यांना हे स्फुरण येते कोठून?

एरिक मारिआ रेमार्कच्या 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' या कादंबरीवरील चित्रपटाच्या निमित्ताने..

'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' याच चित्रपटातील एक दृश्य

पुस्तकाविरुद्धच्या लढाईत गोबेल्सला विजय मिळाला नाही. नाझींच्या सांस्कृतिक ज्यूविरोधासमोर उभे राहणे हे प्रत्यक्ष युद्धभूमीवरील शौर्याएवढेच शौर्य होते. आणि तो काही एकटाच नव्हता. मोझार्ट हॉलचा ज्यू व्यवस्थापक हान्स ब्रॉडनित्झ यानेही 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' हा चित्रपट दाखवण्याचे धाडस केले होते. 1944 मध्ये ऑश्विझमध्ये त्याचा खून करण्यात आला.

अलीकडच्या काळात अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. आजही घडत आहेत. देशात झुंडशाहीची चलती आहे, हे सर्वानाच गेली काही वर्षे जाणवत आहे. कारण आता अत्याचाराचे गुन्हे एकट्या दुकट्याने केलेले नसतात, तर ते झुंडीने अर्थात एकाच विचारसरणीच्या लोकांच्या जमावाने केलेले असतात. पूर्वी असे प्रकार घडत नव्हते असे नाही, पण ते क्वचितच घडत आणि त्यामागे झुंडीची अमानुष ताकदही नसे. असे म्हणतात की, एकटा दुकटा एरवी जे काही करायला धजावला नसता, ते तो झुंडीत सामील असेल तर अगदी सहजगत्या करतो, तो हिंस्र बनतो. या झुंडींना स्वतःची विचारसरणी नसते कारण त्यांतील लोक कधी विचार करतच नाहीत. नेता म्हणून जो कोणी त्यांनी मान्य केला असेल, त्याने दिलेले आदेश अमलात आणायचे, एवढेच त्यांना ठाऊक असते. झुंडीत सामील झालेल्यांना तर जणू काही नव्याने ताकद लाभलेली असते. ती त्यांना मिळते, झुंडीत सामील झाल्यानंतर जे स्फुरण येते त्यामुळेच..

अलीकडे या झुंडींचे लक्ष्य ठराविक लोकच असतात, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मग कधी ते भिन्नधर्माचे असतात किंवा ते आपल्याच धर्मातील ज्यांना खालच्या दर्जाचे समजतात, आणि ज्यांनी या झुंडीतील लोकांना न आवडणारी गोष्ट (ती योग्य वा अयोग्य हा विचारही त्यांना शिवत नाही) केलेली असेल, तर अर्थातच त्यांना लक्ष्य करण्यात येते. झुंडीच्या तावडीत यातले कुणी सापडले, तर त्यांचे अनन्वित हाल होतात, अत्याचार, बलात्कार आणि शेवटी खूनही केले जातात. आता तर त्यांना राज्यकर्त्यांचेच पाठबळ असल्याचे उघड-उघड दिसते. त्यामुळेच एक तर त्यांच्यावर गुन्हे दाखलच होत नाहीत, आणि अपवाद म्हणून दाखल झालेच तर योग्य प्रकारे पुरावे जमवले जात नाहीत. खरे तर जमवून दिले जात नाहीत. अर्थातच, त्यामुळे खटला झाला तरी त्यांना पुराव्याअभावी मुक्त करण्यात येते. मग त्यांनी भले हत्याकांड का केले असेना! अलीकडेच अशा काही बातम्या वाचकांनी वाचल्या असतीलच..

पण एवढ्यानेही त्यांचे, आणि त्यांच्या ‘बोलवित्या धन्यां’चे समाधान झालेले नाही. त्यामुळे आपल्या विचारसरणीला न पटणारे वा विरोध करणारे काहीही त्यांना मान्य नसते. कुणी काय कपडे करायचे, काय खायचे इ. गोष्टीही ते ठरवतात आणि तसे न करणाऱ्यांची थेट विरोधकांत गणना करतात. त्यांना एकदम देशद्रोहीच ठरवतात. साहित्य असो, नाटक असो, वा चित्रपट, भाषणे असोत वा निर्देशने, सत्याग्रह. त्या मार्गाने जाणारे हे सारे आपले नुसते विरोधकच नाहीत तर शत्रूच आहेत म्हणून ते देशद्रोहीच आहेत, असे जाहीर करून त्यांना शासन करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे, अशी त्यांची भावना असते. आणि भावना दुखावल्याचे कारण देऊन ते कुणालाही विरोध करतात; भाषणे, नाटक चित्रपटांचे खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करतात आणि संबंधित लोकांवर हल्ले करून किमान जखमी करण्याचा वा ठार मारण्याचाही मार्ग अवलंबतात. पोलिस मध्ये पडणार नाहीत, याची त्यांना खात्री असते आणि बहुतेकदा तसेच होते. जर कुणी मध्ये पडले, तर त्यालाही मारहाण होते आणि तो पोलिस अधिकारी असला, तर अर्थातच त्याची बदली करून टाकण्यात येते.

हे सारे वाचताना प्रश्न पडत असे की, या झुंडींना हे बळ, हे स्फुरण कुठून येते? एकाएकी हे भारून गेल्यासारखे, कशाने तरी पछाडल्याप्रमाणे हे लोक का वागतात? एरवी शांत, काहीसे भित्रे म्हणावे असे लोक या हिंसाचारात, अत्याचारात, मालमत्तेचे नुकसान करण्यात आघाडीवर असलेले कसे दिसतात? ते एकदम कसे बदलतात? त्यांच्यात हा बदल कसा होतो, हे स्फुरण त्यांना येते कोठून... असे प्रश्न पडत होते. पण उत्तर काही सापडत नव्हते.

नुकताच ‘द टाइम्स, लंडन’मधील बेन मॅकिटायर (Ben Macintyre) यांचा लेख वाचायला मिळाला. तो एकदम वेगळा आणि चांगला वाटला म्हणून वाचकांच्या माहितीसाठी त्याचा स्वैर अनुवाद देत आहे.

तो 1930 मधला डिसेंबर महिना होता. बर्लिनमधील सुंदर मोझार्ट हॉल खचाखच भरला होता. एरिक मारिआ रेमार्कच्या 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' या प्रख्यात कादंबरीवर आधारलेला चित्रपट तेथे दाखवला जाणार होता. पहिल्या महायुद्धाच्या काळात खंदकातील सैनिकांच्या जीवन-मरणाची कहाणी पडद्यावर दाखवली जाणार होती. कादंबरी आधीच्या वर्षात प्रकाशित झाली होती आणि ती सनसनाटी ठरली होती. तसेच तिने चांगलीच खळबळ माजवली होती. युद्धाविरुद्ध लोकांना जागे करणारी, खऱ्या अर्थाने ती आंतरराष्ट्रीय सर्वाधिक खपाची (जेन्युइन बेस्टसेलर) कादंबरी ठरली होती. केवळ जर्मनीमध्येच तिच्या 15 लाख प्रती खपल्या होत्या, तर ब्रिटन आणि फ्रान्समध्ये सहा लाख, म्हणूनच हॉलिवूडमध्ये तिच्यावर त्याच नावाने तयार झालेला चित्रपट साऱ्या बर्लिनमध्ये चर्चेचा विषय झाला होता. ज्याच्या-त्याच्या तोंडी तेव्हा त्याचे नाव होते.

प्रेक्षागृहातील दिवे मंदावले आणि पडदा उघडला. त्याच वेळी जोसेफ गोबेल्स आणि नाझींच्या तपकिरी रंगाचे शर्ट घातलेली त्याची टोळी तेथे येऊन वाईट वासाचे बॉम्ब फेकू लागली. शिंका येणाऱ्या भुकटीची उधळण करू लागली आणि दुष्मनीचा आगळावेगळा प्रकार म्हणून त्यांनी तेथे पांढरे उंदीरही सोडले. 'हा ज्यूंचा चित्रपट आहे' असे ओरडत त्यांनी प्रोजेक्टर चालवणाऱ्यांवर हल्ला केला आणि तेही कमी झाले म्हणून की काय, हॉलमधील प्रेक्षकांनादेखील ते ज्यू आहेत असे समजून त्यांनी क्रूरपणे मारहाण सुरू केली.

आपल्या दैनंदिनीमध्ये याबाबत लिहिताना गोबेल्स अतीव सुखावला होता. त्याने लिहिले, 'केवळ दहा मिनिटांत चित्रपटगृहाचे स्वरूप वेड्यांच्या घरासारखे झाले. पोलिसांकडे काहीच अधिकार नाहीत. रागावलेले लोक आपला राग ज्यूंवरच काढत आहेत. बाहेरच्या तिकिटबारीला तर वेढाच पडला आहे. खिडक्यांच्या काचा फोडल्या गेल्या आहेत. हजारो लोक हे दृश्य मजेत पाहत त्याचा आनंद घेत आहेत. चित्रपट दाखवणे थांबले आहे आणि आता पुढचा खेळही बंद पडला आहे. आम्ही जिंकलो आहोत'.

गोबेल्स बरोबरच होता. निदान काही काळ तरी जर्मनीतील सर्वोच्च सेन्सॉर बोर्ड नाझींच्या दबावाला नमले आणि ‘जनजीवन सुरळीत सुरू राहण्यासाठी’ असे कारण देऊन त्यांनी 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' या कादंबरीवर बंदी घातली. रेमार्कची ही 200 पानांची छोटेखानी कादंबरी युद्धविरोधी असलेली सार्वकालिक श्रेष्ठ कादंबरी आहे.

अपोलिटिकल म्हणजे अ-राजकीय, राजकारणाशी काहीही संबंध नसलेली युद्धाची कटुता दाखवणारी, सैनिकांच्या हालअपेष्टांनी हादरवून सोडणारी आणि माणुसकीची जाणीव करून देणारी आहे. पूर्वी कधी नव्हते अशा प्रकारे या कादंबरीत युद्धाचे खरेखुरे चित्र रंगवण्यात आले होते. त्यामुळे होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक वेदना, अर्थहीन कत्तली, सुजाण समाजजीवनापासून पूर्णपण फारकत झाल्याचा आघाडीवरून परतलेल्या सैनिकांनी घेतलेला अनुभव या साऱ्याचे प्रत्ययकारी आणि अस्वस्थ करणारे चित्रण या कादंबरीत असल्यामुळे, लोकांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. 'रेमार्क यामुळे एका पिढीचाच आवाज बनला. त्याच्या शब्दांत, 'ही पिढी म्हणजे तोफगोळ्यांपासून वाचलेली, तरीही युद्धाने पूर्णपणे उदध्वस्त झालेली पिढी. आता यावर्षी एडवर्ड बर्गर याने 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' याच चित्रपटाच्या बनवलेल्या नव्या आवृत्तीने 'बाफ्टा' चित्रपट पारितोषिकांसाठी तब्बल 14 नामांकने मिळवली आहेत.


हेही ऐका : हिटलरचा फॅन असलेला जोजो -  मृद्‌गंधा दीक्षित


पहिल्या चित्रपटाने 1930 च्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्तम दिग्दर्शक आणि सर्वोत्तम निर्मितीचे ऑस्कर मिळवले होते. ही कादंबरी प्रकाशित झाल्यापासून आजवर तिच्या चार कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. आणि तिचे नाव हा एक वारंवार वापरण्यात येणारा वाक्प्रचारच बनला आहे. परंतु 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' या कादंबरीची सर्वात मोठी जमेची बाजू (यशच म्हणायचे) म्हणजे नाझींनी तिचा सर्वाधिक द्वेषराग केला. (कारण तिच्यामध्ये) माणसाची संवेदनशीलता, हळवेपणा रेमार्कने प्रभावीपणे दाखवला होता आणि हिटलरच्या सैन्याच्या शौर्याला गौरवण्याच्या अगदी विरुद्ध असे रेमार्कचे हे चित्रण होते. हिटलरला आधुनिक शूरवीर सरदार हवे होते. भीतीने कापणारी, चिखलाच्या खंदकातील अर्धपोटी आणि थंडीने गोठणारी माणसे नको होती. (खरे तर) तसा हिटलरही खंदकातून वाचूनच परतलेला होता. पण (युद्धाचे) ते वास्तव काल्पनिक साहित्यात वा चित्रपटात आलेले तो सहन करत नव्हता. त्याला ते सहनच होत नव्हते.

नाझींच्या विचारप्रणालीनुसार हे पुस्तक पराभूत मनोवृत्तीचे आणि राष्ट्रविरोधी आणि जर्मनी कमकुवत असल्याचा प्रचार करणाऱ्या ज्यूंच्या मोहिमेचा भाग होते. पुस्तकात राष्ट्रीय भावनेच्या नाझी प्रणालीचा अभाव असल्याने ते नाझी प्रणालीला धोक्याचे वाटत होते आणि (त्यांच्या मते) ते जणू पाठीत खंजीर खुपसल्यासारखे होते. त्यामुळे लेखकावर तो आपल्या शांतिवादाला गौरवण्यासाठी युद्धाच्या भयासंदर्भात अतिशयोक्ती करत असल्याचा आरोप केला गेला होता. रेमार्क हा काही ज्यू नव्हता. पण चित्रपटाचा निर्माता कार्ल लीमेल हा देश सोडून गेलेला जर्मन ज्यू होता. या चित्रपटाच्या प्रीमियरच्या आधी काही काळ गोबेल्सच्या ठगांपैकी एकजण रेमार्कला भेटला होता आणि त्याने 'आपल्या अनुमतीशिवायच चित्रपटाचे हक्क ज्यू निर्मात्याला विकण्यात आले’, असे सांगावे असे त्याने रेमार्कला बजावले. हा एक प्रकारचा सौदाच होता. आणि त्यात सुचवण्यात आले होते की, नाझींना आपले असत्य पसरवण्यात रेमार्कने मदत केली, म्हणजे त्याला ज्यूंनी फसवले असा प्रचार करण्यासाठी नाझींना मदत केली, तर त्याला संरक्षण देण्यात येईल.

1933 च्या मे महिन्यात, म्हणजे नाझी सत्तेवर आल्यावर चारच महिन्यांनी या पुस्तकाची होळी करण्यास आरंभ झाला. बर्लिनच्या बेबेलप्लात्झवर (नाझींच्या म्हणण्यानुसार) 150 'अध:पतित लेखकांच्या 25000 पुस्तकांची धगधगणाऱ्या आगीमध्ये आहुती देण्यात आली. गोबेल्स आता प्रोपगंडा मंत्री झाला होता आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे सारे जर्मन मन:स्थिती शुद्ध करण्यासाठी करण्यात आले होते. 'या होळीमध्ये 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' ही कादंबरी सुरुवातीलाच आगीत टाकण्यात आली होती. तिची निर्भर्त्सना 'जागतिक युद्धातील सैनिकांचा साहित्यिक विश्वासघात करणारी अशी करण्यात आली होती. नंतर शुद्धीकरणासाठी सर्व ग्रंथालयांतून हे पुस्तक काढून टाकण्यात आले. ते स्वतः कडे बाळगणे किंवा विकणे बेकायदेशीर समजण्यात आले. दोषी रेमार्कला केव्हाच हद्दपार करण्यात आले होते. पहिल्यादा तो स्वित्झर्लंडला आणि तेथून नंतर अमेरिकेत गेला. नाझींनी त्याची 'डरपोक देशद्रोही' म्हणून नालस्ती केली आणि त्याचे जर्मन नागरिकत्व रद्द केले. आपले मूळ नाव (Remark) बदलून फ्रेंच धाटणीचे नाव (Remarque) घेणारा माणूस खरा जर्मन असूच शकत नाही, असे म्हटले..

(पण हा लेखक आनुवंशिकतेने काही प्रमाणात फ्रेंचही होता). खोटेपणाने असे सांगितले गेले की, तो कधीही सैन्यात नव्हता. (खरे तर युद्धात) त्याच्या पायाला आणि मानेला शार्पनेल्समुळे जखमा झाल्या होत्या. त्याला प्रत्यक्षात शिक्षा करण्याची संधी नसल्याने स्वस्थ न बसता, नाझींनी आपला बदला घेण्याचा राग 1943 मध्ये त्याच्या धाकट्या बहिणीवर, एल्फ्रीड शोल्झवर काढला. ती व्यवसायाने कपडे बनवणारी होती आणि आपला नवरा आणि मुलांबरोबर ड्रेसडेनमध्येच राहिली होती. तिने एका ग्राहकाशी बोलताना 'जर्मनी' युद्ध हरत आहे, असे म्हटले होते. त्यामुळे तिला शत्रुपक्षाची 'घातपाती प्रॉपगडिस्ट' ठरवण्यात आले. लोकन्यायालयात तिला उभे करण्यात आले आणि ती लोकांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप ठेवण्यात आला. रोलड फ्रीस्लर, जो त्या न्यायालयाचा प्रमुख (कोर्ट प्रेसिडेंट) होता, त्याने हा खटला केवळ बहाणा असल्याचे आणि एल्फ्रीड ही बळीचा बकरा आहे, हे लपवून ठेवण्याचा जराही प्रयत्न केला नाही. तो म्हणाला की, 'दुर्देवाने तुझा भाऊ आमच्या आटोक्याबाहेर गेला आहे. पण तुला आमच्या तावडीतून निसटता येणार नाही. तिला प्लॉटझेन्सी तुरुंगात 16 डिसेंबर 1943 रोजी गिलोटिनखाली मारण्यात आले. 

रेमार्क

रेमार्कला आपल्या बहिणीचे काय झाले ते युद्ध संपल्यानंतर वर्षभर समजू शकले नाही. तो विचार करू लागला की, खरोखरच नाझींना विरोध करताना तो पुरेशा स्पष्टवक्तेपणाने बोलला नव्हता की काय? पण सत्य हे होते की, त्याने नाझींच्या युद्धाला गौरवण्याच्या विरोधात जाऊन हिटलरला प्रतिकार करण्यासाठी मोठीच भूमिका बजावली होती आणि त्याबरोबरच लोकांच्या हत्याकांडात मानवतेची सहनशीलता टिकून राहते, हे कृतीनेच दाखवून दिले होते. या पुस्तकाविरुद्धच्या लढाईत गोबेल्सला विजय मिळाला नाही. नाझींच्या सांस्कृतिक ज्यूविरोधासमोर उभे राहणे हे प्रत्यक्ष युद्धभूमीवरील शौर्याएवढेच शौर्य होते. आणि तो काही एकटाच नव्हता. मोझार्ट हॉलचा ज्यू व्यवस्थापक हान्स ब्रॉडनित्झ यानेही 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' हा चित्रपट दाखवण्याचे धाडस केले होते. 1944 मध्ये ऑश्विझमध्ये त्याचा खून करण्यात आला. (द टाइम्स, लंडन)

हा लेख वाचला. त्यातील आणि आपल्याकडील विविध घटनांचे संदर्भ, एकसारखेपण आणि हेतू एकच असल्याचे जाणवले. हा सारखेपणा जाणवताच एकदम आपल्याला प्रडलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडल्यासारखे झाले. कारण असे आपल्याकडील ही कृत्ये करणारे, त्यांना त्यासाठी उद्युक्त करून प्रोत्साहन देणारेदेखील नाझींनाच आदर्श मानणारे आहेत, हे त्यांनी कधीच लपवून ठेवलेले नाही. त्यामुळे त्यांच्या कृतीही नाझींसारख्याच असणार, हे नव्याने जाणवले. यापुढेदेखील हे असेच चालू राहणार की काही फरक पडणार असा नवाच प्रश्न पडला.

ताजा कलम:

नंतरच्या काही घटनांनी त्याचेही उत्तर सापडल्यासारखे वाटले. बीबीसीच्या मोदींवरील माहितीपटावरील सरकारी बंदीला अर्थच उरला नाही, उलट त्यामुळे त्याच्याबाबत अधिकच उत्सुकता निर्माण झाली. ही बंदी घालावी असे त्या माहितीपटात आपल्या लोकांपुढे उघड होऊ नये असे काही आहे का? याचे उत्तर नाही असेच आहे. त्या माहितीपटात आहे ते तर कितीही सारवासारव करण्यात आली, पुरावे दडवून न्यायालयाकडून क्लीनचिट मिळवण्यात आली, तरी सर्वांनाच माहीत आहे. शिवाय प्रश्न असा आहे की, त्या माहितीपटातील घटना ज्या काही पुस्तकांतून अधिक स्पष्टपणे खुलासेवार देण्यात आल्या आहेत, त्या पुस्तकांवर बंदी घालण्यात आलेली नाही. मग हा राग केवळ बीबीसीच्या माहितीपटावरच का? खरे तर तो ब्रिटनबाहेर कुठेही प्रदर्शित करण्यात आलेला नाही. तरीही ही बंदी का? असा प्रश्नही विचारला जात आहे. (बहुधा पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या मर्यादित आणि चित्रपट पाहणाऱ्यांची - समाजमाध्यमांच्या कृपेने - प्रचंड असल्याने असे करण्यात आले असावे.)

आधी काही काळापूर्वी 'आदिपुरुष' आणि नंतर 'पठाण' या चित्रपटांबाबतही या लोकांनी त्यांच्या ठराविक धाटणीने, भावना दुखावल्याचा कल्ला करून दहशत माजवली होती. पण रसिकांनी त्यांना दाद दिली नाही. एक तर त्यांना आपले आवडते कलाकार पाहायचे होते आणि केवळ नेट वा मोबाईलवर ठराविक साच्याचे चित्रपट पाहून ते कंटाळले होते. त्यामुळे बहिष्काराच्या आवाहनाकडे, धाकदपटशांकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि या चित्रपटांना गर्दी केली. आणि त्यामुळे साक्षात स्वघोषित विश्वगुरूंनी शिफारस केलेल्या आणि त्यामुळे अनेक राज्य सरकारांनी करमाफ केलेल्या आणि नेत्यांनी मोफत दाखवलेल्या एकतर्फीच आणि उघडउघड प्रॉपगंडा करणाऱ्या चित्रपटाच्या कमाईलाही 'पठाण'ने मागे टाकले. कोणत्या रंगाने कुणाच्या भावना कशाने दुखावतात, याकडे प्रेक्षकांनी लक्षच दिले नाही, उलट आपल्याला आवडणारे काहीतरी पाहायला मिळतेय म्हणून आणि काही प्रमाणात या झुंडशाहीला आपणही विरोध करू शकतो, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी या चित्रपटांना गर्दी केली. या मागेही थोड्याफार प्रमाणात ही भावना असणारच. या लोकांच्या अमानुष झुंडशाहीला ही सणसणीत चपराकच होती / आहे.

त्यातच ‘पठाण’ने तर प्रेक्षकांना जुन्या काळच्या चित्रपटांतील - देशातील बंधुभाव, ऐक्य, प्रेम वगैरेंची आठवण करून दिली असणार. नाहीतरी राहुल गांधींनी 'भारत जोडो' यात्रेत सांगितलेच आहे की, 'नफरत की बाजारमें हमने प्रेमकी दुकान खोली है।' प्रेक्षकांनाही त्याचे महत्त्व कळले आहे. प्रेमाच्या दुकानातील गर्दी वाढते आहे, वाढतच जाणार आहे. म्हणूनच दीर्घकाळ या ना त्या कारणाने लक्ष्य केल्या गेलेल्या शाहरुख खानला दीर्घकाळानंतर मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली. तसे पाहिले तर हा चित्रपटही काही अगदी क्लासिक वगैरे नाही. तो बॉलीवूड पठडीतलाच नेहमीचा मसालापट आहे आणि त्यामुळे त्यातही नायकाचा विजयच होतो.

यातील भारताच्या ‘रॉ’ या गुप्तहेर संघटनेच्या नायकाला पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेची - अर्थातच मुस्लिम - नायिका एका प्रसंगात त्याचा धर्म विचारते, तेव्हा तो स्पष्टच सांगतो की, 'मी फक्त भारतीय आहे'. हे त्याचे उत्तर प्रेक्षकांना प्रचंड भावते आहे. कारण अशा प्रकारे धर्म विचारून, किंवा केवळ संशयावरूनच निरपराध्यांवर केलेले अन्याय आपल्याच देशातील प्रेक्षकांनी पाहिले-वाचले आहेत. ते परधर्मीयांवर आणि आपल्याच समाजातील ठराविक घटकांवर करण्यात आले आहेत. ते सारे कुठेतरी प्रेक्षकांना अस्वस्थ करणारेच असणार. आणि त्यामुळेच ‘पठाण’मधील नायकाचे हे उत्तर ऐकताच ते टाळ्या देऊन त्याला दाद देत आहेत.

आणि यावर कळस चढवला आहे, शाहरुख खानने. एका कार्यक्रमात तो म्हणाला की, नायिका दीपिका पडुकोण, मी आणि खलनायक जॉन अब्राहम हे खरेखुरे अमर, अकबर आणि अ‍ॅन्थनी आहोत. आमच्यातील दीपिका अमर (हिंदू), मी अकबर (मुस्लिम) आणि जॉन हा अ‍ॅन्थनी (ख्रिश्चन) आहे. त्याच्या या बोलण्याचा संदर्भ होता काही वर्षांपूर्वीच्या मनमोहन देसाई यांच्या ‘अमर अकबर अ‍ॅन्थनी’ या जबरदस्त लोकप्रिय, प्रचंड यशस्वी होऊन भरघोस कमाई करणाऱ्या आणि आजही आठवणीत असलेल्या या चित्रपटाचा. या चित्रपटात तीन सख्खे भाऊ (अमिताभ, ऋषी कपूर, विनोद) वेगवेगळ्या धर्माच्या तीन पालकांकडे वाढतात  आणि अन्यायाविरुद्ध लढून यशस्वी होता आणि म्हणतात 'होनी को अनहोनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर अकबर अ‍ॅन्थनी'..

प्रेक्षकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाही आज असाच भारत हवा आहे आणि त्यासाठी आता तेही एकत्र येण्याची शक्यता दिसू लागली आहे. ज्यावेळी देशावर सावट येते तेव्हा सगळे खरेखुरे देशप्रेमी एकत्र येणारच, यायलाच हवेत!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com 
(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)

Tags: Erich Maria Remarque Germany Nazi Hitler Load More Tags

Comments:

डॉ अनिल खांडेकर

श्री आ.श्री. केतकर यांचा लेख अप्रतिम आहे. त्यांनी केवळ एका लेखाचा अनुवाद केला नाही ... तर त्या लेखाची , पुस्तका ची आणि चित्रपटाची पार्श्वभूमी दाखवून दिली आहे. आज आपल्या देशातील परीस्थिती शी असलेलं नातं .. सुसंगती त्यांनी दाखवून दिली आहे. घटनाकारांनी आणि स्वातंत्र्यवीरांनी अशा प्रकारच्या सामाजिक, राजकीय सांस्कृतिक वातावरणाची कल्पना पण केली नसेल... वेदनादायी आहे.

Add Comment

संबंधित लेख