गांधी विरुद्ध लेनिन: त्यांच्या काळात आणि आपल्या काळात

युनायटेड किंगडममध्ये 1932 ते 1943 या काळात इव्हान मॅस्की हा सोव्हिएत रशियाचा राजदूत म्हणून काम करत होता. त्याची डायरी नुकतीच माझ्या वाचनात आली. इतिहास आणि भाषारचनाशास्त्र (फिलोलॉजी) या क्षेत्रांचा गाढा अभ्यास असलेला मॅस्की, इंग्लिश अतिशय चांगल्या प्रकारे बोलत असे. त्या काळातील अनेक प्रभावशाली ब्रिटिश व्यक्तींबरोबरदेखील त्याचे चांगले संबंध होते. हिटलर आणि स्टॅलीन यांच्या सत्ताकाळात मॅस्की ‘कोर्ट ऑफ सेंट जेम्स’ (राजदूतांना अधिकृतरित्या सनद देण्याचे ब्रिटनच्या राज्यकारभारतील ठिकाण) इथे होता. सोव्हिएत-नाझी करार, नंतर या कराराचे उल्लंघन आणि दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीचा भयाण हिंसेचा काळ, या कठीण प्रसंगी मॅस्की एका अतिशय महत्त्वाच्या पदावर कार्यरत होता.

गॅब्रिएल गोरोडेत्स्की या इस्रायली अभ्यासकाने मॅस्कीची डायरी प्रकाशनासाठी संपादित केलेली आहे. साहजिकच या डायरीचा मुख्य भर ब्रिटिश आणि युरोपियन घटना आणि व्यक्तिमत्त्वांवर आहे. परंतु तिच्या 12 नंबरच्या पानावर एक अतिशय उद्बोधक आणि रंजक संदर्भ दिला आहे. 1934मध्ये गांधींनी काही काळासाठी काँग्रेस पक्षापासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. ही बातमी 4 नोव्हेंबर 1934 या दिवशी मॅस्कीच्या कानी पडली. त्या दिवसाची डायरीत नोंद करताना, या सोव्हिएत रशियाच्या राजदूताने लिहिले: 
‘गांधी! माझ्याकडे 1927मध्ये व्हिएन्ना येथून प्रकाशित फुलोप मिलर यांचे ‘लेनिन आणि गांधी’ हे पुस्तक आहे. त्यात लेखकाने या दोन्ही नेत्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय कौशल्याने लिहिले आहे. त्या दोघांची तुलना 'त्यांच्या काळातील यशाची दोन अत्युच्च शिखरे’ अशा शब्दांत केली आहे. सात वर्षांपूर्वीपर्यंत गांधी आणि लेनिन यांची तुलना फक्त कम्युनिस्टांनाच (आणि काही प्रमाणात तीक्ष्ण बुद्धीच्या बुर्झ्वा-भांडवलदारी वर्गाच्या प्रतिनिधींना) अश्लाघ्य-अप्रस्तुत वाटत होती. पण आता? आता तर बुर्झ्वा-भांडवलदारी वर्गाचे विचारवंतदेखील गांधी आणि लेनिन यांना समान लेखण्याची जोखीम घेणार नाहीत. इतकेच नव्हे तर आता प्रत्येक सामान्य माणसाला आणि त्याच बरोबर लेनिनच्या शत्रूंना देखील याची कल्पना आहे की लेनिन म्हणजे मानवतेच्या हजार वर्षांच्या इतिहासातील दिशादर्शन करणारा एक तेजस्वी बिंदू (मॉँट ब्लँक) आहे. या उलट गांधी तर फक्त पोकळ ढिगाऱ्यावर उभी ठाकलेली व्यक्ती आहे, जी खोट्या प्रसिद्धीच्या जोरावर अवघ्या दहा-एक वर्षांसाठी चमकेल आणि लागलीच त्याच वेगाने इतिहासाच्या अडगळीत झाकोळली जाईल. काळ आणि घटना ही अशी तत्त्वे आहेत, जी याचप्रकारे अस्सल हिऱ्यांची पारख करतात आणि नकला करणाऱ्या विदूषकांना विलग करतात.’

मॅस्की हा लेनिनने स्थापित केलेल्या सोव्हिएत संघ राज्याचा एक कट्टर आणि निष्ठावंत सेवक होता. त्यामुळे त्याने गांधींच्या तुलनेत लेनिनची भलावण करणे साहजिकच होते. परंतु मॅस्कीने आपल्या डायरीत लेनिनची प्रशंसा  करणारी  टिप्पणी लिहिण्याच्या 13 वर्षे अगोदर, एका भारतीय तरुणाने देखील गांधी आणि लेनिन यांची तुलना केली होती. आणि त्यात त्याने लेनिनला झुकते माप देत, त्याची उत्कट प्रशंसा करणारा निबंध लिहिला होता. प्रस्तुत निबंध लिहिणाऱ्या बॉम्बेच्या या तरुणाचे नाव होते - श्रीपाद अमृत डांगे. खरे तर मॅस्कीप्रमाणे डांगे काही सोव्हिएत संघराज्याचे सेवक नव्हते किंवा लेनिनविषयी आस्था असण्याचे त्यांना इतर कोणतेही कारण नव्हते. 1921मध्ये डांगेंनी ‘गांधी विरुद्ध लेनिन’ ही छोटी पुस्तिका प्रकाशित केली. या पुस्तिकेत डांगे मिमांसा करतात की, वैयक्तिक प्रामाणिकपणा सोडला तर गांधी मुळातच एक प्रतिक्रियावादी आणि प्रतिगामी विचारसरणीची व्यक्ती होती. त्याचबरोबर ते धर्म आणि वैयक्तिक विवेकवादात गुरफटलेले होते. या उलट लेनिनने आर्थिक शोषणाची अचूक उकल केली होती. इतकेच नव्हे तर हे आर्थिक शोषण संपवण्यासाठी सामुदायिक ठोस कृती करण्याचा प्रयत्न देखील केला होता. एकीकडे गांधींची दृष्टी गौरवशाली भूतकाळ पुन्हा उभा करण्याकडे होती.  लेनिन मात्र आधुनिक संस्कृतीच्या ‘वर्तमान आणि उदात्त उपलब्धींना’ अबाधित राखून त्यावर श्रमिक वर्गाच्या एकीच्या बळावर समाजाची क्रांतिकारी नवबांधणी करू पाहत होता. डांगे ना कधी सोव्हिएत रशियाला गेले होते, ना त्यांनी तिथल्या नेत्यांना कधी पहिले होते. आणि तरी सुद्धा ते ठामपणे सांगू शकले की, बोल्शेव्हिकांनी रशियनांना दिलेले- ‘जमीन, अन्न आणि शांती'चे आश्वासन पूर्ण केले आहे.

यानंतर सहा वर्षांनी ब्रिटिश संसदेतील कम्युनिस्ट खासदार शापूरजी दोराबजी साकलतवालांनी गांधींना एक ‘खुले पत्र’ लिहिले. ते स्वतः भारतातच जन्मले आणि वाढले होते. या पत्रात त्यांनी महात्मा गांधींवर ‘चुकीच्या भावनाविवशतेत’ गुरफटल्याचा आरोप केला. चरखा चळवळीद्वारे गांधींनी  ‘यंत्रशक्तीवर, भौतिक विज्ञानावर आणि भौतिक प्रगतीवर’ हल्ला चढवला असाही आरोप त्यांनी केला. साकलतवालांनी गांधींची तुलना केमाल अतातुर्क, सन-यत्-सेन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लेनिनबरोबर केली होती. आणि या सर्व तुलनांमध्ये त्यांनी गांधींना या इतर व्यक्तिमत्त्वांपेक्षा सामान्यच मानले होते. याही पुढे जाऊन या कम्युनिस्ट नेत्याने असा दावा केला की,  या इतर नेत्यांनी सामान्य जनेतेचा दबलेला आवाज अतिशय धैर्याने आणि निर्भयतेने मांडला होता. तर दुसरीकडे गांधींनी भारतीयांमध्ये लाळघोटी आज्ञाधारकता आणि जगात जनसामान्यांच्या तुलनेत काहींचे श्रेष्ठत्व मान्य करण्याचा चुकीचा समज भिनवला होता.

साकलतवाला यांचे ‘खुले पत्र’ 1927 मध्ये प्रसिद्ध झाले. दोन वर्षांनंतर हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या भगत सिंग यांचे या विवादात आगमन झाले. केंद्रीय सभागृहात बॉम्ब फेकल्यानंतर त्यांना अटक  करण्यात आली होती. आपल्या अटकेनंतर दिलेल्या निवेदनात त्यांनी दावा केला की, ‘ही कृती आदर्शवादी (युटोपियन) अहिंसेच्या युगाचा अस्त अधोरेखित करणारी आहे’. पुढे ते म्हणतात, ‘अहिंसेच्या तत्वाच्या निरर्थकतेबाबत नव्या पिढीला आता यत्किंचितही शंका राहिलेली नाही.’  लाहोरच्या या क्रांतिकारी तरुणाने गांधींपासून पाठ फिरवून लेनिनच्या हिंसक क्रांतीचा मार्ग स्वीकारण्याचा आग्रह भारतीयांना केला.

सोव्हिएत राजदूत इव्हान मॅस्कीप्रमाणेच  1920 आणि 1930च्या दशकातील भारतातील कम्युनिस्ट लेनिनची भक्ती आणि गांधींचा तिरस्कार करत होते. या कम्युनिस्टांना आपल्या  प्राचीन, जुनाट-कालबाह्य झालेल्या समाजाला अनिश्चितेच्या गर्तेतून बाहेर काढून आधुनिक जगात आणण्यासाठी गांधींच्या गूढ प्रतिभेपेक्षा, या विद्वान बोल्शेव्हिक नेत्याचा मार्ग अधिक आकर्षक आणि योग्य वाटत होता. आणि त्यामुळेच साकलतवाला यांनी असा दावा केला होता की, लेनिनच्या रशियाने अवघ्या मानवतेला योग्य मार्ग दाखवला होता. त्यांचा या गोष्टीवर जोर होता की, ‘वर्गीय संघर्ष अटळ आहे आणि हा तोपर्यंत अटळ आहे, जोपर्यंत येणाऱ्या मनुष्य पिढ्या हा संघर्ष यशस्वीपणे नष्ट करणार नाहीत.’ त्याचबरोबर ‘अहिंसेचा मार्ग सोडून कम्युनिस्टांच्या संगतीने कामगार, शेतकरी आणि तरुणांचे संघटन करण्याचा आणि आपली तात्विक भावनिकता सोडून एक निश्चित हेतू, सुस्पष्ट उद्दीष्टे आणि ते प्राप्त करण्याचे मार्ग यांची योग्य आखणी करून संपूर्ण मानवतेला यशस्वी करण्याचा’ सल्ला देखील त्यांनी यावेळी गांधींना दिला.

पुढे गोष्टी उलगडत गेल्या. स्टॅलिन या लेनिनच्या उत्तराधिकाऱ्याने कामगार, शेतकरी आणि अनेक तरुणांचा निर्दयतेने छळ केला. 1930च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत सोव्हिएत क्रांती ही राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या एक डिस्टोपियन, भ्रमित अरिष्ट बनलेली आहे, याची कल्पना तर्कसंगत निरीक्षण करणाऱ्यांना आली होती. परंतु यानंतरदेखील पाश्चिमात्त्य जगातील विशिष्ट उदारमतवादी विचारवंतामध्ये, रशियन क्रांतीच्या जनककर्त्याविषयी एक गूढ भावनिकता अनेक वर्षांपर्यंत टिकून होती. 'संडे टाईम्स ऑफ लंडन'च्या जानेवारी 1972च्या अंकात प्रसिद्ध झालेला व तेव्हाच्या प्रसिद्ध साहित्य समीक्षक सिरील कॉनोली यांनी लिहिलेला एक निबंध  नुकताच माझ्या वाचनात आला. त्या निबंधात गांधी आणि लेनिन यांच्यावर आलेल्या नवीन पुस्तकांची एकत्रितपणे समीक्षा केलेली आहे. या दोघांच्या श्रेष्ठत्वामध्ये तुलना होऊ शकते, कारण ‘या दोघांनी जगातील दोन महान राष्ट्रांना विशिष्ट दिशा दाखवून जगाच्या इतिहासाला कलाटणी दिली’, असे कॉनोली म्हणतात. दोघांमध्ये लेनिन अधिक श्रेष्ठ होता, याविषयी या इंग्लिश सद्गृहस्थांना तिळमात्र शंका नव्हती. बोल्शेव्हिक नेत्याच्या अकाली मृत्युविषयी कॉनोली यांनी लिहिले: ‘गांधींप्रमाणे लेनिनला दीर्घायुष्य लाभले असते तर कदाचित स्टॅलिनचा देखील उदय झाला नसता; परंतु लेनिन ह्यात असता तर काय हिटलरचा उदय झाला असता?’ याविषयी कॉनोलीचे असे मत होते की, लेनिनने आपल्या इच्छाशक्ती आणि आपल्या विचारधारेच्या बळावर हिटलरचा आणि नाझी विचारसरणीचा उदय नक्कीच रोखला असता.

डांगेंप्रमाणे कॉनोली यांनादेखील गांधींच्या व्यक्तिगत सभ्यतेविषयी आदरच होता; गांधींच्या मृत्यनंतर जॉर्ज ऑर्वेलने लिहिलेले प्रसिद्ध वाक्य त्यांनी इथे उद्धृत केले- ‘फक्त एक राजकारणी म्हणून गृहीत धरले गेलेल्या आणि त्या काळच्या प्रसिद्ध राजकारण्यांशी तुलना झालेल्या गांधींनी आपल्या मागे एक विलक्षण वारसा सोडला आहे.’ परंतु, आधुनिक जगासाठी गांधींपेक्षा लेनिनचा वारसा अधिक महत्त्वाचा आणि अधिक प्रासंगिक होता असे डांगेंप्रमाणेच कॉनोली यांचे ठाम मत होते. पुस्तक समीक्षेच्या या निबंधाचा शेवट करताना कॉनोली यांनी लिहिले: ‘लेनिनच्या वारश्याचा एक सैद्धांतिक घटक हा कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्याचा होता. आणि याच्या अगदी उलट गांधींचा वारसा हा तडजोडींनी परिपूर्ण होता. परंतु आपण घाम गाळत कारखान्यात काबाडकष्ट करणारा कामगार असू तर आपण आपल्या मागण्या, इच्छा लेनिनच्या हाती सुपूर्द करणे पसंत करणार नाही का?’

ही वाक्ये 1972 मध्ये लिहिली गेली होती. तोपर्यंत लेनिनच्या रशियातील कामगारांना मागील पंचावन्न वर्षात कुठलेच हक्क मिळाले नव्हते. तर या उलट गांधींच्या भारतात कामगारांना अधिक वेतन आणि कामाच्या जागी चांगल्या सुविधांची मागणी करण्याकरिता किमान संपावर जाण्याचा अधिकार मिळाला होता. आणि आश्चर्याची बाब म्हणजे डांगे किंवा मॅस्कीप्रमाणे कॉनोली काही कम्युनिस्ट पक्षाने पोसलेले कार्यकर्ते नव्हते; उलट कॉनोली स्वतः एक उच्चवर्गीय ब्रिटिश उदारमतवादी विचारवंत होते, जे चांगले खाद्य आणि उत्कृष्ट वाईन पिण्याचे शौकीन होते. कॉनोली लेनिनच्या रशियात असते तर लेनिनवादी विचारसरणीचा पहिला बळी त्यांचाच जाण्याची दाट शक्यता होती. (योगायोगाने लेनिन देखील चांगले खाद्य आणि उत्कृष्ट वाईनचा चाहता होता. गांधी हा कथित बुर्झ्वा प्रतिक्रियावादी व्यक्तीचे राहणीमान  एका सामान्य कामगार किंवा शेतकरी समान आहे तर या उलट सोव्हियत रशियातील सत्ताधारी कम्युनिस्ट नेते त्यांच्या पूर्वी सत्तेत राहिलेल्या झार राजांच्या प्रमाणे विलासी जीवन उपभोगत होते, असा विरोधाभासी तर्क भारतीय कम्युनिस्टांकडून मांडला गेला.)

गांधींचा जन्म ऑक्टोबर 1869 मधील, तर लेनिनचा जन्म त्यांच्या जन्मानंतर सहा महिन्यांनी झाला होता. दोघेही जवळपास समकालीन होते आणि म्हणूनच दोघांची वारंवार तुलना केली गेली. दुसरे (आणि अधिक महत्त्वाचे) कारण म्हणजे, हे दोघेही मानव सभ्यतेचा संपन्न ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दोन विशाल राष्ट्रांचे प्रमुख पुढारी होते आणि ही राष्ट्रे आपल्यावरील राजकीय शोषणाचे आणि कुंठलेल्या अर्थव्यवस्थेचे जोखड झुगारून देऊ इच्छित होते.

भारताने (आणि जगाने) नुकतीच गांधींची 150वी जयंती साजरी केली. या वेळी गांधींची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली गेली. यातील काही स्तुतिसुमने अतिशय प्रामाणिक आहेत तर काही उथळ तऱ्हेवाईक आहेत. त्यांच्या वारश्याचे सिंहावलोकन करताना बरीचशी टीकादेखील झालेली आहे. आणि त्यामुळेच रशिया (आणि जग) लेनिनची 150वी जयंती कशा प्रकारे साजरी करेल, हे पाहणे रंजक राहील. परंतु एकूणच विद्वान अभ्यासकांमध्ये आणि सामान्य जनेतेतही गांधींचा मरणोत्तर जागतिक लौकिक हा लेनिनपेक्षा सरसच आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. अर्थातच इव्हान मॅस्कीच्या मताशी असहमत राहून असे म्हणावे लागेल की, अहिंसा आणि आंतरधर्मीय एकोप्याचा पुरस्कार करणारे गांधी हे 2019मध्ये हिंसक शस्त्रक्रांती आणि वर्गीय द्वेषभावनेचा पुरस्कार करणाऱ्या लेनिनपेक्षा नैतिक आणि राजकीयदृष्ट्या अधिक अनुकरणीय वाटतात; किंवा मॅस्कीच्याच शब्दात सांगायचे झाल्यास गांधी म्हणजे- ‘मानवतेच्या हजार वर्षांच्या इतिहासातील दिशा दर्शन करणारा एक तेजस्वी बिंदू आहे.’

(अनुवाद: साजिद इनामदार)
 - रामचंद्र गुहा, बेंगळूरू

Tags: gandhi lenin गांधी लेनिन रामचंद्र गुहा Load More Tags

Comments:

अभिजीत ढोले पाटील रा .धुमेगव ता .गेवराई जि .बीड .

अगदी बरोबर मत मांडले करणं जग हे अण्व्स्रधरी मूळ गांधीवाद च जगाला तारु शकतो .

Add Comment