1914 ते 2008 असे 94 वर्षांचे आयुष्य लाभलेले बाबा आमटे यांनी 1951 मध्ये स्थापन केलेली महारोगी सेवा समिती आणि आनंदवन प्रकल्प आता 70 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मागील अर्धशतकभर तरी आनंदवन हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातील तरुणाईसाठी ऊर्जास्रोत म्हणून कार्यरत आहे. बाबांच्याच प्रेरणेतून प्रकाशभाऊ व मंदाताई यांनी सुरु केलेला हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पही आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. बाबा आणि त्यांची पत्नी साधनाताई यांच्या कुटुंबाचा विस्तार तर इतका मोठा आहे की, त्यांचे मानसपुत्र व मानसकन्या म्हणवून घेणारे आणि त्याप्रमाणे कार्यरत असलेले असंख्य लोक देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांची दोन मुले विकास व प्रकाश यांनीही बाबांचा समाजसेवेचा वारसा व वसा तेवढ्याच ताकदीने पुढे चालू ठेवला, अर्थातच भारतीताई व मंदाताई यांच्याशिवाय त्यांना ते शक्य झाले नसते. एवढेच नाही तर त्यांची पुढची पिढीही त्याच निष्ठेने व धैर्याने याच कामात सामील राहिली आहे. कालच्या 9 फेब्रुवारीला बाबांना जाऊन एक तप (बारा वर्षे) पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर बाबांचे व्यक्तित्व आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन केलेले समाजकार्य यांच्यावर दृष्टीक्षेप टाकण्याची विनंती आम्ही भारतीताई व मंदाताई या दोघींना केली होती, त्यातून आकाराला आलेल्या दोन स्वतंत्र मुलाखती प्रसिद्ध करीत आहोत. साधना परिवार व आमटे परिवार यांचे ऋणानुबंध खूप जुने आहेत. त्यामुळे या मुलाखतींचे अगत्य आम्हाला विशेष आहे...
-संपादक
प्रश्न- भारतीताई, तुमचे बालपण, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी याविषयी आम्हाला जाणून घ्यायचे आहे.
- माझी आई प्रतिभाताई वैशंपायन आणि वडील भाऊसाहेब वैशंपायन हे दोघेही स्वातंत्र्यसैनिक होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते शिक्षणक्षेत्रात आले, कारण त्यांना शैक्षणिक कार्य करायचं होतं. भाऊंना (वडिलांना) तर मंत्रिपदाची संधीही देण्यात येणार होती, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. ‘देशाला स्वातंत्र्य मिळालं, आमचं काम आता संपलं. आजवर पारतंत्र्यात असलेल्या जनतेला चांगले नागरिक बनवण्यासाठी शहाणं केलं पाहिजे आणि ते केवळ शिक्षणानेच शहाणे होऊ शकतात’ असं ते नेहमी म्हणायचे. भाऊंनी भौतिकशास्त्रातून MSc केलं होतं. लग्न झालं तेव्हा आई साधी मॅट्रिक होती. लग्नानंतर ती कर्वे विद्यापीठातून BABT (म्हणजे आजचे BA B.Ed) झाली. त्यांचं लग्न झालं, तेव्हा स्वातंत्र्यलढा सुरूच होता. मराठवाडाही मुक्त व्हावा, अशी भाऊंची फार इच्छा होती. त्यांचा ग्रुपच होता. अनंत भालेराव, स्वामी रामानंद तीर्थ, दामोदर पांगरेकर वगैरे. निजामाने दिसेल तिथे गोळी मारण्याचा आदेशही भाऊंवर काढला होता त्या वेळी. भाऊ सुरुवातीला सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते, मग हळूहळू विचार बदलत गेले आणि ते नि:शस्त्र लढ्याचे समर्थक झाले. त्यांनी स्वतःला शिक्षणक्षेत्रासाठी वाहून घेतलं होतं, मोबदल्यात ते एक पैसाही घेत नसत. त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी आईवरच येत असे. आई सुरुवातीला प्राथमिक शिक्षिका होती, पुढे ती माध्यमिक शाळेची मुख्याध्यापिका झाली. त्यांचे लग्न झाले होते 1942 मध्ये. स्वातंत्र्यलढ्यात भाऊ भूमिगतच असायचे. दोघांना एकत्र राहता आले ते तब्बल दहा वर्षांनी, म्हणजे 1952 मध्ये. असे असले तरी आपल्याला देशकार्यात सहभागी होता आले याचा आईला जास्त आनंद होता. आमचे पालनपोषण करताना तिने उपसलेले कष्ट अगणित होते.
भाऊंना वाचनाचे प्रचंड वेड होते. ते आम्हाला हजारो रुपयांची पुस्तके आणून देत वाचायला. मलाही वाचायला-लिहायला फार आवडायचे. माझा कल तिकडेच होता, असे मला वाटते. माझ्या भावाला आणि बहिणीला फँटसीची पुस्तकं आवडायची. मला मात्र झाशी की रानी वगैरे सारखी पुस्तकं आवडायची. पुस्तकांचा अगदी ढीग पडलेला असायचा आमच्या घरात. भाऊंचं एक आणि आमचं एक, अशी दोन कपाटं होती पुस्तकांचीच. त्यातून बदाबद पुस्तकं खाली पडायची. माझा भाऊ इंजिनिअरिंगला होता. बहीण BSc करत होती, तर मी मेडिकलला होते. आम्हा तीन भावंडांची फी भरताना आईची खूपच दैना उडायची. फी कशीबशी जमा होत असे. त्यासाठी कधी बांगड्या गहाण ठेव, तर कधी आणखी काही. आमची ही परिस्थिती यशवंतराव चव्हाणांनी जाणली होती. कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असणाऱ्या भाऊंसमोर त्यांनी दोन पर्याय ठेवले. एक- मुंबईमध्ये अधिकाराच्या पदावर नियुक्ती होईल तिथे सहा-सात वर्षे राहा, दिमतीला बंगला आणि नोकरचाकर असतील. भाऊंनी तत्क्षणी ते नाकारलं. पुढे त्यांनी भाऊंना राज्यसभेत पाठवलं.
प्रश्न- इतका नि:स्पृह सेवाभाव तुमच्यामध्ये आई-वडिलांमुळेच आला का?
- साहजिकच. आनंद घेता सर्वांना येतो, तो देताही यायला हवा. माझ्या आई-वडिलांची दानत आणि कर्तृत्व फारच मोठं होतं. आईला तीनच लुगडी होती. एकदा शाळेतील एक चपरासी बाई आली मागायला, तर आईनं वाळत असलेलं देऊन टाकलं. भाऊपण असेच होते अगदी. अशा वातावरणात मी मोठी झाले. त्यामुळे मला पण वाटायचं की, आपल्याला लोकांसाठी काही करता आलं तरच आपल्या आयुष्याला अर्थ आहे. मात्र असे करताना वडिलांसारखं अव्यवहारी राहावं असंही नाही वाटलं कधी. वडिलांचा अव्यवहारीपणा, आईचे कष्ट हे मला नंतर हळूहळू कळत गेलं. त्यामुळे मी आईला होईल तेवढी मदत करायचे आणि पुस्तकं वाचायचे. मी कधी बाहेर खेळायलाही जायचे नाही. अभ्यासातही गती होती. त्या काळी हुशार मुलांना डबल प्रमोशन मिळायचं. त्यामुळे मी तेराव्या वर्षीच मॅट्रिक झाले. या बढतीमुळे माझं गणित मात्र कच्चं राहिलं. ते काही मला कधी कळलं नाही. पुढे डिग्री कशात करायची, हे माहीत नव्हतं. ‘आम्ही आमचं मत तुमच्यावर लादणार नाही, तुम्हाला जे आवडेल ते निवडा’ असं आई आणि भाऊ म्हणायचे. माझा खरं तर उजवा मेंदू चांगला आहे. म्हणजे कलात्मकतेकडे माझा कल आहे, सृजनशीलता आहे. मला बरंच काही सुचतं.
एकदा भाऊंचे एक मित्र नेमके घरी आले होते. ते म्हणाले, आधी डॉक्टर व्हायचं आणि मग काहीतरी लिहायचं. मला लोकांच्या उपयोगी पडायचं आहे, हा विचार तर माझ्या डोक्यात होताच. त्यामुळे मला वाटलं; हा चांगला मार्ग आहे-डॉक्टर होऊन लोकांची सेवा करण्याचा. म्हणून मी तो झेपत नसतानाही स्वीकारला. मला तेव्हा डोक्यात आलंही नाही की, आई पैसे भरू शकणार नाही, तिला फार त्रास होईल. मात्र ते पार पडलं, झालं मग MBBS.
प्रश्न- समाजाविषयी संवेदनशीलता तुम्हाला घरातूनच मिळाली. जनसेवा करता यावी म्हणून तुम्ही पेशाही डॉक्टरकीचा निवडला. बाबांनी असेच काहीसे काम आनंदवनात सुरू केले होते. त्याविषयीची माहिती पहिल्यांदा कधी मिळाली?
- MBBS ला असताना माझ्या दोन मैत्रिणी होत्या-जया आणि मंगल. त्या वेळी साधना साप्ताहिकामध्ये बाबा आमटेंच्या कार्याची माहिती यदुनाथजी देत असत. म्हणजे सोमनाथ श्रमसंस्कार छावणीत काय चालू आहे वगैरे खूप यायचं. त्यामुळे आम्हाला बाबांविषयी प्रचंड आदर आणि कुतूहल होतं. जया सहावीत असताना बाबांच्या श्रमसंस्कार छावणीत गेली होती. आता आम्ही MBBS ला होतो, पण ती खूप भरभरून बोलायची त्या अनुभवांबद्दल. मीही साधनेतून बाबांच्या कार्याविषयी वाचतच होते. मग आम्ही विचार करायचो- हे कोण बाबा आमटे? हे कसे दिसत असतील? काय काम करतात, ते आपण जाणून घ्यावं. जया आणि मंगल या दोघीही मग जाऊन आल्या श्रमसंस्कार छावणीला. माझा काही योग येत नव्हता. अखेर तो आला ऑगस्ट 1975 मध्ये. जया विदर्भातली होती. तिच्या घरी आम्ही गेलो होतो. आम्ही म्हणजे- मी, मंगल आणि माझी आई. आम्ही ठरवलं, बाबांना भेटायला आनंदवनात जायचे आणि निघालो.
प्रश्न- कशी होती आनंदवनाची पहिली भेट? त्यावेळी बाबांची भेट झाली का?
- तो खूपच दुर्गम भाग होता. पावसाचे दिवस होते. कशीबशी एक रिक्षा मिळाली. रिक्षा म्हणजे हातरिक्षाच. हाताने ओढत न्यायची. त्यामुळे रिक्षात बसून जायलाही वाईट वाटत होतं खरं तर. मात्र रस्ताच माहीत नसल्यामुळे काही पर्यायही नव्हता. त्याने आम्हाला एका ठिकाणी सोडलं. तिथून मग चालतच निघालो. डांबरीच काय, मातीचाही रस्ता नव्हता. आम्ही समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाला विचारायचो, बाबा आहेत का? कुणी ‘हो’ म्हणायचे, कुणी ‘नाही’. घरी पोहोचेपर्यंत आम्हाला नक्की काय ते कळले नाही. कसे तरी पोहोचलो. साधनाताई बाहेर काही तरी वाचत बसल्या होत्या. मी त्यांच्याविषयी काहीही वाचले नव्हते, आम्हाला त्या माहितही नव्हत्या. आम्ही गेल्यावर त्यांनी आपुलकीने विचारलं, तुम्ही कुठून आलात वगैरे. आम्ही सांगितलं की आम्ही बाबा आमटेंना बघायला आलोय. ताई म्हणाल्या, ते कालच सोमनाथला गेले. पण दुसरं कुणी नाही तरी मी आहेच. मी साधना आमटे. मग माझ्या आईच्या अन् त्यांच्या गप्पा झाल्या सामाजिक विषयांवर. मीही त्यांना लेप्रसीबद्दल विचारलं. मग संध्याकाळी लवकरच आम्ही तिथून परतलो. बाबा काही भेटले नाहीत तेव्हा.
प्रश्न- पण या भेटीतूनच पुढे बऱ्याच अनपेक्षित घटना घडत गेल्या ना?
- आईसोबत साधनाताईंच्या बऱ्याच गप्पा झाल्या होत्या. मीसुद्धा काही प्रश्न विचारले त्यांना. त्यांना काय वाटलं, काय माहिती! त्यांचं पत्रच आलं आमच्या घरी. पत्रात त्यांनी लिहिलं होतं की, 'माझ्या लहान मुलाचं (प्रकाशचं) लग्न झालंय. मोठ्या मुलाचं नाही झालं अजून. त्याला आम्ही डॉक्टर मुलगीच शोधतोय. तुमची मुलगी मला बरी वाटली. तर, तुमचं काय मत आहे?' आम्हाला तर असा धक्का बसला की, बाप रे. एवढ्या मोठ्या माणसांना भेटायला गेलो आणि हे काय भलतंच? चकितच झालो आम्ही. गोविंदभाई म्हणायचे, अशी संधी क्वचितच येते जीवनात. मी विचार केला की, वेगळं काम करण्याची ही संधी आपल्याला चालून आलेली आहे. मग मी आईला म्हणाले की, मला तिथं जाऊन काम करायला मिळेल. वडिलांनी आनंदवनाचा परिसर, तेथील प्रतिकूलता पाहिली असल्यामुळे ते 'नाही' म्हणत होते. आई मात्र म्हणाली, तुला झेपणार असेल हे सगळं काम, तर जा; पण पुन्हा माझ्याकडे तक्रार वगैरे नाही करायची.
प्रश्न- साधनाताईंच्या पत्राबद्दल वडिलांचे नेमके मत काय होते?
- एकदा गोविंदभाई श्रॉफ आले होते घरी. त्यांच्याशी बोलत असताना वडिलांनी विषय काढला आणि सांगितलं, असं-असं पत्र आलंय. त्यांनी ते पत्रच वाचून दाखवलं. गोविंदभाई यांचा शब्द भाऊ प्रमाण मानत. ते भाऊंना म्हणाले, मी विचार करून सांगतो. मग त्यांनी भाऊंना घरी बोलावलं आणि सांगितलं, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांपैकी कुणीच असं काम केलेलं नाहीये. तिची इच्छा आहे, तर काय हरकत आहे? पण भाऊ म्हणाले, तिने त्या ठिकाणी राहावे असे मला वाटत नाही. तिला समाजसेवाच करायची असेल तर इथे तीस गावांमध्ये तिला काम काढून देतो. (त्यांनी कुठेही काम काढून दिलं असतं. ते तेच काम करायचे.) मी म्हणाले, मला लग्नाशी विशेष कर्तव्य नाही, पण मला बाबांचा सहवास हवाय. कारण इतक्या मोठ्या माणसाच्या सहवासात जर इतकी वर्षे राहता आलं, तर माझ्या आयुष्यात किती बदल होईल! भाऊ म्हणाले, पण ज्यांना लग्न करायचे आहे, त्यांनी एकमेकांचे विचार समजून घेतले पाहिजेत. बरेच दिवस गाठीभेटी होत राहिल्या पाहिजेत आणि मगच लग्नाचा निर्णय घेतला पाहिजे. मात्र गोविंदभाईंच्या हट्टापुढे भाऊंचे काही चालले नाही आणि ते मोठ्या नाइलाजाने तयार झाले.
प्रश्न- पण विकासदादा आणि तुमच्या अशा गाठीभेटी झाल्या होत्या?
- नाही. आई आणि मी पहिल्यांदा गेलो होतो ना, तेव्हा ताईंनी विकासची ओळख करून दिली होती आम्हाला- तितकीच. तसं आमचं दोघांचंही चुकलंच. खरं सांगायचं तर ताईंचंही चुकलं जरा. नुसतं एकदा पाहून पसंत केलं. पण बाबांकडे जायला मिळेल ही भावना माझ्यात खूपच तीव्र होती, त्या ओढीने मी होकार दिला.
प्रश्न- बाबांची काय प्रतिक्रिया होती या प्रक्रियेबद्दल?
- बाबांनी आम्हाला निरोप धाडला, ‘अशी पत्रांवर लग्न ठरत नसतात. तुम्ही प्रत्यक्ष सोमनाथ श्रमसंस्कार छावणीला या.’ मग आई आणि मी गेलो मे 1976 मध्ये सोमनाथला. मी आणि विकास तेव्हा पहिल्यांदा बोललो. तेव्हा त्याने सांगितलं की तो हेच काम करणार आहे. यात पैसे जास्त मिळत नाहीत. पैसे कमावणं हा उद्देश नाहीचे. मी म्हणाले, ठीके ना! आमच्या घरीही असंच वातावरण होतं. आम्हाला तरी कोणते पैसे मिळायचे खूप?
प्रश्न- बाबांशी झालेली ही पहिली भेट असेल ना? काय बातचित झाली तुमच्यात तेव्हा?
- बाबांनी बोलावल्यामुळे मी आणि आई आलो श्रमसंस्कार छावणीला. बाबांनी मला पाहिलं आणि विचारलं की, तुला जीप किंवा इतर चारचाकी गाडी चालवता येते का? मी म्हटलं, नाही येत. त्या वेळी लेप्रसीच्या लोकांना लायसन्सच मिळायचे नाही आणि त्यामुळे बाबांना ड्रायव्हर्सची खूप आवश्यकता होती. पहिल्या भेटीतला हा पहिलाच प्रश्न मला अजूनही आठवतोय. मग संध्याकाळी जेवणाच्या वेळी बाबांनी जाहीर केलं, विकास आणि माझ्या लग्नाचं. तिथल्या मुलांनी मग खूप जल्लोष केला. बाबा म्हणाले, आत्ताच करायचं तुमचं लग्न. माझी आई म्हणाली, असं नाही करता येणार. मला हिच्या वडिलांना कळवावं लागेल आणि त्यासाठी घरी औरंगाबादला जावं लागेल पुन्हा.
प्रश्न- मग ही लग्नाची गोष्ट पुढे सरकली कशी?
- लग्नाच्या बैठकीसाठी गोविंदभाई आणि भाऊ बाबांकडे आले. भाऊंना वाटायचं, मुलीचं लग्न औरंगाबादला करावं. बाबांचा हट्ट काय की- आम्हाला येता येईल तिथे औरंगाबादला, पण आमच्या सगळ्या महारोगी पेशंट्सना लग्न कधी बघायला मिळणार? तर, तुम्ही इथेच करा. या मुद्द्यावर मात्र भाऊ आणि गोविंदभाई अडून राहिले. भाऊ बाहेर ओट्यावर रुसून बसले. बाबा घरात आणि भाऊ बाहेर. मग साधनाताईंचे सारखे हेलपाटे सुरू झाले. यांचा निरोप त्यांना सांग, आणि त्यांचा यांना. शेवटी बाबांनी मान्य केलं की, औरंगाबादला लग्न करू यांचं. पण ते थोडे नाराजच होते. मग 27 नोव्हेंबर 1976 रोजी विकास आणि माझं लग्न झालं ठरल्याप्रमाणे. ‘कामासाठी आणखी दोन हात मिळताहेत याचा मला फार आनंद होतोय’ असं त्या वेळी बाबा म्हणाले होते. विकासची होणारी बायको डॉक्टर आहे आणि कार्यकर्ता म्हणून आणखी एक नवी व्यक्ती त्यांच्याशी जोडली गेलीये याचा त्यांना दुहेरी आनंद झाला होता. माझ्या लहान दिराचा- प्रकाशचा प्रेमविवाह चार वर्षांपूर्वीच झाला होता. त्यांचाही नवा प्रकल्प याचदरम्यान सुरू झाला होता.
प्रश्न- लग्नानंतर आनंदवनात आल्यावर तुमच्या कामाचे स्वरूप कसे होते?
- बाबांनी मला सर्वांत आधी आमच्या लेप्रसीच्या दवाखान्यात जायला सांगितले. बाबा विकासला म्हणाले की, तू हिच्याबरोबर जात जा, हिला सर्व माहिती दे. ट्रीटमेंट काय द्यायची, हे जरा सांगत जा. मात्र विकासने मला काही सांगितलं नाही की समजावलं नाही. मग मी एकटीच जायला लागले. मी पेशंट्सकडून त्यांच्या कामांची माहिती घेऊ लागले. तेव्हा ते विचित्र नजरेने माझ्याकडे पाहायचे. मी त्यांना विचारायचे, तुम्ही काय काम करता? ते उत्तर द्यायचे- आम्ही कास्तकारी करतो. शेतीसाठी इथे कास्तकारी असा शब्द वापरला जातो. इथे माझ्या हाताखाली काम करणारे सगळे अशिक्षित. सगळी औषधे एकत्रच ठेवलेली असायची. मग मी सुरुवातीचे काही महिने त्यांना गोळ्यांचे वर्गीकरण कसे करायचे, हे शिकवले.
इथे माझ्या हाताखाली गीता नावाच्या बाई होत्या. चौथी पास होत्या. चांगल्या श्रीमंत घरातल्या होत्या. त्यांना कुष्ठरोग झाला म्हणून सासरच्यांनी त्यांना घालवून दिलं. त्याचा राग त्यांनी मनात धरून ठेवला होता. त्यांचा तो सगळा राग पेशंट्सवर निघायचा. रोगनिदान करण्यात त्या हुशार होत्या. बाबांसोबत राहून त्या अनेक गोष्टी शिकल्या होत्या. त्यांच्या हाताखाली आणखी काही लोक होते. सर्व जुजबी शिक्षण घेतलेले. अशा सर्वांना मी माझ्या परीने सांगायचे. औषधे ओळखायला शिकवले. त्यांचे वर्गीकरण करून डब्यात भरून ठेवणे, त्यावर चिठ्ठ्या लावणे या गोष्टीही मी त्यांना सांगायचे. पेशंट्सचा बेड कसा लावायचा, त्यांच्यावर लक्ष कसे ठेवायचे, ताप कसा बघायचा, हृदयाचे ठोके कसे मोजायचे- अशा एक ना अनेक गोष्टी मी समजावून सांगायचे.
मला प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा आवडतो. त्यामुळे काही अवधीतच मी दवाखान्यातील गोष्टी नीट करून टाकल्या. बेडनंबर दिले, रजिस्टर बनवले, रोगानुसार पेशंट्सचे वर्गीकरण केले. डेटा जमा केला. त्यामुळे झालं काय की, तिथे सुसूत्रता आली.
प्रश्न- लेप्रसी पेशंट्ससाठी काम सुरू केल्यावर बाबांनी तुम्हाला काही सूचना किंवा मार्गदर्शन केले होते?
- बाबा मला विचारायचे की, दवाखान्यात तू कसं औषध देतेस? पेशंट्सच्या जवळ बसतेस की त्यांना दूर ठेवतेस? कामाला सुरुवात करून काही दिवस झाल्यावर बाबांनी मला हे सगळं विचारलं आणि विकासकडूनही त्यांनी असंचं विचारून घेतलं होतं की, हिला लेप्रसी पेशंट्सबद्दल किळस वाटते का वगैरे. हे सगळं का, तर मला जोखण्यासाठी.
प्रश्न- विकास यांच्याशी लग्न झाल्यानंतर पुढे 35 वर्षे तुम्हाला बाबांचा सहवास लाभला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची कोणती वैशिष्ट्ये तुम्हाला जाणवली?
- बाबा वेळेला फार महत्त्व द्यायचे. 'I am fanatic on time.' असं ते नेहमी म्हणायचे. दिलेल्या वेळेत दिलेलं काम झालं, तर ते दिवसभर इतकी शाबासकी द्यायचे, की बस्स! आणि समजा वेळ चुकली की, ते रागवायचे व लगेच समजवायचेही. दिलेल्या वेळेच्या आधी काम उरकलं, तर विचारायलाच नको! ते जाम खूश व्हायचे. वेळेच्या बाबतीत बाबा फार particular होते. म्हणूनच त्यांना प्रचंड काम करता आलं. आपणच कामात ढिलाई केली, तर आपल्या हाताखालचेही तसेच करू लागतात. बाबांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, 'ज्याची स्वतःशीच स्पर्धा असते, त्याला कोणीच जिंकू शकत नाही.'
एक गंमत सांगते. लग्नानंतर इथे आल्यावर दुसऱ्याच दिवशी बाबांनी मला बँकेचं पासबुक दाखवलं. त्यात फक्त पंधरा हजार रुपये होते. पण केवळ तुझ्या वडिलांनी हट्ट धरला, त्यामुळे ते पंधरा हजार रुपये मी काढले आणि बसच्या भाड्यासाठी खर्च केले. मला आश्चर्यच वाटलं. पहिल्याच दिवशी असं कुणी सुनेला पैशाचं काही दाखवतं का? अतिशय पारदर्शकता होती त्यांच्यात.
बाबांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते परफेक्शनिस्ट होते. कुठलेही काम परिपूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसे. एकदा मी थालिपीठ बनवत होते. बाबा आले आणि म्हणाले ते इतक्या लवकर उलटू नकोस, चिकटून बसेल. मला काही यायचं नाही सुरुवातीला. त्यांनी सांगितलं. फोडणीचं ही असंच. ते तिथेच होते आणि मी फोडणी द्यायला लागलं, ते म्हणाले अजून थोडं थांबली असतीस तर चांगली फोडणी बसली असती. आता ती भाजी तितकीशी चांगली होणार नाही. आणि ती नव्हतीच झाली चांगली. ते पट्टीचे स्वयपाकी होते. त्यांना व्हेज-नॉनव्हेज पूर्ण स्वयंपाक यायचा. ते पोळ्या खूप सुंदर करायचे, असं ताई आम्हाला सांगायच्या. खाऊ घालण्याचं त्यांना प्रचंड वेड होतं.
बाबांना जन्मतःच सगळं कसं काय अवगत होतं, मला काही कळत नाही. सगळ्या गोष्टी एका माणसात असू शकत नाहीत, पण त्या होत्या बाबांमध्ये. म्हणजे त्यांचे अक्षर सुंदर होते, ते सुंदर चित्र काढायचे, शेतीतलं सगळं ज्ञान होतं त्यांना, त्यांनी वकिलीही केली होती. बुद्धिवान माणसं आली की, ते त्यांच्याशीही ते सहजतेने चर्चा करायचे आणि अशिक्षित माणूस आला कोणी, तर त्याच्याशी त्याला समजेल अशा भाषेत बोलायचे. त्याचे प्रश्न बाबा तिथल्या तिथेच सोडवायचे. कुणी एखादा गंभीर प्रश्न घेऊन आला, तर बाबा त्यात इतके गुंतायचे की- जणू तो त्यांनाच पडलेला प्रश्न असावा. मला या सगळ्याचं कायमच आश्चर्य वाटायचं.
आम्हाला बाबांविषयी प्रेम आणि आदर असला, तरी त्यांची भीतीही वाटायची. ते प्रचंड शिस्तप्रिय होते. त्यांचं ते सिंहासारखं चालणं, आवाजही तसाच त्यामुळे आम्हाला दुरूनच कळायचं की, बाबा आलेत. सुरुवातीला तर त्यांचा आवाज ऐकला तरी माझ्या हातातून वस्तू गळून पडायच्या. वेळेवर काम केलं नाही, स्वच्छता ठेवली नाही, पाहुण्यांचं नीटनेटकं केलं नाही; तरच रागवायचे बाबा.
बाबांनी आमच्या इथेच अंधांसाठी शाळा सुरू केली होती. 25 मुलं होती त्यात. अशा प्रकारची शाळा तिथे नव्हतीच. अंध मुलांसाठीदेखील शाळा असते, हे त्यांच्या पालकांना माहीतही नव्हतं. ते मुलांना घरीच ठेवायचे. मग या अंधशाळेत लोक यायला लागले मुलांना-मुलींना घेऊन. पण इतक्या उशिरा की, पंधरा-सोळा वर्षांच्या मुली पहिलीत असायच्या. आता अगदी पाच वर्षांच्याही येतात. पण तेव्हाची परिस्थिती ही अशी होती. तर, बाबांनी या मुलींना आपल्या शेजारच्या खोलीत ठेवले होते. का, तर त्यांच्याकडे लक्ष देता यावे म्हणून. बाबा त्यांना आमच्या घरातच जेवू घालायचे आणि शिकवायचे. म्हणजे ज्याच्या-त्याच्या लेव्हलला जाऊन आणि त्याचं व्यंग काय आहे ते ओळखून बाबा शिकवायचे.
बाबांचं वाचनही प्रचंड होतं. सगळ्या प्रकारची पुस्तकं त्यांच्याकडे होती. त्यांचा वाचनाचा वेग तर प्रचंड होता. सगळं त्यांच्या लक्षात राहायचं. मेमरी इतकी विलक्षण, म्हणजे तिला फोटोग्राफिक मेमरी म्हणता येईल. एखादा माणूस पाहिला की त्याचा इतिहास, भूगोल असं सगळं सांगायचे ते की, तो माणूसही आश्चर्यचकित होऊन जायचा.
बाबा दिवसभर काम करायचे. प्रचंड श्रम. ते कधी निवांत बसले आहेत, असं कधीच झालं नाही. त्यांना जांभई किंवा आळस आलेलाही मी कधी पाहिला नाही. इतरांनीही असंच राहावं, असं बाबांना वाटायचं. ते पहाटे तीनपासून जागे असायचे. काही तरी खुडखुड करत बसलेले असायचे. त्यामुळे ताईपण जाग्याच असायच्या आणि त्या रागवायच्या मग बाबांना. मग शेवटी साडेतीन, फार-फार तर चारला ते ताईंना उठवायचेच. सुरुवातीला इथे कुणी गवळी मिळायचा नाही. गुरंही खूप असायची. मग ताई स्वतःच उठून गीर गाईंचं दूध काढायच्या. घरातलं सगळं काम ताई करायच्या. मात्र ताईंना भांडी घासायला बाबा मदत करायचे. बाबांना उसंतच नसायची. त्यांना सुरुवातीला इथे विहिरी खोदाव्या लागल्या. काळी माती टाकून जमीन सुपीक करायला लागली. शेतीवर लक्ष ठेवावे लागले.
बाबांचा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे, त्यांना आपल्या दोषांची जाणीव होती. ते म्हणायचे- मी खूप रागीट आहे, हे मला माहिती आहे. पण मी क्रोध आवरण्याचा प्रयत्न करतो. यशस्वी होण्यासाठी आपले षड्विकार काढून टाकायला हवेत, याविषयीदेखील बाबा बोलायचे.
बाबा खूप मातृभक्त होते. म्हणजे पितृभक्त नव्हते असं नाही; पण त्यांना ही जाणीव लहानपणापासून होती की, स्त्रियांना घरात खूप काम असतं, त्यामुळे त्यांना मदत केली पाहिजे. आपल्या आईला- बहिणींना ते घरात खूप मदत करायचे. खरं म्हणजे ते खूप श्रीमंत घरातले होते. त्यांच्या वडिलांना पाचशे रुपये पगार होता, स्वतंत्र टांगा होता दिमतीला. पण बाबांना लहानपणापासून स्वतंत्र विचारशक्ती होती. मला नेहमी वाटतं की बाबा जन्माला येताना काही तरी संकल्प घेऊन आले होते आणि त्यांनी तो या जन्मात पूर्ण करून दाखवला. खरं सांगायचं ना, तर बाबांचं व्यक्तिमत्त्वच मोठं विलक्षण होतं. ते सगळ्या विशेषणांच्या पलीकडे गेले होते.
प्रश्न- आपल्या कुटुंबीयांसोबत बाबांचे वागणे कसे असायचे?
- बाबा खूप कुटुंबवत्सल होते. त्यांनी समाजसेवा केली, सगळं केलं; पण त्यांनी आपल्या कुटुंबासाठीही वेळ दिला होता. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. घरातले सगळे एकत्र जमलेत, नातवंडापैकी कुणी त्यांचे केस ओढताहेत, तर कुणी पोटावर बसलेले आहे, कुणी पाय चेपून देतंय, कुणी डोकं दाबून देतंय आणि ते गप्पागोष्टी करताहेत- हे दृश्य माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही.
आम्हा सर्वांना घेऊन ते कधी ताडोबाला जायचे, तर आणखी कुठे तरी जायचे. त्यांना जाणीव होती ना की-आम्हाला नाटक नाही, सिनेमा नाही; इतकच काय तर निरोगी लोकंसुद्धा नाहीत बोलायला. याची त्यांना खूप जाणीव होती.
प्रश्न- इतकं सारं काम उभं करताना मनुष्यबळाचा तुटवडा जाणवायचा? कधी तरी अचानक कुणी महत्त्वाची व्यक्ती निघून गेली वगैरे तर?
- इच्छाशक्ती आणि विचारशक्ती असली की, कामं अडत नाहीत, आपोआप होत जातात. हा अनुभव मी कायम घेतला. आमच्याकडचा एखादा माणूस एका रात्रीत काही तरी ठरवायचा आणि निघून जायचा की- मला अमक्या ठिकाणी नोकरी लागली, मी जातो. नर्सेसही अशाच जायच्या. तुमचा विश्वास बसणार नाही; पण दुसऱ्याच दिवशी लगेच कुणी तरी मुलगी यायची, मला आधार द्या म्हणायची आणि तिने आधी नर्सिंगचं काम केलेलं असायचं. असं असंख्य वेळा घडलंय त्यामुळे त्याला योगायोग म्हणता येणार नाही. हे सगळंच मला विलक्षण वाटायचं.
प्रश्न- इतक्या सगळ्या प्रकल्पांचे बाबांचे व्यवस्थापन इतके अचूक कसे काय होते?
- बाबांची व्यवस्थापनावरील पकडही प्रचंड होती. आमच्याकडे येणारे पाहुणे आज आम्हाला विचारतात की, तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टींचे व्यवस्थापन करता कसे? आम्ही त्यांना म्हणतो की-बाबांनी ज्या पद्धतीने आखून दिलंय तसच आम्ही सगळे काम करतो. बाबा मॅनेजमेंट गुरूंचे पण गुरू होते, असंच मला वाटतं. त्यांनी इथे बारा बलुतेदारांसारखीच व्यवस्था निर्माण केली, सुरुवात शेतीपासून केली. कारण सुरुवातीला त्याचीच गरज होती.
बाबा ताईंना घेऊन सकाळी चारला फिरायला जायचे आणि पूर्ण कॉलनीला चक्कर मारायचे, उत्तर-दक्षिण असा पट्टा आहे. तर ते या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊन यायचे. लोकांना आदल्या दिवशी सांगितलेली कामं त्यांनी पूर्ण केलीत का, हे ते पहाटे चारलाच बघून यायचे. मग घरी येऊन त्यांची कॉफी व्हायची. सगळे कार्यकर्ते पहाटे जमा झालेले असायचे. मग त्यांना सोपवून दिलेल्या कामांचा आढावा बाबा घ्यायचे. कुणी खोटं बोलताना आढळला, तर बाबा त्याला खूप रागवायचे. असं रागवायचे की ‘दे माय धरणी ठाय!’ त्यांचा प्रचंड धाक असायचा, त्यामुळे कामं पटकन मार्गी लागत असत. ज्यांच्यावर रागावलेत, त्यांच्या घरी बाबा जायचे. तब्येत बरी आहे ना, जेवलास का- अशी विचारपूस करायचे. बाबांनी आणि ताईंनी लोकांना विलक्षण प्रेम दिलं. म्हणून ते त्यांना आई व बाबाच म्हणायचे अन् विकासला आणि मला दादा व वाहिनी. आता मी आज्जी झाले, पण तेव्हा म्हणायचे वहिनी.
प्रश्न- बाबांना जाऊन आज एक तप उलटलंय. या काळात बाबांची सर्वाधिक आठवण कधी झाली?
- खरं म्हणजे, मला रोजच आठवण येते. सगळ्यांनाच येते. काही नवं पाहिलं ना किंवा नवं ऐकलं की, बाबा असताना मी पटकन बाबांना जाऊन सांगायचे. आपण कितीही सामान्य गोष्ट विचारली त्यांना, तरी ते मनापासून सविस्तर उत्तर द्यायचे. मला तर याची नेहमी आठवण होते. त्यामुळे कुणीही आपली शंका घेऊन त्यांच्याकडे जात असे. त्याच्या उलट म्हणजे विकास. त्याला टीचिंगची आवड नाहीये. आता त्याला किती गोष्टी येत असती-, हजारो येत असतील, पण तो काहीच नाही सांगत. बाबा मात्र सांगायचे. अजूनही चांगलं गाणं ऐकलं, चांगलं पुस्तक वाचलं, तर मला बाबांची आठवण येते. मला नव्या गोष्टींचा शोध घ्यायला खूप आवडतं. जरा काही नवं कळालं की, मी ते बाबांना जाऊन सांगतीये असा भास मला अजूनही होतो... इतकी आठवण येते.
प्रश्न- बाबांच्या आणि विकासदादांच्या व्यक्तिमत्त्वात काही साम्य आढळते तुम्हाला?
- बाबांचं काम काय होतं, तर कार्यकर्ता घडवण्याचं. मग तो एखादा पेशंट असेल, त्याच्यातली एखादी कला त्यांनी जाणली असेल; तर बरोबर त्याला त्या-त्या खात्यात नेमून बाबा त्यांच्याकडून उत्कृष्ट काम करून घ्यायचे. ही कला त्यांना चांगलीच अवगत होती. हीच कला विकासने बरोबर उचलली आहे. त्याला हल्ली प्लेसमेंट म्हणतात. कोणत्या माणसाला कुठे ठेवलं म्हणजे काम चांगलं होईल, हे त्याला बरोब्बर कळतं. आमच्याकडे वाकडी बोटं असलेला एक कारागीर आहे. तो इतकं सुंदर लाकूडकाम करतो की सर्व जण थक्क होतात. लोकं विचारतात की, ही कलाकृती विकण्यासाठी आहे का? विकास म्हणतो, नाही. त्याची कला दाखवण्यासाठी आहे.
प्रश्न- सध्या तुमचा दिवसभराचा कार्यक्रम कसा असतो?
- आधी उसंतच नसायची कामातून. पण गेल्या पाच वर्षांपासून मी दुखणेकरी झाले. गुडघेदुखी, सायटिका, सांधेदुखी, दमा होतेच आणि आता जोडीला पार्किन्सन्स, BP, Diabetes ही आले. त्यामुळे माझ्याकडून आता फारसे काम होत नाही. तरी सकाळी ओपीडीला जाऊन काही पेशंट तपासून आल्याशिवाय मला चैन पडत नाही. काही ठरलेल्या जागा असतात आपल्या. तिथे गेलं की, बरं वाटतं-तसंच आहे ते. दुपारी 2 ते 3 सक्तीने विश्रांती घ्यावी लागते. झोप काही लागत नाही. मी नुसती पडून राहते. मग वाचन करायचे. संध्याकाळी दम्यामुळे थोडा त्रास होतो, त्यामुळे कमी बोलावं लागतं.
इथे आनंदवनात अंध, अपंग आणि मुक-बधिर असे तीन प्रकारचे पेशंट्स असतात. अंध आणि मूक-बधिर मंडळींमध्ये मला आत्मविश्वास फार दिसतो. पण अपंगांना मोबिलिटीची अडचण फार जाणवते. मला माझ्या वेळच्या अपंग पेशंट्सचा चेहरा दिसायचा. मग इंलंडच्या तीन नर्सेसच्या डोनेशनमधून मी कृत्रिम अवयव (Artificial Limb) युनिट काढलं. आधी लेप्रसीमुळे अपंगत्व यायचे. आता डायबिटिस आणि अपघातामुळे येते. त्या सर्वांना व गोरगरिबांना या युनिटचा उपयोग होतो. या मंडळींची मोबिलिटी वाढवणे आणि त्यांच्यामध्ये उत्साह जागा करणे, हा माझा हेतू असतो. स्वतःला हवं तेव्हा हवं तिथं जाता येणं, हा आनंद किती असतो, तो यांना मिळाला म्हणून हे युनिट आहे.
प्रश्न- तुमची पुढची पिढीसुद्धा तितक्याच जोमाने आनंदवनाचे काम पुढे नेत आहे. त्यांच्या कामाविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.
- आनंदवन हे उद्योगप्रधान स्मार्ट व्हिलेज व्हावं, असं गौतमला- आमच्या जावयाला वाटतं. त्या दृष्टीने त्यांनी सगळे प्रयत्न सुरू केले आहेत. सोलर उपकरणं बसवली आहेत. घरंही नव्या पद्धतीची बांधली जाताहेत. खेळांची अनेक मैदानं तयार केलीत त्यांनी. तिथे दिवसभर सात-आठ प्रकारच्या खेळांचं प्रशिक्षण दिलं जातं दिवसभर. शीतलनेही असंख्य माणसे जोडली आहेत. संस्था सांभाळणे, जमाखर्च पाहणे हे काम ती करते. पूर्ण ऑफिस त्या दोघांवर आहे आता. बाबा कसे चालतं बोलतं ऑफिस होते. आम्हाला तेच आवडायचं. हे दोघे आम्हाला भेटतच नाहीत, इतके व्यग्र असतात. कायम ते इथे ऑफिसमध्ये असतात दिवसभर, तर कधी कधी रात्रीसुद्धा.
आमचा मुलगा कौस्तुभ पाणी शोधणं आणि वाचवणं यावर काम करतो तर सून पल्लवी ‘स्त्रीषु’ या संस्थेच्या माध्यमातून मासिक पाळी स्वच्छता (Menstrual Hygiene) याबाबत अपंग आणि मतिमंद मुलींमध्ये काम करते.
प्रश्न- आनंदवनात येऊन तुम्हाला आता पन्नास वर्षे होतील. मागे वळून पाहताना तुमच्या काय भावना आहेत?
- माझ्या मनातलं उद्दिष्ट पूर्ण झालं. मला कायम वाटायचं- आपण अशा लोकांच्या उपयोगी पडावं, ज्यांच्यापर्यंत मदत पोहोचत नाही. तिथे काम करावं. ते मला करता आलं. माझ्या अंगात माझ्या आई-वडिलांनी देशभक्ती मुरवली, त्यामुळे माझ्या मनात देशवासीयांबद्दल अतोनात प्रेम आहे. त्या भावनेतूनच मी हे करू शकले. जिथे समता आहे, जिथे लोक एकमेकांच्या उपयोगी पडतात; असं ठिकाण काम करायला मला मिळावं, असं नेहमी वाटायचं. ते मिळालं पण माझी शारीरिक शक्ती विकास-प्रकाश पेक्षा फारच कमी, कारण ती ताई-बाबांची मुलं. बाबा पैलवान होते. मग त्यांची मुलं तशीच होणार की नाही? शक्तिमान अगदी. ‘तू संस्थेसाठी असं कुठलं महत्वाचं काम केलंस?’ असं मला विकासने एकदा विचारले. त्यावर मी उत्तरले, ‘मी यथाशक्ती यथामती दवाखाना अजूनही सांभाळते आहे. अपार कष्टातून व अपुऱ्या उत्पनातून माझी दोन मुलं उच्चशिक्षित करून संस्थेसाठी तयार केली आहेत. दोन हुशार कार्यकर्ते म्हणजेच चार हात दिले. हे माझं सर्वांत मोठं काम आहे. प्रसिद्धिपराङ्मुख राहून काम करत राहण्याची शिकवण मला माझ्या आई-वडिलांकडून मिळाली. आजवर मी याच पद्धतीने काम करत आले आणि त्यातच मला समाधान आहे.
डॉ. भारती आमटे, आनंदवन, वरोरा, चंद्रपूर
vikasamte@anandwan.in
(मुलाखत आणि शब्दांकन - समीर शेख)
वाचा मंदाताई आमटे यांची मुलाखत-
संवाद सुरु झाला, आणि अडचणी दूर झाल्या!
Add Comment