लेखन, अभिव्यक्ती, तल्लख स्मरण शक्ती, स्वतंत्र विचार हे हर्डीकरांच्या व्यक्तिमत्वाचे सार मांडले आहे. डझनभर क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करताना हर्डीकर एकाच ठिकाणी गुंतून राहिले असे झाले नाही. म्हणजे पाच विषय घेऊन पदवी, इंग्रजी विषयात एम. ए; पुढे मराठी-इंग्रजी वाङ्मयातील विषय घेऊन पीएचडी पदवीचा अभ्यास, आय.ए.एस.ची तयारी असा त्यांचा बहुमुखी संचार झाला. ग्रामायनमध्ये काम, आणीबाणीतील सत्याग्रह, येरवडा कारागृहातील वास्तव्य, भाजपशी जवळीक, शोधपत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरी अशा गोष्टी त्यानंतर घडून गेल्या.
शिक्षण, लेखन, पत्रकारिता, संशोधन, संकलन, संपादन, चळवळी, व्याख्याने, सामाजिक आंदोलने, युवक आंदोलने, संगीत, गिरिभ्रमण, स्वैर भटकंती, चित्रपट... अशा विविध क्षेत्रात गेली सुमारे पाच दशके अथकपणे वावरणाऱ्या विनय हर्डीकर या चिरतरुण माणसाने नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली यावर विश्वास बसणे अवघड आहे. पण ते घडले आहे खरे! हर्डीकर या जगन्मित्र व्यक्तीच्या [का वल्ली!] मित्रपरिवाराने ही संधी घेतली व हा अमृत महोत्सव सोहळा निरनिराळ्या कार्यक्रमांनी सुमारे वर्षभर गाजून राहिला. त्यांचे मित्र, सहकारी, विद्यार्थी, परिचित व्यक्ती अशा सगळ्यांना तो पुनर्भेटीचा अनोखा आनंदमेळा होता. त्यात या अमृत महोत्सवानिमित्ताने एक संगीत मैफल, एक पदभ्रमण यात्रा, परिसंवाद, चर्चासत्र असे सर्व घडून आले. हर्डीकरांच्या चाहत्यांचा या उपक्रमांना उत्स्फूर्त व तुफानी प्रतिसाद होता.
हर्डीकरांच्या धमन्यांतून वाहणारी रा. स्व. संघाची शिस्त, ज्ञान प्रबोधिनीमध्ये त्यांच्या विचारांचे झालेले पोषण यातून त्यांच्या पुढील आयुष्यातील कामगिरीला एक आकार येत गेला. अभ्यासपूर्ण विचार, तर्कशुद्ध पण व्यवहारी विश्लेषण आणि रोखठोक आग्रही मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये त्यांचे लेखन, विवेचन, व्याख्याने यात नितळपणे प्रतिबिंबित होतात. हर्डीकरांच्या वयाचे पाऊण शतक आणि भारतीय प्रजासत्ताकाचे स्वातंत्र्यानंतरचे पाऊण शतक हा समांतर जाणारा एक अनोखा योगायोग होता. तो धागा धरून काही निराळ्या स्वरूपात या अमृत महोत्सवाची सांगता करावी असे ‘विनय हर्डीकर (75)’ संयोजन समितीने ठरवले. त्यात पुढाकार राजीव बसर्गेकर आणि इतर उत्साही मंडळींचा व साक्षेपी मार्गदर्शन खुद्द विनय हर्डीकर यांचे असे घडून आले. त्याचे फलित म्हणजे स्वतः बसर्गेकर यांनी प्रस्तुत केलेला ‘नव्या युगाचे पाईक’ नामे सुमारे साडेचारशे पानांचा मोठा देखणा अभिनंदन ग्रंथ.
पुस्तकाबद्दल नंतर बोलूच. पण यात काय नाही ते प्रथम सांगितले पाहिजे. हर्डीकर यांचे अभिनंदन-कौतुक करणारी, त्यांच्या आठवणी सांगणारे लेख / मजकूर / किस्से असणारी ही स्मरणिका नव्हे. केवळ तसे पुस्तक काढावे हे त्यांना आवडलेही नसते. तर यात काय आहे ? समाजातील विविध क्षेत्रात गेली सुमारे दोन ते तीन दशके किंवा त्याहूनही अधिक काळ ज्यांनी लक्षणीय काम केले आहे, जे हर्डीकरांचे सहकारी, विद्यार्थी, मित्र किंवा परिचित आहेत त्यांनी या निमित्ताने लिहिलेले एकूण चौतीस लेख आहेत. यातून स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीची ही प्रातिनिधिक कामगिरी कळून येते. पुस्तकात शेवटचा लेख स्वतः हर्डीकरांचा आहे. पंचाहत्तरीच्या टप्प्यावर मागे वळून पाहताना काय भावना आहेत हे आत्मवृत्तपर मुक्त चिंतन त्यांच्या या लेखात आहे. एका कृतिशील कार्यकर्त्याची, जबाबदार - निष्पक्षपाती टीकाकाराची मनोभूमिका कशी घडली आहे, ती विचारधारा विकसित होण्याची नेमकी प्रक्रिया कशी पार पडली ते सर्व स्वतः हर्डीकरांनी मोकळेपणाने मांडले आहे. आधुनिक व्यवस्थापनाच्या भाषेत ते त्यांचे SWOT Analysis (पुस्तकातील डॉ. वसंत काळपांडे यांच्या लेखानुसार तो भाग म्हणजे शत्रुसंधो – शक्तिस्थाने, त्रुटी, संधी व धोके सांगणे) आहे असे म्हणता येईल. अशा समस्त पस्तीस लेखांचा हा ऐवज त्या त्या क्षेत्रातील वाटचालीचा – अनुभवांचा एक अस्सल दस्तावेज झाला आहे. लेखकांचे हर्डीकरांशी असलेले मैत्रीचे / सहकार्याचे / सहमतीचे नाते हा सर्व लेखांमधील समान धागा.
सर्व लेखांची विस्ताराने चर्चा करणे अवघड काम आहे. पण त्यांची संक्षेपात दखल घ्यायला हवी. ज्या उद्देशाने या पुस्तक प्रकल्पाचा घाट घातला ते कितपत साध्य झाले हेही शेवटी पाहता येईल. पुस्तकात समाविष्ट असलेल्या लेखांचे साधारणपणे चार प्रकार पडतात. आपापल्या क्षेत्रातली कामगिरी, वाटचाल, अनुभव यांचे कथन हा पहिला प्रकार. त्या निमित्ताने एखादी समस्या घेऊन तिची उकल करणे हा दुसरा प्रकार. काही व्यक्तिगत अनुभवांचे कथन हा तिसरा प्रकार आहे. तसेच काही पूर्वप्रसिद्ध साहित्यही येथे समाविष्ट आहे, तो शेवटचा प्रकार मानू.
शालेय शिक्षण क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या डॉ. वसंत काळपांडे यांचा लेख सुरवातीसच आहे. सरकारी अधिकाऱ्याची भूमिका नेमकी काय असते व काय असावी हे त्यांनी विस्ताराने मांडले आहे. ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक – संचालक कै. डॉ. अप्पा पेंडसे यांच्या विचारांचा आणि कृतीचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या डॉ. गिरीश बापट यांचा नेतृत्व शिक्षणाचे पैलू विशद करणारा लेख येथे आहे. नेतृत्व विकसन आणि राष्ट्रकारण यांचा समन्वय कसा साधता येईल याचे अनुभवसिद्ध सूत्र त्यांनी मांडले आहे. हर्डीकरांचे जुने मित्र आणि प्रयागराज केंद्रीय विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू डॉ. राजन हर्षे यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामगिरीच्या आठवणी जागवल्या आहेत. राज्यशास्त्र तसेच आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांमध्ये त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले आहे, मूलभूत संशोधन केले आहे, अनेक शोधनिबंध व पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. करियरमध्ये चढउतार येत राहतात, चांगल्या गोष्टींना विरोधही होतो, दबाव-प्रलोभने यांचा सामना करावा लागतो. पण शुद्ध हेतू, अखंड परिश्रम आणि दुर्दम्य आत्मविश्वास हेच शेवटी मदतीस येतात हे हर्षे सर अनुभवाने सांगतात. मोठी स्वप्ने, निर्धारपूर्वक कार्य, झपाटून केलेली शिक्षण क्षेत्रातील कामगिरी, नव्या संस्थांची उभारणी असे योगदान दिलेल्या पराग शहा यांचाही लेख येथे आहे.
साहित्य, लेखन, संपादन या क्षेत्रांमध्ये आपल्या अनोख्या कामगिरीने आज विख्यात असणाऱ्या चौघांना संपादकांनी लिहिते केले आहे. लेखक – कादंबरीकार म्हणून आपले खास स्थान निर्माण केलेले आणि अंतर्नाद या मासिकाचे संपादक असलेले भानू काळे यांनी आपली लहानपणापासूनची जडण घडण आणि नंतर आपल्या लेखन-संपादन विश्वातील वाटचालीवर लिहिले आहे. काही काळ केलेली इंग्रजी-मराठी पत्रकारिताही त्यांच्या नावावर आहे. एकीकडे मासिकांच्या व्यवहाराला ओहोटीचा अनुभव येत असताना काळे यांनी काही विशिष्ट भूमिका घेऊन हे मासिक सुरू केले व यशस्वीपणे चालवून दाखवले. त्यांच्या मासिकाचा एक मोठा वाचक वर्ग निर्माण झाला होता. नवनवीन विषय आणि निराळ्या रीतीने त्यांची केलेली मांडणी या सगळ्याची कथा काळे यांच्या लेखात आहे. नुकतेच अंतर्नाद मासिकाचे प्रकाशन त्यांनी थांबवले. पण त्या सर्व अनुभवाचे एका तटस्थ व वस्तुनिष्ठ भूमिकेतून त्यांनी “ एका मासिकाचा उदयास्त “ हे पुस्तक नंतर लिहिले. हे दोन्ही एकत्र वाचले तर मराठी मासिकांचा ‘साहित्य व्यवहार’ आणि ‘आर्थिक व्यवहार’ यांवर पुरेसा प्रकाश पडतो. विद्रोही शेतकरी - कवी अशी ओळख असणारे इंद्रजीत भालेराव यांच्या लेखातील त्यांचे अस्सल अनुभव अन्तर्मुख करणारे आहेत. हर्डीकरांचे मित्र रविमुकुल हे केवळ चित्रकार - मुखपृष्ठकारच नव्हे तर तो साहित्य क्षेत्रात वावरणारा सजग आणि संवेदनशील माणूस आहे हे त्यांच्या लेखात जाणवते. एखादे पुस्तक घडत असताना मूळ मजकूर, त्याची छपाई, लेआउट, कागदाची निवड, सुबक बांधणी याबरोबर त्याच्या मुखपृष्ठाचाही तितक्याच प्राधान्याने विचार आवश्यक आहे हे रविमुकुल आग्रहाने सांगतात. त्या कामातही नाविन्य, विविधता, सर्जनशीलता आहे, सबब पुस्तकाचे मुखपृष्ठही ‘वाचावे’ हे ते आवर्जून सुचवतात. विख्यात नाटककार आणि हर्डीकरांचे दीर्घ काळचे स्नेही सतीश आळेकर यांनी त्यांच्या फर्ग्युसन कॉलेजमधल्या आठवणी जागवल्या आहेत. आळेकर - हर्डीकर आणि इतर मित्रांच्या 1985 व त्यापुढच्या काळाच्या आठवणी या स्मरणरंजनाची भट्टी छान जमून आली आहे. एकांकिकाकार-नाटककार म्हणून आळेकर जे घडत गेले त्याचे बी त्या काळातच रुजत गेले हे त्यांच्या लेखात स्पष्ट होते. चित्रपट लेखक, समीक्षक, प्राध्यापक, दिग्दर्शक अनिल झणकर यांनी त्यांचे माध्यमे आणि चित्रपट क्षेत्रातले अनुभव सांगून एका वेगळ्या जगाची पारदर्शी ओळख करून दिली आहे.
वामनराव देशपांड्यांचे गुणी चिरंजीव सत्यशील देशपांडे यांनी कुमार गन्धर्वांकडून जी संगीताची तालीम घेतली त्या साधनेचे विविध पैलू आपल्या ‘तीन बंदिशी’ या लेखात त्यांनी उलगडले आहेत. गायक, लेखक, संशोधक दिग्विजय वैद्य यांनी गायक कसा घडत जातो ते दाखवले आहे. विविध घराण्यांच्या आणि वैशिष्ट्यांच्या गायनातून नेमके सौंदर्य कसे टिपावे, त्यामागे कोणते चिंतन असावे हे त्यांनी खुलवून सांगितले आहे. प्रथम संगीत क्षेत्रात काही काळ रमलेले, नंतर चळवळी, राजकारण यात झोकून काम केलेले आणि इंग्रजी-मराठी पत्रकारितेतही नाव कमावलेले अमरेंद्र धनेश्वर यांनी ‘शेवटी संगीत हाच खरा दिलासा’ असा संदेश देऊन सम गाठली आहे !
दऱ्या-डोंगरात भटकंती करताना तिथल्या लोकांचा, पर्यावरणाचा, संस्कृतीचाही विचार निगुतीने करणारा हर्डीकरांचा सहकारी अनिल मोरे याचा 1988 सालचा एक लेख पुस्तकात पुन्हा समाविष्ट आहे. आज सुमारे चार दशकांनंतर त्या आघाडीवर सर्वत्र काय परिस्थिती आहे हे पाहणे उद्बोधक ठरेल. ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा नेणाऱ्या आणि अर्भक मृत्यू, बालमृत्यू या गंभीर समस्या स्वच्छता, आरोग्य शिक्षण अशा सोप्या उपायांनी त्या आटोक्यात आणणाऱ्या डॉ. अभय बंग याचे 2001 सालचे एक व्याख्यान येथे पुनर्मुद्रित केले आहे. आरोग्याच्या समस्या केवळ मोठ्या व महागड्या इस्पितळांनी सुटणाऱ्या नाहीत, त्याला स्थानिक पातळीवरील सोपे व व्यवहारी उपाय तितकेच उपयोगी आहेत हे डॉ. बंग यांनी अनुभवाने सिद्ध केले आहे. डॉ. श्याम अष्टेकर यांनी समाजाच्या विविध स्तरांवर आरोग्य सेवा पोचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. आरोग्य शिक्षण, सेवा यातील सार्वत्रिक गैरप्रकारही त्यांनी जवळून पहिले आहेत. चिंतन, वाचन, लेखन असे त्यांचे लक्षणीय योगदान आहे. शरद जोशींबरोबर त्यांनी काम केले आहे. त्यांनी केलेल्या सूचनांचा सर्व पातळ्यांवर विचार गरजेचा वाटतो. डॉ. संजय मेहेंदळे यांनी देशाच्या व्यापक आरोग्य यंत्रणेचा एक धावता आढावा घेतला आहे. पण हा लेख म्हणजे त्यात केवळ सरकारी योजनांचे प्रकटन वाटते. अष्टेकर, बंग आणि मेहेंदळे यांचे लेख एकत्र वाचले तर सरकारी प्रचारकी माहितीचा फोलपणा ध्यानात येतो. खरे पाहता, आरोग्य विभाग काय, कोणत्याच बाबतीतील सरकारी माहिती आणि आकडेवारी यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या दुर्दैवी आत्महत्येची बातमी आली की, “तो शेतकरी नव्हताच”, “ती आत्महत्त्या नसून अपघाती मृत्यू होता... किंवा अमुक रोगाने तो मृत्यू झाला” असे सिद्ध करण्याचा सरकारचा आटापिटा असतो. आत्महत्त्या, जन्म, मृत्यू अशा सर्व महत्त्वाच्या सरकारी आकडेवारीत मोठ्या गफलती नेहमीच दिसतात. मेहेंदळे यांचा लेख वाचल्यावर देशात आरोग्याची फारशी समस्याच नाही असा सूर उमटतो. असो.
ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आणि प्रबोधिनीच्या ‘प्रबोध उद्योग’चे एक संस्थापक मोहन गुजराथी यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीची मूलतत्त्वे सोप्या भाषेत विशद केली आहेत. विषय वेगळा पण त्याची मांडणी सुगम आहे. शेअर बाजारात फक्त सट्टेबाजी असते, तेथील यशापयश हा केवळ नशिबाचा भाग आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण ते एक शास्त्रच आहे अशी समजूत रुजवण्यासाठी हा लेख नक्कीच उपयोगी पडेल. वित्तीय साक्षरता याने वाढू शकेल. असाच अपारंपरिक विषय म्हणजे देशातील वाढत्या शहरीकरणामुळे आवश्यक झालेले नगर नियोजन. प्रबोधिनीचे विद्यार्थी व कार्यकर्ता अनंत अभंग यांनी या विषयाचा बराच काळ अभ्यास केला आहे. प्रबोधिनीतील त्यांच्या कामाचे शब्दांकन लेखात आहे. आणि लेखाच्या दुसऱ्या भागात ‘विकेंद्रित शहरीकरण’ ही त्यांच्या अभ्यास गटाने विकसित केलेली संकल्पना त्यांनी स्पष्ट केली आहे. यावर त्यांच्या गटाने प्रत्यक्ष क्षेत्र भेटी घेऊन 1000 Green Cities हे पुस्तकही लिहिले आहे. अभंग यांच्या प्रस्तुत विवेचनाचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. त्यांच्या लेखात काही प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. उदा. नागरीकरण याचे धोरण जसे आखता येते, तसेच उपनगरीकरण याचाही त्याबरोबरीने विचार गरजेचा आहे. कारण उपनगरांमधूनच साऱ्या समस्यांची सुरवात होते असे समजायला जागा आहे. शिवाय नगर नियोजनामध्ये त्यासाठी लागणारा प्रशासकीय आकृतिबंध, त्यासाठी आवश्यक असणारा वित्त पुरवठा या सगळ्याचा समावेश त्या प्रतिमानात असायला हवा. पण त्यांचा हा विषय अनेक विद्याशाखांना स्पर्श करणारा आहे व त्यावर अधिक संशोधन - अभ्यास व्हावा हे अभंग सूचित करतात.
हर्डीकरांच्या सामाजिकच काय तर व्यक्तिगत आयुष्यातही शरद जोशींची शेतकरी संघटना हे मोठे प्रकरण होते. या पुस्तकात ती चळवळ आणि तशा घडामोडींचा लेखाजोखा मांडणारे एकू सहा लेख आहेत. हर्डीकरांचे विद्यार्थी-मित्र आणि विख्यात अर्थतज्ञ डॉ. प्रदीप आपटे यांनी शरद जोशींबरोबर ज्या चर्चा-वादविवाद-गप्पा होत असत त्यातून शेतकरी संघटनेची भूमिका कशी घडत गेली ते स्पष्ट केले आहे. एक व्यक्ती म्हणून शरद जोशी समजून घ्यायला हा लेख चांगली मदत करतो. नवसाक्षर महिला नव्या तंत्रज्ञानाशी आणि नव्या तांत्रिक जगाशी कशा जुळवून घेतात त्याची कहाणी चेतना सिन्हा यांनी कथन केली आहे. आदिवासी-कातकरी-गवळी-धनगर यांच्यामध्ये अथकपणे काम केलेले तळमळीचे कार्यकर्ते बाळासाहेब कोळेकर यांचा त्यांचे त्या कामाचे अस्सल अनुभव सांगणारा एक पूर्वीचा लेख येथे पुन्हा घेतला आहे. अनेक युवक चळवळी आणि आंदोलने यांच्यात स्वतः सहभागी असलेले कार्यकर्ते आणि संयोजक अमर हबीब यांचा लेख शेतकरी संघटनेची संकल्पना पुरेशी स्पष्ट करतो. या समस्येवर नेमके काय करायला हवे तेही ते खुलासेवार सुचवतात.
शेतकरी संघटनेच्या एक आघाडीच्या नेत्या व माजी आमदार सरोज काशीकर यांचा लेख या आंदोलनातील त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाचे अनुभव कथन करतो. समस्येचा सर्वस्पर्शी अभ्यास, कळकळ, सुनिश्चित ध्येय आणि धडपड यामुळे चळवळ कशी उभी राहते, कार्यकर्ता कसा घडतो ते त्यांच्या लेखातून समजते. शरद जोशी शेतमालाच्या भावाकरता लढले-भांडले ही केवळ अल्पोक्ती आहे. शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देणे, शेतकरी कुटुंबातल्या महिलांना समान पातळीवरील हक्क देणे ही सामाजिक-मानसिक-वैधानिक-कौटुंबिक क्रांती त्यांनी यशस्वीपणे करून दाखवली ही फार मोठी जमा बाजू अशा लेखांमधून स्पष्ट होते. एक प्रगतीशील शेतकरी सोपान कांचन यांची द्राक्षाच्या निर्यातीच्या प्रयत्नांची धडपड त्यांनी आपल्या लेखात मांडली आहे. सनदी अधिकारी भूषणा करंदीकर यांनी त्या निर्यात प्रयत्नांचे आणखी काही पैलू प्रकाशात आणले आहेत. विदेशी बाजारपेठेत आपल्या फळे-भाज्या-फुले यांची विक्री करण्यास मोठा वाव आहे पण त्यासाठी मालाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक, बाजारपेठेची अचूक माहिती, विक्रीची व्यूहरचना अशा आघाड्यांवर काय काळजी घ्यावी लागते त्याचे प्रत्यक्ष अनुभव या संयुक्त लेखात आहेत.
देशातील औद्योगिक क्षेत्रात वाटचाल करीत असतानाचे अनुभव शब्दबद्ध करणारे एकूण पाच लेख या पुस्तकात आहेत. रसायन उद्योगास देशा-परदेशात मोठी बाजारपेठ मिळू शकते. पण त्यासाठी नवी तंत्रे, संशोधन-विकास, मोठ्या गुंतवणुकी, मालाचा दर्जा अशा सर्व आघाड्यांवर लढावे लागेल हे मुद्दे अविनाश देशमुख यांनी आपल्या लेखात अधोरेखित केले आहेत. हर्डीकरांचे मित्र डॉ. प्रमोद चौधरी यांनी प्राज इंडस्ट्रीजचे साम्राज्य आपल्या धडपडीने कसे उभे केले हे लिहिले आहे. देशात इथेनॉल क्रांती घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पण प्राज फौन्डेशनतर्फे ते विविधांगी सामाजिक कार्याची जी जबाबदारी सजगतेने पार पाडीत आहेत ती गोष्ट खचीतच कौतुकास्पद आहे. पुस्तकाचे सूत्रधार-संपादक आणि हर्डीकरांचे विद्यार्थी-मित्र डॉ. राजीव बसर्गेकर यांनी पॉलिमर क्षेत्रात दीर्घ काळ अध्यापन, संशोधन, लेखन केले आहे. त्या वाटचालीचे वर्णन त्यांनी आपल्या लेखात केले आहे. तीच गोष्ट रासायनिक तंत्रज्ञान या उद्योगाची. त्यावर मुंबईच्या ICT चे कुलगुरू अनिरुद्ध पंडित यांनी विस्ताराने लिहिले आहे. कोणत्याही उद्योगाचा संशोधन आणि नवप्रवर्तन हा पाया असतो. उद्योगामध्ये ऊर्जा, वेळ, मनुष्यबळ, गुणवत्ता, उत्पादन खर्च, उपयोजन या सगळ्यांचा समतोल साधून शाश्वतता कशी गाठता येईल याचे मार्गदर्शन पंडित यांनी केले आहे. ऊर्जा क्षेत्रातील तज्ञ अरविंद करंदीकर यांनी उर्जेचे नवीकरणीय मार्ग आणि सौर ऊर्जा यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे.
ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आणि भारतीय लष्कराचे माजी उपप्रमुख ले. ज. सुदर्शन हसबनीस [निवृत्त] यांनी आपल्या करियरमधील अनुभव आणि त्यावरील निरीक्षणे नोंदवली आहेत. प्रत्यक्ष युद्धात सहभागी असण्याचा त्यांना अनुभव आहेच. पण भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण, भारतीयीकरण, स्वयंपूर्णता, नवनवीन संशोधन व विकास, त्यासाठी काही संस्थांची उभारणी, त्या सगळ्या प्रयत्नांचे समयबद्ध नियोजन यावरचे त्यांचे चिंतन मूलगामी आहे. समाजमनाची जडण घडण होत असताना एक प्रकारचा व्यर्थपणा, फोलपणा किंवा भंपकपणा अनुभवास येतो. त्यातूनच आधुनिक काळातील आव्हाने पेलावी लागतात. असे आगळे वेगळे विवेचन डॉ. नंदू करजगीकर यांच्या लेखनात आहे. भाषा, भाषेचा विकास आणि भाषेचे उपयोजन यांवर सातत्याने व्यासंगी लेखन करणारे डॉ. गणेश देवी यांचे एक दीक्षांत भाषण येथे पुनर्मुद्रित आहे. भाषा आणि समाज यांचा समांतर विकास कोणकोणत्या टप्प्यांमधून प्रवास करतो यावरील त्यांचे चिंतन त्यात आहे. प्रबोधिनीचेच विद्यार्थी आणि सध्या ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असलेले विनय टेंबे यांनीही त्यांच्या आठवणी येथे सांगितल्या आहेत.
देशाच्या सुमारे पन्नास वर्षांच्या आणि त्या बरोबरीच्या पहिल्या पिढीच्या वाटचालीचा हा धावता आढावा झाला. संक्षिप्त नव्हे तर बराच विस्तृत झाला हे खरेच! या अभिनंदन ग्रंथाचे एक उद्दिष्ट होते : पंचाहत्तरी पार केलेल्या विनय हर्डीकर यांची ‘व्यक्ती, विचार व कामगिरी’ अशा अंगांनी ओळख करून देणे. त्यासाठी पुस्तकातील त्यांनीच आपल्याशी साधलेले पारदर्शी आणि प्रामाणिक हितगुज हा त्यांच्या लेखनाचा कळसाध्याय म्हटला पाहिजे. रा. स्व. संघ, ज्ञान प्रबोधिनी, इंडियन एक्स्प्रेस, शेतकरी संघटना येथील अनुभव त्यांनी इतरत्र शब्दबद्ध केले आहेत. तरीही त्यांना काही नव्याने भावलेले मुद्दे, काही निराळी निरीक्षणे येथे आहेतच. लेखन, अभिव्यक्ती, तल्लख स्मरण शक्ती, स्वतंत्र विचार हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सार त्यांनी मांडले आहे. डझनभर क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करताना हर्डीकर एकाच ठिकाणी गुंतून राहिले असे झाले नाही. म्हणजे पाच विषय घेऊन पदवी, इंग्रजी विषयात एम. ए; पुढे मराठी-इंग्रजी वाङ्मयातील विषय घेऊन पीएचडी पदवीचा अभ्यास, आय.ए.एस.ची तयारी असा त्यांचा बहुमुखी संचार झाला. ग्रामायनमध्ये काम, आणीबाणीतील सत्याग्रह, येरवडा कारागृहातील वास्तव्य, भाजपशी जवळीक, शोधपत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरी अशा गोष्टी त्यानंतर घडून गेल्या. यातून त्यांचे बहुजिनसी व्यक्तिमत्व उजळून आले. शेतकरी संघटनेत ते शरद जोशींबरोबर जास्त काळ राहिले आणि रमले. मात्र इतर कोणत्या संस्थेत ते रमले-टिकले, तडजोडी केल्या, पगारवाढ - बढती यासाठी जीव टाकला किंवा स्पर्धेमध्ये कोणावर मात केली - असे घडले नाही. आपल्या मनाने आणि आपल्या रीतीने ते जगत गेले. त्यामुळे विनय हर्डीकर हा कोणताही शिक्का-छाप-साचा नसलेला आणि स्वतःनेच स्वतःला घडवलेला एक कृतिशील विचारवंत म्हणून ओळखला जातो.
पुस्तकात ज्यांनी ज्यांनी लिहिले आहे त्यांची स्वतःची कामगिरी तर स्पष्ट झाली आहेच व त्याचबरोबर प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे हर्डीकरांनाही त्यांनी आपल्या कृतीची / विचारांची साथ दिलेली दिसते. गेल्या पंचाहत्तर वर्षातील विविध क्षेत्रातील प्रगतीचे पैलू जाणून घेण्यासाठी त्यातील तज्ञ व्यक्तींना लिहिते करणे हे अवघड काम संयोजन समितीने समर्थपणे पेलले आहे. शिक्षण, आरोग्य, चळवळी, संगीत, शेती, उद्योगधंदे अशा क्षेत्रातील मूळ अस्सल अनुभव वाचकांसमोर येतात ही अलौकिक बाब आहे. त्यामुळे पुस्तकामागील दुसरे उद्दिष्ट साध्य झाले असेही म्हणता येईल. सततचे परिश्रम, नाविन्याचा ध्यास, प्रामाणिक आणि नैतिक व्यवहार, सामाजिक बांधिलकी अशा मूल्यांचा पाठपुरावा करणाऱ्या तज्ञांचे लेखन/चिंतन एकत्रितपणे आपल्याला दिले याचे श्रेय संपादकांना नक्कीच द्यायला हवे. समकालीन प्रगतीचा धांडोळा ज्यांना घ्यायचा आहे त्यांना हे पुस्तक नक्कीच काही ठोस विचार देईल. नवे युग कसे घडत आहे, त्यातील आव्हाने कसे पेलत आहे याची पुरेशी कल्पना देण्यात हे पुस्तक यशस्वी झाले आहे.
जाता जाता काही किरकोळ शंका : सतीश आळेकरांच्या लेखात त्यांच्या गगनिका या पुस्तकातील सुमारे तीन पानांचा मजकूर शेवटी जोडण्याचे कारण काय? विक्रमवीर क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या जुन्या पुस्तकातील उतारा येथे समाविष्ट करण्याचे प्रयोजन काय? पुस्तकाची संकल्पना, संकलन, नियोजन आणि संपादन हे सबकुछ राजीव बसर्गेकर यांचे. पण त्याला केवळ ‘प्रस्तुती’ असे का म्हटले असावे? असो.
देशमुख आणि कंपनीने सुबक आणि सुरेख पुस्तक सादर करण्याची परंपरा चालू ठेवली याबद्दल त्या सर्व चमूचे खास अभिनंदन करायला हवे.
नव्या युगाचे पाईक
(विनय हर्डीकर ७५ अभिनंदन ग्रंथ)
प्रस्तुती - डॉ. राजीव बसर्गेकर,
प्रकाशक - देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि . पुणे,
पाने - 452
किंमत - रु. 600/-
- डॉ. संतोष दास्ताने, पुणे
santosh.dastane@gmail.com
(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ञ, प्राध्यापक आणि सल्लागार आहेत.)
Tags: नव्या युगाचे पाईक विनय हर्डीकर संतोष दास्ताने ज्ञानप्रबोधिनी साधना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजवाद पत्रकारिता शोधपत्रकारिता उद्योजक प्राध्यापक मित्र देशमुख आणि कंपनी Load More Tags
Add Comment