8 जुलै हा कविवर्य बा. भ. बोरकरांचा स्मृतिदिन. त्यांनी लौकिक जगाचा निरोप घेऊनही तीन तपे ओलांडली. पण त्यांच्या कवितेविषयीचे रसिकांच्या मनातील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. त्यांची कविता चिरस्मरणीय ठरली, याचे कारण म्हणजे ते रवींद्रनाथांप्रमाणे जीवनसौंदर्याचे निस्सीम उपासक होते.
प्रत्येक कवी हा थोड्या फार फरकाने आनंदयात्रिकच असतो. पण बोरकरांच्या कवितेतील रसधुंद वृत्ती, सौंदर्याचे विभ्रम सुकुमार शब्दकळेत पकडण्याची अंतर्दृष्टी, जीवनेच्छेतील उत्कटता, उत्फुल्लता आणि चैतन्यशीलता पाहिली, की ही संज्ञा बोरकरांना चपखलपणे लागू पडते.
निसर्गानुभूतीशी तन्मय होऊन तिचे रूपांतर स्वप्नकळेत करणारा त्यांच्यासारखा कवी विरळाच. कवितारती हाच त्यांच्या कवितेचा मर्मबंध. त्याहून अन्य लौकिक सुखे त्यांनी नाकारली. कवितासखीच्या नित्य सहवासात ते सुखावले. निरंतर अलौकिक अनुभूतीच्या शोधात ते मग्न राहिले. अनुरक्ती आणि विरक्ती यांत त्यांनी एकात्म भाव पाहिला. त्यामुळे त्यांच्या दोन्हीही प्रवृत्तींच्या कविता सारख्याच आस्वाद्य वाटतात. या बाबतीत भारतीय जीवनधारेतील सत्त्वशीलता त्यांनी शोधली असेच म्हणावे लागेल. आयुष्याचा अंतिम टप्पा सोडला, तर कविता त्यांच्यावर सदैव प्रसन्न राहिली. ‘जीवन त्यांना कळले हो’ हे त्यांच्याच कवितेतील बोल हे त्यांनाच लागू पडणारे आहेत.
जीवनातील वास्तव त्यांना छळत नव्हते, अशातला भाग नाही. जीवनात सारी घाण अन् सारा चिखलच आहे, याची त्यांना पुरेपूर जाणीव होतीच; पण जीवनसौंदर्याचे कमळ त्यांना गुणगंधाचा नवा उखाणा नित्य घालत राहिले. त्यामुळे स्वप्नकळेचे सौष्ठव असलेली, रूप-रस-गंध-नाद-स्पर्शमय संवेदनाविश्वाला जाग आणणारी कविता ते लिहीत राहिले. कवितेबरोबर ते बहरत गेले. सृजनशील आत्मा आणि सृजन यांची अशी जिवाशिवाची अभिन्न भेट असते. प्रतिभावंताच्या जीवनातील तो भाग्ययोग असतो. आणखी एक नाते निर्माण झाले ते रसिकमनाचे.
विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकापासूनच त्यांच्या कवितेची मोहिनी रसिकांवर पडली, ती कायमचीच. निसर्गाची उत्कट चित्रलिपी त्यांनी समरसतेने रेखाटली. मानवी भावभावनांचे, आशा-आकांक्षांचे, वृत्तिप्रवृत्तींचे, विजिगीषू वृत्तीचे, रसकल्लोळांचे चित्रण त्यांनी चिंतनगर्भ शैलीत केले. ऐन तारुण्यात गोमंतकीयांच्या स्वातंत्र्याकांक्षेचा आत्मस्वर तितक्याच उत्कटतेने व्यक्त केला.
बोरकर काव्यपरंपरेतील आचार्यकुल पाळणारे होते, म्हणून प्रारंभीच्या पाऊलवाटेवरून वाटचाल करताना भा. रा. तांबे यांनी घालून दिलेली मळवाट त्यांनी स्वीकारली. पण तिथेच ते थांबले नाहीत. जाणिवेचे क्षितिज विस्तारत राहिले. त्यांनी अंत:प्रेरणेला प्रमाण मानले. त्यांच्या कवितेतील लय आणि लावण्य मनाला आल्हाद देणारे. मराठी काव्यविश्वाचे ते देदीप्यमान लेणे ठरले.
कवितेशिवाय कादंबरी, कथा, ललितनिबंध, चरित्र, संस्मरणे आणि अनुवाद आदी वाङ्मयाच्या अनेकविध दालनांत त्यांनी आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली. वाङ्मयाकडे पाहण्याची रसिक आणि चोखंदळ वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. याचे एक कारण म्हणजे बालपणात त्यांच्या घरी आणि भोवतालच्या परिसराचे त्यांच्यावर झालेले श्रवणभक्तीचे संस्कार. तारुण्याच्या ऐन नव्हाळीत पाश्चात्त्य आणि पौर्वात्य साहित्याचे त्यांनी परिशीलन केले. दोना प्रॉपर्सिय कुरैय आफोंसु ई फिगरेदु या व्युत्पन्न आणि रसज्ञ विदुषीचे मार्गदर्शन बोरकरांना लाभले. त्यामुळे पोर्तुगीज व फ्रेंच कवितेचा अभ्यास त्यांना करता आला. प्रो. रामचंद्र शंकर नायक यांची मर्मज्ञता आणि रसज्ञता त्यांच्या बुद्धिविकासास कारणीभूत ठरली.
संवेदनक्षम वयात त्यांचे समवयस्क मित्र कविवर्य दामोदर अच्युत कारे यांचा त्यांना लाभलेला सहवास म्हणजे आनंदनिधानच होय. यासंबंधीचे किती तरी तपशील सांगता येतील. त्यांनी केशवसुत, बी, ना. वा. टिळक, विनायक, बालकवी आणि गोविंदाग्रज या आधुनिक कविकुलातील महत्त्वाच्या कवींच्या कविता एकत्रित वाचल्या. त्यामुळे त्यांच्या कवित्वशक्तीचा विकास झाला. संस्कारबहुलत्व हे बोरकरांच्या प्रतिभेचे व्यवच्छेदक लक्षण. लोकमान्य टिळकांचा मृत्यू आणि भारताच्या राजकीय क्षितिजावर महात्मा गांधींचा झालेला उदय या घटनांचा परिणाम त्यांच्यावर संवेदनक्षम वयात झाला आणि त्यांच्या मनाच्या कक्षा रुंदावल्या.
चित्र, संगीतादी कलांचा संस्कार बोरकरांवर याच काळात झाला. वडिलांच्या चित्रकलेच्या आणि चित्रसंग्रहाच्या छंदामुळे रंग-रेषांच्या विश्वाचा त्यांना परिचय घडला. या चित्रसंग्रहातील राजा रविवर्मा यांच्या चित्रांमुळे त्यांना पुराणकथांचे संदर्भ समजावून घेता आले. बोरकरांच्या घरात सात पिढ्यांपासून संतवाङ्मयाचे वाचन-पठण चालत असे. ‘रामविजय’, ‘हरिविजय’, ‘पांडवप्रताप’, ‘दासबोध’, ‘आर्याभारत’ व ‘भक्तिविजय’ अशा किती तरी ग्रंथांचेही पठण त्यांच्याकडे होत असे. त्याचा परिणाम असा झाला की, छंद, स्वर, ताल आणि शब्द यांची संथा त्यांना सहजगत्या मिळत गेली. बोरकरांनी त्या दिवसांची संस्मरणे जागवली आहेत :
‘‘एखादा श्रुतिसुभग किंवा अर्थगर्भ शब्द कानावर पडला की, तो उन्हातल्या लोलकासारखा माझ्या डोळ्यांपुढे डोलू लागे आणि त्यातून अर्थाच्या आणि नादाच्या रंगछटा ओसंडू लागत.’’ (एका पिढीचे आत्मकथन : वा. रा. ढवळे गौरवग्रंथ, संपा. पु. शि. रेगे आणि इतर, मुंबई मराठी साहित्य संघ प्रकाशन, मुंबई, 1975)
बोरकरांच्या प्रतिभाशक्तीवर महाभारताचा प्रगाढ संस्कार झाला. ‘ज्ञानेश्वरी’चा अमिट संस्कार त्यांच्या मनावर झाला. आपल्या काव्यवृत्तीला आधुनिकतेचे पहिले वळण तिनेच दिले, असे त्यांना वाटते. तुकारामांचे अभिव्यक्तिसौंदर्य त्यांना प्रिय होते. त्यांच्याविषयीचे ऋण त्यांनी मुक्त मनाने व्यक्त केले आहे. कालिदास आणि रवींद्रनाथ हे त्यांचे अत्यंत आवडते कवी. ‘मेघदूत’चा त्यांनी केलेला अनुवाद आणि रवींद्रनाथांवरील ‘आनंदयात्री रवींद्रनाथ’ हे चरित्र याच ममत्वाचे प्रतीक आहे. बालकवींची ‘कोमलकांतपदावली’ त्यांची चित्तवृत्ती प्रसन्न करीत असे. अरविंद घोषांचे व्यक्तिमत्त्व त्यांना प्रिय होते.
बोरकरांनी आपल्या दैवदत्त गुणांचा विकास वाचनाने, चिंतनाने, मननाने आणि निदिध्यासाने केला. उत्कट संवेदनशीलता, तल्लख स्मरणशक्ती, व्युत्पन्नता, श्रुतयोजनकौशल्य आणि सूक्ष्म अवलोकनशक्ती या गुणविशेषांमुळे त्यांच्या कवित्वशक्तीचे पोषण झाले.
बोरकरांच्या संवेदनागर्भ शब्दकळेने निसर्गरंग उत्कटतेने आणि तन्मयतेने टिपले. निसर्गलयीशी साधलेली एकतानता हा बोरकरांच्या प्रतिमासृष्टीचा गुणविशेष. निसर्गानुभूतीच्या साहचर्याने प्रेमानुभूतीचेही प्रकटीकरण ते करतात. या प्रतिमाविश्वात पौराणिक संदर्भ विपुल प्रमाणात येतात. अभिजात गुणांनी त्यांची कविता मंडित झालेली आहे. पर्जन्याच्या उत्सवाची विविध विलसिते त्यांच्या कवितेत आढळतात. पर्जन्यसूक्ते लिहिताना पावसाचीच बेहोशी ते अनुभवतात. उदाहरणार्थ, ‘झाले हवेचेच दही’ या कवितेत चेतनगुणोक्तीच्या सहाय्याने पावसाळी वातावरणाचे चित्र ते हुबेहूब रेखाटतात :
आज जगाचे गोकुळ आज यमुना पांढरी
आणि कालियाच्या उरी घुमे कृष्णाची बासरी
स्वैर चुकूनिया वाटा खुळ्या हंबरती दिशा
भोवळून धारानृत्यीं वेळा झाल्या वेड्यापिशा
‘क्षितिजीं आलें भरतें गं’ या कवितेत धरित्रीच्या अंतर्यामीची प्रीतिभावना साकार झाल्याची अनुभूती कविमनाला जाणवते. तिच्या या नवथर भावनेची कोवळीक व्यक्त करताना कवी उद्गारतो :
लाजण झाली धरती ग
साजण काठावरती ग
उन्हात पान
मनांत गान
ओलावून थरथरतें ग
‘सरिंवर सरी आल्या ग’ ही बोरकरांची सर्वतोमुखी झालेली पर्जन्यविषयक कविता. या कवितेत कवी गोकुळातील रासक्रीडेचे चित्र साकार करतो. रूप-नाद-स्पर्श या संवेदनांचा गोफ येथे विणलेला आहे. नृत्यलयीत कोसळणाऱ्या पावसाच्या सरींचा दृश्य परिणाम येथे साधला जातो :
गोपी झाल्या भिजून चिंब
थरथर कांपति निंब-कदंब
घनमनांतुन टाळ-मृदंग
तनूंत वाजवि चाळ अनंग
‘झाडें झालीं निळीं निळीं’ या कवितेतील आशय संस्कृतिसंदर्भांनी नटलेला आहे. तरीही तो सांकेतिक वाटत नाही. रूपसंवेदनेचे नितांत मनोहर रूप येथे साकार झाले आहे.
झाडें झालीं निळीं निळीं करांगुळीं गोवर्धन
धुंद आकाशच झालें मंद अस्मानी पर्जन्य
जागोजाग पांगुळलें काळें कालिंदीचें पाणी
अंधाराच्या कालियाचे त्यांत चमकले मणी
‘खिडक्यांवर वाजे वारा’ या कवितेत पावसाळ्यातील निसर्गचित्रे रेखाटली आहेत, त्याचप्रमाणे त्या रमणीय पार्श्वभूमीवर प्रेयसीला शृंगारासाठी आवाहन केले आहे. खोडांतून भास फुटलेले आहेत... दगडातून श्वास सुटलेले आहेत... रजतसराच्या धारा वाहत आहेत... मातीतून पाणी खिदळत आहे... पाण्यातून गाणी फुटत आहेत... गाण्यात चारा हिरवळतो... हा निसर्ग सतेज, चैतन्यशील आणि नवयौवनाला जाग आणणारा... म्हणून कवितेतील नायक उद्गारतो:
प्राणांत नवीनच ज्योती
पावळीत झालर मोती
नवतोरण घरसंसारा ग
अचेतनाला चैतन्य प्राप्त करून देणारी प्रतिभा बोरकरांना लाभलेली होती. त्यामुळे त्यांनी अन्य ठिकाणी रेखाटलेली निसर्गचित्रे उल्लेखनीय आहेत. ‘कुळागर’, ‘पूजा’, ‘सांजवेळ’, ‘स्मृति’, ‘चित्रवीणा’, ‘मुशाफिरा’, ‘चांदण्यांचा पारिजात’ आणि ‘दूधसागरास’ अशा किती तरी कवितांकडे अंगुलिनिर्देश करता येईल. गोमंतकातील परिसराचे वैभव बोरकरांनी आपल्या समृद्ध शब्दकळेने सजविले आहे. ‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट’ असे या अभिव्यक्तीचे स्वरूप आहे. त्यांच्या शैलीतील लडिवाळपणा येथे प्रकट होतो.
कुळागर त्यांना प्रिय वाटते. येथील वृक्ष त्यांना सदोदित ताजे वाटतात. येथील निर्मळ जळ झुळूझुळू वाजत असते. येथे लडिवाळ उन्हाचा सावल्यांशी लपंडाव चालतो. ऋतूची पर्वणी साधून येथे दूर देशीची पाखरे येतात आणि गाता गाता जीव सूरांवर नेतात. कधी कधी पानांत लपून फुलांना साद घालतात. येथे कधी कधी सोनचाफ्याची फुले सांडतात. फणसांत लोण्याची मोहळे घमघमतात. आंब्यात संध्यारंग खुलतात. त्यावर खारीची मुखनक्षी उमललेली असते. वयरूपाचे भान न ठेवता गोरखतरूला कुणी नटरंगी वेल कवटाळते. निवडुंग असो वा अन्य कुठलेही झुडूप असो, त्यावर फुलपाखरे रूपेरी फेर धरून नाचतात. अशा या अपार आनंदाच्या क्षणी कवी उद्गारतो :
चांदण्यात बहरे लळा असा सगळ्यांचा
की लेकींचा हा दिवाळसण माहेरी
नमुन्यादाखल बोरकरांच्या एका निसर्गकवितेच्या रूपकळेचे केलेले हे वर्णन. पण त्यांच्या साऱ्याच निसर्गकवितांत कविमानसातील ओसंडून वाहणारी आनंदाची लय दिसते. त्यांनी प्रेमभावनेतील विविध विलसिते प्रकट करणाऱ्या कविता लिहिल्या. प्रेमानुभूतीतील शृंगारानुकूलता हा त्यांच्या प्रेमकवितेचा स्थायीभाव. पण त्याचबरोबर शारीर संवेदनांकडून मानसभाव प्रकट करणारी तिची शक्ती महत्त्वाची.
त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या भा. रा. तांबे यांच्याप्रमाणे तृप्त सहजीवनाच्या कविता त्यांनी लिहिल्या. ‘करि सुदंरी स्वरशृंगार’, ‘कशी तुज समजावुं सांग’, ‘येइ सखी’, ‘तुझी माझी रीत’, ‘सायुज्यमुक्ति’, ‘क्षणभंगुर जरि जीवन’, ‘जपानी रमलाची रात्र’, ‘प्रणयमुग्धेस’, ‘आपण दोघें लहरी ग’, ‘पाठमोरी पौर्णिमा’, ‘तुझे आगमन’, ‘धांवा ऐकून’, ‘घरांतले चांदणे’, ‘सखि ये गे’, ‘प्रीती तुझी’, ‘नको पाहुं वळून’, ‘उर्वशीच तू जाया’, ‘गृहलक्ष्मीस’, ‘स्पर्श’, ‘सजवुं कार्तिकमास’, ‘विरहुली’, ‘चांदण्यांत पारिजात माझ्या’, ‘तुझी हांक अंतरी’, ‘याच नव्या डोहाकांठी’, ‘तुझ्या रानात रे’, ‘गीत माझें गायलो मी’, ‘ती तुझी स्मितरेषा’, ‘जल-द तलावाकांठी’, ‘सांत्वन’ आणि ‘समुद्र बिलोरी ऐना’ अशा किती तरी प्रेमकवितांचा उल्लेख येथे करावा लागेल. अनेक विभ्रमांची ही कविता आहे. ऐन तारुण्यात त्यांनी प्रमत्त प्रतिभेचा आविष्कार केला. परिणत वयात त्यांची प्रेमकविता प्रगल्भ होत गेली. ‘कांचनसंध्या’ या कवितासंग्रहातील प्रेमकविता या संदर्भात अभ्यासण्यासारख्या आहेत.
त्यांची कविता अभ्यासत असताना त्यांच्या अनुरक्तीची कविता उत्कट की विरक्तीची अशी संभ्रमावस्था होते खरी! पण तसे वाटण्याचे काही एक कारण नाही. उत्कटता आणि मनस्वी वृत्ती हा ज्यांचा मनोधर्म आहे अशा बोरकरांच्या प्रतिभाधर्माच्या बाबतीत असे म्हणते येईल की, जीवनाच्या सम्यक पैलूंना स्पर्श करण्याचे सामर्थ्य त्यात होते.
‘रसलंपट मी / गोसावीपण मज भेटे’ असे म्हणणारा हा कवी घरातील कौटुंबिक जबाबदारी पेलत असताना 18 जून 1946 रोजी डॉ. राममनोहर लोहिया यांच्या हाकेला ओ देऊन शिक्षकाच्या नोकरीचा त्याग करून गोव्याच्या मुक्तिसंग्रामात उतरला. नखशिखान्त युरोपियन पेहरावात वावरणाऱ्या या तरुणाने साधा वेश परिधान केला. पुढे त्यांच्यावर महात्मा गांधींच्या तेज:पुंज व्यक्तिमत्त्वाचाही प्रभाव पडला.
‘जिणें गंगौघाचें पाणी’, ‘जीवन त्यांना कळलें हो’, ‘विझवून दीप सारे’, ‘तम:स्तोत्र’ आणि ‘बाष्पसमर्पण’ या कवितांतील अभिव्यक्तीत कृत्रिमतेचा लवलेश नाही. भारतीय परंपरेतील जीवनदृष्टीचा प्रभाव आणि संतवाङ्मयाचा सखोल संस्कार यांच्या समवायातून आलेले नवनीत त्यांच्या विरक्तीचा भाव व्यक्त करणाऱ्या कवितांत आढळते. खूप विस्ताराने हा विषय मांडता येण्यासारखा आहे. प्रबल जीवनेच्छा असलेल्या कविमनाची ही चिंतनशीलतेची मिती आहे.
सरतेशेवटी बोरकरांच्या एका अनोख्या पैलूकडे लक्ष वेधावेसे वाटले. भारतीयांच्या बहुभाषिकत्वाचा त्यांना अभिमान वाटत होता. त्यांना स्वत:ला मराठी, कोंकणी, हिंदी आणि पोर्तुगीज आदी भाषा उत्तमप्रकारे अवगत होत्या. संस्कृतचे औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी केलेला मेघदूतानुवाद ही आश्चर्य वाटण्याजोगी बाब आहे. त्याची प्रस्तावना लिहिताना प्रा. वसंत बापटांनी मुक्त कंठाने त्यांचा गौरव केला आहे. एका दीपोत्सवी संध्याकाळी आपले कविमित्र ग. दि. माडगूळकर यांच्याकडे ते पाच हिंदी कवितांचा उपहार घेऊन गेले.. माडगूळकरांनी ‘तीळ आणि तांदूळ’मध्ये ती संस्मरणे ग्रथित केली आहेत.
विविध सांस्कृतिक वैशिष्ट्ये जपणाऱ्या भारतीय साहित्यावरचे आणि साहित्यिकांविषयीचे बोरकरांचे प्रेम सर्वश्रुत आहे. कन्नड कवी डॉ. द. रा. बेंद्रे, गुजराती साहित्यिक डॉ. उमाशंकर जोशी, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, काकासाहेब कालेलकर, हरिवंशराय ‘बच्चन’, रामधारी सिंह ‘दिनकर’ आणि शिवमंगल सिंह ‘सुमन’ यांच्याविषयीचे त्यांचे ‘मैत्र’ पाहता बा. भ. बोरकर हे व्यक्तिमत्त्व ‘आंतरभारतीय’ वाटते. मंगेश पाडगावकर, ना. धों. महानोर आणि पुरुषोत्तम पाटील त्यांना पुत्रवत वाटत. आद्य शंकराचार्य, सूरदास, मीरा ही सारी व्यक्तिमत्त्वे त्यांना आपलीच वाटत. त्यांनी केलेल्या काही अनुवादांतून हा आपुलकीचा भाव सिद्ध झालेला आहे.
आणि मराठी कवितेने तर बा. भ. बोरकरांची ‘लावण्यरेखा’ आपल्या भाळी मिरवली आहे!
- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com
Tags: सोमनाथ कोमरपंत बा. भ. बोरकर कविता साहित्य Somnath Komerpant Ba Bha Borkar Poems Literature Load More Tags
Add Comment