बहुतांश एकसारखीच होती. चौथ्या कसोटीत इंग्लंडला जेमतेम 205ची मजल मारता आली. या मालिकेत त्यांनी ही मजल आठ डावांत केवळ दुसऱ्यांदाच गाठली ही बाब ध्यानात घेतली तर यातच मालिकेचे सार आहे हे दिसून येते... कारण तिसऱ्या कसोटीतच त्यांचा संघ दोन्ही डावांत लवकरच बाद झाला होता. 

जो संघ पहिल्या कसोटीत पाचशेच्या वर धावा करतो... त्याच्या फलंदाजीला अचानक एवढी दैन्यावस्था यावी आणि वाघाची शेळी व्हावी अशी त्यांची अवस्था का व्हावी असा प्रश्न, त्यांचे बचावाचे खेळपट्टी इत्यादी मुद्दे विचारात घेतले तरी पडतो आणि त्याचे उत्तर तसे अवघड आहे... कारण तसे पाहता याही कसोटीमध्ये त्यांच्या लॉरेन्सने दोन्ही डावांत चांगल्या धावा केल्या. स्टोक्सही पहिल्या डावात चांगला खेळला होता. रूट, सिब्ली, फोक्स असे काही जण अधूनमधून बरे खेळले... पण ते काही त्यांच्या लौकिकाला साजेसे नव्हते. स्टोक्सची बरी कामगिरी असली तरी ती काही त्याच्या कारकिर्दीला साजेशी नाही हेही मान्य करायला हरकत नाही.

मालिकेत जलदगती इंग्लंडच्या अँडरसनचा आणि काही प्रमाणात भारताच्या सिराजचा प्रभाव दिसला. इशांत शर्माने कसोटीची शंभरी आणि बळींचे त्रिशतक गाठले इतकेच... आणि जसप्रीत बुमराही फार काही करू शकला नाही. (अलीकडच्या काळात त्याच्या गोलंदाजीची धार बोथट झाल्यासारखे दिसते आहे खरे. कदाचित तिच्यातील नावीन्य कमी झाल्याने फलंदाजांना आता त्याच्या माऱ्याचा अंदाज पूर्वीपेक्षा नीटपणे करता येत असेल.) 

इंग्लंडच्या आर्चर आणि ब्रॉड यांनीही केवळ हजेरी दिली असेच म्हणायला लागेल. या दोन्ही संघांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मालिकेवर (कारण यावरच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कोण प्रवेश मिळवणार हे अवलंबून होते...) फिरकी गोलंदाजांचीच छाप होती आणि त्यामुळेच केवळ चार कसोटींमध्ये 34 बळी मिळवणाऱ्या अश्विनची मालिकावीर म्हणून केलेली निवड साहजिकच सोपी होती आणि ती होणे योग्यच आहे. (अर्थात त्याच्या जोडीने अक्षरलाही हा मान दिला असता तरी कुणी हरकत घेतली नसती.)

इंग्लंडच्या डॉम बेसचा पहिल्या कसोटीत प्रभाव दिसला... पण अखेरच्या कसोटीमध्ये मात्र त्याला अश्विनप्रमाणे खेळपट्टीचा पुरेपूर लाभ उठवता आला नाही. डावखुऱ्या लीच आणि मोईन अली यांची कामगिरी उल्लेखनीय म्हणायला हवी... मात्र त्यांना फलंदाजांची परीक्षा पाहता येईल अशी पुरेशी धावसंख्या पाठीशी नव्हती. तरीही त्यांनी ज्या जिद्दीने गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगीच होती. मोईन अखेरच्या कसोटीत खेळला असता तर कदाचित काही फरक पडलाही असता. खेळाडूंना आलटून-पालटून विश्रांती देण्याचे त्यांच्या मंडळाचे धोरण त्यामुळेच वादग्रस्त ठरले. तसेच काहीसे बटलरला परत धाडल्यामुळेही त्यांना वाटले असेल.

तर अशा प्रकारे सुरुवात खराब झाली तरी ऑस्ट्रेलियात ज्याप्रमाणे भारताने मागून येऊन मालिकेत आघाडी घेतली होती... त्याचप्रमाणे याही मालिकेत घेतली. पहिला सामना वगळता बाकी सर्व सामने लवकरच संपले म्हणजे जवळपास निम्म्या वेळात. अर्थात नेहमीच असे घडेल असे नाही... याचा विसरही पडू देता कामा नये. 

भारताच्या नव्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी जुन्यांपैकी बरेच जण फारसे यशस्वी झाले नाहीत. एखाददुसरी खेळी हीच त्यांची जमेची बाजू. अर्थात रोहित शर्मा हा ठळक अपवाद. हे सारे जण याबाबत विचार करतीलच... शिवाय वयपरत्वे सर्वच प्रकारच्या, कसोटी एकदिवसीय आणि ट्वेन्टी20, प्रकारांत खेळण्याचा आग्रह त्यांनी धरू नये असे वाटते. त्यांच्यासाठी तसेच संघासाठीही ते फायद्याचेच ठरेल असे वाटते. निवड समिती आणि प्रशिक्षकदेखील याबाबत विचार नक्कीच करतील.

लॉर्ड्‌सच्या दोन वर्षांपूर्वीच्या आठवणी दोन्ही संघांसाठी क्लेशकारकच आहेत. त्या वेळी मर्यादित षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझिलंडविरुद्ध विजय दृष्टिपथात असताना उपान्त्य सामन्यात भारताची अचानक घसरगुंडी होऊन पराभवाची नामुश्की पत्करावी लागली होती... पण त्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या न्यूझिलंडलाही अंतिम सामन्यात अखेर नशिबाचा खेळ पाहायला मिळाला.

विश्वचषक फुटबॉल अंतिम सामन्यात अर्जेन्टिनाच्या मॅराडोनाचा हँड ऑफ गॉड गोल विख्यात झाला. तसेच स्टोक्सची बॅटदेखील इंग्लंडसाठी गॉड्‌स बॅट ठरली होती... (कारण क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू धाव घेणाऱ्या स्टोक्सच्या बॅटला लागून सीमापार गेला... त्यामुळे इंग्लंडचा विजय निश्चित झाला होता) आणि न्यूझिलंडच्या पदरी घोर निराशा आली  होती. 

आता त्या आठवणी विसरूनच दोन्ही संघ 18 जून रोजी साउथम्प्टन मैदानावर उतरतील हे नक्की... पण परिस्थिती अशी आहे की, त्यांच्यापैकी एकाच्या नशिबी पुन्हा एकदा निराशाच येईल... कारण विजेता एकच असतो... म्हणजे पावसाने सामना झालाच नाही आणि दोन्ही संघांना विश्वचषक कसोटी क्रिकेटचे संयुक्त विजेते घोषित करावे लागले नाही तर....

या संस्मरणीय विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन करून त्यांना अंतिम लढतीसाठी शुभेच्छा देऊ या... पण त्यापूर्वी ट्वेन्टी20 आणि एकदिवसीय मालिका व्हायच्या आहेत आणि नंतरही आयपीएलचा उत्सव आहेच... तरीही त्या अंतिम सामन्यात खेळायचे आहे हे भारताच्या खेळाडूंनी विसरायला नको एवढेच सांगायचे...!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)

Tags: क्रीडा क्रिकेट भारत इंग्लड कसोटी आ श्री केतकर Cricket Sports India England A S Ketkar Load More Tags

Add Comment