गाय ही गोमाता म्हणून पवित्र देवता आहे, असे समजणाऱ्या गोरक्षकांकडून गेल्या काही वर्षांत गोरक्षण या नावाखाली एखाद्याकडे गोमांस असल्याचा केवळ संशय आल्यावरून झुंडीने जाऊन हत्या केल्या जात असल्याने, झुंडबळींची संख्या वाढतच गेली आहे. अशा प्रकारची (अंध) श्रद्धा समाज-मानसात पद्धतशीर बिंबवण्याचे प्रयत्न पूर्वीपासूनच कसे होत गेले आणि त्यामुळे अनेकांचे, जमातींचे किती नुकसान झाले, याचा शोध लेखक पत्रकार श्रुति गणपत्ये हिने घेतला आणि त्यानंतर इंग्रजीत 'हू विल बेल द काऊ?' हे पुस्तक लिहिले, परंतु ते छापण्यास कोणी प्रकाशक तयार होईना, म्हणून तिने ते स्वतःच प्रसिद्ध केले. आणि आता त्याचा तिने स्वतःच मराठी अनुवाद करून 'गाईच्या नावानं चांगभलं' हे पुस्तक लिहिले आणि लोकवाङ्मय गृहाने ते लगोलग प्रसिद्ध केले आहे. हा विषय तसा अवघडच, त्यातही सध्या कोणाच्या भावना कधी दुखावतील याचा नेम नाही. त्यामुळे पुस्तकाविरुद्ध निदर्शने होण्याचीही शक्यता असल्याने इंग्रजी प्रकाशकांनी ते नाकारले असणार, हे सहज समजते.
अतिशय मेहनतीने संदर्भ गोळा करून, अनेकांच्या मुलाखती घेऊन आणि त्याला स्वानुभवाची जोड देऊन हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. या संशोधनाला सुरुवात कशी झाली, याची हकीकत लेखिकेने सांगितली आहे, ती वाचताना तिने घेतेलेली मेहनत जाणवते आणि पुस्तक अगदी अचूक व्हावे म्हणून तिने केलेले प्रयत्न दाद देण्यासारखेच आहेत. तरीही ती म्हणते की, "एवढं सगळं अभ्यासूनही गोमासबंदीविषयी काही प्रश्न माझ्यासाठी सुटले नव्हते. माणसं भावनिक दृष्ट्या अन्नाशी जोडलेली असतात. गोमांस कमी लोक खात असले, तरी त्यांचंही भावनिक, मानसिक नातं त्या अन्नाशी आहे. बहुसंख्य लोकांनी ते नाकारल्याने ते गरिबांसाठी प्रथिनांचा स्वस्त स्रोत आहे. पण भारतात अन्न हे धर्म आणि जात यामध्ये विभागलं गेलं असून, त्यामध्ये कायम उच्च जातींचं वर्चस्व राहिलं आहे.”
पुढे ती म्हणते की, अन्नसंस्कृती ही भौगोलिक उपलब्धता, चव, परंपरा, आर्थिक क्षमता, हवामान आदि कारणांनी ठरते. काही ठिकाणी धर्म विशिष्ट अन्न खाण्यास मनाई करतो. म्हणजे हिंदू गोमांस खात नाहीत, तर डुकराचे मांस मुस्लीम आणि ज्यूंना वर्ज्य आहे. पण याच्या मुळाशी कोणतंही धार्मिक कारण नसून राजकारणच दिसतं. अन्नबंदी या राजकीयच असतात. अन्नबंदीच्या नावाने होणारा हिंसाचार हा निषेधार्ह आहेगोमांसबंदी घालून आपण नक्की काय मिळवलं याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे".
भारतात एवढी अन्नविविधता असताना अन्नाचं एकसंधीकरण करण्याची गरजच काय हा लेखिकेचा प्रश्न आहे. मूठभर उच्च जातींचं शाकाहारी अन्न आपण सक्तीचं करतो आहोत का असे ती विचारते. देश केवळ भावनांच्या जोरावर चालू शकत नाही. नागरिकांना अन्नाची गरज असते. त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी काम आणि मूलभूत सुविधांची गरज असते. आपला देश कोणत्या दिशेने न्यायचा आहे हे आता ठरवावं लागेल", असे शेवटी म्हणते.
पुस्तकाचे सहा भाग आहेत. ‘आधुनिक काऊ बॉइज’ यात 'जागरूक नागरिक', गोरक्षक कोण आहेत आणि ते नक्की कुठून येतात?, पूर्वनियोजित हिंसा, गाईच्या नावाने अर्थव्यवस्थेची थाप, गोशाळा एक आधारस्तंभ, ही प्रकरणे आहेत. ‘गाईची गोमाता होताना’ या भागात भूतकाळ आणि लोक अहिंसा स्वीकारतात तेव्हां ... ही प्रकरणे; ‘घेतलं शिंगावर’ या भागात माहिती अधिकाराच्या मदतीने गुन्ह्यांचा शोध ही प्रकरणे, ‘गाईच्या नावानं चांगभलं’ या भागात सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम, आणि गोहत्याविरोधात ठाम भूमिका घेणारे नेहरू ही प्रकरणे; ‘आर्थिक चक्राला खीळ’ या भागात शेतकऱ्यांच्या व्यथा, हंबरणं सोडून सगळंच कामाचं, म्हशीच्या मांसाची निर्यात, पशुगणनेचे आकडे खरं बोलतात तेव्हां... ही प्रकरणे आणि ‘बेचव अन्न’ या भागात अन्न आणि राजकारण, भूक, खाद्यसंस्कृती अन्न आणि राष्ट्रवाद ही प्रकरणे आहेत. शेवटी संदर्भसूचीही आहे.
प्रत्येक भागाआधी गोवंशहत्येच्या संदभात जे दावे करण्यात येतात ते देऊन पुढील प्रकरणांत त्यांबाबत (ते खोडून काढणारे) विवेचन आहे. हे दावे असेः इस्लामच्या आक्रमणापासून गोमातेची रक्षा करणं हे पवित्र काम आहे; हिंदूंनी कधीच गोमांस खाल्लं नाही, गाईची हत्या केली नाही, उलट कायम तिची पुजा केली आहे; गाईला इजा पोहोचवल्याने पाप लागते आणि माणूस नरकात जातो; गोरक्षा ही प्राचीन हिंदू संस्कृती असून ते हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे; गोमातेच्या पोटात ३३ कोटी देव असतात; भारत हा शाकाहारी देश आहे आणि केवळ मुस्लीमच गोमांस खातात. प्रश्न असा आहे की, हे दावे सप्रमाण खोडून काढल्यामुळे असा प्रश्न पडतो की, यामुळे तरी असे दावे ऐकणाऱ्यांना जाग येईल का?
हल्ली मुस्लिमांना गोहत्या करणारे म्हणून गुन्हेगार ठरवण्यात येत आहे. भारतातील बहुसंख्य लोकांचा हा समज आहे. करून दिला गेला आहे. या सगळ्या मोहिमेच्या मुळाशी मुस्लिमद्वेष आहे हे महत्त्वाचे कारण. त्यातूनच इस्लामविषयी रागाला आणि त्याबरोबरच हिंसेला तोंड फुटतं, असे लेखिका म्हणते. अनेकजण झुंडींचे बळी ठरतात. पण बळी घेणाऱ्यांचा गौरव केला जातो. त्यासाठी ती उदाहरणेही देते. जसे की, झारखंडमध्ये हत्या केल्याच्या संदर्भात गुन्हा सिद्ध झालेल्या आठ जणांचा ते जामीनावर सुटून आल्यावर भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी सत्कार केला. महत्त्वाची गोष्ट अशी की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झुंडबळीचा निषेध केल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही घटना घडली होती. आता तर या गुन्हेगारांना हिंदू राष्ट्राची स्वप्ने पाहणाऱ्यांकडून हीरो मानले जाऊ लागले आहे. त्यांच्याबरोबर लाठ्या काठ्या, हॉकी स्टिक्स घेऊन फोटो काढायचे, जणू नाही त्यांनी मोठा पराक्रम गाजवलाय.
खरे तर भाजप केंद्रात सत्तेत येण्याआधी असे प्रकार होतच होते, पण आता भाजप सत्तेवर आल्यानंतर अशा झुंडींचा उन्माद वाढला आहे. २०१५-१८ या काळात झुंडबळींची संख्या १२ राज्यांत किमान ४४ होती. त्यात ३६ मुस्लिम होते आणि याच काळात २० राज्यांत शंभराहून जास्त प्रकरणे झाली आणि त्यात २८० जण जखमी झाले, असे ह्यूमन राइट्स वॉच या जागितक संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. नंतरच्या काळात त्यात बरीच भर पडली असणार, हे वर्तमानपत्रे वाचणाऱ्यांच्या कळत असेल. वाईट बाब अशी की, या झुंडींनी केलेल्या हिंसाचाराकडे पोलिस बहुतेक वेळा बघ्याचीच भूमिका घेतात. अगदी महिलाही कथित गोरक्षकांच्या हिंसेची शिकार होत असल्या तरी. कारण हे गोरक्षक महिलांचाही अपवाद करत नाहीत. स्वतःच न्यायाधीश बनतात आणि शिक्षा सुनावतात. सक्तीने अंमलाजावणीही करतात. सर्वात जास्त हिंसक घटना उत्तर प्रदेश आणि हरयाणात होतात, असेही लेखिकेचे निरीक्षण आहे. म्हणजे तथील शासनाचा या गोरक्षकांना मूक पाठिंबाच आहे, असे दिसते.
हे गोरक्षक उजव्या विचारसरणीच्या किमान एका तरी संघटनेचे सदस्य असतात. काही तर 20-22 वयाचे असतात. काहीजण स्वतःची संस्था स्थापन करून अध्यक्ष, संस्थापक अशी बिरुदे लावतात. त्यांची सामाजिक प्रतिमा उंचावते. त्यामुळे लोक आपण होऊन आजूबाजूच्या घटनांची, विशेषतः मुस्लीम मोहल्ल्यातील, माहिती पुरवण्याचे काम करतात. गावांत आणि निमशहरांत हे माोठ्या प्रमाणात चालते. गोरक्षकांकडे तलवारी, बंदुकाही असतात त्यांसकट ते फोटोला उभे राहतात. गमतीची बाब अशी की, “देशी गाय ही गोमाता आहे, म्हणून ती कापू नये. परदेशी गाय कापली तरी चालेल”, असे उत्तर प्रदेशातील शेतकरी सांगतो. तेथे गोरक्षक हा जणू सन्मानच आहे, असे चित्र २०१४ पासून तयार झाले.
"हिंदू खतरे में है।' असं सांगून गैरमुस्लिमांना एकत्र करणे सोपे जाते. अगदी दलित तरुणही त्याला फशी पडतात. 'दलितांना हिंदू म्हणवण्यामागे अर्थातच स्वार्थ दडला आहे. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागांमध्ये हिंदूंची संख्या जास्त दाखवण्यासाठी ही धडपड. खरं तर दलीत आणि मुस्लिम ज्या सामाजिक स्तरातून येतात तेथे शिक्षण, नोकरी, संधीसाठीही त्यांना सारखाच संघर्ष करावा लागतो. पण सातत्याने हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे हिंदू म्हणवून घेणं दलितांना सोयीचं वाटतं, कारण हिंदू धर्मातून पाठिंबा मिळेल अशी खोटी आशा त्यांना दाखवली जाते,", असे लेखिका म्हणते. हा मुद्दा विचारात घेण्याजोगा आहे.
महामार्गावर गुरे वाहून नेण्यासाठी पोलिसांना लाच द्यावी लागते, हा शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा अनुभव आहे. हरयाणात तर पोलिसच पुढे जाऊन गोरक्षकांना माहिती कळवतात, काहा वेळा गुरांना पकडून जप्ती आणली जाते, तर कधी शेतकरी-व्यापाऱ्यांकडून पैसे उकळले जातात. पश्चिम उत्तर प्रदेशातील व्यापारी सांगतो की, आमच्या गावात गुरे आणण्यासाठी १०००० ते १५००० रुपये जास्त द्यावे लागतात. जाटांची संख्या जास्त आणि त्यांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन शेती. त्यामुळे तेथे गुरांचा वापर अधिक केला जातो. खोटे आरोप करून शिक्षा फर्मावल्या जातात. याची उदाहरणे लेखिका देते. हरयाणातील गोरक्षण कायद्याने गोरक्षकांना छापे टाकण्याचे अधिकार दिले आहेत. त्याची सविस्तर माहिती ती देते. गुजरातमध्ये गोरक्षकांना रोख पारितोषके दिली जातात. त्यासाठी स्वतंत्र निधी तयार करण्यात आला आहे, त्याच्या २००१ ते २०१८ या काळातील आकडेवारीचे कोष्टकही दिले आहे.
गोसेवक गायीचे शेण आणि मूत्राचा (खत म्हणून) वापर करून शेती केल्यास उत्पादन दुप्पट होते असा दावा करतात. काहीजण शेणापासून बनवेल्या वस्तू विकतात आणि त्यात नफा होतो असे सांगतात. शेतकऱ्याच्या घरातील गाय आणि गोशाळेतील गाई यांत काहीही फरक नाही. उलट शेतकरी गाइची जास्त काळजी घेतो, कारण ती त्याचे अतिरिक्त उत्पन्नाचे साधन असते. दूध विकून त्याला रोख पैसे मिळतात. पण तो असे अव्वाच्या सव्वा दावे करत नाही. गायीच्या शेण, मूत्र इत्यादींपासून केलेल्या उत्पादनांबाबत अनेक अवैज्ञानिक दावे केले जातात, त्यांचे ब्रँड बनवले जातात. त्यांना अमेरिका आणि चीनकडून पेटंट मिळाल्याचा दावा 'गोविज्ञान अनुसंधान केंद्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, नागपूरच्या देवळापर गोशाळेने केला आहे. अशी उत्पादने मार्केटिंग तंत्र आणि राजकारण्यांच्या पाठिंब्याने लोकप्रियही होतात, हा या चळवळीचा अत्याधुनिक चेहरा आहे.
गोरक्षक ही हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करणारी प्रमुख शक्ती आहे. राजकीय आणि गरजेनुसार हिंदुत्वाच्या पैलूंवर काम करण्यास ते तयार असतात. हिंदुत्व संघटना या पद्धतीने १९९० च्या दशकात नैतिक पोलिसाची भूमिका पार पाडत होत्या. विरोधी भूमिका घेणारे कलाकार, व्यक्ती आणि व्हॅलेंटाईन डे साजरे करणारी तरुण जोडपी यांना मारहाण करण्यात येत होती, त्याचवेळी अल्पसंख्याकांना दहशत बसवण्याचे काम गोरक्षक करत होते. लेखिकेने म्हटले आहे गोरक्षकांसारख्या व्यक्ती तळागाळातील जनतेला कट्टरवादी बनण्यास प्रवृत्त करतात. याचा परिणाम म्हणजे, समाजातील गुन्हेगारी घटक या यंत्रणेच्या पाठिंब्याने देशातल्या अराजकतेचा आनंद घेत आहेत. देशाला अस्थिरतेकडे घेऊन जाण्याचे हे एक लक्षण आहे.
प्राचीन काळच्या यज्ञांची आणि त्याबरोबर अन्य बाबींची माहिती या पुस्तकात मिळते. आचार्य कोसंबींच्या मते, श्रीकृष्ण हा प्रण्यांच्या यज्ञासाठी होणाऱ्या कत्तलीविरोधात बोलणारा पहिला माणूस होता. त्याला गोपालक म्हटलं जातं आणि त्याचं लहानपण हे गुरांच्या सान्निध्यात गेले. जनतेच्या विरोधाबरोबरच बुद्ध आणि जैन धर्माच्या प्रभावाने यज्ञातील प्राण्यांच्या विनाकारण हत्येला चाप बसला. गाय नेमकी केव्हां पवित्र झाली, आणि लोकांनी गोमांस खाणे कधी बंद केले हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही.
मेरठमधील मिथिलेश सिंग लेखिकेला खरे गोरक्षक आणि फोटोबाज गोरक्षक यांच्यातील फरक सांगतो. अनुदानित नंदिनी गोशाळेत तिला घेऊन जातो. गोशाळेतील जनावरांना चारा आणि पाणीही पुरेसे मिळत नाही, हेही सांगतो. कारण असे की, सरकार प्रत्येक जनावरामागे दर दिवसाला वीस रुपये अनुदान देते. पण प्रत्येक जनावराला रोजचा चारा आणि पाणी यासाठी सव्वाशे ते दीडशे रु. खर्च येतो. भटक्या गाईंबाबत एक बाब लक्षणीय आहेः ज्यांना गाईंची काळजी घ्यायची नसते ते त्यांना दूध काढून मोकाट सोडून देतात आणि संध्याकाळी पुन्हा दूध काढायला नेतात. त्यामुळे त्या गाई कचऱ्याच्या ढिगातही खाताना दिसतात. याच गोशाळेतील मिथिलेश म्हणतोः खरं तर मोदीसरकारमुळे आतची निराशा झाली आहे. त्यांनी गोरक्षणाचा मुद्दा उचलून धरला, ज्यामुळे अनेक लोक चळवळीकडे आकर्षित झाले. पण ते फोटो आणि पेपरमधल्या बातम्यांपुरते मर्यादित राहिले. अन्यथा ते काम करत नाहीत. अशाच गोशाळांचे वर्णन लेखिका करते आणि सीमाभागातील गुरांच्या तस्करीची आकडेवारीसह माहितीही देते. पोलिसांना समांतर अशी यंत्रण तयार करणे ही एक प्रकारे या उजव्या विचारसरणीची पद्धत आहे असे लेखिकेचे मत आहे.
हेही वाचा - भाजपला मुस्लिमांची मने जिंकता येतील? - कलीम अजीम
अहिंसा ही जैन धर्माकडून मिळालेली देणगी आहे, असे सांगून लेखिका म्हणतेः ही देणगी अशा वेळी मिळाली की, जेव्हां हिंदू धर्म हा पूर्णपणे हिंसा, युद्ध, यज्ञासाठी प्राण्यांची हत्या यात बुडालेला होता. कदाचित त्यामुळेच आज गोहत्येच्या नावाने लोकांना ठेचून मारले जात असतानाही, धर्माच्या नावाने दंगे होत असताना बहुसंख्य समाज गप्प आहे. बुद्धांनीही अहिंसेचा प्रचार केला, पण सामान्य जनता आणि भिक्खूंना मांस खाण्यास मनाई केली नाही.
माहिती अधिकाराने घेतलेल्या गुन्ह्यांच्या शोधाबाबत राज्यानुसार आकडेवारी दिली आहे. त्याचप्रमाणे गोहत्येसंबंधी घटनाही पब्लिक युनियन फॉर डेकोक्रेटिक राइटस् (पीयूडीआर). या संस्थेच्या अहवालावरून दिल्या आहेत. त्याचा निष्कर्ष असा की, भाजप सरकार सत्तेत असलेल्या राज्यांत गोमांसाला धरून जास्त वाद आहेत. गोरक्षण कायद्यांमुळे भटक्या गुरांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे, पण त्या मुद्द्यांवर शेतकरी बोलायला तयार नाहीत, त्यामुळे या कायद्यांना म्हणावा तितका विरोध झालेला नाही. काळ बदलला तरी गाईच्या पावित्र्याबाबत लोकांच्या भावना आणि बदललेल्या नाहीत, उलट अधिकच घट्ट झाल्या आहेत. त्यामुळे गरज पडेल तेव्हां गोरक्षणाचा मुद्दा राजकारणात वापरला जाणारच. त्यामुळे गोरक्षण चळवळीचा कोणी प्रतिवाद करत नाही. प्रत्येक राजकीय पक्षाने त्यापुढे नतमस्तक होऊन गाईच्या पावित्र्याला मान्यता दिली आहे. त्यामुळेच गोरक्षा चळवळीला आव्हान नाही.
पशुंच्या कत्तलीनंतरही त्यांना व्यावसायिक मूल्य असते. त्यामुळेच त्यांना पाळणे शेतकऱ्यांना परवडते. जिवंतपणी आणि मेल्यावरही हे प्राणी माणसाला उपयुक्त ठरतात. त्यांचे कातडे, निरुपयोगी भाग, हाडं यांचा वापर करून जिलेटिन, खाण्याच्या पदार्थात वापरले जाणारे डी-कॅल्शियम फॉस्फेट, आतड्यांपासून आवरण, हाडे आणि शिंगांपासून शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. फार्मास्युइटिकल कंपन्यांतही रक्ताचा वापर केला जातो. त्यांच्या चरबीचा वापर होतो आणि टाकाऊ पददार्थांचा झाडांसाठी किंवा पाळीव प्राण्यांचे अन्न म्हणून वापर होतो.
पशुगणनेच्या आकडेवारीवरून दिसतं की, प्रत्रक्ष परिस्थिनी गोरक्षणाचे दावे फोल ठरवते. वाऱ्यावर सोडलेल्या जनावरांची संख्या वाढतेच आहे. कत्तल करण्याऐवजी गुरांना उपाशी ठेवून मारणं हे अविवेकी, आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आणि व्यर्थ आहे. देव आणि धर्माच्या नावाखाली सगळ्या बंदी खपून जातात. एखाद्या गोष्टीच्या पावित्र्याला प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. जो विचारील त्याला समाजाबाहेर काढले जाते. पावित्र्याच्या नावाखाली राजकारण केले जाते. शेवटी लेखिका म्हणते, अन्नासाठें स्वतःच्याच लोकांना मारून आपण कोणता राष्ट्रवाद घडवू पाहतो आहोत ? अशा पद्दतीने देश चालू शकत नाही. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून लोकांनीच पर्याय निवडण्याची गरज आहे. त्यांना अन्नाच्या नावाखाली सर्व काही उद्ध्वस्त करून टाकायचं आहे की एकमेकांचा आदर करीत जीवन जगायचं आहे...
गाईच्या नावानं चांगभलं
लेखकः श्रुति गणपत्ये
प्रकाशकः लोकवाङ्मयगृह, मुंबई
पानेः १९९;
किंमतः ३५०/- रुपये.
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.
Tags: Shruti Ganapatye Beef ban गाईच्या नावानं चांगभलं गोहत्या गोमांस गोवंश गोरक्षक धर्म राजकारण गोमांसबंदी श्रुति गणपत्ये Load More Tags
Add Comment